झाड !! (भाग २ )

Submitted by Sujata Siddha on 22 August, 2023 - 07:36

https://www.maayboli.com/node/71042

झाड !! (भाग २ )

“तुष्या SSSSSS काय होऊन बसलं रे हे ? तुला सावध केलं होतं मी , म्हटलं होतं , नाही त्या गोष्टींशी पंगा घेऊ नकोस , पण ऐकलं नाहीस , गेलास जीवानीशी , मला एकट्याला टाकून “ हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या शिवानंद हमसून हमसून रडत होता , मनातल्या मनात त्याचा आक्रोश चालू होता .आज चार दिवस झाले त्याच्या डोळ्यांचं पाणी खळलं नव्हतं , त्या भीषण ऍक्सीडेन्ट नंतर शिवानंद जे बेशुद्ध पडला ते थेट हॉस्पिटल मध्येच शुद्धीवर आला , गावातल्या लोकांनीच शिवानंद ला ऍडमिट केलं . तुषार चा विचित्र पद्धतीने लटकलेला चेहरा , आणि धड एकत्र करताना सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं , पोलिसांनाही पटकन धाडस झालं नाही हात लावायचं, गावाहून तुषारच्या आई -वडिलांना बोलवण्यात आलं, त्यांचा आक्रोश बघून , सर्वानाच खूप हळहळ वाटली . सगळे सोपस्कार उरकून , जुजबी उपचार घेऊन शिवानंद हॉस्टेल वर परतला , त्याला तुषार शिवाय दुसरं कोणी नव्हतं , एका प्रतिष्ठित घराण्याने देऊ केलेल्या स्कॉलरशिप वर अनाथ शिवानंद ‘जिऑलॉजि ‘ या विषयात ग्रँज्युएशन करत होता , त्याची आणि तुषारची भेट होस्टेलवरच झाली , ते दोघे रूम पार्टनर बघता बघता एकमेकांचे जीवश्च कण्ठश्च मित्र झाले होते . तारुण्यातली उमेदीची स्वप्न दोघानी एकत्र मिळून कितीतरी वेळा रंगवली होती , आता लास्ट ईयरची परीक्षा आटोपली कि ते दोघं मिळून पुढचे प्लँन्स करणार होते , … सगळं काही सुरळीत चालू असताना हा विचित्र अपघात घडला आणि नियती ला दोष देऊन सर्व मोकळे झाले , पण जे अपघाताच्या ठिकाणी गोळा झाले होते त्या सगळ्यांना राहून राहून नवल वाटत होतं ते म्हणजे शिवानंद ला काहीही ,साधं खरचटलं पण नव्हतं . अपघात घडून आता चार दिवस उलटले ,त्या झाडाच्या इथून नेहेमीसारखी लोकांची ये जा सुरू झाली , तशी ती जागा बाधीत वैगेरे आहे अशी काही वदंता तिथे नव्हती त्यामुळे झाल्या प्रकाराचं नवल हे अजूनही शमलं नव्हतंच तरीही सर्व रूटीन सुरू झालं, शिवानंदही हॉस्टेल वर परत आला , एक शिवानंद सोडला आणि तिथेच राहणार रेक्टर च कुटुंब सोडलं तर सगळं हॉस्टेल रिकामं होतं, अजून निदान पंधरा दिवस तरी कोणी येणार नव्हतं ,आता शिवानंद ने पहिल्यांदाच आपला “Cosmic Energy “ चा प्रयोग करायचं ठरवलं.
एके दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर तो उठला , साधेनसाठी लागणारी सामग्री त्याने रात्रीच गावातून फिरून आणली होती , समोर छोटं पंचकोनी आकाराचं पंचधातूचं पात्र घेऊन त्यात काही गोवऱ्या त्याने टाकल्या मग , अक्षता , गोमूत्र शिंपण करून त्या पात्रासमोर त्याने एक पंचकोनी यंत्र एका कोळशाने काढलं , त्यात आवश्यक ती बीज मंत्र लिहून अग्नी चेतवून तो आवाहन मंत्रांचे पठण करायला लागला ,एकाग्र चित्ताने ते झाड डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करू लागला , ‘मला तुझ्याशी बोलायचंय !.. “ त्याने त्या झाडाला संदेश पाठवला. सुरूवातीला काहीच घडलं नाही , मात्र काही दिवस सातत्याने संदेश पाठवत राहिल्यावर त्याला जाणिवेच्या पातळीवर काहीतरी हालचाल जाणवली , जणू ते झाड काही प्रतिसाद देतंय असं वाटायला लागलं ,त्यातही दिवस गेले त्याने आवाहन चालूंच ठेवलं अन एके दिवशी झोपला असताना मध्यरात्री त्याला कोणीतरी हलवलं , “झोपूदे रे तुष्या ..... काय साली कटकट आहे “ शिवानंद झोपेतच म्हणाला आणि दुसऱ्याच क्षणी सावध झाला , त्याला जाणीव झाली कि रूम वर आपण एकटेच असतो आणि तुषार आता या जगात नाहीये . तो सपकन अंथरुणात उठून बसला , सगळीकडे एक प्रकारचा हिरवट उग्र वास भरून राहिला होता ,त्या वासाने त्याला गुदमरल्यासारखं झालं , तितक्यात त्याच्या समोरून गर्जना केल्यासारखा आवाज आला , “बोल sss “
शिवानंद ने डोळे चोळून चोळून पाहिलं ,अंधुक प्रकाशात त्याला दिसलं , समोर अर्धवस्त्रात एक असाधारण उंच मानवी आकृती उभी होती. त्या आकृतीचं डोकं छताला लागलं होतं .हातात त्रिशूळ ,अंगभर भस्म - रूद्राक्षांच्या माळा ,अंधारात लखलखणारे भेसूर डोळे .
“को-कोण ? “ शिवानंद ने कपाळावर सुटलेला घाम पुसत भेदरलेल्या आवाजात विचारलं .
“ का बोलावलंस ? “ त्याच्या घोगऱ्या आणि राकट आवाजाने शिवानंदच्या पोटात गोळा आला . एवढ्या अंधारातही त्या आकृतीच्या क्रूर डोळ्यांमधली आग त्याला जाणवली .
“बोल का बोलवतोयस दिवसरात्र हाका मारून ? “
“मी-मी ? , तुम्हाला ? न-नाही , झाडाला … “ आपली बोबडी वळतीये असं त्याच्या लक्षात येऊन तो गप्प बसला .
“ज्या झाडाला तू दिवसरात्र संदेश पाठवत होतास , त्याच झाडातून आलोय मी .काय बोलायचंय तुला बोल “ हे ऐकून , भेसूर दिसणाऱ्या या शक्तीला त्याच्या मनाविरुद्ध आपण इथे यायला भाग पाडू शकतो या विचारांनी त्याला जरा धीर आला .आणि तो जरा सावरला ,.कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत त्याने विचारलं ,
“त्या झाडात तुम्ही कसे काय राहत होतात ? म्हणजे कधी दिसला नाहीत . “
“ मी शरीररूपाने तिथे राहत नाही मूर्खां SSS, इंद्रियांच्या मर्यादा तुम्हाला असतात आम्हाला नाही. मला जास्त बोलायला वेळ नाही , तु का बोलावत होतास ते सांग “ शिवानंद ला आठवलं त्याने कधीतरी वाचलं होतं , साधनेत प्रगत असलेले साधू किंवा मांत्रिक अथवा अघोर असे दगडात किंवा झाडात राहून अदृश्य रूपाने साधना करतात, याच्या अवतारावरून हा अघोर साधना करणारा असावा असं त्याला वाटून गेलं.
“माझ्या जिवलग मित्राला तुषार ला तू किती विचित्र पद्धतीने मारून टाकलंस , असं का केलंस याचा जाब विचारायचा होता मला ,मान्य आहे की त्याने तुझा त्याने तुझा अपमान केला , पण मी माफी मागितली होती ना ? तरीही तु त्याचं अस्तित्वच नष्ट केलंस ? तेही इतक्या हिडीस पद्धतीने ? एव्हढ्याशा चुकीची एवढी भयानक शिक्षा ? “ शिवानंद च्या डोळ्यासमोर तुषारचा झाडावर लटकणारा देह आला आणि तो तळमळून रडू लागला . .
“ चुका आणि शिक्षा यांची ताळेबंदी तुम्ही मांडता आम्ही नाही , तो माझ्या वाट्याला आला , आणि संपला , त्याने डिवचलं नसतं तर हे भोग त्याच्या वाटयाला आले नसते “
“मग मीही तुला संदेश पाठवून डिवचलंय, मग आता तु मलाही…. ? “ शिवानंदच्या पोटात भीतीने गोळा आला
“ तू मला नाही , मीच तुला संदेश पाठवत होतो , म्हणून तुझी गावाकडे जायची वाट मी अडवत होतो , मध्ये जर तो तुझा मूर्ख मित्र कडमडला नसता तर एव्हाना माझं काम संपलं असतं, “ तो गरजला .
“ मी-माझ्याकडे काय काम ? “ .
“माझ्या साधनेसाठी पूरक असणार शरीर मला हवं आहे , जे तुझं आहे , आत्ता तु बघतोयस ते माझं पूर्व शरीर आहे जे १५० वर्षांचं आहे , ते अस्तित्वात नाहीये , पण मला वातावरणातून ईथर घेऊन ते तात्पुरतं धारण करता येतं , माझ्या साधनेसाठी मला पुन्हा एकदा कायम स्वरूपी मानवी देह हवा आहे आणि तुझ्या शरीराची स्पंदने मला मिळती जुळती आहेत , फार फार वाट पहावी लागली मला त्यासाठी , आता मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक, तुझीही तुझ्या मित्रासारखी गत व्हायला नको असेल तर उद्या अमावास्यां आहे , बरोब्बर रात्री बारा वाजता अंघोळ करून शुचिर्भुत होऊन लाल रंगाच्या वस्त्रात तिथे ये, “
“तिथे म्हणजे ? “
“त्याच तुझ्या त्या झाडाजवळ ! नाही तर परवा त्याच झाडावर तुझं मुंडकं लटकलेलं दिसेल !.. “ अशी धमकी देऊन अघोर तिथून नाहीसा झाला . शिवानंदची झोप पूर्ण उडाली , त्याच्या लक्षात आलं तो पळून जाऊ शकत नव्हता , तो कुठेही अगदी पाताळात गेला तरी अघोर त्याला शोधुन आणेल आणि आपलं काम करून घेईल , आपली असहाय्यता त्याला कधी नव्हे ईतकी तीव्रतेणे जाणवली . तिथे जाण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता .

रातकिडे किर्रर्र किर्रर्र रोजच ओरडतात पण आज तो आवाज आवाज किती भयानक वाटत होता !.. शिवानंद भेदरलेल्या अवस्थेत झाडापर्यतं पोहोचला तेव्हा , १२ वाजत आले होते ,अघोर त्याच्यासमोर प्रकट झाला ,थोड्याच वेळात ‘ घुम्म घुम्म आवाज यायला लागले , मंत्रोच्चरण सुरू झालं ,शिवानंद ची अवस्था एखाद्या मरणोन्मुख जनावरसारखी झाली होती ,आपण होऊन तो अघोरच्या तावडीत गेला होता , त्याच्या डोळ्यासमोर त्याने पाहिलेली भविष्यातली स्वप्न उद्धवस्त होत होती , अनाथ होता त्यामुळे तो एकाएकी नाहीसा झाला तरी त्याच्या बाजूने काळजी करून तपास करणारं कोण होतं ? एक तुषार होता तो ही अघोर ने त्याच्यापासून हिसकावून नेले होता आणि आता त्याला स्वतः:लाच अघोरचं भक्ष्य व्हावं लागलं होतं , समोर लाल वस्त्रात लपेटलेलं एक तांब्याचं यंत्र होतं , त्याची नुकतीच पूजा केलेली दिसत होती , “खाली बस “ अघोरचा घोगरा आवाज त्याच्या ओळखीचा होता . शिवानंद च्या डोक्यावर एक हात ठेऊन त्याचे मंत्रोच्चरण सुरू झाले . “ ओम , ऐ ह्री , श्रीम , अं , सत्ये , हं शवले , ह्सखफ्रे , खरवे , क्लिं रामे , ह्सखफ्रे, नारद ऋषी: , गायत्री छन्द: , श्री गुरू देवता , गुं बीज , ह्री शक्ती: परकाया प्रवेश …

का? का? का? .. काय अपराध केला होता मी कोणाचा ? सामान्य माणूस ईतका असहाय्य असतो का ? कोणीही उठावं आणि त्याच्या जीवाशी खेळावं ? गरिबांना कोणी वाली नाहीच का या जगात ? या अघोरच्या पेक्षा शक्तिशाली आणि सहृदय आत्मा कोणी या जगात नाही का???? “...मनातल्या मनात टाहो फोडतानाचे शिवानंद चे हे शेवटचे शब्द हवेत विरले, मंत्राचा आवाज थांबला , शिवानंद च्या शरीरात अघोर ने प्रवेश केला आणि तो वेगाने तिथून निघून गेला .. आसपास सर्वत्र शांतता पसरली , काही वेळापूर्वी तिथे काही एक अतर्क्य घटना घडली याचा काही मागमूस देखील राहिला नाही …

त्यानंतर काही वर्षे गेली आणि एके दिवशी …

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users