पोन्नियिन सेल्वन पाहण्याआधी हे वाचा - पी एस फॉर डमीज

Submitted by हरचंद पालव on 6 May, 2023 - 11:33

पोन्नियिन सेल्वन या चित्रपटावर गेल्या काही दिवसांत झालेली चर्चा पाहता अतिपरिचयात् अवज्ञा होण्याचा धोका आहे, किंबहुना ती झालीच आहे. विशेषतः चित्रपटाच्या पहिल्या भागात नवीन लोकांसाठी त्यांनी पात्रांची ओळख परेड व्यवस्थित पार न पाडल्यामुळे पंचाईत होते हे मान्य आहे. पण तरीही या चित्रपटाची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे जी मजा आली, ती पाहता हा आनंद इतरांनाही घेता यावा या उद्देशाने अगदी थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची ठरवली आहे. सविस्तर चर्चा खाली करता येईलच, पण लेखात ही ओळख शक्य तितकी संक्षिप्त आणि सुटसुटीत लिहायचा आम्ही प्रयत्न करू. अगदी फार कुठे जाऊन अभ्यास करायची गरज नाही. चित्रपट पाहण्यापुरती माहिती मिळाली तरी पुरे.

ही कथा कुठल्या एका युद्धाची नाही, तर चोळकालीन राजकारणाची, त्यातल्या चढाओढीची, आणि 'कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले' याची आहे. महाभारत, गेम ऑफ थ्रोन्स वगैरे कथानकांत असते तशी पात्रांची खूप मोठी फळी, राजघराण्यांतले परस्परसंबंध, नात्यांतली गुंतागुंत, वेगवेगळी ठिकाणं असं सगळं ह्यात आहे. त्यामुळे थोडी ष्टोरी काय आहे ते पाहूयात.

पोन्नियिन सेल्वन म्हणजे काय रे भाऊ? 'पोन्नी' म्हणजे कावेरी नदी. 'पोन्नियिन सेल्वन' म्हणजे कावेरीचा पुत्र. साधारण १००० वर्षांपूर्वी दक्षिण भारतात (आणि फारिनलाही ... हो, श्रीलंका, साउथ ईस्ट एशियाही फारीनच हाए) पसरलेल्या चोळ साम्राज्यातला सर्वात देदिप्यमान हिरा - राजराजा चोळ ह्याची ही गोष्ट आहे. ह्याचं पाळण्यातलं नाव अरुल्मोळी वर्मन. लक्षात घ्या: अरुल्मोळी वर्मन = राजराजा = पोन्नियिन सेल्वन.

आता ह्याला अजून दोन भावंडं आहेत. सर्वात मोठा आदित्य करिगालन, मधली कुंदवै आणि धाकटा हा - अरुल्मोळी वर्मन. ही तिघं 'सुंदर चोळा'ची मुलं. आता सत्ता ह्यांच्याकडे कशी आली? तर ती प्रक्रिया आणि भाऊबंदकीची बीजे आधीच्या पिढ्यांत पेरली गेली. खालचा तक्ता पहा. (आता सारखं चोळ-चोळ म्हणतो आहोत, म्हणून लक्षात घेऊ या - त्याचा उच्चार आपण हात चोळतो त्यातला च नाही बरे! चोवीस शब्दात जसा चो आहे, तसा उच्चार करा आठवणीनं.)

पोन्नियिन सेल्वन(2).jpg

सुंदर चोळाचे आजोबा परांतक (प्रथम) यांना ३ मुलं. थोरला राजादित्य तरुणपणीच एका लढाईत मारला गेला. त्यामुळे परांतकाच्या मृत्यूनंतर गादी मधल्या खंडरादित्यकडे आली. खंडरादित्याचा जीव राज्यकारभारापेक्षा शिवभक्तीत रमत असल्यामुळे त्याने कारभार धाकटा भाऊ अरिंजय याच्या हाती सोपवला. पुढे अरिंजय मरायला टेकला तेव्हा खंडरादित्याचा मुलगा मदुरांतकन अगदी दोन वर्षाचा असल्यामुळे अरिंजयाचा मुलगा सुंदर चोळ (परांतक-२) राजा झाला. असंतोषाची बीजं पेरली जायला ही कारणपरंपरा पुरेशी होती (आठवा - कौरव-पांडव, राघोबा दादा - नारायण राव वगैरे यादवी).

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा सुंदर चोळ म्हातारा झाला आहे. 'पळयारै' हे चोळ साम्राज्याचं राजधानीचं शहर. परंतु जराव्याधींनी ग्रस्त सुंदर हा तंजावूरला येऊन राहिला आहे, जिथे नंतर राजधानी हलवली गेली (जिथे पुढे ६००-७०० वर्षांनी मराठी साम्राज्यही होते - व्यंकोजी भोसले आठवा). मुलगी कुंदवै मात्र पळयारैमध्ये राहते. ती अतिशय तल्लख बुद्धीची आणि राजकारणकुशल आहे. उत्तरेच्या मोहिमांचं सेनापत्य आदित्य करिगालन करतो आहे तर दक्षिणेकडच्या मोहिमांची धुरा अरुल्मोळी वर्मन वाहातो आहे. मदुरांतकनही आता बराच मोठा झाला असून आता त्याला गादी खुणावते आहे. पण त्याची आई 'सेंबियन महादेवी' हिच्या मते मदुरांतकाने शिवभक्तीतच लीन व्हावे, राजकारणात मुळीच पडू नये. आता या खेळात काही महत्त्वाची प्यादी आहेत.

१. पळुवेट्टरियर बंधू - त्यातला थोरला पळुवेट्टरियर (पेरिय पळुवेट्टरियर; पेरिय म्हणजे थोरला) हा सुंदर चोळाचा कोषाध्यक्ष/खजिनदार आहे. धाकला पळुवेट्टरियर (चिन्न पळुवेट्टरियर; चिन्न म्हणजे धाकला) तंजावुरचा किल्लेदार आहे. हे घराणं मूळचं पळुवूर नावाच्या ठिकाणचं. गेली अनेक शतकं त्यांचे चोळांशी असलेले पिढिजाद संबंध अतिशय जवळचे आणि विश्वासाचे आहेत. पण आता हे बंधू नक्की कुणाच्या बाजूला आहेत? ते दोघेही एकाच बाजूला आहेत का? सिनेमात पहा. हिंदीत सिनेमा पाहिलात तर डबिंगमध्ये 'पळुवेट्टरियर'चा त्यांनी 'पर्वतेश्वर' केला आहे.

२. वंदियत्तेवन वल्लवरायन - हा आदित्य करिगालनचा अगदी जिगरी दोस्त. हा 'वानर' नावाच्या कुळातला आहे. संपूर्ण कथेत मला प्रचंड आवडलेलं हे पात्र. संपूर्ण कथा आपण एका अर्थी ह्याच्या डोळ्यांनी पाहतो, इतकं ते महत्त्वाचं आहे. हा जिथे जिथे जाईल तिथे तिथे कथा उलगडत जाते. सुंदर चोळ आणि त्याच्या मुलांचा काटा काढायचं काय कारस्थान शिजतं आहे ह्याची माहिती काढायची आणि ती त्या तीन मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ह्याच्यावर आहे. त्यासाठी प्रसंगी हेरगिरी, वेषांतर, प्रसंगी समोरासमोर दोन हात वगैरे सगळं करण्यात हा तरबेज आहे.

३. अळवारकडियन नंबी - हा वैष्णव संन्यासी वरवर विदूषक वाटतो. पण हाही एक हेर आहे. कुणासाठी हेरगिरी करतो ते इथे सांगत नाही.

४. वाणवण महादेवी / वानमादेवी - ही सुंदर चोळाची बायको.

५. मलयमान - वानमादेवीचा बाप, आदित्य (आणि भावंडांचा) आजोबा. सिनेमात तुम्हाला आदित्य करिगालनबरोबर एक पांढरी दाढीवाला भीष्माचार्य-छाप माणूस कायम दिसेल. तोच हा मलयमान. त्याच्या सर्व मोहिमांमध्ये सतत सोबत असणारा.

६. पार्थिबेंद्रन - 'पल्लव' नावाच्या राजवंशातला हा पोरगा आदित्यचा चांगला दोस्त आहे. तोही त्यासोबत दिसतो.

७. पेरिय वेळ्ळार (= बूदी (भूती/बोधी?) विक्रमकेसरी) - अरुल्मोळीची सोबत देणारा, चोळांच्या दक्षिण मोहिमांचा सेनापती. ह्याची पुतणी वाणदी ही कुंदवैची जिग्गी मैत्रीण असते. वाणदी आणि अरुल्मोळीचा बार उडवून टाकावा असं याच्या मनात आहे, कारण हे लग्न व्हावं ही तो (वाणदीच्या पिता)श्रींची इच्छा होती.

८. नंदिनी (= इलय राणी) - ह्या पात्राबद्दल लिहायला शब्द अपुरे आहेत. चित्रपटाचं नाव नंदिनी हवं होतं असं वाटून जातं. ही आदित्यची बालमैत्रीण, क्रश, वगैरे वगैरे. ती 'रॉयल ब्लड’ नसल्यामुळे आदित्यच्या घरच्यांनी तिला लहानपणीच राज्याबाहेर काढलं, आणि चोळांचे शत्रू असलेल्या पांड्य राज्यात ती जाऊन राहिली. तिची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. ती या खेळातलं प्यादं नाही, ती सगळ्या प्याद्यांना खेळवते. तिच्या अलौकिक सौंदर्याला भुलून भले भले लोकही आपण होऊन तिच्या हातांतली प्यादी होतात, अगदी राजे-महाराजेही! तिने नंतर तिच्यापेक्षा वयस्कर असलेल्या कोषाध्यक्ष पेरिय पळुवेट्टरियर याच्याशी लग्न केलं आहे. हा म्हातारा नवरा, आणि त्यायोगे राज्याचा पैसाअडका तिच्या मुठीत आहे.
आदित्यने एका युद्धानंतर पांड्य राजा - 'वीर पांड्या'चा शिरच्छेद केल्यापासून पांड्य लोक आदित्याच्या आणि पूर्ण चोळकुळाच्या संहाराला आसुसले आहेत. नंदिनी पांड्य राज्यात आश्रय घेऊन आल्यामुळे तिचं तेही एक कनेक्शन आहे. त्यातला एक 'रवीदासन' नावाचा एक चाप्टर माणूस नंदिनीला गुप्तमार्गाने येऊन चोरून भेटत असतो जादुगाराच्या वेशात. अजून बरंच काही आहे ... नंदिनी नवर्‍यासह चोळांच्या नाकावर टिच्चून तंजावूरातच राहते.

वरती आलेल्या ठिकाणांच्या (पळयारै, तंजावूर, कांची) नावांखेरीज एक कडंबूर नावाच्या शहरातला राजवाडा आहे. तो चोळांचाच एक मंत्री 'संभुवरैयन' याचा आहे. त्याचा मुलगा 'कंधमारन' हा वंदियत्तेवनचा मित्र आहे. ही गोष्ट सांगायचं कारण म्हणजे सुंदर चोळाविरुद्ध त्याचेच मंत्री ह्या कडंबूर राजवाड्यात एकत्र जमून खलबतं करतात हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

बाकी राजकन्या कुंदवै हिची मैत्रीण वाणदी, नाविक मुलगी पुंगुळली, अरुल्मोळीचा जीव वाचवणारी वृद्धा (मंदाकिनी) वगैरे पात्रं पहिल्या चित्रपटात महत्त्वाची आहेत. ती कळायला फार कष्ट पडणार नाहीत. एवढ्या माहितीवर आता चित्रपट बघताना अडचण येऊ नये असा कयास आहे. इतर सविस्तर चर्चा, काय कळलं, काय नाही कळलं वगैरे नंतर करता येईलच. वरती लोकांची नावं त्यातल्या त्यात तमिळ उच्चारांच्या जवळपास लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तमिळ जाणकारांनी सुधारणा सुचवल्यास स्वागतच आहे.

- हरचंद पालव आणि स्वाती_आंबोळे

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

राजराजाचा मुलगा राजेंद्राबद्दल - चोळांचं नौदल राजराजाच्या काळात 'ब्राऊन वॉटर नेव्ही' म्हणजे किनाऱ्याला तुलनेने जवळच्या भागात ऑपरेट करू शकत होतं, ते राजेंद्राने प्रचंड बलवान बनवून 'ब्लू वॉटर नेव्ही' केलं, अर्थात असं नौदल जे महासागरांमध्ये लांब मोहिमा करू शकेल. त्या जोरावर चोळ तसेच कंबोडियन व्यापाऱ्यांना नडणाऱ्या 'श्रीविजय' ह्या इंडोनेशियातील साम्राज्याचा नायनाट ते करू शकले. त्यामुळे व्यापारी चीनपर्यंत जाऊन पोचले. मलाक्काच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवून असण्याचं हे युद्धतंत्र आजही भारतासाठी आदर्श आहे. त्यातून त्याने व्यापार आणि युद्धाचे नवीन डावपेच शोधले. उत्तरेस बंगाल आणि ओडिशावर स्वारी करून राज्य गंगेपर्यंत नेऊन भिडवलं तेही नौदल आणि युद्धतंत्राच्या जोरावर. गंगाविजयाच्या आठवणीप्रीत्यर्थ त्याने जे शहर वसवलं, तिथेच त्याच्या नंतरच्या सर्व चोळ राजांचे राज्याभिषेक झाले. राजेंद्राने चोळांना भारतातीलच काय, पण दक्षिण आशियातील एक बलाढ्य साम्राज्य बनवलं.

मस्त धागा आहे हा हपा स्वाती आणि पायस धन्यवाद. भास्कराचार्यांनी जी पुरक माहिती दिली आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. मला घोळ साम्राज्याबद्दल फार जुजबी माहिती होती.

मुळ पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे, ते संपलं की वर पायस ने उल्लेख केला आहे ती पुस्तक वाचायची इच्छा आहे. पायस वरील पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत का?

<तमिळ हा शब्द पण Tamizh असा लिहिला जातो >
हरचंद पालव, मी Tamil असाच पाहिला आहे. राज्याचं नाव Tamil Nadu लिहिलं जातं.
द्रविड मुन्नेत्र कळघम , कनिमोळी या नावांत मात्र ळ zh असा पाहिला आहे.

इंग्रजांनी tamil असं स्पेलिंग केल्यामुळे सरकार दप्तरी आणि त्यायोगे उत्तरेत सर्वत्र तेच स्पेलिंग वापरलं जातं. पण योग्य उच्चार करण्यास आग्रही असलेले तमिळ लोक Thamizh किंवा Tamizh असं स्पेलिंग करतात. दक्षिण भारतात thचा उच्चार त आणि tचा उच्चार ट करतात ही अजून एक उत्तरेतल्यांना गोंधळवणारी गोष्ट. त्यामुळे आपण neetha वाचून नीथा म्हणतो, पण खरं तर त्यांना नीताच अपेक्षित असतं. Neeta असं लिहिलं तर त्यांच्या मते त्याचा उच्चार नीटा असा होईल.

अजून त्यांनी आपल्या राज्याच्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग बदललं नाही हे नवलच.

माझे एक बॉस तमिळ होते. आणि त्यांना दही म्हणता येत नसे. कारण तमिळमध्ये ह नाही म्हणे. तेच एक डोंबिवलीत जन्मलेली आणि अस्खलित मराठी बोलणारी तमिळ सहकारी h हे अक्षर हेच असं वाचत असे.

माझे एक बॉस तमिळ होते. आणि त्यांना दही म्हणता येत नसे. कारण तमिळमध्ये ह नाही म्हणे. >>> ते 'धयी' म्हणतात‌.

माझ्या मुलांना इकडं लोक रेहानला रेगान आणि माहिरा ला मागिरा म्हणतात..

लेख अभ्यासपूर्ण आहे..
पीएस वन पाहिला तेव्हा अजिबात समजला नव्हता.. मग तमिळ मैत्रिणी कडून वरचा इतिहास समजून घेतला होता तेव्हा बर्यापैकी कळलेला..
पि एस टु ओटिटिवर आल्यावर बघणारे.

हा धागा 2 वेळा वाचून जरा अभ्यास झाला. मग कुठे पहिला भाग पाहिला आणि कनेक्शन्स कळाले.
( किंवा कळाल्यासारखं वाटतंय Proud )
नावं जागा आणि माणसं ह्यांची अवघड आहेत बा.
हिंदीत तर पर्वतेश्वर केलय. Lol
धन्यवाद धागा काढून प्रबोधन केल्याबद्दल Happy

>>ज्या लोकांनी GOT पचवलेली आहे...>>
अवांतर - जिओटीचे आठ सिझन आहेत, तिथे कॅरेक्टर बिल्डिंगमधे गल्लत अजिबात झालेली नाहि. या सिनेमाच्या बाबतीत तरी मनिरत्नमने माती खाल्लेली आहे. कॅनवास मोठा असल्याने सिनेमा ऐवजी वेबसिरीज बनवली असती तर प्रेक्षकांचा गोंधळ उडाला नसता आणि "... फॉर डमीज" ची गरज भासली नसती...

पायस वरील पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत का? >> नंदिनी विजयराघवन यांनी शिवगामी (चारही खंड) आणि पार्थिबनचे इंग्रजी अनुवाद केलेत. त्याशिवाय पोन्नियिन सेल्वनचा अनुवाद केलेल्या पवित्रा श्रीनिवासन (यांचे कोविड काळात निधन झाले) यांनी शिवगामीच्या पहिल्या खंडाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. उर्वरित तीन पुस्तकांचे अनुवाद माझ्या माहितीत तरी उपलब्ध नाहीत.

