फ्री...? : भाग ७

Submitted by पायस on 2 January, 2017 - 02:30

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/61022

१८८७, काल्डवेल मॅनॉर
डेव्हॉनशायर, इंग्लंड

हेन्री ट्रेन स्टेशनमधून बाहेर पडताच काल्डवेलनी पाठवलेली घोडागाडी त्याच्या दृष्टीस पडली. तिला एकच पिंगट रंगाचा घोडा जोडलेला होता. गाडीवानाने अदबीने त्याला झुकून अभिवादन केले व त्याची बॅग हातात घेतली. हेन्री आतमध्ये बसला आणि दुडक्या चालीने तो घोडा मार्गक्रमण करू लागला. हिवाळा अजून सुरू व्हायचा होता. अशावेळी हेन्रीला घोडागाडीत बसून प्रवास करण्याऐवजी घोड्यावर बसून रपेट करायला अधिक आवडले असते पण इंग्लिश प्रघात पाळणे आवश्यक होते. मॅक्सवेल घराणे खूप वर्षांपासून एसेक्स परगण्यात राहत होते. एसेक्स लंडनला जवळ असल्याने तिथे औद्योगिकीकरणाचे वारे लवकर पोहोचले होते आणि तसेही त्या सपाट प्रदेशात वस्ती करणे सोपे होते. हेन्रीला त्या वातावरणाचा काहीसा कंटाळा येई. त्या पार्श्वभूमिवर त्याला डार्टमूरच्या टेकड्यांचा प्रदेश एखादी सानुली झुळूक यावी तसा खुणावे. डेव्हॉनशायर परगणा अजूनही व्हिक्टोरियन संस्कृतीच्या पडद्याखाली शेजारच्या वेल्श संस्कृतीचा प्रभाव राखून होता. लॉर्ड काल्डवेल अजूनही डार्टमूरचा सिंह म्हणून ओळखले जात. आज हेन्री त्यांनाच भेटण्यासाठी निघाला होता.
डार्टमूर इंग्लंडच्या नैऋत्येस असलेला गवती मैदानांचा प्रदेश आहे. पूर्व इंग्लंडच्या मैदानांप्रमाणे तो सपाट नसून छोट्या छोट्या टेकड्यांनी वेढलेला आहे. हेन्रीला व्यक्तिशः डार्टमूरच्या टेकड्या उत्तरेकडच्या डोंगरांपेक्षा अधिक भावत. इथले डार्टमूर पोनीज त्या टेकड्यांवर धावताना बघणे एक आनंददायी अनुभव असे. लॉर्ड काल्डवेल यांच्याबरोबर शिकारीला जायची संधी मिळाली कि दुग्धशर्करा योगच जुळून येत असे. आज मात्र हेन्री सरकारी कामाकरिता तिथे चालला होता. त्याला काम होताच तडक लंडनला परतणे भाग होते. तिबेटशी चाललेल्या वाटाघाटी फिसकटत होत्या आणि त्या प्रदेशात काम केलेल्या काल्डवेल यांचा सल्ला आत्ता मोलाचा होता.
"दोज रास्कल्स डिझर्व्ह वॉर अ‍ॅन्ड अ‍ॅनिहिलिशन!" चार्ल्सकडून थोडी बरी सुरुवात अपेक्षित होती. हेन्रीला आता याची सवय झाली असली तरी चार्ल्सचा मूळचा खानदानी आवाज बदलून तो रासवट शब्दांत आपली मते व्यक्त करायला सुरुवात करे तेव्हा पहिली काही मिनिटे तो दचकल्याशिवाय राहत नसे. चार्ल्स काल्डवेल वयाने हेन्रीपेक्षा फार मोठा नव्हता. परंतु युद्धभूमिवर घालवलेले तास मोजता तो हेन्रीचा आजोबा होता. म्हणूनच कि काय हेन्री त्याला अदबीने सर म्हणत असे. काल्डवेल हे वंशपरंपरागत सरदारकी लाभलेले घराणे नव्हते. चार्ल्सच्या वडिलांनी पहिल्या अफू युद्धात पराक्रम गाजवल्यावर काल्डवेल घराणे नावारुपास आले. मग चार्ल्सने अनेक युद्धांत भाग घेतला व तो सरदारकी मिळविण्यात यशस्वी झाला. अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत तो युद्धास जात होता. अखेर तिसर्‍या अँग्लो-बर्मीज युद्धात त्याचा एक पाय कामी आला आणि नाईलाजाने तो आपल्या डार्टमूरच्या निवासस्थानी स्थिरावला.
"तो राजा चोग्याल ल्हासाच्या नादी लागला तेव्हाच मी म्हटलं होतं. हे मॅकाले मिशन सब झूट आहे आपण त्या लोकांना सरळ धडा शिकवला पाहिजे. पण माझं ऐकतो कोण?"
"सर तुम्ही कितीही बरोबर असलात तरी आता तो भूतकाळ झाला. आज तुम्हाला संधी आहे तर तुम्ही योजना आखायला मला प्लीज मदत करा."
"ठीक आहे मॅक्सवेल. पण फक्त तू म्हणतोस म्हणून मी मदत करायला तयार आहे. असो ते होतच राहिल, तू शिकारीला येतोस? मस्त ससे मारून आणू आणि रात्री दोन पेग मारून मग यावर विचार करू. मी घोडे काढायला सांगतो. अ‍ॅलेक्सी?"
हेन्रीने त्या विशी पार केलेल्या तरूणाकडे पाहिले. जवळच अंगणात तो सरपणाची लाकडे फोडत होता. हाडापेराने मजबूत वाटत होता. चार्ल्सनेच मग ओळख करून दिली, "तुला तर माहितीच आहे मला वॅलेट वगैरेची गरज कधी भासली नाही. बिंगहॅम परिवार वर्षानुवर्षे आमच्या परिवाराचे बटलर आहेत. हा आर्थरचा मुलगा अ‍ॅलेक्सियस अर्थात अ‍ॅलेक्सी." हेन्री आर्टोरियस अर्थात आर्थर बिंगहॅमला चांगलाच ओळखत होता. पुढची पिढी हाताशी आल्याने आर्थर निश्चित सुखावला असणार. त्याने अ‍ॅलेक्सीकडे बघत किंचित हॅट उंचावली व चार्ल्सचा निरोप घेतला.
कपडे बदलून हेन्री बाहेर आला तोवर अ‍ॅलेक्सीने घोडे तयार ठेवले होते. तो घोड्यांपाशी उभा राहून चार्ल्सची वाट पाहू लागला. आता खोटा पाय बसवून, हंटिंगचा पोशाख चढवून यायला थोडा वेळ लागणारच! एवढ्यात ते घोडे खिंकाळले. त्या खिंकाळण्यात एक प्रकारचा गोडवा होता. त्यात धोक्याची सूचना नसून एकप्रकारची ओळख होती. हेन्रीने पाहिले तर एक सात वर्षाचा मुलगा दहा पावलांवर उभा होता. पूर्वी तो इथे आला होता तेव्हा तो खूपच लहान होता आणि नंतर काही कारणाने चार्ल्सच्या या वारसदाराची भेट घेण्याचा योग आलाच नव्हता. ख्रिस मंद स्मित करत त्या घोड्यांजवळ गेला व प्रेमाने त्याने त्यांची आयाळ कुरवाळली.
"हाय ख्रिस" हेन्रींच्या अभिवादनाकडे दुर्लक्ष करत ख्रिस घोड्याच्या मानेशी मान घासत होता. इतक्यात सप्पकन त्याच्या पाठीत हंटर बसला आणि त्याने जमिनीवर लोळण घेतली. चार्ल्स लालबुंद डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होता. हेन्रीला अनुभवाने ठाऊक होते कि अशा वेळी तोंड न उघडलेलेच बरे!
"कारट्या! मॅक्सवेलला हॅलो करायला जीभ झिजते का तुझी? शिस्तीत राहत जा. कुठून पदरी पडलंय हे कारटं कोणास ठाऊक? चल मॅक्सवेल" ख्रिसच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत चार्ल्स जंगलाच्या दिशेने चालू लागला. हेन्रीने मागे वळून पाहिले. ख्रिसच्या डोळ्यांत पाण्याचा टिपूस नव्हता. त्याचेही डोळे लाल भासत होते. त्यात जगाला जाळून टाकणार क्रोध भरून राहिला होता. त्यातला विखार असह्य होऊन हेन्रीने आपले डोळे गच्च मिटून घेतले.

