ढबू.....!!

Submitted by yeda patil on 16 August, 2009 - 03:26

ढबूची आणि माझी पहिली ओळख झाली ती तिसऱ्या इयत्तेत. दुपारची शाळा होती. 'वाणी' गुरुजी त्यांचे लिखाणाचे काम करण्यात मग्न होते. वर्गात कुणी दुपार-डुलक्या घेत होतं, तर कुणी मस्त्या करत होतं, म्हणजे जो तो आपापल्या 'उद्योगात' गुंतला होता. मी ही पाटीवर ९ उभ्या रेषा काढून, त्यांमध्ये १०१ ते २०० असे आकडे लिहीत बसलो होतो. तोच हेडमास्तर वर्गावर आले, त्यांच्यासोबत एक मुलगा होता. त्याने खूप ढगळा पण इस्त्री केलेला पांढरा सदरा घातला होता, डोक्यावर लाल रंगाची टोपी त्याने घातली होती. गुरुजींशी बोलणं संपल्यावर, हेडमास्तर निघून गेले आणि गुरुजींनी त्या मुलाला बसायला सांगितलं.

त्या वेळी आम्ही वर्गात मांडी घालून, अभ्यासाचं दप्तर समोर ठेवून, एकेका रांगेत बसायचो. मी रांगेत पहिल्या जागेवर बसायचो. मला आजही आठवतात ते भाबडे डोळे, त्याची ती शोधक नजर. त्याने पूर्ण वर्ग न्याहाळला आणि तो माझ्या शेजारी येऊन बसला. परत गुरुजी आणि पोरं आपापल्या उद्योगात गुंतली.

"माझं नाव ढबू. ". तो.

"माझं नाव संदीप. तुला घरीही ढबूच म्हणतात? "

"हो. तू पाटीवर हे काय लिहिलं आहे? १०० च्या पुढे काय असत? मी १०० पर्यंत पाटीवर लिहिल्यावर, 'माझा पहिला नंबर', एवढंच म्हणतो, त्या पुढे काहीच नाही. तू १० आणि १, १० आणि २ असं का लिहिलं आहे? त्याला काय म्हणतात? "

मला त्याला म्हणावंसं वाटत होतं की, बाबा रे मी काही आर्यभट्ट नाही, १०१ चा शोध लावायला. तो ते आकडे बघून मला जरा घाबरलेला वाटला. शाळा सुटल्यावर, त्याच्या ह्या प्रश्नावर आम्ही मित्र-मंडळी खूप हसलो होतो. तर असा हा ढब्बू, माझा जीवश्च- कंठश्च मित्र. मला आजवर ह्याने, त्याच्या 'बेसिक' (ही त्याची प्रश्नांची व्याख्याच आहे) प्रश्नांनी हैराण करून सोडलं आहे.

आम्ही ५ वी ला माध्यमिक शाळेत आल्यावर, ४ थी तली मांडी ते ५ वी तला बाक अशी बढती मिळाली. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोबत शिकायला मुलीही आल्या, नेमक्या ह्या गोष्टीमुळे ढबूची मात्र पंचाईत झाली. वर्गात बाकांच्या ६ रांगा होत्या, मधल्या ज्या २ रांगा होत्या, त्यांमध्ये एका बाजूला मुलं आणि एका बाजूला मुली बसायच्या, त्यापैकी मुलांच्या रांगेत मी बसायचो, ढब्बू ला मुलींची भीती वाटायची म्हणून तो शेवटच्या रांगेत शेवटच्या बाकावर बसू लागला आणि तिथून त्याच्या 'बेसिक' प्रश्नांचे 'अस्त्र' सोडू लागला.

ढबू, जरा, "असा कसा मी वेगळा? " ह्या प्रकारातलाच होता. तो एके दिवशी शाळेच्या मैदानावर बसून, त्याच्या वहीच्या पानावर काहीतरी काढत बसला होता.

"ढबू, चित्र काढतो आहेस? ".

