विचित्रविश्वात भागो.

Submitted by केशवकूल on 13 April, 2024 - 08:39

विचित्रविश्वात भागो.
एक काळ असा होता कि मी खूप गरीब होतो. पदवीधार झालो नि तडक मुंबई गाठली. कुरिअर कंपनीत नोकरी मिळवली. त्या कंपनीतच मित्र मिळाले. त्यांच्या खोलीतच एक कॉट घेतली. भाड्याने.
मग घरातले सगळे लग्न कर म्हणून पाठी लागले. मुलगी गावातलीच आमच्यापैकीच होती, माहितीतली होती.
“बाबा, पण मला राहायला जागा नाही.” मी तक्रारीच्या स्वरात सांगितले.
बाबा एकदम भडकले, “लग्नाचा आणि जागेचा काय संबंध? अरे तिची पत्रिका मी बघितली आहे. निवासस्थानाचे ग्रह उच्चीचे आहेत. तुम्ही दोघं राजा राणी बनून राजवाड्यात रहाल. राजवाड्यात.”
बाबांच्या भरोश्यावर मी लग्न करून टाकले.
मुंबईला मित्रांच्या मित्रांपैकी एक जण कंपनीच्या कामासाठी चार महिन्यांसाठी नायजेरियाला गेला होता. मित्र म्हणाला. “तुझा जागेचा प्रश्न सुटेस्तोवर तू रहा तिथे. ऐश कर.”
जागा फर्मास होती. फुल्ली फार्निश्ड.
तीन महिने झाल्यावर मात्र खडबडून जागा झालो. जागेच्या शोधात दाही दिशा. पण भाडी इतकी जबरदस्त कि माझा पगार त्यातच गेला असता. मग खाणार काय? कप्पाळ?
फिरता फिरता एक दिवस एक जाहिरात दिसली.
“अगदी अगदी स्वस्तात मुंबईत रहायची जागा. त्वरित संपर्क साधा...
त्वरित संपर्क साधला. एका एक खाणी जागेत एजंटचे ऑफिस होते.
“तर तुम्हाला जागा पाहिजे म्हणताय. मिळेल. पण जागा खूप नॉईझी आहे. रेल्वे लाईनच्या बाजूला. चालेल?”
“चालेल. पण भाडे वाजवी असायला पाहिजे.” मी पुष्पीकडे बघत सांगितलं. पुष्पा म्हणजे माझी बायको. तिने होकारार्थी मान डोलावून संमति दर्शवली.
“भाडं अगदी नाहीतच जमा आहे म्हणाना.” एव्हढी बोलून त्याला खोकल्याची उबळ आली. रुमाल काढून त्यात तो खोकला. खिशातून रुमाल काढून तो त्यात मनसोक्त खोकला.
“बंगलाच आहे. जागेचे मालक अमेरिकेत असतात. त्यांची इच्छा आहे कि जागा नांदती रहावी. कुणीतरी रहायला यावं झाडलोट करावी आणि एक दिवा लावावा. भाडं जसं जमेल तसं द्या. नाही दिलं तरी चालेल.”
“नाही नाही. तसं कसं चालेल. भाडं सांगा. परवडण्यासारखे असेल तर मग पुढच बघू,”
“दरमहा फक्त एक रुपया. जमेल द्यायला? आधी असं करा जागा बघून या. ही घ्या किल्ली.” त्यानं एक किल्ली दिली. एका टॅगला जोडली होती. टॅगवर लिहिले होते “भुते बंगला.”
“”भुते बंगला”? इथे काय भुते रहातात कि काय?” मी उद्गारलो. म्हणून कमी भाडे का!
“नाही हो. भुतं वगैरे काही नाही. ही द्वाड मुलं. द्या ती किल्ली इकडे.”
त्याने किल्ली घेतली, एक रंगीत पेन घेतले आणि भुतेचं विभूते केलं.
“विभूते म्हणजे बंगल्याच्या ओनरचे नाव.”
“ते अमेरिकेत रहातात ते.” मी त्याला माहिती पुरवली. पण भुते नाहीत म्हटल्यावर मी थोडा निराश झालो होतो.
भूतं घराला घरपण आणतात. पण महिना एक रुपयात तुम्हाला अजून काय पाहिजे. एक रुपयात कितीशी भुतं येणार हो? तुम्हाला म्हणजे... गरिबाने जास्त अपेक्षा ठेवू नयेत.
“मीच तुमच्या बरोबर येऊन तुम्हाला जागा दाखवायला पाहिजे. पण मला झालाय खोकला.”
त्याने उदाहरणार्थ खोकून दाखवले.
“त्याची काही गरज नाही.” मी म्हणालो.
“मी तुम्हाला सांगतो कसं जायचे ते. तुम्ही लोकलनं फाइनडर स्टेशनचं तिकीट घ्या. पण फाइनडर स्टेशनला उतरायचं नाही बरंका. सरळ पुढं जायचं. थोड्या वेळाने लोकल एका जागी थांबते, स्टेशन नाहीये ते. अशीच थांबते. तिथे उतरायचं. घाई करायची नाही. तुम्ही उतरेपर्यंत गाडी थांबते. विभूतेंचा बंगला समोरच दिसेल तुम्हाला. जाल ना व्यवस्थित? का मला येयला पाहिजे बरोबर.”
“नको, नको. आम्ही जाऊ. खूप आभारी आहे.”
त्याला खोकल्याची उबळ यायच्या आत आम्ही काढता पाय घेतला.
“किल्ली मात्र आठवणीने परत करा...”
मी आणि पुष्पी आम्ही जागा पहायला गेलो.
ते एक त्रिकोणी बेट होते. दोन बाजूला फाइनडरची खाडी होती आणि एका बाजूला रेल्वे लाईन. आम्हा दोघांच्या शिव्वाय बेटावर चिटपाखरू नव्हते. समोर विभूते बंगला होता. गाड्यांची अखंड ये जा चालू होती. गाड्यांच्या गोंधळात भर म्हणून कि काय वरून एक फायटर प्लेन रोरावत गेले. त्याने यू-टर्न घेतला आणि अगदी आमच्या डोक्यावरून एक चक्कर मारली. मला वाटले बेटावर दोन माणसे बघून पायलटला धक्का बसला असावा म्हणून खात्री करून घेण्यासाठी त्याने यू-टर्न घेतला असावा. पुष्पाने त्याला हात हलवून टाटा बाय बाय केले.
तर त्या बेटावर आमचे असे स्वागत झाले.
बंगला म्हणजे एक ऐसपैस बैठी वास्तू होती. विशेष म्हणजे बंगलीला गच्ची होती. ती बघून पुष्पा हरकून गेली.
“रात्री आपण इथेच झोपू आणि तारे मोजू.”
आम्ही मनोमन ठरवलं होतं कि जागा घ्यायची. पुष्पाने पोतडीतून नारळ काढला, आत जाऊन खोलीत ठेवला. आणि कोकणी प्रार्थना पुटपुटली.
“जय देवा महाराजा, आम्ही दोघं उभयता आपल्या आश्रयाला आलो आहोत. आमचे रक्षण करा. दोनाचे चार करा.”
चार फुलं अर्पण केली. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. परत फिरलो.
रीतसर कागदपत्रे तयार झाली आणि आम्ही एक रुपया भाड्याने जागा ताब्यात घेतली.
आम्ही आमचे सामान घेऊन तिकडे शिफ्ट झालो. वापरायचे कपडे, रोजच्या वापरातील काही भांडी कुंडी, आमच्या देवीची फ्रेम आणि हो एक लहानुसा गुळगुळीत दगड. एव्हढेच काय ते आमचे सामान.
“हे काय? हा दगड कसला?” मी बायकोला विचारले.
“ही माझ्या आईने मला दिलेली भेट आहे. हा जादुई दगड तिच्या आईने तिला दिला होता. असा हा आमच्या घरी आयांच्या बाजूने आला आहे. स्वयंपाक करताना आमटी, भाजी, पिठले ह्यात टाकला कि त्या पदार्थाला स्वर्गीय चव येते. आपलं काम झालं कि धुवून पुसून डब्यात ठेऊन द्यायचा.”
आम्ही गरीब होतो पण आमच्याकडे तो “सुखाचा पॉलीअना दगड” होता. आता तुम्ही विचाराल कि ही “पॉलीअना” कोण रे भाऊ? सांगणार आहे. पुढच्या भागात.
असेच एक दिवस आम्ही खाडीच्या बाजू बाजूने चक्कर टाकून घरी परत आलो तर दारात एक मांजरी आमची वाट पहात बसलेली.
आम्ही दरवाजा ढकलला. (त्या दोन वर्षात आम्ही कधी दरवाज्याला कुलूप लावलं नव्हतं.)
आमच्या आधीच ती घरात शिरली. घरभर हिंडून एकंदरीत घराची पाहणी केली. तिला घर आवडलं असणार. एक कोपरा निवडून तिने आमच्याघरी मुक्काम ठोकला. आम्ही त्या घरात दोन वर्षे काढली. त्या दोन वर्षात तिने आम्हाला सोबत केली. आम्ही तिला आणि तिने आम्हाला आधार दिला. विशेषतः माझ्या बायकोला. मी दिवसभर ऑफिसात मग तिचीच बायकोला कंपनी!

त्या जागेत वीज नव्हतीच! मी कंदील विकत आणला. त्या कंदिलाच्या प्रकाशांत आम्ही दिवस काढले. आय मीन रात्री काढल्या, पावसाळ्याच्या सुरवातीला काजव्यांचे थवेच्या थवे बेटावर उतरायचे. मी त्यांना पकडून काचेच्या बाटलीत भरून ठेवत असे. त्याचा आम्ही विजेरी सारखा वापर करत असू.
एक आठवण.
एकदा आम्ही दोघे समुद्र किनाऱ्याबाजूच्या मरीन ड्राइव्ह रस्त्यावर हवा खात टंगळ-मंगळ करत हिंडत होतो तेव्हा एका भक्कम शरीरयष्टीच्या स्मार्ट तरूणाने दोनी हात फैलावून आमचा रस्ता अडवला.
“ओळखलत कि नाही?”
हा माझ्या तर ओळखीचा नव्हता. मी बायको कडे बघितले. विचार केला, असेल तिच्या माहेरचा. पण तिने देखील नकारार्थी मान हलवली.
“कसं ओळखणार? आपलीतुपली भेटच जर झाली नाहोये. मी त्या फायटर प्लेनचा पायलट. आणि ह्याच त्या बाईसाहेब ना मला टाटा बाय बाय करणाऱ्या? नमस्कार वाहिनीबाय मी फ्लाईट लेफ्टनंट सुबोध.” बायको खुश झाली.
आम्ही खाऱ्या दाण्याच्या तीन पुंगळ्या विकत घेतल्या आणि कट्ट्यावर बसून गप्पा मारत संपवल्या.
“चला आता मला जायला पाहिजे. मी इथे सिम्युलेटवर ट्रेनिंग घेत आहे. परतायची वेळ झाली आहे. भेटू परत.”
“निश्चित.”
तो त्याच्या गर्दीत आणि आम्ही आमच्या गर्दीत हरवलो.

एकदा पुष्पा लाडात येऊन मला म्हणाली.
“माय डीअर भागू, आय...”
अश्या नाजूक समयी विमानांचा एक ताफा कानठळ्या बसतील असा आवाज करत डोक्यावर उड्डाण करत होता.
पुष्पाने त्याच्या वर आवाज करत ओरडून वाक्य पूर्ण केले.
“...लव यू.”
मी अजून जोरात ओरडून उत्तर दिले.
“आय टू लव यू.” हे तिला ऐकू गेले नाही. तिने तिचा कान माझ्या तोंडाशी आणला. तुम्ही कल्पना करू शकता. मग काय झाले असावी त्याची.
त्या दिवशी मला देहबोलीचा शोध लागला.
माणूस जेव्हा गुहेत रहात होता, जेव्हा भाषा नव्हती तेव्हा तो आपल्या भावना कशा व्यक्त करत असेल? ओरडणे, हसणे, रडणे, पाय दणादणा आपटणे, डोक्याचे केस उपटणे असले प्रकार करून तो आपल्या भावना व्यक्त करत असेल काय?
माझा नित्यक्रम सेट झाला होता. सकाळी तयार होऊन, डबा घेऊन मी बरोबर आठ वाजून सदतीस मिनिटांनी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाऊन “फुलगाव ते बंदर” फास्ट ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. गाडी क्षणभर थांबायची. “आईये भाईसाब” म्हणत कोणीतरी हात द्यायचा आणि मी त्याचा आधार घेऊन गाडीत चढत असे. गाडीत खूप चेष्टा मस्करी चालत असे. सगळे जण मला “प्रिन्स ऑफ “नो मॅन’स् लँड”” असे म्हणत. कामावरून घरी परत येताना देखील गाडी बरोबर “माझंगाव” स्टेशनला मला सोडून मग पुढे प्रस्थान करत असे.
एकदा मात्र धमाल आली. त्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एक दिवसाचा लाक्षणिक संप होता. मी पुष्पीला बोललो, “चल आज आपण रेल्वे लाईनवर फिरायला जाऊ.” बायकोने जणू काय पिकनिक आहे अशा स्टाइलने तयारी केली.
“आज आपण तिकडेच जेवण करू.”
