हसरं फूल

Submitted by फूल on 30 May, 2021 - 04:55

सगळे दात दाखवून अगदी उन्हासारखं झगझगीत हसायची ती. छोटेसे मानेपर्यंत कापलेले कुरळे पण काळेभोर केस दोन्ही कानामागे तर्जनीने सरकवत राहणे हा चाळाच मुळी. तिच्या गोऱ्यापान तुकतुकीत कपाळावर महिरपीसारखे दिसायचे ते केस. दौतीत बुडवून सरळ लिहायला सुरू करावं असं टोकदार, धारदार नाक. काळेभोर आणि पाणीदार डोळे. इवलीशी जिवणी आणि त्याखाली त्याहून इवली हनुवटी. डाव्या गालाला खळी पडायची तिच्या. उंच, सडपातळ बांधा. चेहऱ्यावर कायमच निर्भीड, करारी भाव. माझ्या समोरच्या टेबलावर दोन-तीन भली थोरली पुस्तकं घेऊन नोट्स काढत बसलेली असायची. उजव्या हाताने पुस्तकाचं पान उलटायला घेतलं की डाव्या हाताने डाव्या कानामागे केस सरकवायचे आणि पान संपूर्ण उलटलं की उजव्या हाताने उजव्या कानामागे. हे जवळ जवळ प्रत्येक पानाला. निमुळत्या हाताच्या लांबसडक बोटांनी ती काहीही करत असली तरी काहीतरी कुसरीचं नाजूक घडवतेय असंच वाटायचं. तिच्याकडे एक गोडुली पेन्सिल केस होती. त्यावर इटुकली जांभळ्या फुलांची नक्षी... त्या रंगाचं आणि त्या इटुक फुलांचं वेड तिच्यात ठायी ठायी दिसायचं. कधी तिचा स्कार्फ, कधी हातरूमाल, कधी अंगात घातलेला ड्रेस, कुठून ना कुठून तरी ती इटुक फुलं डोकावायचीच. तिच्याकडे बघून नेहमी वाटायचं ही चवी-चवीने जगत असणार तिचं आयुष्य.

माझी भली-थोरली पुस्तकं घेऊन मी लायब्ररीत माझ्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसले की आपल्या पुस्तकांची मांडामांड करताना एकदा समोर मांडलेला देखावा बघून घ्यावा, आजच्या देखाव्यातला जांभळा रंग किंवा चिमुकली फुलं कुठं दिसतायत ते निरखावं, तिचं कानामागे केस सरकवणं बघावं, आपल्या निरीक्षणशक्तीवर आपणच खूष व्हावं, इतक्यात तिनं आपल्याकडे बघावं, तिच्याही ओठावर नेहमीचं, ओळखीचं हसू फुटावं आणि मग पुस्तकात डोकं घालावं हे निदान पंधराएक दिवस तरी नित्यनेमाने घडत होतं.

एक दिवस ती स्वत:हून उठून माझ्या टेबलावर माझ्यासमोर येऊन बसली. “ती समोरची खिडकी थेट माझ्या अंगावर वारा सोडतेय बघ नं, माझ्या पुस्तकाची पानं, माझे केस सगळंच उडवतोय वारा, त्याला चुकवून इथं येऊन बसतेय.” मी उत्तरादाखल नुसतीच हसले. पण माझ्या डोळ्यातलं आश्चर्य लपलं नव्हतं बहुधा. सिडनीतल्या त्या लायब्ररीमध्ये माझं नाव, गाव, फळ, फूल काहीच माहित नसताना या बाई माझ्याशी मराठीत बोलत होत्या. इतके मराठमोळे भाव आहेत का माझ्या चेहऱ्यावर की हिला मी मराठीच आहे अशी खात्रीच पटली. नुकतं लग्नं झालेलं, नवलाईचे दिवस होते ते त्यामुळे गळ्यात मंगळसूत्र होतं माझ्या. पण म्हणून मी मराठीच आहे हा शोध कसा काय लावला हिनं? माझ्या डोळ्यातल्या या असंख्य प्रश्नांना तिने डोळ्यानेच उत्तर दिलं... हसून फक्त माझ्या भल्या-थोरल्या पुस्तकाच्या वरच्या बाजूला पाहिलं तिनं... कधीतरी उगाच चाळा म्हणून मीच मोठ्या अक्षरात मार्करने पुस्तकाच्या वरच्या बाजूला सगळी पानं एकत्र धरून माझं संपूर्ण नाव लिहिलं होतं मराठीत. मी टेबलावर पुस्तक ठेवून वाचताना तिनं माझं नाव अनेकदा वाचलं असणार. मी कपाळाला हात लावून हसले.

आम्ही लायब्ररीच्या क्वायेट सेक्शन मध्ये बसायचो. ऑस्ट्रेलियात लायब्ररीच्या क्वायेट सेक्शनमध्ये शिंक येणं हाही गुन्हा होता. म्हणून पुढे काही न बोलताच तिनं तिच्या uniचं आयडी दाखवलं आणि हात पुढे केला. मीही माझं आयडी दाखवलं आणि हात मिळवला. तिच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मला दाखवून कसला अभ्यास करतेय ते दाखवलं तिने. गायनॉकोलॉजी, ऑबस्टेट्रिक्स असल्या विषयांची पुस्तकं होती तिची. मग मीही तिला माझी cpa ची पुस्तकं दाखवली. खरंतर कोण बाई? कुठली तू? असले अनेक प्रश्न तोंडाबाहेर निसटायला बघत होते पण आमच्या एवढ्या बोलण्यानेही डिस्टर्ब झालेली आसपासची तीन-चार टाळकी चुकचुकली. नाईलाजाने आम्ही दोघींनी गडबडीने आपापल्या पुस्तकात डोकं घातलं.

त्यानंतर आम्ही दोघी नियमित एकाच टेबलावर बसू लागलो. एकमेकींसाठी जागा अडवू लागलो. इटुक फुलांच्या आणि जांभळ्या रंगाच्या सोबतीला तिचा आवडीचा मोगराही नाकाला जाणवायचा रोज. इवल्याश्या डबीत दहा-बारा बदामाचे तुकडे आणि दहाबारा काळ्या मनुका घेऊन यायची ती. पलिकडच्या टेबलावर बसायची तेव्हा तिच्या आणि पुस्तकाच्या मध्ये ती डबी ठेवलेली असायची. माझ्या टेबलावर बसायला आल्यावर तिने मलाही तो सुकामेवा दिला. मी माझ्याजवळचे चणे पुढे केले. तर दोन्ही हात कानशिलावर मोडून “शहाणी गं माझी बाय ती”असलं काहीतरी पुटपुटली. माझ्या चण्यांची सगळीच्या सगळी डबीच उचलून तिने तिच्या आणि पुस्तकाच्या मध्ये ठेवली आणि डोळे मिचकावत हसली...

तिचं सगळंच नेटकं असायचं... एकसारख्या झिजलेल्या आणि धारदार टोक काढून ठेवलेल्या तिच्या पेन्सिलकेस मधल्या पेन्सिली, एकाच बाजूने झिजलेलं खोडरबर, पेन्सिल केसच्या बाजूलाच हाताचं घड्याळ काढून ठेवायची. आणि घड्याळाच्या बाजूला एक टिशूपेपर. तेही नेटकं... सगळं सरळ रेषेत मांडून ठेवलेलं असायचं. वाचण्याच्या नादात कशालाही धक्का लागलाच तर लगेच ते नीट करून ठेवायची.

एकदिवस तिनं निघायच्या आधी माझ्या पुस्तकावर एक टिशूपेपर ठेवला आणि माझ्याकडे बघून डोळे मिचकावले. बघितलं तर त्यावर काहीतरी लिहिलं होतं तिनं. मी चिठ्ठी तात्काळ उघडून वाचली. सुवाच्च... वाटोळे, सरळ, मोकळे का काय म्हणतात ते सगळे गुण तिच्या अक्षराला लागू होते...

भेटूयाकी गं एकदा या लायब्ररीबाहेर. उद्या काय करत्येस? पाव-उणे-चार... उजव्या हाताच्या खिडकीतला तो जांभळा गुलमोहोर... तिथे... तुझी मी... वाटं पहाते... वाटं पहाते.

आणि खाली स्मायलेच्याऐवजी एक इटूक हसरं फूल. त्या खिडकीतल्या जाकॅरांडाकडे आम्ही दोघी रोज आलटून पालटून बघत असू. तोच तो जांभळा गुलमोहर. माझी चिठ्ठी वाचून होईतोवर ती क्वाएट सेक्शनच्या दरवाज्यापर्यंत पोचली होती. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतानाच तिने वळून पाहिलं... मी थंब्स अप केलं पुन्हा तिने डोळे मिचकावले.

दुसऱ्या दिवशी पाचेक मिनिटं आधीच पोचले मी त्या जांभळ्या गुलमोहराखाली. तिच्याच चिठ्ठीतल्या ओळी गुणगुणत बसले होते. हर्षाचा जल्लोष करूनी जेथे प्रीत नदीची एकरुपते... “मस्तय नं गाणं हे... माझ्या मम्माला खूप आवडायचं...” लिंबाच्या रंगाच्या सिल्कीश ड्रेसवर मूठभर जांभळ्या रंगाची इवली फुलं उधळावी तसलं प्रसन्न ल्याली होती ती आणि ओठावर तेच नेहमीचं सोनमाखलं हसू... आम्ही मिठीच मारली एकमेकिंना. त्या जाकॅरांडाच्या कट्ट्यावरच बसलो.

“आवडायचं म्हणजे?”

“ती निघून गेली अगं... मी खूप लहान असताना... देवाघरी का अजून कुठे देवच जाणे...”

“का अजून कुठे म्हणजे?” मी कळूनसुद्धा बावळटासारखं पुन्हा विचारलं...

“ते असं जातात म्हणे कुठे देवाघरी वगैरे... मला काय नक्की माहित नाही...”

काय बोलावं ते न सुचून मी उगाच कपाळ खाजवल्यासारखं केलं आणि नाकाच्या शेंड्यावरून तर्जनी फिरवली.

“ए तुला माहितीये तू असं नेहमी करतेस. तुझ्या पुस्तकाचं प्रत्येक पान उलटताना.” दोन्ही हातांनी स्वत:चे केस कानामागे करत ती म्हणाली... मी हसले आणि म्हणाले...

“आयाम सो सॉरी टू हिअर आबाऊट युवर मम..”

“चल गं... मी इतकी लहान होते की मला आठवतही नाही माझी मम्मा.. बाबा मस्तय... तोच मग मम्मा झाला... आणि जोडीला आज्जी... ती बाबा झाली माझा...तिकडे भारतातल्या घरात ती दोघं आणि इथे मी लिव्ह-इनमध्ये राहते माझ्या बॉयफ्रेंडबरोबर. तुझ्या घरी कोण कोण असतं?”

मला एकावर एक धक्के बसत होते. चौकटीतलं आयुष्य जगलेली मी. आई-वडलांची एकुलती एक लेक. देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने झालेलं लग्नं आणि त्याच कुंकवाच्या धन्याबरोबर आयुष्यातलं पहिलं-वहिलं परदेशगमन. हे चौकटीबाहेरचे किस्से कायम कुणाच्या कुणाचे. माझ्या जवळच्यांच्या परिघात अश्या चौकटीबाहेरच्या आयुष्यांना फक्त मैत्रिणींबरोबर मारायच्या गप्पांत जागा होती.

“माझं आत्ताच चार महिन्यांपूर्वी लग्नं झालं. नवरा आधीपासूनच शिकत होता इथे राहून. मी लग्नं झाल्यावर आले. भारतात जवळचे असे माझे आई-बाबा आणि सासू-सासरे. सख्खी भावंडं आम्हाला दोघानाही नाहीत.”

“अरे वा मस्त... म्हणजे तुम्ही दोघंसुध्दा एकुलती एक... माझ्यासारखी...? ए.. मला नं तुझ्या मंगळसूत्रातल्या दोन इवल्या वाट्या खूप आवडल्या... निदान हे असं मंगळसूत्र घालायला तरी लग्नं करायलाच हवं...”

मी खुदकन हसले. माझ्या मंगळसूत्राशी खेळत तिला विचारलं, “मग तू इथे काय करत्येस?”

“रिसर्च वर्क... अंsss... सोप्या शब्दांत सांगायचं तर... Various methods of birth control and their long term and short term effects, especially pills. या ज्या काही बाजारात आजकाल वाय पिल, झेड पिल सर्रास उपलब्ध आहेत आणि तुझ्या-माझ्यासारख्या मुली त्या बिनधास्त वापरतात त्याचा खरंतर बाईच्या संपूर्ण अस्तित्त्वावर खूप मोठा परिणाम होतोय. त्याबद्दल रिसर्च.”

‘Oh that is interesting… पण त्याचा काय रिसर्च? तश्या पिल्स घेणं योग्य असतं का?’ मी आपला पुस्तकी प्रश्न विचारला.

योग्य अयोग्य आपण कोण ठरवणार? पण त्या वापरण्यावाचून पर्यायही नाहीये. आता असं बघ हं... हल्ली खूप कमी वयांत मुली “वयांत” येतायत आणि सगळ्या काही तुझ्यासारखं पटकन मंगळसूत्र घालून बसत नाहीत. शिक्षण, करिअर असं करत लग्नं खूप उशीरा होतायत... मग मधल्या काळात शारीरिक गरजा भागायच्या कश्या? अश्या गोष्टींचा मोह होणं अनैसर्गिक नाहीये... पण त्याचे परिणामही मुलींनाच भोगावे लागतात गं आणि तेही भीषण आहेत...

माझ्या चेहऱ्यावरचे टिपिकल केविलवाणे भाव तिला दिसले असणार... साध्या–सुध्या मध्यमवर्गीय मानसिकतेची मी... असे विषय पहिल्याच भेटीत एखाद्या परक्या मुलीसमोर निघाले की काय बोलायचं न सुचून अगदी बावळट केविलवाणी अवस्था होणारच...

