वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. 1995 च्या डिसेंबरची एक रात्र,, साधारण आठची वेळ...
स्थळ : आनंद नगर मधला एक फ्लॅट...
चार मित्र कोंडाळ करून बसले आहेत.. कुणीच काही बोलत नाही...
प्लॅंचेट वगैरे काही नाही.. तसाही माझा असल्या गोष्टींवर विशवास नाही....
हो.. पण आधी आमची ओळख करून देतो..
आम्ही चौघ... विन्या, सुन्या, मन्या आणि मी म्हणजेच अम्या किंवा अमर्या किंवा.. जाउदे सगळीच टोपणनावे सांगण्यासारखी नाहीत. चौघही इंजिनियरिंगचे विद्यार्थी. परिक्षा, व्हायावा नुकत्याच संपलेल्या.. त्यामुळे श्रमपरिहार करायला आम्ही एकत्र जमलो होतो. या सुट्टीत काय करायचे हाही विषय होताच.
च्यायला.. ह्या गण्या कुठे उधळलाय --- सुन्याने शांततेच भंग केला... पार्टीची सगळी तयारी झाली होती. आम्ही चौघ बसलो होतो.. मध्ये पेपर पसरला होता ("सकाळ"चा हा रात्री करावयाचा उपयोग.. बाकी सकाळी बातम्या अगदीच फालतू असतात... ) चकण्यच्या पुड्याही सज्ज होत्या. आम्ही सर्व म्हातार्या पाद्र्याला शरण जायला आतुर झालो होतो.. आणि ह्या गण्याचा पत्ता नव्हता.
हा गण्या माझा खास दोस्त. तसे आम्ही पाचहीजण एकमेकांचे जिगरी.. पण गण्या आणि मी जरा जास्त जवळचे.. त्यामुळे सुन्या कॉमेंटवर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
अरे थोडा चकणा तरी काढ... मन्या.. दुसर कोण. हा मन्या म्हणजे नुसता चकणा खाणार आणि थंब्सअप पिणार.. ह्याच्यामुळे दरवेळी थंब्सअप व चकणा कमी पडतो.
ए गप्पा बस.. आत्ताच आपण वडापाव चापलाय.. चकणा कशाला हवाय... विन्याने परस्पर मन्याला गप्पा केले.
बर मग गार पाणी तरी दे.. मन्याची शरणागती.
या सुट्टीत तुझा काय प्लान आहे? सुन्याने आता माझ्याकडे मोर्चा वळवला होता..
तुका म्हणे आता उरलो ट्रेकपुरता.... मी गंभीर आवाजात उत्तर दिले.
तुका कोण? तो पण येणार आहे का आपल्याबरोबर? विन्याचा फालतू विनोद..
आयला विन्या तुला तुका माहीत नाही? वेळ घालवायला कोणीतरी बकरा हवाच होता आणि विन्या आमच नेहेमीचे गिऱ्हाईक ...
तेव्हढ्यात .... लॅच उघडण्याचा आवाज आला... गणेशरावांचे आगमन झाले होते.
अरे किती उशीर... कधीतरी वेळेवर ये.. xxxx .. xxxxx ... अशा सर्व कॉमेंट्सकडे दुर्लक्ष करून गण्याने माझ्या शेजारी बैठक जमवली. जरा स्थिरस्थावर झाल्यावर एक मोठ्ठा घोट घेत गण्याने तोंड उघडले..
आपण उद्या ट्रेकला जायचाय...
च्यायला तुम्ही दोघ सगळ ठरवुनच येता का... सुन्याची कॉमेंट आलीच... आमच्या खास दोस्तीमुळे असे टोमणे अधुनमधुन सहन करवेच लागतात.
आपण ट्रेकला जातोय.. तोरण्याला ... रात्री आपल्याला गडावरच राहायचे आहे.. गण्याने आपला मुद्दा पूर्ण केला.
