लांडगा आणि बकरा

Submitted by मास्तुरे on 24 October, 2007 - 03:21

जेव्हा रीनाने अचानक माझी चौकशी केली, तेव्हा मला थोडंसं नवलच वाटलं.

"तुला फावल्या वेळात काही नवीन व्यवसाय करण्यात इंटरेस्ट आहे का?" रीनाने विचारलं.

रीना माझ्या कंपनीत एचआर मध्ये काम करायची. त्यामुळे तिच्याकडे फावला वेळ भरपूर असायचा.

"फारसा नाही. पण कसला बिझनेस?" मी विचारलं.
"हरकत नाही. तू नाही तर तुझी बायको तरी थोडा वेळ देऊ शकेल?" रीना.
"तिला विचारावं लागेल. पण कसला बिझनेस?" मी पुन्हा विचारलं.
"ते तुला कळेल लवकरच. येत्या शनिवारी संध्याकाळी सात वाजता रिव्हर गार्डन हॉटेलमध्ये बायकोला घेऊन ये. तिथे एक बिझनेस सेमिनार आहे. तिथे तुला नक्की काय ते कळेलच." इति रीना.
"पण नक्की कशा प्रकारचा हा बिझनेस आहे याची थोडीशी कल्पना तर दे." मी जरा संशयाने विचारलं.
"ते तुला कळेलच सेमिनारमध्ये. आम्हाला ते आधी सांगायची परवानगी नाही. शनिवारी संध्याकाळी बरोबर साडेसहा वाजता तयार रहा. आमच्या कंपनीची कार तुम्हाला घ्यायला येईल आणि रात्री परत घरी सोडेल. बिझनेस सेमिनार असल्यामुळे फॉर्मल ड्रेस पाहिजे. फुल शर्ट आणि टाय कंपलसरी आहे." तिने एका दमात सांगून टाकलं.

मी पूर्णपणे गोंधळून गेलो. ही नक्की काय भानगड आहे हे अजिबात लक्षात येत नव्हते. न्यायला आणि सोडायला कार, बिझनेस सेमिनार, फॉर्मल ड्रेस . . . मी पूर्ण भांबावून गेलो.

"आणि हे बघ, सेमिनार संपल्यावर तिथेच डिनर अरेंज केलेलं आहे. पण त्यासाठी दोघांचे मिळून सहाशे रूपये भरावे लागतील. ते आताच माझ्याकडे दे, म्हणजे मी तुमच्या दोघांचं रजिस्ट्रेशन करून टाकते."
"सहाशे रूपये? हा नक्की काय बिझनेस आहे?" मी पुन्हा चिकाटीने विचारलं.
"ते तिथे कळेलच. थोडा धीर धर." रीना ताकास तूर लागून देत नव्हती.

सहाशे रूपये तशी काही फार किरकोळ रक्कम नव्हती. पण हा नक्की काय प्रकार आहे ते काही केल्या लक्षात येत नव्हते. रीना अजिबात ते उघड करायला तयार नव्हती. माझी उत्सुकता क्षणोक्षणी ताणली जात होती. बघू तर चान्स घेऊन, असा विचार करून मी तिला सहाशे रूपये काढून दिले.

-*-*-*-
शनिवारच्या आदल्या दिवशी मला एक फोन आला. फोन करणार्‍याने आपण रीनाचा सुपरव्हायझर असल्याचे सांगितले. आम्ही शनिवारी नक्की येणार आहोत याची तो खात्री करून घेत होता म्हणे. मी त्यालाही या बिझनेस सेमिनार बद्दल विचारले. रीनाप्रमाणे त्यानेही ताकास तूर लागून दिला नाही. फोन संपवताना सहजच आठवल्यासारखे दाखवून तो म्हणाला,

"अजून एक गोष्ट. येताना चेकबुक आणायला विसरू नका."
"चेकबुक? ते कशासाठी?"
"रीना चेकबुकबद्दल सांगायचं विसरली वाटतं. कशासाठी ते तिथे आल्यावर कळेलच."