........
........
........

"सर मॅक्सवेल, सर मॅक्सवेल" हेन्रींनी डोळे उघडले तर समोर जोसेफ चिंताक्रांत चेहर्‍याने त्यांच्याकडे बघत होता. आपल्याला चांगलाच घाम आला असल्याचे त्यांच्य लक्षात आले. रुमालाने घाम पुसत त्यांनी आपण ठीक असल्याचे दर्शवले. जोसेफचा जीव भांड्यात पडला.
"खूपच वाईट स्वप्न पडलेले दिसतंय. पार घाबरेघुबरे झाला होतात. त्यात अजूनही उन्हाळा कमी झालेला नाही. बरं मी उठवण्याचे आणखी एक कारण म्हणजे कलकत्ता आलेले आहे."

~*~*~*~*~

१७ जून १९११
व्हॉईसरॉय हार्डिंग्ज यांचे निवासस्थान
कलकत्ता, ब्रिटिश इंडिया

हार्डिंग्ज आरशात बघून आपले केस सारखे करत होते. केंट परगण्यातल्या प्रसिद्ध व्हिस्काऊंट्सच्या वंशजाला साजेशी त्यांची राहणी होती. पन्नाशी उलटून गेल्याच्या खुणा प्रयत्नपूर्वक लपवल्या जात होत्या. बॅरन ऑफ पेन्सहर्स्ट, व्हाईसरॉय ऑफ इंडिया चार्ल्स हार्डिंग्ज त्या नावाला साजेसा दिसला पाहिजे ना! व्हाईसरॉय मधला रॉय फ्रेंच भाषेतून आलेला आहे, त्याचा अर्थ होतो राजा. ब्रिटनचा खरा राजा सातासमुद्रापार बसला असल्यामुळे त्यातल्या व्हाईस काढून शब्दशः या पदवीला राजाचा दर्जा द्यायला हरकत नव्हती. त्याचा शर्ट अत्यंत तलम अशा डाक्क्याच्या मलमलीचा होता. कोटावर सोनेरी धाग्याने उत्कृष्ट अशी कलाकुसर केली होती. खांद्याच्या इथे झूल शिवली होती. त्या झूलीवर व्हाईसरॉयचे चिन्ह रेशमी धाग्याने विणलेले होते. बटणे रुपेरी होती तर त्यांची काजी रेशमी होती. खास कनौजी अत्तरांचा एक पूर्ण संच दिमतीस होता. पण आज या राजाला कोणती चिंता सतावत होती?
हेन्री उठून उभे राहताच जोसेफलाही हार्डिंग्ज आल्याची जाणीव झाली. "गुड आफ्टरनून हिज एक्सलेन्सी" दोघेही एकाच सुरात म्हणाले. हार्डिंग्जने स्मित करून त्यांना बसण्यास सांगितले. लगेचच चहा व त्यासोबत मफिन्स, बिस्किटे यांनी भरलेल्या थाळ्या पुढे आल्या. जोसेफ ख्रिस इतका चोखंदळ नसला तरी त्याला पहिल्या घोटात कळून चुकले कि तो आत्ता भारतातला सर्वोत्कृष्ट चहा चाखत होता. दार्जिलिंगच्या पानांच्या तीव्र चवीला संतुलित करत होता चीनचा कीमुन चहा. कीमुनच्या ऑर्किडची आठवण करून देणार्‍या सुगंधाला यात अबाधित ठेवण्यात आले होते तर बारीकशी चॉकोलेटची चव अधिकच खुमार आणत होती. जोसेफला क्षणार्धात कळून चुकले कि का लंडनमधले सर्व लॉर्ड भारताचा व्हाईसरॉय बनण्यास का उत्सुक असत. ब्रिटनचा सम्राटही कदाचित असे आयुष्य जगत नसेल.
"सर मॅक्सवेल ... " हार्डिंग्जचा एवढा इशारा मॅक्सवेल यांना पुरेसा होता. त्यांनी थोडक्यात ख्रिस व जोसेफने घेतलेला शोध, त्यांचे तर्क व त्याला पुष्टी देणारे पुरावे यांचा आढावा घेतला. पंचम जॉर्ज यांच्या जीवाला असलेला धोकाही विशद केला. हार्डिंग्ज हे सर्व अत्यंत लक्ष देऊन ऐकत होते. किमान त्यांच्या चेहर्‍यावरून तरी तसे वाटत होते. अंगठा हनुवटीवर, तर्जनी उजव्या गालावर तर उरलेली तीन बोटे मुडपलेली आणि मधले बोट ओठांवर विसावलेले. मधूनच मान डोलावून अत्यंत गंभीर चेहर्‍याने अनुमोदन देणे अशा हालचालींमुळे जोसेफला तरी हा मनुष्य सारासार विचार करून आपले म्हणणे ऐकेल अशी आशा निर्माण झाली. हेन्रींच्या मनात मात्र अशा कोणत्याही भ्रामक समजूती नव्हत्या.

*****

"दॅट जायजँटिक बफून!!" जोसेफ नुसता धुमसत होता. हार्डिंग्जने अत्यंत नम्रपणे पंचम जॉर्ज यांना दिल्ली दरबारात न बोलावण्याची सूचना फेटाळून लावली होती. अशा जर-तर चा विचार करून माघार घेणे ब्रिटिश साम्राज्याला शोभा देणार नाही असे त्यांचे मत पडले. तसेच जर अशी माघार घेणे जर्मनांच्या डोळ्यावर येईल व पुढे ते याचा वापर ब्रिटनची प्रतिमा मलिन करायला करतील अशीही भीति त्यांनी बोलून दाखवली. जोसेफला कळत नव्हते कि अजून आपण काय वेगळे करायला हवे होते जेणेकरून हा निर्णय बदलला गेला असता. हेन्री मात्र शांत होते. बग्गीत बसल्यावर न राहवून जोसेफने त्यांना विचारलेच.
"आपल्या हातात एवढेच होते जोसेफ. एक लक्षात घे हार्डिंग्ज अत्यंत मुरलेला राजकारणी आहे. वयाने तो माझ्याहून दहा वर्षांपेक्षा लहान असला तरी त्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींची समज माझ्या तुलनेत खूप जास्त आहे. ऐन अफगाण युद्धाच्या धुमश्चक्रीत तो इराणच्या दूतावासात काम करत होता. रशियामध्ये तो बरीच वर्षे राजदूत राहिला आहे आणि आपल्या परराष्ट्र खात्यात त्याचे प्रचंड वजन आहे. अशा वेळी त्याने जर पंचम जॉर्ज यांना बोलावण्याचा घाट घालून तो मध्येच मोडला तर त्याच्या नावाला काय किंमत राहिली?"
"पण मग सम्राटांचा असाच बळी जाऊ द्यायचा?"
"अर्थात नाही! एक लक्षात घे कि हर हायनेस क्वीन व्हिक्टोरिया प्रमाणे जॉर्ज फारसे मुत्सद्दी नाहीत. त्यांचा मुख्य उपयोग शांतिदूत म्हणून आहे. माझे शब्द तुला आत्ता गंमतीशीर वाटतील पण भविष्यात या राजा राणींना आंतरराष्ट्रीय बाहुल्याचे स्वरुप येणार आहे. असा मोहरा अर्थातच हार्डिंग्ज वाया घालवणार नाही."
"मग ते तशी पाऊलेही उचलत नाही आहेत. मोरोक्को क्रायसिस आणि पेटलेला भारत अशी दोन दोन प्रकरणे आपल्याला परवडतील?"
"निश्चित नाही. त्यांचे शब्द तू नीट ऐकलेस का? विथ दॅट सेड, आय ट्रस्ट युवर जजमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅज अ प्रोटेक्टर ऑफ किंगडम्स फॉरेन इंटरेस्ट आय अशुअर यू ऑफ माय फुल को-ऑपरेशन! थोडक्यात संभावित धोका टाळायला जे काही आवश्यक आहे ते सर्व करायची परवानगी आपल्याला मिळाली आहे. कोणीही आपल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ही परवानगी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे जोसेफ! बदल्यात आपण लवकरात लवकर या संभावित योजनेच्या मूळापर्यंत जाणे अपेक्षित आहे. देअर इज अ लॉट टू डू!"
जोसेफचा चेहरा उत्साहाने फुलला. त्याने खिडकीतून मागे नजर टाकली. अजूनही तो आलिशान महाल नजरेआड झाला नव्हता. जोसेफ स्वतःशीच पुटपुटला, दॅट जायजँटिक बफून!!

~*~*~*~*~

जुलै पहिला आठवडा, १९११
इंदूर, ब्रिटिश इंडिया

इंदूर आणि इतर संस्थानांमध्ये एक छोटासा फरक होता. होळकरांचे इंदूर विसाव्या शतकातही आपला आब राखून होते. हैदराबादचा निजाम, बडोद्याचे गायकवाड आणि म्हैसुरचे वाडियार वगळता होळकरांइतका मान कोणत्याही संस्थानिकाला नव्हता. इंदूर बघितल्यावर याची प्रचिती कोणालाही येत असे. खवैय्यांचे, रसिकांचे शहर इंदूर! अशा शहराला वैतागलेला मनुष्य अरसिकच म्हणावा लागेल. म्हणा चहा हा एक विषय वगळता ख्रिस अरसिकशिरोमणीच होता.
इंदूरला येऊन ख्रिसला काही काळ लोटला होता. फणींद्रच्या तपासाची सर्व सोय लावल्यानंतर त्याने आपले लक्ष नटराजा सर्कसवर केंद्रित केले. त्या सर्कशीचे जे काही गुपित आहे ते जाणून घेण्याकरिता सर्व इतिहास-भूगोल जाणून घेणे गरजेचे होते. त्याने गोळ्या केलेल्या माहितीनुसार ती सर्कस ग्वाल्हेर जवळ कुठेतरी उदयाला आली कारण सुरुवातीचे सर्व शो राजपुताना व ग्वाल्हेर संस्थानाच्या आजूबाजूला झाले होते. पहिला मोठा शो ग्वाल्हेरच्या सिंधिया संस्थानिकांपुढे झाला व त्यांच्या आर्थिक आशीर्वादाने तिचा विस्तार होऊ शकला. मग हळूहळू ते दक्षिणेस सरकत मुंबईत पोहोचले व पुण्यामुंबईस तिचे बरेच शो झाले. आता नागपुर मार्गे सर्कस पुन्हा उत्तरेस सरकत होती. ख्रिस मुंबईतून निघाला तेव्हा सर्कस नागपुरच्या दिशेने गेल्याची त्याची बातमी होती. तो तिथे पोहोचेपर्यंत सर्कशीचा मुक्काम हलण्याची शक्यता होती. तसेच त्याला सर्कशीचे एका शहरातील वास्तव्याचे पहिल्यापासून निरीक्षण करता आले नसते. हे सर्व विचारात घेता त्याने तिथून जवळ असलेले मोठे संस्थान, इंदूरला जाऊन वाट बघण्याचा निर्णय घेतला. होळकरांसारख्या मोठया संस्थानिकासमोर आपली कला सादर करण्याची संधी कोणताही सर्कस चालक दवडणार नाही असा त्याचा होरा होता. पण अजून तरी सर्कशीने आपले दर्शन दिले नव्हते. पावले वाजली म्हणून त्याने मागे बघितले तर रश्मी चहा घेऊन आली होती. ख्रिसने चहाचा घोट घेतला - नॉट बॅड! नथिंग आऊट ऑफ ऑर्डिनरी बट पासेबल. मग त्याने प्लेट्सवर नजर फिरवली. त्यात पोहे, कचोर्‍या वगैरे होते. आज होळकरांच्या आचार्‍यांनी त्याच्या नाश्त्यासाठी पोहे पाठवले होते. तो काही वेळ रश्मी आणि पोहे यांच्याकडे आलटून पालटून बघत राहिला.
अ‍ॅलेक्सी, एव्हन ईव्ह डिड नॉट मिस एडन अ‍ॅज मच अ‍ॅज आय अ‍ॅम मिसिंग यू !

*****

२८ मे १९११

ट्रेन बडोद्यात पोहोचली आणि ख्रिसला टीसीने उठवले. त्याचे डोके भणभणत होते. त्याला नीटसे काय झाले आठवत नव्हते पण त्या बडबड्या मुलीला कंटाळून त्याला डुलकी लागली होती. झोपेतून उठल्यावर एवढा त्रास? बडोद्यात त्याला काही सर मॅक्सवेल यांची काही पत्रे पोहोचवायची होती म्हणून तिथे तो एक दिवस राहणार होता. आधी सांगितल्याप्रमाणे टीसी त्याला उठवायला आला म्हणून नाहीतर तो किती वेळ तसाच झोपून राहिला असता कोणास ठाऊक? त्याने टीसीचे आभार मानले आणि तो उठला तर आपले सामान गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले.
"आय से, एनी आयडिया व्हेअर डिड माय लगेज वाँडर ऑफ टू?" त्याने टीसीला विचारणा केली.
"सर, आय बिलीव्ह युवर सर्व्हंट डिड टेक इट विथ हर अ‍ॅंड वेंट अहेड." माझी नोकर? ही कोण नवीन .... ओह नो! त्याने आपली डोकेदुखी विसरून बाहेर धाव घेतली. मागून टीसी पण धावत धावत आला. त्याच्या सुदैवाने त्याला रश्मी दिसली.
"आय कमांड यू टू स्टॉप, यू थीफ!!" ख्रिसला आपल्या मागे धावताना पाहून रश्मीने त्यातल्या त्यात हलकी बॅग फक्त बरोबर घेतली. त्याचे पाकिट तिने आधीच काढून घेतले होते. उरलेल्या सूटकेसेस तशाच फेकून तिने धूम ठोकली.
"सर, मला वाटलं कि ती तुमची नोकर आहे." मागून धावणार्‍या टीसीला ख्रिसने बघितलेच नव्हते.
"फॉर द लव्ह ऑफ ऑल दॅट इज गुड, ती मुलगी आणि माझी नोकर? मी कधीही अशा ... अशा कोणाला नोकर म्हणून ठेवून घेणार नाही."
"वेल सर, उद्याला कोणी बघितलं आहे? कुणी सांगावं तुम्ही तिला नोकरीला ठेवालही."
"ब्लास्ट इट. तू माझ्या सोबत का पळत आहेस पण? जा आणि पोलिस कोणी असेल तर त्याला बोलव."
"सर तुमचं तिकिट ...."
वाक्य पूर्ण होण्याआधीच ख्रिसने त्याच्या तोंडावर तिकिट फेकले आणि तो रश्मीच्या मागे धावत सुटला. त्याचा धावण्याचा वेग अचाट होता पण रश्मी देखील कमी चपळ नव्हती. पाठलाग थोड्याच वेळात हमरस्त्यावर आला आणि रश्मीने अचानक सागरगोटे काढून ख्रिसच्या वाटेत फेकले. काय होतंय ते ख्रिसच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. ख्रिस स्वतःला सावरत उठेपर्यंत रश्मी बरीच पुढे पळाली होती.
"सर, लिफ्ट हवी आहे का?" मागून टीसीचा आवाज आला. त्याने एव्हाना एक बग्गी मिळवली होती. ख्रिसच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटली. त्याने गाडीवानाच्या शेजारची जागा पकडली आणि नव्या जोमाने रश्मीचा पाठलाग सुरू झाला. इकडे तिने निर्धास्त होऊन धावण्याचा वेग कमी केला होता. सुदैवाने तिला मागे वळून ख्रिसचे काय झाले बघायची बुद्धि आली आणि तो बग्गीतून तिच्या मागेमागे येतोय हे बघून तिने पुन्हा वेग वाढवला. घोड्याच्या वेगाने आपल्याला धावणे जमणार नाही हे कळण्याइतकी ती हुशार होती. म्हणून तिने हमरस्ता टाळून चिंचोळ्या बोळांची निवड केली. ख्रिसला याची कल्पना आली होतीच. त्याने गाडीवानाला बग्गी इमारतींना किंचित खेटून घ्यायला लावली व आश्चर्यकारक चपळतेचे प्रदर्शन करत त्याने इमारतीच्या छतावर उडी घेतली. आता ख्रिस छतावर तर रश्मी जमिनीवर असा सुरू झाला. पळता पळता तिला एक भिंत आडवी आली. पुन्हा मागे वळण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे तिने शिताफीने भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ख्रिसने ही संधी साधून तिच्यावर झेप घेतली. दोघेही भिंतीच्या दुसर्‍या बाजूला पडले व रश्मीच्या हातातून ख्रिसची बॅग खाली पडली. तिच्यातले कागद इतस्ततः पसरले. ख्रिसने रश्मीचे दोन्ही हात पकडून ठेवले. ती तिच्या परीने प्रतिरोध करत होती आणि अचानक तिचा प्रतिरोध मंदावला. ख्रिसला काही कळेना पण तिच्या हाताला सुटलेला कंप त्याला जाणवला. त्याने नीट पाहिले तर ती त्या कागदांकडे रोखून बघत होती.
"साहेब या निशाणाशी तुमचा काय संबंध आहे?"
निशाण? ते सर्व फोटो व कागद सर्कसशी संबंधित होते. त्याला ते कागद गोळा करून तिला प्रत्येक कागद दाखवून उलट तपासणी घ्यायचा मोह झाला पण ही नाटक करत नसेल कशावरून? त्याने अधिक धोका न पत्करता तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. इथे मॅक्सवेल यांनी त्याला दिलेले ओळखपत्र कामी आले. त्या अधिकाराचा वापर करून त्याने पोलिसांना तो परत येईपर्यंत तिला केवळ नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. ती अजूनही थरथरत होती. ख्रिसने आपले सामान गोळा केले व प्रथम सर मॅक्सवेल यांची पत्रे योग्य त्या ठिकाणी पोहोचवायचे ठरवले. बग्गीत बसल्यावर तो सर्व फोटो बघत विचार करत होता. निशाण? कोणते निशाण?

*****

रश्मी गवताची काडी चावत त्या खोलीला असलेल्या एकमेव खिडकीतून बाहेरची दृश्ये न्याहळत होती. तिची गैरसोय असली तर इतकीच कि तिला त्या खोलीच्या चार भिंतींच्या बाहेर जायला सक्त मनाई होती. अन्यथा तिला हव्या त्या सुखसोयी पुरवण्यास ख्रिसने सांगितले होते. वेण्या सुटून तिचे लांबसडक केस अस्ताव्यस्त लोंबत होते. डोळ्यातले बेफिकीरीचे भाव काहीसे कमी झाले असले तरी कायम होते. दोन दिवस ती या खोलीत बंद होती. जेवण द्यायला येणारा पोलिस सोडला तर तिच्याशी कोणीही संवाद साधला नव्हता. चोरी केल्याबद्दल तिला यापूर्वीही शिक्षा झाली होती पण हा अनुभव नवीन होता. कडी काढल्याचा आवाज झाला आणि आत येणारा ख्रिस तिच्या नजरेस पडला.
"हाय प्रिटी लेडी. आशा करतो कि तुला फार त्रास झाला नसेल."
"साहेब ..."
"अं ह. ख्रिस! मला स्वतःचे नाव आहे आणि मला सर म्हणू शकणारा एकमेव व्यक्ती .. वेल लाँग स्टोरी शॉर्ट, कॉल मी ख्रिस! मला ख्रिस म्हणूनच हाक मार."
"बरं. ख्रिस साहेब (ख्रिसने मनातल्या मनात कपाळाला हात लावला). कृपा करून मला जाऊ द्या. म्हणजे मी चोरी केली, मी कबूल करते. मी शिक्षाही भोगायला तयार आहे पण अशी नजर कैद का?"
"अह्ह ते चोरीप्रकरण मी केव्हाच विसरलो. मला स्वतःचीच लाज वाटायला पाहिजे कि कोणीतरी दिवसाढवळ्या माझ्या डोळ्यात धूळ फेकून निसटण्यात जवळपास यशस्वी झाले. असो, मला अधिक रस आहे तुझ्या त्यादिवशीच्या प्रतिक्रियेमध्ये, तिच्यामागच्या कारणांमध्ये. असं काय झालं कि तू इतकी घाबरलीस?"
"जाऊ द्या ना ख्रिस साहेब. तुम्हाला एव्हाना कळून चुकले असेलंच कि मी तुमच्या पकडीतून निसटण्यासाठी तो दिखाऊ अभिनय केला होता. पण तुमची सुद्धा कमाल आहे अजिबात फसला नाहीत."
"ओह्ह अच्छा तर तो अभिनय होता. मोस्ट प्रेजवर्दी परफॉर्मन्स इंडीड! मग या फोटोत असं काय विशेष आहे बरं.."
त्याने अचानक बर्थोल्ट होनेसच्या प्रेताचा फोटो तिच्या समोर धरला आणि तिच्या तोंडून अस्फुट किंकाळी बाहेर आली. ती थोडी मागे सरून भिंतीला टेकली. ख्रिसने विजयी मुद्रेने तिच्याकडे पाहिले. तिने हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला,
"काहीतरीच काय! प्रेताचा फोटो बघितल्यावर कोणीही दचकेल. इंग्रज लोक हुशार असतात असा माझा समज होता. पण बहुधा तो गैरसमजच होता."
"आय सी. म्हणून तू हुशार इंग्रजांनाच फसवून त्यांच्या सामानाची चोरी करतेस. मस्ट से आय अ‍ॅम इंप्रेस्स्ड! तुला एवढं लक्षात आलं असावं कि मी कोणी सामान्य पोलिस नाही. तेव्हा मी जे काही विचारेन त्याची खरी खरी उत्तरे दे. आता सांग या फोटोत असं काय विशेष बघितलंस? प्रेत आणि ते ही फोटोत बघून घाबरणार्‍यांपैकी तू निश्चित नाहीस. मग काय झालं? असं काय आहे या फोटोत?"
रश्मीने बोलायला थोडा वेळ घेतला. मग आवंढा गिळत तिने बोलायला सुरुवात केली.
"तुमचा सैतानावर विश्वास आहे?" ख्रिसने क्षणभर विचार करून नकारार्थी मान हलवली.
"त्या फोटोत ज्याचं कोणाचे प्रेत आहे त्याच्या जखमा नीट बघा." त्याने फोटो उजेडात धरून नीट पाहिला. त्याच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राचे असंख्य वार केले गेले होते. एवढ्या जखमांमध्ये हिला नक्की काय दिसले?
"तुम्ही चुकीच्या ठिकाणी शोधत आहात. त्याच्या कपाळावर बघा." त्याच्या कपाळावर गोल अशी खूण होती खरी. होनेसच्या चेहर्‍याचा जवळून काढलेला फोटो त्याने बाहेर काढला. ती याच फोटोला बघून घाबरली याची त्याने खात्री करून घेतली. नीट बघितल्यावर लक्षात येत होते कि कपाळावर मुष्टिप्रहाराची खूण होती. खुनी इसम हातात विशिष्ट प्रकारची अंगठी घालत असला पाहिजे कारण तसा वण होनेसच्या कपाळावर उमटला होता. रोखून पाहिले तर त्या वणाला एका चेहर्‍याचा आकार होता. त्या चेहर्‍यातून लांब दात बाहेर आले होते. ती अंगठी एका सभ्य गृहस्थाची असण्याची सुतराम शक्यता नव्हती.
"हेच ते निशाण?"
"होय. मी या वाटेला कशी लागले ती एक करूण कहाणी आहे. तर .."
"कट इट आऊट, विल या? नाऊ डोन्ट बी अ क्रमबम. मला माहिती आहे कि तू सावरली आहेस. तुला डांबून ठेवण्याचा माझा हेतु नाही. पण मला या निशाणाविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. सो प्लीज डोन्ट पुल धिस क्रायबेबी ड्रामा नाऊ!"
तरीही तिने नाटक लगेच बंद नाही केले. ख्रिसने सुस्कारा सोडत आपला रुमाल तिच्या हातात सरकवला.
"सर" एक सार्जंट आत आला. भेटीची वेळ संपली होती.

*****

ख्रिस चरफडत स्टेशनबाहेर पडला. हीच घटना अजून महिनाभराने घडली असती तर सर मॅक्सवेल किंवा जोसेफला एक तार पाठवून त्याला सहज रश्मीला सोडवता आले असते. पण आत्ता त्या चौकीचा अधिकारी तिला सोडायला तयार नव्हता. त्याचेही बरोबर होते, असे कसे एका चोराला सोडायचे? ख्रिसने तिच्यावरचे आरोप बिनशर्त मागे घेण्याची तयारी दर्शविली तरीही त्याने ठाम नकार दिला. बहुधा एका मोठ्या व्यक्तीचे नाव वापरून आपल्या हाताखालचे पोलिस वापरल्याचा रागही त्याच्या डोक्यात असावा. ख्रिसने दुपारची झोप घ्यायचा असफल प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यासमोर फणींद्रचे शब्द नाचत होते - 'तू आत्ता जसा आहेस तसा तू माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीस.' अखेर काहीतरी ठरवून त्याने मनाशी एक निर्णय घेतला.

*****

रश्मीची नजरकैदेच्या खोलीतून साध्या कोठडीत रवानगी करण्यात येत होती. ती मनातल्या मनात छद्मी हसली. याकरिता रात्रीची वेळ निवडून तुम्ही चूक केलीत ख्रिस, रात्रीची मी इथून कशी निसटते आता बघत राहा. तिच्या हातात बेड्या घातल्या होत्या पण पाय मोकळेच ठेवण्यात आले होते. बहुतेक कोणाला अपेक्षा नसावी कि ती पळून जायचे साहस करेल. रात्री तिला न्यायला देखील एकच सार्जंट पाठवण्यात आला होता. आता फक्त याला चकवायचे कसे हा विचार करायचा होता. हे सर्व घडत असताना तिच्या लक्षात आले नव्हते कि तो सार्जंट तिला कोठडीच्या विरुद्ध दिशेने नेत होता. ते जेव्हा थांबले तेव्हा ते एका बग्गीसमोर उभे होते. ख्रिस त्या बग्गीच्या दरवाज्याला टेकून उभा होता. रश्मी पुरती गोंधळली. ख्रिसने कोटाच्या खिशातून एक लिफाफा काढून त्या सार्जंटच्या हातात टेकवला. लिफाफ्यावर टिचकी मारत त्याने रश्मीच्या बेड्या खोलल्या आणि अंधारात तो दिसेनासा झाला.
"माझ्या जुन्या वॅलेटची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण मला एका पर्सनल अटेंडंटची नितांत गरज आहे. आय गेस आय हॅव टू अ‍ॅडॅप्ट विथ अ क्रमबम लाईक यू."
"ख्रिस साहेब .."
"सर. ख्रिस किंवा सर या दोनच प्रकारे तुला हाक मारायची परवानगी आहे. अर्थातच सार्वजनिक स्थळी तुला 'सर' हेच संबोधन वापरावे लागेल. तुझी राहायची व खायची-प्यायची सोय अर्थात मी करेन. बाकी वरखर्चाचे आपण नंतर बघू. यात माझा काय वैयक्तिक स्वार्थ आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे पण तुला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. मी काही पोलिसांना बोलावणार नाही. तशीही तू जर चोर्‍या करत राहिलीस तर पुन्हा कधीतरी पकडली जाशीलच. पण आत्ता माझ्याजवळ फार वेळ नाही. लवकर निर्णय घे; तुला माझा प्रस्ताव मान्य आहे?"
रश्मी अशा पद्धतीने ख्रिस काल्डवेल यांच्याकडे नोकरीकरिता जून १९११ पासून रुजू झाली.

~*~*~*~*~

१ जुलै १९११

आंतरराष्ट्रीय रंगमंचावरही नाट्य रंगात आले होते. मे महिन्यापासून २०,००० फ्रेंच सैनिक मोरोक्कोच्या फेझ शहरात ठाण मांडून होते. जर्मन परराष्ट्रमंत्री कीदरलेन-वेक्टर एक अत्यंत धोरणी राजकारणी होता. त्याला शक्यतो युद्ध टाळायचे होते कारण नुकत्याच बहरात आलेल्या जर्मन औद्योगिक क्षेत्राला व त्याच्या व्यापारिक हिताला धक्का लागण्याची शक्यता होती. दुर्दैवाने कैसर विल्हेमच्या कानांवर युद्धखोरांनी ताबा मिळवलेला होता. कीदरलेनच्या मतांशी सहमत असलेली आणखी एक व्यक्ती बर्लिनमध्ये होती - फ्रेंच राजदूत ज्यूल्स गॅम्बोन. दुर्दैवाने पॅरिसमध्येही युद्धास उत्सुक असलेल्या पक्षाचे वर्चस्व होते. या दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जून महिना कसातरी खेचला पण आज या सर्वांवर पाणी फिरवणारी घटना घडली.
अगादिर हे मोरोक्कोच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले एक सुंदर शहर आहे. कॅसाब्लांकापासून केवळ ५०८ किमी अंतरावर असलेल्या अगादिरची शानही काही वेगळीच आहे. इथेही फ्रेंचांचे सैनिकी ठाणे होतेच. अटलांटिकच्या निळ्याशार पाण्याकडे बघत, उत्कृष्ट मद्याचा आस्वाद घेत मोरोक्कन पाहुणचार झोडण्याशिवाय त्यांना काही काम नव्हते हा भाग अलाहिदा. आज अटलांटिकमध्ये खळबळ माजली होती. आधी क्षितिजावर एक पांढरा ठिपका एवढेच तिचे अस्तित्व होते. मग हळूहळू ती दृष्टिपथात आली. ती जवळ जवळ सव्वादोनशे फूट लांब होती. तिचा कमाल वेग ताशी १४ नॉट्स एवढा होता. तिचा पत्रा आता उन्हात तळपत होत. त्यावर 'एस एम एस पँथर' अशी अक्षरे स्पष्ट वाचता येत होती. डेकचा दरवाजा उघडून दोन जर्मन अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी एक जर्मन झेंडा फ्रेंचांना दिसेल अशा रीतिने फडकावला.
जर्मनीने फ्रेंचांना जरब बसावी म्हणून आपली 'पँथर' ही प्रसिद्ध गनबोट मोरोक्कोत पाठवली होती.

*****

"डेव्हिड वी डिड इट." एल्सा डेव्हिडच्या खोलीत येऊन चित्कारली. मॅक्सवेल यांना आलेल्या तारेची नकल तिच्या हातात होती. डेव्हिडने विस्फारलेल्या डोळ्याने त्यातला मजकूर वाचला. कीदरलेनच्या बचावात्मक धोरणाचा डेव्हिडला तिटकारा होता. त्यामुळे ही बातमी पाहून त्याची खात्री पटली कि आता लवकरच जर्मनी रणशिंग फुंकेल आणि संपूर्ण युरोपाला आपल्या पंखाखाली घेईल.
"एल्सा, आता काही फरक नाही पडत कि हे भारतीय आपली योजना अगदी जशीच्या तशी पार पाडतात कि नाही. इथून मागे फिरणे खूप अवघड आहे. मला फणींद्रला भेटलेच पाहिजे. इथून पुढे जर आपण अंतिम लक्ष्य साध्य केले तर आपण जर्मन हीरोज असू एल्सा!"
"मला कल्पना आहे डेव्हिड! मी तुम्हा दोघांच्या भेटीची व्यवस्था कशी करता येईल ते बघते."
डेव्हिडने पॅपीचे डोके कुरवाळले. तो आता पूर्णपणे दुरुस्त झाला होता. या सगळ्या घटनाक्रमाने जोसेफ व मॅक्सवेल यांच्या डोकेदुखीमध्ये वाढ होत होती.
भरीस भर म्हणून ५ जुलैला 'पँथर'ची जागा 'बर्लिन' या अधिक मोठ्या गनबोटीने घेतली. जर काही केले गेले नाही तर युद्ध अटळ होते.

~*~*~*~*~

छोटा रुद्र आपल्या आईसमोर उभा होता. तिच्या चेहर्‍यावर भयमिश्रित चिंता झळकत होती. रुद्रने खांद्यावरून एक शेला व खाली धोतर एवढेच परिधान केले होते. त्याचे केस अजूनही पाण्याने ओले होते. त्याला अजूनही समजत नव्हते कि आपण इतर मुलांसोबत पोहायला गेलो तर काय बिघडले? पाण्यात खेळायला, सूर मारायला जी मजा येते ती आईला कशी समजत नाही? मित्रांबरोबर खेळण्याबरोबरच उन्हापासून बचावही होतो. बाबांनीही काही दिवसांपूर्वी मोठ्या आनंदाने परवानगी दिली आहे. मग बिनसले कुठे?
"रुद्र मला वाद घालायला वेळ नाही. एकदा नाही म्हटले कि नाही."
"पण का? सगळेजण तर ओळखीचे आहेत. बरोबर रक्षक घेऊन जात जाऊ का? माझी त्यालाही काही हरकत नाही."
"रुद्र, तू एक राजकुमार आहेस आणि आता तुझं वय झालेलं आहे कि तू राजकुमारासारखा वागायला शिकावंस. मलिका" तिने टाळी वाजवताच मलिका दाखल झाली.
"जी हुकुम?"
"रुद्रला घेऊन जा. त्याच्या औषधाची वेळ झालीच आहे. रुद्र मलिकाबरोबर जा आणि औषध पी."
"मला नको ते औषध. किती कडू आहे ते आणि मला कुठला आजारही नाही."
"मलिका!" त्या आवाजात एक जरब होती. मलिकाने रुद्रचा हात पकडला आणि त्याला ओढत घेऊन जाऊ लागली.
"सोड मलिका मला, सोड ..."

......
......
......

रुद्रला जाग आली तर मलिका त्याच्या समोरच होती. तिने एक पाऊल जवळच्या दगडावर टेकवले होते तर कोपर त्या पायावर टेकवून हनुवटी पंजावर रेलली होती. खट्याळ हसत ती म्हणाली,
"कुंवर रुद्रसिंह, सोडण्यासाठी मी तुम्हाला धरलं कुठे आहे?"
"विनोद नकोत मलिका. मी आता कुठलाही कुंवर नाही. तू इथे मला उठवायला आली आहेस म्हणजे?"
"हो रात्रीचं नीट लक्षात आलं नाही पण आपण इच्छित स्थळी पोहोचलो आहोत. म्हणजे अगदी पोहोचलो नसलो तरी खूप जवळ आहोत. मग मी म्हटलं कि रात्र व्हायच्या आत तिथे पोचून आपले तंबू ठोकलेले बरे."
"हं. ठीक आहे मी आणि संग्राम थोड्याच वेळात आवरून तयार राहू."
रुद्रने सभोवताली नजर फिरवली. इंदूर शहराची वेस नजरेच्या टप्प्यात होती. इथेही कोणी वाघ किंवा सिंह असेल?
तिकडे ख्रिसला उचकी लागली. सर्कस अजूनतरी त्याच्या नजरेच्या टप्प्यात आली नव्हती.

क्रमशः

टीपः सुरुवातीला ख्रिसचे वडील व हेन्री हे ब्रिटिशांच्या सिक्कीम मोहिमेविषयी चर्चा करत आहेत. १८८८ च्या जानेवारीमध्ये ब्रिटिशांनी सिक्कीमवर चढाई करून तिबेटींना तिथून हुसकावून लावले व चोग्याल राजांना ब्रिटिश सार्वभौमत्व मान्य करण्यास भाग पाडले. तिसरे अँग्लो-बर्मीज युद्ध १८८५ मध्ये झाले. तो एकंदरीत प्रदेश भौगोलिक दृष्ट्या बराचसा सारखा आहे. चार्ल्स यांचा अनुभव लक्षात घेऊन हेन्री त्यांचा सल्ला घ्यायला गेला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन वर्षात तरी सलग भाग वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे... ह्या भागात फार घडामोडी झाल्या नाहीत तरी उत्सुकता वाढते आहे.. आणि येस. एक फ्राऊलीन गोष्टीत आलेली आहे... Happy

क्या बात है,,, हा भाग ही छान. किती उत्सुकता वाढवली आहे. रश्मी ही नविन पात्राची एंट्री आनि रुद्र चा पुर्वेतिहास काय असेल ???

>>नवीन वर्षात तरी सलग भाग वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे... ह्या भागात फार घडामोडी झाल्या नाहीत तरी उत्सुकता वाढते आहे.. आणि येस. एक फ्राऊलीन गोष्टीत आलेली आहे...<< +१००१ Wink

हिम्सकूल, जीव भांड्यात पडला की नाय फ्रेऊलाईन आली पाहून Light 1 घ्या

धन्यवाद Happy

नवीन वर्षात तरी सलग भाग वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे >> प्रयत्न करेन.

एक्स्ट्रॉ फीचर : कही वो निशान ये तो नही???

पायसजी...
पुढील भाग लीहा की हो! _/\_