सातवेळा जगभ्रमण करून आलेला सिंदाबाद आता पुन्हा ताजातवाना झाला होता. बराच काळ लोटला होता. त्याच्या सफरीला जग पूर्ण बदललं होतं. जागा, संदर्भ, माणसं सगळंच ! सिंदाबाद पुन्हा निघाला नवं जग पहायला, अनुभवांचे गाठोडं वाढवायला आणि का कोणास ठाऊक पण येऊन पोहोचला कोल्हापुरात !त्याला कोल्हापुरी दणका बसला असता तो टोलनाक्यावरच पण घोडयावरून येत असल्याने सहीसलामत सुटला. कोल्हापुरात त्याचे आगमन तसे वेगळयाच प्रकारे झाले. पुलावर आला आणि नदीमातेला नमस्कार करावा म्हटला तर नदीतील प्रदुषणाने त्याचे हात छातीवर जायच्या ऐवजी नाकावर आणि कानावर गेले. ठिकाय म्हटला असेल कांही तरी प्रॉब्लेम ,म्हणून पुढे जाणार तेवढयात एक मर्सिडीज् पुण्याकडे सुसाट वेगाने आली. या गाडयांपुढे आपला घोडा काय कामाचा नाही हे दुरदृष्टया माणसानं सहज ओळखलं आणि घोडा तिथंच सोडून तो पायी कोल्हापुरात अवतरला.
एव्हाना एमएच-09 मर्सिडीज बेंझवरून त्याने माणसांविषयी अंदाज बांधायला सुरूवात केली होतीच. सहज जाता जाता पोहोचला तो कावळया नाक्यावर. रणरागिणी ताराराणीचा तो अश्वारूढ पुतळा, आवेश पाहून, त्याला स्वत:चीच लाज वाटली. तसाच पुढे आला तो डायरेक्ट हॉटेलात घुसला. हा ! काय हॉटेल वा ! 5-6 मजली चकमकीत, लखलखीत 200 दिव्यांनी चमकणारे. येताना लोड शेडींगचा बोर्ड का लागला हे त्याला लगेच समजले. हॉटेलवर कार्यक्रम सुरू होता. मैफिली रंगत हात्या. एव्हाना त्याचं समाजवादी पित्त खवळलेलं होतं. एवढे पैसे उधळताय, तर गोरगरीबांचे काय ? त्यांनी जगायचं कसं. तर, थोडा पुढे आला आणि त्याला गावठी धाबा दिसला. तोही हाऊसफुल्ल. समाजातल्या प्रत्येक थरातील लोक तिथे रस्स्याचा आस्वाद घेत होते. असं भन्नाट चित्र तो पहिल्यांदाच पाहत होता. स्टॅण्डवर घेऊन आलेल्या के.एम.टी. त चढू लागला. पण या गर्दीत आपण सपाट होणार नाही ना, अशी साधार भिती त्याला वाटू लागली. एवढयात कोल्हापूरी चप्पल घातलेला भारदस्त पाय त्याच्या पायावर पडला. तो किंचाळलाच, पण, बसमधल्या गांवरान गप्पात ते किंचाळण समोरच्यालाही ऐकू गेल नाही. कांही वेळानं त्या मिशीवाल्या माणसानंच त्याला बसायला आपली जागा देऊ केली. मगाशी पाय देणारा कोल्हापूरी खरा वा माणुसकीचा वसा दाखवणारा कोल्हापूरी खरा.त्याला पडलेला हा पहिला प्रश्न. दे धक्का म्हणून कोल्हापूरी धक्के त्याला जोरातच बसू लागले होते. कांही वेळाने तो त्या कलाकलाटाला कंटाळला. शेवटी, त्या पारावरल्या गप्पा पण, याला पारचं माहित नाही. तर, त्या चर्चाचे महत्व त्याला कसं समजणार बुवा ? तो थेट पोचला राजारामपुरीत. सगळं कसं शांत. घरापुढं चार चाकी, टुमदार घर आणि आत एन.