लावारिस

Submitted by सत्यजित on 8 May, 2009 - 02:13

गटार...,
दिवसभर दुर्गंधी वहात वाहणारं गटार...
रात्र होताच कसलीही तक्रार न करता तेही होत निवांत, स्थिर
त्या काळ्याशार पाण्यात दिसतं
चांदण्याचं मोहक प्रतिबिंब,
अगदी तुमच्या निळ्याशार समुद्रात किंवा
नितळ गंगेच्या पाण्यात दिसणार नाही इतकं मोहक

उद्या पुन्हा हे गटार वाहु लागेल,
रात्रीची घाण धुऊन, न्हाऊन, पुसून, टापटिप निघालेली लोकं
नाकं मुरडतिल त्याला पाहुन,
अगदी तशीच जशी मला पाहुन मुरडतात
दिवसभराचा कोलाहल संपला की
मी जाउन निजतो त्याच्या शेजारी
आणि मग पुन्हा
त्याच्यात आणि माझ्यात तेच चांदण फुलतं..
उद्याच्या सुखवस्तू स्वप्नांचं...

टापटिप लोक नावं ठेवत रहातात
त्यांचा समुद्र खराब झाला म्हणुन
ह्याचं येड्यांचही माझ्या सारखंच
कुणाचं पाप कुणाच्या माथी...

मी आणि माझं चंद्रमौळी गटार

-सत्यजित.

गुलमोहर: 

सुंदर Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

उद्याच्या सुखवस्तू स्वप्नांच... अजून किती आतला वेध घेणार आहेस भावा!!
मी आणि माझं चंद्रमौळी गटारं... ईथे थोडा बदल हवाय का रे? र वरचा अनुस्वार की झं च्या ऐवजी झी?

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" सुंदर. "

सत्या, जियो रे ! लाजवाब !

एकदमच वास्तववादी रे सत्या! सही आहे.

लावारिस - असामान्य, छान...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

व्वा! मस्त!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

'चंद्रमौळी गटार' ही रचना आवडली. पण अर्थाच्या दृष्टीने काही तांत्रिक चुक असेल तर माहिती नाही. (संदर्भ- चंद्रमौळी झोपडी)

बाकी कविता आवडली.. Happy

--
उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!

सत्या आवडली कविता

आणि मग पुन्हा
त्याच्यात आणि माझ्यात तेच चांदण फुलतं..
उद्याच्या सुखवस्तू स्वप्नांचं...>>> हे विशेष..

लगे रहो सत्याभाई

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

भिषण सत्य. चांगले रेखाटले आहे.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

चंद्रमौळी गटार , आवडलं.

सत्या,

साजिराला अनुमोदन. कविता चांगली आहे . नवीन शब्द कवींनी कॉईन करायलाच हवेत. विशेषणंही वेगवेगळ्या पध्दतीने वापरून पहायला हवी फक्त गटारीला चंद्रमुळी हे विशेषण योग्य होते की नाही (कवितेतील अर्थाच्या अनुषंगाने ) हे पहायला हवं.

धन्यवाद एक चांगला विचार मांडल्याबद्दल

छान कविता!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

सत्यजित,

Thought मस्त आहे. एक माझं वैयक्तिक मत सांगू का? कवितेनी स्वतःच स्वतःचं रूपक उलगडून सांगू नये.
म्हणजे उदा. 'अगदी तशीच जशी मला पाहुन मुरडता' किंवा 'ह्याचं येड्यांचही माझ्या सारखंच' या ओळी वगळून वाचताना मला जास्त मजा आली.

चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या फटींतून चंद्रप्रकाश आत येतो असं - घर/झोपडी/छप्पर.
या ठिकाणी 'गटार हे वास्तव - आणि तरीही त्यात येणारी स्वप्नं हा चंद्रप्रकाश' या अर्थी फार छान आला आहे हा शब्द. Happy

जबरी रे .. वाचलीच नव्हती. नव्या उपक्रमाचे आणि त्यात अशा कविता निवडून समोर ठेवणारे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत.

परागकण

इथे बरिच चर्चा झाली मी वेळे आभावि उत्तर नाही देउ शकलो नंतर आळस केला.

चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या फटींतून चंद्रप्रकाश आत येतो असं - घर/झोपडी/छप्पर.
या ठिकाणी 'गटार हे वास्तव - आणि तरीही त्यात येणारी स्वप्नं हा चंद्रप्रकाश' या अर्थी फार छान आला आहे हा शब्द. >> परफेक्ट स्वाती...

चांदण्याचं मोहक प्रतिबिंब,
अगदी तुमच्या निळ्याशार समुद्रात किंवा
नितळ गंगेच्या पाण्यात दिसणार नाही इतकं मोहक >> माझी स्वप्न फार साधी आहेत, साध्या मुलभुत गरजाची, आईच्या प्रेमाची, मायेच्या कुशीची, करुणेची आहेत. (निळ्याशार समुद्रात)कुणच्या द्वेशाची नाहीत, संपतीची नाहीत, ऐशोआरामाचीही नाहीत. (गंगेच्या पाण्यात) मोक्ष, मुक्ती, भक्ती असल्या सात्विक लोभाची पण नाहीत. माझा कुणावर राग नाही, लावारिस करणार्‍या ,जन्मदेणार्‍यांवरही नाही . कुणीतरी आपलं म्हणावं अशी ही अपेक्षा नाही, ह्या जगाने फक्त उगाच तिरस्कारानी पाहु नये, मी लावारिस असण्यात माझा काहीच दोष नाही. जसा गटाराचा ते घाण असण्याशी नसतो तसा.

अशा ह्या बिचार्‍या चिमुकल्या अनाथाच हे करुण स्वगत आहे.

स्वाती "कवितेनी स्वतःच स्वतःचं रूपक उलगडून सांगू नये." >>
माझं मत कवितेच्या बाबतित पुर्ण वेगळ आहे. मला स्वतःला ओपन एंडेड किंवा गुढ कविता आवडत नाहीत कींवा मला स्वतःला त्या निर्मितीचा आनंद मिळत नाही. कविता ही वाचताच कळावी आणि सर्वबोधी असावी हे माझं मत.

साजिरा आणि वैभव,
'चंद्रमौळी गटार' - चंद्रमौळी शब्दाचा अर्थ खर तर कफ्फ्लकता असा होतो, गरिबी असा होतो पण माझ्या मते त्या पुढे जाउन चंद्रमौळी या शद्बाचा अर्थ गरिबी आहे पण दरिद्री नाही. हा शद्ब मला नक्की आठवत नाही पण "ह्या झोपडित माझ्या" य कवितेतला आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात होती ही कविता कोणाची ( मधव जुलियन??) ते अजिबात आठवत नाही पण फार सुंदर कविता आहे, कुणाला माहीत असल्यास नक्की पोस्ट करा.

तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार.... !!!!

सत्या, वेगळ्याच रुपात .

अभिनंदन सत्या!
कविता आवडलीच पण चंद्रमौळी खरच विशेष. मला आठवतंय त्याप्रमाणे या झोपडीत माझ्या ही संत तुकडोजी महाराजांची कविता आहे. फार सुंदर आहे.

चंद्रमौळी - हा शब्द मला फार ताकदीचा वाटतो. तो केवळ एक "स्टेट" दाखवत नाही तर त्यापुढे जाऊन - का? कुणामुळे? जबाबदारी कुणाची? अशा प्रश्नांच्या वाटेवर वाचकाला वळवतो असं मला वाटतं. इथे तू फार फार अचूक वापरला आहेस!!

छान आहे