“जाऊ दे.. कधीतरी फुरसतीत सांगेन... अगदी खरं सांगू का... हा रिसर्च वगैरे सुद्धा नं एक बहाणा आहे. मला आज्जी आणि बाबाबरोबर जाम बोअर व्हायला लागलं... त्यांना माझं लग्नं उरकून टाकायची घाई... आणि मला असं ठरवून लग्नं करायचंच नव्हतं म्हणून आले पळून. पण इथे ढोर मेहनत करावी लागते यार... रात्री हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट आणि दिवसा अभ्यास... त्यातून वेळ मिळाला तर प्रेम-बीम... ए.. यार असं बोलता बोलता खेळायला तरी गळ्यात काहीतरी घालायला हवं... यार...” माझं मंगळसूत्राशी खेळणं तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं.

माझ्यापेक्षा चांगली सात-आठ वर्षांनी मोठी होती ती. तिचं बोलणं मला परीकथेसारखंच होतं. अश्या गोष्टी सांगून ती चिमुकल्या फुलांचा ड्रेस घातलेली परी उडून जाईल असंच वाटलं मला. तिची बोलतानाची हातांची कवायत बघण्यासारखी होती. कुणी हात बांधले हिचे तर मुकीच होईल ही असला काहीतरी यडचाप विचार करत असताना तिने माझ्या डोळ्यांसमोर हात फिरवला...

“ओय कुडी... किथे खो गयी?”

मग किती वर्षं झाली इथे येऊन?, कुठला विझा?, इथले पहिले दिवस कसे गेले, इथलं क्लायमेट, इथली लोकं असलं बरंच काही-बाही बोललो. म्हणजे तीच बोलत होती बरंचसं... मी ऐकत होते.

“चला... आपली पुस्तकं वाट बघतायत. निघूया का?” मी घड्याळात बघत विचारलं. माझ्या नकळत मी तिच्यासारखं बोलून गेले होते.

“हो... शी बाबा जायला हवं नै... पण अजून खूप बोलायचंय तुझ्याशी... उद्यासुद्धा भेटूया? इथेच...? इथेच आणि या कठड्यावर अशीच श्यामल वेळ सखे गं कसा रंगला खेळ...?” गोडच गायली ती.

“तू गाणं शिकलीयेस?” पुन्हा प्रश्न निसटला...

“आज्जीने शिकवलं.. ती शास्त्रीय गाते. मी आपलं गुणगुणते...उद्या भेटूया का ते सांग की...” तिने पुन्हा गळ घातली...

मलाही तिच्याकडून खूप काही जाणून घ्यावं असं वाटत होतं. तिला मीसुद्धा इंटुक फुलासारखीच दिसत असेन बहुधा. इंटुक आयुष्य जगलेलं एक इंटुक फूल. मी खरंतर भारावून गेले होते पण गांगरूनही गेले होते. पहिल्याच भेटीत तिचं सगळं आयुष्य तिने सताड उघडून दाखवलं होतं. कधी कधी माणसाचा मोकळेपणाच अस्वस्थ करतो नै आपल्यासारख्या चाकोरीतल्या लोकांना.

“उद्या नाही जमणार... बघू... परत भेटू कधीतरी... ठरवू...” मी बोलून गेले.

“ओके, लायब्ररीत तर भेटशीलच नं. पुन्हा कबूतर जा जा जा खेळूया...”, तिने पुन्हा एकदा मला मिठी मारली. आणि आम्ही क्वाएट सेक्शनमध्ये आपापल्या पुस्तकांत हरवलो.

त्या रात्री भारावल्यासारखं सगळं जाऊन नवऱ्याला सांगितलं. माझ्या आधी पाचेक वर्षं त्याने सिडनीत काढली होती त्याला हे नवीन नव्हतं. तो हसला आणि एवढंच म्हणाला, “तिच्याशी बोलणं बंद नको करू. ती तुझ्याहून वेगळी असेल पण म्हणून वाईटच असेल असं नाहीये...” त्याचं हे बोलणं मला सर्वार्थाने पटलंच असं नाही पण कुठेतरी आत मनाशी घट्ट बांधून ठेवलेली एखादी गाठ सैल झाली इतकंच.

माझ्या आणि तिच्या भेटी-गाठी वाढल्या. कधी त्या जांभळ्या तरूतळी, कधी जिथे फलाटाला आगगाडी मिळते, कधी त्या तिथल्या पलिकडल्या कॅफेटेरियात आम्ही आमच्या अभ्यासाच्या आधी किंवा नंतर भेटत असू. तिचं गोष्टीवेल्हाळ बोलणं ऐकत राहावंसं वाटायचं. एखाद्या पुस्तकासारखं वाचूनच काढत होते मी तिला जणू.

“बाबा एक नंबर आर्टिस्ट आहे माझा. खूप सुंदर ऑइल्स काढतो. मम्मा उगाच नाही प्रेमात पडली त्याच्या. आधी प्रेमात पडली आणि मग लग्नात पडली.”

“लग्नात पडली..?”

“प्रेमात पडतात तसंच की... तू नाही का पडलीयेस?”

“आणि मम्मा?”

“मम्मा... मम्मा खरंतर तशी काहीच करायची नाही पण म्हटलं तर बरंच काही करायची. ती शिल्पकार होती असं बाबा सांगतो. तिथेच तर भेट झाली त्यांची. आर्ट्स कोलेजमध्ये. पण मम्मा कविता करायची, लहान मुलांसाठी गोष्टी लिहायची, गायचीही सुंदर... पण माझ्यासारखीच... या गाण्यातली एक ओळ त्या गाण्यातल्या दुसऱ्या ओळीला जोडत... ही बघ..”

असं म्हणून तिने तिच्या फोनवरचा आईचा फोटो दाखवला... तिच्या आईची साडी बघितली आणि इटुक जांभळ्या फुलांमागचं गुपित कळलं.

“किती सुंदर होती तुझी मम्मा... तशीच दिसतेस तू...”

“हम्म... बाबा पण हेच म्हणतो..”

“मग तू मेडिसिनमध्ये कशी वाट चुकलीस?”

“चुकले नाही गं.. आवडतं मला हे... आज्जीच्या पायावर पाय ठेवलाय मी असं म्हणतात लोक..”

“आज्जी...?”

“सुलभ प्रसूती गृह आहे आमचे पुण्यात... गेल्या तीस वर्षांत हजारेक पुणेकर तरी आमच्या मदतीने जन्माला आलेत... आज्जीच्या मागे जायचे रोज दवाखान्यात कोरी करकरीत बाळं बघायला.. मग उत्सुकता वाढली आणि रीतसर शिक्षणच घेतलं...”

मी यापुढे अजून काही विचारायला जाणार तेवढ्यात म्हणाली... “ए आता माझं बास हं तुझं सांग... चलो रानी बताओ तुम्हारी कहानी...”

“माझी कसली गोष्टं.. आई पोस्टात.. बाबा बँकेत..”

“आणि तू ऑस्ट्रेलियात.. नवऱ्याबरोबर... म्हणजे एक था राजा.. एक थी रानी.. दोनो मिल गये.. खतम कहानी... सरळ, सोपं, साधं, आयुष्यं... मस्तय... असं असायला हवं... नाहीतर आमचं... भलामोठ्ठा गुंता सोडवत बसायचं...”

“असला कसला गुंता झालाय? बरं चाललंय की.. काय गं... ठीक चाललंय नं?”

“काय दगड ठीक.. तू खूपच शहाणं बाळ आहेस... जरा छानशी वेडी हो बरं.. मग तुला कळेल माझा गुंता... तुझ्यापेक्षा आठ उन्हाळे जास्त बघितलेत मी.. अजून लग्नात नाही पडलेय... मी कधी घालणार तुझ्यासारखं मंगळसूत्र...? परवा आज्जीला म्हटलं फोनवर मंगळसूत्र घालावंसं वाटतंय तर म्हणाली कुंकवाला धनी शोधा आधी...”

“मग चांगलं करून देत होते लग्नं भारतात तर आलीस पळून...”

“ठरवून लग्नात पडता येतं पण ठरवून प्रेमात कसं पडणार? मला आधी प्रेमात पडून मगच लग्नात पडायचंय.. म्हणूनच तर राहतेय नं लिव्ह-इनमध्ये...”

“तुझ्या घरी माहितीये हे?” मी बावळटासारखं विचारलं..

“अर्थात.. मी त्यांच्यापासून काहीच लपवत नाही... खरंतर मी कोणापासूनच काहीच लपवत नाही. बाबाला आधी थोडा धक्का बसला... पंजाबी छोरा... पण मग आज्जी म्हणाली... भारतीय आहे नं... चांग भलं... मला सगळ्यात जास्त काय आवडतं माहितीये त्याचं... तो मस्त स्वयंपाक करतो.. सगळा हं.. पोळ्यासुद्धा... ये एकदा तुझ्या नवऱ्याला घेऊन घरी जेवायला.”

तिच्या घरी जेवायला जायचा योग काही आला नाही. माझी सेमिस्टर संपली मग मी लायब्ररीत जाणंही बंद केलं. माझ्या घराजवळ मला एक स्टडी सर्कल मिळालं.. तिथे बसून मी अभ्यास करायचे. तरी कधी कधी मेसेज यायचा फोनवर “त्या तिथे... मॉलमध्ये... तिकडे... एक वाजून पाव तास लोटल्यावर...?” मला जमणार असेल तर मी थंब्स अप पाठवायचे. नसेल जमणार तर तिच्याच भाषेत ‘उलटा थंब्स अप’.. पण आम्ही भेटत राहिलो. त्याचं कारण तीच.

