आमची अमेरिका वारी….. भाग 1 - सीएटल

Submitted by Prashant Mathkar on 26 November, 2022 - 11:14

आमची अमेरिका वारी…..
(प्रशांत मठकर)
भाग 1- सीएटल

पाच वर्षांपूर्वी आमची मोठी कन्या मास्टर्स डिग्रीसाठी अमेरिकेत गेली आणि तिनं तिकडेच बस्तान बसवलं. पाठोपाठ दोन वर्षांनी धाकटीही गेली आणि मास्टर्स नंतर तीही तिकडेच नोकरीला लागली. त्याआधी मेहुणी अमेरिकेतच स्थायिक झालेली. सर्वांचा आम्हाला अमेरिकेस येण्याचा आग्रह बरेच दिवस सुरु होता. पण अनेकदा जवळजवळ ठरलेला कार्यक्रम कुठे तरी माशी शिंकायची आणि रद्द व्हायचा. शेवटी गेल्या डिसेंबरमध्ये मोठ्या मुलीच्या लग्नानंतर आमचा अमेरिकावारीचा प्लॅन आकार घेऊ लागला आणि गेल्या 24 में रोजी अमेरिकेतील सीएटल शहराच्या विमानतळावर आमच्या आगमनाने तो मूर्त स्वरूपात आला. निघताना पत्नीने मुली आणि बहिणीसाठी बॅगांमध्ये ठुसलेले मसाले, लोणची, सुकी मच्छी सारखे पदार्थ, आतापर्यंत ऐकलेले अनुभव आणि सल्ले पाहता अमेरिकन कस्टम्सच्या नजरेतून सुटतील याची शाश्वती नव्हती. पण बहुतेक त्यादिवशी कस्टम्स अधिकाऱ्यांचा मूड चांगला होता त्यामुळे आमचं सर्व सामान विनातपासणी बाहेर निघालं....आणि..अजूनही आंबे वगैरे सारख्या वस्तू घेता आल्या असत्या आणि त्या घ्यायला मी आडकाठी केल्याबद्दल एअरपोर्टवरच माझी कानउघडणी झाली.

विमानतळाबाहेर स्वागताला सीएटलला राहणारी धाकटी कन्या हजर होतीच. घरी पोचल्यावर ताजतवान होऊन जेवण झाल्यावर मस्त ताणून दिलं ते संध्याकाळपर्यंत. तशी या मोसमात इथे संध्याकाळ रात्री नऊ साडेनऊला होते म्हणजे रात्री नऊपर्यंत चक्क ऊन. परदेशवारीचा जेट लॅग मला मात्र जाणवला नाही (याच कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागण्याची माझी सवय हेच असावं). मुलीच अपार्टमेंट अगदी सीएटल बंदराच्या समोरच त्यामुळे सकाळी उठल्यावर बाल्कनीत बसून चहा घेत घेत समोर बंदरात येजा करणाऱ्या मोठमोठ्या प्रवासी क्रूझ, मालवाहू बोटी, लहान मोठ्या सुंदर शिडाच्या खाजगी होड्या पहाण हा माझा दुसऱ्या दिवसापासूनचा दिनक्रमच बनला. Boat I_1.jpgया बंदरात अनेक अजस्त्र धक्के (Piers), त्यातला एक तर तरंगता. या धक्क्यावर हॉटेल्स, निरीक्षण मनोरे, महाकाय मेरी गो राऊंड, मत्स्यालय यासारखी पर्यटकांना आकर्षित करणारी मनोरंजनाची अनेक साधन आहेत. किनाऱ्याच्या दुसऱ्या अंगाने एक सुंदर पार्क आहे. ज्यात वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक सारख्या सुविधा आहेत. पहिल्या दोन तीन दिवसांत आजूबाजूच्या परिसराचा प्राथमिक धांडोळा झाल्यावर सौच्या साथीने आमची स्थानिक भटकंती सुरू झाली. इथे छान छान इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने मिळतात. त्या पाहून इथल्या मुक्कामात त्यावरून एक तरी सैर करण्याचा इरादाही पक्का झाला.
IMG-20220719-WA0038.jpg
सीएटल हे अमेझॉन कंपनीच प्रमुख बिझिनेस सेंटर. इथला एक अवेन्यू अमेझॉनच्या उंच उंच इमारतीनीच व्यापला आहे. या इमारती पण पाहण्यासारख्या. त्यातली काचेच्या तीन घुमटांची अमेझॉन स्फीयर ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत एक पर्यटन स्थळच. यामध्ये जगभरातील विविध वनस्पतींच्या सांनिध्यात बसून अमेझॉन कर्मचारी काम करू शकतात. दर शुक्रवारी कार्यालयीन वेळेनंतर अमेझॉन कर्मचाऱ्यांचे नातेवाईक ही इमारत आतून पाहू शकतात. कन्या अमेझॉन मधेच कार्यरत असल्याने अमेझॉनचा हा कार्यालयीन कामकाज करताना कर्मचाऱ्यांना निसर्गाच्या सांनिध्यात घेऊन जाणारा अप्रतिम अविष्कार अनुभवण्याची संधी आम्ही घेतली.

पाइक प्लेस मार्केट...सीएटलमधल वैशिष्ट्यपूर्ण मार्केट
सीएटलमधल इलीयट बे ला लागूनच असलेलं पाइक प्लेस मार्केट माझ्या मुलीच्या रहाण्याच्या ठिकाणापासून दहा मिनिटांवर. 1907 साली सुरू झालेल हे अमेरिकेतल सर्वात जुन्या आणि सुरू असणाऱ्या पब्लिक फार्मर्स मार्केट्सपैकी एक. शेतमाल, हॅन्डीक्राफ्टस् आणि इतर पाचशेच्या वर दुकानं असलेल हे मार्केट सिएटलमधल सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ. दर वर्षी जगभरातुन 10 दशलक्षाहून अधिक पर्यटक इथे येतात आणि सर्वाधिक पर्यटक भेट देणाऱ्या जगातील पर्यटन स्थळांच्या क्रमवारीत या मार्केटचा 33 वा नंबर लागतो. मार्केटच्या चार स्तरांवर (levels) प्राचीन वस्तू, कॉमिक्स, खेळणी, पुस्तक, संग्रहणीय वस्तू, ताजा शेतमाल, मासे-मटण आणि इतर विविध प्रकारची दुकान आणि रेस्टॉरंटस् आहेत. स्थानिक शेतकरी आणि कारागीरांना माल विकण्यासाठी इथे टेबल स्पेसहि मिळते. Allowing consumers to "Meet the Producer" हे या मार्केटच ब्रीदवाक्य. मार्केटचा विस्तार आणि वैविध्य एवढ मोठ की पूर्ण मार्केट फिरायला एक दिवस अपुराच.

मार्केटच्या एका गल्‍लीत चूइंग गम पासून बनलेली एक अनोखी रंगीबेरंगी ‘ गम वॉल’ आहे. 1990 च्या दशकात इथल्या ‘Unexpected Productions’ थिएटरच्या कलाकारांनी चघळलेला गम या गल्लीच्या भिंतींवर चिकटवण्यास सुरवात केली आणि त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांच अनुकरण केल्याने या गमचा विस्तार वाढत त्याने दोन्ही भिंती व्यापून गेल्या. हळू हळू ही रंगीबेरंगी लक्षवेधी कलाकृति पर्यटकांच्या कुतुहलचा विषय बनली. इथे येणारे सर्व पर्यटक या वॉलला भेट तर देतातच पण तिचा विस्तार वाढवायला आपला हातभारही लावतात.IMG_20220530_123224.jpg
मार्केटमध्ये ब्रॉन्झची एक मोठी पिगी बँक आहे. या पिगी बँकेला ‘राचेल’ हे एका खऱ्या डुकराच नाव दिल आहे. यात टाकलेले पैसे मार्केट फाउंडेशनच्या फंडाला जातात. राचेलची लोकप्रियता एवढी की ती या मार्केटचा राजदूत (Mascot) आहे.

माझ्यासारख्या मत्स्यप्रेमीसाठी या मार्केटमधल मोठ आकर्षण म्हणजे त्यातल फिश मार्केट. अमेरिकेत कुठेही ताज्या माशांची डिलिव्हरी एका रात्रीत द्यायची ग्वाही इथे दिली जाते. त्यामुळे माशांची दुकानं दिसताच आमचे पाय लगेचच तिकडे वळले. दुकानात फिश टेबलवर अनेक प्रकारचे मोठमोठे मासे, कोळंबी, खेकडे, किमतीच्या लेबल्ससह बर्फात रचून ठेवलेले. पण किमतीत नो घासाघीस..... कोळणीशी घासाघीस करूनच मासे घ्यायची अंगी मुरलेली सवय....आणि कोळणीच्या जागी असलेले हट्टे कट्टे ‘कोळणे’ पाहूनच मासे खरेदीतला आमचा उत्साह तिथेच मावळला... त्यातही कोळंबी, खेकडे वगळता दिसणारे मोठमोठे अनोळखी मासे पाहून आमची मत्स्यभूक फक्त निरीक्षणावरच भागली. या दुकानांमधला जगप्रसिद्ध फिश शो मात्र पाहण्यासारखा. गिऱ्हाइकाने साल्मन सारखा एखादा मोठा मासा निवडल्यावर दुकानातला कर्मचारी तो मासा पॅकिंग काउंटरवरच्या कर्मचाऱ्याकडे हाताने नेऊन देण्याऐवजी ऑर्डरचा पुकारा करत त्याच्याकडे फेकतो आणि पॅकिंग काउंटरवरचा कर्मचारी त्या माशाला झेलून साफ करून पॅक करतो. गिऱ्हाईकाची तयारी असेल तर त्यालाही मासा फेकण्याची संधी मिळते. हा शो पाहायला पर्यटकांची गर्दी जमते.

गिटार वादक, पियानोवादक, फिडलर्स, वाद्यवृंद, मॅजिक शो, जगलर्स सारखे आपापले कलाविष्कार पेश करून पोट भरणारे स्ट्रीट परफॉर्मर्सही (Buskers) या मार्केट मध्ये अनेक ठिकाणी दिसतात. पण कोणीही त्याबद्दल पैसे मागताना दिसत नाही... सगळा खुशीचा मामला.. वाटल तर समोरच्या पेटीत टाका.. नाही तर जो देगा उसका भला..ना देगा उसका भी भला.....
IMG-20220609-WA0026.jpg
एक खास बात स्टारबक्स कॉफीप्रेमींसाठी......स्टारबक्स कॉफी स्टोअर्स आज जगात कानाकोपऱ्यात आहेत. पण जगातला पहिला स्टारबक्स स्टोअर सिएटलमध्ये याच पाईक प्लेस मार्केट समोर आहे. पाईक प्लेस मार्केट ऐतिहासिक ठिकाण असल्याने या स्टारबक्स स्टोअरच्या मूळ रचनेत अजिबात बदल झालेला नाही. अगदी मूळ स्टारबक्स लोगोही तसाच आहे. पण इथे इतर स्टारबक्स स्टोअर्ससारख आरामात बसून कॉफीचा आस्वाद घेता येत नाही कारण जागेअभावी इथे टेबल खुर्च्या नाहीत.....

मार्केटचा असाच फेरफटका मारताना एक सिगरेटस, चिरूटसारख तंबाखूजन्य वस्तु विकणारं दुकान दिसल. दर्शनी भागात अनेक प्रकारचे चिरूट, पाईप्स, तंबाखू पाउच, सिगरेट लायटर्स, टी शर्टस आणि इतरही बरीच चित्रविचित्र कधी न पाहिलेली सामग्री विक्रीसाठी ठेवलेली. कुतुहलापोटी चौकशी केली तर समजल की ते सीएटलमधल सर्वात जुनं Head Shop होत.IMG-20220609-WA0024.jpg आता Head Shop हा शब्द पहिल्यांदाच ऐकलेला.....मग गूगल बाबाची मदत घेतली तेव्हा कळल.. .ते Cannabis (भांग, गांजा), तंबाखू सारख्या अमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणारी सामग्री आणि संबंधित वस्तूंच्या किरकोळ विक्रीच दुकान होत. सीएटलमधील आमच्या मुक्कामात या मार्केटच्या खूप फेऱ्या झाल्या आणि या मार्केटची अनेक वैशिष्ट्य माहिती झाली. (क्रमश:)
IMG-20220609-WA0027.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच लिहिलं आहे वर्णन ओघवत्या भाषेत . नजरेसमोर सगळं उभं करणार ... क्रमशः आहे म्हणजे घरबसल्या आमची अमेरिका बघून होणार :).
फोटो हवे होते मात्र .

अरे वा! सिअ‍ॅटलवर मालिका!! सिअ‍ॅटलात स्वागत. माऊंट रेनिअर चक्कर झाली असेलच तुमची अर्थात, त्यावर लिहीणार असालच. माझाही लेख पाहून घ्या Happy https://www.maayboli.com/node/50426 (उगीच आपली माझी रिक्षा!)

अमेरिकेत गेलेल्या पालकांना मुले सूचना देतात की फार दूर जाऊ नका फिरत फिरत. तसं तुम्हाला अडवलेलं दिसत नाही. म्हणजे मज्जा आहे. आम्हालाही दाखवा गमती जमती.
इतका लांबचा विमानप्रवास कसा झाला? कंटाळा आला का?

छान
देसी पालक टेम्प्लेट बाहेरचं लिहिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

मस्तच!
मागेच वाचलेले. पण बहुधा फोटो नसल्याने प्रतिसाद द्यायचा राहिलेला. आता अ‍ॅड केलेत हे छान केले. आम्हा भारतातल्या जनतेला फोटोशिवाय अमेरीका कळणार कशी Happy