प्राक्तन

Submitted by अवल on 18 March, 2024 - 13:16

घे उतरवला सगळा साज श्रृंगार
तयार आहे आता तुझ्या स्वागताला
बरस हवा तितका, हवा तसा
गोठवून टाक माझ्या नसानसांना
कर प्रयत्न, रंग-रूप सारं कर शुभ्र
तुझ्या बोचऱ्या गारठ्याने टोकेरी फांद्या
रंगहिन, रुक्ष, निष्पर्ण, निरिच्छ, निर्विकार
अन वर दे सोडून निर्लेप वस्त्र पांढरं
राहिन लपेटून तेच गारढोण प्रावरण
सुकत आत आत, रुखं रुखं वरून...

जातील, हेही बर्फाळ दिवस जातील
झालं? झालं तुझं? अस्तित्व दाखवून?
मानलं न तुला? तूच अखेर एकमेव!
चल, आता जा; अंतरीची उर्मी बाहेर पडु देत
हिरवा कोवळा कोंब पडू देत बाहेर
उजळत्या उन्हात इंद्रधनु बनु पहातय
उमलु देत त्याला, फुटु देत धुमारे
तुझे भान ठेऊनच उमलतील ती
दुसरा पर्यायच नाही, त्यांना अन तुलाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर....

धन्यवाद, दसा, सामो, कृष्णा, पॅडी.
सामो, खरं तर ऋतु, त्यातही बर्फाळ प्रदेशातले वनस्पतींचे स्थित्यंतर अपेक्षित होते

>>>>>>.सामो, खरं तर ऋतु, त्यातही बर्फाळ प्रदेशातले वनस्पतींचे स्थित्यंतर अपेक्षित होते
ओह ओके ओके माझी गल्लत झाली.

सामो, असं काही नाही ग. कवितेला अनेक आयाम असू शकतात. वाचणाऱ्याला त्यात वेगळं काही दिसावं, जाणवावं हे अप्रूपच Happy