<<जिओटीचे आठ सिझन आहेत, तिथे कॅरेक्टर बिल्डिंगमधे गल्लत अजिबात झालेली नाहि.>>>
सहमत. या चित्रपटात character building कडे पूर्ण दुर्लक्ष आणि नेहमी प्रमाणे दक्षिण भारतीय सिनेमातील गाण्यांचे न जमलेले हिंदीकरण या दोन गोष्टी खटकल्या.

हर्पा, स्वातीताई, सुंदर माहिती. सिनेमा पहायचा प्रयत्न केला होता पण न कळल्यामुळे सोडून दिला होता. पण हा लेख वाचून बर्याच गोष्टी समजल्या.

पायस, पवित्रा श्रीनिवासन यांनी चार भागांचा पूर्ण अनुवाद आणि पाचवा भाग अर्धवट करून झाला. कौतुकाची गोष्ट म्हणजे वर्षा वेणुगोपाल यांनी उरलेला पाचवा भाग पूर्ण केला आणि त्यामुळे आता त्यांचे पाचही भाग उपलब्ध आहेत.

हपा >> हो, पोन्नियिनचे सर्व खंड अनुवादित आहेत. माझा प्रतिसाद शिवागामीयिनच्या अनुवादाबद्दल आहे.

@ पायस, धन्यवाद .

@ हपा, विनोदाच सगळं श्रेय गुगल इंडिकचे!

सुरेख परिचय दिला आहे, पुन्हा एकदा (तिसऱ्यांदा) बघेन. कथेच्या गाभ्यापर्यंत गेल्याशिवाय काही चैन पडणार नाही आता. धन्यवाद हर्पा व स्वाती Happy
पायस, मैत्रेयी आणि भास्कराचार्य यांचेही प्रतिसाद आवडले.
-----
मी मधे अलयैकडल गाण्याचा अतिरेक केला होता. तरीही पाठ झालं नाहीच, भाषेची/उच्चारांची भलतीच अडचण होतेय. सबटायटल मधल्या 'झ' मुळे तो तुम्ही सांगितलेला पुंगुळली व अरूल्मोळी यांना पुंगुझाळी व अरूनमौझी वाचले. अजूनही बरेच घोळ घातले आहेत. Happy

आता सध्या सगळे रेझिस्टंस सोडून वीरा-राज-वीर हे गाणं रिपीटवर आहे. चळ लागलाय. मला गाण्यातले बारकावे कळत नाहीत. 'अलैकडल'वरून यावर उडी मारली आहे. हे फारच आवडलंय.प्रत्येक गाण्यात कावेरी नदी कुठल्यानकुठल्या रूपात दाखवलेली आहे. ती एक मुख्य पात्र आहे. तिच्याप्रवाहाच्या साक्षीने कथा पुढे पुढे जातेयं. गाणं ऐकताना/बघताना राज्याभिषेकाची लगबग, मोगऱ्याचा सुगंध, लगबगीने औक्षणाची तयारी करणाऱ्या सुंदर राजस्त्रिया वगैरेंचा आभास होतो. यात वीररस जरासा स्थिरावलेला वाटतो, शिवाय शृंगाररसाचा शिडकावा सुद्धा जाणवतोय. चांदोबातली पानं फडफडल्यासारखी वाटतात. वीरांना शृंगार शोभतो हे असं काही बघून नक्कीच पटतं. Happy

वीरा राजवीर फारच सुंदर जमलेले आहे. मी काल पुन्हा ऐकत होतो हे. युट्यूबवर त्याच्या व्हिडीओत मध्ये मध्ये काही युद्धाचे सिलूएटस् (सावलीचित्र) येतात, त्यात मला मध्येच कटप्पा बाहुबलीला मारतोय असं दिसल्याचा भास झाला. Lol

काल पी एस २ पाहीला. सुंदर चित्रपट. भव्य सेट्स, नेत्रदीपक वेषभूषा, सुंदर जवाहीर....
अजून मला एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे...सगळी पात्रं तलवारीचं पातं धारेच्या बाजूने हाताळतात....मलाच एकदम अंगावर काटा येत होता पाहताना....आत्ता चर्र रक्ताची धार लागेल म्हणून....
आदित्य चे काम सुपर्ब. नंदिनी सोबतचा शेवटचा प्रसंग बेस्ट.
या सिनेमात काय नाही...!! उत्कट पण अधुरी प्रेमकहाणी, शौर्य ,त्याग , सौंदर्य, भरभरून ओसंडणाऱ्या भावना......

हॅट्स ऑफ !!

Pages