Chatbot : डॉक्टर व रुग्णांचा संवादी यंत्रमित्र ? (१)

Submitted by कुमार१ on 14 February, 2023 - 04:06

गेले काही महिने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या Chatbot या नव्या अवतारामुळे तंत्रजगतात धुमशान चालू आहे. एका संगणक उद्योगाने त्यांची संबंधित प्रणाली बाजारात आणली. त्यानंतर थोड्याच काळात अन्य बलाढ्य उद्योगाने पण या क्षेत्रात उडी घेतली आणि त्याच तोलामोलाचा किंबहुना अधिक सरस नवा अवतार आपण तयार करणार असल्याचे जाहीर केले. सध्या बऱ्याच जणांनी कुतूहलापोटी ही यंत्रणा वापरून पाहिली आहे. त्या अनुभवातून बऱ्याच जणांचे असे मत झाले आहे, की ही यंत्रणा सध्या बाल्यावस्थेत आहे. कालौघात जसा जसा अधिकाधिक अनुभवसंपन्न विदा या यंत्रणेमध्ये भरला जाईल त्यानुसार ती अधिक उपयुक्त आणि विश्वासार्ह ठरेल. या नव्या तंत्रामुळे निव्वळ ‘गुगलशोध’ ही जुनी यंत्रणा लवकरच कालबाह्य होईल असेही भाकीत वर्तवले गेले.

एकंदरीत या विषयावर जोरदार मंथन आणि काथ्याकूट देखील चालू आहे. अशा वातावरणात वैद्यकीय क्षेत्राला मागे राहून कसे चालेल? त्यानुसार डॉक्टरांच्या विविध व्यासपीठांवरून या विषयावर लेखन, वाचन, भाषण आणि चर्चा झडत आहेत. हे नवे तंत्र डॉक्टरांचा विश्वासार्ह मदतनीस ठरेल काय, किंवा रुग्णांचा उत्तम मार्गदर्शक होऊ शकेल काय, असे मुद्दे चर्चेत आहेत. त्याचबरोबर या नव्या तंत्राचे संभाव्य धोकेही चर्चिले जात आहेत. समाजाच्या आजपर्यंतच्या वैज्ञानिक इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसेल, की कुठलेही नव्हे तंत्रज्ञान उदयास आले की त्यावर प्रशंसा आणि टीका या दोन्हींचा भडीमार होतो; काहीसा गदारोळही उठतो.

काय करायचंय हे नवं खूळ”, इथपासून ते
“आता यावाचून पर्याय नाही”,
इथपर्यंतची सर्व मते व्यक्त होत असतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध प्रणाली वैद्यकीय क्षेत्रात या आधीपासून वापरात आहेतच- जसे की, मोबाईल ॲप्स आणि शरीरावर परिधान केलेली छोट्या आकाराची उपकरणे किंवा घड्याळे. या लेखात फक्त Chatbot या नव्या संगणक प्रणालीचा वैद्यकीय क्षेत्रात कसा उपयोग/दुरुपयोग होऊ शकेल याचे विवेचन करतो. या तंत्राची वैद्यकातील उपयुक्तता, त्याच्या मर्यादा, त्यातून उद्भवणारे गोपनीयता आणि नैतिकतेचे प्रश्न अशा मुद्द्यांच्या आधारे या नवतंत्रज्ञानावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