बघता बघता वर्षं उलटली... माझं cpa पूर्ण झालं. तिनेही तिचा प्रबंध पूर्ण केला. मग मध्ये जवळ जवळ वर्षभर संपर्क तुटला.

माझं डोहाळेजेवण होतं... सगळ्या जुन्या-नव्या, इकडच्या-तिकडच्या, लहान-मोठ्या सख्या गोळा झाल्या होत्या. तिलाही बोलावलं होतं... गर्भरेशमी नऊवार नेसून आली होती.... पिवळ्या जर्द रंगावर जांभळे इवले ठिपके... माझ्या डोहाळजेवणाला माझ्यासकट सगळेच तिच्याचकडे बघत होते. खोटा आंबाडा, चंद्रकोर, नाकात नथ... सकाळच्या कोवळ्या लूस उन्हासारखं तिचं सोनमाखलं रुपडं... खूप लोभस दिसत होतं. सगळ्यात गम्मत म्हणजे गळ्यात मंगळसूत्र होतं बाईंच्या...

“पंजाब्यांमध्ये हे सगळं करत नाहीत... मला असलं भारी वाटलंय नं तू डोहाळेजेवणाला बोलावलंस म्हणून...”

“पण तू बोलावलं नाहीस लग्नाला..” मी जराश्या नाराजीने म्हटलं..

“मी आणि माझा नवरा एवढेच होतो... आज्जी आणि बाबापण नव्हता... इथे लग्नं केलं आणि गेल्याच महिन्यात भारतात जाऊन पाया पडून आलो.. येताना तीन-चार मंगळसूत्र घेऊन आलेय. तुझ्यासारखं पण आणलंय एक..”

“अभिनंदन...”

“तुझं सुद्धा... आणि आशीर्वाद देतेय... एक मस्त भिंगरी जन्माला येवो आणि तुला ती छानसं वेड लावो...” माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला गच्चं मिठी मारली तिने आणि जाण्यासाठी वळली...

“किती छान दिसतेयस आज...” मी न राहवून म्हटलंच शेवटी...

तिने जाता जाताच मागे वळून डोळे मिचकावले...

“होतं असं कधी कधी चुकून...” असं म्हणत दरवाज्यापाशी पोचली आणि तिथूनच माझ्याकडे बघून ओरडली... “ऐक..... तुझं बाळ मी जन्माला घालत नाहीये याचं खूप वाईट वाटतंय मला..”

आणि दरवाजा उघडून पसार झाली...

सगळ्या बायका माझ्याकडे डोळे वटारून बघायला लागल्या... “ती गायनॉकॉलॉजीस्ट आहे नं म्हणून म्हणाली तसं...” मी कसं बसं सावरलं...

तिच्या तोंडात साखर पडली.. भिंगरीच जन्माला आली. एका शुक्रवारी सकाळी फोन आला...

“आज कुठेतरी जाsssवेsss... असं वाटतंय... येऊ का तुझ्या भिंगरीला बघायला? दहाला पाऊण तास शिल्लक असताना उगवते... जेवायलाच येतेय गं..”

तेव्हा माझे आई-बाबा घरी होते. मला नाही म्हटलं तरी थोडं टेंशनच आलं होतं... भलत्या वहिवाटेने जाणारं हे पाखरू आईसमोर काय बोलेल आणि काय नाही. पण दृष्ट लागण्याइतकं समजूतीचं वागली. दिवसभर होती माझ्या घरी... बाळ वाढवण्याच्या दृष्टीने खूप छान सूचना केल्या मला... तिच्या आज्जीला फोन करून घरगुती औषधं विचारून घेतली ती सांगितली. एवढंच कशाला आईला स्वयंपाकात मदत करू गेली... माझ्या आईला काकू काकू म्हणत आईच्या मागे मनसोक्त स्वयंपाकघरात लुडबूडून घेतलं तिने.

“मी या कांद्याला चिरते, या ताकाला घुसळू का?, काकडीची सालटं काढू का? मी पोळ्या करते आज... मला घडीच्या पोळ्या करता येत नाहीत पण पोळ्यांच्या घड्या करता येतात... मस्त फुलके करते... तुम्ही निवांत बसा बरं... मी तिची मोठी बहिण आहे पर्यायाने तुमची मुलगी... म्हणजे लेक लाडकी या घरची... जा तुम्ही बाहेर जा बरं..”

असलं सगळं स्वयंपाकघरातून ऐकू येत होतं. थोड्यावेळाने आई बाहेर आली... आणि हुश्श करून बसली.. “काय मुलगी आहे का भिंगरी...”

“भिंगरीssss” आतून आवाज आला.

जाताना मला घट्ट मिठी मारली... नेहमीसारखी... “पुढल्या आठवड्यात मेलबर्नला मूव्ह होतेय. मला तगडी नोकरी मिळालीये... माझ्या आवडीचं काम आहे... नवरा पण होईल मूव्ह काही दिवसातच माझ्या मागोमाग... इथले दाणे संपले.. तुला मेसेज टाकून भेटायला बोलावता यायचं नाही आता.”

