ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

Submitted by बस्के on 21 July, 2009 - 15:19

"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:..
"अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा
"हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. Sad "
"ह्म्म.."
"ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...."
"असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! Wink "
"हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त दिवस होते.. पण ते भारतात परतल्यापासून जास्तच वाटतंय मला असं.. Sad "

"ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !! मला आत्ताच्या क्षणाला काहीही आवडत नाहीये इथलं.. एकतर आपल्या गावात आपली लोकं कमी.. त्यातून अमेरिकन्स जास्त.. त्यान्ना हाय हॅलो सोडून काही बोलता येतं की नाही कोण जाणे! मला ना असं कोणीतरी पाहीजे.. अपॉइन्टमेन्ट, फॉर्मॅलिटी सगळं सोडून फोन न करता छान पैकी आरामात घरी येऊन कॉफी पीत गप्पा हाणणारी मैत्रीण हवीय़! श्या किती आम्ही मारायचो गप्पा अशा.. मिथु,मनी.. sigh.. ... इथे आहेत ना लोकं, मैत्रीणी.. पण किती ते अंतर? अमेरिकेच्या एका टोकावरून दुसरीकडे जायचे म्हटले तरी विमानाने ८-१० तास लागतात!! सगळंच अवघड! साधी कोथिंबीर आणायला गाडी काढून १५-२० मैल तरी गाडी हाकावीच लागते!! "
" घरं पण कसली पुठ्ठ्याची! मला इथल्या भिंती पण आवडत नाहीत.. पांढरे पुठ्ठे सगळे! रात्री अंगावर येतात अंधारात! सुरवातीला आठवते ना कसे झाले.. २-३ आठवडे नुसती वाईट स्वप्नं मला! म्हणजे आधीच तो वाईट्ट जेटलॅग लागला होता.. वेड्यासारखी कधीही झोपायचे.. रात्री टक्क जागी.. कधीतरी झोप लागली तर वाईट स्वप्नांची रांग.. कधी मी पडतीय, कधी कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कधी कोणी मारतंय.. अर्रे काय्ये हे ?? :(( "
"अगं नवीन जागा.. त्यातून तू कधी पुणे सोडून राहीली नाहीयेस.. येणारच ना त्या अशा (भितीदायक) जुन्या आठवणी..!! " (माझा नवरा पुण्याचा नाही, त्यामुळे तो पुण्यावरून टॉन्ट्स मारणे सोडत नाही!! )

"गप हा.. पुण्याला नावं नकोयेत.. मी आधीच इतकी मिस करतीय.. आणी तू असं बोलतोस.. काही वाटतं का तुला?? तुझी गरीब बिचारी बायको इतकी वैतागलीय.. आणि तुला जोक्स सुचतायत.. व्हेरी फन्नि!!! :(( ते काही नाही.. तू काहीतरी कर.. कळलं का? मला पुण्याला जायचेय..सगळ्या मैत्रिणींना भेटायचेय.. पुण्याला भेटायचेय माझ्या! आई बाबांबरोबर राहायचंय.. आईला स्वयपाक करून तिच्या आवडीचे खायला करून द्यायचंय(एकदातरी!! Lol ), त्यांच्याबरोबर कॅरम,रमी खेळायचीय! खूप काही! तेही आत्ताच्या आत्ता !!?? "
"आय नो, आय नो... डोन्ट वरी.. जाशील तू लवकरच.. ओके? नॉऊ चिअर अप! काय कंटाळा कंटाळा करतीयस.. विकेंडला कुठे जायचे ते कर बरं प्लॅन.. मी काही पाहणार नाही.. लोकेशन, रस्ते, हॉटेल्स सगळं ठरव.. जाईल वेळ जरा.. तसंही तू काही सोडणार नाहीस प्लॅनिंग नीट करायला.. नंतर ऑर्कुटवर फोटो टाकून शायनिंग मारायचे असते ना! हेहे"
"हो म्हणजे काय! :)) अरे ते शायनिंग मारणे नसते रे ! मी काय करतीय सद्ध्या, कुठे भटकंती, किती खादाडी केली ते सगळं एका क्लीक मधे कळतं ना माझ्या मित्र-मैत्रिणी,घरच्यांना.. ते सगळं शेअर करणं हा उदात्त(!) हेतू असतो बरका! लोल.. Happy "
"ह्म्म नशीब हसलीस.. आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर! "
"ह्म्म, आला मूळपदावर! सा.खि. काय अरे.. जमेल का अशी इन्स्टंट! करते काहीतरी !! मलाही भूक लागली वैताग करून!"
------------------------------------------------------------------------------------
नेहेमीचे डायलॉग्स हे..
( घरची मंडळी : घाबरू नका! टेन्शन घेऊ नका! मी एकदम मजेत आहे! Happy )

