ड्रीमलँड-१

Submitted by SharmilaR on 3 May, 2024 - 01:57

ड्रीमलँड
(1)

आज सकाळीच कार सर्विसिंगला दिल्यामुळे सारिकाने शाळेत जायला स्कूटर काढली. रौनकची शाळा सुटायला अजून बराच अवकाश होता, पण सरिकाला आवडायचं, तिथे जरा आधी जाऊन गंमत बघत उभं रहायला...

काही वर्गांना शेवटचा गेम्स पिरीअड असायचा. मग ती मुलं बाहेर फुटबॉल वैगैरे काहीतरी खेळत असायची. काही मुले नुसतीच दंगा मस्ती करत असायची. शेवटचा पीरियड असल्यामुळे टीचर पण जरा दुर्लक्ष करायचे मुलांच्या दंगा मस्ती कडे. कधीतरी त्या खेळण्यात रौनकही असायचा.

सारिका तिथेच झाडाखाली रौनक ची वाट बघत उभी असायची. मुलांचे खेळ बघतांना तिला खूपच मजा वाटायची. तिला तिचं बालपण नव्याने जगता यायचं. कधीतरी तिची एखादी मैत्रीण, म्हणजे रौनक च्या एखाद्या क्लासमेट ची आई पण लवकर यायची, मग तिथेच त्यांच्या छान गप्पा रंगायच्या.

सारिका नेहमी प्रमाणेच सावकाश स्कूटर चालवत होती. कुठलीही गाडी चालवतांना ती नेहमीच सावकाश.. खूप काळजीपूर्वक चालवायची. आता पुढच्या सिग्नल वरून उजवीकडे वळलं, की त्या रस्त्यावर शाळा येणार. शाळेच्या अर्धा किलोमीटर आधीच, एका ठिकाणी ती गाडी पार्क करायची. आणी मग चालत शाळेत जायची.

एकतर शाळेच्या गेट समोर सगळ्या रिक्शा.. मुलांना घ्यायला आलेले पालक.. धावणारी मुलं.. ह्यांची गर्दी.. सगळ्यांना अगदी गेट पासून शक्य तितक्या जवळ, त्यांच वाहन घेऊन उभं रहायचं असायचं... जर्रा धीर नसायचा कुणाला..

सारिकाला जरा पायी रमत गमत चालायला आवडायचं. रौनकलही आवडायचं.. तिच्या सारखंच गप्पा मारत मारत जरा पायी चालायला. चालता चालता मग त्याला शाळेतल्या सगळ्या गमती जमती पण आईला सांगता यायच्या. शक्य असतं, तर सारिका घरी पण त्याला पायी पायीच घेऊन गेली असती. आणी रौनक ही अगदी उड्या मारत तिच्या बरोबर आला असता. खूपच चुळबुळ्या होता तो. त्याच्या एनर्जी ला तरी चांगली वाट मिळाली असती.. पण त्यांच घर खूपच लांब होतं शाळेपासून.. आणी तिकडे घराजवळ अजून बसचा रूटही चालू झाला नव्हता..

सिग्नल हिरवा होताच सारिका उजवीकडे वळली. चौकाच्या मध्यावर ती पोहोचली असेल.. अन्.. अन्.. काही कळायच्या आत समोरून सिग्नल तोडून भरधाव येणाऱ्या एका मोटरसायकलची तिला धडक बसली. ती धडक एवढी जोरात होती, की मोटरसायकल वरची तिन्ही मुलं तिथेच वेडीवाकडी कोसळली आणी सारिका हवेत फेकल्या गेली..

****
(क्रमश:)

पुढील भाग:-

https://www.maayboli.com/node/85090
https://www.maayboli.com/node/85092
https://www.maayboli.com/node/85093
https://www.maayboli.com/node/85094

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults