समज-१ ची लिन्क
तसा काही संदर्भ नाही... पण समज-२ वाचून गैरसमज नको म्हणून 
*************************************************************************
शाळेत जात होते तोपर्यंत ठीक होतं.... म्हणजे आईचं व्यवस्थित लक्ष होतं आणि त्याहीपेक्षा एकाच गावात घर-शाळा त्यामुळे तिचं हेरखातं आजुबाजूला असल्याची मला आणि तिलाही खात्री होती.
कॉलेजात जाणार म्हटल्यावर....
लक्ष दे. धेंदरटासारखी कुणाहीबरोबर काहीही बोलत बसू नकोस...
कुणाचं काय सांगता येतय....
आपण आपलं बघावं. आपला अभ्यास बरा की आपण बरं....
तुला सवय आहे नसत्या भानगडींमध्ये गूंतवून घ्यायची....
कसली कसली माणसं भेटतील... आपण आपलं सावध असावं...
धूर्त असतात माणसं... कशी, कुठे जाळ्यात अडकवतील....
आयुष्यातून उठायला फार मोठं कारण लागत नाही.... नुसती बदनामी पुरते....
म्हणजे ह्यात माणूस हा "पुरुष माणूस" ह्या अर्थाने हं!
एक ना दोन. कमीतकमी एकोणीसशे बत्तीसतरी सूचना त्यांचा क्रम बदलून, वेगवेगळ्या प्रसंगी, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, किंवा तिला सुचेल तेव्हा तेव्हा, किंवा प्रसंगा प्रसंगांना साजेल अशा निवडून वगैरे, वेगवेगळ्या भाषांमध्ये (मराठी आणि मालवणी) पण एकाच टोनमध्ये (काळजी....) इतकेवेळा ऐकवल्यात की.... अगदी आत्ता आत्ता पर्यंत मलाच काय पण भावालाही पाठ होत्या.
मी ह्यातलं सगळं पाळलं असं नाही.
म्हणजे.... धेंदरटासारखी बोललेच, मैत्रिणींच्या "नसत्या" भानगडीत वगैरे कधी कधी त्यांच्यापेक्षाही जास्तच गुंतवून वगैरे घेतलंच.
....पण आई सांगतेय ना? म्हणून मग त्या सगळ्याचीच नोंद झालीच की मनात.
मग जमेल तितकी सावध-बिवध राहिलेच. अगदी धास्तावून नाही पण "मुलीच्या जातीला" हवी तेव्हढी नक्की (आईला हवी तेव्ह्ढी नसावी बहुतेक).
***************************************************************************************
माझ्या लेकाची बारावी संपली, नुकतिच. इथे बारावी पर्यंत शाळेतच असतात. उगीच दोन वर्ष, त्याचं मोठं व्हायचं लांबवल्यासारखं वाटलं..... जरा बरं वाटलं.
त्याच्या कॉलेजच्या गप्पा कधीच सुरू झाल्या....
आणि मला लक्ककन माझे दिवस आठवले... आईची काळजी-चालिसा आठवली.
मनात आलं अगदी चालिसा नाही पण बत्तिशी नाहीतरी किमानपक्षी विसा तरी सुचायला नको मला? काय म्हणायचं ह्याला? आई का सोंग?
ते काही नाही, आपण पण जरा काळजी-बिळजीच्या स्वरात त्याला चार गोष्टी सांगायलाच हव्यात. उगीच काय?...
....................
अन त्याक्षणी अजून एक झटका बसला....
मी ज्याला "काळजीच्या चार गोष्टी" सांगायच्या म्हणते आहे, तो एक 'पुरुष माणूस' आहे.... हो!
"एक पुरुष माणूस"!
ज्याच्यापासून जपण्याचे चौतिसशे प्रकार, आणि एकमेव परिणाम आईने सदैव ऐकवला.... तो "माणूस" आता माझा मुलगा आहे!
***************************************************************************************
किती किती सैरभैर झाले म्हणून सांगू! काही विशिष्ट संकेतांच्या जोखडात आपण किती आणि कसे बांधलेले असतो ते लक्षात आलं.
ही माझी मुलगी.
एक "तरूण माणूस" म्हणून जगात पाऊल ठेवण्याआधी नुसत्या काळज्यांचं ओझं हिच्या पायात अडकवायचं का?
एक "तरूण अन समर्थं" माणूस म्हणून हिच्या "असू" शकण्यावर, "करू" शकण्यावर, "होऊ" शकण्यावर..... अशा अनेकविध "शकण्यांवर" का विश्वास ठेवायचा नाही? पंखात बळ येईल असं, आत्मविश्वासाचं गान का नाही द्यायचं सोबतीला?
हे.. एक नुस्तंच जोखड का? जे आपल्या खांद्यावर आपल्या आई-वडिलांनी दिलं आणि आपण ते मागच्या खांद्यावर सुपूर्त करायचं हे "पारंपारिक" पालकत्वाचं एक "कर्मकांडं"?
की की .... हा आजूबाजूच्या बदलल्या जगाशी आपला खऱ्याअर्थी सुटलेला संबंध की आपल्याच संस्कारांवर आपणच दाखवलेला अविश्वास की...
की दोन्ही?....
हे सगळं आईला का सुचलं नाही? की सुचलं पण बोलून दाखवणं परवडलं नसेल त्यावेळी?......
तिला जोखण्याचं माझं सामर्थ्य नाही..... ती माझी आई आहे आणि माझ्या चांगल्याचाच विचार सदैव उराशी बाळगून वागली, हा माझा दृढ विश्वास आहे.
आता, हा माझा मुलगा.
एक तरूण "माणूस" म्हणून जगात पाऊल ठेवण्याआधी मला तशी काळजी का नाही?
का? तो एक "पुरुष" आहे म्हणून?
मुळातच तो "समर्थ" असल्याची माझी खात्री कशाच्या बळावर? परत.... तो एक "पुरुष" आहे म्हणून?
"समर्थ" म्हणजे नक्की कशासाठी "समर्थ"?
मी नक्की काय गृहित धरतेय इथे?
म्हणजे.....
त्याला कुणी धक्का लावू शकणार नाही....
त्याने केलेला धेंदरटपणा त्याच्या अंगाशी येणार नाही...
नको त्या भानगडींमध्ये गुंतला तरी हरकत नाही....
कसलीही माणसं भेटली, जाळ्यात अडकवलं तरी फार काही बिघडत नाही....
कारण त्याला आयुष्यातून उठवायला थोडिशी बदनामी पुरेशी नाही....
कारण?...
कारण तो पुरूष आहे?
आपण खरच असा विचार करतोय की काय!
मुलाची आई म्हणून, पालक म्हणून माझी भूमिका काय? कोणत्या बाजूची?
ही मी, जी "बाजू" म्हणतेय ती कसली, कोणाची बाजू?
'मुलगा काय किंवा मुलगी काय....' अशी सुरू होणारी वाक्यं.... वापरतो आपण.... पण आपल्याला नक्की किती कळलीयेत, वळलीयेत?
एकदम भंजाळायला झालं, खरच सांगत्ये.
डोक्याचा थोडाफार भुगा पडल्यावर, शेवटी लक्षात आलं की, उगीच शिणवतोय आपण स्वत:ला.
मुलगा आहे आपल्याला...... एक समर्थ मुलगा! आपली बाजू काय असायची? सोप्पय.... कशाला इतका त्रास करून घ्यायचा?
लेकाला जवळ बसवला आणि दोनच गोष्टी सांगितल्या....
तुझा कुणी मित्रं कुणा मुलीच्या बाबतीत काही विपरित घडवत असेल तर कोणतीही किंमत चुकवून ते थांबव....
आणि असलं काही तुझ्या हातून घडत असल्यास ते मी थांबवेन, कोणतीही किंमत चुकवून! हे ध्यानात असूदे....
बाकी सारं "त्याच्यावर" (लेकावर नाही) आणि माझ्या संस्कारांवर सोडून निवांत झाले, 'सोप्पय' म्हणत!
समाप्त.
मस्त......
अगदी नेहमी सारख छान..............
मस्तच
खरच तुमच्या लिखाणाला दाद देण्यासाठी शब्द अपुरे पडतात. फारच अप्रतिम लिहीता तुम्ही! अगदी थेट मनाला भिडणारं. पुढील लिखाणाची उत्सुकतेने वाट पहायला लावणारं.
खरच दाद
मीही हेच माझ्या दोन्ही मुलांना सांगितल होत की ह्या पैकीच एखादी मुलगी तुझी बायको होणार आहे. तिच्याशी तिच्या वर्गमित्रांनी जसं वागावं अस तुला वाटत तसा तू ही तुझ्या मैत्रिणींशी वागला पाहिजेस.मी सारखी तुला टोकू शकणार नाही पण मोठा होण्याच्या प्रक्रियेत जबाबदारी स्वीकारण अध्याहृत असत तेव्हा तुझा conscience तूच. पण तरीही मुलांना काही कमी धोके नसतात्.कुसंगती किंवा प्रलोभनांचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही.तेव्हा धोक्याचा इशारा देण दोन्ही बाबतीत इष्ट ठरेल नाही का?
अन्जलि
सही
तू लेकाला सांगितलेल्या दोन्ही गोष्टी एक आई म्हणून माझ्या आत्त्यांनीही माझ्या आतेभावांना सांगितल्या होत्या. त्यांची जपणूक अजूनही होते.

आणि, मालवणी बोलतय तू?? काय सांगतस तरी काय?? बरा वाटल्यान हां समजून!!
संस्कार
दाद, आमच्या मुलांवर आम्ही काय आणि कसे संस्कार करावेत ह्याचे संस्कार तू आमच्यावर करते आहेस.
btw, तुझ मुलगा खरंच एवढा मोठा आहे? म्हणजे असायला काही हरकत नाही माझी, फक्त तुला आता 'अहो, दादमावशी' असं संबोधावे लागेल....
सोप्पय?
खरच? की ललित संपवण्या पुरत. आपण पालक झालो तरी आपले पालक निवांत होत नाहीत. वडिल म्हणजे संकट आल की तारणार दैवत, तो पर्यंत ते निवांत( नुसते वाटतात), पण 'आई' तिला निवांत हा माहीतच नाही. "पुरे आता काय लहान आहोत का?" हे वाक्य आपण आपल्या आईवडिलांना आणि ते त्याच्या. आणि त्यावर मिळणार उत्तर ही तेच 'पिढीजात'.
संवाद आवडला, तुझ लिखाण हे लेख किंवा ललित असण्यापेक्षा संवाद आहेत अस मला वाटत.
मस्स्त !!
मस्स्त !!
खूप छान
खूप छान लिहीलंस दाद. समज-१ पेक्षा खूप वरचं आहे हे लिखाण. तेही छान होतंच पण हे खूप जास्त छान आहे.
दाद
मस्त लिहीलय.
मला तर नेहमी वाटत कि निसर्गानेच अन्याय केलाय काही गोष्टिंमधे स्त्रीवर. बघ ना, नाही जाता येत तिला मुलासारख वाटेल तिथे, वाटेल त्या वेळी. कायम कुणाच्या तरी सोबतीचा टेकु घ्यायचा, जो मुलांना लागतो अस वाटतच नाही.
मुलाच्या आईची काळजी
दाद,
काळजी मुलाची पण वाटते ग! मुली पण मुलांना संकटात टाकू शकतात. आणि बाकी कुसंगतिचा पण धोका असतोच की, विशेषतः मुले जेंव्हा अनोळखी शहरात, एकटी जातात शिक्षणाच्या निमित्ताने.
माझा मुलगा टोरोंटो ला गेला तेंव्हा मला अशीच काळजी वाटत होती.
प्रत्येकाकडे सद्सद्विवेक बुध्दी असणे महत्वाचे. चांगल्या वाईटाची पारख करता आली पाहिजे आणि चांगल्याची साथ देण्याचे धाडस असले पाहिजे.
चांगला विशय मांडलास! नेहमी प्रमाणे आवडले!
-अनिता
मस्त!