"नाही, ढगांच्या स्थितीची आउटलाइन काढतो आहे. ढगांची स्थिती आज ४ वाजता अशी आहे, काल अशी होती. " त्याने आधीचं पान दाखवलं. "ही परवा ४ वाजेची स्थिती. " पुढचं पान. हे काढून काय भेटणार? इति मी.

"नक्कीच काही तरी काळ आणि स्थितीचा संबंध असेल आणि मी तो शोधूनच काढेल. " खेळाच्या तासाला बाकी मंडळी, खेळ खेळायची आणि ह्याचे असले उद्योग चालू असायचे. एके दिवशी, जेवणाच्या सुट्टीत, मी डबा खाऊन डब्बा ठेवायला आलो, तर ढब्बू त्याच्या जागेवर न बसता, खिडकीजवळच्या एका बाकावर बसला होता, काहीतरी मोजत होता. वर्गाच्या त्या खिडकीतून एक निंबाचं झाड दिसायचं.

"काय मोजतो आहेस ढबू? " ढबूची एकाग्रता भंग करत मी म्हणालो.

"मला प्रश्न पडला आहे की निंबाच्या झाडाला पानं किती असतात? माझ्या घराच्या खिडकीतूनही असच एक निंबाचं झाड दिसतं, त्या झाडाच्या पानांची संख्या ह्या झाडाच्या पानांच्या संख्येइतकी असेल, असं मला वाटतं". मी बेशुद्धच व्हायचा राहिलो होतो.

असाच एके दिवशी, मी आणि ढबू देवळात गेलो होतो, दर्शन झाल्यावर, मी आणि ढबू मंदिराच्या पायऱ्यांवर बसलो होतो. गाभाऱ्यातून बाहेर येताना, ढबू, भिंतीवर लावलेल्या देव-देवतांच्या फोटोंकडे बघत बाहेर आला होता.

अरे, हे भिंतीवर जे राम, सीता, हनुमान, शिव-शंकर, गणपती आदी देवांचे फोटो लावले आहेत, त्यांचे ते फोटो, कोणत्या फोटोग्राफरने काढले आहेत रे? ते खरंच असेच दिसत असतील का? मला ही गळ्यात असा साप ठेवता येईल का? मी पण ह्या देवांसारखे, लांब केस केले तर आई मला रागावेल का? मला त्यावेळी, हा देव वगैरे तर नाही ना असले भास व्हायला लागले होते.

१० वी चा निकाल लागल्यावर मी जिल्ह्याच्या ठिकाणी, शिकायला जाणार होतो. मी आणि ढबू शाळेच्या पटांगणात, संध्याकाळी, गप्पा मारत बसलो होतो. ढबू त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता म्हणून त्याची 'का-कु' चालली होती, बाहेर शिकायला. "विज्ञान तुझा आवडता विषय आहे ना, सूर्य आणि चंद्र आपल्यापासून किती दूर आहेत हे तुला मोजायचं आहे ना? त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ना, विज्ञान खूप चांगलं शिकवतात, तिथे ना आपण सोबत राहू, खूप शिकू. " माझ्या ह्या आश्वासनावर तो भाबडा जीव माझ्याबरोबर यायला तयार झाला.

तिथे शिकायला गेल्यावरही त्याचे तेच 'बेसिक प्रश्न'. एकदा मी रूममध्ये येताच तो कॉटवर उभा राहून नाचू लागला. त्याने वहीवर, अतिशय पद्धतशीर अशी, जलचक्राची आकृती काढली होती. आणि त्याच्या कॉटवर भलं मोठं पुस्तक पडलेलं होतं.