मला कोड्यात टाकून त्याने फोन बंद केला. चेकबुकच्या उल्लेखाने माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजायला लागली होती. पण त्याचबरोबर या प्रकाराविषयी उत्सुकता खूपच ताणली गेली होती. शेवटी धोका नको म्हणून चेकबुक आणि फारसे पैसे जवळ न ठेवता जाण्याचे ठरवले. नाहीतरी मी सहाशे रूपये रीनाकडे देऊन बसलो होतो. निदान तिथे जाऊन जेवण तरी वसूल करावे असा एक टिपीकल मध्यमवर्गीय विचार माझ्या आणि माझ्या बायकोच्या डोक्यात आला. संध्याकाळी तरी घरी स्वयंपाक करायचे श्रम वाचले या विचाराने बायको मात्र खूश होती.

-*-*-*-
ठरल्याप्रमाणे शनिवारी संध्याकाळी फॉर्मल ड्रेस घालून आम्ही तयार झालो. त्यांच्या कारवर अवलंबून रहायला नको म्हणून आम्ही स्वतःचीच गाडी घेऊन जायचं ठरवलं. बरोबर पावणेसात वाजता रिव्हर गार्डन हॉटेलवर पोहोचलो आणि सेमिनार होते त्या हॉलमध्ये जाऊन स्थानापन्न झालो. हॉलमध्ये विविध वयोगटातले जवळपास ६०-७० स्त्री-पुरुष आधीच आलेले होते.

मी रीनाला शोधायचा प्रयत्न केला. ती एका दुसर्‍याच हॉलमध्ये तिच्या कंपनीच्या इतर प्रतिनिधींबरोबर मिटींगमध्ये आहे असं मला तिथल्या एका बिल्ला लावलेल्या प्रतिनिधीने सांगितलं. मी सर्वत्र नजर फिरवली. सर्व स्त्री-पुरूष लग्नाला आल्यासारखे नटूनथटून आलेले होते.

काही वेळाने रीनाची मिटींग संपली. ती इतर लोकांबरोबर बाहेर येऊन एक खुर्ची पकडून बसली. कोपर्‍यात २-३ स्पीकर ठेवले होते. त्यावर कुठलं तरी इंग्लिश गाणं चालू होतं. समोर मध्यभागी एक मध्यम आकाराचं लाकडी स्टेज होतं. हॉलमधल्या एअरकंडिशनरचं तापमान इतकं कमी ठेवलेलं होतं की मला क्षणभर आपण ऐन हिवाळ्यात हिमालयात उघड्यावर बसलेलो आहोत असं वाटून गेलं.

काही वेळाने स्पीकरवर वाजणारं इंग्लिश गाणं एकदम बंद झालं आणि स्पीकरवरच जाड्याभरड्या आवाजात कुणीतरी आकडे उलटीकडून मोजायला सुरवात केली.

"९ , ८ , ७ , . . . "

शेवटचा आकडा उच्चारून झाल्यावर एकदम सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांनी तालात टाळ्या वाजवायला सुरवात केली. आम्ही दोघेही त्यांच्यात सामील झालो. काय चालले आहे ते काही केल्या कळत नव्हते. डोक्यात एक अस्पष्ट कल्पना यायला लागली होती, परंतु नीटसा अंदाज येत नव्हता.

सर्वजण तालात टाळ्या पिटत असतानाच स्पीकरवर पुन्हा एकदा संगीत सुरू झाले आणि बाजूच्या एका कोपर्‍यातून एक धिप्पाड तरूण पळतपळत स्टेजकडे आला. स्टेजजवळ आल्यावर, स्पर्धेत लांब उडी मारणारे स्पर्धक जशी लांबलचक उडी मारतात, तशी धाडकन उडी मारून तो स्टेजवर चढला आणि इतरांबरोबर टाळ्या पिटत त्याने स्टेजवरच नाच करायला सुरवात केली. सूट घातलेल्या अवस्थेतला त्याचा नाच हे अतिशय विलक्षण दृश्य होते. त्याच्या शरीराचे एकंदरीत आकारमान पाहिल्यावर त्याच्या उडीमुळे लाकडी स्टेजचा भुगा कसा झाला नाही याचेच मला आश्चर्य वाटले.

थोडा वेळ नाचल्यावर तो दमून स्टेजवर एका खुर्चीवर बसला. हॉलमधले इतर सर्वजणही स्थानापन्न झाले. त्या तरूणाने एकदम बोलायला सुरवात केली. त्याने प्रथम स्वतःचे नाव सांगितलं. नावावरून तो पंजाबी वाटत होता.

"मला सांगा, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही पहिल्यांदा मेनूकार्डाची कुठली बाजू बघता?" त्याने उपस्थितांना विचारले.

सर्व प्रेक्षक गोंघळून गेले. कोणालाच उत्तर देता आले नाही.

"मला विचारायचं आहे की तुम्ही मेनूकार्डची डावी बाजू आधी बघता की उजवी बाजू बघता?"

कुणीच उत्तर दिले नाही.

"आम्ही आजूबाजूचं प्रेक्षणीय पब्लिक बघतो." कुणाच्या तरी चावट उत्तरावर हशा पिकला.

स्टेजवरच्या माणसाने समोरचा प्रोजेक्टर ऑन केला. त्याच्यामागच्या पडद्यावर कुठल्यातरी हॉटेलचे मेनूकार्ड दिसायला लागले.

त्याने पडद्यावरच्या मेनूकार्डकडे बोट दाखवले.

"हे बघा एका हॉटेलचे मेनूकार्ड. बहुसंख्य माणसे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर पहिल्यांदा उजव्या बाजूला लिहिलेल्या किंमती बघतात आणि नंतर कमीतकमी किंमतीचे पदार्थ वेटरला आणायला सांगतात." तो स्पष्ट करू लागला.

"आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये वडापावच मागवतो.", अजून कुणाच्यातरी कॉमेंटवर खसखस पिकली.

"बहुसंख्य माणसे आपल्या आवडीचे पदार्थ मागवण्याऐवजी आपल्याला परवडेल अशा किंमतीचेच पदार्थ मागवतात.", पंजाब्याने परत सुरवात केली. "फक्त हॉटेलातच नाही तर मॉलमध्ये, फर्निचरच्या दुकानात, टीव्ही, फ्रीज अशी कुठलीही गोष्ट घेताना बहुतेक जण पहिल्यांदा किंमत विचारतात आणि मग परवडेल अशा किंमतीचाच ब्रॅंड निवडतात."

तो चेहर्‍यावर हास्य आणून आणि खेळकर भाव ठेवून बोलत होता. प्रेक्षकांना आपल्या बोलण्यात इंटरेस्ट वाटावा यासाठी त्याची धडपड चालू होती.

"असं का होतं? तुम्ही आपल्याला आवडलेल्या आणि चांगल्या ब्रॅंडच्या वस्तू का घेऊ शकत नाही? याला एकच कारण आहे. ते म्हणजे त्या वस्तूची किंमत आपल्याला परवडत नाही. म्हणून आपण हलक्या दर्जाच्या स्वस्त वस्तू वापरतो किंवा खिशाला परवडेल तेवढीच चैन करतो." असं म्हणून तो खी खी करून हसला.

हा इथे तत्वज्ञानाचे डोस का पाजत आहे ते मला कळत नव्हते.

