इतिहासातले कटाप्पा

Submitted by आशुचँप on 16 May, 2017 - 04:30

......स्पॉयलर अलर्ट.........

ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी वाचू नये, गौप्यस्फोट होण्याची शक्यता

बाहुबली चांगला का वाईट, भव्यदिव्य का नाही वगैरे विषयांवर भरपूर धागे निघाले आहेत. त्यात भर घालायाची इच्छा नाही. पण त्या चित्रपटाच्या निमित्ताने काही विचार डोक्यात आले ते मांडण्याचा प्रयत्न.

या चित्रपटात सर्वात डोक्यात जाणारी व्यक्तिरेखा कुठली असेल तर ती कटप्पाची. भलेही राजामौलीने त्याला खूप शूर, इमानदार, प्रेमळ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी प्रत्यक्षात तो एक अत्यंत निर्बुद्ध असा सेवक होता. खरेतर सिंहासनाचा गुलामच.

मान खाली घालून उभे राहयाचे आणि जी काही आज्ञा येईल तिचे बिनबोभाट पालन करायचे हेच काम. मग कितीही चुकीची, अन्यायाची असेल तरी. बरं हे एखाद्या क्षुल्लक माणसाने केले असते तरी समजू शकले असते पण हा राज्याचा जवळजवळ अनधिकृत सेनापतीच. राजकुमारांना अंगावर खेळवले आहे. आपल्या या निर्बुद्ध वागण्यामुळे राज्याचे किती नुकसान होते आहे हे कळत नसेल.

राजमाता भावनेच्या भरात आदेश देते, तो हा बिनबोभाट पाळतो. तिला असे म्हणत नाही, की हे चूक आहे. जर हा आदेश पाळायचा असेल तर पहिले मला ठार करा. तुम्हाला तो नको असेल तर आम्ही सगळे इथून निघून जातो, कुंतल देश किंवा अजून कुठे. पण नाहीच, हा नंदीबैल मान डोलावतो आणि एक सुखी संसार आपल्या हाताने उध्वस्त करतो. एक संसार नाही, बल्लालदेव क्रूर आहे, प्रजेवर अन्याय करणार आहे हे माहीती असून देखील तो हे कृत्य करतो. देवसेनेला बंदी घालून उघड्यावर ठेवताता तर त्यबद्दल बोलत नाही. बरे पहिल्या पार्टमध्ये तो रानरेड्याच्या हातून आपणहून मारला जातोय क्रूर राजा तेही नाही. गुलामी इतकी मुरलेली अंगात की सेवा करत रहायची, कितीही क्रूर असला तरी. आणि याच मानसिकतेमुळे इतिहासात अनेक कटाप्पा तयार झाले आणि त्यांच्या मानसिक गुलामगिरीमुळे बाकीच्यांना अत्याचार सोसावे लागले आहेत.

पटदिशी डोळ्यासमोर येणारा कटाप्पा म्हणजे मिर्झाराजे जयसिंग. शहाजहान आजारी पडल्यानंतर औरंगजेब आणि दारा शिकोह यांच्यात सत्तास्पर्धा सुरु झाली. दोन्ही राजपुत्र त्यावेळी यथातथाच होते आणि राजपुतांच्या हाती सामर्थ्य होते. आता ते ज्यांच्या बाजूने जाणार तोच राजपुत्र जिंकणार हे उघड होते. अशा वेळी मिर्झा राजेंनी थोडा-फार दयाळू, एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाराची निवड न करता क्रूर, धर्मपिसाट औरंगजेबाची निवड केली हे अनाकलीनय आहे. खुद्द शिवाजी राजेंनी नंतर एका पत्रात याचा उल्लेख केला आहे. बरं, पुूढेही जेव्हा औरंगजेबाने हिंदु लोकांवर अत्याचार सुरु केले तेव्हाही हा कटाप्पा मान खाली घालून दरबारात उभाच.

वर राजाची मर्जी व्हावी म्हणून शिवाजीराजांना पराभूत करण्याच्या कामगिरीवर निघाला. शंभर टक्के मानसिक गुलामगिरी.

तोच प्रकार १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात. आख्खे उत्तर पेटले असताना आणि गोऱ्यांना मारण्यासााठी शिपाई जीवाचे रान करत असताना केवळ कटाप्पाच्या सहाय्याने इंग्रज टिकून राहीले, तो कटाप्पा होता शिख पलटणी. या शिखांनी आपली स्वामीनिष्ठा इंग्रजांच्या पायी इतक्या पराकोटीची वाहीली होती की आपल्याच बांधवांचे राजरोस मुडदे पाडले. इतकेच नाही, गावेच्या गावे जाळली, गाणी म्हणत लोकांना फासावर चढवले. त्यावेळी ही शिख पलटण इंग्रजांच्या बाजूने उभी नसती तर त्यांना भारतात राहणे अशक्य झाले असते. त्यांच्या या स्वाभिमानशून्य गुलामगिरीने देशाचे फार मोठे नुकसान केले.

नंतर मग जेव्हा त्यांना जाग आली आणि स्वांतत्र्यासाठी लढा पुकारला हे सगळे नंतरचे. पण जेव्हा आवश्यक होते तेव्हा हा कटाप्पा बाहुबलीलाच मारून मोकळा झाला होता.

अजून एक लांबचे पण जगाच्या इतिहासावर परिणाम करणारे उदाहरण म्हणजे डेझर्ट फॉक्स रोमेल.

चर्चीलने देखील ज्याचे गुणगान केले आहे अशा रोमेलकडे सुरुवातीला पश्चिम आघाडीचे नेतृत्व होते. तो जर्मन जनतेच्या गळ्यातला ताईत होता. पण आपली स्वामीनिष्ठा त्याने हिटलरच्या पायाशी वाहलेली होती. हिटलरचे अनेक निर्णय अचाट चुकीचे आहेत हे दिसत असूनही त्याने ते विनातक्रार पाळले. सैन्याचे अधिपत्य हातात असतानाच जर त्याने उठाव केला असता तर कदाचित दुसऱ्या महायुद्धाचे चित्रच पालटले असते.

नंतर त्याने हिटलरला मारायच्या कटात गुप्तपणे सहभाग घेतला होता आणि याची कुणकुण हिटलरला लागताच त्याने गुप्तपणे त्याला विषप्राशन करण्याचा मार्ग दिला. आपल्याला हिटलर जाहीररित्या मारण्याचे धाडस करू शकत नाही हे माहीती असूनही रोमेल आत्महत्येच्या मार्गाने गेला.

योग्य वेळीच त्याने हिटलरचा काटा काढायला मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली असती तर लाखो निष्पाप जीव वाचले असते.

अजूनही आहेत, पण सध्या इतकेच पुरे.

त.टी. - चित्रपटाला काय इतके सिरीयसली घ्यायचे असे कुणी म्हणू नका. चित्रपटाला सिरियसली घेतले नाहीये, अशा पद्धतीच्या वृत्तीबद्दल हे भाष्य आहे. कटाप्पा केवळ निमित्तमात्र आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान निरिक्षण . असे अजुन बरेच कटप्पा भारतीय इतिहासात आहेत.
पण बाहुबलीतल्या कटप्पा बाबत , जरी त्याने विरोध केला होता तरी , शिवगामी म्हणते ' मी बाहुबलीला मारेन', तेव्हा त्याचा नाईलाज होतो.
कदाचीत कटप्पाला बल्लालदेवाचं कारस्थान उघड करताही आलं असतं.

शिख पलटणींच्या बाबतीत त्यांना फसवले गेले असे आपण म्हणू शकतो. कारण मराठ्यांनी आणि स्वातंत्र्ययुद्धातील इतर शक्तींनी मिळून बुजगावणे म्हणून बसवलेला बहादुरशहा जफर या बाबीचा वापर इंग्रजांनी फार कावेबाजपणे करुन घेतला की बघा तुमच्या गुरूंवर अत्याचार करणार्‍यांचा वंशज गादीवर बसलाय. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला नसावा. चु,भू.द्या.घ्या.

बाकी सहमत.

हो शक्यता आहे. पण निदान इंग्रजांना मदत न करता तलवारी म्यान करून शिख बसले असते तरी चालण्यासारखे होते. पण त्यांनी इंग्रजांच्या वरताण अत्याचार केले. इतक्या मोठ्या स्केलवर ब्रेनवॉश करण्याइतका इंग्रजांकडे वेळ कुठे होता. शिपायांचे बंड ही तसे अचानकच उफाळून आले होते.

शिवगामी म्हणते ' मी बाहुबलीला मारेन', तेव्हा त्याचा नाईलाज होतो.

ठीक आहे ना, तो त्याचे वजन खर्ची करून हे म्हणू शकत नाही, आम्ही तुमच्या राज्यातच राहणार नाही. आम्ही मेलो असे समजा. आणि बाहुबली कुटुंबाला घेऊन परागंदा झाला असता.

असेच बरेच कटप्पा आजही भारतात आहेत आणि २०१४ नंतर तर दॄश्यस्वरुपात दिसायला लागले. खरे-खोटे, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय याची अजिबात चाड न बाळगता आपल्या राजावर केले जाणारे आरोप आणि विरोध कटप्पाच्याच वृत्तीने निखंदून काढणे चालले आहेच. इतिहासातल्या जर-तर कडे कशाला पाहा, जे चालले आहे आजूबाजुला तेवढे बघणे उपयोगाचे ठरेल....

स्वातंत्र्ययुध्दात बर्‍याच जणांनी भाग घेतला नाही. काहींच्या मते तर इंग्रज आपले शत्रु नसून मुस्लिम, दलित आपले खरे शत्रु आहे त्यांच्याशी आधी लढा.

सगळ्यात मोठा कट्प्पा, पितामह भीष्म, rather त्यांना डोळ्यापुढे ठेवूनच ती व्यक्ती रेखा लिहिली असावी,

दुसरा कटप्पा, सुजा उद्दौला, आणि सुराजमल जाट जे पानिपतात शत्रूला सामील झाले किंवा शांत राहिले,

आणि समोर घडतंय ते चुकीचे आहे, दूरगामी परिणाम करणारे आहे हे समजत असून सुद्धा जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा आपण सगळेच कटप्पा असतो.

छान लेख. निरीक्षण आवडले.
<<<सगळ्यात मोठा कट्प्पा, पितामह भीष्म, rather त्यांना डोळ्यापुढे ठेवूनच ती व्यक्ती रेखा लिहिली असावी,>>> +१००

छान लिहिले आहे

सगळ्यात मोठा कट्प्पा, पितामह भीष्म >+१

समोर घडतंय ते चुकीचे आहे, दूरगामी परिणाम करणारे आहे हे समजत असून सुद्धा जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा आपण सगळेच कटप्पा असतो.>>>>>>> सिम्बा + १००००००० अगदी खरं

राजमाता भावनेच्या भरात आदेश देते, तो हा बिनबोभाट पाळतो. तिला असे म्हणत नाही, की हे चूक आहे. जर हा आदेश पाळायचा असेल तर पहिले मला ठार करा. तुम्हाला तो नको असेल तर आम्ही सगळे इथून निघून जातो, कुंतल देश किंवा अजून कुठे. पण नाहीच, हा नंदीबैल मान डोलावतो आणि एक सुखी संसार आपल्या हाताने उध्वस्त करतो.
>>
गुलाम नव्हता. त्याला गुलामांच्या बाजारातुन विकत आणलेले नव्हते.
त्याच्या पुर्वजांनी, आमचा समुह व पुढच्या पिढ्या तुमच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहतील असे "वचन" दिलेले होते.
कटप्पा त्या वचनात होता. त्याच्यादृष्टीने ते बरोबरच होते.
दुस-या भागात, महेंद्रच्या बाजुने लढताना कटप्पा जेव्हा राजवाड्यात पोहोचतो तेव्हा भल्लाळदेवाचे वडील परत त्या "वचनाची" आठवण करुन देऊन त्याची दिशाभुल करायचा प्रयत्न करतात. तेव्हा तो त्यांना आठवन करुन देतो की, मरण्याआगोदर शिवगामीने महेंद्रला राजा घोषीत केले होते त्यामुळे त्या राजाची - राजसिंहासनची - बाजु घेऊन त्याने वचनच पाळले आहे तोडलेले नाही.
या सगळ्यात गुलामी कुठेही नाही.

आता,
"पुर्वजांनी दिलेल्या वचनाचा" गैरफायदा घेतला जातोय, त्याने न्याय बाजुची हार होते आहे, वाईट बाजु जिंकते आहे, असे दिसत असताना त्या "वचनाचा" जे एक प्रकारचा "करार"च आहे, त्या कराराचा किती मान ठेवायचा व गरजेनुसार असे वचन / करार न पाळावे - या सद्सदविवेकबुद्धीत कटप्प कमी पडला,
असा मुद्दा असेल तर तो बरोबर आहे.

भिष्म, द्रोणाचार्य माझ्याही डोक्यात आलेले, पण मी ते पौराणिक म्हणून उल्लेख केला नाही.

समोर घडतंय ते चुकीचे आहे, दूरगामी परिणाम करणारे आहे हे समजत असून सुद्धा जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा आपण सगळेच कटप्पा असतो

क्या बात है, फारच सुंदर वाक्य

त्याला मानसिक गुलाम म्हणले आहे. सद्सद्विवेकबुद्धीबद्दलच आक्षेप आहे.

भीष्मांचेच उदाहरण डोक्यात आलं होतं. किंबहूना, शेवटी युद्धानंतर जेव्हा पांडव शरपंजरी भीष्मांना भेटायला जातात, तेव्हा भीष्म युधिष्ठीराला जो उपदेश करतात ('व्यक्तीपेक्षा राज्य श्रेष्ठ'), त्यात ह्या चुकीची कबुली देतात असं मला वाटतं.

पण चूक - बरोबर हे बरेच वेळा hindsight मधे ठरतं. कधी कधी असहायता सुद्धा असू शकते, तर कधी कधी 'हे सगळं बदलेल' ही (भाबडी?) आशा सुद्धा निर्णयाच्या आड येते. काही प्रसंगात दूरदृष्टीचा अभाव असतो. हे कशाचही समर्थन नाहीये, असलीच तर कारणमीमांसा आहे.

जेव्हा भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंगची कीड लागलेली तेव्हा सचिन तेंडुलकर कटप्पा झालेला.

मग महेण्द्र बाहुबली सौरव गांगुली आला...

धाग्याची कल्पना छान, आणखी काही सुचले तर भर टाकतो.

"जेव्हा भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंगची कीड लागलेली तेव्हा सचिन तेंडुलकर कटप्पा झालेला." - हा सचिन च्या कारकिर्दीवर बरेच वेळा घेतला गेलेला आक्षेप आहे. त्याला गरज असली तर त्याने त्याचं खंडन करावं. पण मला वाटतं की हे ईतकं सरळ साधं सोपं नसावं.
एक तर त्यात फार मोठे मोठे गुन्हेगार गुंतले होते, ज्यामुळे धोका खूप मोठा होता (बॉब वूल्मर चं उदाहरण आहेच).

दुसरं म्हणजे बाहेरून बघताना एखादा आरोप करणं वेगळं आणी आत राहून पुरावा सादर करणं वेगळं.

ईतक्या उघड उघड गोष्टी चालत नसाव्या.

जेव्हा मित्र कोण आणी शत्रू कोण हे कळत नाही तेव्हा कुणावर, किती आणी कसा विश्वास टाकायचा हे सुद्धा कळत नाही.

आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे गृहीत धरतो की आपल्यापर्यंत आलं नाही म्हणजे त्याने काहीच केलं नसणार. हे गूहीतक कदाचित तितकसं बरोबर नसेल सुद्धा.

सचिनबद्दल काही बोललं कि सचिनभक्त खवळतात असा अनुभव आहे.

माझ्या निरीक्षण व अनुभवानुसार, सचिन हा क्रिकेटमधला एकमेव असा ब्रँड आहे जो क्रिकेटपेक्षा कैकपटीने मोठा आहे. याच्यावर शिंतोडे उडू देणे कोणालाच परवडण्यासारखे नव्हते, तरी त्याची कारकीर्द डोळस पणे पाहिली तर अनेक लूफोल्स दिसतील, भक्त इतके आंधळे असतात की देवाने अगदी दाखवून पाप केले तरी ते मानायला तयार नसतात. उद्या सचिनने स्वतः कबुली जरी दिली तरी भक्त म्हणतील तो कोणाच्या दबावाखाली कबुली देतोय....

ही सचिनवर टिका नाही.
म्हणजे सचिन मॅच फिक्सिण्गमध्ये सहभागी होता असे नाही.
कटप्पाचा अर्थ लक्षात घ्या. त्याने याला वेळीच वाचा फोडायला हवी होती असे मला वाटते ईतकेच.
बाकी त्याने तसे न करण्यामागची कारणे फेरफटका म्हणतात तशी असू शकतात. त्यामुळे सचिनवर कसला रागही नाहीये. त्याच्या धाग्यांवर आणि फॅनक्लबात माझी नियमाने हजेरी असते.

सचिन कडुन अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, कारण जे त्याला माहीत आसेल त्याचा पुरावा त्याच्या कडे असायला हवा
नाही तर विरोधक त्याचच करिअर बरबाद करायला मागे पुढे पाहील नसतं.
आपल्या अजुबाजुला होणा-या किती भ्रष्टाचाराच्या गोष्टींचा आपण पाठपुरावा करतो, उजेडात आणतो.

बाबरी मशिद की वादग्रस्त ढाचा की काय ते पाडले तेंव्हा कोण कटाप्पा होते? वाजपेयी की नरसिंहराव? आणि २००२ साली गुजरात दंगल की प्रतिक्रिया की काय ते झाले तेंव्हा?

"जेव्हा भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंगची कीड लागलेली तेव्हा सचिन तेंडुलकर कटप्पा झालेला." - हा सचिन च्या कारकिर्दीवर बरेच वेळा घेतला गेलेला आक्षेप आहे. त्याला गरज असली तर त्याने त्याचं खंडन करावं. पण मला वाटतं की हे ईतकं सरळ साधं सोपं नसावं.
एक तर त्यात फार मोठे मोठे गुन्हेगार गुंतले होते, ज्यामुळे धोका खूप मोठा होता (बॉब वूल्मर चं उदाहरण आहेच).
दुसरं म्हणजे बाहेरून बघताना एखादा आरोप करणं वेगळं आणी आत राहून पुरावा सादर करणं वेगळं.
ईतक्या उघड उघड गोष्टी चालत नसाव्या.
जेव्हा मित्र कोण आणी शत्रू कोण हे कळत नाही तेव्हा कुणावर, किती आणी कसा विश्वास टाकायचा हे सुद्धा कळत नाही.
आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे गृहीत धरतो की आपल्यापर्यंत आलं नाही म्हणजे त्याने काहीच केलं नसणार. हे गूहीतक कदाचित तितकसं बरोबर नसेल सुद्धा.
>>>>>>>>>. संपुर्ण पोस्ट पटली

मंडळी पुन्हा नव्या तिकिटावर जुना खेळ खेळून पश्चाताप करायला लावणार बहुदा. >>> +१ , आशु काही लोक वाटच बघत असतात असे खेळ करण्याची.

Pages