कविता

भेट

Submitted by अ. अ. जोशी on 27 April, 2011 - 04:08

क्षितिजावर चमकलेली किनार
भेदून जाईल आरपार
या कल्पनेनेच चमकलेले मन
आठवत होते नेहमीचे क्षण...
रोज येतात दु:खे
सोनेरी किरणांना धरून
मी दिसण्याची वाट पहात
तिथेच, दारापाशी असतात बसून...
आतूर असतात कधीची
मला बिलगण्यासाठी....
रात्रीच्या सुखांचा पडदा बाजूला सारून
मीही जातो दार उघडण्यासाठी....
दार उघडताच दिसते
आसुसलेले दु:ख त्यांचे...
आणि घेतो मनातच हसून
दिवसातले... शेवटचे..!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आठ्वणी

Submitted by अरुण वि.देशपाडे on 27 April, 2011 - 02:13

आठवणी
आवडत्या माणसांच्या आठवणी
ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात
खुणा असतात त्यांच्याच
पानापानागणिक !
केंव्हाही वाचावं मनातल्या मनात
आपल आवडतं माणूस
त्याच्या आठवणींसकट.....
बिनबोभाट....!
***********
-अरुण वि. देशपांडे.

"रसिक हो- "मन डोह " हा माझा दूसरा कविता संग्रह दि.०८ मे-२०११ रोजी प्रकाशित होतो आहे.

गुलमोहर: 

हे इंद्रदळा

Submitted by अज्ञात on 26 April, 2011 - 09:24

हे नीरघना तू ये रे
कवटाळ ग्रीष्मज्वाळेला
विकलून स्वास्थ्य बघ गेले
शिडकाव; झरून; धरेला

शोषून तळातिल पाणी
नळ; शुष्क; कुपातिल झाले
ताणून वाळली मुळे
फिकुटली सुकली हिरवी पाने

हे इंद्रदळा
ये धावुन जलद नृपाळा
स्पर्शातिल किमया
थेंब होउ दे वाळा
गात्रांस सहारा
पुलकित रोम शहारा
साकडे तुला
सावर रे कातर वेळा

.......................अज्ञात

गुलमोहर: 

हेच खरे!

Submitted by कविन on 26 April, 2011 - 07:27

लहानपणी वीज गेली
की मेणबत्तीच्या प्रकाशात
सावल्यांचा खेळ रंगायचा
हरिण, ससा, पक्षी, मासा
वेगवेगळा आकार त्या
सावल्यांमधून तयार व्हायचा

घामाच्या धारा आणि गुणगुणणारे डास
कासवछापचा चुरचुरणारा उग्रसा वास
सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा,
सावल्यांच्या त्या भासमय खेळात
जीव असा रंगून जायचा

शेवटी छोटे काय नि मोठे काय?
नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना

हेच खरे!

गुलमोहर: 

संकल्प

Submitted by उमेश कोठीकर on 26 April, 2011 - 06:46

मृत्यूमधला जन्म कळावा
जगण्यामधला मोह गळावा
करूणेच्या नवलाख कळांनी
'मी'मधला हा 'मी'च जळावा

असे काहीसे करून जावे
दु:ख जगाचे हृदयी घ्यावे
बहीण माझी, माझा भाउ
दु:खाला विसरून हसावे

या मातीतून असे रूजावे
फुलाफुलांतून असे फुलावे
करूणेचा मधुपर्क साठण्या
आयुष्याचे पराग व्हावे

या रूधिराचे पाणी व्हावे
तहानलेल्या कामी यावे
बीज होऊनी धरतीमध्ये
या देहाचे अन्न बनावे

गुलमोहर: 

गीत

Submitted by क्रांति on 26 April, 2011 - 04:56

गीत
काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला इथून वेचलं आणि पहिला प्रयत्न केला.

जखमा फुलतील नव्याने,
थरथरेल मन तृणपाते,
भगव्याशा आभाळाचे
क्षितिजाशी धुरकट नाते

त्या कातरवेळी माझ्या
वेदनेस कंठ फुटावा
हुरहुरत्या सांजेला मी
माळून पूरिया द्यावा!

झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या

गुलमोहर: 

पर्‍या खरोखर असतात का ?

Submitted by Saee_Sathe on 26 April, 2011 - 03:06

पर्‍या खरोखर असतात का ?
विचार करते रोज असा मी
पर्‍या खरोखर असतात का ?
चांगल्या, वाईट, काळ्या, गोर्‍या
रडतात किंवा हसतात का ?

सुंदर निर्मळ मन त्यांचे
दृढ कधी होते का ?
चांगली कामे करतात पण
कधी वाईट मनात येते का ?

आई आई सांग ना मला
पाहीली आहेस का गं परी ?
दिसते कशी ? बोलते कशी ?
सांग जरा तु मला तरी

चमचमणारा मुकुट तिच्या
डोक्यावरती असतो का ?
केसांवरचा रातकिडा
शांत कधी बसतो का ?

- मृण्मयी शैलेंद्र साठे

गुलमोहर: 

तुमची ईच्छा - तुमची मुलगी

Submitted by Saee_Sathe on 26 April, 2011 - 03:04

(आई-बाबा यांपैकी बाबांना आपण खुप घाबरतो. हो ना ? मला माहितीये. तुमचं उत्तर नक्की "हो" च असेल ! कारण बाबा खुप स्ट्रिक्ट असतात. तर या ठिकाणी मी बाबा आणि मुलगी यांच्यातले संभाषण दाखवले आहे !)

काय हो बाबा ?
सारखे अभ्यास करायला लावता
कंटाळून जाते मी
तरीही रागावता

सकाळी सकाळी रोज
ऑफीसला का जाता ?
घरी आल्यावर नुसते
टि.व्ही. च का पहाता ?

प्रगती-पुस्तक मिळाले
की कधी पापे घेत नाही
पापे राहीले लांबचे
साधी मिठीही मारत नाही

रोज रात्री झोपताना
गमती-जमती सांगत नाही
मी सांगते तर
मला सांगु ही देत नाही

का हो बाबा आता
नावडती झाले का मी ?
पहीले होते लहान
आता मोठी झाले का मी ?

गुलमोहर: 

संवादायचंय!

Submitted by नीधप on 26 April, 2011 - 00:36

संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?

अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,

असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद

आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...

- नी

गुलमोहर: 

मायदेशी माझ्या दारी..

Submitted by rutuved on 25 April, 2011 - 22:23

मायदेशी माझ्या दारी,
झाली ग्रीष्माची सराई,
दिस फुटे सोनियाचा,
रात तार्‍यांची चटाई.....१

विखुरल्या त्या दुपारी,
अग्नीपंखांची कताई,
मनी आंब्याचा मोहोर,
परी झुलतो गं बाई.......२

भर उन्हात सांडली,
अशी सावली वडाची,
अन् मुखावरी आली,
ती झुळूक वा-याची......३

सांडलेल्या सांजवेळी,
बकुळीचा गंध वाहे,
मग पेटीच्या सुरात,
जीव माहेराला धावे.....४

ऋतुवेद

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता