कोकणी माणसाने कोकण रेल्वेचे स्वप्न खुप वर्षांपासून बघितले होते. पण राजकारण्यानी नेहमी त्याच्या तोंडाला पानेच पुसली होती. पण आता मात्र कोकण रेल्वे प्रत्यक्षात आलीय. कोकणी माणसाचे स्वप्न साकार झाले का, हा प्रश्नच आहे.
पनवेलपासुन थेट बांद्यापर्यंतचा टापु, रेल्वेशिवाय होता. तशी कोकणात जायला बोट होती, पण ती पावसाळ्यात बंद असे. शिवाय ती सगळीच बंदरे घेत नसे, त्याम्ळे तिथुन घरी जायला परत सर्व्हीस मोटर वा बैलगाडीची व्यवस्था करावी लागत असे.
आता जो नॅशनल हायवे १७ आहे त्याची अवस्था पुर्वी बिकट होती. सध्या आहे तोही थेट समुद्रकिनार्यापासून दूरवरूनच जातो. अगदी मालवण, रत्नागिरी हि मोठी गावेदेखील, त्या रस्त्यापासुन दूर आहेत. मग कोकणात जाण्यासाठी वरच्या मार्गाने म्हणजे कोल्हापुरवरुन जावे लागायचे. ( आणि घाटी हमाल डॅंबिस असे कोकण्याना वाटत असल्याने, बाचाबाची नेहमीचीच. )
पण आधी पनवेल, मग रोहा आपटा असे करत, शेवटी कोकण रेल्वे, एकदाची पुर्ण झाली. ती पुढे मडगावला जोडण्यात आली. तसे मडगावला रेल्वे स्टेशन होतेच. बेळगाव वास्को मार्गावरच्या गाड्या तिथुनच जात असत.
आधी निराश झालेल्या कोकणी माणसाने, तो मूळातच सोशिक असल्याने, कोकण रेल्वेशी जुळवुन घेतले.
नेमक्या काय अडचणी आहेत, त्या बघु या. एक तर या मार्गावरची बहुतेक स्थानके, मुख्य गावापासून दूर आहेत. त्यामूळे एस्टीला पर्याय नाहीच. गाड्यांच्या वेळा संभाळत एस्ट्या जातात खर्या, पण डबल प्रवासाचा त्रास आहेच.
दुसरे म्हणजे, हा संपुर्ण मार्ग एकेरी असल्याने, गाड्यांच्या संख्येवर नियंत्रण आलेय. दोन गाड्यांमधील अंतर बरेच असते. पण तरिही कर्नाटक, केरळ इथे जायचा वेळ खुप कमी झालाय, रो रो गाड्यांमुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी झालाय.
तिसरी अडचण आहे ती दरडी कोसळण्याची. कोकणातला दगड तितकासा मजबुत नाही. कोकण रेल्वे विक्रमी वेळात आणि कमी खर्चात पुर्ण केली आहे, त्यामुळे जिथे जिथे डोंगर फ़ोडुन मार्ग काढला आहे, तिथे व्ही शेप न घेता यु शेप घेतला आहे. उभ्या भिंतींमूळे अर्थातच दर पावसाळ्यात दरडी कोसळतात.
हा संपुर्ण मार्ग एका पातळीत आहे. इथे कुठेही चढ उतार नाहीत. जिथे डोंगर आडवा आला तिथे बोगदा आणि जिथे दरी आहे तिथे पूल, असे करत हा मार्ग बांधलाय. शिवाय हा मार्ग बहुतांशी गावाबाहेरच्या दुर्गम भागातुन जात असल्याने, अपघात झाल्यास मदतकार्यात नेहमीच अडचण येते.
तरिही या मार्गावरचा प्रवास म्हणजे एक सुखद अनुभव ठरतो. मला हा प्रवास करायची संधी अनेकवेळा मिळाली, त्याच्याच य आठवणी.
या मार्गावरची सगळ्यात जलद गाडी म्हणजे, जनशताब्दी एक्सप्रेस. या मार्गावरचा पहिला प्रवास याच गाडीने झाला. भल्या पहाटे मुंबईहून हि गाडी सुटते. ( पुर्वी कुर्ला टर्मिनस वरुन सुटायची. ) आणि दुपारच्या आत मडगावला पोहोचते. तिथुन दुपारीच निघुन रात्री मुंबईला येते. या मार्गाचे सौंदर्य बघायचे, तर दिवसाच प्रवास करायला हवा, ती हौस या गाडीत भागवता येते, पण प्रवासात एक दिवस जात असल्याने, माझ्यासाठी हि गाडी सोयीची नव्हती. पुर्वी या गाडीच्या तिकिटात, जेवण पण मिळत असे, नंतर ते बंद करण्यात आले. म्हणजे जेवण मिळते पण ते विकत घ्यावे लागते.
माझा जास्तीत जास्त प्रवास हा कोकणकन्या एक्स्प्रेसने झाला. गोव्याहुन मुंबईला येण्यासाठी सगळ्यात सोयीची गाडी. हि साधारण संध्याकाळी सहा वाजता मडगावहुन सुटते. आणि पहाटे दादरला पोहोचते.
मडगाव सोडल्यास गोव्यातील इतर स्थानकेही मुख्य गावापासुन दूरच आहेत, पण रेल्वेचे बुकिंग पणजीच्या कदंबा स्टॅंडवरच होते. ईतरहि एजंट आहेत. एक विचित्र प्रथा म्हणजे, तिथे बुकिंग फ़ॉर्मचेही दहा रुपये द्यावे लागतात. पण तरिही बाकि सोयी छान आहेत.
गोव्यातील मुख्य स्थानक मडगाव. ते जुने आहे आणि गावापासुन थोडे दूरच आहे. पण तरिही ते सुबक आहे. गोव्यातील प्रथेप्रमाणे प्रशस्त आणि स्वच्छही आहे. आवारातच रेस्टरुम्स आहेत, पण रेल्वेच्या नियमाप्रमाणे त्या फारच कमी वेळा उपलब्ध असतात. स्थानकातच नेटकॅफ़े आहे. आवारात काहि खास झाडे आहेत, उंडीचे फुलणारे झाड स्टेशनला लागुनच आहे. मडगाव कारवार शटलमूळे हे स्थानक कायम गजबजलेले असते.
कोकण कन्या एक्स्प्रेस अत्यंत स्वच्छ असते. तिला अलिकडे आय एस ओ मानांकन मिळाले. माझा प्रवास कायम एसी स्लीपरने होत असल्याने, या प्रवासाचा शीण अजिबातच जाणवत नाही.
या गाडीला डिझेल इंजिन असते. गाडेच्या लान्बीपुढे ते पिटुकले दिसते, आणि मधला भाग तर जाळीदार असल्याने, पोकळही दिसते. भारदस्तपणा कसा तो नाहीच. मडगावहुन सुटायला या गाडीला बहुतेकवेळा उशीरच होतो. पण तरिही हा उशीर मुंबईपर्यंतच्या प्रवासात भरुन काढला जातो.
गाड्याना उशीर किंवा खोळंबा व्हायचे मुख्य कारण म्हणजे एकेरी मार्ग. संपुर्ण मार्गावर समोरासमोरुन गाड्या एकमेकीना क्रॉस करु शकत नाहीत. असे क्रॉसिंग फक्त, स्थानकावरच होते, म्हणुन दुसरी गाडी स्थानकात यायची वाट गाड्याना बघावीच लागते. हा खोळंबा कधीकधी अर्ध्यापाऊण तासाचाही असतो. पण अश्यावेळी बहुदा घोषणा केली जातेच.
पणजी, म्हापसा या गावात रेल्वेची स्थानके नाहीत. पणजीसाठी ओल्ड गोवा म्हणजेच करमळी हे स्थानक जवळ आहे तर म्हापश्यासाठी थिवी.
पणजीपासुन साधारण १२ किलोमीटरवर करमळी आहे. पणजी स्थानकातुन, ओल्ड गोव्यासाठी कायम बसेस सुटतात. त्यापैकी एखादी पकडुन चर्चजवळ उतरले कि दुसरी गावात जाणारी बस पकडुन, थेट स्थानकात जाता येते. सामान थोडे असेल आणि सडे असाल तर पायलटनेही जाता येते. ( पायलट म्हणजे गोव्यातील बाईक टॅक्सी ) रिक्षाने जायचा पर्याय मात्र तितकासा सोईस्कर नाही.
दोन बसची कटकट नको असेल तर त्याच बसने रेल्वे पुलावर उतरुन जाता येते. ( स्टॉपचे नाव पुलार, खास गोव्याचा शब्द. ) या पुलावरुन थेट ट्रॅकवरच उतरता येते आणि त्यातुन चालुन, स्थानकात जाता येते. हे स्थानक माझ्या अत्यंत आवडीचे. मडगावपेक्षा कमी गजबजाट हे एक कारण पण महत्वाचे कारण म्हणजे, या स्थानकाजवळ असलेली विस्तीर्ण मोकळी जागा आणि तिथे दिसणारे पक्षी. नजर पोहोचेल तिथपर्यंत हा दलदलीचा भाग आहे. हिरव्या पिवळ्या रंगाची इथे उधळण असते. यातच पांढरी भातकमळे, निळी , गुलाबी फुले उमललेली असतात. पण सगळ्यात आकर्षक असतात ते तिथले पक्षी. निळे, तपकिरी, पांढरे अश्या अनेक रंगांच्या पक्ष्यांचे थवे तिथे खेळत बागडत असतात. मधुनच आकाशात फ़ेरफ़टका मारुन, परत अड्डा जमवतात. जाणार्या रेल्वेगाड्यांची ते दखलही घेत नाहीत.
या स्थानकाच्या दोन फ़लाटाना जोडणारा एक सुंदर पुल आहे. या पुलावरुन या पक्ष्याना न्याहाळणे आणि फोटो काढणे हा माझा आवडता उद्योग असायचा. गाडीला उशीर झाल्याचे अजिबात वाईट वाटत नसे. हि जी जागा आहे ती आहे स्थानकाच्या पुर्वेला, त्यामूळे मावळतीची सोनेरी किरणे या जागेवर पडली तर सगळ्या दृष्यालाच छान झळाळी येत असे. अश्यावेळी चुकुन गाडी वेळेवर आली, तर मला जरा वाईटच वाटत असे.
बाकि हे स्थानकही चिमुकले आणि छान आहे. अगदी स्थानकातच सोनचाफ़्याची फ़ुलणारी दोनतीन झाडे आहेत.
डब्यातले बर्थ नंबरही मला पाठ असल्याने. मला बर्थ शोधायला त्रास होत नाही, सामानही मोजकेच असल्याने, मी मिनिटभरातच पुस्तक उघडुन वाचायला सुरवात करतो.
मला कायम खालचा बर्थ आवडत असल्याने, तिकीट काढतानाच माझी निवड मी नोंदवतो. पण मी तिथे बसलो, कि हळुच मला बर्थ बदलायची विनंति केली जाते, अगदीच निकड भासली तर मी विनंति मान्यही करतो, पण उगीचच, मला गृहीत धरणार्यांची विनंति मात्र मी धुडकावुन लावतो. वरती बुकिंग करतानाच का नाही खालचा बर्थ बुक केला, असे विचारतोही.
या मार्गावरची थिवीम आणि पेडणे स्थानकेही छान आहेत, पण माझ्यासाठी ती सोयीची नव्हती. मडगाव ते करमळी दरम्यान झुआरी नदीवरचा मोठा पुल रस्त्याला समांतरच जातो पण मांडवी ओलांडताना मात्र, गाडी पणजीच्या बर्याच पुर्वेकडुन जाते. त्या पुलावरुन रात्रीची पणजी छान दिसते, टेकडीवरचे विधान भवन, त्यावरचा तो खास दिवा, दुरवरच्या अग्वाद किल्ल्यावरचा दिवा, मांडवी पुलावरचे दिवे छान दिसत असतात. हा टप्पा ओलांडला कि गाडी अगदी वेगळ्याच भागातुन जायला लागते.
बाहेरचा चंद्र चांदण्या निरखुन झाल्या कि मी परत जागेवर जाऊन बसतो. या गाडीतले खाद्यपदार्थहि माझ्या खास आवडीचे. चहा कॉफ़ी बरोबरच इथे टोमॅटो सुप, मसाला दूध, सोलकढी मिळते. मेथी कबाब हा एक खास प्रकार. मटका दहि, फ़्रुट चाट हे पण खास. जेवण मात्र तितके चांगले नसते, मेथी मलाई मटर, पातळ डाळ चपाती भात वगैरे असते, पण जेवणासोबतचे पापड मात्र खुपच वाईट असतात. त्याना अमोनियाचा वास येत असतो. आमटीलाही चव नसते पण सोलकढी उपलब्ध असते. जेवणानंतर फ़्रुट चाट, मटका दहि किंवा गुलाब जाम मजा आणतात. या गाडीत सकाळी मात्र चहा कॉफ़ीशिवाय काहिच मिळत नाही, त्यामुळे सकाळी काहि खायचे असेल तर रात्रीच घेऊन ठेवणे योग्य असते.
बरेच जण घरुन डबा आणतात. आणि साग्रसंगीत मांडुन जेवतात. पण हे जेवण येते रात्री नऊ नंतर, त्यामुळे तो पर्यंत टाईमपास करावाच लागतो. एरवी मला प्रवासात वाचन जमत नाही, पण या गाडीत मात्र बाहेरच आवाज नसल्याने, छान वाचन होते.
कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीनंतर मात्र गाडी बहुतेक भरते. बहुतेकवेळा या स्टेशनवर क्रॉसिंगमूळे खोळंबा होतोच. अनेकवेळा सावंतवाडीला पॅलेस ऑन व्हील्स दिसते.
या गाडीच्या स्वच्छतेकडे खास लक्ष दिले जाते. खाली पडलेला कचरा तत्परतेने उचलला जातो, बाथरुम्सदेखील स्वच्छ ठेवली जातात.
जेवण आटपल्यावर पैसे घेणारा मात्र यायला उशीर कार्तो. पण एकदा ते चुकते केले कि अगदी घरच्यासारखी छान झोप लागते. आणि घरच्याप्रमानेच मला भल्या पहाटे जाग येते. बर्याच वेळ नॅशनल हायवेशी फारकत घेत चाललेली गाडी नागोठण्यापासुन रस्त्याशी लपंडाव खेळत चालते. पेणच्या आधीच्या इस्पात कारखान्याची प्रचंड निळी ज्योत, पहाटे सुंदर दिसते. कर्नाळ्याचा सुळकाहि अंधारात उठुन दिसतो.
पनवेलच्या आधी गाडी एक मोठे वळण घेते. आणि पनवेल स्थानकात शिरते.
पनवेलहुन कुर्ल्याला यायला तसा माझ्यासाठी लोकलचाही पर्याय आहे. ( लोकल वाशी, मार्गे कुर्ल्याला जाते ) पण तरिही मी याच गाडीने दादरपर्यंत जातो. ( हा मार्ग कळंबोली, दिवा, ठाणे असा आहे ) ठाण्यापासुनच मी दारात उभा राहतो. कुर्ल्याला गाडी स्लो व्हावी आणि मी उतरावे अशी खुपदा इच्छा होते खरी, पण अजुन एकदाही तसे झालेले नाही.
खरे तर पनवेल ते दादर हा तासाभराचा प्रवास. पण एकदा मजाच झाली, पनवेलला साडेचार वाजता गाडी उभी असताना अचानक सगळीकडे धुके भरुन आले, मग गाडी अगदी पुलंच्या शब्दात रुळावर म्हशींचा तांडा आल्याप्रमाणे शिट्या वाजवत हळुहळु आणावी लागली. दादरपर्यंत यायला गाडीला चक्क तीन तास लागले होते.
परत गोव्याला जायला मात्र माझ्यासाठी हि गाडी सोयीची नसायची. रात्री अकराला इथुन निघुन सकाळी दहा साडेदहाला गोव्यात पोहोचते.
बाकिच्या गाड्या, आणि हट्टाने पावसाळ्यात केलेला दिवसाचा प्रवास, या बद्दल परत कधीतरी. गाडीत भेटलेले प्रवासी पण भेटवायचे आहेत.
मस्तच लिहिले आहे.......
दिनेशदा...............
कोकण रेल्वेचा प्रवास मस्तच...... मी खुप दिवसांपासुन ठरवतो आहे की कोकण रेल्वेने प्रवास करायचा...
पण जमत नाही... दुधाची तहान ताकावर तसे तुमचे वर्णन वाचुन सध्या समाधान करुन घेतो....
अरे वा!
सविस्तर लिहिल आहे.


एक कोकण रेल्वे होताना मारामार झाली आता डबल मार्ग कधी होइल काय माहीत.
स्टेशन्स लाम्ब आहेत हे खरे.
मी पाहिलय रत्नागिरीचे स्टेशन रत्नागिरि शहरापासुन ८ किमी लांब आहे.
कोकण रेल्वेने एकदा प्रवास करण्याची ईच्छा आहे बघु कधी पुरी होतेय
कोल्हापुर जर काहितरी काड्या करुन रत्नागिरि किंवा गोव्याला जोडल तर धमाल येइल
योग्य वेळी
दिनेशदा, माझ्यासाठी तुम्ही अगदी योग्य वेळी अतिशय उपयुक्त अशी ही गोव्याची लेखमाला चालू केली आहे. १६ ते १९ जानेवारी गोव्याला जात आहोत. १९ चा परतीचा प्रवास 'कोकणकन्या' नेच करत आहोत.
दिनेशदा...
तुमच्या निरिक्षणाला दाद द्यायला हवी!



कोल्हापूर ते गोवा
झकास,
कोल्हापुर कोकणच्या तुलनेत खुपच उंचावर आहे. त्यामुळे तसा रेल्वेमार्ग होणे कठिण आहे. पण वैभववाडी हे कोकण रेल्वेचे स्टेशन आहे. दुहेरी मार्ग शक्यच नाही. कारण तश्या सोयी नाहीत.
मंजू आणखी माहिती हवी असेल तर मी आहेच की.
मस्त
दिनेश, छान लिहीलय. पण थोड ललीत न होता माहिती देण्याच्या अनुषंगाने लिहील्यासारखे वाटले.
मी २ वेळाच या रेल्वेने गेलो. दोन्ही वेळेस दिवसा. फारच मस्त प्रवास आहे. पहील्यावेळेस बहूतेक जनशताब्दीने गेलो. साडेतीन तासात ठाणे चिपळूण. बाबांना कधी या रेल्वेने जाता आले नाही पण मी गेलो तेंव्हा तेच जास्त खूष झाले होते.
तू लिहीलेल्या काही अडचणींबद्दल अस आहे की मुद्दामच मार्ग, स्थानके अशा ठिकाणी बांधली की पुढे ती मोठी करण्यासाठी जागा घेऊन ठेवली आहे. ते ऐन गावाच्या जवळ शक्य झाले नसते. तसच मार्गही वस्तीपासून लांब ठेवला आहे कारण को़कण रेल्वे अतिजलद असावी असच ठरवल होत. मुंबईत लोकलला वेगात जाता येत नाही हे आपण पहातोच. अतिजलद म्हणूनच जेवढा मार्ग सरळ तेवढ चांगल अस पाहताना गावाजवळील लोकांकडून तशी भूमी संपादन करणे अवघड होते.
ही कारणे मी कोकण रेल्वे प्रोजेक्टवर काम करणार्या अभियंत्याकडून ऐकली आहेत.
तसही ८ १० किमी ही अंतरे आता 'फार नाही' अशीच होत जाणार आहेत. मला स्वतःला ती थोडी लांब आहेत हेच छान आहे वाटते. गाडीची गर्दी, वाहनांचा आवाज, प्रवाश्यांचा गोंधळ अस काही पहायला ऐकायला न लागता लांबवरून फक्त ईंजिनाची शिट्टी ऐकणे फार सुखावह आहे.
मस्तच!
दिनेशदा, हा लेख आवडलाच.
बरेचदा कोकणात इतरत्र फिरता यावं म्हणून (आणि नवरा भारतात गाडी चालवू शकतो म्हणूनही) कुठेही गाडी घेऊन फिरलोय.... येत्या मोहिमेत ठरवून कोकणची यात्रा कोकण रेल्वेने करणार आहोत... काय होईल ते होईल!
जावू तेव्हा तुम्हाला विचारेनच!
अडचणी
सव्यासाची, कोकणाचे वर्णन करत बसलो तर माहीती देता येणार नाही. तशी ललित मधे माहीती द्यायला हरकत नसावी.
स्थानके गावापासून लांब असल्याने, काही गावाना जायला खूपच त्रास होतो. मालवण तर तब्बल ३० किमीवर आहे. त्यामुळे गाडितून उतरलो तरी पोहोचल्याचे समाधान मिळत नाही.
अपेक्षित वेग अजून जमवता आलेला नाही. एकेरी मार्गामूळे ते शक्यही व्हायचे नाही. म्हणजे क्रॉसिंगसाठि खोळंबा होणारच.
दिवसाच्या प्रवासाबद्दल मात्र अजून लिहायचे आहे.
छान
छान लेख, दिनेशदा. ह्या रेल्वेचा कोकणचा कअलिफोर्निया करण्यात महत्वाचा वाटा असणार असे वाचले होते, ते खरे का?
कोंकण एक स्वप्न
भारतात आल्यावर खुप फ़िरायचय..सुरवात आवडत्या कोंकणापासुन करायचिय.. परदेशात अनेक टिकाण बघितली तरी देशात काहिच बघितल नसल्याची खंत आहेच..
दिनेशदा लेखणाची फ़र्माईश पुर्ण केलित ..धन्स
ती जनशताब्दीच का?
मस्त माहिती आहे. मी रत्नागिरीला २-३ वेळा कोकण रेल्वेने गेलो आहे पण काही वर्षांपूर्वी एक गाडी चालू झाली मुंबई हून सकाळी सुटणारी, बहुधा जनशताब्दीच असावी, त्याला एसी न ठेवता नुसती चेअर कार आहे असे ऐकले होते, त्यामुळे त्यातून जायचे आहे. कोकणच्या प्रवासाची मजा मोकळ्या हवेशीर खिडक्या आणि कधीही दारात जाऊन उभे राहता येणार असेल तर जास्त येइल असे नेहमीच वाटते (एसी मधे फारच अलिप्तपणे गेल्या सारखे वाटते)
एकदा रत्नागिरी हून नाशिक ला जायचे होते म्हणून तेथून पुढे दिल्लीपर्यंत जाणार्या एका गाडीने रत्नागिरीहून बहुधा सकाळी निघालो, ती दिव्यापर्यंत वेळेत आली पण नंतर डोंबिवलीजवळ उगाचच तासभर तिला उभी करून ठेवली होती आणि फास्ट लोकल्स ची वेळही झालेली नव्हती. मला वाटले मध्य रेल्वे वरून ती गाडी तिकडे ट्रान्स्फर केल्याने म्.रे. वाले असे करतात
आणखी एक म्हणजे मी पहिल्यांदा ९६-९७ मधे गेलो होतो तेव्हा स्टेशनांमधे आणि गाडीतही कोकणी किंवा मराठी पद्धतीचे, कदाचित जवळपास बनले जाणारे पदार्थ येत विकायला. आता काय आहे माहीत नाही. असे ऐकले होते की ती कंत्राटे सुद्धा नंतर उत्तर भारतीयांकडे गेली.
हल्लीच
हल्लीच कोकणकन्येने प्रवास केला.. मुम्बई ते मडगाव.. रात्री ११ ला गाडी वेळेत सुटली.. परंतू अतिशय सावकाश जात होती,प्रत्येक स्टेशन वर उगीच १०-१० मि. थांबत होती, त्यामुळे मडगाव ला १०.३० ला पोचायची गाडी १.३०-२.०० ला पोचली.. माहीत नाही असे नेहेमीच होते, की त्या दिवशीच झाले होते.. गाडी खूपच छान आणि स्वच्छ आहे,परंतू थोडीतरी वे़ळेत गेली पाहीजे...
बाकी वर्णन खूप छान.. कोकण सगळंच सुंदर आहे! कितीही आणि कुठेही फिरलं तरी मस्त वाटतं!!
उत्तर
भाग्य,
कॅलिफोर्निया नको, कोकण तसेच राहु दे. गोव्यातील व्यवस्था अपुरी पडत असल्याने म्हणा किंवा आणखी काहि कारणाने, आता पर्यटक कोकणात जातात. सोयी झाल्यात. अलिकडे मालवणला व्हेल्स दिसले. डॉल्फिन्स दिसतातच. कोरल्स पण दिसायला लागलेत. वॉटर स्पोर्ट्स सुरु झालेत. स्थानिक तरुण या उद्योगात शिरलेत, पण गोव्याप्रमाणे ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय न माजो, हि इच्छा.
गणपतिपुळ्याला तर बार्स चे पेवच फुटलेय.
फारेंड, जनशताब्दी च्या खुर्च्या प्रवासाच्या दिशेने नसल्या, तर फार वैताग येतो.
bsk मुंबईहुन जायला ती गाडी अजिबात सोयीची नाही. पुढे लिहितो आहेच.