आर.आय. चे पालन झाल्यावर एकापेक्षा एक मॉल आणि त्यात ही गर्दी. एकाचा धक्का लागला म्हणून बघतोय तर काय ? एवढसं पोरगं हायबुसा( एक महागडी दुचाकी) वरून पुढच्या गल्लीला पोहोचलेलं याचा पोटातले कावळे आता काव, काव करू लागलेलं. कोणत्या तरी विचारलं. आणि सरळ पोहोचला. फडतरेंच्या दुकानात बघतोय तर या गाडया. नॅनोपासून मर्सिडीजपर्यंत, सायकलीपासून होंडापर्यंत आणि सगळे गर्भश्रीमंत मिसळीची प्लेट कधी मिळते याची वाट बघत बसलेले. याने जागा मिळवली, मिसळ खाल्ली. पण अशी तिखट मिसळ नी भाजलेली जीभ शांत व्हायचं नांवच घेईना. शेवटी तसाच तो आला शाहू मिलपाशी. जुन्या काळचं कांही तरी दिसतंय म्हणून भोंगा वाजवायला गेला. पण वाजता वाजेनाच. अहो, एवढया दिग्गजांनी एवढा प्रयत्न करून तो बंद पाडला ते पुन्हा वाजू देण्यासाठी ? त्यामुळे तो तिथल्या एका बागेत गेला आणि झाडाखाली एक रात्र काढली. सफरचंद कांही पडलं नाही त्याच्या डोक्यावर पण डेरेदार वृक्षाखाली, छान शांत झोप लागते. असा शोध मात्र त्याला नक्की लागला.
दुसऱ्या दिवशी ताज्या मनानं तो उठला. उद्यमनगरातल्या आवाजाला तो कंटाळला आणि थेट घुसला ते शाहू स्टेडिअममध्ये. बघतो तर काय ! गर्दीचा महापूर. फूटबॉलचा सामना रंगात आलेला. दोन्ही बाजूंनी जल्लोष. इथेच त्याला कांही नवीन शब्द (शिव्या) समजले. पण" काटा कीर्रऽ" याचा अर्थ त्याला शेवटपर्यंत लावताच आला नाही. एवढयात काय झाले कोणास ठाऊस ? पण एक दगड त्याच्या डोक्याला लागला. पाहतो तर काय दोन मंडळात जुंपली होती. दगडांचा वर्षाव सुरू झाला होता. पण पोलीसांनी थोडयाच वेळात सगळयांना शांत केले होते. इर्षेचा असा उद्रेक त्याने मँ.यु. व चेल्सा यांच्या सामन्यातही पाहिला नव्हता. वेळ जात होता तशी बक्षीसांची संख्या वाढत होती. एखादा सामान्य माणूस देखील हजार हजार रूपयांचे बक्षीस लावत होता. बक्षीस लावणारा चेहरा व त्याची रक्कम यांचा कांही मेळ जमत नव्हता. व्यक्तीच्या मानाने ती फारच मोठी रक्कम होती. एवढयात खेळाडू जखमीही झाला पण खेळ चालूच राहिला. पण त्याच्या नजरेतून हे सुटले नाही कीं, त्या जखमी खेळाडूला उचलणारे दोन खेळाडू हे त्याच्या विरूध्द संघातील होते. आणि त्याच क्षणी त्याच्या डोक्यात एक नवा प्रश्न उभा राहिला. मगाशीचं भांडण खरं की आताची मदत. त्याला तर कांही समजेनासेच झाले होते. म्हणूनच तो त्या गर्दीत शिरला आणि मातब्बरांची मते ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. फूटबॉल इथल्या नसा नसात भिनलाय हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तसाच तो केशवराव भोसलेत गेला. नव्वद वर्षाचे जुने नाटयगृह एवढयाशा गांवात आणि तेही एवढे सुसज्ज ! व्वा ! त्याला शेक्सपिअरच आठवला. आणि योगायोगाने नाटयगृहात शिवाजी सावंतांचं व्याख्यान चालू होतं. त्या व्याख्यानाने तो इतका भारावला कीं, त्याला आपण काय ऐकलंय आणि ते काय होतं हे समजायला एक क्षणही लागला नाही. भाषा समजत नसूनही तो गेला खासबागेत. त्यानं कुठं तरी वाचलं होतं कीं, ऑलिम्पिक पदक मिळवणारा मल्ल येथे खेळलाय म्हणे. पण बघतोय तर काय आत लावणीचा फड. पुन: एक प्रश्न ही एक ऐतिहासिक जागेची आबाळ मानायची की ती जागा टिकावी म्हणून केलेला हा केविलवाणा प्रयत्न. तसाच खाली उतरला. मनात प्रश्नोत्तरे चालू होतीच. एवढयात त्याला दोन-तीन हायाबुसा थांबलेल्या दिसल्या. एवढयाशा गांवात हायाबुसा त्याला कांही कळेचना. आणि त्या गाडीवर बसून, दोन पोरं कागदातून कांही तरी खाताना दिसली. त्याला कांही समजेना म्हणून तो तिथं गेला आणि त्यानंही तो पदार्थ घेतला त्याला पण जाम आवडला. एक नाही दोन-तीनदा खाल्ली. तिथं पडलेल्या कागदाच्या कपटयात तीन-चार कपटाची भर घालून तो राजाभाऊच्या गाडीपासून हालला.
असेच दिवस जात होते. कोल्हापूर तसे दिलदार शहर. त्यामुळे खायची आणि झोपायची सोय कुठेना कुठे होत होतीच. तर एके दिवशी असाच तो भवानी मंडपात गेला. चांगली सात वेळा जगप्रदक्षिणा केलेला हे बेणा तिथल्या भुशाच्या वाघाला पाहून घाबरला. तिथून जो निसटला तो थेट महालक्ष्मी मंदिरात उन्हानं पाय भाजत होतेच. पण, ती कलाकुसर मनप्रसन्न करणारी ती भक्ती एवढं पाहून तो इतकंच म्हणाला आमचं पॅलेस झक मारलं. तिथं किती वेळ गेला ते त्याला कळालंच नाही. तसाच रोडवर आला. पाहतो तर ही गर्दी. त्याला वाटले संध्याकाळचे सात वाजले असतील पण घडयाळात पाहतो तर रात्रीचे अकरा. एवढी प्रचंड गर्दी आणि सगळी कांही शिस्तीत चालू होतं. एखादा हॉर्न सोडल्यास प्रत्येक जण शांततेत आणि मजेत चालला होता. पवित्र स्थानाजवळच्या पवित्र परिसराचं पावित्र्य बऱ्याच अंशी जपलेलं होते. त्या लोंढयातून तो गुजरीत गेला. किती ते सोनं. आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली तो असाच फिरत होता. फिरता फिरता कुंभार गल्लीत कलाकुसरी करणारे छोटे हात त्याने बघितले. अगदी सहज वाजणारा ढोल ताशाही बघितला. खडयाखडयातून जाताना दोन-तीन वेळा पाय देखील मुरगळला. पण कट्टयावरचं दुध प्यायल्यावर अंगात दहा हत्तीचं बळ संचारलं.
कधी नैसर्गिक स्पीड ब्रेकर (म्हैस) त्याला समजलाच नाही. तर कधी डिजीटल बोर्डांची संख्या मोजताना गणितच चुकलं. अजय कसबेकर या गुणवान शास्त्रज्ञाचे घर पाहून उडणाऱ्या पंखांना कोणीच रोखू शकत नाही. यांवरचा त्याचा विश्वास अधिकच दृढ झाला. दुधाळीवर जाऊन त्याने नेमबाजीही पाहिली. तेजस्विनी सावंतची, नवनाथची गोळी आपल्याला बसली नाही म्हणूनच सुखावला. कोण्या गांव वाल्याने त्याला पाहुणा समजून रंकाळयावर नेले. त्याच्या डोक्यात या मैदानाचे नांव काय असा प्रश्न येत होताच. पण त्या शहाण्या माणसाने सिंदाबादला रंकाळयाचा इतिहास आणि वर्तमानही सांगितले. इंग्रजांची दूरदृष्टी कमीच पडली. असे त्यांना मनोमन वाटते. त्याच रस्त्याने राधानगरीस गेला. तिथली हिरवाई बघून आला. हिरवाईतलं पिवळं पण त्याला खुपलं. पण तिथलीच गवयासारखी तगडी माणसं त्याला भावली. जोतिबाच्या गर्दीत चेंगरला गेला. त्या गुलालाच्या भाऊक स्पर्शातील आस्था तो विसरू शकला नाही. सावंतांचे व्याख्यान त्याने ऐकले होतेच. तेंव्हापासून पन्हाळयावर जायचेच हे तर त्याने ठरवलेले होतेच. असाच एक दिवस तिथंही गेला. पण त्याच्या नजरेस फुटलेल्या काचाच फक्त दिसल्या. तो मनोमन वरमला. पण तेंव्हा त्याने कोणाच्या तरी तोंडून इतिहास देखील ऐकला. क्रांती फक्त अमेरिकेतच होत नव्हती हे त्याला इथे समजले.
माणसाची दिलदारी, खुजेपणा, रांगडेपणा, भाऊकपणा, हुषारी, अचूकता हे सर्व गुण एकाच ठिकाणी पाहून त्याची मती कुंठीत झाली. त्याला विचार करायला वेळ पाहिजे होता. शेवटी रंकाळयावर गार वारा घेत बसला. थोडं शांत वाटलं त्याला. तिथेच त्यानं केंदाळ काढणारे स्वयंसेवक पाहिले. हा प्रश्न कधीना कधी तरी सुटेल असे त्याला वाटून गेले. तेथून पेठेत आला, तर जोरजोरात भांडणं चाललेली. त्याच्या डोक्यात आता तर शिव्यांचा नवा शब्दकोषच तयार झालेला होता. रस्त्यावरचं रणांगण पाहून तो पळून गेला आणि दुसऱ्या एका गल्लीत शिरला. तिथं कोणाला तरी कांही तरी लागलं होतं. म्हणून अख्खी गल्ली जमली आणि त्याला जागतिक संशोधन करणाऱ्या पत्कींकडे न्यायचा विचार करत होते. पुन: तोच प्रश्न नक्की खरं काय ? तसाच बाहेर पडला. सहकाराचा पराक्रम बघून आला. बुडालेल्या पत संस्थांही पाहून आला. पोस्टरवर इतक्यांना नेते भेटलेले होते त्यामुळे प्रत्यक्ष भेटायची गरज उरलेलीच नव्हती. खरं तर या फलकांची त्याला किळस आलेली होती. पण याच भाऊ गर्दीत त्याला राजगुरूंची आणि विवेकानंदांची माहिती सांगणारे फलकही दिसले. थोडा खुषावला.
दिवसावर दिवस जात होते. अख्खं कोल्हापूर फिरला. कधी अंगावर काटा आला तर कधी खिन्नही झाला. शेवटी एकदा बघून घ्यावी म्हणून महापालिकेतही शिरला. ते गलिच्छ राजकारण. ती फेकाफेकी यांमुळे कुठेन येथे आलो. असे त्याला वाटले. पण एखादा खरी कळकळ असणारा नगरसेवकही त्याला इथेच दिसला. टेबलावरचे आणि टेबला खालचे दोन्ही हात त्याने बघितले. देशोदेशी मातीच्याच चुली. हे सत्य त्याला पचवायलाच लागले. शेवटी शाहू महाराजांच्या प्रतिमेला नमन करून तो परतीच्या वाटेला निघाला. किती दिवस गेले हे त्याचे त्यालाच समजले नाही. या दिवसात त्याने खूप कांही मिळवले होते. अभिजीत कोसंबीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्याने ऐकले होते. संतोष शिंदेच्या विनोदावर खो खो हसला देखील होता. सिनेटोनमधला प्रसंग पाहून डोळयातील अश्रू देखील आले होते. दंाडपट्टा पाहिला. फूटबॉलचा ज्वर पाहिला. बारा-बारा तास भारनियमन पाहिले. सहकाराची किमया पाहिली. खड्डे पाहिले. अख्ख्या कोल्हापूरचा पुरेपूर अनुभव घेतला. आणि महत्वाचं म्हणजे माणसाला माणसाशी जोडणारी माणुसकीची नाळ त्यांनं इथंच पाहिली आणि अनुभवली.
हळूच सिंदाबाद गांवाच्या बाहेर पडला. आपल्या घोडयावर स्वार झाला आणि पुढच्या वाटेला निघून गेला. सात विश्वसफरीत त्याने अनेक बरे वाईट अनुभव घेतले. या अनुभवांचे त्याने सारासार बुध्दीने विवेचनही केले होते. तसाच तो विचार करू लागला. आपली ही सफर नव्या जगातील या जगात भावनांना स्थान पैशानंतर अशाच संस्कृतीत सामावणारं हे एक साधंसं गांव. या गांवात काय नाही ? पैसा आहे. सत्ता आहे, भ्रष्टाचार आहे. समस्या देखील आहेत. पण महत्वाचं म्हणजे, या गांवात यंत्र न झालेली माणसं आहेत. त्यांचा भावना आहेत. आणि ती जपणारी एक छानशी संस्कृती देखील आहे. माणसाला माणूस म्हणून जगायची संधी आहे. एकूण काय तर सगळयात असून, सगळयांपेक्षा वेगळे असेहे महालक्ष्मीच्या सहवासाने पावन झालेले कलापूर, कोल्हापूर आहे. साऱ्या मानवी जगाचं न उलगडणारं कोडं इथं कांही प्रमाणात उघडलेलं आहे. अशा एकना अनेक गोष्टी त्याच्या मनात येत होत्या. तो पुढे पुढे सरकत होता. पण मन मात्र कोल्हापूरतच रमलं. आणि शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........
आवडलं
आवडलं तुमचं कोल्लापूर
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
मस्तच रे!
मस्तच रे! तोड्लयस रे...भारी...!
मुलगा, तू
मुलगा, तू कोल्हापुरचा आहेस एवढं नक्की कळलं...:)
छान
छान लिहीलय.
मुलगा, छान
मुलगा,
छान लिहिलेय ,कोल्हापुर फिरुन आलो असे वाट्ले. पण एक प्रश्न आहे...अभिजित कि प्रसनजित कोसंबी.?
माझा आवड्ता गायक आहे इंडियन आयडल मधिल...
चु.भु.मा.
छान ओळख
छान ओळख करून दिलीस कोल्हापूरची.. एकदम नाद खुळा... काटा किर्रर्र....
(No subject)
छान उतरलय.
छान उतरलय. शेवट पण मस्त.
सह्हीच
सह्हीच मित्रा..
अभिजित कि प्रसनजित कोसंबी.?>>>
तो अभिजीतच आहे...अभिजीत कोसंबी हा झी सारेगमा मराठी चा पहिला winner आहे..आणी प्रसेन्जित कोसंबी त्याचा धाकटा भाउ कि जो Indian Idol मधे आहे
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
वा मर्दा...
वा मर्दा... छान.
(No subject)
केदार
केदार धन्यवाद,
>>>अभिजीत कोसंबी हा झी सारेगमा मराठी चा पहिला winner आहे..आणी प्रसेन्जित कोसंबी त्याचा धाकटा भाउ कि जो Indian Idol मधे आहे
हे मला माहितीच नव्हते. झी सारेगम पाहिलेच नाहि कधि
आभारी
आभारी आहे
पण माहीतीसाठी
त्या दोघांपैकी प्रसेनजीत हा मोठा आहे तर अभिजीत लहान खुप जणांचा गैरसमज आहे हा
आणि हो ही माहिती पुर्ण सतय आहे कारण मी आणि ते दोघे चार वर्षापुर्वी एकत्र गाणे शिकायचो मी गाणे सोडले त्यामुळे आता भेट नाही
बाकी पहिल्याच लिखाणाला दीलेल्या प्रतीसादाबद्दल आभारी आहे
पुन्हा
पुन्हा एकदा वाचलं.
आवडलं.
छान
छान
या गांवात
या गांवात यंत्र न झालेली माणसं आहेत. त्यांचा भावना आहेत. आणि ती जपणारी एक छानशी संस्कृती देखील आहे. माणसाला माणूस म्हणून जगायची संधी आहे. एकूण काय तर सगळयात असून, सगळयांपेक्षा वेगळे असेहे महालक्ष्मीच्या सहवासाने पावन झालेले कलापूर, कोल्हापूर आहे>>>>>
काय भारी लिवलासा हो. लई आवडल. आमच्या कोल्हापुर सारख गाव आणि माणस कुठच नाहीत.:)
......................................................................................................
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन.
सही
सही एकदम....मस्त

..............................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही...
व्वा!!फारच
व्वा!!फारच छान मराठी मुला....अगदी मस्त ट्रिप करवून आणलीस घरची............पन्चगन्गेचे नाव वाच्ल्याबरोबर मी कधी आपल्या कोल्हापूरात पोहोचले कळलेच नाही...आणी शेवटपर्यन्त फिरतच होते......
तुझ्या लेखाबरोबर...
छानच मित्रा!!! लगे रहो.
फुलराणी
अहाहा काय
अहाहा काय बहरला आहेस रे .. मस्त लिहीलं आहेस. खुसखुशीत !!
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)
सही लिहिलं
सही लिहिलं आहे.
आवडलं.. 
पण सिंदाबाद की 'सिंदबाद'?
--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?
वा : मराठी
वा : मराठी मुला..
मस्तच लिहिलं आहेस. कोल्हापूरबद्दल. हल्ली खूप उत्सुकतेने वाचत असतो.
सीमा,
आमच्या कोल्हापुर सारख गाव आणि माणस कुठच नाहीत
याचा अनुभव घेईन लवकरच.पण नक्की तू म्हणतेस तसंच असेल कोल्हापूर!
आवडलं.
आवडलं. सिंदबादला घेऊन कोल्हापुराची सैर, हि कल्पना आवडली.
छान रे
छान रे मराठी मुला...............मस्तच !
वा !! काय
वा !! काय झकास लिहीलंय ... मी सलग सात आठ वेळा वाचलं .. आणि दर वेळेस मला अजुन अजुन जास्त आवडलं .. फार छप्परफाड लिहिलंय .. एक नंबर दोस्ता !! तु आणि तुझे कोल्हापुरही !!
वरील सर्वांशी सहमत आहे !! अजुन असेच लेख येऊ द्यात !!
- यमदूत
मी पण
मी पण कोल्हापूर फीरुन आलो रे तुझ्यासोबत, खूप छान वर्णन आहे.
नाद्खुळा
नाद्खुळा लिवलाइस भावा.... लई भारी... जाग्यावर पलटीच की..
नाद खुळा
नाद खुळा रे,मजा आली एकदम मस्त फेरी झाली कोल्हापूरची
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
खुप छान ...
खुप छान ... कोल्हपुरा विषयी छान माहिती मिळाली ... लेखन छान आहे
दोन
दोन वर्षापुर्वी गेलो होतो कोल्हापुरात. उमदा अनुभव. पुन्हा आज जाऊन आलो. मजा आला.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
एकदम झकास
एकदम झकास कोल्हापूर दर्शन करवून आणलत की ओ राव्...........लइ भारी.....
Roops..........
" करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."
Pages