तोरण्यावर रात्री राहु देत नाहेत... तिथे भुते असतात... आपण तोरण्याल कितीतरी वेळा गेलोय.. त्यापेक्षा कळसुबाई ला जाउया... त्यापेक्षा सरळ तीन दिवसाचा लोणवळा-भीमाशंकर करूया.. चर्चेला आता रंग भरू लागला होता.
अरे जरा गप्प बसा.. गण्या जरासा खेकसलाच.. आपण तोरण्यालाच जायचय .. ते सुद्धा रात्री...
काहीतरी प्रॉब्लेम होता हे नक्की... आजपर्यंत आम्ही अनेक ट्रेक केले... कुठे जायचे ह्यावर फारसे वाद नसायचे. गण्या तर कायम म्हणायचा कुठेही चला पण लगेच निघूया.. मग आजच त्याला तोरण्याने का झपटलाय ? तेही रात्री वर राहायचे कारण?
त्यावेळी तोरण्यावरील भूतांच्या कथा बर्यापैकी प्रचलित होत्या... तसा आमचा भुताखेतांवर फारसा विशवास नव्हता.. अपवाद फक्ता सुन्याचा.. तो थोडासा घाबरट होता. पण उगाच विषाची परिक्षा कशाला.....
माझ्या डोक्यात हा विचार चालू असताना इकडे गण्याची इतरांबरोबर चांगलीच जुंपली होती. हा एव्हढा का पेटालाय? डाल में कुछ काला है.... तो तोरणा जाउ दे.. हे खुळ गण्याच्या डोक्यात आले कुठून हे शोधले पाहिजे..
तत्पुर्वी तेथे शांतता प्रस्थापित करणे जरूरी होते आणि ते फारसे अवघडही नव्हते
मी सर्वांचे ग्लास परत भरले.. थोडासा चकणा काढला.. मग काय .. खोलीत शांतता पसरली.. अर्थात ही फार वेळ टिकणार नव्हती.. त्यामुळे फार वेळ घलवुन चालणार नव्हते. मग मी (माझाच) ग्लास बाजूला ठेवला, भराभर संपणार्या चकण्याकडे दुर्लक्ष केले आणि बोलायला सुरवात केली
गण्या.. तुला तोरण्यालाच का जायचाय? खर कारण सांग
नाही.. म्हणजे तस विशेष काही नाही, आपण आधी जाउ तर खरे.. मग कळेलच सगळ्यांना...
खरे कारण सांगावे की नाही.. असा गोंधळ गण्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. "काही विशेष नाही" म्हणजे काहितरी विशेष आहे हे समजण्याइतकी आमची मैत्री मुरलेली होती
आता गणुभाऊंकडून सत्य वदवायचे दोन मार्ग होते ... एकतर त्याला एकट्याला बाजुला घेऊन विचारायचे किंवा अजुन काही वेळ (आणि पेग) जाऊ द्यायचे.. सत्य आपोआप बाहेर आले असते.
माझ्या डोक्यात हा विचार चालू असतांनाच समोर चर्चेला चांगलाच रंग भरला होता. गण्या विरुद्ध इतर सर्व असा सामना रंगात आला होता
गण्या चांगलाच पेटला होता ....
जिंदगीमें आदमी दोइच टाइम ऐसे भागता है .... ऑलीम्पिकका रेस हो या पोलीस का केस हो .....
नक्कीच कोणीतरी काडी लावली होती. आग तो बराबर लागी थी ...
पण काडी कोणी टाकली? आमच्या विरोधी गँग्समधले सगळे चेहरे सामोरे तरळून गेले. त्यातील बहुतेंकांचा आम्ही वेळोवेळी कचरा केला असल्यामुळे त्यांना सबळ कारण होतेच.. पण त्यांच्यापैकी कोणीच गणूला एव्हडे भडकाऊ शकेल ,,, नाही शक्य नाही .
आणि अचानक एक चेहरा डोळ्यासमोर आला. अंजली .. नाही म्हटलं तरी थोडी धडधड वाढलीच ..
ही अंजली मुंबईची. त्यावेळी आमच्या पुण्याच्या कॉलेजमध्ये मुलींची लोकल (पुण्याच्या), मुंबईच्या आणि दिल्लीच्या (सर्व उत्तर भारत ) अशा कॅटेगरी होत्या . प्रत्यकीची वैशिष्ट्ये वेगळी . दिल्लीवाल्या म्हणजे ... जाऊदे त्याविषयी परत परत कधीतरी. उगाच विषयांतर नको . तसेही उगाच पाल्हाळ लावणे माझ्या स्वभावातच नाही.
हां .. तर ही अंजली . दिसायला एकदम मस्त .. स्वभावाने बिनधास्त. तिची आणि गण्याची घसट सध्या वाढत चाललीय. तरी याला सावध केले होते .. गरज असेल तेंव्हा घसट वाढवायची व नंतर GL एन्ट्री करायची हा अंजलीचा हातखंडा प्रयोग होता . GL एन्ट्री हा आमच्या कॉमर्स च्या मित्रांकडून उचललेला शब्द प्रयोग. BPL ला समानार्थी.
विजेच्या वेगानी हे सगळे विचार माझ्या डोक्यात चमकुन गेले ...
. . .
...
अंजली ..... मी ठामपणे म्हणालो . बहुदा माझा आवाज जरा जोरातच आला असावा . अचानक शांतात पसरली. गण्या वैतागुन आणि बाकीचे कुतूहलाने पाहू लागले
च्यायला .. चढली का काय तुला . एकदम अंजली कशी काय आठवली ? --- विन्या
कायरे काय गडबड आहे ? -- सुन्या
तुझा आणि अंजली चा काय संबंध ? दोस्ताना (जुना) मधल्या शत्रू सारखा चेहरा करून गण्या
अरे .. गप्प बसा रे .. गण्या ... या अंजलीशी तू बेट (पैज) लावलीस ना ? तोरण्यावर रात्रभर राहायची ?
माझ्या या थेट प्रशांवर गणूचे अवसान गळाले . आता पर्याय नव्हता .
हो .. मान खाली घालुनच गाण्याने होकार भरला. त्याचे काय झाले सहज बोलता बोलता ...
तिने तुला भरीला घातले -- मन्याने वाक्य पूर्ण केले .
आता सर्व नजरा माझ्यावरून गण्याकडे वळल्या होत्या. त्यानंतर बरीच गरमागरम चर्चा झाल्यावर व गण्याची पुरेशी पिसे काढून झाल्यावर
"अब बोल दिया है तो कर देंगे " असं म्हणून ती रात्र संपन्न झाली .
दोन दिवसानी संध्याकाळी भूतोंडयाची एसटी (आमचा लाल डब्बा) पकडून आम्ही वेल्ह्याला रवाना झालो. बाकी ट्रेक वर कुणी काय घ्यायचे वगैरे इतके ठरून गेले होते कि त्यात गडबड होण्याचे काही कारण नव्हते. तरी स्वारगेटवर एकदा उजळणी झालीच.
संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही वेल्ह्यात उतरलो. अंधार होण्यापूर्वी वर पोचून लाकडं (काटक्या) गोळा करू असा प्लॅन होता.
त्यामुळे खाली कॅप्टन कडे चहा घेऊन लगेच निघायचे असे ठरले. हे कॅप्टनचे हॉटेल हा आम्हा सर्व ट्रेक वाल्यांचा नेहमीच अड्डा .
चहा घेता घेता ..
आत्ता या वक्ताला कुठं ? -- एक गाववाला
कुठं म्हणजे? गडावरच कि
आणि खाली कधी येणार ?
सकाळच्याला .. रात्री वरच राहणार आहोत .
गाववाल्याने त्याच्या साथीदाराकडे पहिले. आमचा चहा संपायच्या आत दोघेही गायब ..
तुम्ही काही आता गडावर जात नाही -- कॅप्टन ने भविष्यवाणी वर्तवली
कॅप्टनला का म्हणून विचारणार तेव्हड्यात दाराशी तो मघाचाच गाववाला अजून चार पाच जणांना घेऊन आला होता.
त्या सर्वांचा एकूण सूर रातच्याला गडावर वंगाळ गोष्टी घडतात ... देवीचं छप्पर सुद्धा टिकत नाही तेंव्हा आत्ता गडावर जाऊ नका असाच होता.
त्यांच्याशी चर्चा (?) करता करता घोळका वाढत गेला .. शेवटी त्यातले एक आजोबा ठाम स्वरात म्हणाले .. आत्ता गडावर जायचं नाही. रातच्याला इथे रहा आणि सकाळी जा . त्याचा आवाज आणि अविर्भाव पाहिल्यावर बोलणेच खुंटले. आम्ही पाच जण सगळ्या वेल्हा गावाशी पंगा घेऊच शकत नव्हतो .
हताशपणे आम्ही परत कॅप्टनच्या हॉटेलात. त्याने न बोलता भजी व चहा समोर ठेवला. आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तिथून एक भाजीचा ट्रक पकडून नसरापूरला व तेथून घरी ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी ...... ..... ......
स्थळ : पुन्हा तेच .. आनंदनगर
कलाकार : नेहमीचेच यशस्वी .. आम्ही सहा जण .. म्हणजे आम्ही पाच आणि सहावा म्हातारा पाद्री
नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरु झाला. सगळे गण्याची समजूत घालण्यात गुंतले होते .
अरे आपण गेलो होतो .. पण गावकर्यांनी आपल्याला वर जाऊ दिले नाही .. तू काही बेट हरला नाहीस .. आता सोडून दे ... वगैरे .. वगैरे
आपण गडावर रात्री राहणार . अपुनको कोई नही रोक सकता .. दुसरं कोण .. मीच बोलले
काहीपण बोलू नकोस. कसा जाणार आहेस वर?
पाण्याप्रमाणे .. तेही पावसाच्या ... ग्लासमध्ये पाणी ओतत मी म्हणालो.
पावसाच्या? वर काय हेलिकॉप्टर नेणार आहेस का?
आयडिया काय अगदीच वाईट नाही .. पण हेलिकॉप्टर नाही .. आपण पायीच जायचे -- इति मीच
काय ते नक्की सांग .
गप्प बस उगाच तुझं तिरपागड डोकं चालवू नको .. तेव्हड्यात सुन्याने संधी साधलीच.
मला अशा भन्नाट (फक्त माझ्या दृष्टीनेच ) सुचतात. बरेचदा त्याने आमचा फायदाच होतो. अर्थात कधी कधी फटकाही बसतो .. परवाच सुन्याला माझ्या एका भन्नाट कल्पनेचा ... जाऊदे विषयांतर नको.
तर मी एकंदरीतच विक्षिप्त / तिरपागडा / इत्यादी इत्यादी म्हणून प्रसिद्ध होतोच. पुढे MBA ला गेल्यावर यालाच creative / out of the box thinking असे छान छान प्रतिशब्द आहेत असे कळले .. पण इंजिनिअरिंगला मात्र विक्षिप्तच .. चालायचंच
विन्या , गेल्यावर्षी पावसाळ्यात सगळं पाणी आपल्या पार्किंग मध्ये जमा झाले होते --- मी
हो . त्याचे काय ?
पण ते पाणी आपल्या घरात काही शिरले नाही
मुर्खा ... आपण तिसऱ्या मजल्यावर रहातो . घरात कसे शिरेल पाणी ?
पण पावसाळ्यात खिडकीतून पाणी आत येते..
अजूनही कुणाच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता. लवकर काहीतरी करणे भाग होते. कारण यांचा पेशन्स कधी संपेल सांगता येत नाही .
आपण तोरणा राजगड ट्रेक केला होता ... मी माझे बोलणे पुढे रेटले
त्याच आणि पावसाचा काय संबंध ? तो आपण उन्हाळ्यात केला होता.
हो पण आपण संध्याकाळी निघालो आणि पहाटे पोचलो.
हो .. ह्या मन्याने शी केली नसती तर लवकर पोचलो असतो ..
एक मिनिट तुला नक्की काय म्हणायचंय ? गण्याच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागला होता ...
हे बघ .. आपण जर संध्याकाळी लवकर राजगड हुन निघालो तर रात्री तोरण्यावर पोचू . तेंव्हा आपल्याला थांबवायला कोण येणार आहे?
सगळे डोळे विस्फारून माझ्याकडे बघत होते.
आम्ही बेट जिंकणार होतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता आमचा राजगड ते तोरणा ट्रेक कसा झाला, तोरण्यावर आम्हाला भुताचे काय अनुभव आले .. ते पुढच्या भागात
तळटीप : खरे तर माझे तोरण्यावर रात्री राहण्याचे अनुभव मला थोडक्यात सांगायचे होते. तसही मला पाल्हाळ लावायला आवडत नाही हे सुज्ञ वाचकांच्या ध्यानी आले असेलच. पण याचा दुसरा भाग लिहायला लागतोय यास फक्त वेल्ह्याचे गावकरीच जबाबदार आहेत याची नोंद घ्यावी
पुन्हा तळटीप : भुते असतात का ? याचे उत्तर या लेखापुरते "हो" असेच आहे
पुभाप्र
पुभाप्र
पुढचा भाग येऊद्यात लौकर
पुढचा लेख येऊद्यात लौकर
>>>> पुन्हा तळटीप : भुते असतात का ? याचे उत्तर या लेखापुरते "हो" असेच आहे <<<
म्हणजे पुढच्या लेखात ते उत्तर "नाही" असे करणार आहात काय?
पुभाप्र आणि भू प्र सुद्धा
पुभाप्र
सुद्धा
आणि
भू प्र
>>>> पुन्हा तळटीप : भुते
>>>> पुन्हा तळटीप : भुते असतात का ? याचे उत्तर या लेखापुरते "हो" असेच आहे <<<
म्हणजे पुढच्या लेखात ते उत्तर "नाही" असे करणार आहात काय? >>>
नाही हो .. खरतर या भागाचे नाव एक ट्रेक --- न झालेला असे असायला हवे
" झपाटलेला" पुढच्या भागात
ओके, वाट बघतोय पुढच्या भागाची
ओके, वाट बघतोय पुढच्या भागाची
तसही मला पाल्हाळ लावायला आवडत
तसही मला पाल्हाळ लावायला आवडत नाही हे सुज्ञ वाचकांच्या ध्यानी आले असेलच. >>>
हो हो..
मस्त लिहिलय ...
पुढील भाग लवकर येऊ देत...
मस्त...!!! पुढील भागाच्या
मस्त...!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!!!
पाल्हाळ न लावता
पाल्हाळ न लावता सांगितल्याबद्दल आभार.
बाकी तोरण्याचं भूत एका मित्राला भेटू शकलं नाही. मी वर जाऊन परत चारलाच खाली आलो. राहिलो असतो,डबा खाल्ला असता दोघांनी।
दुसरा भाग लवकर टाकला तर बर
दुसरा भाग लवकर टाकला तर बर वाटेल...आवडली कथा
पुढ्चा भाग कधी ??
पुढ्चा भाग कधी ??
>>>> आता आमचा राजगड ते तोरणा
>>>> आता आमचा राजगड ते तोरणा ट्रेक कसा झाला, तोरण्यावर आम्हाला भुताचे काय अनुभव आले .. ते पुढच्या भागात<<<< कधी येणार अनुभव ??? आतुरतेने वाट पाहत आहेत बरेच जण !!!