कोलाज

Submitted by दाद on 24 May, 2009 - 23:38

मैत्रिणीच्यात डोकावले मधे एकदा. पुढल्या दरवाजातून आत पाऊल टाकलं आणि जोरदार आवाजात सुचना मिळाली, ’मौशी (हं अशीच हाक मारते)... कशावरही पाय न देता बाजूऽऽऽऽऽने ये’.
तिची सूचना पाळायची म्हणजे मला हातांवर चालत किंवा पालीसारखं भिंतीवरून सरपटत आत जायला हवं.

मैत्रिणीची वीस वर्षाची लेक अख्ख्या हॉलभर कागदाच्या तुकड्यांचा पसारा घेऊन बसली होती. डोळे मोठ्ठे करीत "प्रोजेक्टय" एव्हढ्याच संक्षिप्तं स्वरूपात आपल्या अतीमहत्वाच्या, प्रोजेक्टबद्दल मला सावधान करून ती पुन्हा विचारात गढली.

मधे एक मोठ्ठा पांढरा जाड कागद, आजूबाजूला मासिकातून, वर्तमानपत्रातून, पुस्तकांमधून कापून काढलेले, कागदाचे असंख्य तुकडे. मधला पांढरा कागदही बराचसा कसल्या कसल्या तुकड्यांनी आधीच शोभित.. का विशोभित?

जमेल तिथे फक्तं चवडे टेकत मी जेव्हा आतल्या दाराशी पोचले तेव्हा तिथे तिष्ठत उभी सखी दिसली.
मी विचारायच्या आधीच तिचं सुरूही झालं, ’काही विचारू नकोस. वैताग झालाय, गेले चार दिवस. पुढली खोली वापरताच येत नाहीये. तुला म्हणून येऊ दिलन. आम्हाला मागचच दार वापरावं लागतय... आम्हालाच चिकटव म्हणावं आता कुठेतरी म्हणजे हलायला नको. अगं परवा ह्यांच्या पायाला चिकटून कायतरी एक... चिटोरं आलं ह्या खोलीत.. तर अर्धा तास हैदोस. माझं मुंडकं कुठंय म्हणून...’

मला खरंतर हसू येत होतं पण, मारच खाल्ला असता म्हणून गंभीर चेहर्‍याने सगळं ऐकून घेतलं. पण कोलाज म्हणजे नक्की काय घडवणं चाललय ते जाणून घ्यायची जबरदस्तं उत्सुकता काही स्वस्थं बसू देईना. आमचं मैत्रिणींचं काय ते गुज संपल्यावर तिच्या लेकीला हाक मारली.

’तू इथे येतेयस की, मी तिथे येऊ?’... मी अल्टिमेटमच दिला.

तेव्हा मग, हळूच दार लोटून अस्ताव्यस्तं केसांच्या झिपर्‍या, तारवटलेले, सुजलेले डोळे, थकलेले खांदे असलं घेऊन बाईसाहेब स्वयंपाकघरात आल्या.

’सॉरी मौशी... खूप वैतागलेय..... बाय द वे... हाव आर यू?’

चार-पाच दिवसांत पहिल्यांदाच जरा शुद्धीवर येऊन बोलणार्‍या लेकीकडे मैत्रिणीने आधी डोळे विस्फारून बघितलं आणि काही न बोलता, समोर अजून एक चहाचा कप आणि खायला आणून ठेवलं.

’कोलाज म्हणजे काय गं? ते तुकडे तुकडे जोडून नक्की काय बनवायचं चाललय?’, मी अतिशय सरळपणाने विचारलेला प्रश्नं कुठेतरी पोचला असावा.

समोरच्या बाऊलमधल्या उपम्यात बुडलेले डोळे वर झाले आणि चक्कं हसली.
’तीच तर गंम्मत आहे ना, मौशी. नक्की काय करायचय ते असं शब्दांत सांगत आलं तर त्याला कोलाज कसं म्हणणार?’

