समागम (भाग २)

Submitted by Abuva on 11 February, 2024 - 00:49
Bard Generated Image - Trail with lake visible

(भाग १ - https://www.maayboli.com/node/84650 )

अर्जुन आटपत होता. तेवढ्यात फोन वाजला. चित्रांगदा होती. "गुड मॉर्निंग! उठला आहेस ना? ए, त्या लिस्टमध्ये रेनकोट नव्हतं. मी छत्री घेणार आहे. तू पण काही तरी घे. आत्ता मी न्यूजमध्ये बघतेय, संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. गेट रेडी रे आता. बाय बाय, सी यू सून!"
बाकी काही म्हणा शी इज प्रॅक्टिकल! बोंबला, एक नग वाढणार आता सामानाचा...
आटोपून त्यानं सॅक पाठीला लावली. एक हॅन्डबॅग होती ती घेऊन बाहेर पडला. शनिवार असल्यानं रूममेट अजूनही झोपलेलेच होते. रस्ता क्रॉस केला की‌ डंकिन डोनट्स होतं. तिथनं त्यानं त्यांचा लंच आणि जाताना खाण्यासाठी एक डझन डोनट्स घेतले. उदयन त्याला इथेच पिकअप करणार होता. कॉफी घेऊन तो दिसू शकेल अशा बेतानं बाहेरच उभा राहिला.

आली गॅंग! गाडीत रॉकिंग म्युझिक चालू होतं. उदयन शेजारी अवंतिका होती, मागे चित्रांगदा. डिकी उघडून अर्जुनानं सॅक, हॅन्डबॅग आत टाकले, अन् चढला... उदयननं अवंतिकेची ओळख करून दिली. तिनं हात मिळवताच "ओ, यू आर सो क्यूट!" करून सुरुवात केली. तिला चित्रांगदेची साथ मिळाली, "खरं ना, बघ सांगत नव्हते का मी तुला?" मग दोघींचा किलबिलाट सुरू झाला. ह्या भडीमारानं अर्जुन लाजलाच. मग काय, ते तिघेही अर्जुनाची खेचायला लागले. अर्जुनानं भानावर आल्यावर हातातला डोनट्सचा बॉक्स अवंतिकेला दिला. "ओ डोनट्स, सो लव्हली!" मग प्रत्येकानं एकेक डोनट तोंडात लोटल्यावर जरा आवाज कमी झाला! पण तेवढ्यापुरताच! मग अवंतिका चित्रांगदेला म्हणाली, "सच अ वेल-मॅनर्ड किड ही इज... तू गटवला नाहीस का याला अजून?" आता गप्प पडायची पाळी चित्रांगदेची होती! सगळे जोरदार हसले. पण ती सोडते काय? तिनं उदयनला उचकवण्याचा प्रयत्न केला, "उदयन, बघ हां, अवंतिकेला अर्जुन आवडलेला दिसतोय!" अवंतिका त्याहूनही हुशार! ती म्हणाली, "माझ्या शौहरला मला कोणकोण आवडतं, ते चांगलं माहित आहे!"

ते इंटरस्टेटवर चालले होते. तो आता डाउनटाउनमधे शिरला. उदयन सोडून सगळेच नवीन. मग तो जाता जाता एक एक लॅंडमार्क्स दाखवत होता. म्युझियम, बेसबॉल पार्क, फूटबॉल स्टेडीयम, टाउन हॉल, युनिव्हर्सिटी...

तासाभराचा ड्राईव्ह होता. ह्यांचा वात्रटपणा चालूच होता. मग एकमेकांची जरा डिटेल ओळख झाली. उदयन आणि अवंतिका दोघे चाईल्डहूड प्रेमी होते. एकाच एरीयात रहायचे, शाळेतही एकत्र होते. पण कॉलेजेस वेगळी झाली. पण सगळ्या धबडश्यातून त्यांचं प्रेम टिकलं होतं, वाढलं होतं. आणि उदयनच्या चारएक वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यानंही त्यात फरक पडला नव्हता! ती गेले चार वर्षं भारतात ट्रॅव्हल सेक्टर मध्ये काम करत होती. ती त्यातल्या गमतीजमती सांगत होती. मधेच एखाद्या गाण्यावर उदयनला डिवचून त्यांच्या डेटिंगच्या कथा सांगत होती.

सिटी सोडल्यावर इंडस्ट्रिअल एरिया लागला. मग एअरपोर्ट गेलं. पुढचं एक एक्झिट घेऊन उदयन रूरल कम्युनिटीत घुसला. विंटरच्या सगळ्या खुणा मिटल्या नव्हत्या. झाडांवर पालवी फुटत होती. पण आकाश लख्ख होतं. समोर थोडा डोंगराळ भाग दिसत होता. गाडी आता त्या दिशेने धावू लागली.

लेकच्या कडेला पार्किंग होतं. तिथेच रेस्टरूम्स होत्या. गाडीतून उतरताच क्षणीच आल्हाददायक निसर्गानं अर्जुनचा कबजा घेतला. हवेत गारठा नव्हता, गारवा होता. उन्हात चटका नव्हता, उब होती. पायखालची माती ओलसर होती, थंडीनं गारठून दगड झालेली नव्हती. समोरच्या तळ्यात पाण्याच्या लहरी हलकेच बागडत होत्या, लाटा नव्हत्या. आणि वातावरणात मनाला कुरवाळणारी शांतता भरली होती. त्या शांततेनं सोबतीसुद्धा भारले होते. गाडीतून उतरल्यावर पहिल्या "ओ वॉव" नंतर काही क्षण त्या वातावरणासारख्याच स्तब्धतेत गेले. सगळ्यात पहिल्यांदा उदयन सावरला. "अरे, आज काय आपणच का इथे? बहोत खूब!", त्यानं अवंतिकेला डोळा मारला!
अर्जुनासाठी तर इट वॉज अ ड्रीम कम ट्रू! जराशानं दोघीही अचानक चिवचिवायला लागल्या. चित्रांगदा रनर होती. तिला राहवलं नाही. ती पटकन लेकशोअर वर दोन राउंड मारून आली.
उदयननं तोवर अर्जुनच्या मदतीनं हाईकची तयारी केली. निवडक सामान पाठीवरच्या सॅकमध्ये भरलं. पाणी, लंच, चघळायला जरा च्याऊम्याऊ आणि फर्स्टएड. लागतंय काय आणखी? हो, आणि पावसासाठी. तसंही वजन वाहून नेण्यात काय हशील होता? रेस्टरूममध्ये जाऊन सगळे रिफ्रेश होऊन आले. चलो, ट्रेलहेड!

---

झाडाझाडोऱ्यात गेल्यावर थंडावा वाढला. त्यामुळे कितीही चाललं तरी घाम येत नव्हता. हा मुलुख उदयनच्या पायाखालचा होता. त्यामुळे तो अनेकविध बाबींची ओळख करून देत होता. मधनं मधनं चढ होते, ते अगदीच मामुली होते. त्यामुळे सगळे हास्यविनोद करत खेळीमेळीनं चाललं होतं. पायवाटेच्या दोन्ही बाजूंनी झाडी होती. काही मोजके सदाहरित वृक्ष सोडल्यास, बहुतेक झाडं निष्पर्ण होती. पानगळ झाल्यापासून फारसं कुणी न फिरकल्यामुळे, बऱ्याच ठिकाणी पायवाट त्या ओल्या पानांखाली दडली होती. मात्र सर्वत्र त्या झाडांतून एखाद तळं या ना त्या बाजूला दिसत होतं. क्वचित पायवाट अगदी तळ्याच्या काठालगत जायची. त्यावेळी या अचल, निवळशंख पाण्याकडे अगदी तंद्री लावून बसावसं वाटायचं. काही वेळा वाट तळं पार करून जायची. मग तिथे इटुकला पिटुकला लाकडी पूल असायचा. मग त्या पुलाच्या काठाला वेंगून दोन्हीकडचं पाणी पहावं. आणि आत्ता नसलेली बदके त्यात पोहोत आहेत अशा कल्पना करायची. किंवा पाणथळ जागा असायची. तिथे अगदी जमिनीलगत लाकडी रस्ता-कम-पूल केला असायचा. दूरच्या दूर जाणारा.
हा सीझन म्हणजे निसर्ग आसन्नप्रसवा असतो. विंटरच्या कालावधीत सगळी सजीव सृष्टी कडाक्याच्या थंडीला अन् बर्फाला घाबरून कोषात गेली असते. पण वाढणाऱ्या तपमानाबरोबर तिची बहुप्रसवा वृत्ती पुन्हा उसळी घेऊ पहात असते. त्या निर्मम तपकिरी, राखाडी आसमंताला हिरवी कळा यायला वेळ असतो. पण एखाद्या प्रसवधर्मिणीच्या मुखावरचं अवचित तेज पाहून अनुभविक बायका कशी अटकळ बांधतात? तशी काहीशी किमया इथे घडत असते. द नेचर इज प्रेग्नंट विथ पॉसिबिलिटीज! आणि इथे तर चार उमदे नवयुवक होते. ज्वानीच्या आगीत धगधगणारे, बर्स्टिंग ॲट सीम्स विथ व्होल्कॅनिक पॉसिबिलिटीज!! सुंदर निसर्ग होता, हवीहवीशी हवा होती, अन् सृष्टी खुणावत होती. अशा वेळी चित्तवृत्ती पालवल्या नाही तर नवलंच!
उदयन आणि अवंतिका सहजतेनं वावरत होते. पायवाट जरा मोठी असेल तर जोडीनं हातात हात धरून चालत होते. पुलाच्या कठड्याला टेकून दम खाताना अवंतिका सहजपणे उदयनच्या खांद्यावर मान टेकवत होती. हास्यविनोदात त्याच्या चावटपणाला हसून त्याच्या पृष्ठभागी चापट मारत होती. कुठे कारण नसताना घसरल्यासारखं दाखवून त्याला जाऊन मिठी काय मारायची! अशा तारुण्यसुलभ क्रीडा चालल्या होत्या.
अर्जुन आणि चित्रांगदा हा खेळ लांबूनच पहात होते. त्यांच्या वागण्या बोलण्यात मोकळीक होती, जवळीक मात्र उपचारापुरती. या वेगळ्या वातावरणात त्यांची ऑफिसमधली जवळीक अपुरी होती. असलाच तर त्याच्यामध्ये थोडा ताण जाणवत होता. पण मौसम आशिकाना असल्यानं, हळूहळू तो ताणही निवळेल असं चित्रांगदाला वाटत होतं. अर्जुन मात्र जरा अवघडलेला जाणवत होता.
तीन-साडेतीन तासांनंतर साधारणत निम्मी वाट चालून झाल्यावर मंडळी विश्रांतीला बसली. एका छोट्या टेकडीवर पठारासारखी जागा होती. तिथे एक पिकनिक टेबल मांडलं होतं. चक्क एक नळही होता. पण आत्ता त्याला पाणी नव्हतं. या चौघांपैकी अवंतिका आता दमली होती. तिला याची फारशी सवय नसावी. उदयन चतुर होता. तिला आणखी दमवणं म्हणजे ट्रीपचा विचका होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलं. लगेच त्यानं पर्याय काढला.
"डार्लिंग, इथे आपल्याला एक शॉर्टकट आहे. दोन मैलात आपण कॅम्पसाईटला जाऊ शकतो."
हे ऐकल्यावर अवंतिकेचे डोळे लकाकले. "जानू, ऐसाही करते है"
पण चित्रांगदा जरा नाराज झाली.
उदयननं लगेच तिला सुचवलं, "तुम्ही दोघं करून या फुल ट्रेल. नो इश्यूज! त्या एंडला एक भन्नाट लुकआउट आहे. तिथून कैक मैलांचा प्रदेश दिसतो. वर्थ ए लूक. फोटो काढून आणा."
"ओके!"
"बरं तुम्ही येईपर्यंत मी कॅंपसाईटला टेंट लावून तयार ठेवतो.'
इथे अर्जुन जरा विचारात पडला. आपला टेंट लावायचं काम ह्याच्यावर कशाला टाकायचं? तो तसं म्हणाला.
"च्यायला, हा अर्जुन फारच विचार करतो बुवा. नाही ते प्रश्न पडतात याला. बरं नाही लावणार, झालं?"
अर्जुनला विचार करायला वेळही न देता चित्रांगदेनं अर्जुनचं दप्तर घेऊन पळ काढला. ए, ए करत अर्जुन तिच्यामागे धावला.
अवंतिका ओरडली, "अरे, लंच तर करून जा."
चित्रांगदा तिकडनंच ओरडली, "यू बोथ एंजॉय द सॉलिट्यूड..."

---

ट्रेलवरचा शॉर्टकटचा रस्ता मागे पडला, टेकडीचा उतार चालू झाला. मग चित्रांगदा धापा टाकत एका झाडाच्या आधाराने थांबली. ती थांबल्याचं बघितल्यावर अर्जुन धावायचा थांबला आणि दम खात चालत चालत पोहोचला. "कसली हौस आली आहे तुला धावायची?"
"अर्जुन्या, बधीर आहेस रे तू, बधीर!"
"ए गप गं. बधीर का?"
"त्यांना एकांत हवा होता. आलं का तुझ्या लक्षात?"
आत्ता अर्जुनची पेटली. "आयला.."
"तू बसला असतास तिथे लंच खात. मंद!"
"ते सोड. पण मला भूक लागली आहे हां. ते डोनट उरले आहेत ना?"
"इथं डोनट खा. पण आपण लंच त्या लुकआऊटला जाऊन करू."
अर्जुननं त्यांच्या सॅकमधून डोनटचा बॉक्स काढला. एक चॉकलेट राहिला होता, आणि एक ग्लेझ्ड.
चित्रांगदा म्हणाली, "मला ग्लेझ्ड दे".
अर्जुननं चॉकलेट डोनटचा तुकडा तोडला. चित्रांगदा अचानक त्याच्या जवळ झुकली आणि त्याच्या हातातल्या चॉकलेट डोनटचा एक तुकडा दातांनी तोडून खाल्ला. आणि मग त्याच्या कडे बघत मिष्किल हसली. अर्जुन भांबावला, पण एक सेकंदासाठीच, आणि मग हसत हसत पाठीला दप्तर लावून पुढे निघाला. चित्रांगदा मागून धावत आली, आणि त्याला धपका मारून पुढे गेली. मागनं जात अर्जुनानं तिचा हात हातात पकडला, आणि चालतच राहिला. या कृतीनं दोघेही आश्चर्यचकित झाले. पण... पण दोघांपैकी एकानेही हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला नाही. जोडीनं दोघं जात राहिले.

लुकआऊट हा एका शंभर-दिडशे फूट खोल (का उंच) कड्याचा माथ्यावरचा कातळी पृष्ठभाग होता. वाऱ्यात आता गारवा वाढला होता. माथ्यावरचा सूर्य ढळून खांद्यावर आला होता. त्या प्रकाशात आसमंत त्या सुंदर दुपारी सुदूर स्वच्छ दिसत होता. पूर्वेच्या क्षितीजावर फॅक्टऱ्यांची धुरांडी दिसत होती. लांबवर विमानं टेकऑफ घेताना दिसत होती. आणि मधला अवकाश रिकामी शेतं, त्यात अडकलेले घरांचे पुंजके, त्यांना छेदणारे रस्ते यांनी भरून काढला होता. पश्चिमेला थोडे ढग जाणवत होते. चित्रांगदेनं ऐकलेला पावसाचा फोरकास्ट हाच असावा.
ह्या दृष्यानं, त्या गारव्यानं दोघांचाही थकवा दूर पळवून लावला होता. त्या कातळातून एक छोटा ओहोळ वाहत होता. ते पाणी बर्फासारखं थंडगार होतं.
त्या पाण्यानं हाततोंड धुतल्यावर अर्जुन म्हणाला, "याचा पावसात धबधबा होत असणार!" कड्याच्या कडेपर्यंत जाऊन तो खाली वाकून बघू लागला.
चित्रांगदा पलिकडच्या दगडावर बसली होती. "मरायचं नसेल तर लंच काढ. मरायचंच असेल तर खाली उडी मार, ते सोपं पडेल". दोघेही खळखळून हसले. दप्तर उघडून त्याने सॅन्डविचेस काढली. एक एक्स्ट्रा होतं, ते परत ठेऊन दिलं. दोघांनाही इतकी भूक लागली होती की खाताना आपोआपच त्यांचं बडबडणं बंद पडलं.
सॅंडविच संपवून अर्जुन तिथेच लवंडला. डोक्याखाली हात घेऊन एका कुशीवर वळून समोरचा नजारा अनिमिष नेत्रांनी आपल्या रंध्रारंध्रांत साठवून घेऊ लागला. वेगळा निसर्ग, वेगळं वातावरण, पण त्यातून मिळणारा आनंद - चिरपरिचित तरीही अगम्य, गोचर तरीही अगोचर.

पाण्यात हात खळबळवून चित्रांगदा उठली, आणि अर्जुनाच्या पाठीला पाठ देऊन रेलून बसली. "काय डिव्हाईन फीलींग आहे हे.." ती म्हणाली. निसर्गात हरवलेला अर्जुन तिच्या स्पर्शानं भूतलावर आला. हलकीशी शिरशिरी त्याच्या शरीरात लहरून गेली. तिच्या शब्दांचा, झालंच तर शब्दांमागचा अर्थ धुंडाळू लागला. त्याचा मगाचचा बोल्डपणा जाऊन तो परत एकदा गोंधळलेल्या मनस्थितीत गेला, त्याची डिफेन्सिव्ह शील्ड्स डिप्लॉय झाली!
तिच्याशी नजरानजर होताच अर्जुन म्हणाला, "उलुपी हवी होती नै आत्ता इथे!"
चित्रांगदा बोलली काहीच नाही. पण अर्जुनाला तत्क्षणी तिचं शरीर ताठरल्याची जाणीव झाली. तिनं तोंड फिरवलं आणि हलकेच ती बाजूला सरकली. भलत्या वेळी अभावितपणे भलतंच बोलून बसल्याची जाणीव त्याला झाली.
"चला निघू या. उशीर नको व्हायला." चित्रांगदाचा स्वर हवेतला गारठा वाढवत असल्याचा भास अर्जुनाला झाला!

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती मस्त.काही होऊ नको दे त्यांच्यात Happy
आम्ही अर्जुन आणि उलुपी ला शिप करतो.चित्रांगदेला हजार मिळतील.