सगळे तोंडावर आले नसतील संवाद.. पण मनात सतत वाजत असतात..
किती मिस करते मी इंडिया, पुणे, सगळंच,सारखंच..
वरचा संवाद वाचून असे वाटेल की मी अगदीच दिवसभर फ्रस्ट्रेट होऊन बसलेली असीन.. तसं काही नाही! मस्त आराम फर्मावतीय़.. भरपूर हिंडतीय.. खूप नवीन पदार्थ करायला शिकतीय, ते खात सुद्धा आहे! इथेही मैत्रिणींशी फोनवर का होईना गप्पा हाणतीय.. चॅट तर काय असतंच.. इथेही मंडळाचे कार्यक्रम असतात, भरपूर मराठी पब्लिक साधारण ४०-५० मैलांवर असतेच! बरेच नातेवाईक राहतात जवळच..

सगळं बेस्ट आहे हो! पण म्हणून इंडीयाची आठवण येणारच रोज! नाही जाऊ शकत मी हवं तेव्हा, मनात येइल तेव्हा.. अंतर,नोकरीतून सुट्ट्या,व्हीजाच्या कटकटी असतातच, त्या सगळ्या जंजाळातून जाणे म्हणजे कुठे सोप्पंय!

आत्ता लिहीता लिहीता अजुन एक जाणवलं.. भारताबद्दल आपल्या मायभूबद्दल इतकं, इतकं आतून वाटत असतं सारखं.. जीव तीळ तीळ तुटतो कधी कधी! आई कधीतरी सांगते शक्य तितक्या नॉर्मल आवाजात, की चिऊड्या आत्ताच तुझी इतकी आठवण आली, असला सही पाऊस पडातोय़!.... अशा परिस्थितीत धड उठून जाताही येत नाही.. समजूत काढूनही उपयोग नसतो, आणि काय काढणार? कसंनुसं हसून विषय बदलायचा अन काय!
असं आणि इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. आजकाल नेटने जग फार जवळ आलंय.. लिखित मिडिअम असल्यामुळे कोणी काहीही बोलले तरी फारसा फरक नाहीच पड्त! पडून घेऊ नये! पण मग असं पदोपदी दिसत असेल तर आपण नक्की काय करावं?(अगदी कॉमन उदाहरण घ्या, इसकाळमधे येणारे वाचकांच्या कमेंट्स!! ) आमची काही आकांक्षा आहे, एक ठराविक ध्येय आहे आयुष्यात, काही नवीन गोष्टी साध्य करायच्या, नवनवे प्रदेश पाहायला मिळ्तात, काही शिकायचे असते.. हे सर्वं चूकच का?? आपलं, आपल्या आई बाबांचे, कुटुंबाचे आयुष्य जमेल तितके सोपे करायचे.. या विचाराने आम्ही इथे येतो.. त्यांच्याबद्दल प्रेम जाऊदे, पण द्वेष का वाटावा इतका? इतका.. की त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? Sad इट हर्ट्स.. पण जाऊदे.. जशी परदेशात आहे म्हणून बळंचच भारावून जाणारी लोकं असतात तस्साच पण उलटा प्रकार!

आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो, छ. शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून स्फुरण चढते, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जमेल तसे कार्यक्रम होतात इथे, कार्यक्रमापेक्षाही ती देशभक्तीची भावना आमच्याही मनात तेव्हढीच असते, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझ्याच काळजाची जखम असल्यासारखे सैरभैर झाले होते मन... अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!! आम्ही भारतीयच आहोत शेवटी... जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी! आणि मायभूला स्वत:च्या ’माय’ इतकंच मिस करत राहणार.. म्हणून तर हे सगळं मराठी साईट्स शोधणे, मराठीतून ब्लॉग लिहीणे, पुस्तकं शोधणे वगैरे करत असतो आपण.. जमेल तसं भारतीय,महाराष्ट्रीय लोकं शोधून गणगोत जमवतोच ना आपण? इंडियन रेस्टॉरंट दिसलं की पावलं वळतातच ना तिथे? शेवटी आयुष्याची कमीत कमी २४-२५ वर्षं जिथे काढली ती पुसून थोडीच जाणारेत?? कसं शक्य आहे..!
------------------------------------------------------------------------------------
हे अन असं सारखं येतच असतं डोक्यात.. बर्‍याच दिवसांपासून काहीतरी लिहायचे होते असे.. अर्थात मनातले विचार परफेक्ट नक्कीच उतरले नाहीयेत.. नाहीतर मी प्रथितयश लेखिका नसते का झाले! Happy नेहेमीप्रमाणेच मनात आले तसे उतरवले.. थोडं exaggerated सत्यकथन असं म्हणता येईल याला..
आवडले तर नक्की कळवा.. नाही आवडले तरी कळवा चालेल! Happy

गुलमोहर: 

नक्कीच आवडलं.
खास करून जेव्हा, "इथल्या शाळांतून शिकून, इथल्या कॉलेजातून शिकून परदेशी जाता तुम्ही.. आणि तिथे पैसे कमवता.. " असं म्हणणार्‍यांची किव येते.
यामध्ये भारतप्रेमा पेक्षा परदेशस्थ असणार्‍यांवर होणारा जळफळाटच दिसतो.
इथे राहून काय कमावतो यापेक्षा काय गमावतो हेच विचारा असं म्हणेन. पण .. काहीतरी नवं करण्याची , पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा असतेच आणि असावीही!
तुझा लेख आवडला.
प्राजु
http://praaju.blogspot.com/

खूप छान आहे .. मी पण नेहमी च असा त्रागा करते

<<त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? इट हर्ट्स.. >>

वा, वा. मनातले बोललात. पण जाऊ द्या. चालायचेच.

<<सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच!>> हे तर खरेच आहे. पण त्याबरोबर भारतात सुद्धा किती सुधारणा झाल्या आहेत, तेहि समजून घ्या. त्रागा करून घेण्यात आपल्यालाच त्रास होतो.

<<मराठी साईट्स शोधणे>> या फंद्यात पडूनच मायबोलीवर आलो नि अडकलो! आता इथून सुटका म्हणजे सिगारेट सोडण्यापेक्षा कठीण झाले आहे. किती शिव्या, किती वाईट ऐकले मी इथे, पण नाद सुटत नाही.

असे वाटते, आपण कुरुप असलो, अर्धवट असलो, प्रसंगी आईवर रागावलो, तरी आई प्रेम करतेच ना? तसे असावे, पण भारतीय जनतारूपी आईचे तसे काही नसते. आता मोठे व्हायचे! सासरी जाणार्‍या मुलीसारखे. ती पण आपल्या आईबाबांकडे राहून, त्यांच्या पैशाने शिकते, खाते, मोठी होते नि मग सासरी निघून जाते. कुणा हतभागी मुलीला घरचे सांगतात, तू आता आम्हाला मेलीस! तसे आपले आहे असे समजायचे. कठोर व्हायचे!!

Happy

<<देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला?>>

अगदी अगदी!!! भावना पोचल्या! Happy

आताच थोड्या दिवसांपूर्वी भारतातल्या माझ्या काही नातेवाईकांकडून असलचं काही काही ऐकून घेतलं होतं. (मीच फोन केला होता, सहज चौकशीसाठी... ते राहीलं बाजूलाच आणी वर bsk आणि प्राजु म्हणता आहेत तसच काहीसं सुनावलं तिकडच्यांनी) त्याची पुन्हा आठवण झाली. Angry

बाकी, बस्के Light 1 (केदार कडून साभार) छान लिहीलं आहेस.

चान्ग्ला लेख आहे. मला वाट्ते आपण एकच करू शकतो...तुलना न करणे!! भारताबाहेर काय आणी किती चान्ग्ल्या गोष्टी आहेत ते बाहेर पडलेल्याना कळ्तातच्.त्या तिथे अस्लेल्याना न सान्गणे हेच उत्तम! कारण तुमचा हेतू कीतिही चान्गला असला तरी लोक वेगळाच अर्थ काढतात बर्याच्दा.
भारतात गेल्यावर ज्या गोश्टी आपण बाहेर मिस करतो त्याचा आनन्द घ्यावा बस्स!!

छानच लिहिलंय. माझ्या पण मनात गेली २ वर्षं हाच विचार येतोय. इथलं सगळं आता तितकं ग्लॅमरस वाटत नाही आणि १० वर्षांपूर्वी इथल्या सगळया गोष्टींसाठी जे आकर्षण होतं ते आता नाही.

भा,
उत्तम लिहिले आहेस.....अगदी मनातले!!!!!

मस्त लिहिलयस! खरं आहे तू म्हणतेस ते. सुरुवातीला फार चिडचिड होते. अर्थात ऐकवायला नवराच सापडतो. बाकी इकडे येणारे सगळे १$ = ४५ ते ५० रूपये आहेत, तोपर्यंतच येणार! हे आपल्या डोक्यात पक्के असले की पुढचे प्रश्न सोपे होतात. अनिवासी भारतीयांवर टीका हा तोंडी लावायचा विषय आहे. आतले आणि बाहेरचे यांच्यात हा वाद रहाणारच!

बीएसके, नेहमीसारखेच सुरेख लिहिलय. इथे आली तेव्हा मलाही खुप कंटाळा यायचा. तरी बरे सिंगापुरला बरेच भारतीय आहेत. बोलणे नाही झाले तरी निदान बघायला तरी बरेच मिळतात. Happy

मी देशाबाहेर येऊन खुप वर्षे नाही झालीयेत. पण एक मात्र मला नक्की वाटते ते हेच की, ज्या क्षणी आपण देश सोडतो त्याक्षणी देशाप्रती आपली जबाबदारी जास्त वाढते, ते यासाठी की देश आणि पैसा यातुन आपण पैसा निवडलेला असतो. देशातले लोक आपल्यावर आसुड ओढतात आणि आपल्यासारखे देश सोडुन गेलेले लोक आपल्याच देशाला नावे ठेवतात ( मी खुप लोक पाहिलेत, देश सोडला की देशातल्या वाईट गोष्टींवर ताशेरे ओढायला मोकळे. जणु काही भारताबाहेर सगळे देश स्वर्गच.) अगदी परवा परवाच एका मित्राचा मुलगा वय वर्षे तीन बोलतांना ऐकला " आय लाईक सिन्गापूर... इंडिया इज डर्टी " Sad त्याआधी त्या मित्राच्या तोंडुन खुपदा देशाबद्दल वाईट्च ऐकले होते. अशावेळी मात्र नक्कीच वाईट वाटते. तेव्हा चुक दोन्ही बाजुने होतेय असे वाटते.

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

बास बास, बी एस के, तुझ्या नवर्याशी म्हणजे आमचे एकेकाळचे परम मित्र निनाद याच्याशी एका गोष्टी बाबत ए़कदम सहमत.....साबुदाण्याची खिचडी हा कुठ्ल्याही दुखावर, आठ्वणींवर...वगैरे वगैरे...एकदम रामबाण उपाय आहे......

भाग्यश्री, मस्त लिहिलयंस.....अगदी पटलं.
<<आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर<<
हे वाचून तर मी पोट धरून हसतेय्....अगदी आमच्याकडचं वाक्य आहे हे....

--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

आवडल भाग्यश्री ! छान स्वच्छ लिहिले आहेस.
लिहिल्याने मोकळं मोकळं वाटत असेल ना ! आम्ही (भारतात राहणारे भारतीय) तुझ्या भावना समजू शकतो आणि सदैव तुझ्यासारख्यांच्या बरोबर आहोत. तुला असं चिडचिड व्हायला लागलं ना की लगेच मायबोलीवर येत जा .... !

प्रिन्सेस ला २१ मोदक !!!! (गणपती जवळ आलेत ना म्हणुन) Happy

भाग्यश्री- लेखन आवडले. Happy
बरेच उलटसुलट विचार दोन्ही बाजू पाहिल्यामुळे गोळा होतात, ते एकदा लिहायचे म्हणते आहे.

सगळ्यांचे खूप धन्यवाद! थोडा स्फोटक विषय आहे खरंतर.. पण थँक गॉड इथे नाही झाला! Happy
रैना, नक्की लिही !

हे जे प्रकटन लिहीले आहे ते काय विचाराने लिहीले आहे हे नमूद करते.
होम सिकनेस .. ही एक फेज असते. आपण काही कामंधामं सोडून हे असे विचार नाही करत. असे विचार नेहेमीच येतात जातात.. कधी जास्त रेंगाळतात.. अशा त्या फेजला मला कॅप्चर करायचे होते... बस्स.. ते होम सिकनेस वाटणे, त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येणे! हा काही रोग किंवा प्रॉब्लेम नाहीये राईट! .. Happy इट हॅपन्स, एव्हरीटाईम!! फक्त आपण आपल्या देशी,आपल्या माणसात असलो की त्यावर उपाय निघतात लगेच! तसे कधी कधी इथे राहून नाही निघत.. फॉर एग्झँपल, मला पाऊस फार्रच आवडतो, पण इथे कॅलिफॉर्नियात तसा मनासारखा नाही पडत.. आहे काही उपाय? त्या पावसासाठी मला पुण्यात येणं परवडणार आहे का! ) असल्या चिडचिडीला मोकळं करण्याचे हे प्रकटन..

ते लिहीता लिहीता, शेवटचा मुद्दा डोक्यात आला, आणि तो मी मांडण्यापासून राहवू नाही शकले..
निवासी-अनिवासी हा मुद्दा मला प्रत्यक्शात कधीही अनुभवावा लागला नाहीये! कोणालाही मी सांगायला गेले नाहीये की परदेशात ना असं असतं इत्यादी, आणि कोणीही मला पर्सनली लेक्चर दिले नाहीये, तुम्ही अनिवासी वगैरे! ( थँक गॉड, तितका अविचाराने उगीचच झोडणारं पब्लिक नाहीये माझ्या संपर्कात!)
पण जेव्हा कुठेही कोणालाही असं जेव्हा बोलले जाते तेव्हा मी विचार करतेच. मला ते खटकतेच! त्यामुळे ते सगळं इथेही उतरलं..

परत एकदा थँक्स! Happy
www.bhagyashree.co.cc/

भाग्यश्री, आवडलच. अगदी आपल्यातल्या जवळ जवळ प्रत्येकाच्या मनातलच. सतरा वर्षं भारताबाहेर आहे पण अजून राष्ट्रगीताची झलक जरी ऐकली की, घशात आवंढा येतो आणि एकटी असले तर सरळ रडू येतं. हा कालचा शर्टं आणी हा आजचा वेगळा शर्टं असं मायभूमीबद्दल आणि कर्मभूमीबद्दल वाटू शकत नाही. एकाच देहावरच्या त्वचेचे हे दोन थर आहेत... त्यातला आतला, रक्तपेशींच्या, हॄदयाच्या अधिक जवळचा, मायभूमीचा, हे मी ठामपणे सांगू शकेन.
तो सोलून काढता येणार्‍यातला नाही.

("हे गाणं नको शिकवूस... तू रडतेस" ह्या एव्हढ्या कारणासाठी अजून लेकाला आपलं राष्ट्रंगीत संपूर्णं येत नाही.)

अगदी मनापासून, कळकळीने लिहिलयंस बस्के! Happy
खूप आवडलं..
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

भाग्यश्री आवडलं.

--------------
नंदिनी
--------------

उगाच अभिनिवेश न दाखविता मनापासून लिहिलं आहे, ते स्पष्टच कळतं आहे. Happy

फक्त ठिकठिकाणच्या स्मायलीज तुमच्या 'फ्लो' ला अडचण आणतात असे वाटले. (पण हे झाले 'ललित' या लेखप्रकाराच्या दृष्टीने. बाकी, मनातलं उतरलंय, ते भावलंच. मी दोन दिवस पुण्याबाहेर गेलो, तरी कधी एकदाचे परततो, आणि इथले रस्ते, लोक, बेशिस्त वाहतूक पाहतो, असे होते! परदेशस्थ भारतीयांच्या मानसिकतेची कल्पना तेव्हा येते.)

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

अगदी मनाताल आणि दुसर्यना सान्गुन पण नाहि कळत.
झक्कि, तुम्हाला अनुमोदन

हा लेख इथे पण आहे का? Happy

मीही माझा 'तिथलाच' प्रतिसाद पेस्ट करतो.....

देश सोडणे, गाव सोडणे हे प्रकार लोक इतक्या सिरीयसली का घेतात , मला समजलेले नाही..... माणूस हा माकडापासून तयार झालेला आहे, मग मी आणि हजारो वर्षापूर्वीचे ते माकड यान्च्यामधल्या सगळ्या पिढ्या एकाच गावात्/एकाच घरात घडून गेलेल्या असतात का ? काही ठराविक पिढ्यानन्तर स्थित्यन्तरे/ स्थानन्तरे ही अपरिहार्यपणे झालेली असतात... सगळीकडचे चान्गले एकत्र करून पुढच्या पिढीला देणे , एवढेच आपले काम....

हिन्दु धर्मामध्ये देशान्तर हे पाप कधीपासून मानले जाऊ लागले, याचा सन्दर्भ कुणी देऊ शकेल का ? कारण गम्मत म्हणजे रुग्वेदामध्ये एक रुचा आहे....

'हे मित्रावरूणानो आम्हाला दूरदेशी जाण्याची, ज्ञान आणि धन कमावण्याची सन्धी द्या. आपली कृपा आमच्या पुत्रपौत्रावरही असू द्या.'

रामाने लन्केला केलेले गमन , कृष्णाने गुजरातजवळ समुद्र ओलान्डून द्वारकेची केलेली स्थापना ही याचीच रूपे आहेत असे मला वाटते... ( आणि योगायोग ( ?) म्हणजे रामाने समुद्र ओलान्डण्यापूर्वी रामेश्वरला शिवलिन्गाची स्थापना केली तर कृष्णाने सोमनाथ मन्दिर निर्माण केले... एन आर आय लोकानी देखील प्रत्येक सुट्टीतून पुन्हा परदेशात येताना आधी शिव मन्दिरात जाण्याची प्रथा ठेवली तर ..? यातील धर्मशास्त्र कुणी उलगडले तर जास्ती बरे होईल..)

BSK
लेख खुप अवडला. मी मायबोली वर खुपच नविन अलिये. कोणाला अजुन ओळखत नाहि मराठि वाचुनच पोट भरल. तुझ्या सरखिच पुण्याच्या पावसाच्या अठ्वणिनी बेजार आहे मी पण.
पण या सगळ्या देशान्तर चर्चेत एक सन्गावस वाटल. माझि ८ वर्षाचि मुलगी आहे. तील पुण खुपच अवडत. पन गेल्यावर ३/४ दिवसानि तिल इकडच्या घरची खुप आठवण यायला लगते. घर अपलि वाट बघत असेल म्ह्नणते.
माझि आइ म्हणते "अग तिचि नाळ तिकडे पुरलि अहे ना? अता तोच तिच देश" बहिणा बाई म्हनते तस ..लेकिच्या महेरा साठी माय सासरी नान्दते.

अजुन मराठि लिहिण नीट जमत नहिये.
धन्यवाद

बस्के, मस्तच लिहिलं आहेस! आवडलं!

bsk लेख आवडला.
ईथे राहतांना भारताला नावं ठेवणारी, जायला आवडत नाही असं म्हणणारी माणसं भेटली की फार वाईट वाटे, चीड येई. असं कसं म्हणवतं? आता मात्र दया येते अशा लोकांची. भारतात जे चांगलं आहे त्याबद्दल बोलावसं वाटत नाही, तिथे जे लोक आपलं आयुष्य, असेल नसेल ते सगळं पणाला लावुन, कष्ट, अडचणी सहन करुन इतरांसाठी झटतात त्यांच्याबद्दल माहितीसुद्धा नाही, सगळ्या क्षेत्रात भारताचं पाऊल योग्य दिशेनी पुढे पडावं म्हणुन आटोकाट प्रयत्न करणारी माणसं आहेत हे गणतीतही नाही. स्वतः तिथे गेलं की फक्त खाणंपिणं, नातेवाईकांना भेटणं, आपण अगदी स्वर्गातुन ईथे आलोय असं वागणं या पलिकडे काही करायचं नाही. वर पुन्हा भारतातल्या लोकांनाच बदलायची इच्छा नाही, हे असेच राहणार ही बकवास.
भारतात काही प्रॉब्लेमच नाही असं माझं म्हणणं नाही. पण कुठल्या देशात नसतात ते? कुठेतरी कमी जास्त असणारच. नुसता प्रॉब्लेम आहे, अडचण आहे असा कंठशोष करुन ते दुर होत नाहीत. जे त्यासाठी काहीतरी करताहेत त्यांच्या हातांना जमेल तसं बळ देणं एवढं तरी आपण करु शकतो.

इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. >>>>>>>>>> जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. त्यामुळे याबाबतीत अनिवासी भारतीयांनीच जरा समजुतीन घ्यावं. जोवर एखाद्या वस्तु, गाव, व्यक्तीपासुन आपण दुर जात नाही तोवर त्याची किंमत कळत नाही. तेव्हा भारताबाहेरचा भारतीय माणुस काय मिस करतो याची भारतातल्या लोकांना कल्पना कशी येणार?

भाग्यश्री, सही दिलसे लिहीलं आहेस. त्यामुळं आवडलं!
इंग्रजी शब्दांचा वापर जरा जास्तच झालाय.तिथे पर्यायी मराठी शब्द वापरता आले असते नं? Happy

एसआर्के, अनुमोदन... प्रत्येक वाक्याला

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

थँक्स सगळे..
एसार्के, बरोबर बोल्लीस! Happy
दाद, तुम्हाला आवडलं?? ( आनंदाने नाचणारि बाहुली! Happy )

प्रकाश, पहीले जे संवाद आहेत त्यात मी काही बदल नाही करू इच्छीत. कारण ते संवाद आहेत. जसे मी बोलते तसंच तिथे टाईप करावे असं वाटतंय मला.. संवादाच्या खालच्या परिच्छेदात मात्र बघते काही बदलता येण्यासारखे आहे का..
मला मी जसं बोलते तसं लिहीण्याची सवय आहे. नडते खरंच.. मागे पूनमनेही सांगितले होते..
सवय बदलली पाहीजे! :|

www.bhagyashree.co.cc/

.....

Pages