मस्त लिहिलंस दाद! आई ही शेवटी आई असते- मुलाची असो की मुलीची.. त्यामुळे तुला वाटत असलेली काळजी भिडली. आणि शेवट तर लई खास केला आहेस.. अगदी योग्य, आणि पंच असलेला!
लिहित रहा..
छान आहे
अगदी शब्दांचा नेमकेपणा आहे तुमच्या लेखनात.
आवडल
खरय!
खरय! मुलगा काय किंवा मुलगी काय... पालकांच्या काळजीची जात तीच!
हो! मला तितका मोठा मुलगा आहे.... त्यामुळे 'दाद मावशी', 'दाद काकू', 'दीदी', 'दादागिरी', काहीही शोभतं.... आणि चालतही मला. (अगदी 'दादी' केलं नाहीत म्हणजे झालं.)
असो....
आयटे, माझी आई मालवणी पण बाबांकडले वसईचे. त्यामुळे घरात मालवणी बोलली जात नाही. मावश्या-मामांशी आईचं जे गूज चालतं ते मात्रं मालवणीत.... तेव्हढंच ऐकून मालवणी शिकणं काही झालं नाहीये... ही खंत आहे.
'बाकी, कळता माका सगळी'
मीच काय पण नवर्यानेही लेकाला त्याच्या भाषेत जवळ जवळ हेच सांगितलं.
एका मुलीला तिचं 'शील-बिल' काय म्हणतात ते जपण्यासाठी अगदी आजच्याही दिवसातही जितकं "ऐकवलं" जातं... तसं त्याबाबतीतलाच जबाबदारीचा सल्ला किंवा ताकीदही अगदी तीच आई आपल्याच मुलाला देते का? तर 'नाही'.
एक पालक म्हणून जितकं "इतरांपासून जपण्याचा" सल्ला मुलीला दिला जातो, तितका "इतरांना जपण्याचा" सल्ला मुलांना देण्याची नैतिक जबाबदारी आपली सगळ्यांची आहे... इतकच ह्या लेखाचं सार!
हेच ते--
काल अगदी हेच मी आणि माझी नणंद बोलत होतो. मुलींना तर आपण शिकवत असतोच, पण मुलांना काय सांगायच, जेणे करुन उद्या छेडणार्या मुलांमध्ये नाही तर त्यांना सुनावणार्यांमध्ये आपलया घरातला मुलगा असेल. ही जवाबदारी सगळ्यात आधी आई वडीलांची आहे.
तु तुझ्या मुलाला जी वाक्ये शेवटी सांगितलीस, तीच वाक्ये मनात घर करतात्--मुलांच्या. आणि एखाद्या मुलीला वाचवतात, अपमानीत होण्यापासून.
तुझ्या लिखाणाबद्दलच माझ मत तुला माहीत आहेच्--अप्रतिम.
अनघा
खूप झाला!! :)
>>>'बाकी, कळता माका सगळी'
कळता मां? आणि काय व्हया मगे? खूप झाला!!
एक पालक
एक पालक म्हणून जितकं "इतरांपासून जपण्याचा" सल्ला मुलीला दिला जातो, तितका "इतरांना जपण्याचा" सल्ला मुलांना देण्याची नैतिक जबाबदारी आपली सगळ्यांची आहे... इतकच ह्या लेखाचं सार!>>>>
लाख बोललिस बघ!
मुलगा असो मुलगी चांगल वाईट दोघांनाही सारखच कळाव हेच खर..
ए खरंच .. असं सगळे लोकं
ए खरंच .. असं सगळे लोकं अपल्या मुलांना सांगत असतील का??
उलट वटतं मला..
मोकळा सोडतात :-|
दुर्दैव आहे.. समजदार आया (आई चं अनेकवचन) क्वचीत अढळतात मुलांच्या.. आधीच्या पिढीत तरी..
अत्ताच्या आयांचं तुमच्या सारखं असेल तर किती बर होईल..
मग आपली मुलगी असली तरी जिवाला घोर नको
मस्त लिहिलय... समज - १ -
मस्त लिहिलय...
समज - १ - अप्रतिमच....
((तुझा कुणी मित्रं कुणा मुलीच्या बाबतीत काही विपरित घडवत असेल तर कोणतीही किंमत चुकवून ते थांबव....
