शिमग्याची गजाल..

Submitted by प्रकाश सरवणकर on 27 January, 2018 - 04:44

आपल्या कोकणात गणपती आणि शिमगो हेचा याड परत्येकाक आसताच... जेंका ह्या दोन सणांपैकी येकव सण आवाडणा नाय तो खरो मालवणी माणूसच नाय असा मजा म्हणना हा..
कितीक मालवणी पोर गणपतीच्या आदी मालकान रजा नाय दिल्यान तर नोकरी सोडून दितत आणि गावाक जातत... परत येवन नयी सोदतत...
आमच्या देवगड तालुक्यात आणि गाबीत समाजात शिमग्याची पारंपारिक घुमाट आणि कोळीण नाचाची पद्धत हा... पयल्या दिशी होळी उबी ऱ्हवली की घुमटावर थाप पडता आणि कोळीण झालेलो कुंवारो पोरगो फुडें धूळ व्हयपर्यात रोज मांडार घुमटाच्या वांगडान म्हटलेल्या फागांच्या तालावर नाचता फाटेपर्यात... येक फाग झालो की त्या नाच्याक इसरांती गावक व्हयी म्हणानं मदी याक सोंग हाडतत, गावच्या आणि एकूणच आजूबाजूक घडणाऱ्या गोष्टींवर इनोदी पद्धतीन रंगवलेला न्हान नाटुकला म्हणजे सोंग आसता.. ह्या चार पाच दिवसात सगळ्या पुरुष माणसांनी रातीचा घराक न थांबता मांडार हजर ऱ्हवाक व्हया.. कोण कल्टी मारता काय पोर लक्ष ठेवण आसतत.. जर कोण घरात आसून इलो नाय किंवा मांडारसून कल्टी मारून बायलेच्या बाजूक झोपाक गेलो ह्या लक्षात इला की पोर ढोल घेवन कामगिरीवर भायर पडतत... हळूच तेंच्या खळ्यात जावन अचानक ढोल ताशे कडकडावन घुमावतत को भुतुर गुटली मारलेलो बापयो गप भायर येवन १०० ची नोट ढोलवाल्यांक सरकायता आणि तेच्यावांगडा मांडार येता... धूळ, धूळवड म्हणजे रंगपंचमी चो दिवस आसता.. भौतेक पाचवो दिवस आसता, होळी तोडल्यानंतरचो... ह्या दिवशी रात्रभर फाग, नाच्या किंवा कोळीण नाच, घुमाट आणि सोंगा हेचा रोम्बाट चालू आसता.. फाटपटी वाडेचार काडुक धूप घातलो जाता आणि घराण्याचो देव ठराविक कुडी च्या अंगात येता तेका देवानं आंग धरल्याण असा पण म्हणतत.. एका न्हान पोरांक क्रिष्णा बनवलो जाता आणि क्रीष्णाची दिंडी ढोल ताशे आणि फटाक्यांच्या गजरात सुरू व्हता... देवाची कुड ह्या दिंडीत येवन आंग धरूक लागता... गुलालाची उधळण सुरू आसता.. अंगात देव इलेली कुड वेगात येवन मांडार घुमूक लागता... क्रिष्णाक एका पाटार आणि कोळीण झालेल्या नाच्याक राधा म्हणान बाजूच्या पाटार उब्या केला जाता.. कुड क्रीष्णाचो आशीर्वाद घेवन घुमूक लागता....मग मेळेकरी लोकांचे, पावण्यांचे, भावकीचे प्रश्न देवाफुडे मांडतत.. कौल, नवस व्हतत.. जुने फेडले जातत... देवान आंग सोडल्यान की ह्यो कार्यक्रम संपता... इलेले नवसाचे पेडे आणि तोरणांचे नारळ फोडून सगळ्यांका पेडे खोबऱ्याचो प्रसाद दिलो जाता...
आमच्या घराण्याच्या मांडार ह्या असाच पारंपरिक दर वर्साक चालू आसता... जसो मुंबयत नावरात्रीक लोग सणाच्या नावाखाली गरब्यात काय माय घडत आसता तसाच आमच्या गावांनी ह्या शिमग्याक चालू पोरा पोरी चान्स मारीत आसतत... शिमग्याचे चार पाच रात्री म्हंजे रातभर घराभायर ऱ्हवाचो पर्वानो आसता...
येवडा पुराण बास झाला... आता तुमका मूळ गजाली कडे घेवन जातय..
माजो एक चुलत चुलत भाव... भावकेतलोच.. सुदगो नाव तेचा.... लय वासकाडो... हायस्कुल पासून तेचा कामच ह्या.. दिसली पोरगी की लागलो पाटी... प्रेम बिम असली काय भानगड नाय... पॉर कसाव असांदे.. काळा... गोरा.. जाडा.. बारीक.. हिंदू.. मुस्लिम.. पॉर असल्याशी मतलब.. बाकी काय नाय... तेचा तत्वज्ञान याकच व्हता... आपला काम झाला की बास... काय लगीन करूचा हा काय तेच्यावांगडा...
बरा... तेका गावाचे शिमा पण आडये येयत नाय व्हते... ह्या येका गोष्टीसाठी सुदगो तर वलांडून पैलाडच्या टेम्बवली गावात पण चक्रो मारी... हायस्कुलातल्या मित्रांक भेटाक म्हणान जाय.. असा करता करता सुदगो नोकरेच्या पाटी मुंबयत इलो... नशीबवान व्हतो, वळकीन गवरमेन्टच्या नोकरेक लागलो... मुंबयत पण काय सवय सोडल्यान नायच व्हती.. हय झोपडपट्टीत, चाळीमदी पोरांची काय कमी नसाच... गोरो गोमटो सुदगो.. तेच्यात सरकारी नोकरी... ह्यो स्टाइल मारी.. पोरा दिपकत...
आता बाकीच्या मालवणी माणसासारकोच सुदगो, गणपतीक आणि होळयेक गावाक जाय...
गावात गेला की तेचे उद्योग चालू व्हयत..
चाकरमानी सुदगो मगे गरयेक आवास लावन बरोबर मासो पकडी... परत्येक फेरयेत तेका सावाज गावलेला आसाच.. खाली हात येना म्हंजे तेची मान खाली गेल्यासारा व्हता...
असोच ह्या वर्साक पण सुदगो होळयेक गावाक इलो व्हतो... होळी तोडुच्या दिसापासना सुदगो हजर झालो... चाकरमानी फुटक्या तारवासारे एक एक उतरत व्हते वाडीक... सुदग्यान आमच्या बाजच्या करंडे वाडीत येक टेळ हेरल्यान... पॉर काय खास नाय व्हता.. रंगान काळा, माडा सारा ताडमाड.. म्हंजे येका विंग्रजी शब्दात सांगुचा झाला तर 'म्यारेज मटेरियल' नाय व्हता.. आवशी बापसाच्या जिवाक तसो घोरच व्हतो...
आता ही करंडे वाडी म्हंजे आमच्या वाडीच्या पुर्वजानी केलेली आपली सोय व्हती.. सोयर सुतकाच्या अडचणीच्या येळेक देवाधर्माची कामा अडू न्हये, पूजेक माणूस गावचो हेच्यासाठी, पुर्वजानी करंडे पावण्यांका जैतापूरातसून हाडुन हय आपल्या बाजूक वस्तीक बसवलेल्यानी... त्येमुळे आमच्या मांडार ह्याकरंडे पावण्यांका न्हेमी सांबाळून घेयत आणि राबवण पण घेयत.. बऱ्याच येळेक लग्नासाठी पोरी बगुक पण लांब जावचा लागा नाय.. कारण ह्या करंडे वाडीत एकावदा चांगला पॉर दिसला की आमच्या भावकितल्या पोरासाठी तेंका मागना गेलाच... तसाच ता उलटा पण आसा.. त्येमुळे हय सगळेच एक दुसऱ्याचे पावणे झालेले असो प्रकार..
पण कोणत्याव आमच्या भावकेचो शब्द करंडे वाडीक मानुचोच लागा.. कदी कदी करंडे वाडीतली नवीन पोर त्यामुळेच भिरसाटुन जायत..
तर,
तुमका सांगी व्हतय की सुदग्याक ता काळा बाळा पाकुर (पाखरू) पटला... ह्यो गोरो गोरो चाकरमानी आपल्यार लायन मारता ह्या निसत्या जाणावला तेवापासना तेच्या आंगार निसतो काटो उबो ऱ्हवाक लागलो... सुदग्यान दुपारचा काजीत बोलवन मजा करूक बगल्यान, पन तेवढ्यात मंगो नाना खयसून उपाटलो.. " कोन रे काजीत?".. सुदग्यान बाजच्या गडग्या वरसून उडी मारल्यान आणि खाली वाकान पशार झालो... मिनग्यान (मीना नाव तेचा) वर सरकलेलो चुडीदार कुडतो खाली खेचल्यान आणि आवाज दिल्यानं " कोण नाय ओ नानानु, मी आसय... "
" तू व्हय, मिनग्या दुपारचा खय मरतस हय, वायच शेळेचा येवचा ना..." मंगो नाना काळजीन बोललो... तेंकाव तसो काय संशेव येवक नाय, कारण गोऱ्या, चिकन्या पोरींच्या पाटी फिरणारे डोंगळे मिनग्याच्या काळ्या गुळाक चिकटुचे नाय असा आपला म्हाताऱ्याक वाटला..
मिनग्यान पण फाटी उचलल्यान आणि वाटेक लागला..
रात्री होळी पडली आणि पारंपरिक सुरू झाला...
आजपासून रोज रात्री दोनव वाडीतली बापय आणि बायल माणसा मांडार येवक लागली...
सुदग्यान ही संधी हेरलेलीच व्हती...
पयल्या दिवशी लौकर कार्यक्रम आटपतो घितत त्येमुळे तेनी काय गडबड करूक नाय...
दुसऱ्या दिवशी रातीची जेवना झाली...
ढोल ताशे कडाडले..
घुमाट वाजूक लागला..
कोळीण उभी ऱ्हवली...
नमनाचो फाग झालो, गणपती येवन आरती फुगडी सगळा झाला...
आमच्या गिरीश दादान आता कथेचे फाग सुरू केल्यानं...
रामायणा मदलो एक सुदंर फाग

रावणान सिता नेलीया वरी हनुमंत पाठविले कुंवरी हो...
पाठविले कुंवरी हनुमंत पाठविले कुंवरी..
हनुमंत उडाले..
रे हनुमंत उडाले....
उडाले तेथुन....
रे हनुमंत उडाले....
उडाले तेथून गेले लंकेच्या वरुन...
हनुमंत उडाले तेथून गेले लंकेच्या वरुन...
अवघी लंका हो..
ओ अवघी लंका का...
लंका शोधुनी पाहे...
ओ अवघी लंका का...
लंका शोधुनी पाहे जाउनी बसले बावडेवरी..
अवघी लंका शोधुनी पाहे जाउनी बसले बावडेवरी..
नगरच्या नारी हो...
ओ नगरच्या नारी का...
नारी बावडेवरी...
ओ नगरच्या नारी का...
नारी बावडे वरी बोलती सितेच्या खबरी...
नगरच्या नारी बावडे वरी बोलती सितेच्या खबरी...
बोलती सितेच्या....
ओ बोलती सितेच्या...
सितेच्या खबरी...
ओ बोलती सितेच्या....
सितेच्या खबरी तयांच्या फोडीयल्या घागरी...
बोलती सितेच्या खबरी तयांच्या फोडीयल्या घागरी..
हनुमंत उडाले...
ओ हनुमंत उडाले....
उडाले तेथुनी...
ओ हनुमंत उडाले....
उडाले तेथुनी गेले लंकेच्या वरुनी...
हनुमंत उडाले तेथुनी गेले लंकेच्या वरुनी...
अवघी लंका हो...
ओ अवघी लंका का...
लंका शोधुनी पाहे...
ओ अवघी लंका का...
लंका शोधुनी पाहे जाउनी बसले वृक्षावरी..
अवघी लंका शोधुनी पाहे जाउनी बसले वृक्षावरी...
मुद्रीका टाकूनी हो....
ओ मुद्रीका टाकुनी का...
टाकुनी त्या रामाची...
ओ मुद्रीका टाकुनी का...
टाकूनी त्या रामाची सितेच्या चरणी लागले...
मुद्रीका टाकुनी त्या रामाची सितेच्या चरणी लागले..
तू बा कोणाचा...
रे तू बा कोणाचा...
कोणाचा रे कोण....
रे तू बा कोणाचा...
कोणाचा रे कोण तुझे नाव सांग मजला...
तू बा कोणाचा रे कोण तुझे नाव सांग मजला...
मी बा रामाचा....
ओ मी बा रामाचा...
रामाचा सेवक....
ओ मी बा रामाचा....
रामाचा सेवक माझे नाव हनुमंत...
मी बा रामाचा सेवक माझे नाव हनुमंत..
हर हर गाईन पवित्र काय रामायण...
हर हर ..............

गिरीशदादा आणि शिरीदादा आळवन आळवन ह्यो फाग येका लयीत गायत व्हते... बाकी सगळे काका, पुतणे, करंडे पावणे गळ्यात घातलेल्या घुमटावर मन लावन साथ करीत व्हते...
सुदग्याचो ह्या सगळ्यात मिनग्यावर लक्ष व्हतो.. तेनी हळूच मिनग्याक नजरेनं खुनायल्याण... मिनग्या हळूच उटला.. इरागतिक जावचा दाकवन पाटच्या दारान भायर पडला... हयसून सुदगो पाटी पाटी सरकान हळूच फूडच्या खळ्यातसून भायरो झालो... लागानच संज्याचो रिकामको गोटो व्हतो... सुदगो मिनग्याक घेवन गोट्यात घुसलो.. सुदग्यान मिनग्याक वरसूनच घुसळूक सुरवात केल्यानं... मिनग्या फुस्फूसुक लागला.. मिनग्याचे व्हट तेनी आपले व्हट दाबून बंद केल्यान खरे.. पण हय जास्ती काय गडबड केली तर आयतेच सगळयांक गावक व्हयत ह्या तेंच्या लक्षात इला... सुदग्यान मिनग्याक हळूच प्लान सांगितल्यान... मिनग्यान मुंडी हलयल्यान.. कपडे झटकून मिनग्या पाटच्या दारातसुन परत वळयेत जावन बसला.. सुदगो पण थोडो येळ काडून परत मांडार चालणाऱ्या फागावर चक्की वाजवक लागलो... मदसून दोगवांची नजरानजर झाली की मिनग्या लाजून मान खाली घाली... फूडच्या दोन दिवसात सुदग्यान अशीच थोडो थोडो येळ भेटान लोखांड गरम केल्यानं...
धुळीच्या दिवशी मिनग्यान आवशिक ठरल्या पलांनापरमान सांजेक आवशिक अडचण ईल्याचा सांगल्यान... शेवंता.. तेची आवस बोलली.. " फटकी येव तुज्यार.. तुका पण आजच व्हवचा व्हता.. आता माजी पण धूळ चुकली.. "
मिनग्या शाना.. सुदग्यान चार दिवस चांगला दाणा पाणी घालून कबुतर शिकयल्यान व्हता... त्येमुळे ता पट्कन आयशिक बोलला.. " आये, तू काययेक ऱ्हव नुको माज्या वांगडा... मी आता मोटा, जाणता आसय.. एक रात काडुक काय कटीन नाय माका.. जेवन झोपाचाच हा माका.. तू जा आपली धुळीक"
शेवत्याक पण मन मारूनच ऱ्हवचा लागणार व्हता.. कारण धुळवडीच्या रात्री नयी नयी सोंगा आसतत... ती चुकली आसती... आणि... वाडेचार इलो की मिनग्याच्या लग्नाचा पण ईचारुचा व्हता...
शेवंता बोलला.." बग मिनग्या, तू म्हणतस म्हणान मी जातय... भुतुरसून कडी चांगली लावन घी.. मी फाटफटी येतलय" मिनग्याक काय ताच व्हया व्हता...
धुळीच्या रात्री जेवणा आटपून सगळी भावकी, पावणेपैक, आजूबाजूच्या गावातली नातेवायक, गावकरी सगळे जमा झाले..
पारंपारिक सुरू झाला.. गणेशवंदन झाला आणि फाग आणि सोंगा आळी पाळीन सुरू झाली... सोंगा रंगात इली हत, लोक रंगून गेले हत ह्या बगून सुदग्यान हळूच कल्टी मारल्यान.. पानदीतसून अंदारात चाचपडत सुदगो हळूहळू चलूक लागलो.. कोणाक संशेव नुको म्हणान पानंद उतरून खाली रस्त्याक लागासार तेनी मोबाईल ची बॅटरी पेटवक नाय... रस्तो लागलो तसो मोबाईल ची बॅटरी पेटवन घायघायत सुदगो करंडे वाडीच्या रस्त्याक लागलो.. तेच्यान आता कळ काडवत नाय हुती... सुदगो मिनग्याच्या घराकडे इलो आजूबाजूक बगल्यान.. सगळे धुळीक मांडार गेलेले..
सुदग्यान हळूच तीन येळेक कडी वाजयल्यान... मिनग्यान पट्कन दार उगडून सुदग्याक घरात वडल्यान.. सुदग्यान पयली भुतुरसून कडी लावन घितल्यान आणि निचिंतीन मिनग्याक मिठीत वडल्यान...

.... सुदग्या नावाच्या बोक्याक असा वाटला व्हता की आपुन डोळे मिटून जा दूध पिताव ता कोणी बगुक नाय हा...
करंडे वाडीचे पोर आदीपासूनच ह्या सगळ्यार बारीक लक्ष ठेवन व्हते.. जवसर डुकर टप्प्यात येयत नाय तवसर पेट काडायचो नाय ह्या तेनी ठरवलेलाच व्हता... आज ते हातची संधी सोडणार नाय व्हते... बाकी वाडीत कोणाक कानोकान खबर देवक नाय व्हती... सुदगो गेल्यार पंदरा इस मिनटानी पोरांनी आमच्या भावकितल्या पोरांक जवळ घितल्यानी... करंडे वाडीत एक जान घरात जावन झोपलो हा, तेका ढोल घेवन उटवन हाडया असा सांगितल्यानी.. आमच्या पोरांक पण काय संशेव येवक नाय, कारण ही नेमीचीच गोष्ट व्हती... कोण घराक जावन झोपलो तर ढोल घेवन जायचा, दंड वसूल करायचो आणि तेंका मांडार घेवन यायचा... धा बारा पोर ढोल ताशे घेवन हलकेच भायर पडले... मोठयानी पण बगीताला पण कोणाक तरी उचलून हाडुक चललेत हयोच समज...
सगळे पोर गपचिप चालत करंडे वाडीत घुसले.. शेवत्याच्या घरासमोर इल्यार पाचजाण पाटच्या च्या दाराक आणि उरलेले फुडच्या दाराक उबे ऱ्हवले आणि शिट्टी वाजल्याबरोबर येकाच येळेक धा बारा ढोल एकसाथ वाजाक लागले...
भुतुर रंगात इलेलो सुदगो हडबडलो.. काय करूचा ता तेंका कळाक मार्ग नाय उरलो... आपुन आता आडाकलव ह्या त्येच्या ध्येनात इला... सुदग्या आणि मिनग्यान सगळे कपडे कवळल्यानी... दोगाव भायर इली... पोरांनी ढोल वाजवीत दोगावांची धिंडका मांडार हाडल्यानी... मांडारचे कार्यक्रम आटपत इले व्हते... कार्यक्रम संपवन थयच मेळो(बैठक) बसलो...
मिनग्याच्या भावान मेळ्यात सुदग्याचे गेल्या पाच दिवसातले पराक्रम सगळ्यांका फोडून सांगल्यान...
आता तशी सुदग्याची कीर्ती सगळ्या भावकेक म्हायती असल्यामुळे कोणी काय तेची बाजू घेवक नाय.. भावकी करंडे पावण्यांका दुकव शकत नाय व्हती.. सुदग्याच्या बापसाक मोट्या माणसांनी ईचारल्यानी "तुजा काय मत शंकऱ्या?" शंकरो काय बोलता.. " आता पोरान श्यान फासल्याण तोंडाक, आता तुमी म्हणशात तसा"
भावकेन निर्णय दिल्यान उद्याच्या उद्या हेंचा लगिन लावन देवचा... पोरीच्या आयुष्याचो प्रश्न हा... काय करतत.. दुसऱ्या दिवशी देवगडाक पोरांक पिटाळून दुपारपर्यात सगळा सामान हाडुन सुदगो आणि मिनग्या चा लगीन पार पडला.. अश्या तऱ्हेन शिमग्याच्या धामधुमीत शिकाऱ्याची शिकार झाली..... सुदगो सुदारलो तो कायमचो...

©प्रकाश सरवणकर ९८६९२८०६६०

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!!