पॅरिसमधे पुरातन भारत... गीमे संग्रहायल

Submitted by सॅम on 21 April, 2009 - 18:12

तसा Indian म्हणुन ओळखला जाणारा भाग पॅरिसमधेही आहे... ला शापेल नावाचा. जिथे कोणिही हिंदी बोलत नाही, दुकानांबाहेर तमिळ वाघांचे (LTTE) फोटो लावलेले असतात. हे बघितेल्यावर समजलं की Indian म्हणजे भारतीय नाही तर Indian म्हणजे भारतीय उपमहाद्विपीय. त्यात पाकिस्तान आल, लंका आणि बांगलादेश आले. तसे तमीळ भारतीय आहेत या ठिकाणी पण मी अजुनही एखादे पंजाबी/गुजराथी दुकान शोधतोय (असायलाच पाहीजे नं, 'ती' लोकं तर सगळीकडे असतात!!)

पण हा लेख आहे पुरातन भारतावर. म्हणजेच पुरातन भारतीय वस्तु असलेल्या एका संग्रहालयावर. पॅरिसमधे तशी बरिच संग्रहायल आहेत. इथल्या महाराष्ट्र मंडळामुळे गीमे संग्रहायल पाहायचा योग आला. हे संग्रहायल तसे एवढ प्रसिद्ध नाही. इथे आशियामधल्या पुरातन (खासकर धार्मिक) कलावस्तु आहेत. एमिल गीमे यांनी १८८० दरम्यान केलेल्या प्रवासात या वस्तु फ्रांसमधे आणल्या.

इथे भारत, नेपाळ, तिबेट व कंबोडिया इथेल्या हिंदु कलावस्तु, तर भारत, तिबेट, चीन, अफगाणिस्तान व (सध्याचे) पाकिस्तान इथेल्या बौद्ध कलावस्तु आहेत. बर्याच गोष्टी फार पुरातन आहेत (९ वे शतक).

प्रामाणिकपणे सांगतो, आधी वाटलं आपल्याच जुन्या वस्तु पाहण्यात काय एवढ भारी?!! पण अर्ध्या तिकिटात, गाइड सकट संग्रहालय पाहायला मिळतय तर का सोडा (आता... आहे मी मध्यमवर्गीय!), पण दिवसाअखेर पटलं की योग्य निर्णय घेतला.

आत गेल्या गेल्या, पहिलंच दालन कंबोडियातील हिंदु कलाकृतींच. हिंदु साम्राज्याच्या वैभवाच्या काळात हिंदु (आणि नंतर बौद्ध) धर्म "शांततामय मार्गानी" कंबोडिया पर्यंत पोचला होता. इथे समुद्रमंथन, रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग दगडात कोरलेले पाहायला मिळतात. सर्व मुर्ती त्यांच्या (कंबोडिअन) पद्धतीच्या असल्यामुळे पहायला मजा येते!

समुद्रमंथन,
मध्यभागी वरती 'ब्रम्हा' त्याच्या बाजुला 'चंद्र' व 'सुर्य'; डावीकडे देव, उजवीकडे दानव; खाली 'विष्णू' कासवाच्या अवतारात ('कुर्म'), मंथनासाठी वापरलेल्या 'मंदर' नामक पर्वताला पाठिवर घेउन. 'लक्ष्मी' आणि इंद्राचा घोडा मंथनातुन बाहेर येताना.

रामायण: सुग्रीव-वाली,
डावीकडे राम व लक्षुमणाबरोबर वानरराज सुग्रीव; मधे सुग्रीव-वाली लढताना; उजवीकडे वालीचा वध.

सुंद-उपसुंद,
सुंद-उपसुंद हे भाउ 'तिलोत्तमा' या अप्सरेसाठी भांडताना. 'तिलोत्तमा'ला ब्रम्हदेवानी पाठवले या दोघांमधे भांडण लावायला कारण ब्रम्हदेवानीच दिलेल्या एका वरामुळे ते दोघे अमर झाले होते (पण ते एकमेकांना मारु शकतील असा clause होता त्या वरात!)

यातील बरीच शिल्प 'अंगकोर' इथल्या मंदिरातील आहेत. मला बर्‍याच वर्षांपासुन ह्या मंदिराबद्दल उत्सुकता आहे (श्रेयः डिस्कव्हरी वाहिनी) चिक्कार मोठं मंदीर आहे म्हणे, जंगलाच्या मधे. अशीच शिल्प काही इंग्लंडमधे असतील, काही अमेरिकेत... मग अंगकोरमधे काय उरलं असेल? आणि तरी देखिल तिथे अजुन शिल्प असतील तर मुळात किती तयार केली असतील?!!

पुढचं दालन होतं आपल्या (भारतातल्या) शिल्पांच. या वस्तुंमधे बर्याच आपल्या देवाधिकांच्या अत्यंत सुंदर मुर्ती आहेत.

खालील फोटो: ब्रम्हा,

खालील फोटो: नटराज (११वे शतक, तामीळनाडू) शंकर, वैश्विक नर्तकाच्या रुपात

सहजच मला वाटले की ह्या मुर्ती 'आपल्या' आहेत.. त्या भारतात असायला हव्या होत्या! ह्या आपल्या वस्तु या लोकांनी चोरल्या(?) असं आत्ता म्हणणे सोप्पे आहे.. पण त्या वेळी आपण सरळ सरळ हारलो (कारण काही का असेना) आणि त्यामुळे ह्या लोकांना 'आपल्या' मुर्ती इथे आणणं शक्य झालं, मग आपल्याला आत्ता असे म्हणण्याचा हक्क नाही.

आता मला कळले की इजिप्तच्या लोकांना त्यांच्या 'ममीज्' दुसर्‍या देशातील संग्रहालयात बघुन काय वाटत असेल!

तर, मी म्हणत होतो त्याप्रमाणे या मुर्ती 'आपल्या' आहेत असे मी म्हणु शकणार नाही ('होत्या' हे खरं!), पण तसे मानले तरी पुढचा प्रश्ण हा पडतो (मलातरी पडला) की, ह्या मुर्ती आपल्याकडेच राहिल्या असत्या (आणि काही धर्मांध बादशहांच्या नजरेतुन सुटल्या असत्या) तर आत्ता यांची स्थिती काय असती? दोन पर्याय आहेत, एकतर शेंदुर फासुन ठेवला असता, (ती मुर्ती न रहता त्याचा देव झाला असता), किंवा, कुठेतरी दुर्लक्षित मंदिरात, त्या मुर्ती पाहायला कुणी गेलेच नसते. मी स्वतः पाहिली आहेत ही उदाहरण, कार्ले/भाजेची लेणी पहा, एका लेण्याचं मंदिर केलेलं तर बाकी दुर्लक्षित! लोणारला देखिल, एका मंदिरात मुर्तीला शेंदुर फासुन ठेवलाय, त्याबरोबर त्या मंदिराची रंगरंगोटी, ढिगभर फोटो, देणगिदारांची नावे, मोठ्या आवाजातली भजनं या सगळ्यात मूळ मंदिर, मुर्ती कुठल्या कुठे हरवून जाते. एक मंदीर असं तर बाकी भग्नावस्थेत... देव्हार्‍यात अंधार आणि वटवाघुळं... का, तिथे देव नाही?

जाउदे (घिसा पिटा विषय आहे हा), तर सांगायचा मुद्दा हा की शेवटी असं वाटलं, ह्या कलाकॄती इथे आहेत तेच चांगल आहे... त्या निमित्ताने इथल्या लोकांना आपले (गत)वैभव बघायला तरी मिळते. नाहीतर या लोकांना वाटत भारत, माफ करा, इंडिया, म्हणजे फक्त गरीबी, झोपडपट्टी, जातीय दंगे आणि call centers (जय हो!!)

या सार्‍या मिश्रभावनांनी मी आपल्या देवादिकांच्या मुर्ती बघत होतो. मला मुळातच हे असलं सगळ पाहायला आवडतं. त्यातला काही आभ्यास आहे किंवा विशेष कळतं अशातला भाग नाही! पण आवडतं.

तर, हे पण दालन संपल. आता पाय बोलायला लागले होते आणि वरती अजुन दोन मजले होते. तरी मोर्चा पुढल्या मजल्यावर वळवला. पुढे, नेपाळ मधिल पुरातन कलाकॄतिंमधे एक वेगळीच गोष्ट बघितली, मोठ्या कापडावर काढलेली चित्र-मालिका, एखाद्या comics प्रमाणे! या पुरातन कॉमिक्समधेही पहिले चित्र गणपतीबप्पांचे!! गणरायाच्या नमनानेच गोष्ट सुरु.

पुढे, बौद्ध कलाकॄती नुसत्या चीन व तिबेट इथल्या नसुन, अफगाणिस्तान व (आत्ताचे) पाकिस्तान इथल्या देखिल.... या तालिबानी प्रदेशात शेकडो वर्षांपुर्वी बौद्ध धर्मानी अहिंसा व शांतीचा संदेश पसरवला होता यावर कोणाचा विश्वास बसेल?

खालील फोटो: बोधिसत्व (काळः इ.स. १०० ते ३००) गांधार (पाकिस्तान)

पुढे पुढे शेवटची दालनं उरकत पुन्हा भारतीय दालनापाशी आलो. इथे शिल्प नसुन दागिने, कपडे अशा एकंदर कलाकुसरीच्या वस्तु होत्या, प्रामुख्याने राजस्थानी. फार जुन्यापण नव्हत्या. मला तर वाटलं माझा लग्नातला शेरवानी ड्रेस आणला असता तर यांनी तो पण ठेउन घेतला असता. इथे आमच्या गाइडने मजेदार गोष्ट सांगितली. "आपल्याकडे इंग्रजांचे राज्य असताना, समाजातील काही घटक त्यांना (इंग्रजांना) विशेष मान देत आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करत. त्यातुनच इंग्रजी पेहेरावातील काही खुबींचे अनुकरण झाले. त्यातील एक म्हणजे मानेभोवतीची ताठ कॉलर (शेरवानी/नेहरु शर्टची असते तशी). कालांतराने इंग्रजानी ही पद्धत सोडुन दिली आणि आता ही स्टाईल खास भारतीय म्हणुन ओळखली जाते.

मला विश्वास आहे की फ्रेंच लोकांना हे संग्रहालय म्हणजे एक अजायब घर वाटत असणार! फ्रेंचांचे भारतज्ञान आणि भारतीयांचे फ्रेंचज्ञान दोन्ही अगाघ आहे. मला फ्रांस व फ्रेंच लोक यांच्याबद्दल कीती कमी माहीती होती ते इथे राहिल्यावर जाणवल. जास्त तर गैरसमजुतीच होत्या. माहीती तशी फक्त एकच, की पॅरिसमधे आयफेल टॉवर आहे. बस. बाकी शुन्य.

तस फ्रेंचांना पण आपल्याबाबतीत जास्त माहीती नाही. 'श्री गणेश' तेवढा सगळ्यांना माहीतीये कारण प्रत्येक इंडियन (भारतीय नाही इंडियन) हॉटेलात तो असतोच! हाइट म्हणजे, माझा बॉस मला खास फ्रेंच हॉटेलात घेउन गेला तर त्या हॉटेलमालकाने मला गणपतीची पितळ्याची मुर्ती आणुन दाखवली. तो (म्हणजे मालक... गणपती नाही) मुंबइत ताजमधे शेफ होता काही वर्ष. भारतीय जेवणाबद्दल अजुनही त्याच्या मनात धसका आहे! ती मुर्ती त्याने बारवर ठेवली होती! आता काय सांगायच याला...

फ्रेंच लोकांना भारताबाबत माहीती म्हणजे, माहात्मा गांधी आणि जातीव्यवस्था. इंफोसिस देखिल माझ्या कंपनीतल्या लोकांना माहिती नाही. (आता बोला, आणि मी संगणक क्षेत्रात काम करतो!)

तर हे संग्रहालय भारताबद्दल कुतुहल तरी नक्कीच निर्माण करत असेल. मझ्या ज्ञानातही यामुळे भर पडली, भर पडली म्हणण्यापेक्षा उजळणी झाली असं म्हणु!

बाकीचे फोटो: पिकासावर पहा.

गुलमोहर: 

छोटीशी पण छान सफर! आश्चर्य वाटले या सगळया गोश्टी तिथे आहेत हे बघून!
<<<< ह्या मुर्ती आपल्याकडेच राहिल्या असत्या (आणि काही धर्मांध बादशहांच्या नजरेतुन सुटल्या असत्या) तर आत्ता यांची स्थिती काय असती?>>>> हे ही खरेच!!
फुलराणी

खरच सॅम, मला कुणी तरी सांगीतलं होतं की इंडीया ह्या शब्दाचा संदर्भ आता अख्ख्या एशियन (पराभूत)संस्कृतीशी जोडला जातो.

Most natives are called Indians. Eg: Paki, US Native tribes

समीर, खूप छान माहिती दिलीस. मला पॅरीसमध्ये हे असं काही संग्रहालय आहे हे माहित नव्हतं. किंबहुना माझ्या ओळखीचे सतराशे साठ फ्रेंच लोकं असूनही त्यातल्या एकानेही मला ह्या बद्दल सांगितलं नाही कधी. नाहीतर मीही फ्रांसमध्ये असताना कधीतरी ते पाहून यायचा प्रयत्न केला असता. असो. परत भेटीचा योग येईल की नाही माहित नाही. पण तू फोटोरुपाने छोटी पण छान सफर घडवलीस. धन्यवाद. Happy
Arc de Triomphe पासून Eiffel tower कडे येणार्‍या Rue d'Iena वर आहे का कुठे हे संग्रहालय ? तो रस्ता मी पहिल्या पॅरीसभेटीत पायी पार केला होता. जर त्याच रस्त्यावर असेल तर मी ह्या क्षणी खूप हळहळत आहे की इतक्या जवळ जाऊन आले आणि तरीही तिथे असलेली भारतीय शिल्प बघायचा योग नव्हता.. Sad

वा! फारच सुंदर आणि नाविन्यपूर्ण माहिती दिलीत. खूपच इंटरेस्टिंग...फोटोंनी आणखी मजा आली. धन्यवाद.:)
माहीती तशी फक्त एकच, की पॅरिसमधे आयफेल टॉवर आहे. बस. बाकी शुन्य <<< अगदी अगदी. आम्ही पॅरिस ला एकदा नाही दोनदा फिरुन आलो पण असं काही असेल ह्याची साधी कल्पना पण नव्हती.
जर त्या मुर्ती भारतातच राह्यल्या असत्या तर काय झाले असते ह्या बद्दलच्या तुमच्या मतांशी सहमत.

आवडला लेख.
---------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......