आणि असलं काही तुझ्या हातून घडत असल्यास ते मी थांबवेन, कोणतीही किंमत चुकवून! हे ध्यानात असूदे..)) समज कम धमकी आवड्ली...
(No subject)
हे आवडलं - समज १
हे आवडलं - समज १ पेक्षाही.
असलं काही तुझ्या हातून घडत असल्यास ते मी थांबवेन, कोणतीही किंमत चुकवून! हे ध्यानात असूदे >> लोहाराचं एकच वाक्य पुरेसं असतं
आवडलं
आवडलं
आवडेश
आवडेश
पट्लं .. अगदीच!
पट्लं .. अगदीच!
(No subject)
खुप छान आहे हे.... आणि पटंलही
खुप छान आहे हे.... आणि पटंलही
मुलगा काय मुलगी , दोघांची
मुलगा काय मुलगी , दोघांची चिंता जगात सारखीच.
माझी मुलगी जराशी आताशीच एकटी कुठे कुठे बाहेर जाते... मला तर उगाच चिंता लागते. खात्री असते मला तिची व ती सांगून जाते.

पण बर्यापैकी काही टवाळ मित्र-मैत्रीणी पण आहेत. पण मी काहीही सांगितले मुलीला की तिला वाटते तिच्या मित्र-मैत्रीणींच्या विरोधातच बोलतेय असे वाटते. तरीही मी बोलतेच.
सगळ्या प्रकारच्या चर्चा नीट करून झाल्यात(दारू, सिगरेट, क्रश, प्रलोभने वगैरे वगैरे...) पण मलाच कळत नाही , कितपत डोक्यात गेलेय, तेव्हा मी ही 'त्याच्यावर' सोडतेय.
दाद , खुपच छान लिहिलंय
दाद , खुपच छान लिहिलंय तुम्ही.
विशेषतः शेवटचे वाक्य तर खासच.
प्रत्येक टप्प्यावर पालक म्हणून आपणही नव्याने शिकत असतो असं वाटतं.
"मुलगा काय मुलगी , दोघांची
"मुलगा काय मुलगी , दोघांची चिंता जगात सारखीच." >> अगदी खरं!
माझा आदी जेव्हा या टप्प्यातून जाईल तेव्हा त्याच्याशी कसे वागायचे, त्याची ही वाट कशी सोपी करायची हे प्रश्न मला आत्ताच कधी कधी अस्वस्थ करतात. त्याला चांगले मित्र असणं फार फार महत्त्वाचं वाटतं मला.
तुझा कुणी मित्रं कुणा
तुझा कुणी मित्रं कुणा मुलीच्या बाबतीत काही विपरित घडवत असेल तर कोणतीही किंमत चुकवून ते थांबव....
आणि असलं काही तुझ्या हातून घडत असल्यास ते मी थांबवेन, कोणतीही किंमत चुकवून! हे ध्यानात असूदे....>>>>> आवडल्....खरच याची गरज आहे...मी म्हणेन प्रत्येक आईने हे आपल्या मुलाला सांगावे...
खुप छान लिहीलय...
सगळ्या प्रकारच्या चर्चा नीट
सगळ्या प्रकारच्या चर्चा नीट करून झाल्यात(दारू, सिगरेट, क्रश, प्रलोभने वगैरे वगैरे...) पण मलाच कळत नाही , कितपत डोक्यात गेलेय <<< सगळ्या आई-बापांना असंच वाटत असतं. आणि इतकं सांगितलंय पण त्यातलं गांभीर्य नक्की थोडं तरी डोक्यात घुसलंय की नाही देवजाणे.. नाहीतर अजून थोडं सांगू या, असा विचार करून पुढची संधी मिळताच (जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे - किंवा मुद्दाम गाडी तिकडे वळवत पण नकळत तिकडे गाडी आल्याचे दाखवत) पुन्हा सूचनांचा भडीमार चालू होतो..........
दाद, चांगलं लिहिलंयत. पहिल्या परिच्छेदातली वाक्ये तर तंतोतंत.
Pages