कधी कधी बोलता बोलता सहज एखाद्या पुस्तकाविषयी समजतं. आपल्याला कुणीतरी सांगतं की ते पुस्तक नक्की वाच. आपण हरप्रयत्नाने पुस्तक मिळवतो आणि पुस्तक भन्नाट म्हणजे भन्नाटच निघतं. अशा वेळी पुस्तक नक्की वाचायला सांगणाऱ्याचे आभार कसे मानायचे तेही कळत नाही !
'निशाणी डावा अंगठा' या पुस्तकाबद्दल असं म्हणजे सेम असंच झालं !
आधी तर चक्क आप्पा बळवंत चौकात चार-पाच दुकानं फिरूनही ते पुस्तक मिळत नव्हतं. बरं, हातात फार वेळही नव्हता, त्यामुळे आता पुढच्या सुट्टीतच पुण्याला आल्यावर 'निशाणी....' वाचायला मिळणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. घरी येताना शेवटचा प्रयत्न म्हणून अत्रे सभागृहातल्या पुस्तक प्रदर्शनाबाहेर रिक्षा थांबवली. रिक्षावाल्यांना म्हटलं, "दोन मिनटांत अलोच". नुसतं आत जाऊन पुस्तक आहे का विचारायचं आणि नकार घेऊन परतायचं. दोन मिनटं खूप झाली की त्यासाठी ! आत गेल्यावर आश्चर्याचा धक्काच ना एकदम… चक्क पुस्तक मिळालं तिथे !
या कादंबरीच्या सुरूवातीला ओळी आहेत 'घटना व प्रसंग काल्पनिक वाटू नयेत इतक्या हुबेहूब गोष्टी आपल्या भोवताली घडत असतात, पात्रे काल्पनिक वाटू नयेत इतकी हुबेहूब माणसे भोवताली वावरत असतात.' एरवी आपल्याला वापरून गुळमुळीत झालेली वाक्यं वाचायची / पहायची सवय असते 'या कादंबरीतील पात्रे काल्पनिक असून......... योगायोग समजावा !' 'निशाणी…'च्या वेगळेपणाची ही पहिली खूण !!
गावांमधले 'प्रौढ साक्षरता अभियान' हा या कादंबरीचा विषय. 'निशाणी डावा अंगठा' .. काय पर्फेक्ट नाव आहे ना कादंबरीचं? 'रंगनाथ भास्कर डुकरे' हा गावाकडचा एक तरूण शिक्षक स्वेच्छेने (आणि स्वार्थासाठी !) अभियानात पूवेका (पूर्ण वेळ कार्यकर्ता) म्हणून नाव नोंदवतो. डुकरेच्या प्रवेशापासून आणि ’पूवेका’ म्हणून बदललेल्या कामाच्या स्वरूपातून उलगडत जातो 'निशाणी डावा अंगठा' नावाचा भन्नाट प्रकार. कादंबरीतला खूपसा भाग बोलीभाषेतला असल्याने, वाचताना जरी तो लहेजा पकडायला थोडा वेळ लागला तरी, कादंबरी जास्तच खुमासदार होते.
साक्षरता प्रसार अभियानातले घोळ हा विषय घेऊन एकूणच सरकारी व्यवस्थेचा भोंगळ कारभार, नोकरशाहीच्या अजब तऱ्हा, कागदी घोड्यांचे महत्व (आणि त्यांचे पराक्रम !), आकडेवारीचा बडेजाव, माणसांचे 'कातडी बचाओ' स्वभाव असे एक ना अनेक प्रकार गमतीजमतीतून दाखवले आहेत. 'निशाणी…'मधले साक्षरता अभियान म्हणजे एक प्रकारचा फार्सच म्हणाना.
शाब्दिक, प्रासंगिक, उपरोधिक, उपहासात्मक अशी विनोदाची वेगवेगळी रूपं आपल्याला ‘निशाणी…’मधून भेटायला येतात. रोजच्या जीवनात काही ठराविक घटना घडत असतात, आपण गृहित धरलेली काही ठराविक वाक्यं / शब्द असतात. रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं. नमुन्यादाखल बघा ….
>>>> गटशिक्षणाधिकारी खासबागेसाहेब ऑफिसात आले तेव्हा नेमके सहा वाजले होते. सूर्य आपला नेहमीसारखा चित्रातल्या दोन डोंगरांच्या मधात गडप झाला होता. पाखरंही नेहमीसारखी चारचे आकडे घेऊन घरट्याकडे परतत होती.
>>>> गध्याच्या मागून आणि साहेबाच्या पुढून कधी जाऊ नये. गधं लाथ मारतं आणि साहेब तोंड मारतं. दोन्ही गोष्टी लागल्या की माणसाले काही सुचत नाही.
>>>> आपल्याकडं कसं, आपण कम्प्युटरचा क्लास टाकला तरी सत्यनारायणाची पूजा करणार. घरी टीव्ही, फ्रिझ किंवा फोन घेतल्यावर त्याला हळद-कुंकू लावून, वाहून, नारळ फोडून शेरणी वाटणारे किंवा मोबाईल घेतल्यावर पहिला एस.एम.एस. देवाला करणारे लोक आपण.
काही ठिकाणी तर हसून हसून डोळ्यांत पाणी आलं तरी मूळ विषयाचं गांभीर्य सतत जाणवत राहतं…. चार्ली चॅप्लिनच्या विनोदासारखं ! बरं, मराठी भाषाही इतकी वळणदार आहे की शब्दाशब्दांतच विनोद दडलेला असतो. आता कुणी म्हणेल की हो, पण 'निशाणी…'त काही ठिकाणी अश्लील शब्द आणि अश्लील विनोद सहज वापरले आहेत. पण बोलीभाषेची तीच तर मजा असते. त्यात श्लील / अश्लील असं काही नसतंच.. असतं ते फक्त मनातले विचार सरळसोट पोचवणं. 'निशाणी डावा अंगठा'मधली अस्सल नमुनेदार पात्रं तेच तर करतात.
२००५ साली 'निशाणी डावा अंगठा' प्रकाशित झाली. गेल्या चार वर्षांत कादंबरीच्या एकूण पाच आवृत्ती निघाल्या आहेत ! 'निशाणी…' हा इतका अस्सल प्रकार आहे की माझी खात्री आहे आज कै. पु.ल. असते तर त्यांनी या कादंबरीचं आणि लेखकाचं भरपूर कौतुक केलं असतं.
परवा २२ तारखेला या कादंबरीवर आधारित मराठी सिनेमा झळकलाय -- 'निशाणी डावा अंगठा' याच नावाने. पुरूषोत्तम बेर्डे दिग्दर्शक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांना, अनुक्रमे त्या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार म्हणून, झी गौरव पुरस्कारही मिळालाय. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, संजय नार्वेकर असे एक से एक कलाकार या सिनेमात आहेत. मी कादंबरी तर तीन वेळा वाचलीय, आता वाट बघतोय सिनेमा पहायची -- 'निशाणी डावा अंगठा !'
खरच हे एक
खरच हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. भाउ, जावइ वगैरे टीम तर लै भारी. विशेष म्हणजे पुस्तकाच्या शेवटी वेग इतका सुरेख वाढवत नेला आहे. फारच सुंदर शैली आणि वेग आहे आहे ह्या पुस्तकाला.
अरे वा,
अरे वा, मस्त वाटतंय पुस्तक! संदीप, आता तुझ्याकडूनच उधार घेईन म्हणते वाचायला
कधी देतोस ते बोल? 
>> कधी देतोस
>> कधी देतोस ते बोल?
नक्की देईन पण आधीच ३/४ जण रांगेत आहेत !!
माझा क्लेम
माझा क्लेम लावून ठेव बरं. फार उत्सुकता लागलीये आता
संदीप,
संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.
पिक्चर ही चांगला आहे असे (बहुधा पुपुवर) वाचले. घ्यायलाच पाहिजे हे पुस्तक आता. 'अत्रे' मधे नुकतीच प्रसिद्ध/लोकप्रिय झालेली पुस्तके पुढे लावतात ती सर्व बघितली होती, त्यात दिसले नाही मागच्या एक दोन वेळेस.
मेरा
मेरा उधारीका नंबर कब आएगा?
बघुया, मला मिळतंय का भारतात.
अमोल, अत्रे
अमोल,
अत्रे मधे काउंटरवर चौकशी करायला सांग.. कदाचित मिळेल.
कोणी
कोणी लिहीले आहे हे पुस्तक?
लेखक आहेत
लेखक आहेत श्री. रमेश इंगळे-उत्रादकर
>> रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं. >>
धन्यवाद.
धन्यवाद.
कुठच्या कुठे ते!
श्री. रमेश इंगळे-उत्रादकरांच्या 'निशाणी डावा अंगठा' या पुस्तकाबद्दल असं म्हणजे सेम असंच झालं!
असे लिहायचे ना.
मलाही
मलाही लायनीत लाव रे भाउ.
मस्त.. मी
मस्त.. मी आता भारतात परत जाणारै या विकांताला.. आणि मॅजेस्टिकमध्ये पडीक रहाणार आहे!
भरपूर पुस्तके घ्ययची आहेत.. गेल्या ६ महिन्याचा पुस्तक उपास सोडायचा आहे..!
सध्या सगळेच सही पुस्तके सुचवत आहेत .. धन्यवाद संदीप!
शोनू,
शोनू, जोशीसाहेब, तुमच्याकडे रवाना होणार आहे ना हे पुस्तक.. कशाला उगीच दुसर्यांचे नंबर अडवताय
चित्रपटाब
चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवली भाऊ. पुस्तक वाचेन म्हणतोय. पाहू इथे मिळतय का ?
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
मलाही
मलाही शोधायला हव पुस्तक. उत्सुकता लागली आहे.
पुस्तक छान
पुस्तक छान असेलच. त्याबद्दल प्रश्नच नाही. पण संदीप मला तुझे परिक्षणही खूप आवडले. नेमके मुद्दे, सुरेख वर्णनशैली आणि समरसून केलेले लेखन यामुळे हा छोटासा लेखही अतिशय वाचनीय झाला आहे.
संदीप,
संदीप, खरेच आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. गेल्या वर्षी मायदेशातून येताना काही पुस्तके आणली त्यात हे व शाळाही आणले. डुकरेपासून सगळी पात्र इतकी झकास व चपखल आहेत . सिनेमाही छान झाला आहे. अगदी कालच माझ्या आईबाबांनी पाहिला. रमेश इंगळे-उत्रादकरांनी उभी केलेली पात्रे भन्नाट आहेत.
तुझे परिक्षण आवडले. ज्यांना याबद्दल काहीच माहित नसेल ते तुझ्या नेमक्या मुद्देसूद लेखाने वाचण्यास नक्की प्रवृत्त होतील.
टण्याशेट
टण्याशेट वा वा वा. तुमचे आभार माणावे तेवढे थोडेच.
रांगेतला
रांगेतला पुढचा नंबर माझा.
परागकण
माझे
माझे अश्विनिला अनुमोदन्...संदीपचे परिक्षणही सुरेख...मी प्रथम सिनेमा पाहीला (आम्हाला प्रिमिएर पाहायला मिळतो ना) आणि मग पुस्तक वाचले आणि पुन्हा एकदा सिनेमा पाहिला. दुसर्यान्दा पाह्ताना अगदि पुस्तकच वाचतेय असे वाटले.. पटकथेला काही वावच नव्ह्ता... मकरन्द्चा पुवेका (पुर्णवेळ कार्यकर्ता) आणि अशोक सराफ यान्चा भावड्या फार आवडला...कोणाला पुस्तक वाचायचे असेल तर माझ्यकडेही आहे बरे का
आणि हो
आणि हो निर्मिती सावन्तचा उल्लेख राहिलाच...रमेश इंगळे-उत्रादकरांनी कादम्बरीत उभ्या केलेल्या पात्राना या सर्व कलाकारान्नी उत्तम न्याय दिलाय.
छान लिहिले
छान लिहिले आहे परिक्षण. पुस्तक वाचलेच पाहिजे असं वाटून राहिलं...
माबो
माबो अॅडमिन,
हा लेख मुखपृष्ठावर ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद
हे पुस्तक
हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17122
वा! पुस्तक
वा! पुस्तक जसं च्या तसं अवतरलंय. फक्त "पोवाडा" चा प्रसंग पाहिजे होता. फर्मास!!
माधुरी वारियत