एक व्यक्ती अशी …

Submitted by काव्यधुंद on 13 February, 2024 - 01:26

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिच्या स्पंदने अंतरीची कळावी
मनाचा मनाशी संवाद व्हावा, हृदयातली तार तेथे जुळावी

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिला भेटता दुःख सारे सरावे
निसर्गा वसंती जसा गंध येतो, तसे चित्त उत्फुल्ल अलवार व्हावे

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिची ओढ काळास व्यापून टाके
जिला भेटण्याने तमाच्या जिव्हारी, प्रभा लालिम्याची क्षणार्धात फाके

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिने फक्त देताच आधार थोडा
संपून जाईल आकांत सारा, विसावा सुखे जीव घेईल वेडा

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिच्या फक्त असण्यात धुंदी जराशी
युगे लोटलेली तिच्या संगतीने, उरतेच तरीही हुरहूर क्षणाची

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिला भेटल्यावर उमगे स्वतःशी
जिचा शोध होता जन्मांतरीचा, तिला भेटता तूच निःशब्द होशी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिली आहे.

याला उत्तर एका गाण्यात आहे. आपण बऱ्याच कल्पना करतो, पण अचानक एक व्यक्ती अशी भेटते की आपण तसा विचारच केलेला नसतो.

एक दिन आप यूं हमसे मिल जाएंगे, मैने सोचा ना था