Tour du Mont Blanc भाग ६ - तिसरा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 7 August, 2023 - 22:12

सकाळी ८ ला निघालो. सकाळी ascent होता, तसे असले की बरे असते. दुसऱ्या group मधले आगे मागे असायचे ते मेंबर आज दिसले नाहीत, तर कालच्या शिणवट्यामुळे आज बरेचसे अंतर ते बसने कापणार आहेत असे कळले. मग आम्ही आपापली पाठ थोपटली. वारंवार चढत गेलो तशी राहिलो ती बिल्डिंग,रस्ते, खालची valley दिसायला लागली. इतक्या खालून गायीच्या घंटांचे निनाद ऐकू येत होते. मग फ्रेड सर्वांत जास्त दूध देणाऱ्या गाईला राणीसारखा मुकुट, रांगेत पहिला मान, गावागावांतील गाईंच्या लढतीच्या प्रथा, त्यात होणारे अपघात वगैरेबद्दल सांगत होता. कसे कोण जाणे Animal Welfare वाले तिथे पोहोचले नसावेत. भूतदया या तत्वाबद्दल शंका नाही पण ७०-७५% टक्के मांसाहारी आणि जीवो जीवस्य जीवनं याही तत्वाने चालणाऱ्या जगात Animal Welfare बद्दल ज्या चमत्कारिक गोष्टी कानी येतात त्या व्यवहार्य नाहीत असेच वाटते. तसेच अशाच प्रथा भारतीय खेड्यापाड्यात अनेक आहेत, त्या मात्र मागास आणि इथे युरोपात मात्र ते कित्ती कित्ती आपल्या प्रथांना जपतात याचे कौतुक अशा वर्गालाही एकदा मनात मनसोक्त नावे ठेवून घेतली. आमच्यापैकी कोणी तसे नव्हते. यावरूनच चालू झालेल्या चर्चेत, (कोणाचाही विश्वास बसणार नाही पण सत्य आहे) सईदने ‘मराठी लोक व्यापारात, आर्थिक उलाढालीत मागे का” अस्साच प्रश्न विचारला. मी थक्क झाले. तो जन्माने अबूधाबीचा आणि तिथेच राहणारा इन्व्हेस्टर आहे. त्याला मराठी - पंजाबी - तामीळ वगैरे फरक माहीत होतेच आणि वर आपले व्यवच्छेदक लक्षणही माहित होते. मग माझ्या मगदुराप्रमाणे मी आणि कुलकर्ण्यांनी त्याचे शंकानिरसन केले. कुलकर्णी स्वतःचा उद्योग चालवून आज ५० पेक्षा जास्त लोकांना उत्तम रोजगार देत आहेत, त्यामुळे त्यांचा यावर बोलण्याचा अधिकार निश्चितच अधिक पण माझे नाक खुपसणे पण त्यांनी प्रेमाने खपवून घेतले.
6_1.jpg6_2.jpg
आधी चढून मग जरासे उतरलो तिथे मोठे पठार meadow सारखे होते. आणि मग पुन्हा चढायला लागलो. चढ उत्तर सतत असायचे. डोंगर माथ्यावर जाऊन उताराला लागलो तेव्हा फ्रेडने आता इथल्या cottage शी ब्रेक घेऊ, तिथल्या बाईशी नम्रपणे बोला, नाहीतर मला पुन्हा ती इथे पाय ठेऊ देणार नाही वगैरे सांगितले. एका स्विस बाईने चालवलेले लहानसे cottage - ‘Bovine’ होते. तिथे वाहन येत नाही. त्या बाईचे ८० च्या घरातले आई वडील सुद्धा टेकड्या चढूनच तिथे आले होते. बसायला बाक, पाण्याची सोय होती, आजूबाजूला कुरणे आणि त्यात गायी विहरत होत्या. आणि तिने केलेले घरगुती अत्यंत उत्कृष्ट केक, पाय वगैरे विकायला ठेवले होते. क्रेडिट कार्ड अर्थात चालणार नव्हते. पारुने माझी गरिबी लक्षात घेऊन मला काही युरो उसने दिले आणि मी chocolate केक घेतला. इतका सुंदर chocolate केक मी आयुष्यात प्रथमच खाल्ला याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. तो केक खाण्यासाठी तिथे पुन्हा जायला मी एका पायावर तयार आहे. तिथे असणं साजरं करण्यासाठी ६-७ मिनिटांची भीमसेन जोशींची शुद्ध कल्याणमधली एक अलौकिक चीज ऐकली. सगळ्याचेच सार्थक झाले.
