खऱ्याखुऱ्या कवितेची खोटीनाटी गोष्ट

Submitted by पॅडी on 15 March, 2024 - 03:22

चार मौलिक सूचनांसमोर
आदराने झुकवली मान
म्हटले या निमित्ताने
सोडवू जुन्या निरगाठी; होते - नव्हते गुंते
होईल संसार नावाच्या जटील कोड्याची उकल,
एका उद्दाम बेदरकारीने
घातला निरागस अक्षरांना वळसा
जिवाभावाच्या शब्दांना दिली
बेमालूम बगल

गजरा की बुके...बुके का गजरा
तळ्यातमळ्यात करताना, माझा-
लोण्याचा गोळा गटकावणारा बोका झाला,
- " साब धंदे का टायम हैं;
क्या मंगता जलदी बोलो.."
किरटा फुलवाला उगाच फिस्कारला..!

आइस्क्रीम ' फॅमिली पॅक ' घेताना
विरघळत गेलो स्वतः त
अन् अंगांग शहारले,
कळेना इतक्या वर्षांनी
बथ्थड देहाचे ब्रम्हकमळ
कसे काय उमलले...?

" व्हॉट हैपन टू योर चॉइस, डैडी -"
आंबट चेहऱ्याने चिरकले चिरंजीव :
" शी!! पुन्हा केसर- पिस्ता?? ",
खरं सांगू :
लिहा-बोलायला ठिकाय -
काही उमलतबिमलत नसते जगण्यातून कविता
बिनकामाचा उपदव्याप नुसता...!

परत नकोच विषाची परीक्षा
मनोमन ठरवून टाकलं,
चुरगळलेल्या देहमनाने
गजऱ्याच्या पुडक्याचं लंगडं कोंबडं तसंच झाकलं ...

- तर आठवल्या शुभचिंतकांच्या सूचना; सल्ले
म्हणता पुन्हा बांधू गेलो
निसरड्या वाळूत सरकते किल्ले

नव्या उमेदीने... नव्या उभारीने घातला
देशांतर्गत पर्यटनाचा घाट ,
डेस्टिनेशनवर होईनाच एकमत
इन मीन तीन डोकी
फर्माईशी सतराशे साठ!

स्वप्नाळू सुरांत बोललो :
धुंडाळू डोंगरदऱ्या ...पालथी घालू गर्द वनराई
श्रम परिहार - शिवाय रटाळपणातून चेंज,
तिथेही झाली घोर निराशा :
- रूम्स आर स्मेली
- फ़ूड इज़ पथेटिक
- लुक; माझ्या मोबाइलला कुठेच मिळत नाही रेंज!

व्हायचा भटकंतीचा उत्सव -
ठरली सुतकी चेहऱ्यांची वणवण,
पुन्हा ये रे माझ्या मागल्या
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न

परतीच्या प्रवासात;
कालपरवा -
निर्ममतेने झिडकारलेली
शब्दाक्षरांची शुभ्र पिलावळ
पुन्हा पायांत लुडुबुडू लागली,
प्रतिकांच्या भोपळ्यात बसून
एक ऐटीत निघाली लेकीच्या घरी-
कल्पनाविलासात निमग्न-
दुसरी कापसाची म्हातारी
सुदूर नभात उंच उंच उडू लागली....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>प्रतिकांच्या भोपळ्यात बसून
एक ऐटीत निघाली लेकीच्या घरी-
कल्पनाविलासात निमग्न-
दुसरी कापसाची म्हातारी
सुदूर नभात उंच उंच उडू लागली....

वाह वाह!!! या म्हातारीला खाणारे कोल्हे, वाघ म्हणजे 'कामाचा व्याप', 'ओव्हरटाईम', 'पैशाची चणचण' किंवा 'अचानक आलेले आजारपण' जे की लेकीपर्यंत पोचू देत नाहीत. पण प्रतिकाच्या भोपळ्यांना, कल्पनाविलासाला - कशाचेच भय नाही पॅडी. तेव्हा चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.

मस्त कविता.

अरे सॉरी सॉरी कविता बसलेली आहे ना प्रतिकांच्या भोपळ्यात मग वरील माझा उतारा निरर्थक ठरतो. खोडलेला आहे.

सामो - जीवनाशी चार हात करताना, येणारे बरे वाईट अनुभव; संगीत मान-अपमान आदि जगून भोगून कितीही नैराश्य आले तरी कविता जगण्याची उमेद देते, किंबहुना जगणे सुसह्य करते, असा हा अनुभव शब्दबद्ध केलाय...

प्रतिकांच्या भोपळ्यात बसलेली व आकाशात उंच उडणारी कापसाची म्हातारी ही अंतर्बाह्य सुखावणारी विलक्षण संवेदनशील तरलता मनातली अन् कवितेतली ही....

- अभिप्रायासाठी खूप खूप आभार...( बाकी पहिला उतारा एका वेगळ्या दिशेकडे बोट दाखवतोय...कधीतरी त्याची ही कविता होऊ शकेल असे वाटते..)

>>>>जगणे सुसह्य करते, असा हा अनुभव शब्दबद्ध केलाय...
बरोबर. कळले होते.
>>>>>प्रतिकांच्या भोपळ्यात बसलेली व आकाशात उंच उडणारी कापसाची म्हातारी ही अंतर्बाह्य सुखावणारी विलक्षण संवेदनशील तरलता मनातली अन् कवितेतली ही....
सुंदर.

>>>>>तुमचा व्यासंग अफाट आहे ह्याची प्रचीती कैकदा अनुभवलीय …
असं अजिबात नाहीये हो. मला सरळसोटच अर्थ कळतात. Happy असो. थांबू यात.