उन्मनी

Submitted by क्रांति on 21 June, 2009 - 22:08

तुझ्या आठवात मन चैत्रपालवी
धुंद मोग-याचा गंध लपेटून प्रीत जागवी

तुझ्या विरहात मन वैशाखवणवा
जळे तनमन, आसुसला प्राण शोधतो गारवा

तुझ्या चिंतनात मन आषाढमाया
शामरंगी घन आभाळी रेखिती काजळछाया

तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे
भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे

तुझ्या सावलीत मन शरदचांदणे
सावळ्या रात्रीच्या अंगांगी फुलली लक्ष गोंदणे

तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी
घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी

गुलमोहर: 

घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी >> मस्तच

क्रांती, सुंदर कविता.

...अप्रतिम ..."आठव -> विरह -> चिंतन -> संगत -> सावली -> प्रणय"... हा प्रवास किति मधाळ आहे. मुद्दाम घातलास का तो अपसुकच आलाय?

"तुझ्या चिंतनात मन आषाढमाया
शामरंगी घन आभाळी रेखिती काजळछाया"

"तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे
भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे"

दिलखेचक ओळी!!

तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे
भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे
.....खुप छान सर्वच कविता छान...
पण उन्मनी म्हनजे काय...........कळलं नाही.

धन्यवाद मंडळी.
श्रीकांत, तो प्रवास आपसुकच आलेला आहे. काही महिने, काही ऋतू आणि त्या-त्यावेळची मन:स्थिती असा तो सहजप्रवास झालाय.
सोनावणेजी, उन्मनी याचा अर्थ स्वतःला विसरलेला, आत्यंतिक एकरूप झालेला [किंवा झालेली] असा आहे.
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

सावळ्या रात्रीच्या अंगांगी फुलली लक्ष गोंदणे

तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी
घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी >. मस्त नेहमी प्रमाणेच...राधामय..

उन्मनी - अतिशय सुंदर, खुप आवडली, सगळ्या ओळी आवडल्या

तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी
घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी

खुप सुंदर...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

छान, मनाचे निरनिराळे रंग दाखविणारी.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

क्रांती,
जून महिन्याच्या मिळालेल्या "सर्वोत्तम कविता" ह्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !! Happy पुढील वाटचालीला अनंत शुभेच्छा. Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद मायबोली प्रमाणेच मराठी किंवा इंग्रजीत नोंदवू शकता. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

अभिनंदन. कविता चांगली आहे. मला थोडी शब्दांचा सोस असलेली वाटली. पण कदाचित ते तसे नसेलही.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

व्वा क्रांती!!! मस्तच!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

क्रांती अभिनंदन .कविता छान आहे .

अभिनंदन क्रांती Happy .कविता छान आहे. तुमच्या कविता छान असतात.
धनु.

छान! खुप सु॑दर कविता आहे.

क्या बात है! सुरेखच! मनःपूर्वक अभिनंदन!

कविता छान, कल्पना छान, शब्दरचना छान, शब्दांची मांडणी आणि लय छान.

एकंदरीत लय (म्हणजे चिकार) आवडली.

क्राती अभिनंदन!!!

अलिकडे ऑफीसमध्ये माबो बंद झाल्यामुळे बर्‍याच कविता वाचायच्या राहुन जातात. त्यात असे काही मोतीही हातातुन निसटुन जातात. हार्दिक अभिनंदन!

***********************************
एक नवीन सुरुवात : http://www.maayboli.com/node/9171

व्वाह ! सुंदर !!

तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे
भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे>> हे खास आवडले! Happy

अभिनंदन, क्रांती!
अतिशय सुंदर कविता. निसर्गाच्या खेळातही रासलीला... सुरेख! वेगळी शब्दसंपदा आहे.

अभिनंदन, क्रांती!
कविता छानच आहे आधी कशी निसटली कोणास ठाऊक !

नमस्कार मा.बो.कर हो! बर्र्याच दिवसा॑नी आलोय. मार्चची सर्वोत्तम पैकी एक अशी निवडली गेलेली कविता पाठवल्यानन्तर आजच येतोय. काही वैयक्तिक कारणा॑मुळे जमल॑ नाही. आता आशा आहे, नियमित भेटी होतील्.एक नवी कविता पाठवतोय.

भीवरेच्या वाळवंटी.

भीवरेच्या वाळव॑टी.. तापल्या वाळूवरी;
रांगते तान्हे , तयाचा दाह वैकुंठाभरी .

पंढरीच्या पांडुरंगासी न कोणी सांगते,
' रे विठू , तुझिया पदी बघ एक तान्हे रांगते!'
........
अर्भकाला उचलुनी घेई कटी-खांद्यावरी,
तापल्या वाळूतुनी पद-चिन्ह-विट्ठल मात्र ती!

पुन्हा एकदा नमस्कार्.
जरा गल्ली चुकलो.बर्‍याच दिवसांनी बसल्याने‍
नवीन कविता भलत्याच पत्त्यावर टाकली, त्याबद्दल क्षमस्व!

Pages