छान
लेख मस्त आहे.
कोकण रेल्वे च्या संदर्भात एक गाणे आहे, "आली कोकणची गाडी दादा आली कोकणची गाडी... आताच रोहा मागे पडले तयार ठेवा नारळ पोहे...".
मला ते गाणे हवे होते. कोणाकडे आहे का? ८-९ वर्षापुर्वी म.टा. मध्ये आले होते. जवळपास १३-१५ कडवी होती.
माझी आई (~५८ वर्षे वय) सांगते की तिच्या लहानपणी दंडवतेंच्या प्रचाराला सगळी कार्यकर्ते "येणार येणार कोकणरेल्वे येणार" अशा घोषणा देऊन प्रचार करायचे. तेव्हा सुरु झालेली घोषणा ४०-४५ वर्षांनंतर प्रत्यक्षात आली
दिनेश मस्त विषय
कोकण माझ्याही प्रेमाचे.. मी मुळातच कोकणी...
कोकण रेल्वे सुरु झाली तेव्हा कोकणी स्वभावाप्रमाणे 'आट दिवसात बंद पडतली' हे भवितव्य ऐकले होते. पण छान चालली आहे..
'परदेसाई' विनय देसाई
सगळ्यानी एकदा पावसाळ्यात या रे
सगळ्यानी एकदा पावसाळ्यात जमा रे. कोकण रेल्वेचा प्रवास करु. मस्त भिजू.
विनय,
मालवणलाच आता कोरल्स वगैरे दिसायला लागली आहेत. किल्ल्याच्या मागे आहे म्हणे ती जागा.
माझे कोकणकन्या
दिनेशदा,
माझे घर स्टेशपासून अगदी जवळ आहे. गाडी स्टेशनमधे येताना आणि जाताअ आमच्या घरातून दिसते. आम्हीतर आज शताब्दि उशीरा आली वाटतं , कन्या गेली आता तरी झोपा अशी वाक्यं वापरतच असतो.
कोकन रेलवेच्या प्रवासाच्या माझ्या खूप आठवणी आहेत. कित्यक शुक्रवार रात्र आणि रविवार रात्र याच गाडीमधे घालवले आहेत.
कोकण रेल्वे हा इंजिनीअरिंगमधला चमत्कार आहे. अशक्य वाटणारी गोष्ट खरी झालेली आहे.
मला कोकणकन्या हे गाडीला दिलेले नाव प्रचंड आवडते. नाव सुंदर तर आहेच पण एकदम apt पण आहे.
कोकणकन्या...
दिनेशभाऊ,
झकास वर्णन आहे.. एकदा देशात गेलो की हा प्रवास नक्की करणार आहे, त्यातून तुम्ही इतक आग्रहाच निमन्त्रण देत असाल तर नक्कीच येवू.:)
प्रवास.
आधी सांगितल्याप्रमाणे १९ जानेवारीला गोवा ठाणे परतीचा प्रवास 'कोकणकन्या'ने केला. मस्त गाडी आहे एकदम. क्रमळि स्टेशनला अर्धा तास गाडी उशीरा आली. पण ठाण्यातलं टायमिंग अचूक पाळलं. गाडीतलं जेवण पण चान्गलं होतं. आत्तापर्यंत या गाडीने जो काही २-३ वेळ प्रवास केला तो सगळ संगमेश्वरपासून होता. त्यामूळे गाडीत चढायचं ते मूळी झोपायलाच असं काहीसं व्हायचं. पण हा प्रवास अगदी सुखाचा झाला.
छान..
पनवेल कोकणात येते हे माहिती नव्हते.
दिनेश, आपल्या आवडीनिवडी उत्तम जमतात. मी गीतांजलीनी सकाळी अकोल्याला निघतो कारण सकाळची ती रम्य वेळ आणि खिडकीतून दिसणारा निसर्ग ह्यांचा आनंद घायचा असतो. मुद्दाम स्लीप्र २रा दर्जाचे तिकेट काढतो कारन येसींना काच असतात. त्यातून बाहेरचे नीट दिसत नाही.
कोकण रेलवे एक चमत्कार. हाच
कोकण रेलवे एक चमत्कार.
हाच चमत्कार पून्हा एकदा कोकण रेल्वे (कमिश्निन्ग स्टाफ) नी कश्मिर खोर्यात केला