सहज पाथेर गप्पो ( कलर्स ऑफ इनोसन्स) बंगाली चित्रपट सकाळ पेपर्स मध्ये प्रसिद्ध झालेला लेख .. परिचय आणि रसास्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 2 April, 2021 - 01:47

सहज पाथेर गप्पो ( कलर्स ऑफ इनोसन्स)

अंधार असतो म्हणजे प्रकाश नसतो, पण प्रकाश येतोच आणि मग अंधार उरत नाही ..
मंगेश पाडगावकर

दिग्दर्शक मानस मुकुल पाल यांचा “सहज पाथेर गप्पो” हा बंगाली भाषेतील विविध पारीतोषके आणि सन्मान यांनी गौरवलेला चित्रपट. २०१७ साली बंगाल सरकारचे उत्तम दिग्दर्शकाचे पारितोषक तसेच वेस्ट बेंगाल फिल्म जर्नालीस्ट असोसीएशन तर्फे मोस्ट प्रोमिसिंग डायरेक्टर” “बेस्ट साउंड डिझाईन” आणि “ मोस्ट प्रोमिसिंग अक्टर” हि सवे बक्षिसे या चित्रपटास मिळाली होती. विशेष म्हणजे बाल कलाकारांच्या अभिनयासाठी २०१६ साली “उत्तम बाल कलाकार” विभागात या चित्रपटास national film award” सुद्धा प्राप्त झाले होते.

बंगाल मधील एका खेड्यातील घर. हि कहाणी आहे त्या घराची. काड्यासारखा देह घेऊन वणवण करत हिंडणारया त्या घरातील कर्त्याबाईची.. (स्नेहा बिश्वास) तिच्या दोन निरागस मुलांची .. भीषण अपघात झाल्याने विकलांग होऊन अंथरुणाला खिळून असलेल्या बापाची .. त्यांच्या साथीला आहे फक्त झोपडीतला अंधार. हा अंधार आहे दारिद्र्याचा, परिस्थितीने ओढवलेल्या असहायतेचा. हा अंधार आहे घोर निराशेचा. पण त्या अंधारातही एक मिणमिणता दिवा आहे. आशा, निरागसता, निष्पाप जीवनाचे प्रतिक असणारी दोन लहान मुले. बारा वर्षाचा गोपाळ ( समुल आलम) आणि नउ ते दहा वर्षाचा छोटू ( नूर इस्लाम)
खेड्यातील एक छोटेसे नदीचे पात्र आणि त्याच्या काठावर बसलेली हि दोन लहान मुले. गोपाळ मासे पकडण्याचा प्रयन्त करीत आहे. आणि छोटू त्याच्याकडे उत्सुकतेने बघत आहे. दोघांच्याहि चेहऱ्यावर चिंता. छोटुला चिंता आहे आपल्या बाबांच्या मरणाची. त्याचे बाबा भीषण अपघात झाल्याने मरणासन्न अवस्थेत पडलेले होते. आपल्या आईकडे पैसे नाहीत या गोष्टीची त्याला रुखरुख होती. शेजारच्या काकुना त्याची आई सांगत असताना त्याने हे सर्व ऐकले होते. खर तर मरण म्हणजे काय हे सुद्धा न कळण्याचे त्याचे वय. आपल्या भावाशी बोलता बोलता त्याच्या डोळ्यात आश्रू येतात. विकलांग असले तरी ते बाबा होते आणि त्यांच्या आजारपणामुळे आई दु:खी झालेली होती. घरातले वातावरण त्याच्या बालमनाला जाणवत होते. पण बाबांच्या मरणापेक्षाही त्याला भीती होती बाबा गेले तर त्यांना खायला अन्न मिळणार नाही या गोष्टीची. घरच्या दारिद्र्याने त्यांना नेहमी भुकेजलेले ठेवलेले असते. कुणी काही दिले तर खायचे. पण त्या मोजक्या अन्नात त्यांची भूक कशी भागणार? छोटू पेक्षा गोपाळ दोन तीन वर्षांनी मोठा आहे. आणि त्याचमुळे तो समजूतदार आहे. तो छोटुला सांगतो “गावातील काकुनी त्याला त्यांच्या विहिरीजवळचा कचरा काढायला बोलावले आहे. ते जे देतील ते आपण दोघे मिळून खाऊ” मघाशी रडत असणार्या छोटूच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि त्याचे निरागस डोळे चमकतात.. बोलता बोलता गोपाळाच्या हातात असलेला मासा पकडायचा रॉड तुटतो आणि छोटू जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो. मासा मिळाला नाही या दु:खापेक्षा त्या निरागस मुलाला भावाची मजा झाली याचा आनंद त्याला वाटतो.मघाशी पोटात असलेली भूक तो विसरून जातो.

शेतातल्या त्या पायवाटेने ती दोघे चालली आहेत. छोटू सांगतो “ दादा तू तसे करू नको. नाहीतर देव आपल्याला शिक्षा देईल” आणि गोपाळ त्याला गप्प करीत पुढे निघून जातो. त्या मोकळ्या रानात छोटू एकटाच उभा आहे. कधी झाडाजवळ तर कधी कोंबडीच्या पिलाची नक्कल करीत तर कधी माती उकरत. कदाचित पोटात लागलेली भूक त्याला अस्वस्थ करीत आहे.इतक्यात आकाशात विजा कडाडतात. आणि थोड्याच वेळात मुसळधार पाउस पडू लागतो. अंगात शर्ट नसलेला उघडा छोटू त्या पावसात एकटाच उभा आहे “जाऊ नको” असे म्हणत असतानाही आपला दादा कुठे गेला असे विचार कदाचित त्याच्या मनात चालू असावेत. तोच गोपाळ तिथे येतो आणि त्याला दोन अंडी दाखवतो. छोटूचे डोळे पुन्हा आनंदतात. ओसरलेला पाउस निसर्गाची शोभा खुलवत असतो पण छोटूच्या मनातील प्रश्न तसेच असतात. “ चोरी करणे हे पाप आहे. देव आपल्याला शिक्षा देईल” गोपाळ मात्र स्वभावाने बंडखोर आहे. छोटूच्या प्रश्नावर तो बोलतो “ त्याला शिक्षा द्यायची तर देऊ दे. मुळात त्याने आपल्याला उपाशी का ठेवले?” पण चोरून आणलेले अंडे सुद्धा त्या दोघांच्या नशिबात नाही. कारण बराच वेळ आपली मुले आली नाहीत म्हणून काळजीत असलेली त्यांची आई, मुले घरी आल्यावर त्यांना रागावते आणि मारलेल्या त्या धपाट्यात ते अंडे फुटून जाते.

त्या दोघांचे दु:ख आहे कडाक्याची भूक लागलेली असतानाही त्यांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. आणि त्याचमुळे ती दोघेही जेवणासाठी नेहमी आसुसलेली आहेत. पण काहीतरी खायला मिळावे हि इच्छा मनात असतानाही त्यांची निरागसता कुठेही कमी होत नाही. इतर लोक नदीतले मासे खात असतात हे दु:ख त्यांच्या मनात आहे, पण ते दोघे जेव्हा डबक्यातला मासा पकडतात तेव्हा त्याला एका बाटलीत ठेऊन त्याच्याकडे आनंदात बघत राहण्याचा निष्पापपणा त्यांच्या ठायी आहे. दोघा भावांचे प्रेम अतूट आहे. नदीवरून पाणी आणत असताना एकच बादली दोघांनी उचलून आणायची हे त्या दोघांचे भावबंध जुळल्याचे प्रतिक आहे. पण केवळ निरागसता, प्रेम हा यांचा गुण नाही तर एक सलणारी वेदनाही त्यांच्या मनात निश्चितच आहे. जेव्हा ते दोघे एके ठिकाणी कामाला गेलेले असतात तेव्हा त्या घरातल्या मुलाचे शाळेत जात असताना त्याची आई लाड करीत असते. पण गोपाळची शाळा मात्र आदल्या दिवशी सुटलेली असते कारण त्याच्या आईला फी परवडत नसते. हा विरोधाभास आपल्यालाही हेलावून टाकतो. कुठेतरी पारावर बसलेले असताना दुडूदुडू शाळेत धावत जाणारी मुले बघितल्यावर गोपाळ त्यांच्याकडे त्याच दु:खी नजरेने बघत असतो. गोपाळ मोठा असल्याने त्याचे दु:ख किंचित वेगळे आहे. पण छोटूच्या मनात मात्र सातत्याने भूक डोकावत असते त्याचमुळे शाळेतल्या मुलांना “रोज जेवायला देत असतात”हा विचार त्याला अस्वस्थ करीत असतो. मनातील हा त्रागा गोपाळ एक दिवस जेवणावर काढतो आणि आईवरून संतापून बाहेर पडतो. तेव्हा छोटू गावाबाहेर रडत बसलेल्या आपल्या भावाला झाडावरचे दोन पेरू घेऊन जातो. आपल्या भाऊ उपाशी आहे. तो रडतोय याची जाणीव त्याला आहे. आणि त्याचमुळे रडत असणार्या गोपाळचा मूड बरा करण्यासाठी तो त्याला मिथुन सारखे नाचून दाखवतो.

