शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले

Submitted by मृण_मयी on 8 May, 2009 - 02:23

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले
दे अर्थ आता जगण्यास; पुष्कळ झुलवून झाले

तुजवीण हाती काही न उरले माझे म्हणाया
बाकी जगावर केव्हाच पाणी सोडून झाले

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

अद्याप आहे अंतर जरासे, तृष्णा जरासी
अद्याप कोठे लज्जित कळीचे उमलून झाले?

नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

गुलमोहर: 

Pages