" हे बघ संदीप, आपण बघ, म्हणत बसायचो ना, श्रावण आला आभाळ भरले निळ्या-निळ्या मेघांनी, मेघांचे काफिले सरकती डोंगर-माथ्यावरती.... सूर्याच्या तापमानाने, पाण्याची वाफ होते, ही वाफ हवेपेक्षा हलकी असते, ती वरवर जाते, तिचे ढग होतात, ढगांना थंड हवा लागली की पाऊस पडतो... ते सगळं सगळं खरं आहे रे, पण हे बघ ही रेणूंची अभिक्रिया, ही कृत्रिम पाऊस पाडायला लागणाऱ्या पावडरची नावे, त्यांचे गुणधर्म.... ". तो काय काय बोलला, हे झेपायला मला निदान १५-२० दिवस लागले होते. "मेसरवरचं जेवण चांगलं, चविष्ट का नाही लागत रे? सगळे मेसवाले मामा, असेच असतील का रे? आपल्या घरमालकांची नात, रुता, माझ्याकडे बघून गालातल्या गालात का हसते? सायकल मी नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूला चालवूनही, त्या स्कुटी वाल्या मुलीने मलाच का रस्त्यावर आडवा केला? आणि वरून मलाच 'इडियट, रास्कल' काय, काय ते बोलली. त्याचे हे सगळे प्रश्न तो, मी झोपतानाचं विचारायचा, त्यामुळे मला झोप खूप लवकर लागायची.

१२ वी च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मात्र ढबूने मला आणि आक्ख्या कॉलेजलाच धक्का दिला होता, चक्क त्याने, "लिखे जो खत तुझे, जो तेरी याद मे.... ", म्हणलं होतं, मी उडालोच होतो आणि पट्ठ्याने मला समजूच दिलं नव्हतं हे विशेष. १२ वी नंतर, ढबू इंजिनियरींगलाही पुण्याला, सोबतच होता. तिथे मात्र, ढबूच्या प्रश्नांचा व्याप वाढला होता. पुण्यात आल्यावर, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून खरंच वेद वदवून घेतले होते की नाही, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी, ढबूने जंग-जंग पछाडलं होतं. आपण संस्कृत का शिकलो नाही? हा अजून त्याचे एक बेसिक प्रश्न. तो मला त्या 'रेड्याच्या' समाधीच्या गावीही घेऊन गेला होता मला. ज्ञानेश्वरी, वेद आणि भाष्य काय काय पुस्तकं घेऊन आला होता. "अरे मान न बाबा, वदवले होते वेद. इतके सगळे लोक मानतात, तर तू पण मान ना".

"नाही रे, संदीप. जरी मानलं की त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते, तरी मग त्या मागचं विज्ञान मला समजून घ्यायचं आहे. "

तहलकाच्या तरुण तेजपालांवर हल्ला, त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढला तेव्हाच कसा झाला? सत्येंद्र दुबेला का मारलं लोकांनी? त्याच्या आईला मुलगा वारल्याचं दुःख किती झालं असेल? मी नदीजोड प्रकल्पासाठी काय करू शकतो? मी सनदी अधिकारी व्हायला हवं का? मी जगण्याच, कारण काय असावं? मृत्यू काय असेल? नेमकं काय होत असेल? बाप रे, हे ढबूच्या तोंडून ऐकल्यावर मी ठार वेडा होईल की काय अशी भीती वाटू लागली होती, त्या रात्री, ढबू रडला आणि माझं सगळं जीवन त्या अश्रूंनी बदलवलं.

तर असा हा ढबू, मायक्रोसॉफ्ट इंडिया मध्ये कसं काय काम करतो तो ढबूच जाणे. तिथल्या ही कर्मचाऱ्यांना, त्याच्या पाठ असलेल्या मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कविता ऐकवत असेल, त्याला आठवत असलेल्या धड्यांची नावं आणि त्यांचे 'कंटेंट' सांगत असेल. कधी-कधी त्याचे ते 'बेसिक' प्रश्न विचारून बेजार करून सोडत असेल.

ढबूच्या लग्नासाठी, त्याचं मन वळवण्याची जबाबदारी, मित्र ह्या नात्याने माझ्यावरच येऊन पडली होती.