आम्ही खरंतर काही नेहमी भेटत नव्हतो पण तरी उगीच डोळ्यांत पाणी आलं.. दोघींच्याही..

“एका फोनच्या अंतरावर आहोत असं म्हणायचं... आज्जी बाबाला समजावते असं..”

मी हासले..

“चला काका काकू... येते... काळजी घ्या आमच्या मुलीची... जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा...” असलं गुणगुणत निघून गेली...

माझ्या लेकीसाठी satinचा पांढरा शुभ्र फ्रॉक आणला होता तिनं... त्याच्या गळ्याजवळ नाजूक जांभळ्या फुलांची नक्षी होती. तसलेच बुटू, मिटन्स आणि टोपडं सुद्धा... शिवाय मला एक गिफ्ट कार्ड दिलं.. ती गेल्यावर उघडून बघितलं तर आत एकच ओळ होती...

“स्वत:साठीच वापर हं... प्लीज....” आणि एक हसरं फूल...

एक हसरं फूल बहुधा कायमचंच आपल्या आयुष्यातून निघून गेलं असं वाटलं मला तेव्हा... नंतर जेव्हा तिच्याबद्दल विचार करायचे तेव्हा वाटायचं माझ्या आत्ताच्या या वयात भेटली असती नं मला ती तर कदाचित अजून छान मैत्री झाली असती आमची. तेव्हा गांगरून जाऊन मी फारसं काही बोललेच नाही तिच्याशी. आत्ता भेटली असती तर मी तिला अधिक छान समजून घेऊ शकले असते. गेल्या पाच-सहा वर्षातल्या सिडनीतल्या वास्तव्यात अनेक जणांना भेटले होते, अनेक अनुभव घेतले होते, अनेक माणसं जवळून बघितली होती. आता माझ्या बाजूची चौकट मी बऱ्यापैकी मोकळी केली होती. मनाशी मारून ठेवलेल्या बऱ्याच गाठी मोकळ्या झाल्या होत्या. माझ्या कक्षा रुंदावल्या होत्या. आता ती जवळ असायला हवी होती. पण चणे असले की दात नसतातच.

तीन-चार वर्षं उलटून गेली.. आणि माझ्या नवऱ्याला मेलबर्न मध्ये नवीन नोकरी मिळाली... आम्ही तिकडे जायचं ठरवलं. मधल्या या तीनेक वर्षांच्या काळात तिच्याशी अगदी जुजबी संपर्क होता. खरंतर आम्ही सतत भेटत राहिलोय असं नव्हतंच मुळी. पण ती जेव्हा भेटायची तेव्हा कडकडून भेटायची. त्या भेटीचं भूत नंतर अनेक महिने डोक्यावर बसायचं.. अनेक गोष्टींचा विचार करायला लावायचं..पण ते पूर्वी.. आता थोडीफार का होईना मीही बदलले होते.. आता भेटली तर असं नाही व्हायचं...

आम्ही मेलबर्नमध्ये येऊन एखाद महिना झाला असेल. माझं पिल्लू तीनेक वर्षाचं झालं होतं. घराजवळच्याच एका किंडीत लेकीचं नाव घातलं. एक दिवस सकाळी असंच तिला सोडायला किंडीत गेले होते. शाळेच्या दरवाज्यात सगळ्यांचे स्ट्रोलर्स पार्क केलेले असायचे. तिथेच मी आमचाही स्ट्रोलर पार्क केला आणि लेकीला वर्गापर्यंत सोडायला गेले.. परत येऊन बघते तर स्ट्रोलरमध्ये एक टिशूपेपर... त्यावर काहीसं लिहिलं होतं म्हणून उघडून वाचलं...

“समोरच्या बागेतला जांभळा गुलमोहोर... उद्या भिंगरीला शाळेत सोडलंस की...?”

खाली एक हसरं फूल... मी थम्ब्स अप करायला आजूबाजूला पाहिलं... पण ती कुठेच दिसली नाही. तिला फोन करून बघितला. पण तो व्होईस मेलवर गेला. मग मी नुसताच थंब्स अपचा मेसेज पाठवला.. तिनं ‘हसरं फूल’ एवढे दोनच शब्द लिहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पोचले शाळेत. स्ट्रोलर पार्क करताना बाकीच्या स्ट्रोलर्सवरून सहज नजर फिरवली तर एका स्ट्रोलरला जांभळ्या इटुक फुलांचा स्कार्फ लटकला होता. मला आश्चर्य, आनंद सगळं एकाच वेळी होत होतं. माझ्या लेकीला वर्गात सोडून बाहेर आले. तर ती समोरच्या जाकॅरांडाखाली... अंगभर जांभळी फुलं मिरवत, नेहमीचं हसत, दोन्ही हात पसरून माझ्यासमोर उभी...