chatbot.jpgपूर्वपिठीका
Chatbot ही ताजी घटना असल्यामुळे तिच्यावरील चर्चा जोरात आहे. परंतु त्या आधीची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला बरेच मागे जावे लागेल. काही दशकांपूर्वी सर्व प्रकारची वैद्यकीय माहिती आंतरजालावर व्यापक प्रमाणावर उपलब्ध झाली. त्याचे तसे सामाजिक सुपरिणाम दिसले त्याचबरोबर बरेच दुष्परिणाम देखील जाणवलेले आहेत. आपले आरोग्य आणि औषधे यासंबंधीचे सामान्यज्ञान सर्वांसाठी सहज उपलब्ध झाले खरे, परंतु त्याचबरोबर नको इतकी माहिती सर्वांसाठी उपलब्ध झाल्याने काही समस्याही निर्माण झाल्या. जीवशास्त्राची शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा नसलेले अनेक जण जालावरील ही माहिती वाचून (डॉकटरांच्या सल्ल्याविना) स्व-उपचारांच्या नादी लागलेले दिसतात. आपल्याला झालेल्या एखाद्या आजारासंबंधी जालावर सहज उपलब्ध असलेली जुजबी किंवा अर्धवट माहिती वाचून डॉक्टरांना नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून भंडावून सोडणारे लोकही खूप वाढले. अशा लोकांना ‘गुगल डॉक्टर’ ही उपाधी चिकटली. असे गुगल डॉक्टर स्वतःच्या आजारासंबंधी फक्त सामान्यज्ञान मिळवूनच थांबले असते तर बरे झाले असते. परंतु, त्यांनी याही पुढे जाऊन नियमानुसार डॉक्टरांच्या चिट्ठीविना मिळू न शकणारी औषधे एकतर दुकानांमध्ये जाऊन सरळ विकत घेतली किंवा ऑनलाईन पद्धतीने मिळवली. हा प्रकार नक्कीच धोकादायक ठरला. कायदेपालन न करणाऱ्या देशांमध्ये ही अनिष्ट प्रवृत्ती फोफावलेली दिसते.

आता Chatbot या नव्या सुविधेमुळे प्रश्नकर्त्याचा जालशोध घेण्याचा त्रास वाचणार आहे आणि हवे तसे आडवेतिडवे प्रश्न विचारल्यानंतर देखील एक निबंधस्वरूप तयार उत्तर एका फटक्यात मिळणार आहे. त्याचा उपयोग स्वतःसाठी करताना तारतम्य बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उपयुक्तता
एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. एखाद्या व्यक्तीस झालेले सर्दी-पडसे-अंगदुखी यासारखे किरकोळ त्रास वगळता, कुठल्याही मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी रुग्णाने प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेणे अत्यावश्यक आहे. रोजच्या जीवनातील व्यग्रतेमुळे काही वेळेस डॉक्टरांची भेट घेणे लांबणीवर पडते. अशा प्रसंगी एक तात्पुरती मदत म्हणून या जालतंत्राकडे पाहता येईल. गरजेनुसार या तंत्राचा रुग्ण आणि डॉक्टर या दोघांनाही मर्यादित उपयोग करून घेता येईल. त्याचा आता स्वतंत्रपणे विचार करू :

१. रुग्णांच्या दृष्टिकोनातून उपयोग
एखाद्या व्यक्तीस जेव्हा काही शारीरिक त्रास होऊ लागतो तेव्हा सर्वप्रथम ती घरगुती उपायांचा अवलंब करते. त्यानंतरही काही फरक न पडल्यास डॉक्टरांना दाखवणे क्रमप्राप्त असते. आपल्याला जी काही लक्षणे उद्भवली आहेत ती जर सुसूत्रपणे आपण Chatbot सुविधेमध्ये विचारली तर त्यातून एक प्राथमिक स्वरूपाचा उपयुक्त सल्ला मिळू शकतो. आता आपल्या संस्थळावर घडलेले एक जुने उदाहरण देतो.

“चांगले युरोलॉजिस्ट सुचवा”

या शीर्षकाचा एक धागा मागे निघाला होता. तिथली चर्चा वाचतानाच मला असे जाणवले, की लघवीचा ‘काहीतरी’ त्रास होतोय म्हटल्यानंतर सामान्य माणूस एकदम युरोलॉजिस्ट अशी पटकन उडी मारतो. ( urine problem ? >>>>> urologist !) ते योग्य नाही. लघवीच्या त्रासासंदर्भात चिकित्सा करणारे तज्ञ डॉक्टर मूलतः दोन प्रकारचे असतात. त्यापैकी नेफ्रॉलॉजिस्ट हे फिजिशियन असतात तर युरॉलॉजिस्ट हे सर्जन. निरनिराळ्या मूत्र आजारांमध्ये अनेक प्रकारची लक्षणे उद्भवतात. त्यामध्ये लघवीला जळजळ होणे, लघवी करताना दुखणे, लघवी वारंवार आणि खूप प्रमाणात होणे किंवा अजिबात न होणे, कंबरेच्या बाजूच्या भागात किंवा ओटीपोटात दुखणे.. इत्यादी, इत्यादी. इथे संबंधित रुग्णाला या लक्षणांच्या आधारावरून तज्ञशोधाची प्राथमिक दिशा समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल :

A. लघवी करताना थोडीशी आग होती आहे आणि अंगात किंचित कसकस वाटते आहे : अशा प्रसंगी नेहमीच्या कुटुंबवैद्यांना दाखवणे इष्ट.
B . कंबरेच्या बाजूच्या भागांमध्ये वेदना आहे, थंडी वाजून मोठा ताप आलेला आहे आणि पायावर/तोंडावर सूज आहे : हा प्रांत नेफ्रॉलॉजिस्टचा असतो.
C . लघवीची धार बाहेर पडताना अडथळा होत आहे किंवा साठी नंतरच्या वयात लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते आहे : हा प्रांत युरोलॉजिस्टचा असतो.

आपल्याला होणाऱ्या विशिष्ट त्रासावरून आपल्याला कोणत्या प्रकारच्या डॉक्टरांची गरज आहे, हे मार्गदर्शन या संवादी यंत्रांमुळे चांगल्या प्रकारे होईल.

आता काही अन्य पातळींवरील उपयुक्तता पाहू. शारीरिक त्रासांपैकी काही त्रास असे असतात की ज्याबद्दल आपल्याला थेट डॉक्टरांशी बोलताना अवघडल्यासारखे होते. डॉक्टरांचे वय, लिंग, बोलायला कडक आहेत की मवाळ आहेत, अशा अनेक गोष्टींमुळे काही वेळेस रुग्णांना डॉक्टरांशी नीट मनमोकळा संवाद साधता येत नाही. जेव्हा रुग्णाला होणारा एखादा त्रास सौम्य ते मध्यम स्वरूपाचा परंतु सुसह्य असतो, तेव्हा थेट डॉक्टरांकडे जाण्याऐवजी जर या संवादी यंत्राचा प्राथमिक उपयोग केला तर तो काही प्रमाणात फायदेशीर होतो. कधी कधी जिवंत व्यक्ती एखाद्या समस्येवरील उत्तर जणू एकमेव असल्यासारखे फाडकन देताना दिसते. परंतु bot यंत्रणेमध्ये असे न होता विविध पर्याय सुचवले जातील.

जननेंद्रियांसंबंधीचे प्रश्न, मूलभूत लैंगिक सुख किंवा असुरक्षित संभोगानंतर असणारी संभाव्य गुप्तरोगाची भीती, यासारखे प्रश्न या यंत्राला आपण मनमोकळेपणाने विचारू शकतो. वैद्यकीय व्यवसायात (पुरुष डॉक्टरांना) महिला रुग्णांसंबंधी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. बाह्य जननेंद्रियांच्या भागात जर काही त्रास होत असेल तर त्यामध्ये दोन मूलभूत शक्यता असतात. एक तर तो त्रास मूत्रमार्गाचा असतो किंवा योनीमार्गाचा. परंतु यासंबंधीची लक्षणे स्पष्टपणे सांगायला बऱ्याच महिला कचरतात. लग्नानंतर बराच काळ प्रयत्न करूनही मूल होत नाही ही समस्या थेट सांगायला सुद्धा बरीच जोडपी अडखळतात. स्त्रीच्या जननेंद्रियाच्या भागातील त्वचेवरील काही समस्या असेल, तर तो स्त्रीरोगतज्ञाचा प्रांत नसून त्वचा व गुप्तरोगतज्ञाचा असतो, ही प्राथमिक समज देखील अनेकांना नसते. अशा प्रसंगी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीच जर यंत्रसंवादातून काही प्राथमिक मार्गदर्शन मिळाले तर ते रुग्णाचा आत्मविश्वास वाढवते.

सामाजिक आरोग्याच्या स्तरावर या नव्या तंत्राचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. समाजात विविध प्रसंगी संचारबंदी, टाळेबंदी किंवा मर्यादित संचार यासारख्या परिस्थिती उद्भवतात. नुकतीच आपण महासाथीच्या निमित्ताने काही काळ अशी परिस्थिती अनुभवली. अशा प्रसंगी सर्वांसाठीची मार्गदर्शक आरोग्यतत्वे किंवा महत्वाच्या सूचना bot यंत्रणेच्या माध्यमातून सर्वांना सहज उपलब्ध होतात. ज्या रुग्णांच्या बाबतीत दीर्घकाळ औषधोपचार चालू आहेत त्यांना येणाऱ्या किरकोळ समस्यांचे निवारण घरबसल्या होऊ शकते.

एखादा डॉक्टर स्वतः आजारी पडू शकतो किंवा काही अपरिहार्य कारणामुळे रजेवरही जाऊ शकतो. यंत्राच्या बाबतीत या शक्यता उद्भवत नसल्याने ते एक चांगला २४ X ७ चालू असणारा घरगुती आधार ठरेल. गेल्या दोन वर्षांत यासंबंधीचे अनेक चांगले प्रयोग प्रगत देशांमध्ये झाले आणि तिथले अनुभव आशादायक आहेत. किंबहुना त्यामुळे वैद्यकीय bot प्रकारच्या संशोधनाला चांगली चालना मिळाली. अर्थात रुग्णांनी या आभासी संवादी मार्गदर्शनाचा लाभ घेताना एक गोष्ट मनाशी पक्की ठसवली पाहिजे. BOT यंत्रणा म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टरला पर्याय नव्हे; डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीचे ते एक प्राथमिक मार्गदर्शन आहे; आपण आणि डॉक्टर यांच्यामधली ती केवळ तात्पुरती मध्यस्थ आहे.
..

बॉटची डॉक्टरांसाठीची उपयुक्तता आणि अन्य मुद्द्यांचा परामर्श लेखाच्या उत्तरार्धात.
*****************************************************************************************************************************
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हो ! मगाशी गडबडीत त्यांचे सर्वात वर असलेले बोधचिन्ह वगैरे बघायचे राहून गेले.
आता लक्षात आले.
धन्यवाद Happy

IMG-20230221-WA0011_0.jpg

किरकोळ आजार असणारे च सर्वात जास्त ग्राहक,(,,आजारी लोक,,), असतात.
गंभीर आजार नैसर्गिक रित्या च सर्रास होत नाहीत.
आणि झाले तर फक्त speciallist डॉक्टर च त्या वर उपचार करतात.
बाकी लोकांनाच व्यवसाय कमी होणार च.

ChatGPT एक कृत्रिम बुध्दीमत्ता असलेले एक tool आहे. ते आधी वापरात असणाऱ्या chatBot च प्रगत स्वरूप आहे.
ओपन AI ह्या कंपनीने ChatGPT विकसित केले. Nov मध्ये त्याची तिसरी आवृत्ती आली. आणि कंपनीच्या दाव्यानुसार ते माणसांप्रमाणे वाक्य तयार करून संवाद करू शकते.
कुतूहलापोटी जगातील अनेक लोकांनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले.
साधारण असं दिसत की जिथे algorithmic , logical किंवा informative संवादाची अपेक्षा असेल तिकडे chatGPT माणसांपेक्षा किंवा त्याहून उत्तम काम करते. पण जिथे EQ, भावनिक किंवा परस्पर नातेसंबंध, आठवणी जी connections गुंतागुंतीची आणि किचकट असतात ती अजुतरी chatHPT मानवाच्या तोडीची करू शकत नाही.

वरती कोणी म्हंटल्या प्रमाणे ते ठोकळेबाज उत्तर देते, कारण त्या त्याच्या मर्यादा आहेत. कारण त्यांना जेवढं शिकवलंय, data भरलाय त्यावरच त्यांची उत्तरे abalambu असणार.
ChatGPT का २०२१ पर्यंतचा data dila hora म्हणून तुम्हाला ते तसे उत्तर देते.
Google सर्वात मोठ search engine असल्यामुळे त्यांनी जे बार्ड म्हणून tool आणलं त्याची अचूकता, उत्तरे ह्याविषयी उत्सुकता होती.
मी जे काही प्रयोग करून बघितले ते मला अजिबात impressive वाटले नाहीत.
पुढे ते कोणाचे जॉब्स घेतील ह्या गोष्टी आहेतच पण सध्या आपण आपल्या व्यावसायिक गोष्टीत यांचा वापर करून आपले काम सोपे आणि परिणाम कारक व्हायला मदत घेऊ शकतो.
बरेच लोक ती घेतायत.

एकच उदाहरण
chatGPT ल वडापाव किंवा समोसा ह्यावर कविता करायला सांगा.
अगदी बाळबोध आणि ठोकळेबाज उत्तर येईल.
कारण वडापाव शी त्याच्या dataset मध्ये कनेक्शन मुंबई, फव फूड, बेसन , गोल आकार, etc आहे.

तो vadapavch संबंध एखाद्या human Javi सारखा, मित्रांशी, कॉलेज शी, पावसाशी, त्याच्या खामाग वासाशी किंवा इतर असंख्य आठवणींशी जोडू शकणार नाही कारण ती connections जी मासाने anubhavliyet ती त्याच्याकडे नाहीत.

chatGPT 4, प्रो kinvacpaid version वापरून coding करता येते असे वाचलय, पण मी स्वतः वापरून बघितलं नाहीये.

खरंय. सध्या ते विकसनशील आहे.
...
आजच हा लेख वाचला:
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होऊ शकणारे धोके

https://www.aksharnama.com/client/article_detail/6725

मानवी मेंदूपेक्षा अधिक क्षमता असलेले, स्वतः विचार करू शकणारे आणि प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात कायम मानवी हिताचे निर्णय घेतील, याची शाश्वती नाही. त्या वेळी आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान असलेल्या आणि त्या बुद्धीत घातांक दराने वाढ होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिम्सला थांबवणे मानवाला शक्य होणार नाही. त्यामुळे मानवी अस्तित्वापुढील धोका कित्येक पटीने वाढू शकतो.

ChatBot , डॉक्टरां सारखे संवादी किंवा कन्सल्टंट म्हणून येतील आणि त्या विषयीचा हा लेख पण कॉमेंट्स मध्ये बऱ्याच जणांनी chatGPT छा उल्लेख केल्यामुळे वरची सविस्तर कॉमेंट.

सध्या अनेक मायक्रो robots वर विकास, प्रयोग आणि संशोधन चालू आहे. पैकी हा एक pillBot.
एका छोट्या capsule chya आकाराचा हा microbot पाण्याबरोबर औषधाच्या गोळी सारखा मिळायचा. तो आपल्या शरीरात फिरतो, आणि तुम्ही घरी असताना सुद्धा डॉक्टरांना हॉस्पिटल मध्ये बसून तुमची endoscopy करता येते. त्याचे पुढे अजूनही बरेच उपयोग करता येतील

कोणाला अजून माहिती हवी असेल तर खालील लिंक वर अजून माहिती मिळू शकेल.

https://link.medium.com/aJUXv2imdAb

PillBot
>> भारी आहे हा प्रकार !

सध्या अनेक मायक्रो robots वर विकास, प्रयोग आणि संशोधन चालू आहे. पैकी हा एक pillBot.>>>
तीन वर्षांपूर्वी मी एक कथा लिहिली होती.
त्यात मायक्रो robots वापरले होते.

तीन वर्षांपूर्वी मी एक कथा लिहिली होती.
त्यात मायक्रो robots वापरले होते.<<<< आता अस खूप होणारे.

पूर्वी साय फाय मध्ये वाचलेल्या/ लिहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष व्यवहारात आल्यात/ येतील.

SpaceX आणि त्या क्षेत्रातील गती बघता पूर्वीचे जायंट रोबो किंवा आताचे स्टार वॉर टाईप chya गोष्टी येत्या काही दशकांमध्ये काही अंशी प्रत्यक्षात यायची खरी शक्यता आहे.

Robotics & Medicine:
ह्या संदर्भात अजून थोडी माहिती.
इस्राएल च्या तज्ञानी एक असा सूक्ष्म, एका पेशी एवढ्या आकाराचा रोबो - micro-robot - बनवला आहे. तो तरंगत आपल्या शरीरात वाहिन्यांमधून मार्गक्रमण करू शकतो. शरीरातील एखादी पेशी निरोगी आहे की बाधित आहे हे त्याला समजते. आणि तो त्या पेशीला उचलून बाजूला एखाद्या ठराविक ठिकाणी घेऊन जाऊ शकतो किंवा त्या पेशीत एखादे जनुक संक्रमित करू शकतो.
अधिक जाणून घेण्यासाठी वाचु शकता.

खरंय. अगदी सूक्ष्म तंत्रज्ञान आहे ते. काही आजारांवरची नवी औषधे विकसित करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल.
धन्यवाद !

Pages