......मध्यरात्रीच्या त्या प्रहरी दोन भाऊ झोपलेले आहेत. पण त्यांची आई मात्र आपल्या नवऱ्याजवळ बसून मुसमुसून रडत आहे. नवऱ्याची वेदना तिला आता असह्य होत आहे. झोपेतून दचकून गोपाळ उठतो आणि धापा टाकत, रडत तसाच उभा राहतो. मागे वळून बघताच त्याला मोकळे केस सोडून, व्यथित झालेली त्याची आई दिसते. आईला बघून गोपाळ घाबरतो. पण कसलाही विचार न करता त्याची आई निघून जाते .त्याचवेळी गोपाळला दारात असलेले वडिलांचे प्रेत दिसते.अखेर त्याचे वडील मरण पावलेले असतात. आपली आई कुठे गेली म्हणून गोपाळ तिच्या मागे पळत जातो. गोपाळला बघताच त्याची आई जोरात पळू लागते. “ तुझ्या वडिलांना अग्नी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत” असे ओरडून सांगते. दूरवरून येणारा रेल्वेचा जोराचा आवाज आणि “ आई आई” करून गोपाळने फोडलेला हंबरडा. अस्वथ करणारे वातावरण बघत असतानाच गोपाळ त्या स्वप्नातून दचकून जागा होतो. दोघाही माय लेकांची मानसिक अवस्था सांगणारा हा हृद्य प्रसंग. सकाळची वेळ झालेली असते. कोंबडा आरवलेला असतो. गोपाळ कुठेतरी आपले साठवलेले थोडे पैसे हातात घेतो. आणि आईच्या पदराला बांधून ठेवतो. त्याला त्याची आई पैशासाठी गमवायची नव्हती.

परिस्थिती माणसाला आगतिक बनवते तसेच शहाणपण सुद्धा शिकवते. आपल्या आईचे, भावाचे पोट भरण्यासाठी गोपाळ मोकळ्या रानातून भाजी , नारळ तोडून आणायचा आणि बाजारात विकून द्यायचा. परिस्थितीवर मात करायचा त्याने शोधलेला तो मार्ग होता पण छोटू त्या मिळवलेल्या मोजक्या पैशातही आपण श्रीमंत होणार म्हणून स्वप्न रंजन करत होता. त्या दिवशी त्यांना गावात कळते जन्म अष्टमीचा उत्सव आला आहे. गावातील धनाढ्य व्यक्तीने सर्व गावाला जेवायला बोलवायचे ठरवले आहे. वेगवेगळ्या पदार्थाची रेलचेल त्या दिवशी जेवणात असणार म्हणून छोटू खुश आहे पण गोपाळला मात्र त्या दिवशी उत्सवात नारळ लागतील आणि त्याच्याकडून नारळ विकत घेतले जावेत म्हणून तो काय करता येईल या विचारात आहे. गावातल्या त्या शेठाणीकडे दोघेजण जातात. आपला धंदा होतोय म्हणून गोपाळ आनंदात आहे पण छोटूच्या मनात मात्र शेठाणीकडून पैसे घेतले तर ती आपल्यला जेवायला बोलावणार नाही याची चिंता आहे. जन्मअष्टमीचा दिवस उजाडेपर्यंत छोटू याच विचारात असतो. आपण जेवायला बसलो आहे, वेगवेगळे पदार्थ खातो आहे याचे स्वप्न त्याला पडायचे. एक दिवस तो गोपाळला न सांगता शेठाणीला पूजेसाठी देऊन येतो आणि ते सुद्धा विनामुल्य. कारण त्याला इच्छा आहे शेठाणीने त्याला जेवायला बोलवावे.
अखेर तो दिवस उजाडतो. त्या दिवशी सर्व गाव उत्सवाला चालले आहे. पण या दोघांना बोलावलेच नाही. आपल्याला का बोलावले नाही याची रुखरुख छोटुला आहे. पण गोपाळ मात्र त्याना बोलवायचे तर बोलावतील या विचाराचा आहे. आणि म्हणूनच तो बाजारात गेला आहे. सर्व जण जेव्हा मिष्टान्न भोजन करण्यासाठी त्यांच्या घरावरून जात आहेत तेव्हा छोटू आपले घरातील नेहमीचे कसेबसे जेवण चिवडत आहे. आपल्याला बोलावले नाही याचा सल त्याला असह्य होतो आणि तो आश्रुना वाट मोकळी करून देतो.

दुसरे दिवशी सकाळ होते. वृक्ष बहरलेले असतात. फुलांनी गच्च डवरले असतात. शेतावर काम करणारे मजूर नवीन आशा घेऊन कामाला आलेले असतात. आणि त्या निरभ्र आकाशाकडे बघत छोटू आणि गोपाळ पहुडलेले असतात. मनात घोर निराशा असतानाही आपल्या बोलण्यातून आपल्या आई वडिलांवरचे ते प्रेम व्यक करीत असतात. त्यांच्या डोळ्यात उद्याची पहाट आहे.

बालकलाकारांचा उत्तम अभिनय. निरागसता, त्यांच्या मनातील वेदना या साऱ्या गोष्टी प्रभावीपणे आपल्यापुढे व्यक्त झालेल्या आहेत. निसर्गाइतकच पारदर्शक त्याचं मन आहे आणि त्याचमुळे निसर्गाच्या पार्शभूमीवर गोपाळ आणि छोटूचे संवाद आपल्याला मनस्वी भावतात. गोपाळचा व्यवहारीपणा किंवा वयाने मोठे असल्यामुळे त्याला असलेली समज वेळोवेळी आपल्या लक्षात येते.

आईच्या भूमिकेत स्नेहा बिश्वासचा अभिनय आपल्याला तिच्याबद्दल कणव निर्माण करतो. घरातील दारिद्र्यामुळे असहाय झालेली, मुलांच्यावर प्रेम करणारी आणि तितकीच त्यांना धाक दाखवणारी आई, नवऱ्याच्या काळजीमुळे हमसून हमसून रडणारी बायको या साऱ्या भूमिका तिने ताकतीने पार पडल्या आहेत. गोपाळला आपले वडील गेल्याचे पडलेले स्वप्न दृश्य यात तिचा अभिनय उत्कृष्ट झाला आहे.

परिस्थितीचे विदारक चित्र दाखवतानाही, बालकलाकारांची निरागसता, त्याचे विविध रंग आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवतात. नैराश्य आणि दु:ख यांनी भरलेले अनेक प्रसंग जरी या चित्रपटात असले तरीही रडता रडता हसवणाऱ्या प्रसंगाची विलक्षण गुंफण सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्या कुटुंबातील प्रत्येकाचे एकमेकावर प्रेम आहे आणि वडील त्यांच्या आजारातून बरे होतील याचा विश्वास त्या दोघा भावांना आहे. शेवटी आकाशात पाखरे उडतात आणि दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनात आशावाद निर्माण करतो. हे दृश बघत असताना ओठावर पाडगावकरांच्या कवितेची एक ओळ येते “ उडणाऱ्या पाखरांच्या पिसांना फुलांचा सुवास असेल”. निरागस आशावाद व्यक्त करणारा चित्रपट संपला तरी दीर्घकाळ स्मरणात राहतो.

सतीश गजानन कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults