उपासना ! भाग -3

Submitted by Sujata Siddha on 4 May, 2024 - 10:01

https://www.maayboli.com/node/85078 -भाग २

उपासना !
भाग -3

... अर्ध्या वाटेवर गेलो असेंन नसेन तितक्यात शालू मला धावत येताना दिसली , सगळ्या अंगावर चिखल माखलेला कळत होतं , कपडे चिखलाने भरलेले ,पडल्या बिडल्या की काय या दोघी ? कुठे लागलं बिगलं तर दवाखानाही नाही आसपास , मनात नाही नाही ते विचार येतच होते तोच मला बघू शालूने जोरात हंबरडा फोडला , “ कृष्णा दादा SSSSSSS !. “ त्याबरोबर अंगावर सर्रकन काटा आला ,मी अजून स्पीड वाढवत धावत तिच्यापर्यंत पोहोचलो . “कियारा कुठे आहे ? “ मी धापा टाकत तिला विचारलं ,ती मोठ्याने रडत होती .
“बोल ना SSS कुठे आहे किया SSSS ? “माझा आवाज वाढला तसं पांदीच्या मागच्या बाजूच्या झाडीच्या दिशेने तिने बोट दाखवलं आणि स्फुंदून स्फुंदून ती रडू लागली , मी जोरात पळत आतल्या बाजूला गेलो आणि समोर ते भयानक दृश्य , जे नंतर कित्येक दिवस माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं , फार फार प्रयास पडले मला ते विसरायला . समोर कियारा अस्तव्यस्त पडली होती , अंगावरचे कपडे फाटलेले , कमरेखालचा भाग उघडा पडलेला , त्या अंधारातही तिची गोरी कांती झळझळुन दिसत होती ,वेदना , अपमान , शरम . भीती या सगळ्या भावनांचा एकाच वेळी मनात कल्लोळ उठला ,कसे तरी तिचे कपडे सावरले , दोन्ही हातांवर तिला उचलली आणि घराकडे निघालो . “किया माझ्या बाळा काय झालं गं हे , कोणा नराधमाने तुझी अशी अवस्था केली गं ? मोठ्याने आक्रन्दत मी घराकडे निघालो होतो , भेदरलेली शालू माझ्यामागे रडत येत होती, वाटेत लागलेल्या विहिरीत तिच्या सकट उडी मारावी असे खूप वाटून गेले पण खूप आवर घातला मनाला . कसाबसा घरी आलो , आम्हाला असे बघून घरी सगळ्यांचेच धाबे दणाणलेले . आता कियारा च्या आई वडिलांना काय जबाब द्यायचा ? कोणाचं असेल हे नीच आणि अधम कृत्य ? आता काय करायचं ? माय आबा सगळेच रडायला लागले , शालू ला खोदून खोदून विचारले तर तिचे एकच उत्तर , पांदीजवळच्या ओहोळात नवीन रंगीत मासे आले होते , कियाराला ते मासे बघायचे होते म्हणून , आम्ही पांदीकडे गेलो , तिथे पोहोचलो आणि मासे बघत होतो , अंधार पडायला लागला म्हणून निघणार तेव्हाच कुठला तरी वास भंपकन माझ्या नाकात शिरला आणि पुढे काय झालं मला कळलं नाही , शुद्ध आली तेव्हा ती चिखलात पडली होती आणि कियारा तिच्या सोबत नव्हती , कसे बसे उठून ती कियाराला शोधू लागली आणि तिला कियारा बेशुद्ध पडलेली नको त्या अवस्थेत दिसली , ते बघून घाबरून ती घराकडे यायला निघाली तोच मी तिला येताना दिसलो .
कियारा अजूनही बेशुद्ध होती , तसेच तिला गाडीवर घातले मागे शालूला बसवली ,अन्याची बाईक घेऊन आलो , कियारा ला कसे बसे माझ्या आणि शालूच्या मध्ये बसवून सुसाट तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो . ईमर्जन्सी बघून डॉक्टरांनी कियाराला ताबडतोब टेबल वर घेतले , पडदे सरकवले आणि तपासणी चालू केली शालूच्याही डोक्याला थोडा मार लागला होता तिलाही ड्रेसिंग चालू होते म्हणून मी तिच्या टेबल जवळ उभा होतो , तितक्यात … “ च च ...अरेरे काय अवस्था केलीये रे या मुलीची , किती जखमा झाल्या आहेत, डोक्याच्या मागच्या बाजूलाही मार लागलेला दिसतो बेशुद्ध असतानाच त्याच अवस्थेत बलात्कार झालेला दिसतोय भयंकर आहे .. , !!!... “
डॉक्टरांचे ते शब्द तप्त शिशासारखे माझ्या कानावर पडले ,त्याक्षणी मस्तकात सणकन कळ उठली , कोण असेल तो नीच ? हाताच्या मुठी वळायला लागल्या , दात ओठ आवळले गेले ,”तितक्यात कियाराचा कण्हण्याचा आवाज आला “ ती शुद्धीवर येत होती , मला तिला तोंड दाखवायचीही लाज वाटू लागली , खूप यातना झाल्या मनाला . कियारा शुद्धीवर आली खरी पण ही माझी कियारा नव्हती , तिच्या डोळ्यात पूर्ण अनोळखी भाव होते , कोणीही समोर गेलं की खूप आक्रोश करत होती त्याचवेळी मोठ्याने रडत होती ,आता भीती जाईपर्यंत ही अशीच ओरडणार . दोन -तीन नर्सेस धावत आल्या त्यांनी पटकन एक सिडेटिव्ह दिलं . मी वेगाने बाहेर आलो , कियाराच्या आई -बाबांच्या नजरेला नजर कसा देणार होतो मी ? विचार करून माझ्या तोंडचं पाणी पळालं काय करू ? काय होऊन बसलं हे ? कोण असेल तो राक्षस ? त्या न पाहिलेल्या हरामखोराच्या विचारांनी मी त्वेषाने मुठी आवळत होतो .. तोच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला ,मी दचकून मागे वळून पाहिलं तर ते डॉक्टर कडुसकर होते , “ कृष्णा मी काय सांगतोय ऐक , कियाराचे आई -बाबा येतील , पोलीस येतील , व्हेरीफिकेशन होईल , जबाब नोंदणी होईल , तुला नाही नाही ते प्रश्न विचारतील , कदाचित तुलाच आरोपी ठरवून ,तुझ्यावर चार्ज लावून तुला खडी फोडायला पाठवू शकतील , तू तरुण आहेस एकदम डोक्यात राख घालून बोलू नकोस , आता येईल त्या प्रसंगाला धीराने तोंड दे , तुझी माय , बाबा , शालू , मंगेश सगळ्यांचा विचार कर ,आणि शालू तिच्यासोबत होती ना ? तीला म्हणावं नीट उत्तरं दे . जे झालं ते झालं त्याला काही ईलाज नाही , पण ईथुन पुढेच जास्त काळजी घेण्याची गरज आहे . Be brave !.. “
माझ्या डोळ्यात भीती दाटून आली ,हे काय आणखी नवीन संकट ? कियाराचे आई बाबा खरंच असं करतील ? हलकेच माझ्या खांद्यावर थोपटून डॉक्टर निघून गेले .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयाण वळण
पुभा लगेच येणं आवश्यक...