’हे तुमचं मॉडर्न आर्ट म्हणजे भलतच सुखाचं. नक्की काय ते सांगत येत नाही, शब्दांत... पण आहे काहीतरी... तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही मॉडर्न नाही.... असं म्हटलं का झालं काय?’, मी तिढा घातला.

’ए, कायतरी बोलू नकोस. इट्स नॉट लाइक दॅट. शेवटी मला काय दाखवायचय, एकूण काय इफेक्ट यायला हवाय ते माझ्या कल्पनेत आहे. आणि माझ्याकडे असलेल्या तुकड्यांमधूनच मला ते तयार करायचय. अ‍ॅटलिस्ट, जितकं त्या कल्पनेच्या जवळ जाता येईल तितकं. पण हातात असलेल्या तुकड्यांमधूनच हं’
तिनं बर्‍यापैकी समजावून सांगायचा प्रयत्नं केला. पण माझा चेहरा, आल्जिब्राचं समजून कॅल्क्युलसच्या लेक्चरला बसल्यासारखा, ’समजतय असं वाटतय पण माहिती आहे की नक्की समजलेलंच नाही’, अशा टाईपचा झाला.

तिनं हातातला घास तस्सा बाऊलमधे सांडला. ’इकडे ये, दाखवते तुला.’ म्हणत मला त्या खोलीत घेऊन गेली. तिने जिथे जिथे पाय ठेवला तिथे तिथे बिनदिक्कत ठेवत गेल्याने निर्वेधपणे तिच्या त्या पसारा-केंद्रापाशी पोचले.

उजवीकडच्या खिडकीतून संध्याकाळची मऊ किरणं आत आली होती.
’इथे उभी राहून बघ. काय वाटतं? ह्या डावीकडून असं सगळं.. म्हणजे सगळंच... आकार, रंगांची इंटेन्सिटी... असं चढत जातय... असं वाटत नाही? असं असं?’, हातवारे करीत ती, शब्दातीत जे, ते दाखवायचा प्रयत्नं करीत होती.

"आता बघ, इथे 'हा' तुकडा न ठेवता 'तो' ठेवता आला असता... पण ते बरोबर नाही", तिने एका हाताचं एक बोट चित्रातल्या तुकड्यावर आणि दुसर्‍या हाताने त्या पसार्‍यातल्या एका तुकड्याकडे बोट दाखवीत म्हटलं.

"काय फरक पडतो?" असं मी मनातल्या मनातच म्हटलं.

मला खरतर त्यातलं काहीही, अगदी डोळे फाडफाडून, आठ्या-बिठ्या घालूनही दिसेना. त्या आयताकृती कागदाच्या उजव्या दिशेने सगळ्या तुकड्यांची गर्दी होत गेलेली दिसत होती. अलोट गर्दी एखाद्या कड्याशी येऊन तटावी तसं... तटकन तुटतच होतं तिथे. उजवीकडचा भाग अजून रिकामाच होता. तो एक... विसरून राहून गेल्यासारखा, रिकामा, जरा विचित्र दिसत होता, हे खरं. ह्याव्यतिरिक्तं तिला काय दाखवायचय ते कळेना. आपल्याला "ती" दृष्टी नाही, हा साक्षात्कार व्हायला मोजून अर्धं मिनिट पुरलं.

मग अशावेळी आपण मोठी माणसं काय करतो? गाढवपणा! तोच मी ही केला.

’हो, हो... खरच की गं... वा वा... ह्याला म्हणतात होय... कोलाज? हं... छानय की रंग-बिंग... त्या उरलेल्या भागात अजून काही चिकटवलस का... झालंच की, तुझं कोलाज पूर्णं!’

ती बोलली काहीच नाही... कोलाजकडे बघून हसली फक्तं... माझ्याकडे बघितलनही नाही... तरी मला कळून चुकलं.

घरी आले पण त्या कोलाजने पाठ सोडली नाही. घरी येता येता, मग प्रत्येक गोष्टीत कोलाज दिसायला लागलं. ते समोरचं झाड अजून थोडं झुकलं तर?, तो ढग इथे नको... जरा अजून उजवीकडे असता तर?, पानात पोळी अश्शी ठेवली तर?
कोलाजचा भुंगा डोक्यात फिरायला लागला.
********************************************
आपलं आयुष्यसुद्धा एक कोलाजच नाही का? मात्रं बनवणारा "तो"! आपण नाही!
एकासारखं दुसरं नाही. प्रत्येकाच्या आयुष्याचं कोलाज ही, त्याच्या हातून घडलेली एक सुंदर, तरी अजोड कलाकृती.

त्याच्याही हातात सगळंच नाही. आपण आपली कर्मं करीत जायचं. आपसूक त्याच्या हाती एक एक तुकडा येत जातो. तो कुठे, कसा ठेवायचा हा सर्वथा त्याचाच फुलवरा. तुकडे कसेही हाती येवोत, त्यातून एक अर्थपूर्णं कोलाज निर्माण करण्यासाठी आपली सारी कला पणाला लावतो, तो! कलाकारांचा कलाकार!

आपण आपल्या किंवा दुसर्‍यांच्या आयुष्यातले दोन-पाच तुकडे बघतो आणि म्हणतो... एकूण आयुष्यं सार्थकी लागलं, अगदी भरून पावलं... किंवा, भिक्कार आहे आयुष्यं. अगदी शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असला भोग!

त्याला दिसतय तस्सं... आपलं अख्खं आयुष्यं, त्यातल्या सगळ्या तुकड्यांसहं... आपली-परकी माणसं, काही घडणं-न घडणं, आणि मधली उसंत, ते ही स्थळ-काळ सापेक्ष... हे सगळं, "त्याला दिसतय तस्सं" आपल्याला दिसायला हवं. इतकच नव्हे तर, आपल्या ह्या आयुष्यातल्या कोलाजवर न ठेवता त्यानं, "आता नको, मग" असं म्हणून, बाजूला ठेवलेले तुकडेही दिसायला हवेत.

त्याशिवाय, हे आयुष्यं समजून घ्यायचं तर, आपल्याच आयुष्याकडे बघण्यासाठी हवी... "त्या"ची दृष्टी!
एखादा तुकडा इथेच का, हाच तुकडा का... असल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्या मैत्रिणीच्या लेकीची दृष्टीसारखीच "त्या"ची ती प्रगल्भ नजर हवी.
त्याची "ती" समदृष्टी हवी! प्रत्येक जीवात्म्यावर त्यानं सारखाच जीव ओतून केलेलं प्रेम आणि म्हणूनच मनापासून घडवलेलं प्रत्येक आयुष्यं, प्रत्येक कोलाज!

विचार करायला लागले आणि जाणवलं, सोप्पं नाही त्याचं काम! त्याच्या वंशाला जाऊ तेव्हा कळतील सृजनाच्या त्याच्या वेदना.

माझ्या मैत्रिणीच्या लेकीसारखा तो ही बसला असणार...
आपणच त्याच्या हाती दिलेले असंख्य गत कर्मांचे तुकडे अवती-भवती घेऊन. हाती घ्यायच्या प्रत्येक आयुष्याचा मूळ कागद... मोठ्या आस्थेने उचलून घेत असेल. त्यावर स्वहस्ते लिहीत असेल...
॥ श्री ॥
अन मग लागत असेल कामाला. एकेक तुकडा जोडीत कोलाज बनवण्याच्या. एखादा तुकडा एखाद्या विशिष्टं जागी ठेवताना कळवळला असेल, स्वत:शीच... अन पुढचाच तुकडा त्याच्या हाती येताच, मऊ मवाळ चांदण्याचं हसू सांडलं असेल.

एखाद्या कोलाजवर... मूळ कागद अजून शिल्लक असतानाच, थांबला असेल! ह्या कोलाजवर साजेल असा तुकडा नाही म्हणून. अन अपूर्णं राहिल्यासारखं, अर्ध्यावर सोडून, उठून गेल्यासारखं... तसाच, मोकळा ठेवला असेल... आयुष्याचा उरलेला मूळ कागद... बस्स!
कलाकारांच्या ह्या कलाकाराला ह्या कलाकृतीत हेच आणि इतकच व्यक्तं करायचय!

अन, एकदा का मनासारखं उतरलं की, प्रत्येक कोलाजवर आपली सहीही ठोकत असेल.

अशाच.... एखाद्या सुदिनी, सुवेळास, प्रसन्नं मनाने हाती घेतला असेल असाच एखादा... आकाशासारखा निरभ्रं, मूळ चित्त-पट. त्यावर नेहमीच्या सवयीने आधी लिहिलं असेल...
॥श्री॥
अन... थक्कित होईल! की शोधू जाता, एकही तुकडा हाती येऊ नये... समाधानाचा निश्वास टाकीत, ते विलीन करता करता...
आजूबाजूला पसरलेली इतर अनेक कोलाज दिसली असतील... गर्दटलेली, गिचमिडलेली, केविलवाणी...

काही दृढ निश्चय करून परत एकदा नीट पसरला असेल तो उजळला चित्त-पट. एक दीर्घ श्वास घेतला असेल आणि त्याच्या अंगुलीतून उमटली असतील शुभाक्षरं....
ज्ञानेश्वरी!
हे तुमचे करणे!

क्षणात परत अनावर प्रेमाने, मृदू, हळवा हळवा होत, आपले सजल नेत्रं मिटून घेत... ओठ टेकवले असतील... जिथे नेहमी सही करतो तिथे...

अशा कोलाजला मग चिकटून रहातं....

...कोवळं चांदण्याचं हसू, तापहीन मार्तंडाचं तेज, अगदी इवला अष्टगंधाचा सुगंध, अन... असं बरच काही!

-- समाप्तं

गुलमोहर: 

>>> माझ्या मैत्रिणीच्या लेकीसारखा तो ही बसला असणार...

वा! वा! फारच छान Happy

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

सुरेख, तुझ्या लिखाणाला दाद द्यायला खरच शब्दच नसतात. खुप छान... Happy
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

'वेड लावणारच' लिहायच ह्या नियमात बांधून घेतलयस का दाद? Happy
ज्ञानेश्वरी!...
कलाकारांच्या ह्या कलाकाराला ह्या कलाकृतीत हेच आणि इतकच व्यक्तं करायचय!... काय लिहायच ह्यावर!!! जियो!

क्या बात है!!!! जियो!!!!

========================
बस एवढंच!!

दाद, एकदम दिल से दिल तक पोचलं.सहीच ! आवडलं मला.
"आपणच ते तुकडे त्याला देत असतो" हे खूप खूप आवडलं. क्या बात है!

फक्त आणि फक्त दादच लिहू शकते इतकं सहज आणि हृदयाला साद घालणारं!!!!
--------------
नंदिनी
--------------

सुरेख, खुपच छान.
मला तुमचे सगळे लेखन आवडते.
धनश्री.

सुंदर!
------------------------------------------------------------------------------
It is absurd to divide people into good and bad. People are either charming or tedious.

<<आपलं आयुष्यसुद्धा एक कोलाजच नाही >> अगदि खरय! खुप छान लिहिलय.

व्वा, व्वा! फारच छान. अगदी मनाला भिडले सारे. कवितेला जसे महिन्यातील उत्कृष्ट कविता हा किताब देतात, तसे महिन्यातली उत्कृष्ट् ललित असा याला मान द्यायला पाहिजे.
कोलाज मधून आयुष्याकडे बघण्याचा विचार उत्तम. काही उपनिषदे वाचायला नकोत. आयुष्याचा अर्थ कळतो नुसते तुमचा लेख वाचून.

नंदिनी, झक्की यांना अनुमोदन !
दाद, खरच शब्दच नाही उरत दाद द्यायला !!
Happy
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

खरंय दाद. अगदि खर आहे.
अतिशय सुंदर.
झक्किंना पूर्ण अनुमोदन.

दाद- तुमची शैली सहज, रसाळ, सौंदर्यासक्त आहे.

खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचेच. झक्कीदा, फार मोठा मान दिलात.... नकोच इतकं ओझं. उपनिषदांतलं आयुष्याचं तत्वज्ञान सागराइतकं आहे... मी एक शिंतोडा, एक थेंब निरखण्याचा... अन तो सुद्धा प्रयत्नं केलाय फक्तं. (भाषा मात्रं आपली-तुपली).

हा लेख लिहून झालेत काही महिने. माझ्यामते कागदावरलं कोलाज आणि माझ्या मनातल्या विचारांतून पुढे आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्नं ह्या दोन गोष्टी तळ्यात्-मळ्यात इतक्या वेगळ्या दिसत होत्या. एकीतून दुसरीकडे झालेला माझ्या विचारांचा प्रवास काही मनासारखा उतरला नाही म्हणून इथे पोस्टायचा ठेवला होता. (माझ्या मनासारखा अजूनही ह्या लेखात उतरलेला नाही.)
असो... पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे.

दाद
तुम्ही खुपच छान लिहितात, तुम्हाला काय व्यक्त करायचय ते सहज सोप्या पण वेधक शब्दात माडंतात!!!

दाद, नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण आहे.

परत एकदा सुन्दर अनुभव..
इट्स देजावु ऑल ओव्हर अगेन.. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

शलाकाताई,
कोलाज, 'तो' आणि 'त्याचं कोलाज' ह्यांची गुंफण इतकी सुरेख बांधलीयत की समोर असतात तर नक्की तुम्हाला वाकून नमस्कार केला असता. खरंच सांगतोय... उगीच बढवून्/चढवून नाही.
या पेक्षा योग्य प्रतिसाद आत्तातरी सुचत नाहीये !

आपलं आयुष्यसुद्धा एक कोलाजच नाही का? मात्रं बनवणारा "तो"! आपण नाही!
एकासारखं दुसरं नाही. प्रत्येकाच्या आयुष्याचं कोलाज ही, त्याच्या हातून घडलेली एक सुंदर, तरी अजोड कलाकृती.

त्याच्याही हातात सगळंच नाही. आपण आपली कर्मं करीत जायचं. आपसूक त्याच्या हाती एक एक तुकडा येत जातो. तो कुठे, कसा ठेवायचा हा सर्वथा त्याचाच फुलवरा. तुकडे कसेही हाती येवोत, त्यातून एक अर्थपूर्णं कोलाज निर्माण करण्यासाठी आपली सारी कला पणाला लावतो, तो! कलाकारांचा कलाकार!

>>>>>>>>>>>>>>

दाद, कसलं सुरेख लिहिले आहे ! कड्डक सॅल्युट तुम्हाला Happy

काही उपनिषदे वाचायला नकोत. आयुष्याचा अर्थ कळतो नुसते तुमचा लेख वाचून.
>>>>>>>>> अगदी अगदी ! Happy

वि.स.खांडेकरांचा "दोन मेणबत्या" हा लघुनिबंध आठवला.तुमचे ललित वाचुन ! Happy
(बाय द वे, ललित आणि लघुनिबंध हे वेगळे साहित्यप्रकार आहेत कि एकच? )

आयुष्य कोलाज, बनवणारा या कल्पना चान्गल्या आहेत. थोडा फापटपसारा झालाय.
थक्कित - म्हन्जे काय? असा शब्द आहे?

Pages