आंदण

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 July, 2009 - 08:48

ऊनपावसाचा गण
गाई आभाळ अंगण
दृष्ट लागण्याजोगते
सृष्टी श्रुंगार तोरण

डोंगराच्या माथ्यावर
धुकं धुकं सभोवर
हिर्वी हिरवी वाकळ
दडे यौवनाचा ज्वर
मोहरून अंग चोरी
लवलेली पाती-तण

सर येई झर झर
चिंब रान, चिंब घर
अन फुटतो छताच्या
काळजालाही पाझर
मन ओलेते आवरी
थिटे देहाचे कुंपण

कुठे लगबग मिठी
कुठे तगमग देठी
सण झुले उंबर्‍याशी
सयी लोचनांच्या भेटी
आसावल्या पदरास
हवा श्रावण आंदण

गुलमोहर: 

व्वा Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

बहोत खूब, कौतुक!
<<मन ओलेते आवरी
थिटे देहाचे कुंपण>>

सुरेखच!

सण झुले उंबर्‍याशी
सयी लोचनांच्या भेटी
आसावल्या पदरास
हवा श्रावण आंदण
>> अगदी खास !

सुरेख.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

व्वा! मान गये!!
कालच मी गोवा ते पुणे असा प्रवास करून आलो. अंबोलीचा घाट हे [मी पाहिलेल्या] जगांतलं एक नितांत सुंदर स्थळ आहे, विशेषतः पावसाळ्यांत. मी सावंतवाडीला पोचताच मनांत म्हटलं, 'पुढे आंबोलीच्या घाटांत धुवाधार पाऊस कोसळत असू दे' आणि अगदी तस्संच घडलं, त्यामुळे प्रवास सार्थकी लागला!
त्या सुखद आठवणी अगदी ताज्या असतानाच आज ही कविता वाचायला मिळाली, पुन: प्रत्ययाचा आनंद मिळाला!! धन्यवाद.
बापू करंदीकर

वाह , क्या बात है I

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!

वा वा, आख्खे आयुष्य आंदण द्यावे एव्हढी सुंदर निर्मिती! गंडा बांधा आम्हाला गुरु.
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ', ये ना बघायला आई!

कुठे लगबग मिठी
कुठे तगमग देठी
सण झुले उंबर्‍याशी
सयी लोचनांच्या भेटी
आसावल्या पदरास
हवा श्रावण आंदण

सुंदर कविता

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" खाशी ! "

अरे कौतुका; आभार वगैरे मानायची काही पद्धत?
..............................................................................
आई माझा देव, सुख माझे घे गा
रूंदावल्या किती, पायीच्या गं भेगा!

छान कविता!
'शृंगार' असे हवे. तसेच सभोवर की सभोवार?
दडे यौवनाच ज्वर? चढे यौवनाचा ज्वर म्हणायचय का?
बाकी आवडले.