.. आणि आपलेच विष

Submitted by aschig on 11 May, 2009 - 03:49

.. आणि आपलेच विष
(आशिष महाबळ ११ एप्रील २००९ लमाल - ऋतु)

शिरमन्त वरद आणि स. शशि आज बरसणाऱ्या मानसुनच्या पहिल्या पावसात यथेच्छ भिजत होते. त्यांच्याकडे या क्षणाला पाहुन कुणाला वाटले नसते की एका महत्वाच्या खगोलशास्त्रिय मोहिमेकरता हे मुद्दाम हवाई व ला सेरेना मधुन कधीकाळी दाखल झाले होते. त्या कामगिरीने परत आणले खरे, पण चेन्नईचा चिकचिकाट त्यांच्या मुळीच पचनी पडत नव्हता. तसे ते दिवसभर वातानुकुलीत खोल्यांमध्ये अतिवेगवान अशा संगणकांसमोरच असत. अगदी तहानभुक विसरुन. त्यांची मोहिम होतीच तशी विलक्षण. आज मात्र त्यांच्या मनात वेगळेच वादळ घोंघावत होते. त्यामुळे जणु काही ते वादळ शमवायला ते वर्षादेवीची मदत घेत होते.

पण तुम्हाला त्या वादळापुर्वीच्या गोष्टींबद्दल सांगायला हवे. पहिल्यांदाच परग्रहावरुन अयांत्रिक खुण मिळाली होती. माऊंटनव्ह्युव स्थित १९८४ साली स्थापन झालेल्या सेटीच्या एका रेडिओ तबकडीला अनेक वर्षांच्या कानोस्यानंतर या संदेशलहरी सर्वप्रथम मिळाल्या होत्या. वेगवेगळ्या तरंगलांबीत अधिक माहिती मिळवण्याकरता अनेक दुर्बीणी लगोलग तिकडे वळल्या. बुद्धिमत्तेचे अचुक लक्षण असणारी ही खुण म्हणजे अविभाज्य संख्या. २, ३, ५, ७, ११, ... या संख्या ज्यांना १ व स्वत: शिवाय कशानीच भाग जात नाही त्या निसर्गात आपोआप कोणत्याच प्रक्रियेनी निर्माण होऊ शकत नाहीत. अशा संदेशलहरी प्राप्त होताच सगळीकडे त्याचा बोलबाला झाला यात नवल नाही. वैज्ञानिकांप्रमाणेच अर्थात राजकीय पुढाऱ्यांनी देखिल त्याची दखल घेतली आणि नेहमीप्रमाणे स्वत:चे मांडे भाजण्याकरता अतिशय गमतिदार असे आरोप प्रत्यारोप झाले. धर्मगुरुंनी देखिल त्यांच्या धर्मपुस्तकात अशी खुण मिळणार हे नमुद असल्याचा पहिल्यांदाच खुलासा केला. प्रसार माध्यमांबद्दल तर काही विचारयालाच नको. एकुण काय तर सर्वांनाच इतर गोष्टि लपवण्याकरता एक चांगले निमित्त मिळाले होते. नशिबाने की दुर्दैवाने एका महिन्यानी ते सिग्नल्स येणे बंद झाले.

तोपर्यंत अर्थात खगोलशास्त्रज्ञांकडे भरपुर माहिती जमा झाली होती. केवळ अविभाज्य आकडेच प्राप्त झाल्यामुळे त्या बाबतीत नविन अशी कोणती भर नव्हती पडली, पण ज्या दिशेने त्या संदेशलहरी आल्या होत्या त्या भागाचा बराच अभ्यास मात्र झाला होता. वर्तुळाचे ३६० भाग केले असता एक भाग म्हणजे एक अंश. अशा अंशाचे ३६०० भाग केल्यास प्रत्येक भाग म्हणजे एक वि-कला (आर्कसेकंद). चंद्र-सुर्यांचा दृष्यमान आकार हा साधारण १८०० विकला किंवा अर्धा अंश इतका असतो. आकाशाच्या एवढ्या तुकड्यात साधारणपणे डोळ्याने दिसु शकतील असे खुपच कमी तारे असतात. याला अपवाद असतो तो आपल्याच दिर्घीकेच्या पतलाचा. रात्री दिसणारा आकाशगंगेचा दुधाळ पट्टा हा हीच पातळी दर्शवतो. संदेशलहरी आकाशगंगेच्याच एका भागातुन आल्यामुळे नेमका स्त्रोत शोधण्याबाबत जरा पंचाईत झाली होती. इथे तारे दाटीवाटीने एकत्र डांबल्यागत भासतात. मात्र यामुळे तो सिग्नल आपल्याच आकाशगंगेतुन येत असणार हे जवळपास नक्की झाले होते.

टंचाई असुन देखिल जमेल तशी तजवीज करुन लालोत्तर तरंगलांबीमध्ये निरिक्षण करू शकेल अशी दुर्बीण एका उपचंद्राप्रमाणे आकाशात स्थापण्यात आली होती. याच दुर्बीणीचे कंट्रोल्स चेन्नई मध्ये होते. थंडी संपत आली होती आणि अनायासे वसंत पंचमी जवळच असल्याने त्यादिवशी या आधुनीक वेधशाळेचे उद्घाटन करावे असे कुणीतरी सुचवल्यावर त्याला फार कोणी आडकाठी घालायचा प्रयत्न केला नाही. शिरमन्त वरद आणि स. शशि यांना थोडी गम्मत वाटली होती पण त्यांनीही काही म्हंटले नाही. आश्चर्य म्हणजे १० दिवसातच पुन्हा सिग्नल्स मिळणे सुरु झाले आणि सगळे त्या पृथ:करणात गुंतले. पुन्हा एकदा अविभाज्य संख्यांची उजळणी झाली आणि मग मात्र चक्क नंबर थेअरी मधील काही कोडी प्राप्त झाली. सुरुवातीला सोपी आणि नंतर अधिकाधिक कठीण. आणि त्यादरम्यान कळु न शकलेले अनेक सिग्नल्स. ती कोडी महितीतील होती म्हणुन लवकर कळली, आणि त्यांच्या अनुषंगाने अजुन काही खुणा (सिम्बॊल्स). अर्थात कोड्यांची उत्तरे पाठवायची झाल्यास पाठवणार तरी कशी? एकतर उत्तर पोचायला हजारो वर्ष लागणार, दुसरे म्हणजे अगदी पिन-पॊईंट केल्याशिवाय योग्य ठिकाणी उत्तर पोचले का हे कळायला काही मार्ग नाही. बरोब्बर महिन्याभरानी सिग्नल्स पुन्हा बंद झाले. एका महिन्यानी पुन्हा सुरु झाले आणि पुन्हा एक महिना चालले. असे होता होता एक वर्ष लोटले.

सुरुवातीच्या सिग्नल्सना मिळालेला प्रतिसाद तो प्रकार पुन्हा सुरु झाल्यावर बदलला होता. पण वर्षभर फक्त कोडी प्राप्त होतात म्हंटल्यावर त्यातील गंभीरता सामान्य जनतेच्या दृष्टिने पुन्हा कमी झाली होती. लोकांनी पुन्हा हे कोणत्यातरी टवाळखोर वैज्ञानीकांनी चालवलेला प्रकार आहे असे म्हणणे देखिल सुरु केले होते. त्यात कुणाच्या तरी लक्षात आले होते की संदेशलहरी प्राप्त होणे आणि थांबणे हे प्रत्येक पोर्णिमेला होत होते. त्यामुळे लोकांनी ते सर्व अनाकलनीय अशा नैसर्गीक शक्तिंना जोडुन विज्ञानाचे दफन जाहीर केले होते. अर्थात तोपर्यंत ते सिग्नल्स १२००० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका उद्रेक झालेल्या ताऱ्याजवळुन येताहेत हे कळले होते आणि त्यांचे वर्ष पृथ्वीच्या वर्षाशी जुळण्याची सुतराम शक्यता नाही या युक्तिवादाकडे त्यांनी सोईस्कर रित्या कानाडोळा केला होता. वैज्ञानीक मात्र या प्रकाराने खरच भांबावुन गेले होते. अनेकदा पृथ्वीच्या परिवलनाचे पडसाद वेगवेगळ्या पुथ:करणात अनाहु्तपणे सापडतात. पण त्या सर्व शक्यता कधीच तपासुन आणि निकालात काढुन झाल्या होत्या.

या अवकाशिय सिग्नल्स कडुन कबुलीजवाब मिळवण्याकरता तीन शक्तीमान संगणक बनवल्या गेले होते: वष्म, ग्रिन्त आणि हेर्षा. गणिती कोडे सोडवणे म्हणजे त्यांच्या माय्क्रोट्रॆन्झिस्टर्सचा मळ होता, पण जंक डि.एन.ए. प्रमाणे कोड्याच्या दरम्यान पसरलेल्या कोड्यांपुढे मात्र त्यांनी तुर्तास तरी हात टेकले होते.

पुढे एक वर्षभर शांतता होती, आणि पुन्हा रिसिव्हर्स जागे झाले. पुन्हा एक महिना सिग्नल्स, एक महिना शांतता असे एक वर्ष. तिच कोडी पण त्यादरम्यानचे संदेश वेगळे. पुन्हा एक वर्ष शांतता. असे सतत तीन वर्ष झाले. त्यानंतरच्या शांततेत स. शशिने तीन वर्षांचे संदेश तिन्ही संगणकांना वेगवेगळे दिले व त्यांचे एकत्रित विविधसंबंधदर्शक विश्लेषण केले. ते करताच सगळे एकदम जुळुन आल्याप्रमाणे त्यांना त्या परग्रहियांच्या भाषेची जणु एक किल्लीच अवगत झाली. ते ती भाषा कळवायचाच प्रयत्न त्या संदेशांमधुन करत होते. इतर पृथ्वीवासियांकरता ते संदेश हे तोपर्यंत केवळ कार्टुन्सचा व अधुन-मधुन एखाद्या नाटकाचाच विषय बनुन रहिले होते. या नव्या माहितिकडे देखिल बहुतेकांनी फारसे लक्ष दिले नाही.

पुढील काही वर्षे हळु हळु नवनव्या संदेशांमधुन खूप माहिति प्राप्त झाली. त्यातील बराच भाग अतिशय चमत्कारीक असा होता. ते लोक स्वत:ला अख म्हणवीत. आपल्यापेक्षा आकाशगंगेच्या मध्यभागाच्या ते बरेच जवळ होते. इतकेच नव्हे तर आसपासच्या ताऱ्यांच्या अधिक संख्येमुळे त्यांना उर्वरीत विश्वाबद्दलचे ज्ञान मिळवणे अतिशय कठिण होते. त्यात त्यांचे सुर्य हे बायनरी होते म्हणजेच ते एका ताऱ्याभोवती प्रदक्षिणा न घालता २ ताऱ्याभोवती फिरत. त्याचमुळे कदाचित पण पृथ्विपेक्षाही जास्त प्रकारचे अंधविश्वास तिथे फोफावले होते. दोन सुर्यांमुळे असेल पण त्यांचे ऋतु विचित्र आणि त्याचमुळे त्यांच्याकरता जास्त महत्वाचे. गुंतागुंतिच्या वातावरणात उत्क्रांत झाल्याने त्यांच्या एक जात म्हणुन जिवंत रहाण्याच्या दृष्टिने त्यांच्या नैतिक भावना देखिल जास्त प्रगल्भ होत्या. त्यात त्यांच्या एका सुर्याचा उद्रेक झाला. नशिबानी त्यावेळी दुसरा सुर्य मधे होता व त्याच्या मॆगनेटीक फिल्ड्मुळेच केवळ ते तात्पुरते बचावले होते. लवकरच त्यांना दुसरीकडे आसरा मिळवावा लागणार होता. उरलेल्या विश्वाचा मात्र थोडा अधिक भाग आता त्यांना ज्ञात झाला होता. त्यांच्या पुढच्या पिढ्या इतरत्र जीवसृष्टि शोधु लागल्या. मात्र त्यांनी स्वत:करता काही पक्के नियम बनवले होते. ज्या ठिकाणी जायचे तिथे वस्ती असल्यास नीट पुर्वकल्पना देऊनच जायचे. येवढेच नव्हे तर आपल्या व त्यांच्या रितिरिवाजांचे पालन करुन हा सर्व प्रकार करायचा.

पुढचा भाग अजुन चक्रावुन टाकणारा होता. काही अखांचे मत होते की दुसऱ्या ग्रहावरील लोक सजाण असतील तर त्यांच्या उत्क्रांतीत मुळीच ढवळाढवळ करायची नाही. तर इतरांचे मत होते की आपली जरी ती नैतीक मुल्ये असली तरी जर अखजातीचेच काही खरे नसेल तर निदान ती मुल्ये टिकवायला तरी आपण दुसऱ्यांबद्दल जरा बेफिकीर बनायला हवे.

या ठिकाणी पुन्हा काही वर्षांकरता संदेशांमध्ये खंड पडला होता. जणु पृथ्वीवासियांना, निदान स्वत:च्याच पापपुण्यात गुंतुन न रहाता लक्ष द्यायला ज्यांना वेळ होता त्या पृथ्विवासियांना, पुढिल संदेश पचवायची ताकद देण्याकरता. पुढचा संदेश होताच असा एक बॊंबगोळा. अखांच्या दोन्हि गटांनी तह करुन ठरविले होते की सजाण असले तरी अशा ग्रहवासियांना गरज पडल्यास उडवायला हरकत नाही जे स्वत:तच मश्गुल असतात. या सर्व संदेशामध्ये त्यांच्याकडिल शस्त्रांबद्दल ना काही माहिती होती, ना इतर ग्रहांबद्दल जिथे त्यांनी संदेश पाठवले असतील. सर्व एकतर्फीच असल्यानी तो संदेश सर्वदिशीय होता की केवळ पृथ्वीकरता नियुक्त हे ही नकळे. येवढे मात्र कळले होते की अजुन दहा हजार वर्षे - आणि हा आकडा २१ से.मी. तरंगलांबीच्या भाषेत सांगितल्या गेल्यामुळे कुणाची वर्षे हा प्रश्न नव्हता - तरी काही होणार नव्हते. अर्थात ते खोटे सांगत नसतील तर. अर्थात लगेच आलेच तरी करता येण्यासारखे किती होते काय माहित. एकच जमेची बाजु होती. अजुनही त्यांच्या दोन्हि गटांमध्ये नेमक्या कोणत्या ऋतूत आणि मुहुर्तावर मोहीम राबवायची हे ठरत नव्हते. सर्व महत्वाच्या गोष्टी ते पुर्वी दोन्हि सुर्य एका ठराविक स्थितीत असतांना करत. आता तर ते शक्य नव्हते. त्यामुळे जरा उशिर होत होता.

इतर पृथ्वीवासियांना हे सर्व सांगुन केवळ युद्धाचीच बोलणी ऐकावी लागली असती. वसुंधरेला स्वत:चे का प्रश्न कमी होते? शेवटी सर्व ग्रह आणि तेथील लोक सारखेच. शिरमन्त वरद आणि स. शशि यांनी वष्म, ग्रिन्त आणि हेर्षा यांना काय करणे शक्य आहे याची माहिति गोळा करायला सांगुन नुकत्याच सुरु होत असलेल्या पावसाकडे पहिल्यांदाच - की शेवटच्यांदा - धाव घेतली.

गुलमोहर: 

क्रमशः आहे का?

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

जबरदस्त ! ...सुरुवात उत्कंठावर्धक झालिये......प्रतिक्षेत.....

सम्पली. Happy

घाबरवू नका हो..

ग्रहवासियांना गरज पडल्यास उडवायला हरकत नाही जे स्वत:तच मश्गुल असतात
ती मुल्ये टिकवायला तरी आपण दुसऱ्यांबद्दल जरा बेफिकीर बनायला हवे
कोणत्या ऋतूत आणि मुहुर्तावर मोहीम राबवायची हे ठरत नव्हते. Happy सही.

जयंत नारळीकरांनंतर तुम्हीच.
तुम्ही धर्म व खगोलशास्त्र या दोन्हीत प्राविण्य मिळवले आहे, काय संबंध आहे का त्यांचा एकमेकांशी? Happy Light 1

ह्म्म्म्म आम्ही टिपीकल सायन्स फिक्शनच्या अंताची प्रतिक्षा करीत होतो ! Sad

बिनालढ्याचीच संपली ? Happy

तसं बरचसं चित्र क्लिअर आहे म्हणा! सही होती....धन्यवाद झिंगर Happy

मस्त आष्चिग. जियो. जियो.
दुसरा परिच्छेद कॉन्टॅक्ट बद्दल आहे ना? मलाही फार आवडतं ते. अर्थात तुमच्या इतके समजत नसणार मला खगोलशास्त्रीय बारकावे, तरीही. एकदा कॉन्टॅक्ट बद्दल लिहिणार का प्लीज ?

छान सुरुवात! Happy
जस की "युद्धस्य कथा रम्या:" तसच अगदी "या विज्ञान कथा" देखिल रमवतात! Happy
थोडी त्या सन्देशाची नमुना प्रत दिली अस्तित तर अधिक चान्गले वाटले अस्ते! Happy
पुढील भाग येऊद्यात लौकर! Happy

खासच रे ! ही विश्वामित्रापेक्षा जास्त आवडली.
>>> गुंतागुंतिच्या वातावरणात उत्क्रांत झाल्याने त्यांच्या एक जात म्हणुन जिवंत रहाण्याच्या दृष्टिने त्यांच्या नैतिक भावना देखिल जास्त प्रगल्भ होत्या. >>> तर इतरांचे मत होते की आपली जरी ती नैतीक मुल्ये असली तरी जर अखजातीचेच काही खरे नसेल तर निदान ती मुल्ये टिकवायला तरी आपण दुसऱ्यांबद्दल जरा बेफिकीर बनायला हवे. >>> सजाण असले तरी अशा ग्रहवासियांना गरज पडल्यास उडवायला हरकत नाही जे स्वत:तच मश्गुल असतात. >>> अजुनही त्यांच्या दोन्हि गटांमध्ये नेमक्या कोणत्या ऋतूत आणि मुहुर्तावर मोहीम राबवायची हे ठरत नव्हते. >>>
हे वाचता वाचता स्वतःशीच हसू फुटले Happy

    ***
    Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.

    लोकहो धन्यवाद. काही लोकांना कथा संपुच नये असे वाटत होते, पण संपवावी लागली. Happy ईसापच्या "निती" न आवडणे हे त्यामागचे कारण असावे बहुदा. किंवा गोष्ट ही गोष्ट म्हणुन न लिहिता असेच सुचलेले काही विचार
    गम्मत म्हणुन तसेच गुंफले म्हणुन असेल.

    नावांच्या दोन गमती करायचा प्रयत्न केला आहे. एक बालीश आणि दुसरा बारीक.

    रैना, कॉन्टॅक्ट वाचुन खुपच वर्ष उलटलीत. चिनुक्सने प्रवासी पुस्तकांचा केला आहे तसा साय-फाय चा बाफ बनवायला हवा म्हणजे त्यात इतरही पंखे उतरतील. की आधिच आहे तसे काही? Stanislaw Lem ची His Masters Voice नामक सुंदर कादंबरी आहे. त्यात मुख्यत: परग्रहावरुन आलेले संदेश आणि त्यांचा पृथ्विवर लावल्या गेलेला अर्थ हेच आहे.

    --------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद