नास्तिक (३)

Submitted by कॉमी on 10 May, 2023 - 10:53

नास्तिक लोकं नैतिक अनैतिक या फरकावर विश्वास ठेवतात का ?
- सांगता येत नाही. नास्तिक असणे हे फक्त देवावर विश्वास आहे की नाही इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यापुढे व्यक्तिबाबत दुसरे काही नास्तिक ह्या शब्दातून समजत नाही. काही नास्तिक असे पण असतात ज्यांचा देवाखेरिज इतर अद्भुत गोष्टींवर विश्वास असतो.

लेट मी रीफ्रेज. नास्तिक माणसाने नैतिक आणि अनैतिक हा फरक मान्य करणे शक्य आहे का ?
- हो ! अर्थातच. बहुतांश नास्तिक लोकांना मान्य असतो हा फरक.

मी असे ऐकले आहे की नास्तिक लोक "objective morality" वर विश्वास ठेवत नाहीत. हे खरे आहे का ?
- वर सांगितल्या प्रमाणे, नास्तिक देवावर विश्वास ठेवत नाहीत इतकेच सगळ्या नस्तिकांबद्दल ठामपणे म्हणता येऊ शकते. पण हे खरे आहे की objective morality ही धर्मांना जोडली गेलेली कल्पना आहे. ही खासकरून करून अब्राहमिक धर्मांशी जोडली गेलेली कल्पना आहे. आणि बरेच नास्तिक ही कल्पना मानत नाहीत. मी सुद्धा नाही मानत ह्या कल्पनेला.

नक्की काय अर्थ आहे objective morality चा?
- objective morality म्हणजे नैतिकतेचे नियम हे आपल्या सोयीसाठी केलेले नियम नसून चांगलं आणि वाईट विभागणारी सत्यं आहेत, असे सांगणारा दृष्टिकोन. त्या नियमांमध्ये तर्काला आणि मतमतांतरे असण्याला काहीही जागा नाही. म्हणजे, एखादी कृती वाईट आहे असे धर्मग्रंथात म्हणले असेल तर ते सत्य आहे (objective truth). ती कृती का वाईट आहे हा विचार करणे आपले काम नाही. म्हणजे समलैंगिकता हे पाप असेल तर ते पापच आहे, का विचारण्याचे काम नाही. ह्या विचारपद्धतीचे कारण हे आहे की त्या धर्मांमध्ये देव हा सर्व चांगुलपणाचा स्त्रोत आहे असे मानतात. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत बनवले असल्याने, त्याला जे चांगले वाटते ते हमखास आपल्यासाठी चांगले असते, आणि त्याला जे वाईट ते हमखास आपल्यासाठी वाईटच असते. त्यात प्रश्नांना जागा नाही. ह्या दृष्टिकोना प्रमाणे चांगले आणि वाईट ह्यांना विभागणारे नियम भौतिकशास्त्राच्या नियमांप्रमाणे आहेत, स्थिर आणि निरपेक्ष.

पण तू का मानत नाहीस objective morality?
- मला वाटते दैवी आज्ञांपेक्षा एखाद्या कृतीचे काय परिणाम आहेत ह्यावरून त्या कृतीची नैतिकता ठरवणे हा मार्ग जास्त चांगला आहे. एकतर दैवी आज्ञा मला दैवी वाटत नाहीत, त्या तत्कालीन समाजांच्या विचारांनाच प्रतिबिंबित करतात. आणि जुन्या पुराण्या समाजाच्या नैतिकतेच्या काही कल्पना आजच्या जगात कुणालाच पटणार नाहीत अश्या आहेत. मला वाटते objective morality असे काही अस्तित्वातच नाही. कृती आणि कृतींचे परिणाम हा एकमेव मार्ग आहे नैतिक आणि अनैतिक असा भेद करण्याचा.

ह्या प्रकारच्या विचारांना पण काही नाव आहे का ?
- हो, कृतींच्या परिणामावरून नैतिकता आणि अनैतिकता ठरवणे ह्या विचारपद्धतीला उपयोगितावाद (utilitarianism) म्हणतात.

पण तुझी आणि माझी चांगुलपणाची कल्पना वेगळी असली तर ? जर आपला पाया वेगवेगळा असेल तर आपण एकत्र येऊन नियम कसे ठरवणार ?
- हम. खूपच अवघड प्रश्न आहे. ह्याचे इतके समाधानकारक उत्तर मी देऊ शकत नाही. पण मी माझा अंदाज वर्तवू शकतो, की बहुतेक लोकं जगातले दुःख आणि वेदना कमीत कमी राहाव्यात हा पाया स्वीकारतात.
बदलत्या सामाजिक परिस्थिती नुसार नैतिकतेची परिभाषा बदलायला हवी. तशी लवचिकता दैवी नियमांमध्ये नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आपापसात चर्चा करून नियम बनवले तर मतभेद असूनही आपण जास्त चांगले जग बनवू शकू असे मला वाटते.

(समाप्त)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आस्तिक आणि नास्तिक ह्यांच्या मध्ये जास्त फरक नाही.
कोणताच धर्म वाईट नाही...
कर्मकांड चे अवास्तव स्तोम धर्माला विकृत बनवते.
कर्मकांड चे विकृत स्वरूप आस्तिक आणि नास्तिक लोकातील फरक आहे.
देव झोपतो दुपारी आणि रात्री असे पण कर्मकांड आहे.
मग तेथील वीज बंद करा,देव्हारा बंद करा,तिथे एसी लावा.
नको ते प्रकार केले जातात.
ह्याला नक्की च श्रद्धा किंवा धर्माची शिकवण म्हणता येणार नाही...

आस्तिक जे खरेच ईश्वर मानतात .
ते ईश्वर सर्व व्यापी आहे असेच मानतात.
त्या साठी मंदिरात जावे असे त्यांना वाटत नाही,देवासमोर तासनतास बसावे,कर्मकांड करत ह्याची पण त्यांना गरज वाटतं नाही.
नास्तिक पण देव नसेल मनात पण निसर्गात असलेल्या अनेक शक्ती न चे अस्तित्व मान्य करतात.
त्या शक्ती कोणत्या आहेत ह्याचा शोध घेतात.
खरा आस्तिक पण देवाचे अस्तित्व शोधायचा प्रयत्न करतो .
शास्त्रीय पद्धतीने किंवा आत्मिक पद्धतीने.

<< कोणताच धर्म वाईट नाही >>
या वाक्याशीच सहमत नाही. त्यामुळे पुढील सर्व स्पष्टीकरण व्यर्थ वाटते.

आज ही कविता वाचली तिचा अंशतः भाग -

ज्यांच्या परसातली झाडे फुलांनी वाकून जातात
त्यांना पडत नाहीत प्रश्न
फुले वेचण्यात आयुष्य संपून जाते रे त्यांचे
पण ज्यांच्या झाडांना श्रद्धेची फुलंच लागत नाहीत
अशा माझ्यासारख्यांचे
आणि अनंत काळ विटेवर उभे राहणाऱ्या तुझे
काय हाल होतात, हे ह्यांना कसे कळेल?
- *गणेश कनाटे*

नैतिकता.
हा शब्द खूप विशाल आहे.
आपण जो विचार करून हे नैतिक हे अनैतिक असे ठरवतो धर्माचे नैतिकतेच्या व्याख्या आपण खोट्या आहेत असे म्हणतो तेव्हा आपण फक्त आपल्या पुरताच विचार करत असतो.
पण धर्म जेव्हा नैतिक अनैतिक काय हे सांगत असतो तेव्हा ते पूर्ण समाजाचा विचार करत असतात..एकंदरीत समाजावर काय चांगला वाईट परिणाम होईल ह्याचा विचार तिथे केलेला असतो.
सम लैंगिक संबंध अनैतिक आहेत असे धर्म बोलतो तेव्हा सम लैंगिक संबंध चे समाजावर,कुटंब व्यवस्थेवर काय परिणाम होतील ह्याचा विचार केलेला असतो.
पण नास्तिक फक्त त्या दोन व्यक्ती न पुरताच विचार करतो त्या मुळे त्याला त्या संबंधात काही अनैतिक वाटत नाही.
भारतात नास्तिक लोक तशी खूप कमी आहेत जी कोमी ह्यांच्या व्याख्येत बसतील.
धार्मिक विरोध हा भारतात प्रचंड आहे हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी त्यांच्या श्रद्धा स्थानावर टीका करण्या साठी देव धर्म कसे बोगस आहेत,देव कसा अस्तित्वात च नाही असे विचार पसरवले जातात.
कोण करते हे..बौद्ध धर्मीय, डावे विचाराची लोक.
कारण त्यांचा धर्म देव नाही असे मानतो .
धर्म न सोडणारा नास्तिक व्यक्ती खूप भेटतील पण धर्म सोडणार nastik व्यक्ती एकदाच मिळेल आणि तो पण हिंदू धर्मीय च असेल.

धर्म सामाजिक नैतिकता सुद्धा सांगू शकत नाही. आज आपले कायदे धर्माधरित नाहीत. ते आपण आपल्या बुद्धीने, विचार करूनच बनवलेले आहेत.

बाकी, समलैंगिक संबंधांचे समाजावर कसलेही वाईट परिणाम होत नाहीत. कुटुंबव्यवस्थेवर काही वाईट परिणाम होत नाहीत.

सामो, कविता छान आहे. पण श्रद्धा असणे = भरभराट, श्रद्धा नसणे = हाल ही dichotomy खरी नाही.>>
हे पटलेच..

धर्म पाळत नसणार नास्तिक भारतात नाही.
हे मला सांगायचे आहे.
जे नास्तिक नास्तिक म्हणून उड्या मारत असतात ते सर्व बौद्ध धर्मीय आहेत.
त्यांना हिंदू ना टारगेट करायचे आहे.
पण स्वतःचा धर्म हिंसक पद्धतीने वाढवायचा पण आहे मुस्लिम लोकांसारख.
धर्म न पाळणारा नास्तिक असेल तर त्याचा आदर आहे

अलीकडे हे अधूनमधून चक्क लॉजिकल लिहू लागले आहेत अशी कमेंट करणार होते पण लगेच दुसऱ्या कमेंटमधून भ्रमनिरास केला

ओ हेमंत, मी हार्ड कोअर नास्तिक आहे अन हिंदूही आहे Lol
मूळात हिंदु धर्मातच नास्तिकवाद समाविष्ट आहे. थोडा अजून अभ्यास करा हो

अजून मला काय म्हणायचे आहे ते मीच स्पष्ट करण्यात कमी पडलो असेन.
नास्तिक वादाच्या नावाखाली हिंदू धर्माला टारगेट करणारे तत्व ज्ञान सांगणारे कोणताच धर्म पाळणारे नसावेत .
अगदी हिंदू धर्म पण त्यांनी त्यागला असावा
नास्तिक पण आहे आणि धार्मिक पण आहे हे एकत्र असता कामा नयेत.
मग अशा नास्तिक लोकांचा मला खूप आदर आहे.
त्यांनी वेगळा रस्ता निवडला आहे त्याचे फायदे त्यांना किती मिळतात ह्याचा अभ्यास करून बाकी लोक पण त्या मार्गावरून जातील .
काही तरी positive घडेल

कॉमी
आस्तिक/नास्तिक ह्याची व्याख्या तुम्ही केली आहे का? का वाचताना मी मिस केली?

माझ्या मते "ज्ञानप्रक्रियेत कोणाचाही ( देव, रुढी, श्रद्धा, गुरु,.....) हस्तक्षेप मान्य न करता, पूर्णत: बुद्धिनिष्ठ मार्ग अंगिकारतो , तो नास्तिक!" Happy

धर्म न मानणारा हे पण जोडा
धर्म पण न मानणारा म्हणजे नास्तिक.
धर्म पण मानतो आणि नास्तिक पण आहे.
हे कसे शक्य आहे

देवावर विश्वास नसणारा माणूस>>
आता माझे पहा. देव आहे पण तो फक्त अडाणी अंबानीना मदत करतोय.
ओके.
पण देव म्हणजे चित्रात दाखवलेला असतो तो अरुण गोविल, किंवा महिपाल ह्यांच्या सारखा दिसतो तो?
नाही. तो निर्गुण निराकार असतो.
तो एक्झॅॅटली करतो काय?
झाडाचे पान देखील त्याच्या इच्छेेशिवाय हलू शकत नाही.
छ्या! ते काम तर वारा करतो. वारे कसे वाहतात ते मला माहित आहे. त्यासाठी देवाची गरज नाही.
हे खूप वाढत जाईल. त्याला काही अंत नाही.

अजून माझा पॉइंट क्लिअर करतो.
मी आस्तिक आहे त्याच बरोबर उच्च शिक्षित पण आहे
सर्व नैसर्गिक घटने मागील विज्ञान मला खूप उत्तम रित्या माहीत आहे पण तरी अज्ञात शक्ती अस्तित्वात आहे असे मला वाटते.
म्हणून धार्मिक आहे
गणपती घरात मना पासून बसवतो.
हे माझे पर्सनल लाईफ आहे.
माझ्या बाजूला नास्तिक राहतो तो गणेश मूर्ती बसवत नाही
देव मानत नाही .
मला त्याची काही अडचण नाही
तो त्याचा प्रश्न आहे
पण तो माझा नास्तिक शेजारी मात्र माझ्या धार्मिक
पनावर टीका करतो.
ह्याचा अर्थ हा शेजारी नास्तिक नाही
दुसऱ्या कोणत्या तरी धर्माच्या प्रभावात आहे.
आणि हे ढोंगी नास्तिक मला तरी खरे nastik वाटत नाहीत
धार्मिक च वाटतात
मत भेद ,विरोध इथेच आहे.
नास्तिक लोकांनी आस्तिक लोकांच्या जीवनात हस्तक्षेप केला नाही तर त्यांच्या विषयी कोणालाच काही अडचण नाही..आस्तिक लोक त्यांच्या जीवनात बिलकुल हस्तक्षेप करत नाहीत .हे पण जवळ जवळ सत्य आहे

Hemant 333
तो शेजारी येई पर्यंत तुम्ही व्यवस्थित लिहित होता.
त्या शेजार्याला तुमची काळजी वाटते आहे हे लक्षात घ्या.

मला भारतात ढोंगी नास्तिक आहेत ते नास्तिक च नाहीत ते दुसऱ्या धर्माच्या प्रभावात असणारे धार्मिक लोक आहेत.
हे सांगण्यासाठी मी वरील उदाहरण दिले आहे

काही दिवसांपूर्वीच एका तज्ज्ञांनी लिहिलेला लेख वाचला , गणेशमूर्तींच्या विसर्जनाने होणाऱ्या प्रदूषणावर . त्यात रासायनिक रंगांनी तर प्रदूषण होतंच पण मोठ्या प्रमाणावर शाडू मातीही तलावासाठी , जलचरांसाठी चांगली नाही याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं होतं .. तळ्यातील गाळाचं पृथक्करण केल्यावर त्यात अतिशय घातक विषारी रासायनिक पदार्थ आढळून आले , रंगांमधून विरघळलेले . ही द्रव्यं कॅन्सरला कारणीभूत होणारी आहेत . ह्या तलावाचं पाणी पिण्यासाठी पुरवलं जातं , या तलावात मासेमारी केली जाते .

कित्येक लाख गणेशमूर्तींचं विसर्जन दरवर्षी होतं . अशावेळी निदान गणेशमूर्तीच्या बाबतीत तरी माझं पर्सनल लाईफ आहे , हे खरं राहत नाही .

असो . प्लॅस्टिक पिशव्यांनी प्रदूषण होतं तरी आपण सगळेच त्या वापरतो , फटाक्यांनी प्रदूषण होतं तरी ते फोडतो . कारखान्यांमधून होणारं प्रदूषण दिसत नाही तुम्हाला ..... मग गणेशमूर्तींनीच काय घोडं मारलं आहे ? आमचाच धर्म बरा दिसतो तुम्हाला वगैरे वगैरे नेहमीचं अस्त्र उगारून बोलणाऱ्यांची तोंडं बंद करूच शकतो आपण . पर्यावरणाचं कौतुक आम्हाला सांगू नका , मूर्ती पुजून आम्हाला 5 / 10 दिवस अतिशय आनंद मिळतो , बास .. आणि काही धाड भरत नाही पर्यावरणाला .. विनाकारण कटकट नको तुमची असं ठणकावून सांगता येतं .

एखाद्याला पर्यावरणाची काळजी असेल तर तो साहजिकच यावर टीका करू शकतो , मग तो आस्तिकही असेल किंवा नास्तिकही . त्यावेळी तो खरा नास्तिक नसून ढोंगी आहे , दुसऱ्या धर्माचा आहे , म्हणून टीका करतो अशी समजूत करून घेणं बालिशपणाचं आहे .

>>> पण श्रद्धा असणे = भरभराट, श्रद्धा नसणे = हाल ही dichotomy खरी नाही.
करेक्ट!!

>>>>मग तो आस्तिकही असेल किंवा नास्तिकही . त्यावेळी तो खरा नास्तिक नसून ढोंगी आहे , दुसऱ्या धर्माचा आहे , म्हणून टीका करतो अशी समजूत करून घेणं बालिशपणाचं आहे .
होय. उत्तम मांडणी राधानिशा.

हा वेगळा विषय आहे .
उदाहरणात मी लिहले आहे मी उच्च शिक्षित आहे
सर्व नैसर्गिक घटने मागील विज्ञान मला माहित आहे.
म्हणजे मूर्ती विसर्जन मुळे प्रदूषण होते हे पण माहीत आहे.
त्या साठी मी बदलायला पण तयार आहे माती ची मूर्ती वापरेन.
पण बाजूचा नास्तिक माझ्या गणेश ustav ला च विरोध करत आहे.
मातीच्या मूर्ती मध्ये थोडी देव आहे.
ही अंध श्रद्धा आहे हे बंद करा.
हे फक्त उदाहरण आहे .
असे घडते .
त्या वर मत व्यक्त करा..

मातीची , रासायनिक रंग न वापरलेली गणेशमूर्ती आणि तिचं वाहत्या पाण्यात विसर्जन न करता घरीच टब मध्ये वगैरे विसर्जन आणि ते पाणी बागेत / झाडांना देणे , किंवा धातूची मूर्ती वापरणे , ती विसर्जित न करता , गणेशोत्सव संपल्यावर देवघरात ठेवणे असे काही उपाय त्या लेखात होते .

बाकी विरोधासाठी विरोध करणाऱ्याच्या मताला किंमत देऊ नये हे उघड आहे. सहसा गणेशमूर्ती स्थापना वगैरे दुसऱ्याच्या खाजगी गोष्टीत अगदी नास्तिक लोकही बोलायला जात नाहीत असा माझा अनुभव आहे . म्हणजे एरवी चेष्टा वगैरे खूप करतील , सोशल मीडियावर , एखाद्या गप्पांच्या बैठकीत , चर्चेत पण प्रत्यक्ष कृतीला विरोध कोणीही करत नाहीत . नास्तिकांच्या चेष्टा , थट्टा , टीका यांना खरमरीत उत्तरं द्यायला सगळे आस्तिक समर्थ असतात , आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बाजू आपापल्या मतावर ठाम असतात आणि काहीही करून दुसऱ्या बाजूचं मतपरिवर्तन करू शकत नाहीत पण ते करण्याच्या प्रयत्नाची खुमखुमीही दोन्ही बाजूंना असते .

त्यात नास्तिकांना आस्तिकतेमुळे जगाचं होणारं नुकसान थांबवणं हे आपलं कर्तव्य वाटत असतं , आस्तिक भोळसट , बावळट वाटत असतात आणि आपण आपलं म्हणणं त्यांना सहज पटवून देऊ शकू असा गाढ आंधळा आत्मविश्वास असतो . दुसरीकडे आस्तिकांनाही नास्तिक लोकांमुळे धर्म भ्रष्ट वगैरे होऊन स्वैराचार , अराजकता माजेल अशी भीती असण्याची शक्यता आहे , म्हणून तेही विरोध करतात .

वादाची खुमखुमी नसेल तर अशा चर्चांपासून लांब राहावं . आणि प्रत्यक्ष आयुष्यात आग्रहाने असे विरुद्ध बाजूचे विचार मांडणारी एखादी व्यक्ती भेटली , ती आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहे असं वाटलं तर नम्र शब्दात - हा आमचा खाजगी प्रश्न आहे , आमच्या आयुष्यात काय करायचं ते आम्ही ठरवू , तुमचा सल्ला मागितला तरच द्या " एवढं सांगितल्यावर कोणीही कोणाच्या घरात नाक खुपसायला जात नाही .

मुक्त गप्पा - चर्चा असेल तर त्या व्यक्तीलाही त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहेच .

जरा विरोध झाला की अस्तिकांच्या भावना दुखावतात याबद्दल मला नेहमी कमाल वाटत आली आहे . काही नास्तिक लोक टिंगलटवाळीच्या सुरात बोलतात , आस्तिकांना मूर्खात काढतात हे अनुभवूनही माझ्या तर भावना कधी दुखावलेल्या नाहीत . मी व्यवस्थित आस्तिक आहे . ज्यांच्या भावना जरा जराशा कारणांनी दुखावतात त्यांच्या श्रद्धा डळमळीत असतात म्हणून की काय अशीही शंका येते कधीकधी . आपल्या श्रद्धेवर आपला ठाम विश्वास हवा .

ज्याप्रमाणे नास्तिकांना आस्तिक लोक भोळसट , बावळट वाटतात त्याप्रमाणे खऱ्या आस्तिकाला मनात नास्तिकांबद्दल थोडीशी कीव आणि करुणा वाटत असते , असा माझा अंदाज आहे ( ज्ञानदेवांनी त्याला उपजोनी करंटा म्हटलं आहे , एखादा माणूस करंटेपणाने स्वतःचंच नुकसान करून घेत आहे , असं जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं तेव्हा त्याचा राग येईलच कसा ... त्यालाही अपवाद आहेत , अनेकवेळा नास्तिकांच्या हातून खूप चांगली समाजपयोगी काम उभी राहिलेली दिसतात , उदा . दाभोळकर , अनिल अवचट ... अशावेळी तो ईश्वरी योजनेचाच भाग वाटतो .. कुणी सांगावं एखादा जीव नास्तिक म्हणून जगल्यानेच त्याची अध्यात्मिक उन्नती अधिक चांगल्या प्रकारे होत असेल , प्रत्येक जीवासाठी योग्य असा निर्णय परमेश्वर घेतो असं मला वाटतं . )

तो त्यांना काही प्रत्युत्तर देण्याच्या , काही पटवून देण्याच्या भानगडीतही पडणार नाही , निदान तावातावाने तरी नाही , आणि प्रयत्न केलाच आणि त्यांना नाही पटलं तर त्याचं काही दुःखही वाटून घेणार नाही .

विरुद्ध बाजू काय म्हणते आहे हे शांतपणे ऐकून घेण्याएवढी परिपक्वता अस्तिकांकडे असायला हवी खरं तर . बऱ्याच वेळा विरुद्ध बाजू चांगल्या शब्दात बोलणारीही असू शकते , तिचा हेतू टिंगलटवाळीचा नसून खरोखर समाजहिताच्या कळकळीचाही असू शकतो उदा . नरेंद्र दाभोलकर , ते नास्तिक होते तरी मला त्यांची भाषणं , चर्चा ऐकायला खूप आवडतात कारण इतकं निर्मळ , निस्वार्थी मन ..

डॉ . शंतनू अभ्यंकर यांचा एक व्हिडिओ आहे युट्यूब वर - " इतकी शहाणी सुरती माणसं मुळात देव का मानतात ? ,"

https://youtu.be/Go8OdzojHbg

तो पूर्ण अतिशय संयत भाषेत आहे , कुठेही अस्तिकांचा अपमान नाही . डॉक्टर स्वतः नास्तिक आहेत पण ते विरुद्ध पक्षाचे किंवा धर्माला विरोध करणारे वगैरे अजिबातच वाटत नाहीत , कारण मोकळ्या मनाने पूर्वग्रह न ठेवता ऐकला . आणि ऐकूनही माझ्या आस्तिकतेत कणभर घट वगैरे होत नाही , ती आहे तेवढीच आहे , तितकीच ठाम आहे .

radhanisha आपला प्रतिसाद पटला.
आता माझा एक मुद्दा. जर देव असेल तर जगात अन्याय दुःख का आहे? म्हणजे लहान बालकांना व्यंग का येतात? त्यांनी काय पाप केले? मला अंबानीच्या घरी जन्म का नाही मिळाला? ह्याचे समर्थन करण्यासाठी मग पुनर्जन्म, स्वर्ग, नरक ह्या कल्पना पुढे येतात. कसा देवावर विश्वास ठेवायचा.

Pages