गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ९ (अंतिम )

Submitted by रुद्रसेन on 24 April, 2024 - 12:48

आपल्या घराच्या बाहेर एका कट्ट्यावर रॉबिन आरामात सिगरेट पीत विचार करत बसला होता. आबांच्या नाटकाचे बिंग बाहेर काढल्यानंतर खरंतर त्याला समाधान वाटायला हवे होते, कारण त्याने खुनात वापरलेल्या हत्याराचा शोध लावलेला होता आणी या प्रकरणात प्रगती केली होती. पण त्याला म्हणावं तसं समाधान लाभलेलं न्हवत. आबांचा नाटकी खेळ हा फक्त मालतीबाईचे खर स्वरूप बघणे यासाठी होता. अर्थात मालतीबाईचे लोकांसोबतचे चुकीचे वागणे आणी बाहेरील बेकायदेशीर गैरप्रकरण वाढली असती तर आबांनी मालतीबाईचा जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पहिले नसते तसं आबांनी स्वतः बोलून दाखवलं होतं. पण आबांनी काही करायचा आतच दुसऱ्या कोणीतरी मालतीबाईचा काटा काढलेला होता. कुटीरोवांच्या हत्यारानेच मालतीबाईचा बळी गेला असल्याची रॉबिनला पक्की खात्री होती. आबांच्या खोलीत मिळालेल्या आबांच्या मित्राच्या पुस्तकात त्याला त्या श्स्त्राविषयी माहिती मिळाली होती, ओल्डोमा वनस्पतीच्या खोडापासून एक वितभर लांब पोकळ नळी बनवली जाते, ज्यामध्ये इंच दोन इंचाच्या टोकदार सुया ज्या ओल्डोमा वनस्पतीपासूनच बनवल्या जात. त्यांच्या अग्रभागी ओल्डोमाच्या जहरी पानांपासून काढलेला घट्ट रस लावून ती सुई अलगदपणे लांब नळीत ठेवायची आणी नळी एका उघड्या बाजूने तोंडात धरून जोरात फुंकायची. वाऱ्याच्या वेगाने सुई निश्चित लक्षामध्ये घुसून काही मिनिटातच काम तमाम करायची. हत्यार तर समजल होतं पण दुर्दैवाने सापडलेलं न्हवत. त्यामुळे रॉबिन काहीसा चिंताक्रांत होता. तरी एक प्रश्न त्याला भेडसावत होताच. कि तो त्या हत्याराचा वापर कोणी केला असेल आणी का केला असेल.

धुराची वलय सोडतच त्याने सुस्कारा सोडला.
सिगरेट संपवून रॉबिन आपल्या खोलीत आला. खुर्चीवर बसून त्याने आपले दोन्ही पाय टेबलावर ठेवले. आणी विचारात गढून गेला तेवढ्यात टेबलावरचा फोन खणाणला...

विचारांच्या तंद्रीतच रॉबिनने फोन उचलला.
“ हेल्लो रॉबिन, “ इ. देशमुख म्हणाले.
“ हेल्लो ..देशमुख “ आपल्या विचारांची तंद्री भंग न करताच रॉबिन बोलला.
“ रॉबिन, ऐक माझं मी आबांना आणी पाटील डॉक्टरांना चांगलं रिमांड मध्ये घेऊन चौकशी करतो. नक्कीच ते काहीतरी लपवत आहेत” देशमुख घाईघाईत म्हणाले.
इ. देशमुखांना अजूनही आबांवर आणी पाटील डॉक्टरांवर संशय होता. पण रॉबिनने याही वेळी देशमुखांना दाद दिली नाही.
“ आपल्याला काहीतरी मिळाले आहे हे वरिष्ठांना सांगण्यासाठी का तुम्हाला त्या दोघांना रिमांड मध्ये घ्यायचं आहे.” रॉबिन देशमुखांची नस पकड शांतपणे म्हणाला.
“ हे बघ रॉबिन मला तर वाटतंय कि, आपण एकदा त्यांची व्यवस्थित चौकशी करायलाच हवी, नक्कीच काहीतरी मिळेल” देशमुख आत्मविश्वासाने म्हणाले.

“ देशमुख, ते दोघेही गुन्हा करण्याइतपत सक्षम नाहीयेत. पाटील डॉक्टर म्हणजे शेळपट शेळी आहे, आबांचं म्हणालं तर ते मालतीबाईना मारण्याचा तयारीत होते, पण त्यांची ती मनीषा पूर्ण झाली नाही आणी जरी त्यांची ती इच्छा पूर्ण झाली असती तरी त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं. तितके स्वाभिमानी आहेत ते असं मला तरी वाटतं” रॉबिन खुर्चीत रेलत म्हणाला.
“ कदाचित त्या ओल्डोमा नावाच्या वनस्पतीच्या बिया कुठे आहेत हे त्यांना माहित आहे त्यामुळे जरा कडकपणे चौकशी केली कि बिया कुठे आहेत याचा थांग आपल्याला त्यांचाकडूनच मिळेल, डॉक्टर पाटलांना जरा फैलावर घेतल्यावर पोपटासारखे बोलतील बघ ते” देशमुख बोलले.
“ अहो देशमुख त्या बिया काय आत्तापर्यंत तशाच असणार आहेत का, ज्याने घेतल्या असतील त्याने त्यांचं रोप तयार....... एवढ बोलून रॉबिन बोलायचा थांबला... आणी फोन तसाच कानाला लावून विचारात गढला.

इकडे देशमुखांना वाटलं रॉबिनने फोन ठेवला कि काय.. ते हॅलो.. हॅलो.. एवढचं बोलू लागले...
अरे.. हे मला आधी का नाही सुचले....रॉबिन मनातच म्हणाला.

“ देशमुख मला एक अत्यंत महत्वाच काम आठवलय मी नंतर बोलतो असं म्हणत देशमुख काय बोलतायत हे न ऐकताच रॉबिनने फोन ठेवून दिला, आणी त्वरेने हालचाल करत पटकन आपल्या घराच्या खाली लावलेल्या दुचाकीपाशी आला. घाईघाईतच त्याने आपली दुचाकी चालू केली आणी शहराच्या बाहेर निघाला. काही वेळाने दुचाकी चालवल्यानंतर तो शहराबाहेर एका कच्च्या रस्त्यालगत असलेल्या नर्सरीजवळ आला. आजूबाजूला लोकांची शेती दिसत होती, जास्त कोणती वर्दळ किंवा दुकाने वगैरे न्हवती. फक्त काही अंतरावर एक छोटंसं टपरीवजा हॉटेल दिसतं होतं. समोरच नर्सरीच छोटसं गेट होतं. रॉबिनने गेटमधून प्रवेश केला आणी आतमध्ये गेला. आत येताक्षणी त्याला विविध प्रकारची रोपं आजूबाजूला दिसली. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती टाकून गुलाब, मोगरा, प्राजक्त अशा प्रकारची फुलझाड होती. जरा पुढे गेल्यावर बाजूलाच विविध फळझाड असलेली रोपं लावलेली होती, कलमी रोपं आणि औषधी झाडांची रोपंसुद्धा व्यवस्थित ठेवलेली दिसत होती. आतमध्ये येण्यासाठी आजूबाजूला असलेल्या रोपांच्या गर्दीतून रॉबिनला पुढे यावं लागलं. पुढे आल्यावर आतमध्ये रिकाम्या जागेत एक पस्तिशीचा एक माणूस खाली बसून माती वेगळी करण्याचं काम करत होता.

“ या नर्सरीचे मालक कोण आहेत” रॉबिनने मुद्दाम नवख्या माणसासारखं त्या इसमाला विचारलं.
त्या माणसाने मागे वळून पाहिलं.
“ अविनाशसाहेब म्हणून आहेत मालक, तुम्ही कोण आहात’” मातीतून हात बाहेर करत त्या इसमाने विचारलं.
“ अच्छा, मला त्यांना भेटायचं होतं, काही रोपं घ्यायची होती, कधी येतील ते” अविनाशने इकडे तिकडे पाहत विचारलं.
“ येतीन थोड्या वेळाने...तुम्ही बसा तोवर “ एवढ बोलून त्या माणसाने आपले हात परत मातीत घालून काम करू लागला.
“तुम्ही इथे काम करता का ? “ रॉबिनने विचारलं.
“ हो इथे कामाला आहे मी “ मान वर न करता त्या इसमाने उत्तरं दिलं.
“ ठीक आहे मी तोवर नर्सरी मध्ये जरा फेरफटका मारतो “ रॉबिन असं म्हणाल्यावर त्या माणसाने फक्त मान डोलावली आणी आपल्या कामात गढून गेला.

रॉबिन मग तिथून पुढे आतमध्ये नर्सरीच्या मागच्या बाजूला जिथे एक छोटं शेड होतं तिथे गेला. नर्सरी नाही म्हटलं तरी मोठी होती आणी खूप वेगवेगळ्या प्रकारची रोपं तिथे उपलब्ध होती. शेडजवळ पोहोचल्यावर तिथे रॉबिनला दिसलं कि वर पारदर्शक प्लास्टिकचं छत केलेलं होतं त्यामुळे आतमध्ये उजेड येत होता. शेडमध्ये शेतीसाठी उपयुक्त झाडे ठेवलेली दिसत होती आणी बाजूलाच एक फावडे आणी छोटीशी कुदळ होती. शेडच्या कोपऱ्यात थोडीशी माती वर आलेली दिसत होती, जणु जमीन खणल्यासारखी दिसतं होती. रॉबिनने पुढे जाऊन पाहिलं तर कोणतं तरी झाडं उपटून टाकल्यासारखं वाटत होतं, इतर रोपाप्रमाणे ते प्लास्टिकमध्ये मातीत नसणार तर जमिनीमध्ये लावलेलं असणार असं दिसतं होतं. जमीन कुदळीच्या सहाय्याने खणुन काढल्यासारखी दिसतं होती. रॉबिन तिथे खाली झुकून पाहू लागला.

रोप मुळासकट उपटून टाकल्यामुळे तिथे इतर कोणताच मागमूस राहिलेला न्हवता. रॉबिन आजूबाजूला पाहू लागला, जमिनीवर इतर काही खुणा आहेत का ते त्याला पहायचं होतं. पण तसं काहीच आढळलं नाही. शेडच्या एक बाजूला छोटासा दरवाजा होता त्याच्यापुढे मागे मातीच्या ढिगारा होता, रोपांसाठी मातीची व्यवस्था तिथून केली जायची. शेडच्या कोपऱ्याकोपऱ्यात बांबू उभे केले होते जेणेकरून शेडला आधार देता येईल. शेडची उंची जास्त उंच न्हवती, रॉबिनने हात वर केले असते तरी त्याचे हात शेडच्या छताला टेकले असते. रॉबिन कोपऱ्यांमध्ये उभ्या केलेल्या बांबूकडे गेला आणी बांबूच निरीक्षण करू लागला. जिथे जमीन खणली गेली होती त्याच्या जवळच्या बांबूवर काहीतरी टोचल्याप्रमाणे काही होल दिसत होत्या, रॉबिनने जवळ जाऊन निरीक्षण केलं आणी हाताची घडी घालून विचार करू लागला. लांबून काहीतरी टोकदार वस्तू फेकून मारल्याच्या खुणा वाटत होत्या. रॉबिनने बारकाईने त्या खुणांना न्याहाळल तेव्हा त्या नजरेस पडल्या. तिथलं निरीक्षण करून रॉबिन लगेच अचानक तिथून बाहेर पडला आणी बाहेर काम करत बसलेल्या त्या इसमाजवळ आला.

“साहेब आले नाहीत का अजून “ रॉबिनने विचारलं.
“ नाही आले अजून.... खरंतर एव्हाना यायला हवे होते,” कपाळावर आठ्यांच जाळ आणत तो इसम बोलला.
“ अच्छा इथे नर्सरीत तुमचे मालक एकटेच येतात का? अजून कोणी येत असत त्यांच्यासोबत” रॉबिनने विचारलं. तसं विचित्र चेहरा करून त्या इसमाने रॉबिनकडे पाहिलं. त्याला हे प्रश्न कळला नाही.
“ म्हणजे..” अस म्हणत आपला चेहरा तिरकस ठेवत तो म्हणाला.
“ म्हणजे नर्सरी खूप मोठी आहे आणी छान ठेवलीय, कोणी मदतीला येतं का तुमच्या मालकांच्या कि तू एकटाच असतो इथे” रॉबिन सहजपणे म्हणाला.
“ मीच असतो इथे देखभालीला, पण साहेबांच्या पत्नी म्हणजे छोट्या बाईसाहेब पण येतात इथे केव्हा केव्हा, कामासाठी” एवढ बोलून तो इसम आपलं काम करू लागला.

त्याला इसमाला अजून जास्त काहीही न विचारता रॉबिन तडक तिथून बाहेर पडला, बाहेर लावलेल्या आपल्या दुचाकीजवळ आला. आसपास कुठे फोनबुथ आहे का ते त्याला पहायचं होतं. पण इथे जवळपास हॉटेल किंवा फोन असल्याचं काहीच लक्षण दिसत न्हवत. रॉबिन दुचाकीवर बसला आणी समोर काही अंतरावर एक टपरीसारखं काहीतरी दिसतं होतं तिथे निघाला. त्या टपरीजवळ पोहोचताच त्याला दिसलं कि आतमध्ये छोटेखानी हॉटेल आहे जिथे नाश्ता, चहा अशा गोष्टी मिळतात. तिथे समोरचं गल्ल्यावर एक इसम बसलेला होता त्याचाकडे चौकशी केल्यावर रॉबिनला समजलं कि आतमध्ये फोन आहे. आतमध्ये गेल्यावर एका कोपऱ्यात ठेवलेला टेलिफोन त्याला दिसला आणी रॉबिन तिथे गेला.
रिसीवर हातात घेऊन त्याने नंबर फिरवून इ. देशमुखांना फोन लावला. पहिल्या दोन रिंगमधेच देशमुखांनी फोन उचलला.

“ हा.. इ. देशमुख बोलतोय” देशमुखांचा भारदस्त आवाज आला.
“ देशमुख साहेब मी रॉबिन बोलतोय.. फोनवर रॉबिन आहे कळताच त्याला पुढे काहीही बोलू न देता देशमुख म्हणाले “ अरे रॉबिन कुठे होतास तू.. किती वेळ झालं तुझा घरी तुला फोन करत होतो मी .. तू फोन उचलला नाहीस”
“ देशमुख मी जरा अविनाशच्या नर्सरीमध्ये आलोय मी “ रॉबिन म्हणाला.
“ त्याची काही एक आवश्यकता नाहीये आता रॉबिन, आपल्याला गुन्हेगार मिळालाय ” देशमुख पुढे काही बोलणार इतक्यात रॉबिन आश्चर्याने म्हणाला” काय...कोण आहे गुन्हेगार”
“आत्ताच काही वेळापूर्वी अविनाश पोलीस स्टेशन मध्ये आला होता, आणी त्याने कबुल केलंय कि खून त्यानेच केलाय म्हणून” देशमुख म्हणाले.
“ काय.. असं म्हणाला तो” रॉबिन जवळपास ओरडतच म्हणाला.
“ होय त्यानेच कबुलीजबाब दिलाय कि त्या संध्याकाळी त्यानेच गुपचूप हॉस्पिटलमधून येऊन मालतीबाई यांना बेसावध क्षणी गाठून संपवलं. घरी त्याला आणी त्यच्या बायकोला दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाउल उचललं होतं. त्यामुळे मला वाटतंय कि आता खुनी सापडलाय तुला हेच सांगायला मी फोन करत होतो पण तू घरात न्हवतास” देशमुखांनी एका दमात सांगून टाकलं.
“ खून जर अविनाशने केलाय असं त्याचं म्हणण आहे तर मग कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल त्याने काय सांगितलं” रॉबिनने प्रश्न केला.
“ अ.. ते त्याने नष्ट केलंय असं त्याचं म्हणण आहे. पण कोर्टात तो ते सगळं सांगणार आहे,” देशमुखांनी माहिती पुरवली आणी तू सुद्धा ताबडतोब पोलीस स्टेशनला ये असं सांगून देशमुखांनी फोन ठेवला.

यावर काहीही न बोलता फोन ठेवून रॉबिन तेथून विचार करत बाहेर पडला. आपल्या दुचाकीजवळ येऊन तो थांबला. त्याला दोन मिनिट विश्वासच बसत न्हवता कि अविनाशने खुनाची कबुली दिलेली आहे आणी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालाय.
रॉबिनने मनाशी काहीतरी ठरवलं आणी आपल्या दुचाकीवर बसला. जमीन खणल्याच्या खुणा आणी बांबूवरची टोकदार होल कशाची आहेत हे त्याला समजून चुकलं होतं. आपली दुचाकी चालवत शहराकडे तो निघाला. काही वेळानंतर त्याची गाडी देसाई वाड्याजवळ येऊन थांबली.

संध्याकाळ होऊ लागलेली होती.
वाड्याच दार उघडंच होतं त्यामुळे रॉबिनने आतमध्ये प्रवेश केला. अंगणात येऊन पाहिलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. रॉबिनने मग आपला मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला, स्वयंपाकघरच्या दाराशी आल्यावर त्याला आतमध्ये नंदिनी काम करताना दिसली. ती पाठमोरी उभी होती, रॉबिनने यावेळी लक्ष विचलित न होऊ देता दरवाजावर टकटक करून आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली. नंदिनीने मागे वळून पाहिलं. रॉबिनला पाहून ती काहीच बोलली नाही तशीच मान खाली घालून उभी राहिली.

“ मला समजलं कि अविनाशने गुन्हा कबुल केलाय, आणी तो स्वतः पोलीसस्टेशन गेला” रॉबिन धारधार नजरेने नंदिनीकडे पाहत म्हणाला.
“ हो..एवढचं बोलून नंदिनी खाली पाहत ओट्यावरच्या भांड्यांशी चाळा करू लागली.
“ मी नर्सरीवर जाऊन आलोय मगाशी..” एवढ बोलून रॉबिन नंदिनीची हालचालींच निरीक्षण करू लागला.
त्यावर काहीही न बोलता नंदिनी मागे वळली आणी ओट्यावरच्या भांड्यांची आवराआवर करू लागली. तिची अशी शांतता रॉबिनला रुचली नाही.
“काही बोलणार नाहीस का यावर तू...” रॉबिन नंदिनीचा एकेरी उल्लेख करत स्पष्टपणे नंदिनीला म्हणाला.
रॉबिनच्या या एकेरी उल्लेखावर कोणतीही प्रतिक्रिया न देता नंदिनी आपलं काम करू लागली तिने शेगडीवर भांड ठेवून गॅस पेटवला काही क्षण शांततेत गेले. पण त्या शांततेचा भंग करत नंदिनी म्हणाली.

“ तुम्ही एक दिवस माझ्यापर्यंत येणार याबाबत खात्री होती मला, पण एवढ्या लवकर याल असं वाटलं न्हवत” एवढ बोलून नंदिनी मागे वळली, बाजूच्या लाकडी फळीवरील एक डबा बाहेर काढून ओट्यावर ठेवला
“ तुम्ही चहा घेणार का “ अतिशय स्पष्ट आणी शांततेत नंदिनी म्हणाली.

तिच्या या थंड आणी आत्मविश्वासु वागण्याने रॉबिन खरंतर आवकच झालेला होता. पण तरीही तसं चेहऱ्यावर न दाखवता तो स्पष्टच म्हणाला.
“ नर्सरीमध्ये कुटीरोवांकडून मिळालेल्या त्या बियां तुचं पेरल्यास आणी त्याचं रोप उगवलं, तुझं काम झाल्यावर नंतर तूच उपटून टाकलेस, मानलं तुला. कोणालाही ते शस्त्र किंवा त्याबद्दलचा कोणताही मागमूस तुला ठेवायचा न्हवता. पण दुर्दैव तुझं या रॉबिनच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी गोष्टी सुटत नाही याची तुला कल्पना नसावी” रॉबिन घारीसारखी नजर रोखत नंदिनीला पाहत म्हणाला.

“ जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा वाड्यात आलेलं पाहिलं तेव्हाच तुम्ही खूप आत्मविश्वासू आहात हे कळलेलं होतं, तुमची चौकशी करण्याची पद्धत आणी वाड्याच्या आसपास तुम्ही केलेलं निरीक्षण, मुख्य म्हणजे आबांचं नाटक तुम्ही ज्या पद्धतीने बाहेर काढलंत तेव्हा तर तुमच्या हुशारीची खरंच दाद द्यावी वाटली मला. तुमच्यामुळे खरंतर आम्हाला आबा परत मिळाले असं म्हणायला हरकत नाही” नंदिनी शांतपणे पण खंबीर आवाजात म्हणाली
“तुला एवढचं समजलं असेल तर हे पण सांग कि तू मालतीबाईचा खून केलेला असताना अविनाशने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन का केलं, अर्थात पोलिसांना अविनाशला अटक करून काहीही मिळणार नाहीये हे मला माहितीये. कारण खुनाच शस्त्रच त्यांना मिळालेलं नाहीये, त्याच्या नुसत्या कोरड्या कबुलीजबाबावर खटला उभारू शकत नाही आणी राहिलाच तर तो टिकूच शकत नाही” हाताची घडी घालत नंदिनीकडे पाहत रॉबिन म्हणाला. नंदिनीच्या चेहऱ्यावर याचा वाक्यांचा काहीही परिणाम झाला नाही जणू काही तिला माहित होतंच कि रॉबिन हेच बोलणार आहे
“म्हणूनच तर ते पोलिसांना स्वाधीन झालेत ना” शांतपणे असं बोलत नंदिनीने आणी फळीवरून काढलेल्या डब्याच झाकण उघडू लागली. तिच्या हावभावातला शालीनपणा जाऊन एक कणखरपणा दिसत होता. तिने मागे वळून गॅस वरच भांड खाली ठेवलं. जवळच्या डब्यातून तिने काहीतरी बाहेर काढलं आणी रॉबिनला दाखवत म्हणाली.

“ या शेवटच्या दोनच सुया राहिल्यात “ असं रॉबिनला दाखवून तिने त्या ओल्डोमा वनस्पतीपासून खोडापासून बनवलेल्या त्या सुया शेगडीच्या धगधगत्या गॅसवर धरल्या. रॉबिनला काही कळणार इतक्यात त्या जाळून खाक झाल्या होत्या.

“ तुम्ही आमच्या आबांना आमच्यात परत आणल, त्याच्या बदल्यात कमीत कमीत त्या शस्त्राची हलकीशी झलक बघायचे हकदार तुम्ही नक्कीच आहात” एवढ बोलून नंदिनीने तो डबा बाजूला ठेवून दिला. कुटीरोवांच्या शस्त्राचे अस्तित्व सांगणारे पुरावे रॉबिनच्या देखत जाळून खाक झालेले होते.
“ किती विचित्र खेळ खेळतेयस ना तू... आपल्या सासूला त्याच शस्त्रांनी जिवनिशी मारून तुला कसलीही खंत वाटत नाहीये. नक्कीच दगड मनाची आहेस तू” रॉबिन आवेशात म्हणाला.
तसं नंदिनीने स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर पाहिलं. संध्याकाळच कोवळ उन खिडकीतून तिच्या अंगावर पडलेलं होतं. तिच्या नजरेत आता एक प्रकारचा दुःखाचा डोंब दिसून आला. मगाचा चेहऱ्यावरचा कणखरपणा जाऊन तिथं आता एक स्त्रीचा नाजुकपणा आलेला होता. तिला तसं पाहताच रॉबिनचा आवेश जरासा ओसरला.

“ एका आईच आईपण हिरावून नेल्यावर ती कोमल मनाची राहत नाही रॉबिन,” पहिल्यांदाच नंदिनीने रॉबिनचं नाव आपल्या तोंडून घेतलेलं होतं. तिच्या नेत्रातून दोन अश्रूबिंदू तरळले. ती पुढे बोलू लागली – “ तुम्हाला हे समजलंच आहे कि माझ्या सासूबाईंचा खून मी केलाय तर तो का केलाय हे सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागेल. कदाचित त्यानंतरच तुम्ही मला समजू शकाल कि इतकी दगड मनाची मी का झाले.
क्षणभर डोळ्यातले तरळणारे अश्रू नंदिनीने पदराने पुसले आणी बोलू लागली -

“मी एक अनाथ मुलगी होते लग्नानंतर या घरात आल्यापासून मला माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासऱ्यांनी आबांनी कधीच अनाथ असल्याची जाणीव होऊ दिली नाही. नेहमीच प्रेमाने माझ्याशी वागत आले. आशुतोष सुद्धा वहिनी वहिनी करत माझ्याशी मैत्रीपूर्ण बोलायचे. मला आपलं घर काय असत याची जाणीव या लोकांनी मला करून दिली. पण सासू बाई अगदी त्या उलट होत्या मला सारखं टोचून बोलायच्या. मला सुद्धा माहित नसलेल्या माझ्या आईबाबांचा उद्धार करायच्या. पण मी कधी तक्रार केली नाही ना कोणाजवळ काही बोलले. माझ्या घरातील इतर प्रेमळ माणसांमध्ये मी असले कि या सगळ्या गोष्टी मी विसरून जायचे.
असेच दिवस पुढे जात होते काही दिवसांनी मला समजले कि मला दिवस गेले आहेत. मी खूप आनंदी झाले मी फक्त अविनाश यांना सांगितले त्यांना सुद्धा आनंद गगनात मावेना. पण हि बातमी काही दिवसांनी सगळ्यांना असं आमचं ठरलं. एके दिवशी माझ्या सासूबाईनी मला खूप काम सांगितली. त्यांचे कपडे धुवायचे होते आणी काही कपड्यांना इस्त्री करून द्यायचे होते कारण त्यांना बाहेर जायचे होते. मला दिवसभर कामं करून थकायला झालं होतं. म्हणून मी व्हरांड्यातल्या जिन्याच्या पायरीवर बसले होते. तेवढ्यात सासूबाई आल्या आणी मला बसलेलं पाहून खूप शिव्या देऊ लागल्या. काम करायची सोडून बसतेय का नुसती म्हणत त्यांनी आरडाओरडा केला. लगेचच कपड्यांना इस्त्री कर म्हणून मागे लागल्या. मी त्यांना सांगितलं कि मी थकलेय जरा बसते मग नंतर करून देते. मी काहीतरी उगाच कारण सांगून काम टाळायला बघतेय असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांना जास्तच राग आला, माझं काहीही न ऐकता मला दंडाला धरून त्यांनी तिथून उठवलं आणी मला मारू लागल्या. आता मात्र माझा नाईलाज झाला मी त्यांनी सांगितलं कि आई मला दिवस गेले आहेत मी थोडं आराम करून नंतर कपड्यांना इस्त्री करते. पण मी काहीतरी खोटं बोलतेय असं वाटून त्यांनी मला रागाने लांब ढकलून दिलं त्यांचा जोर इतका होता कि व्हरांड्यातल्या बाजूच्या खांबावर जाऊन मी आदळले आणी माझ्या पोटाला मार लागला. मला असह्य कळ जाणवली आणी आई ग.. म्हणून मी कळवळले. तरीही माझ्या या अवस्थेकडे दुर्लक्ष करून त्या निघून गेल्या. मला जमिनीवरून उठवल देखील नाही. बराच वेळ मी तशीच कण्हत पडून होते थोड्या वेळाने कमलाबाई आल्या त्यांनी पटकन मला तिथून उचलून नेलं, त्यांना वाटलं मला चक्कर आली होती. मी सुद्धा त्यांना घडलेला प्रकार सांगितला नाही.

रात्री अविनाशना मी घडलेला प्रकार सांगितला आणी सांगितल कि माझा पोटात कळ येतेय. लागलीच त्यांनी मला एका हॉस्पीटलला नेलं. तिथे गेल्यावर समजल कि माझ्या पोटाला मार बसल्याने आतमध्ये बाळाला धक्का बसलेला आहे आणी बाळ त्यातच दगावल. हे ऐकून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितली. त्यामुळे माझ्यासुद्धा जीवाला धोका होता तो टळला. पण आमचं बाळ दगावल्याने आम्ही खूप दुखीः झालो. यांनी माझी समजूत घातली कि आपण बाळासाठी परत प्रयत्न करू. पण नंतर प्रयत्न करून देखील मला दिवस राहिनात म्हणून परत हॉस्पीटला जाऊन चेकउप करून पाहिलं तर त्यात कळल कि पहिला गर्भपात झाल्याने गर्भाच्या पिशवीला इजा झालीय आणी मला परत आई होता येणार नाही.”
एवढ बोलून नंदिनी ओक्साबोक्स्शी रडू लागली.

नंदिनीवर ओढवलेल्या प्रसंगाचं रॉबिनला सुद्धा खूप वाईट वाटलं. तो फक्त मान खाली घालू उभा राहिला. नंदिनीच सांत्वन कसं करावं हे त्याला समजेना आणी अशा प्रसंगी कोणते सांत्वनपर शब्द वापरावेत हे देखील त्याला समजले नाही. त्यामुळे न समजून रॉबिन तसाच दुःखी मानाने उभा होता. थोड्या वेळाने नंदिनीने स्वतःला सावरलं आणी ती पुढे सांगू लागली.

“ आमच्या दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे झाले होते, अविनाश खूप गप्प गप्प राहायचे. रात्र रात्र मी उशीत तोंड खुपसून रडायचे. पण एके दिवशी ठरवलं कि बस्स आता यापुढे सहन करायचं नाही मी स्वतःवर येणारी कोणतीही वेळ निभावून नेली असती पण माझ्या बाळाला या जगात येऊन श्वास घेण्याआधीच या जगाचा निरोप घ्यायला लावणाऱ्या माझ्या क्रूर सासूचा जीव घायचा. मी हे ठरवलेले कोणालाच सांगितलं नाही आणी कशाप्रकारे सासूबाईना मारता येईल त्याचा विचार करू लागले. दरम्यान आबा फिरायला म्हणून डोंगरदऱ्या आणी धबधबे पाहायला गेले होते, तिथून ते मला पत्र पाठवायचे कि ती ठिकाणं कशी आहेत, तुला आणी अविनाशला मी इथे एकदा तरी फिरायला आणणार अशा अर्थाची पत्र असायची, त्यांनी मला पत्रातून तिथे त्यांना भेटलेल्या कुटीरोवा जमातीबाद्द्द्ल आणी त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीबद्दल आणी त्यांनी आबांना दाखवलेल्या शस्त्राबद्दल माहिती सांगितली जी फक्त मला आणी आबांनाच माहिती होती.”

“दुर्दैवाने तिथून येताना आबांना अपघात झाला आणी त्यांना हॉस्पिटलला नेलं, त्याचं समान मात्रं घरी आणल तेव्हा त्याचं सामान त्यांच्या खोलीत लावत असताना त्यांच्या सामनात मला एक लोखंडी पेटी सापडली त्यात मला त्या ओल्डोमा वनस्पतीच्या काही बिया दिसल्या. तेव्हा माझ्या मनात एक कल्पना आली. अनायसे अविनाश यांची नर्सरी होती तेव्हा या बिया तिथे पेरुयात असं मी ठरवलं. आणी एका मोक्याच्या क्षणी मी त्या वनस्पतीपासून कुटीरोवांच हत्यार बनवणार होते. नर्सरीत काम करणाऱ्या कामगाराला मी या रोपाला हात न लावण्याविषयी सुचवलं होतं, एक छोटं कुंपण त्या रोपाच्या बाजूला बनवलं, आणी त्या वनस्पतीची काळजी घेऊ लागले. माझी मेहनत फळाला आली आणी ते रोप उगवून आलं. त्याची एक छोटी फांदी काळजीपूर्वक तोडून त्यापासून पोकळ नळी आणी सुया बनवल्या. दर आठवड्याला तिथून पाने तोडून त्याचा रस बनवून ठेवायचे. आणी तिथल्या बांबूवर एक कागद लावून लांबूनच नळी तोंडाजवळ धरून नळीच्या तोंडाशी फुंकून सुया बरोबर त्या कागदावर मारायचा सराव करू लागले. कारण मला हे शस्त्र वापरण्याची संधी जेव्हा कधी मिळेल तेव्हा लगेचच ते चालवावं लागणार होतं. ओल्डोमाच्या पानांच्या रसाचा वापर तेव्हा होणार होता. सुदैवाने त्यांचा रस जास्तकाळ टिकून राहत असे. सासूबाई कधीकधी संध्याकाळी अंघोळ करून बाहेर जातात मला माहित असायचं. त्याचं वेळी सासूबाईंचा काटा काढायचं ठरवलं. अपेक्षितपणे कमला आणी मी स्वयंपाक घरात असताना मला त्यांनी काही कपडे धुवायला दिले आणी आताच्या आत्ता धुवा असं सांगितलं आणी अंघोळीला निघून गेल्या. मी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं माझ्या डोक्यात योजना तयार होती. कमलाबाई त्या दिवशी सोबत कपडे धुवू लागल्या त्याचा खरंतर फायदा झाला कारण त्या सोबत असल्यावर माझ्यावर संशय येणार न्हवता. कमलाबाईंच्या नकळत स्वयंपाकघरातून चाकू घेतला आणी एका कपड्यात बांधून बादलीतल्या इतर कपड्यात तो कपडा टाकला. कमलाबाई पुढे गेली तेव्हा ओट्याच्या खाली कोपऱ्यात ठेवलेली ओल्डोमाच्या रसांची डबीत बादलीत वर ठेवली. नळी आणी सुया साडीला कमरेच्या काच्यात गाठ मारून ठेवल्या. आणी मागे विहीरिवर गेले, कमलाबाईंना दुसऱ्या बादलीतील कपडे धुवायला दिले.
माझ्या जवळची बादली मी बाजूला ठेवली. सासूबाईंची अंघोळ करायला किती वेळ घेतात हे माहित असल्याने तेवढा वेळ जाऊ दिला. आणी रहाटाने पाणी काढून थोडे कपडे धुतले. नंतर कपड्यात गुंडाळलेला चाकू गुपचूप हातात घेतला, कमलाबाई कपडे धूत होती मी हळूच रहाटाचा दोर घेऊन कळशी घट्ट करण्याच्या बहाण्याने चाकू ने रहाटाचा दोर निम्म्याहून अधिक उसवला मग कळशी लावली आणी विहिरीत कळशी सोडली. कळशी भरून काही झटके दिले त्यामुळे भरलेली कळशी खाली निसटली आणी विहिरीच्या तळाशी गेली. कमलाबाई दुसरी कळशी आणायला वाड्याच्या अडगळीच्या खोलीत गेली जिथे एका कोपऱ्यात मी जादाच्या कळश्या ठेवलेल्या होत्या पण त्या बादल्या आणी इतर भांड्यांच्या आड होत्या जेणेकरून कमलाबाईंना कळशी सापडायला वेळ लागणार होता. कमलाबाई कळशी आणायला गेल्यावर मी त्वरेने कमरेला लावलेल्या ओल्डोमा वनस्पतीच्या सुया बाहेर काढल्या आणी बादलीतल्या डबीच झाकण काढून त्यात त्याची टोकं बुडवली.
आणी नळीमध्ये सुया घालून पळतच वाड्याच्या मागच्या दारातून वाड्यात आले. वाड्यात कोणीही आलेलं न्हवत. सासूबाईंची अंघोळ झालेली होती आणी त्या त्यांच्या खोलीत जाताना मी पाहिलं. माझं नशीब बलवत्तर होतं. कमलाबाईंना दुसरी कळशी अजून सापडलेली न्हवती कारण वरच्या मजल्यावरून भांड्यांचा आवाज येत होता त्यावरून समजत होते कि त्या अजून कळशी शोधत होत्या. मी आजूबाजूला कोणी नाही हे पाहून पटकन सासूबाईंच्या खोलीबाहेर आले. सासूबाई समोर आरशात पाहून केस विंचरत होत्या त्यामुळे त्यांना समजलं नाही कि मी मागे आहे. त्यांनी त्यांचे एका बाजूचे केस बाजूला केले होते. मी क्षणाचाही विलंब न लावता हातातल्या नळीला तोंडाजवळ नेले आणी नळी जोरात फुंकली त्यासरशी वेगाने आतील सुया बाहेर पडल्या आणी बरोबर सासूबाईंच्या कानाच्या खाली घुसल्या. त्या घुसताक्षणी सासूबाई तोंडातून हलकासा अस्फुट आवाज करत जमिनीवर कोसळल्या, त्यांचं शरीर पूर्ण आखडल होतं आणी त्यांना कसलीही हालचाल करता येत न्हवती. मी पुढे जाऊन त्यांच्या मानेमागच्या घुसलेल्या सुया बाहेर पटकन काढल्या पण त्या नादात त्या ओढल्या गेल्या आणी थोडंसं रक्त बाहेर आलं पण मला जास्त विचार करायला वेळ न्हवता. कमलाबाई कधीही खाली आल्या असत्या. मी त्या सुया काढल्या आणी पटकन पळत मागच्या दरवाजाने विहिरीजवळ आले. बादलीतल्या ओल्या कपड्यात नळी आणी सुया एका कापडात बांधून ठेवून दिल्या.

आणी कपडे धुवायचं नाटक करत कमलाबाईंची वाट पाहत बसले. थोड्या वेळाने मला कमलाबाईंचा आरडाओरड ऐकू आला. मला समजलं कि कमलाबाईंना सासूबाईंच्या खोलीत त्या आडव्या पडलेल्या दिसल्या असणार, मी पळत आतमध्ये गेले आणी मग पुढे काय झालं हे तुम्हाला माहित आहेच”

एवढ बोलून नंदिनी मान खाली घालून शांत बसली. खिडकीबाहेर बाहेर आता अंधार पडू लागलेला दिसत होता. रॉबिन शांतपणे हातावर हनुवटीवर टेकून उभा होता.

“ खरंतर मला सुरुवातीला डॉक्टर पाटलांवर संशय होता, पण नंतर त्यांच्या घरी आबा गुपचूप येजा करतात. हे समजल्यावर आबांवर संशय बळावला. पण मालतीबाई कोसळल्या तेव्हा आबा घरात न्हव्तेच आणी त्यांच्याकडे ओल्डोमाच्या बिया सुद्धा सापडल्या नाहीत म्हटल्यावर मला माझी तपासाची दिशा बदलावी लागली. बिया गायब झाल्या म्हणजे नक्की कोणाला तरी त्या पेरून त्याचं रोप बनवायचं असणार हे मला समजलं होतंच. त्यामुळे साहजिकच अविनाशवर संशय आला. कारण रोपे लावायला नर्सरीपेक्षा सुरक्षित जागा दुसरी असणार न्हवती. आबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन तिथून गुपचूप माघारी येऊन त्यानेच मालतीबाईंचा काटा काढला असणार असं वाटत होतं. नर्सरीला भेट दिल्यावर नक्की रोप सापडणार असं वाटून मी तिथे गेलो पण तू आधीच रोपाची विल्हेवाट लावलेली होतीस.”

नंदिनीकडे पाहत रॉबिन म्हणाला आणी पुढे बोलु लागला –
शेडमधे आधाराला उभ्या केलेल्या बांबूवरची बारीक होल पाहून समजलंच कि येथे कोणीतरी येऊन सुयांना मारून लक्षभेद करण्याचा सराव केलेला दिसतोय. अविनाश सोडून नर्सरीत राजरोसपणे जर कोणी येउजाऊ शकत असेल तर ती तूच होती. नंतर देशमुखांनी सांगितलं कि अविनाशने गुन्हा कबुल केलाय तेव्हा खून त्याने केलाय खरं वाटलं नाही कारण नक्कीच तो कोणाला तरी वाचवत असणार हे स्पष्ट होतं. तेव्हा माझा लक्षात आलं कि तो नक्की कोणाला वाचवतोय. मालतीबाई वाड्यात कोसळल्या, तेव्हा दोनच व्यक्ती वाड्यात होत्या एक कमलाबाई आणी तू, नर्सरीमध्ये रोप तूच लावलेलं असणार हे पक्क कळल, मग मी आबांचा रहस्यभेद केल्यावर तुला समजलं कि आज न उद्या मी कुटीरोवांच्या शस्त्रापर्यंत पोहोचणार म्हणून मी तिथे पोहोचायच्या आधीच तू ते रोप नष्ट केलंस.”

यावर नंदिनी थोडावेळ शांत बसली. मागे वळून तिने गॅस बंद केला, आणी परत रॉबिनकडे वळत ती म्हणाली
“ मला माहित होतं ज्यावेळी तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल माहित होणार त्याचं वेळी तुम्ही त्याच्या मागावर जाणार. आबांच्या खोलीत येऊन ज्यावेळी तुम्ही त्यांचं बिंग बाहेर काढलं त्याचवेळी मला समजलं कि तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल समजलंय, त्या रात्री मी अविनाश यांना आमच्या झोपायच्या खोलीत सगळ्या गोष्टी सांगितल्या, मीच सासूबाईना मारलंय यावर त्यांचा विश्वास बसला नाही. तसं करण्यामागच कारण काय होतं हे देखील त्यांना सांगितलं. ते सांगताना मला अश्रू अनावर झाले, पण त्यांनी मला समजून घेतलं, त्यांना सुद्धा वाईट वाटलं. तुमची इच्छा असल्यास मी पोलिसांच्या स्वाधीन होते असं मी म्हणाले पण त्यांनी नकार दिला ते म्हणाले कि असं काही करू नकोस देसाईंच्या सुनेबाबत लोकांनी भलत्यासलत्या गोष्टी बाहेर केलेल्या योग्य होणार नाही. त्याउलट ते म्हणाले कि तुझा ऐवजी मी गुन्हा केलाय असं सांगतो. मी सुरुवातीला ओढेवेढे घेतले. पण नंतर आमचं ठरलं कि आधी गुन्हा कबूल करायचा पण कोर्टात गेल्यावर तो नाकारायचा. कोर्टात केस टिकणार नाही अशाने. पण मग कुटीरोवांच शस्त्रसुद्धा नष्ट करावं लागणार होतं. कधीतरी तुम्ही नर्सरीवरसुद्धा ओल्डोमा वनस्पतीच्या शोधार्थ येणार हे समजून म्हणून मीच नर्सरीवर जाऊन ते रोप उकरून काढलं आणी नष्ट केलं.”

एवढ बोलून नंदिनी शांत बसली. तिला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून झालं होतं. रॉबिनने खाली मान घालून उसासा टाकला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता. १-२ रातकिड्यांचा आवाज वाड्याच्या बाहेरून येत होता. काहीही न बोलता रॉबिन स्वयंपाकघरातून बाहेर पडला. वाड्याबाहेर येऊन हताश होत त्याने दुचाकी चालू केली आणी घराकडे निघाला.

त्याला खुनी सापडला होता पण तो गुन्हा सिध्द करू शकत न्हवता कारण खुनाच हत्यार नष्ट झालेलं होतं आणी खुनाचा हेतू सुद्धा गुप्त राहणार होता. सगळ्या गोष्टी समजून पण रॉबिन हतबल होता, खरंतर असं त्याच्या गुप्तहेरीच्या कार्यकाळात प्रथमच घडत होतं. खरंतर मालतीबाई यांना असं मरण येणं अपेक्षित होतं असं रॉबिनला वाटून गेलं. आपल्या घरातल्या सुनेला त्यांनी अत्यंत वाईट वागणूक दिलेली होती. नंदिनी हि कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती न्हवती, आपल्या बाळाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा बदलाच तिने घेतलेला होता. त्यामुळे तिला गुन्हेगार म्हणून साबित करण्याची खटपट सुद्धा रॉबिनला करू वाटली नाही.

यातच काही दिवस निघून गेले. इ. देशमुखांनी अविनाशच्या जबाबानुसार त्याच्यावर खटला भरला होता. प्रकरण कोर्टात गेलं. अविनाशने कोर्टात आपला शब्द फिरवून गुन्हा केल्याचं नाकबूल केलं अर्थात हे सगळं त्याने आणी नंदिनीने आधीच ठरवलं होतं. सन्माननीय कोर्टाने देखील पुराव्याअभावी अविनाशला निर्दोष ठरवलं. देशमुखांचा तिळपापड झाला, खून अविनाशनेच केलाय असं त्यांना अजूनही वाटतंय. रॉबिनने देशमुखांना खरा खुनी कोण आहे याबाबत काहीहि सांगितलं नाही आणी सांगून पण काय करणार कारण त्यांच्याकडे पुरावेच न्हवते, आणी होते ते फक्त तर्क. तसंही रॉबिनला नंदिनीने केलेल्या कृत्याबाबत काहीही गैर वाटत न्हवते, वाटत होती ती एक सहानुभूती. भविष्यात कधीतरी योग्य वेळ आली कि देशमुखांना या प्रकरणाचा खरा खुनी कोण होता हे सांगायचं रॉबिनने ठरवलं होतं. संध्याकाळची वेळ होती रॉबिन आपल्याच खोलीत खुर्चीत स्वस्थपणे बसून होता. हातची बोट एकमेकांत गुंफवून साऱ्या घडलेला घटनांचा घटनाक्रम मनाशी घोळवत शांत बसला होता.
तेवढ्यात दारामधून त्याच्या घराच्या समोर काम करणारा पोरगा आतमध्ये आला.

“ दादा, हे पार्सल आलंय तुझा नावाने” हातामध्ये खाकी पार्सल नाचवत तो पोरगा रॉबिनजवळ आला.
या वेळी पार्सल कोणी असेल याचा विचार करतच रॉबिनने ते पार्सल त्या पोराकडून घेतले आणी खुर्चीतून उठून बाजूच्या खिडकीजवळ गेला. पार्सल जास्त जड न्हवते. समोर काम करणारा पोरगा तिथेच उभा राहून रॉबिनकडे आशाळभूतपणे पाहत होता. रॉबिनने काळजीपूर्वक पार्सलचे सील काढले. आतमध्ये पैशाच्या काही नोटा होत्या आणी एक चिठ्ठी. रॉबिनने नोटा आतमध्ये तशाच ठेवल्या आणी आतमधली चिट्ठी बाहेर काढली आणी वाचू लागला -
“ मला लिहायला जास्त जमत नाही, पण तरीही प्रयत्न करावा असं वाटलं. तुम्ही खूप कष्टाने आणी प्रामाणिकपणे तपासकाम केलंत. तुम्ही आमची दुखः आणी आमच्यावर आलेली कठीण वेळ समजून घेतली, त्यामुळे आम्ही जे काही केलं असेल, ते तुम्हाला समजून पण त्यावर पुढे कोणताही हस्तक्षेप तुमचाकडून झाला नाही. त्याबद्दल तुमचे खरंच आभार. तुमच्या कामामुळे खरंतर आमच्या घराला परत घरपण मिळालं, घरातले सगळे आता मिळून मिसळून राहू लागलोय. याचं श्रेय खरंच तुम्हालाच जाते. पण एक खंत वाटत होती कि तुम्हाला मात्र यातून काहीही मिळालं नाही. तुम्ही उदरनिर्वाहासाठी हे काम करता मात्र आमच्या प्रकरणात तुम्हाला काही लाभलं नाही. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणी कष्टाची परतफेड म्हणून हि छोटीशी भेट स्वीकाराल अशी अपेक्षा आहे, म्हणूनच हे पार्सल पत्रासोबत पाठवण्याचा खटाटोप करत आहे. पत्राच्या शेवटी माझं नाव लिहित नाही पण तुम्हाला समजलं असेलच, परत एकदा तुमचे आभार”

पत्रातील मचकूर पूर्ण वाचून रॉबिन शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागला. पत्र नंदिनीने लिहिलंय हे समजायला त्याला वेळ लागला नाही. पत्रातील मायना लिहिताना सुद्धा तो पुरावा म्हणून वापरता येऊ नये याची काळजी घेऊन तिने लिहिला होता, खरंच या गोष्टीचं रॉबिनला कौतुक वाटलं. खिडकीबाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत रॉबिन उभा होता. पत्र वाचून त्याने हात कमरेच्या मागे बांधले आणी त्या नादात रॉबिनच्या हातातून पार्सल निसटून खाली जमिनीवर पडलं आणी आतल्या नोटा पार्सलच्या बाहेर आल्या, बाजूलाच उभ्या असलेल्या पोराने त्या नोटा पहिल्या आणी तो पोरगा आनंदाने नाचू लागला.

“ हुर्रे..दादाकडे पैसे आले. आता दादा नवीन बुद्धिबळ घेऊन मला शिकवणार..हुर्रे.....आणी दादा आता चहाच्या उधारीचे पैसे चहावाल्याच्या तोंडावर फेकून मारणार...हुर्रे ” असं म्हणत मोठमोठ्याने गाण म्हणत तो पोरगा उड्या मारून नाचू लागला.

पण रॉबिनच मात्र त्याच्याकडे लक्षच न्हवत, समोर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे आणी सूर्यकिरणांच्या लालसर पिवळ्या रंगानी फुललेल्या आभाळाकडे पाहत पाणावलेल्या नेत्रांनी पण तरीही हलकस स्मित करत तो खिडकीबाहेर बघत तसाच उभा होता...

समाप्त...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वळणं वळणं घेत कथा खऱ्या खुन्यापर्यंत आली. बरीच पात्रं, त्यांच्या ॲलिब्या, मोठा पसारा होता. त्यात शेरलॉक होम्स कथेप्रमाणे (साईन ऑफ फोर?) ब्लोपाईपचा वापर! मग जरा फॅमिली ड्रामा, असं करून साठा उत्तरी कहाणी एका उत्तरी संपली. मजा आली!
पुढील लेखनास शुभेच्छा!