आम्ही एकमेकीना घट्ट मिठी मारली.

“वाट पाहूनी जीव शिणला...” ती गुणगुणली.

“तुझं कोण भिंगरी की भोवरा...?” मी न रहावून झटकन विचारलं...

“भोवरा... पण माझा नाही... म्हणजे कागदोपत्री मीच आई आहे त्याची पण जन्मदाती नाही..”

“म्हणजे?” माझा पुन्हा एक बावळट प्रश्न...

“अगं दत्तक घेतलं त्याला.. दोन वर्षांपूर्वी आमच्याच प्रसूतीगृहात जन्माला आला तो... त्याच्या वडलांनाही आज्जीनेच जन्माला घातलेलं सगळं कुटुंबच आमच्या ओळखीचं... त्याचे आई-वडील एका अपघातात गेले.. त्याला सांभाळणारं कुणी उरलंच नाही.. मला मूल दत्तक घ्यायचंच होतं.. मग त्यालाच घेऊन आले.”

“अगं पण मग तुझा नवरा? त्याला चाललं?”

“त्याच्याशी लग्नच मी या अटीवर केलं होतं की स्वत:चं मूल होऊ द्यायचं नाही. मूलं दत्तक घ्यायची.”

“का? स्वत:ला मूल होऊ शकत असतानाही?”

“अर्थात.. अगं लोकसंख्या हा केवढा मोठा प्रश्न आहे जगासामोरचा... माझ्या रिसर्चचा हाही एक भाग होता.. या क्षेत्रात असताना त्या प्रश्नाची धग खूप जवळून जाणवते गं... आपल्या पोटी जन्माला आलं कीच आपलं असं का मानायचं...? मग नको असताना जन्माला आलेली, नको नको त्या अवस्थेत, परीस्थितीत जन्माला आलेली लेकरं.. त्यांनी कुणाकडे बघायचं...? जी आधीच जन्माला घातली आहेत, ज्यांना कुणी वाली नाही अशी लेकरं सांभाळूया की...”

“तुझ्या नवऱ्याला पटलं हे?”

“लग्नाच्या वेळी पटलं म्हणाला... पण नंतर त्याचे आई-वडील त्याला भरीस पाडायला लागले आणि तो मला. माझ्या तत्त्वाला मुरड घालणं नाही जमलं गं मला. आम्ही वेगळे झालो.”

“मग या मुलाला एकलीच सांभाळतेस?”

“एकटी का? बाबा आणि आज्जी आहेत की. येतात ते इथे माझ्या मदतीला... ए.. आता माझ्याबद्दल राहू देत तू तुझं सांग... भिंगरीने अजून वेडं लावलं की नाही तुला? चलो रानी बतादो तुम्हारी कहानी..”

“माझी कसली गोष्टं... नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली इथे मेलबर्नमध्ये म्हणून गेल्याच महिन्यात आलोय.”

“आणि लेक या शाळेत आहे... मस्त.. एक था राजा.. एक थी रानी.. दोनो मिल गये.. खतम कहानी.. सरळ, सोपं, साधं आयुष्य... नाहीतर मी बघ अजून गुंता सोडवत बसलेय...”

“आता कसला गुंता..?”

“स्वत:ला चौकटीत अडकवून घ्यायचा खूप प्रयत्न केला गं मी... पण माझ्यासारखी षटकोनी आयुष्य चौकटीत बसवायला गेलं नं की एकतर चौकट तरी मोडते नाहीतर आयुष्य तरी... मी चौकट मोडायचं ठरवलं पण आयुष्यलाही थोडी धस लागलीच गं.. माझं प्रेम होतं गं त्याच्यावर... अजूनही आहे.”

मी काय बोलावं ते न सुचून कपाळ खाजवलं आणि नाकावरून तर्जनी फिरवली...

“ए.. तुझी ही सवय अजून नाही गेली..?” तिनं कानाजवळचे केस कानामागे नेत विचारलं..

मी नुसतीच हसले. पुन्हा एकदा भारावून गेले होते आणि गांगरूनही.. माझी चौकट कितीही रुंदावली तरी ती चौकट तिचा षटकोन सामावून घेईल एवढी मोठी नाही व्हायची... तिला समजून घ्यायला मला नव्यानेच जन्मावं लागेल...

ती मात्र तश्शीच हसत होती... सगळे दात दाखवून.. उन्हासारखी... घनघोर वादळा-पावसानंतर पडलेल्या नाजूक, ओल्या, कोवळ्या उन्हासारखी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेत नायिकेचे नाव वगळलेय पण रसग्रहणांत काहीही फरक पडलेला नाहीये.
व्यक्ती आणि व्यक्तिचत्रण दोन्ही अप्रतिम ... !!

Pages