किती कोडकौतुक किती सोहळे ते--( भुजंगप्रयात )

Submitted by निशिकांत on 23 June, 2017 - 02:48

जरा धाक होता जरूरी मनाला
म्हणोनी तुला निर्मिले मानवाने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

तुझा गवगवा वाढवायास लिहिल्या
हजारो कथा, काल, थोतांड आम्ही
अविष्कारिले पाप, पुण्यास सुध्दा
मनी जागवायास भयंगंड आम्ही
सुरू जाहला कोंडमारा मनाचा
रुढीचे उभे राहिले कैदखाने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

अवाढव्य, चित्रांस, किंमत मिळे पण
कधी चित्रकारास पुसतो न कोणी
तुझा फक्त डंका जगी वाजतो अन्
खर्‍या शिल्पकारास बघतो न कोणी
तुला लाभते पालखी, न्याय कुठला?
नि भोई बनावे तुझ्या करवित्याने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

तुझी पाद्यपूजा, तुझी आरती अन्
तुझ्या भव्य दिंड्या, तुझी कैक क्षेत्रे
न कळले कधी दास केलेस आम्हा!
ससे जाहले माणसे सर्व भित्रे
जनाधार देवा हवासा तुलाही
तरी भक्त केलेस का दीनवाणे?
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

"जसे ठेवतो देव तैसे रहावे"
अशा शिकवणीचीच जडली बिमारी
तुझीही महत्ता कमी खूप झाली
नि शिरजोर झालेत पंडे पुजारी
जरी क्षुद्र माणूस, दगडा! तुला मी
दिले देवपण माखुनी शेंदुराने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कविता आहे.

सगळ्या ओळींमध्ये मात्रा जमल्या आहेत का? उदा. दिले देवपण माखुनी शेंदुराने

गजाननजी, मात्रा तपासून पहिल्या. बरोबर आहेत. मात्रांचा क्रम असा:- लगागा लगागा लगागा लगागा. येथे ल म्हणजे लघू आणि गा म्हणजे गुरू.