6_3.jpg
थोडा वेळ घालवून निघालो, बराच descent होता. पारूची चढावर जी अवस्था साधारण उतारावर माझी तशी होते अशी भीती होती. मग फ्रॅन्कच्या पाठी मी आणि माझ्यापाठी सगळी मंडळी, गुडघा जरा कुरकुर करत असला तरी आपल्यामुळे उशीर नको या भावनेने तसे भरभरच उतरत होते. ऊन वाढत होते, आणि एकूण वाट खडकाळ. आता आम्ही Mont Blanc च्या उत्तरेला होतो आणि उजवीकडे East ला सरकत होतो. अर्थात आता ते शिखर , बरेच दक्षिणेला असल्याने दिसत नव्हते. जेवायला थांबलो तिथे नावाला सावली नाही पण view सुंदर. सगळा Downhill नेटाने केला. आजूबाजूला बघण्यात इतके नेत्रसुख होते की काही वाटले नाही, विचारमुक्त अवस्थेत सर्व आसमंत स्वतःत indulge करत उतरत होते. ३ च्या आसपास बरेच ओढे, पाणी लागले. आणि मग एका ठिकाणी थांबलो. काहीतरी २-३ डिग्री तापमान असलेले प्रचंड गार पाणी वेगाने कोसळत होते. त्यात पाय बुडवून बसले, काही सेकंदांतच बाहेर काढायला लागले पण सगळं शिणवटा एकदम गेला. आजुबाजुला प्रचंड हिरवगार. समोर typical स्विस खेड. फोटो कितीही काढले तरी डोळा जे टिपत असतो ते कोणत्याही कॅमेऱ्याला शक्य नाही. हे वर्णन लिहिताना तिथे असल्याचा भास होतो, गार पाण्याचा स्पर्श पायांना आपोआप होतो. मेंदूत आणि पंचेंद्रियांतच ती सगळी फ्रेम राहून गेलेली आहे.
6_4.jpg
वाटेतलं छोटंसं घर
6_6_0.jpg
बाजूने वाहणारा ओढा
6_7.jpg
आता मुक्कामाची जागा जवळ आलीये असे कळले. पण पुढे एक सुंदर धबधबा होता तिथे अजून रेंगाळलो आणि त्याच्याच कडेने चालत चालत Champex lake जवळ Arpette ला मुक्कामी पोहोचलो. जाताना वाटेत अगदी middle of nowhere दिसलेले हे नवल. हे कोणासाठी होते नकळे, आम्ही इथे ४ लाच पोहोचलो, तेव्हा अजून अर्धा तास थांबूया असे फ्रेडला सुचवले, त्याने हसत हसत आमची मागणी धुडकावत लावत तसेच रेटत पुढे नेले.
6_9.jpg
मुक्कामाकडे जाणारी वाट
6_5.jpg
धबधब्याच्या कडेने चढत गेलो तेव्हा वर इतकी मोठी जागा असेल असे वाटले नाही. एकूण परिसर मोठा होता. राहण्याच्या खोल्या, शूज ठेवण्याची जागा, खाण्याची जागा, त्यापाठी अप्रतिम हिरवळ , कपडे वाळत घालायला जागा सगळंच मुबलक आणि पाठीमागे मोठे मोठे उभे डोंगर. स्विसमधल्या पहिल्या रात्रीनंतर हा सुखद अनुभव होता. लोकही मवाळ वाटले. अंघोळीचे पाणी मात्र गरम होते की नाही यावर वाद होता, आम्ही गरम मानून घेतले. इतकी वर्दळ असून सगळे कसे आताच साफ केल्यासारखे चकाचक असायचे मात्र. राहण्याच्या खोल्या फारतर दुसऱ्या मजल्यावर असतील आणि एव्हाना १५ किलोचे पोटे उचलून चढण्याचा सर्व झाला होता. आम्ही हिरवळीवर बसलो, दुसरा group नाचतही होता (आज बसने आले होते ते इथे) , आम्हीही ४ पावले टाकली. इतर कोणी नव्हते म्हणून एकटी पत्ते खेळले. जेवायला ब्रेड, सूप , सलाड , चीज वगैरे नेहमीची मंडळी झाल्यावर चक्क छोले आणि जीरा राईससम प्रकार होता. गोऱ्या मंडळींना फारसे आवडले नाही, आमच्यापैकीपण अनेकांना. सईदने जोरात निषेध नोंदवला. त्यांच्या भावनेशी पूर्ण सहमत असले तरी मी जेवण चांगले एन्जॉय केले. आज झोपल्या झोपल्या बऱ्याच गप्पा मारल्या. रात्री जेवणानंतर चिरंजीव व पारू आपापली ipad घेऊन की ठराविक एपिसोड बघत असत, त्यांना आजूबाजूच्या जगाशी तेव्हा काही देणे घेणे नसायचे, त्यावरून त्यांची बरीच चेष्टा केली. त्यांन ते न कळत नसल्याने आम्ही सुखात आणि ते सुद्धा. अनिता दुसऱ्या room मध्ये होती, तिने जरा मित्रमंडळ जमवले होते हे बघून बरे वाटले. फ्रेड, दुसऱ्या ग्रुपची गाईड मुलगी आणि मंडळी एकूण रंगात आली होती. या मंडळींचे बोलताना तोंडच नाही डोळे, हात, पाय सगळेच बोलतात असे वाटायचे. म्हणजे हातवारे नाहीत, पण एक abstract, विशिष्ट देहबोली होती हे जाणवायचे. त्या दुसऱ्या ग्रुपच्या गाईड बाईने मला खरोखर मोहून टाकले. ३५ शी ची वगैरे बाई असेल नसेल. सकाळी ८ ला बघा नाहीतर रात्री १० ला तशीच टवटवीत असायची आणि सटासट फिरत असायची. पुष्कळ ओझे पाठीवर घेऊन तिच्या ग्रुप मधल्या अशाच १०-१२ लोकांना हाकत असायची. पण तिचा धाक होता, खडूस मास्तरीणीला घाबरावं तसं तुच्या ग्रुप मधल्या लोकांना तिच्याबद्दल वाटत असावं. जास्त बोलायची नाही, कामापुरतेच. फ्रेड मात्र रंगीला रतन होता. रात्री जरा ४ घोट घशाखाली गेले की एकदम खुलायचा. अर्थात त्या वेळीसुद्धा त्याच्यातला गाईड पूर्णपणे सावध असायचा हे निश्चित. आमचे पाय किंवा दुखल्याखुपल्याबद्दल विचारायचाच. टेकाडावरच्या त्या सुंदर स्विस खेड्यातली रात्र अगदी सुखात गेली.
6_8.jpg
क्रमश: - https://www.maayboli.com/node/83844 -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ च्या आसपास चालू करायचो. ४ ते ५ मध्ये पोहोचायचो. Lunch सुमारे ३०-४५ मिनिटे. शिवाय मधले मधले ब्रेक. On an average रोज १००० मीटर चढ आणि तितकाच उतार, मुक्कामाचे ठिकाण पुष्कळवेळा valley मध्ये, खाली होते. पण वर खाली सतत बदलायचं. सुमारे १५-१८ किमी अंतर रोज. गाईडने वेग असा सेट केलेला की चालण्याचा वेग सर्वात हळू चालणाऱ्याएवढा व्हायचा. अर्थात आम्हाला काही घाई नव्हती. आरामात बघत बघत जायला चालणार होतं.

<< सुमारे १५-१८ किमी अंतर रोज. गाईडने वेग असा सेट केलेला की चालण्याचा वेग सर्वात हळू चालणाऱ्याएवढा व्हायचा. >>
सगळ्यात हळू चालणारी व्यक्ती साधारण काय वयाची होती? थोडक्यात सांगायचं तर जाणून घ्यायचंय की काय वयापर्यंत ही ट्रीप जमू शकेल?

सगळ्यात हळू चालणारी व्यक्ती साधारण काय वयाची होती? >> Happy Happy Happy
उबो, थेट प्रश्नाला थेट उत्तर - ६५.
मला कल्पना आहे , तुम्ही काय अंदाज घेत असाल. या वयातले अनेक लोक मला वाटेत भेटले. कधी वय जास्त असले तरी चालण्याचा वेग मुळातच जास्त असतो. ट्रेकिंगचा अनुभव कामी येतो.
एखाद्या multi day ट्रेक चा अनुभव असेल, रोज ५ -६ मैल असे सलग काही दिवस चालण्याइतपत पाय तयार असतील म्हणजे मनात आले तर कधीही इतक सहज चालू शकण्याइतपत ( डोंगरातच असे नाही , नेहमीच्या रस्त्याला), एकूण तब्बेत ठीक असल्यास, ट्रेक करणे शक्य आहे. तिथे काही वेगाने चालत नाही पण नेहमीच्या चालण्यात १५ ते २० मिनिटांत एक मैल चालू शकता का, आणि त्याच वेगाने ५-६ मैल? ठरत नसेल तर ठरवाच , enriching अनुभव आहे एकूण. हे वर्ष गेले, पुढच्या जून मध्ये वगैरे हा ट्रेक पुन्हा चालू होईल तोपर्यंत तयारी करण्यास रग्गड वेळ आहे. विशेष काही माहिती हवी असेल तर अवश्य विपू करा