" का लग्न करावं माणसाने? ढबूचा बेसिक प्रश्न. बरं मग विहिरीत उडी मारून आत्महत्या करणारा माणूस, विहीर कधी ढुंकून तरी पाहतो का? मग का बघायला जावं, लग्नासाठी मुली? ऑफिसातल्या ज्या ज्या मुली लग्नाच्या आहेत त्या मुलींना सरळ-सरळ विचारलं तर त्या हो म्हणतील का? नाहीच हो म्हणणार. मित्र म्हणतात, हळू हळू मैत्री कर, मैत्री वाढव आणि मग विचार. बरं ह्याच मुलींना मी त्यांच्या घरी आई-वडिलांसोबत गेलो, चहा- पोहे खाल्ले, दोन-चार इकडचे-तिकडचे प्रश्न विचारले, की ह्याच मुली सरळ-सरळ मला होकार देतील का? " ढबू एकदाचा शांत झाल्यावर लहान मुलाला मारतात तसं मारावं आणि मी म्हणतो आहे तसं कर, असं वाटत होतं. पण फार अथक प्रयत्नांनी, ढबू मुलगी बघायला तयार झाला.

ढबूसाठी मुलगी बघायला मी ही सोबत होतो. थंडगार ए. सी. च्या हवेतही दरारून घाम फुटला होता. ढबूचे पाय लटपटत होते. ढबूच्या हातावर हात ठेवल्यावर तो कुठे शांत झाला, चहा-पोहे चे सोपस्कार पार पडल्यावर मुलीच्या वडिलांनी म्हटलं की मुलगा आणि मुलीला बाहेरच्या खोलीत बोलायचं असेल तर बोलू शकता. आली का पंचाईत? आत गेल्यावर ह्याने, ह्याचे बेसिक प्रश्न सुरू केले तर काही खरं नाही? नाही तर विचारायचा, डोक्यावर नेमके किती केस आहेत वगैरे? कार्यक्रम यशस्विरीत्या पार पडला आणि ढबूचा बार उडाला. आता ढबूचं लग्न ठरलं आहे, त्याच्या अनेक प्रश्नांच 'व्यावहारिक' उत्तर मी त्याला दिलं आहे, पण त्याचे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. पण ढबूने मला वचन दिलं आहे, तो त्याचे बेसिक प्रश्न, त्याच्या बायकोला कधीच नाही विचारणार. बघूया, लग्नानंतर, स्वारी काय -काय बेसिक प्रश्न विचारते, ते?

बरं मंडळी, ढबूच्या लग्नाला जरूर यायचं हं.

गुलमोहर: 

अतिशय सुरेख वर्णन....हास्यविनोदाची बाजु फार चातूर्याने मान्ड्ली.

बर..ढबूच लग्न आहे तरी कधी????

सही बॉस... येडया पाटलाने येड लावलं...
Lol Lol
माझेही काही बेसिक प्रश्न:
१) लेखकाचे नाव येडा पाटिल का?
२) ह्या लेखात किती ओळी आहेत?
३) एका ओळीत किती शब्द आहेत?
४) एकूण लेखात किती शब्द आहेत?
५) एखाद्या ह्या ओळीतले शब्द आणी पुढच्या ओळीतले शब्द ह्यामध्ये काही नाते आहे काय?
६) एकूण लेखात किती वेलांट्या आहेत?
७) र्‍हस्व किती आणी दिर्घ किती?
सुचले की आणखिन विचारतो. Light 1

मस्त रे!!!!!!!!!
लेख वाचल्यावर मी माझ्या प्राथमीक शाळेत जाऊन आलो

ढबूचा contact no.द्या ?
विचारतो honeymoon कोणते प्रश्न विचारलेस?

श्री. नां.च्या लंबोदर सारखा खर तर वैज्ञानीक वगैरे बनायला हव होत बिचार्‍या ढबू ने.
शेवट झटपट का केला?

Pages