करोना पूर्व दंतकथा

Submitted by भाऊसाहेब. on 11 August, 2021 - 02:34

करोनापूर्व दंतकथा.
परवाची गोष्ट ,अगदी परवाची.
दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताचे दुखणे घेऊन.
संध्याकाळी सात।साडेसात ची वेळ

दवाखान्यात बर्यापैकी गर्दी होती.
प्रतिक्षालयात पंधरा।वीस लोक बसलेले.रुग्ण (दंताळू) व सोबतचे( सांभाळू ) धरुन
दोन तीन चिमुरडे पण.
चेहऱ्यावर च्या करुण भावा वरून रुग्ण कोण ते सहज ओळखू येत होते. 'मेरा नंबर कब आयेगा ?'
असा प्रश्न मनात घेवून ,तोच अधुनमधून रीसेप्शनिस्टला विचारत,
मी बसलेलो .
गर्दी असली की बरं वाटतं एकटेपणा जाणवत नाही.कुणीतरी सोबत आहे ही भावनाच उभारी देतै मनाला .असे विचार मनात ये होते.क्षणाचे का असेना हे सोबती होते माझे.
मन उचंबळून की काय म्हणतात तसं आलं.
उतनाही उपकार समझ 'कोई जितना साथ निभाए ,' साहीर च्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या.
काही दुखत असलं की असलं काही तरी उदात्त वगैरे दाटून यायची मनाला सवय झाली आहे।.इथेतर दाढदुखी होती.

किमान अर्धा तास होता. जमलेल्यांपैकी
ऐंशी टक्के जनता ( दंताळू व सांभाळू मिळून ) आपापल्या माना
खाली घालून आपापल्या मोबाईल मधे मग्न होते.
व्हाटसअप ,फेसबुक ,च्याटींग,कॉलींग
स्क्रोलींग वगैरे सुरु होते.

फोनवरबोलणे .पण कुजबुजीचे स्वरात. वा: इतरांना त्रास होउ नये
याचे भान येतयं समाजात.एक सुखद
विचार डोकावला. एवढ्यात कुणाचा तरी मोबाईल किंचाळला. मग मोबाईल चा मालक पण मोबाईल वर जोरजोरात वादू लागला. बसलेले करवादले. क्लिनीक मधील
दोन्ही रीसेप्शनिस्टपैकी
एकजण ,आपले काम सांभाळून ,मोबाईल वर गेम खेळायची कसरत करत होती .तिने मोबाईल मधून मान वर करून त्याला शूकशूक केले. मग त्याचा स्वर खाली आला.
दोन छोटे ,मोबाईल वर कार्टून पाहात होते. आणि त्यांचे मायबाप लेकरांचे कौतूक बघून सुखावत होते .लहान वयात किती सफाई ने मोबाईल ऑपरेट करतोय.मोठा झाल्यावर नक्कीच तो कोण जॉब्स का गेट त्याच्या सारखा होउ शकतो.असे भाव चेह-यावर दिसत होते.
अधुनमधून कुठला आवाज आला,बोलावणे आले ,तर मोबाईल मग्नांचे तेवढ्यापुरते डोके वर व्हायचे. आपल्याशी संबंधित नाही कळल्यावर पून्हा माना खाली व्हायच्या.
काहीवेळाने काही जण कंटाळून आपापले मोबाईल चाळून खिशात वा हातात नुसतेच ठेवलेले होते
अधूनमधून कुणाच्या तरी मोबाईल ची रींगटोन वाजायची वा सिग्नल यायचा. लगेच बहुतेक जण जणुकाही आपल्यालाच कॉल,मेसेज आहे वाटून मोबाईल तत्परतेने पाहूनघ्यायचे व पून्हा जागेवर ठेवायचे.
बहुतेक सारे आत्ममग्नवा मोबाईल मग्न होते.
जे या आत्मानंदात विलीन नव्हते ते इकडे तिकडे पाहात ,कधी बाहेर चकरा मारत वेळ काढत होते.
ज्यांचे नंबर आले ते आत जात होते.त्यांच्या जागी नवीन लोक येत होते पण एकंदरीत देखाव्यात फारसा फरक पडत नव्हता.या सगळ्या कडे पाहात माझाही वेळ चांगला जात होता.
एक आजीबाई या सगळ्याकडे, मनातल्या मनात ' काय मेलं खूळ ते! आमच्या वेळी असलं नव्हते ' असे मनात म्हणत सर्वांवर नजर टाकत होत्या.माझी त्यांची नजरानजर होताच ,मी त्यांच्या मनीचे भाव बरोबर आहेत असे हास्याने दाखविले .त्या ही अंतरीची खूण पटल्या सारखे हसल्या.
एवढावेळ प्रतिक्षालयातल्या टीव्हीवर बातम्या सुरु होत्या.

रोजचेच दळण ते.परत सकाळपासून रात्री पर्यंत चालूच .असून असून वेगळे ते तरी काय काय दाखवणार वा सांगणार?
अपघात, अतिवृष्टी,पूर,दुष्काळ,बळीराजा सुखावला,वा पावसाच्या प्रतिक्षेत, दुबार पेरणीचे संकट,दुर्घटना,तोडफोड
,जाळपोळ,नुकसान ,संप,रस्तारोको,।शेतकर्यांच्या आत्महत्या,पेट्रोल डिझेलची भाववाढ,राज्यकर्त्यांच्या केलेल्या (?) कामा बद्दलच्या फुशारक्या,विरोधकांचे नाकर्तेपणा चेआरोप ,वेगवेगळ्या कामातले,संस्था तले भ्रष्टाचार, आरोपींचे पलायन, रुपयाची घसरण,अतिरेकी हल्ले,नटनट्यांचे एकमेकांवरचे आरोप,तेच ते अन तेच ते.
लोक अधुनमधून टीव्ही वर द्रष्टीक्षेप टाकत होते.मग आपला याच्याशी काही संबंध नाही हे जाणून पून्हा आपल्या कामाकडे वळत होते.
एवढ्यात आठ वाजले.
रीसेप्शनिस्टने एकदम भानावर आल्या सारखं मोबाईल बाजूला करुन रीमोट ने च्यानेल बदलला.शिर्षकगीत सुरू झाले अन्, मोबाईल मग्न मंडळीपैकी अनेकांचे कान टवकारले.
'कोणाच्या तरी बायकोच्या नवरा 'की नवर्याची बायको 'नावाची मालिका सुरु झाली होती .
बहुतेक जणांचे डोळे मोबाईल वरून टीव्हीकडे वळले.
आता अर्धातास तरी ,ही मालिका संपेपर्यंत , डॉक्टरांनी बोलावू नये असे अंतरीचे भाव अनेकांच्या चेहर्यावर उमटले होते.
एवढ्यात मला डॉक्टरांचे बोलावणे आले .मग मी माझ्या या सर्व क्षणिक सोबत्यांचा मनोमनी निरोप घेउन,दाताचे दुखणे कायमचे मिटविण्याचे आशेने डॉक्टरांच्या कक्षात गेलो.
नीलकंठ देशमुख

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults