मायबोलीवर लिहिलेला गृप (Group) शब्द बरोबर आहे का?

Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22

अ‍ॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.

लोकांचं काय मत आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. तेच ना की 'मिटींगीत ठरले' हे व्याकरणदृष्ट्या १००% अचूक आहे म्हणूनच मी त्याचे उदा दिले. पण त्यासाठी "बैठकीत, चर्चेत" ठरले असे शब्द योजायला पाहिजेत. अगदी मोरो केशव वा यास्मिन शेख म्हणाले तरी. कारण ते फक्त व्याकरणात बसते का हे पाहत आहेत असे वाटते. (नसता, त्यांनी लगेच त्याला प्रतिशब्द दिला असता जो उपलब्ध आहे. आणि दिला असेल तर माफी मागतो) ती भाषेची वृद्धी नाही. नाहीतर लोकमान्यानी 'गमनागमन' वा सावरकरांनी 'य' शब्द आणले नसते. तो विचार वा ३५० वर्षांपुर्वी रघुनाथपंत हणुमंत्यांनी जो मराठी कोष लिहायला घेतला त्याची काही गरज न्हवती, कारण फारसी शब्द होते व ते मराठीत तत्कालिन व्याकरणाप्रमाने चालतही होते.

तू म्हणतोस, तसा हा मुद्दा किंचीत वेगळा आहे, पण चर्चा फक्त नामाशी एकरुप न राहता संपूर्ण भाषेवरच चालू झाली आहे. आणि भाषेशी सलंग्न असल्यामुळे मी तो लिहीला.

माझ्या मते तरी विकांत, सेव्हणार, मिटणार हे माबोवरील शब्द आहेत >> नाही. बहुतांश मराठी नेटीझन आता 'विकांत' वापरत आहेत. सर्व संकेतस्थळांवर, आणि हीच मराठीची पुढची व आजची पिढी, म्हणून माझा वैयक्तीक विरोध असला तरी ह्या शब्दासाठी मी 'ओपन' राहील, कारण तो आता रुळत चालला आहे. - हे फक्त उदा. आहे. )

यांना आपले म्हणा >> क्ष मला जाहिरात आठवली. Happy माझ्यावरच्या प्यारात मी विकांताला आपले म्हणायला धजावत आहे, पण मिटींगीत ठरले, व्हिजनीनुसारला नाही. Happy (फ तुला उद्देशून नाहीरे, केवळ उदा म्हणून.)

केदार,
मिटींग हा शब्द वापरण्यास व्याकरणकारांनी सांगितलेले नाही. तो शब्द वापरल्यास त्याची रुपे कशी असतील, हे त्यांनी सांगितले आहे. हेच इतर शब्दांनाही लागू होते.
मराठी शब्द वापरण्याचे स्वागतच आहे. पण इंग्रजी शब्द मराठी भाषेत वापरताना मराठी भाषेचेच नियम लावले गेले पाहिजेत.
बाकी, विकांत तुला धेडगुजरी वातत नाही, हे आश्चर्यच आहे.

नाही. अरे धेडगुजरीच वाटतं बाबा. तू निट वाचले नाहीस मी काय लिहीले ते. (वैयक्तीक विरोध असेल तरी समाजाला जर चालत असेल, तर माझा विरोध काहीही कामाचा नाही. असा वरच्या पोस्टीत सूर आहे की बाबा.)

स्लार्ट्या,

तू मी लिहिलेल्या पोस्टीतले

>>>मात्र जर असा बदल अजूनपावेतो झाला नसेल आणि व्याकरणनियमांत नवीन प्रवाहांप्रमाणे बदल व्हावा, असे वाटत असेल तर त्यासाठी योग्य त्या रीतीने प्रयत्न करून त्याला अधिकृत मान्यता मिळवून, मग तो बदल अमलात आणावा लागतो. तोवर जे नियम/संकेत आहेत ते तसेच्या तसे पाळणे, हे योग्य ठरते.
<<<
हे मत वाचले नाहीस का? जर तुझे व अनेक जणांचे मत भाषेत नवीन प्रवाह येत आहेत, नवीन शब्द सामील होत आहेत व त्यानुसार व्याकरणाचे नियम अद्ययावत झाले पाहिजेत, असे आहे (अर्थात याला कुणाचीही ना नाही आणि नसावी. व्याकरण म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नाही.); तर ते नियम रीतसर प्रयत्न करून, संबंधित लोकांशी चर्चा करून व्याकरणाच्या अधिकृत नियमांमध्ये सामील करून घेणे इष्ट आहे. मग ते सर्वजण विनातक्रार पाळतील. तोपर्यंत जिथे प्रमाणभाषा आवश्यक आहे, तिथे प्रचलित नियम वापरून लिहिण्यात गैर काय? मायबोलीचे (जी मायबोली मराठीतले आद्य आणि सर्वांत मोठे संकेतस्थळ आहे) विभाग किंवा वेगवेगळ्या रकान्यांची नावे ही प्रमाणभाषेत असावीत, हा मुद्दा चुकीचा आहे का? लक्षात घे की, इतर बाफांवर कुणीही सगळ्यांच्या पोस्टींतले व्याकरण सुधारताना दिसत नाही. जिथे प्रमाणभाषा गरजेची आहे असे वाटते, तिथेच हा आग्रह धरला जात आहे.

श्रद्धा, माफी Happy हे वाचले होते, पण चिन्मय आणि क्ष शी बोलण्याच्या नादात त्यावर लिहायचे विसरून गेलो.
क्षनेसुद्धा हाच प्रश्न विचारला आणि मी त्याला वर उत्तर दिले आहे.
भाषेसारखी गोष्ट बदलण्यासाठी अधिकृत मान्यता मिळवण्याची अपेक्षा फोलच ठरेल. ती कोण्या एकाची, एका समूहाची, एका वर्गाची मालमत्ता नव्हे. जनमताचा रेटा निर्माण झाला की भाषा बदलणार. शिवाय असे बघ, जर अधिकृत मार्गांनी केलेल्या/झालेल्या बदलांना जनतेनेच स्वीकारले नाही तर ? जनाधार हेच अंतिम सत्य Happy एखाद्या समूहाला बदल करायचे झाले की तो ते बदल अंमलात आणायला सुरूवात करणार... त्यांनी का जावे कोणाकडेही मान्यता मिळवायला ? त्यांनी त्या मान्यतेची वाट तरी का पहावी ? ती भाषा त्या समूहाचीसुद्धा आहेच.
>>> तर ते नियम रीतसर प्रयत्न करून, संबंधित लोकांशी चर्चा करून व्याकरणाच्या अधिकृत नियमांमध्ये सामील करून घेणे इष्ट आहे. मग ते सर्वजण विनातक्रार पाळतील. >>>
हो, तू दिलेला मार्ग आधी ठरवून करण्यात आलेल्या बदलासाठी योग्य आहे. उदा. अनुच्चारित अनुस्वार काढून टाकण्याचा बदल बहुधा तसा घडवण्यात आला (चूभूदेघे). इथे जो बदल घडला आहे, तो अभावितपणे झाला आहे. आता अशा बदलांना होत्याचे नव्हते करणे, त्यांना परत या योग्य/इष्ट मार्गाकडे वळवणे शक्य आहे का ? (भाषिक बदलाचा स्वभाव). असे झालेले बदल भाषेला स्वीकारावे लागतील ही शक्यता जास्त. शिवाय इष्ट कोणासाठी ? भाषेसाठी की लोकांसाठी ? लोकांसाठी म्हणशील तर लोकांनी तो बदल आधीच व्यवहारात आणला आहे, त्या बदलासकट 'संवाद' यशस्वी होत आहेच. मग भाषेसाठी इष्ट ? परत, प्राधान्य कोणाला ? आणि का ? Happy
.
>>> मग तो बदल अमलात आणावा लागतो. तोवर जे नियम/संकेत आहेत ते तसेच्या तसे पाळणे, हे योग्य ठरते. >>>
बदल समाजात अंमलात आणावा लागेल का ? मला शंका आहे. बदल समाजात होईल, तो भाषेला स्वीकारावा लागेल. म्हणजे बदल उलट भाषेलाच अमलात आणावा लागेल. (अमलात की अंमलात ?) क्षचा प्रश्न याच स्वरूपाचा होता, ज्याला मी उत्तर दिले आहे.
.
एक समांतर उदाहरण म्हणून .... अमेरिकनांनी इंग्रजीमध्ये असंख्य बदल केले - कलरमधला यु काढला, utilize, realize, असे बदल केले, झेडच्या ऐवजी झी म्हणायला लागले, इ. इ. हे बदल त्यांनी कसे केले ? ते इंग्रजांकडून किंवा दुसर्‍या कुठल्याही संस्थेकडून अथवा घटकाकडून मान्यता मिळवायला गेले होते का ? हे बदल आता अधिकृत भाषेचा भाग आहेत. तर हे मला खरेच जाणून घेण्यात रस आहे. कृ.जा.प्र.पा.
.
दुसरा मुद्दा शीर्षकांच्या शुद्धलेखनाचा. मीतरी सगळीकडेच शुद्धलेखनाचा आग्रह धरेन (उपरोल्लेखित काही शब्द अपवाद, जे अपवाद असण्याचे कारणही मी दिले आहे :)) शीर्षकाला वेगळा न्याय लावावा असे मला वाटत नाही.

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    >>अनुच्चारित अनुस्वार काढून टाकण्याचा बदल बहुधा तसा घडवण्यात आला
    नाही. अनुच्चारित अनुस्वार छपाईला खिळे कमी लागावेत म्हणून काढून टाकला गेला असं मी वाचलेलं आठवतंय.

    >>एक समांतर उदाहरण म्हणून .... अमेरिकनांनी इंग्रजीमध्ये असंख्य बदल केले
    हे उदाहरण खरंच समांतर आहे का?

    अरे कारण काहीही असो, तो 'ठरवून केलेला बदल' होता... त्या उद्देशाने म्हटले.
    समांतर म्हणजे 'भाषेत एका समूहाने बदल केला, तेव्हा त्यांनी तसे करण्याची पूर्वमान्यता मिळवली होती का ?' याअर्थी.

      ***
      दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
      पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

      आयला, केवढी ती क्लिष्ट चर्चा! बापरे!
      पण तरीही, काही मेचक्या मुद्यान्च्या अनुषन्गाने.....
      कानाला बरे वाटते, वा बहुजन समाज वा नविन पिढी जे बोलते, बहुसन्ख्येने बोलते, म्हणून भाषाशास्त्रिय व्याकरणान्च्या नियमात बदल करा वा ते ते असलेले नियमच चूक ठरवा अशासारखे निष्कर्ष निघणारे विचार बघुन मला अगदी "कम्युनिस्ट" क्रान्तीची आठवण झाली! Proud
      मुम्बईत वा एक्स्प्रेस वे वर, बेल्ट बान्धून गाडी चालवली पाहिजे हा झाला नियम.
      उद्या मी म्हणले किन्वा एखाद्या "सुन्दरीने" म्हणले की शी बाई, छातीवरून आडवा जाणारा हा बेल्ट अगदीच घाणेरडा दिसतो, घाणेरडा वाटतो म्हणून मी तो वापरणार नाही, मला जश्शी मोकळी ढाकळी बसून गाडी चालवायची तस्सेच करेन, तर ते चालेल का?
      जर कुणाचे उत्तर चालेल असेल, तर त्याने पाय पुढे करावेत, मी दन्डवत घालतो!
      पण जर चालणार नसेल, कारण तो नियम आहे, त्या नियमात राहूनच गाडी जशी चालवली पाहिजे तशीच कोणतीही भाषा, खास करुन स्वभाषा, त्याहुन पुढे जाऊन मातृभाषा तर तशीच व्याकरणाच्या नियमात चालवली पाहिजे! याबद्दल खरे तर दूमत नसावे!
      पण एकन्दरीतच, समाजातील अन्य प्रान्तातील झून्डशाही व हमकरेसोकायदा ही वृत्ती बघता, भाषेचे व्याकरणाचे नियम, यावरही आभाळ कोसळल्यास नवल नाही!
      साहित्य निर्मिती करताना बोलीभाषा वापरणे वेगळे, अन भाषा म्हणून शुद्ध लिहिण्याचे असल्यास त्यावेळची भाषा वापरणे वेगळे!
      तुम्हा आम्हाला पाण्यास पाणीच म्हणावे लागेल, म्हणायला आवडेल, पण तेच एखाद्या सायन्टिस्टाला त्याच्या लेखात, त्याच्या भाषेत एचटूफोर या सज्ञेनेच पाण्याचा उल्लेख करावा लागेल, कारण सायन्सच्या दृष्टीने तो त्यान्चा नियम आहे, व असे नियम त्या त्या क्षेत्रात जसे की केमिस्ट्री/फिजिक्स शरिरविज्ञान/औषधीनिर्माणशास्त्र यात कसोशीने पाळले जातात! न पाळले गेल्यास अनर्थ ओढवेल! भाषेच्या व्याकरणाच्या नियमान्चे देखिल असेच आहे, फक्त बोलीभाषेत काहीही धेडगुजरी घुसडले तरी तत्काळ आभाळ कोसळणार नसल्याने, अभ्यास करण्याची प्रवृत्ती नसल्याने, योग्य त्याचा आग्रह धरण्याची वृत्तीच नसल्याने, आमचे तेच बरोबर हा गन्ड असल्याने, या हिन्दुस्थानात, खास करुन सुधारित महाराष्ट्रात, गेल्या शे दिडशे वर्शान्च्या काळात, व्याकरणदृष्ट्या, लिखित व मौखिक्-वाचिक भाषेची वाट लागल्याचे दिसते, येवढेच नव्हे तर सन्स्कृत भाषेचा र्‍हास देखिल सोप्प ते चान्गल या वृत्तीने अधिक झाला जितका तो इन्ग्रजी आक्रमणामुळे नाही झाला!
      अन सरकारी पातळीवर, सत्ताधारी पक्षान्कडून, मतान्च्या लालसेपोटी केवळ, अल्पसन्ख्य अभिजनान्ची पर्वा न करता, बहुजन जे जे म्हणेल ते ते मान्य करण्याच्या वृत्तीपाई अजुन कसले कसले धिन्डवडे बघायला मिळणार देव जाणे!
      थोडे विषयान्तरः माझी प्रवासगाथा ओहयो की कायसासा एक लेख हे मायबोलीवर नुकताच प्रसिद्ध झालेला, त्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधून घेतले. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस, अमेरिकेत, जर्मन नावे वा तत्सम/तत्सदृष नावे दिसल्यास ती बदलण्यात आली! अमेरिकेत हे गेल्या शतकात घडले, त्या आधी ब्रिटीश परम्परा ठोकरुन लावण्यासाठी तर त्यान्नी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी प्रयत्न केले! पण तेच, आमच्या इथे काय? बॉम्बेचे मुम्बै करायला स्वातन्त्र्यानन्तरची तब्बल चाळीस वर्षे वाट बघावी लागली! बाबराच्या आक्रमाणाची एक खूण अयोध्येत शिल्लक होती, ती उतरविण्यास अशीच वाट बघावी लागली! अन ते झाल्या मुळे, म्हणे तो एक वारसा होता, व तो अमक्या तमक्यान्नी उद्ध्वस्त केला तर त्यान्ना मते देऊ नका, हा राजरोस प्रचार! जे त्याबद्दल, तेच भाषेबद्दलही!
      तुम्ही उगाच वाद घालता आहात, तुम्ही ज्या व्याकरणाबद्दल वाद घालता आहात, त्या तुमच्या भाषा-व्याकरणाला, भाषेवरचे "बामणी" कुम्पण असे तर कितिकान्नी कित्येकदा सम्बोधले आहे! पन्चवीस एक वर्शान्पूर्वी तर शालेय अभ्यासक्रमातून र्‍हस्व दीर्घचे नियम बासनात गुन्डाळण्याची टूम निघाली होती, त्याचे नेमके काय झाले माहीत नाही!
      तर सान्गायचा मुद्दा काय, की केवळ "बहुजन" करतात तेच योग्य हा निकष लावायचा असेल, तर बोलणेच खुन्टले! पण जर "नियम" हवेच असतील, तर शेकडो वर्षे अस्तित्वात असलेले नियम आधी पाळायला शिकले/शिकवले पाहिजे यात शन्का नाही!
      त्यात पळवाटा नाहीत!
      भारतात, रस्त्यात डावीकडून गाडी चालविणे हा नियम, सिग्नल न तोडणे हा देखिल नियम, पण मला आवडत नाही, चान्गले वाटत नाही, चान्गले दिसत नाही, सगळेच तर नियम तोडतात वा अन्य कसल्याही कारणाने मी जर तो नियम तोडला तर एकना एक दिवस कपाळमोक्ष ठरलेला!

      लिंबू , अजिबात पटली नाही तुमची पोस्ट.
      बदलत्या काळाप्रमाणे कितीतरी चालीरीती बदलतात, भाषेमधे तसा बदल होणे अपरिहार्य आहे. नियम असू दे, नसू दे, बदलू दे, न बदलू दे, भाषा बदलत रहाते- बोली भाषा लवकर, अन जास्त बदलेल, लेखी स्वरुपात बदल हळू हळू होतील पण बदल होतील हे नक्की.

      भाषेच्या नियमाबद्दलच्या चर्चेत जातीयवाद अन राजकारण आणायचं काय प्रयोजन तेही कळलं नाही.

      गेल्या शंभर दीडशे वर्षात "बामणी" प्रथा काहीच बदलल्या नाहीत का ? ज्या प्रथा आजकाल कोणी पाळत नाहीत त्यात अनिष्ट प्रथा काहीच नव्हत्या का ?

      जियो स्लार्टी! उत्तम, मुद्देसूद, समजूतदार व आश्वासक विचार अन् मांडणी!

      भाषेचे नियम हे वाहतुकीच्या नियमांसारखे नसतात हे तर मी माझ्या पहिल्याच किंवा दुसर्‍याच पोस्टमधे म्हटले होते. Happy असो प्रत्येकाचे मत असतेच.

      तसेच आणखी एक मत पहा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्या "भाषाविवेक" या पुस्तकातील हे उतारे वाचा. हे अर्थात आंतरजालावर सापडले व जे परिच्छेद मला पटले व इथल्या चर्चेला धरून आहेत असे वाटले, तेच इथे देत आहे. पुस्तक वाचून आणखी काही रोचक सापडले तर लिहिनच. हेही एक मत आहे अश्या दृष्टीने वाचावे म्हणजे फार त्रास होणार नाही. मला स्वतःला परकीय शब्दांसाठी मराठी शब्दयोजना करणे चुकीचे वाटत नाही पण जसाच्या तसा परकीय शब्द उचलताना त्याची लक्तरे करणे पटत नाही. (क्ष, scholastic शब्द बघ. तसे Guru चे इंग्रजी करत नाही.) असो, उतारे पुढीलप्रमाणे -

      मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ १९व्या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्‍याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समजणार्‍या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.

      पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!

      अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती. भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.

      डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्‍या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.

      भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्‍या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात."

      चाफ्या,
      संदर्भ कळला नाही.
      इथे भाषेचे आततायी शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न न करता, तिचे आहेत ते व्याकरणाचे नियम पाळा असा आग्रह आहे. राजाध्यक्षांच्या उतार्‍यातला संदर्भ हा संस्कृतप्रचुर शब्द वापरण्याची टूम निघाल्याच्या संदर्भात होता. त्याचा इथे बादरायणी संबंध वाटतोय.

      वेगळा संदर्भ आहेच पण भाषा कशी लवचिक असावी (नव्हे ती असतेच) याचे महत्त्व हे मत अधोरेखित करते त्या दृष्टीने इथल्या चर्चेला धरून व रोचक वाटला म्हणून इथे दिला. जी भाषा काळाचे बदलते प्रवाह मान्य करत नाही ती मागेच अडकून पडते. प्रवाहाप्रमाणे जी बदलते ती मात्र बहरत जाते. सोपे उदाहरण द्यायचे तर पूर्वीच्या काळचे आणित, पाठविली/पाठविले, दाखविली/दाखविले असे शब्द आता आपण सर्रास आणत, पाठवले, दाखवले असे चालवतो. व्याकरणात असा नियम होता/आहे नव्हता/नाही हे मला ठाऊक नाही. पण जनमानसाने हा बदल घडवला हे नक्की. हे व असेच बदल होतच राहणार. ती भाषेची शक्ती आहे, मर्यादा नाही.

      हो, पण इथे मर्यादा फक्त व्याकरणाची पाळा असं म्हणतोय ना आम्ही? इंग्लिश शब्द घेऊच नका असा आग्रह असता तर तुझ्या प्रतिक्रियेचा योग्य संदर्भ लागला असता.
      इंग्लिशीतले शब्द मराठीत व्याकरणाप्रमाणे चालवले तर भाषेचा लवचिकपणा कुठे बिघडतोय? वाकव की हवी तशी Happy

      पुनश्च हरीओम्! इंग्रजी शब्द घेऊन ते मराठी व्याकरणाप्रमाणे चालवणे हा प्रघात अस्तित्वात नाही. त्यामुळे समाजाप्रमाणे / प्रवाहाप्रमाणे लवचिकता हे महत्त्वाचे आहे, मूठभर व्याकरणतज्ञांच्या हवाल्यानुसार लवचिकता यापेक्षा. काळानुरुप समाजाने ते शब्द तसेच्या तसे वापरणे पसंत केले आहे. यालाही अगदीच मराठीमय झालेल्या शब्दांचे तुरळक अपवाद असले व मान्य करायला जड जात असले तरी सत्य तेच आहे. Happy

      बरं, करु परत सुरूवात.

      १. टेबलावर रुमाल ठेवतो
      २. कँपातल्या दुकानात जातो
      ३. कार्डावर खरेदी करतो
      ४. पेनात रिफील टाकतो
      ५. पंपावर पेट्रोल भरतो
      ६. मी तिकीटांच्या (मूळ शब्द Ticket) लायनीत उभा राहतो.
      ७. स्टेशनांत बस आलीये की नाही ते बघ
      ८. सायकलीला कुलूप लाव
      ९. पेपरातली बातमी वाचलीस का?
      १०. फडकं मागच्या सिटाखाली आहे.
      ११. मोठा हॉल आहे, तीन चार तरी टयूबा लागतील
      १२. वर्ष संपत आलं, डायर्‍या आणायच्या आहेत.
      १३. कुठल्या कॉलेजात जातोस?

      हे कुठले प्रयोग आहेत? हे अस्तित्वात नाहीत असे म्हणायचे आहे का तुला?

      >>समाजाप्रमाणे / प्रवाहाप्रमाणे लवचिकता हे महत्त्वाचे आहे, मूठभर व्याकरणतज्ञांच्या हवाल्यानुसार
      मग हे वरचे वाक्यप्रयोग करणारे आपल्या समाजाबाहेरचे आहेत का?

      इथले बहुसंख्य लोक कुठे राहतात? अमेरिकात.
      मी सध्या कुठे आहे? ऑफिसत.
      स्टेशनला, स्टेशनवर.
      पॅरिस कुठे आहे? युरोपत.
      मी पेनने लिहितो.

      असं सगळं लिहिलं तर चालेल का?

      नियम नाहीत असं इथल्या अनेकांचं म्हणणं होतं. मी नियम दाखवले आहेत. याआधीही चुकीची उदाहरणे, संज्ञा वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे (दूरचा, पूर्णत्व, तत्सम शब्द इ.). ज्यांना मुठभर व्याकरणतज्ज्ञ म्हटलं गेलं आहे, त्या दादोबा तर्खडकर, मोरो केशव दामले, अर्जुनवाडकर, गोविलकर, मंगरुळकर, ढेरे, सामंत, केळकर, यास्मीन शेख, वि. भा. देशपांडे, नीलिमा गुंडी, माधवी वैद्य या सार्‍यांचा भाषेचा अभ्यास, व्यासंग इथल्या सर्वांपेक्षाच अधिक आहे. भाषेचे काही नियम आखले आहेत. त्याप्रमाणे ती वापरली जावी, असा संकेत असतो.
      मात्र आपल्या अशुद्ध भाषेचे समर्थन करताना, कृपया या लोकांच्या अभ्यासाचा अवमान होणार नाही, याचे भान ठेवा. 'अमेरिकन मराठी' वापरायची असेल तर खुशाल वापरा, पण आपल्या औद्धत्याने भाषेच्या नियमांची पायमल्ली करू नका.

      ('अमेरिकन मराठी'चा संदर्भ : 'अमेरिकन इंग्रजी'त जशी नियमांना न जुमानता मोडतोड केली जाते/गेली, तशीच मराठी भाषेतही होते आहे. अमेरिकेत राहणार्‍या लोकांचा इथे संबंध नाही)

      मा. प्रशासक,
      इथे वापरलेला 'ग्रूपामध्ये' हा शब्द व्याकरणदृष्ट्या चूक आहे, हे मी नियमांच्या आधारे सिद्ध केले आहे. तो शब्द 'ग्रुपामध्ये' असाच हवा. मराठीतील तमाम भाषातज्ज्ञांनीही याचा निर्वाळा दिला आहे. कृपया योग्य तो निर्णय घ्यावा. मूठभर लोक 'कपमधे', 'टेबलवर' असं अशुद्ध मराठी बोलतात, म्हणून मायबोलीवर तसंच मराठी वापरलं जावं, हे योग्य नाही.

      वरील पोस्ट लिहिल्यानंतर मला डॉ. अरुणा ढेरे यांचा फोन आला. डॉ. अरुण टिकेकर त्यांच्या घरी होते, आणि त्यांनी इथल्या चर्चेबद्दल त्यांना सांगितले. डॉ. टिकेकर यांनीही लिहिताना प्रमाणभाषाच वापरली जावी, हे सांगितले आहे.
      त्यांच्या मते, 'भाषेचे हे नियम अभ्यासकांनी अभ्यास करून, निरिक्षण करून तयार केले आहेत. ते वाकवण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण नियम पाळत नाही, कारण आपल्याला कोणतेही नियम पाळण्याचे शिक्षण मिळत नाही. सर्वच नियम आपण तोडतो.'
      'व्याकरणाचे, लिहिण्याचे अनेक नियम गेल्या शंभर वर्षांत बदलले. हा नियम बदलण्याची अभ्यासकांना गरज भासली नाही, यातच सारे काही आले.'

      डॉ. अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांतही हा नियम पाळला गेलेला नाही. हे त्यांच्या लक्षात आणून देण्याचं धैर्य, आणि थोडं औद्धत्यही माझ्यात नव्हतं. पण 'हा नियम पुस्तकांत पाळला गेलेला नाही', असं मी म्हणताच, 'माझ्याही पुस्तकांत तो पाळलेला नसावा. पुढच्या आवृत्त्यांमध्ये काळजी घेते,' असं त्या म्हणाल्या.

      गरजवंतांनी खात्री करून घ्यावी.

      ओके क्ष, केदारचा संवाद विसरलेला दिसतोस. असो. मग हे खालील प्रयोग अगदी रोजच्या सामान्य मराठी माणसाच्या वाक्यप्रयोगात अस्तित्वात आहेत असे म्हणायचे आहे का तुला?

      १. मी तुझ्या या कन्सेप्टीचा कडाडून विरोध करतो.
      २. माझी मुलगी डान्साच्या क्लासाला जाते.
      ३. रॉजरने कालच्या टेनिसाच्या खेळात टायब्रेकरात बाजी मारली.
      ४. कालपासून आमच्या फ्रीजाच्या टेंपरेचरात आम्ही बदल केला आहे.
      ५. भारतीय टीमाने सर्व इव्हेंटांमध्ये भाग घेऊन मिळवलेल्या गोल्स मेडलांमुळे अभिमान वाटला.
      ६. जपानाच्या ट्रिपीत स्मोकाच्या इनहेलेशनामुळे त्रास झाला.
      ७. खराब हवामानामुळे पॅराशूटाच्या जम्पीची भिती वाटली.
      ८. त्या मिसहॅपीमुळे लँडींगाचे तंत्र चुकले व फ्लाईटीतील होस्टेशीचा तोल गेला.
      ९. घरातील क्लटराला आवरता आवरता हाऊसमेडीचे कार्पेटावरच्या सोन्याच्या रिंगीकडे लक्ष गेले.
      १०. अवेअरनेसामुळे स्ल्मांतल्या मुलांना आता ब्राईट फ्यूचराचे दिवस येवोत.

      (असे आणखी कितीतरी लिहिता येईल रे! कंटाळा आला.)

      चिन्मय, मत पटले नाही असे म्हटले की अवमान होत असेल तर मग ही चर्चा तरी कशाला करायची? इथे कोणाचाच वैयक्तिक अवमान कोणी करत नाहिये. प्रत्येकाच्या जाणिवा, अभ्यास, तर्क, आचार, मूल्ये, वगैरे वगैरे हे सगळे श्रेष्ठच असते. (तज्ञांचेही व बहिणाबाईंसारख्या अशिक्षित सामान्यजनांचेही). तूच दिलेल्या डॉ. कलाम यांच्या उदाहरणाप्रमाणे इथे सगळे एकाच लेव्हलवर (माफ करा, पण लेव्हलीवर नाही) येऊन चर्चा करत आहोत ना? तज्ञांचा (किंवा कोणाचाच) अनादर इथे नाही. पण हेच म्हणणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, हाच नियम म्हणजे ब्रह्मवाक्य हे जरा अनुचित वाटते. संपूर्ण समाज आज एका वेगळ्या दिशेने जात असताना ते साफ चुकीचे कसे आहे व त्यांनी असेच लिहिले बोलले पाहिजे असे म्हणणे आततायी वाटते. आणि डॉ. ढेरेंच्या निर्णयाचे स्वागत आहे. आणि तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. किंबहुना ही चर्चा वाचणार्‍या प्रत्येकाला यातले एक मत पटले असण्याची शक्यता आहे. तेव्हा ज्याला जे पटेल ते त्याने जरूर आचरणात आणावे. मी तर आधीच म्हटले आहे, की येणारा काळ ठरवेलच काय टिकते ते. Happy

      >>> मात्र आपल्या अशुद्ध भाषेचे समर्थन करताना, कृपया या लोकांच्या अभ्यासाचा अवमान होणार नाही, याचे भान ठेवा. 'अमेरिकन मराठी' वापरायची असेल तर खुशाल वापरा, पण आपल्या औद्धत्याने भाषेच्या नियमांची पायमल्ली करू नका.

      १. केवळ मतभेद व्यक्त केल्याने कोणाचा अवमान होत असेल तर होवो बापडा.

      २. जे नियम नाहीत, केवळ संकेत आहेत असं (वारंवार) अधोरेखित करून झालेलं आहे, त्यात कशाचीही कसलीही पायमल्ली होण्याचा (आणि कोणाचाही कसलाही अवमान होण्याचा) प्रश्नच उद्भवत नाही. 'जो जे वांछिल तो ते लिहो' हे निदान परकीय शब्दांच्या बाबतीत नक्कीच लागू पडतंय असं मला वाटतं.

      संपादन :
      चाफ्या, आपल्या पोस्टी क्रॉस झाल्या (की आपले पोस्ट्स क्रॉस झाले). पण मुद्दा अधोरेखित होतोय, म्हणून माझी / माझे पोस्ट बदलत नाही.

      चाफ्या,
      'जपानाचा/ची/चे' हा प्रयोग चूक आहे. वर नियम मी दिला आहे.
      तुझ्या उदाहरणांतील वाक्यांत तू असंख्य इंग्रजी शब्द विनाकार्ण वापरले आहेस. ते तसे आहेत, म्हणून तुला ते विचित्र वाटत असेल.
      <त्या मिसहॅपीमुळे लँडींगाचे तंत्र चुकले व फ्लाईटीतील होस्टेशीचा तोल गेला.<>

      त्या अपघातामुळे लँडीगचे तंत्र चुकले व विमानातील हवाईसुंदरीचा तोल गेला, असं वाक्य वापरायला अजिबात हरकत नाही. आणि तसे वापरायचे नसेल, तरी तू लिहिलं आहेस ते चूक आहे.
      षष्ठी विभक्तीचा अतिशय चुकीचा वापर तू इथे व काही ठिकाणी केला आहेस.
      उदा. टेनिसाच्या खेळात . इथे टेनिसच्या खेळात असे हवे.
      घरचे अन्न - घराचा दरवाजा, पदरचे पैसे - पदराचा काठ, हातचा मळ - हाताचे हाड हे फरक लक्षात घे. सरसकट सगळीकडे समान्यरुपं करायची नसतात.
      बाकी, <<९. घरातील क्लटराला आवरता आवरता हाऊसमेडीचे कार्पेटावरच्या सोन्याच्या रिंगीकडे लक्ष गेले.
      १०. अवेअरनेसामुळे स्ल्मांतल्या मुलांना आता ब्राईट फ्यूचराचे दिवस येवोत.<>>
      ही वाक्ये धेडगुजरी मराठीची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांना मराठी तरी का म्हणायचे?

      आणि,
      'मग त्यांना जाऊन सांग की हे नियम मला मान्य नाहीत', हा माझ्या लेखी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अपमानच आहे. असो.

      स्वाती,
      नियम आहेत, ते मी दिले आहेत. पुस्तकांची नावेही दिली आहेत.

      हो रे मुद्दामच वापरले आहेत भरमसाठ इंग्रजी शब्द. आपण तसे वापरत नाही हे खरे. पण या चर्चेत आक्षेप इंग्रजी शब्दांना नाही ना? त्यांच्या वापराकडेच लक्ष वेधतोय मी. आणि चुका सुधारल्याबद्द्ल धन्यवाद. पण हे शब्द अश्या रुपात कोणी वापरत नाहीत हे मला "क्ष"ला सांगायचे होते.

      'मग त्यांना जाऊन सांग की हे नियम मला मान्य नाहीत', हा माझ्या लेखी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अपमानच आहे. >>> बापरे! चिन्मय! कृपया मतभेद आणि अपमान या दोन गोष्टी वेगळ्या ठेव रे!

      स्वाती, Happy

      'अश्या' नव्हे 'अशा'.
      आणि हे असे इंग्रजी शब्द वापरून गोंधळात भर पडते आहे, असं तुला वाटत नाही का?
      जे काही शब्द आपण वापरतो, ते मराठीच्या नियमांप्रमाणे चालावेत, अशी अपेक्षा आहे. इंग्रजीत अनेक बाहेरून आलेले शब्द आहेत. ते इंग्रजी व्याकरणाच्या नियमांप्रमाणेअच चालतात. 'He met his gurunna,' असं विचित्र काही लिहिलं जात नाही. जपानी, फ्रेंच या भाषांतही बाहेरून आलेल्या शब्दांना त्या त्या भाषांचेच नियम लागतात. उच्चार बदलतात, लिपी बदलते. मराठीतही तसेच केले जावे, ही अपेक्षा भाषातज्ज्ञांची आहे. आणि त्या नियमाचं पालन केलं जावं.

      आणि, परत एकदा सांगतो, तसा नियम आहे. आणि नियम पाळावेत, असा संकेत आहे.

      चिनूक्स, तू दिलेल्या नियमांचा (तू ठळक अक्षरांत नमूद केलेला) गोषवारा परभाषेतून मराठीत आलेल्या सर्व शब्दांची मराठी शब्दांप्रमाणे सामान्यरुपे करावीत.
      असे सामान्यरूप शब्दाचे लिंग समजल्याशिवाय करता येत नाही.
      उदा 'इंग्लंडास' का? 'इंग्लंडीस' का नाही? ('इंग्लंड' या देशास - अशा अर्थी ते असेल तर 'श्रीलंकेस' का म्हणायचं?) 'ट्रेनीत' का? 'ट्रेनात' का नाही?
      जोवर त्याचे नियम ठरत नाहीत तोवर 'सामान्यरूप मराठी शब्दांप्रमाणेच करा' या मोघम 'नियमाला' काही अर्थ उरत नाही.

      असो. मला आता त्याच त्याच मुद्द्यांची पुनरावृत्ती करायचा कंटाळा आला आहे.

      स्वाती,

      लिंगनिश्चितीबाबत गोंधळ आहे, आणि तो सर्व व्याकरणकारांनी मान्य केला आहे. अशा शब्दांचा वापर करताना लिंग बदललं तरी चालेल, पण सामान्यरुपं त्या त्या लिंगाप्रमाणे व्हायला हवीत.

      'श्रीलंकेस' का म्हणायचं हे मी अगोदरच सांगितलं आहे. 'श्रीलंका' हा आकारान्त शब्द आहे. या शब्दांची सर्व सामान्यरुपं होतात. अपवाद नाहीत. कृपया परत नियम वाचतेस का? Happy

      त्याबद्दलही मला शंका(च) आहे.
      'रोहा' (विटा / अष्टा - अशी आणखीही उदाहरणं देता येतील) नामक गावाला जाऊन आलो - हे सांगताना आपण 'रोह्यास जाऊन आलो' म्हणू.
      मग 'लंक्यास' जाऊन आलो - का नाही?
      याचा अर्थ एकतर आपण ते मराठीप्रमाणे चालवत नाही आहोत, किंवा मराठीतच ते कसं चालवलं जावं याला एकमेव नियम नाही किंवा कोणत्यातरी संकेतानुसार मराठीत लंका स्रीलिंगी आहे तर अष्टा नाही.

      आणि हे असे इंग्रजी शब्द वापरून गोंधळात भर पडते आहे, असं तुला वाटत नाही का?
      >>>> बरं मग यातला प्रत्येक शब्द वेगवेगळ्या मराठी वाक्यात टाक. माझ्या म्हणण्याला त्याने काहीही धोका पोचत नाही! Happy

      इंग्रजीत अनेक बाहेरून आलेले शब्द आहेत. ते इंग्रजी व्याकरणाच्या नियमांप्रमाणेअच चालतात.
      >>>> हेही चूक. मागेच दाखवले आहे की इंग्रजी लॅटिन व ग्रीक भाषांचे नियमही पाळते. ते पोस्ट वाच.

      पण खरंय, आता खरंच कंटाळा आला. किती वेळा तेच ते आणि तेच ते? (असे म्हणूनही मी इथे आलोच! पण ते स्लार्टीचे कौतुक करण्यासाठी व राजाध्यक्षांचा उतारा देण्यासाठी! Happy )

      <'रोहा' नामक गावाला जाऊन आलो - हे सांगताना आपण 'रोह्यास जाऊन आलो' म्हणू.
      मग 'लंक्यास' जाऊन आलो - का नाही?<>

      रोहा हा पुल्लिंगी शब्द आहे. अकोल्याला गेलो, आग्र्याला गेलो, रोह्याला गेलो.
      श्रीलंका हा स्त्रीलिंगी शब्द आहे. श्रीलंकेस गेलो. अमेरिकेस गेलो, श्रीलंकेतील अतिरेकी, अमेरिकेची चॉकलेटं.

      अधिक शंका असल्यास मी व्याकरणाच्या पुस्तकांची यादी दिली आहेच. तिथे हे सर्व नियम दिले आहेत. शासकीय व्याकरणाच्या नियमावलीतही हेच नियम आहेत.

      ती श्रीलंका ( रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीचा सागर लहरी इ. वाली लंका )
      ती रोहा म्हणतात का ? ती मुंबई, ती काशी, ते पुणे, ती आळंदी ( देवाची, चोराची इ )
      रोहा अन श्रीलंका एक सारखे कसे चालतील ?

      शोनू, मी तेच विचारलंय. लंका स्त्रीलिंगी आणि रोहा नाही हे कसं ठरलं? हे मराठीतच जर निश्चित नाही, तर परकीय शब्दांना ते नियम लावायचा अट्टाहास का करायचा?

      Pages