मी, बायको आणि मनी म्याऊ रेल्वे लाईन वर जाऊन खूप बागडलो. सगळ्यात मनीने मजा केली.
प्रथम तिने आम्हाला मागच्या दोन पावलावर चालून दाखवलं. मग हवेत कोलांट्या उड्या मारून दाखवल्या मग तिथलीच एक काठी हातात घेऊन तिने काठी फिरवत फिरवत जाणाऱ्या ऐटबाज तरुणाची नक्कल करून दाखवली. मग काठी टेकत टेकत जाणाऱ्या म्हाताऱ्याची नक्कल केली. म्हातारी माणसं जशी खोकतात अगदी तस्सं खोकून पण दाखवलं. आता बोला. तुमचा विश्वास बसत नाहीये ना.
“ही मनी चावट झाली आहे.” बायको प्रेमाने नि कौतुकाने बोलली. ते ऐकून मनीला अजून चेव आला. आमच्याकडे बघून डोळे मिचकावून ती हसायला लागली. मग तिने एक हिंदी गाणे निरनिराळ्या गायकांच्या आवाजात आणि स्टाईल मध्ये म्हणून दाखवले.
“मने, आता बस्स झाले. माहित आहे खूप हुशार आहेस.” बायकोनं असे दटावाल्यावर ती रुसून एका बाजूला जाऊन बसली, म्हणाली, “म्याऊ!”
“कळलं. भूक लागली आहे ना?” बायकोनं सँडविच करायची सामग्री पोतडीतून काढली. थोड्याच वेळात आम्ही सँडविचवर ताव मारून तिथेच लाईनवर दिली ताणून.
एवढ्या वेळात एकपण ट्रेन आली नाही कि गेली नाही. का कोण जाणे आम्हाला चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले. त्या रात्री आम्हा दोघांना झोप आली नाही.
“अरे एव्हढे मनाला लावून का घेतोस? थोड्याच वेळात पहाट होईल, सूर्य उगवेल. आणि गाड्या येतील.”
जेव्हा पहिली गाडी धाड धाड करत गेली तेव्हा आमच्या “बेकरार दिलको करार आ गया.” काळाचा प्रवाह जणू काही काळ थांबला होता तो पुन्हा सुरु झाला, देव तिकडे आणि आम्ही इकडे मजेत आहोत ह्या सुखद कल्पनेनं आम्हाला गाढ झोप लागली. बापरे नको रे बाबा तो संप पुन्हा.
दिवस असे मजेत चालले होते.
तशात एजंटचा मला फोन आला.
“इकडून गेलात तर कधी येऊन जा. तुमच्यासाठी रावसाहेबांचा मेसेज आहे.”
आम्ही विभूते बेटावर राहून “विभूते महालाची” देखभाल करत आहोत ह्याबद्दल त्यांनी आम्हा दोघांचे आभार मानले होते. इकडे येऊन आम्हाला भेटायची त्यांची तीव्र इच्छा होती पण सध्या तरी ते शक्य होईल असं दिसत नव्हतं ह्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता. शेवटी निदान मी, माझे आणि माझ्या पत्नीचे फोटो त्याना पाठवावेत अशी त्यांची प्रार्थना होती.
पत्नी म्हणजे बायको. त्यांच्या उच्च वर्तुळात बायकोला पत्नी असे म्हणत असावेत. ऐकावे ते नवलच.
त्याच रविवारी आम्ही फोटू सेशन केले. फोटो अमेरिकेत जाणार म्हणून मी सुटाबुटात नि बायको भरजरी शालूत, अंगावर दोन चार (चार कुठले दोनच हो) दागिने लेवून तयार झालो. फॅशन मॅगेझीनमध्ये जशा पोझ असतात तश्या पोझ घेऊन आम्ही एकमेकांचे फोटो काढले. दिले रावसाहेबांना अमेरिकेत पाठवून.
त्यांचे उत्तर वाचून आम्हाला धक्का बसला. ते लिहितात, “हे काय फोटो तुम्ही पाठवले आहेत? माझी एकूण अशी कल्पना होती कि तुम्ही सहज सुंदर असाल. पण असे दिसते आहे कि तुम्ही कृत्रिम आहात- आर्टिफ़िशिअल असा शब्द त्यांनी वापरला होता. तुम्ही कचकड्याचे आहात काय? मिसेस भागो बहुतेक शालू नेसून स्वयंपाक करत असाव्यात. शालू नेसून भांडी घासत असणार आणि धुणी धुवत असणार. आणि मिस्टर भागो, तुम्ही सुटाबुटात टाय लावून बागकाम करत असाल. मी भारत जेव्हा सोडला तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. आता बरेच बदल झाले आहेत असे दिसतंय, इत्यादि इत्यादि.
आयुष्यात प्रथमच मला माझी लाज वाटली.
आम्ही लगेचच नवे सेशन केले. अॅज इज व्हेअर इज बेसिसवर. त्यात म्याऊचे फोटोही आले.
हे फोटो मात्र रावसाहेबाना भावले. आम्हाला शुभाशीर्वाद देऊन त्यांनी मनीम्याउचे खूप कौतुक केले. त्यांनी लिहिले होते कि अशीच एक मनी कार्लेकर थ्री रिंग सर्कसमध्ये काम करत असे त्याची त्याना आठवण झाली.
अशाप्रकारे आम्हाला मनीचे रहस्य उलगडले.
लिहिण्यासारखे खूप काही आहे. ह्या छोट्या लेखात सगळ्या आठवणी लिहिणे शक्य नाही.
ते सुखाचे जादूई दिवस केव्हा भुर्कन उडून गेले ते समजलेच नाही. असच असतं. दुर्दैवाचे दशावतार मात्र सरता सरत नाहीत. रेंगाळत रहातात. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. हाच सिद्धांत आईनस्टाईन नावाच्या इसमाने मांडला --कि टाईम इस रिलेटीव-- तेव्हा केव्हढा गाजाविजा झाला. असो.
आमचा भाडेपट्टीचा करार दोन वर्षांपुरता होता. दोन वर्ष जवळ जवळ पुरी होत आली होती. आता पुढे काय? हा विचार सतत मनात येत होता. शेवटी बायकोशी विचार विनिमय करून मी फाईनडर प्रॉपरमध्ये एक जागा बघितली. देवाच्या दयेने मला नोकरीत बढती मिळाली होती. थोडे पैसेही गाठी जमा झाले होते. बायकोलाही छोटी मोठी नोकरी करून संसाराला मदत करायची इच्छा होती. मी एजंटकडे जाऊन आमचा निर्णय कळवला. तो म्हणाला मी रावसाहेबाना कळवतो.
आम्ही सामानाची बांधाबांध सुरु केली. मनीला पण जाणीव झाली होती कि आम्ही आता जाणार. ती घरात सैरभैर फिरत होती. निरोप घ्यायचे दुःख काय असते ते त्या दिवशी आम्हाला समजले. पण इलाज नव्हता.
जायच्या दिवशी आम्ही सामान घेऊन रेल्वे लाईनपाशी गाडीची वाट पहात उभे होते. मनीही होती. आम्ही तिला खूप सांगून बघितले. चल आमच्या संगती पण ती काही बधेना. तिचे आपले “म्याव म्याव” चालू होते. आम्हाला आधी वाटले कि म्याव म्हणजे “मी आऊ?” असे असावे पण ते तसे नव्हते. आम्ही गाडीत चढलो. तिला शेवटचे सांगून झाले, “किती नखरे करते आहेस. चल आता.”
पण मनी आली नाही ती नाहीच.
अखेर आगगाडीनेही एक उसासाशिट्टी दिली. तिलाही समजले असावे कि आता पुन्हा इथे थांबणे नाही. मनीच्या डोळ्यात अश्रू होते पण तिने मोठ्या कष्टाने चेहऱ्यावर हसू आणले. पुढचा एक पाय उचलून आम्हाला टाटा बाय बाय केले.
हळू हळू आमचे विचित्र विश्व दृष्टीआड होत गेले.
लहानपणी मी “विचित्रविश्वात वेणू” नावाचे पुस्तक वाचले होते. ते कुठल्यातरी इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर होते म्हणे. मी पण अशाच विचित्रविश्वात काही वर्ष काढली. विचार केला आपणही एक पुस्तक लिहावे. हा लेख त्या पुस्तकाची नांदी वा समरी आहे असे समजा.
(नेव्हर से समाप्त)

"Raindrops Keep Falling On My Head" ह्या अजरामर नाण्याच्या पार्श्वभूमीवर ही कथा .spiderman 2 मधून
https://www.youtube.com/watch?v=nL8hVXSDmNM

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंजक....

सगळ्या प्रतिसादकांचे आभार.
पुढच्या लेखात
"Raindrops Keep Falling On My Head" ह्या गाण्याचे बोल आणि त्यावर छोटे विश्लेषण लिहीणार आहे.
अगदी साधे सरळ लिहिण्याची इच्छा आहे.
"ही सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वाज लाईट." ह्या पद्धतीचे.
बघुया कस जमतंय.