"आपल्या मर्यादित उत्पन्नामुळे आपल्याला जगात खूप तडजोडी कराव्या लागतात. लहान घरात रहावे लागते, विमानाने जायच्या ऐवजी ट्रेनने जावे लागते. अगदी विमानाने प्रवास केला तरी इकॉनॉमी क्लास मध्ये अडचणीत बसावे लागते. म्हणजे थोडक्यात आपले उत्पन्न कमी असल्यामुळे मन मारून जगावे लागते." त्याचे गुर्‍हाळ चालूच होते. प्रेक्षकातले काही जण त्याच्याशी सहमत झाले.

एवढं बोलून तो ऊठला आणि त्याने प्रोजेक्टर चालू केला. त्याच्या मागे असलेल्या पडद्यावर वेगवेगळ्या जाहिराती दिसायला सुरवात झाली. ‘क्लब महिंद्रा हॉलीडेज’, ‘झेनिथ काँप्युटर’, ‘एस्सेल वर्ल्ड’, ‘फिलिप्स सीडी प्लेयर’ अशा टीव्हीवर नेहमी दिसणार्‍या जाहिराती पडद्यावर येत होत्या.

जाहिराती संपल्यावर मध्यंतर झाले. मध्यंतरात आम्ही पटकन जेवून घ्यायचे ठरवले. आधीच भरलेले सहाशे रूपये वसूल नको का करायला? जेवणाचा मेनू बघितल्यावर आमची निराशा झाली. फक्त सॅंडविचेस आणि पुलाव. सहाशे रूपयातले साठ रुपये सुद्धा वसूल होत नाहीत याबद्दल आमची खात्री झाली.

-*-*-*-
पंधरा-वीस मिनिटांनी मध्यंतर संपलं. स्पीकरवर एक इंग्लिश गाणे वाजायला सुरवात झाली. सर्वजण आपापल्या आसनांकडे परतून आसनस्थ झाले.

काही वेळाने स्पीकरवर वाजणारं इंग्लिश गाणं एकदम बंद झालं आणि मागच्याच प्रकाराची पुनरावृत्ती सुरू झाली. स्पीकरवरच जाड्याभरड्या आवाजात कुणीतरी आकडे उलटीकडून मोजायला सुरवात केली.

"९ , ८ , ७ , . . . "

शेवटचा आकडा उच्चारून झाल्यावर एकदम सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांनी पुन्हा एकदा तालात टाळ्या वाजवायला सुरवात केली. आम्ही दोघेही त्यांच्यात सामील झालो. आता स्टेजवर तोच पंजाबी उडी मारतो का दुसरा कुणीतरी येईल एवढी एकच उत्सुकता मनात होती.

सर्वजण तालात टाळ्या पिटत असतानाच स्पीकरवर पुन्हा एकदा संगीत सुरू झाले आणि बाजूच्या एका कोपर्‍यातून एक वेगळाच तरूण पळतपळत स्टेजकडे आला आणि आधीच्या पंजाब्याप्रमाणेच त्याने लांबूनच स्टेजवर धाडकन उडी मारली आणि इतरांबरोबर टाळ्या पिटत त्याने स्टेजवरच नाच सुरू केला. सूट घातलेल्या अवस्थेत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत जसे वेडेवाकडे अंगविक्षेप करून नाचतात तसा तो नाचत होता. तो नाचताना लाकडी स्टेजचा घुमल्यासारखा आवाज येत होता.

थोड्या वेळाने त्याचे तांडव नृत्य संपले. त्याबरोबर तो आणि सर्व प्रेक्षक स्थानापन्न झाले. हा तरूण भारतीय वाटत नव्हता. गोरापान, घारे डोळे, उंच आणि एकदम सडपातळ. पण चेहर्‍यात भारतीयत्वाची थोडीशी झाक होती. त्याने इंग्लिशमधून बोलायला सुरवात केली. त्याचे आंग्लाळलेले उच्चार ऐकून तो 'ABCD' असावा असे मला वाटले.

आमचे जेवण (दोन सॅंडविचेस आणि बेचव पुलाव) नुकतेच संपले होते. हॉलमध्ये प्रचंड थंडी वाजत होती. मला हुडहुडी भरली होती. या प्रकाराचा मला आता बराचसा अंदाज आलेला होता. सहाशे रूपये अक्कलखाती गेल्याची जवळजवळ खात्री झालेली होती. आता इथे फार वेळ न घालवता घरी निघावे असा मी विचार केला. परंतु, आता इतका वेळ थांबलो आहोतच तर अजून थोडा वेळ थांबून हा प्रकार संपवूनच घरी जाऊ असे माझ्या पत्नीने सुचविले.

त्या स्टेजवरच्या तरूणाने बोलायला सुरवात केली. प्रथम वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्याने सर्वांचे औपचारिक आभार मानले. नंतर प्रेक्षकांमध्ये एक माजी पोलिस उपनिरीक्षक उपस्थित आहेत असे सांगून त्यांचे सुद्धा आभार मानले.

"मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं?" त्याने एक फालतू प्रश्न भिरकावला.
"चंकी पांडे", कुणीतरी पीजे टाकला. त्याच्या आजूबाजूचे काही जण हसले.
"मला असं सांगा की भारतात चांगली कार केवढ्याला पडते?" त्याने आधीच्या माणसाप्रमाणेच सुरवात केली.
"६५ लाख", कुणीतरी उद्गारलं. हा पीजे टाकणारा तो मगाचचाच माणूस असावा. प्रेक्षकातले काही जण पुन्हा एकदा यांत्रिकपणे हसले.
"४ ते ५ लाख", दुसर्‍याच कुणीतरी उत्तर दिलं.
"तुमच्यापैकी कितीजणांकडे कार आहे?"

या प्रश्नावर थोडे हात वर झाले.

"तुमच्याकडे कुठली कार आहे?"
या प्रश्नावर ‘सॅंट्रो’, ‘इंडिका’ अशी काही जणांनी उत्तरे दिली.

"तुमच्यापैकी किती जणांकडे मर्सिडीझ आहे?"
एकही हात वर झाला नाही.
"टोयोटा करोला, होंडा अकॉर्ड? लॅन्सर?"

या प्रश्नावर सर्वत्र सुतकी शांतता पसरली. फक्त एअर कंडिशनरचा तेवढा आवाज येत होता.

"माझ्याकडे मर्सिडीझ आहे. खूप वर्षांपासून मी मर्सिडीझ वापरतो. मी मर्सिडीझशिवाय दुसरी कुठलीही कार वापरत नाही.", त्याने अभिमानाने सांगितले.
"ऑसम! ग्रेट!", बहुतेक मगाचाच प्रेक्षक माणूस मोठ्यांदा उद्गारला. सर्व प्रेक्षक स्टेजवरच्या माणसाकडे "अजि म्या ब्रह्म पाहिले" या नजरेने पाहू लागले.
"मी का मर्सिडिझ वापरतो? कारण मला ती गाडी आवडते आणि परवडते म्हणून. मला एवढी महाग गाडी कशी परवडते? कारण मी भरपूर पैसे कमावतो आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे पाहिजे ती खरेदी करतो.", त्याने आपला मुद्दा पटवायला सुरवात केली.

प्रेक्षकांतून "वॉव", "अमेझिंग", "अनबिलिव्हेबल" असे चीत्कार उमटत होते. एका विशिष्ट गटामधूनच हे चीत्कार येत होते.

"तुम्हीसुद्धा मर्सिडीझ घेऊ शकता. त्यात विशेष असं काहीही नाही. आम्ही थोडक्या श्रमात कायम भरपूर उत्पन्न मिळविण्याची एक अभिनव योजना सुरू केली आहे. तुम्ही मगाशी पडद्यावर अनेक जाहिराती पाहिलेल्या असतील. त्या जाहिरातीतल्या प्रत्येक प्रॉडक्टला आम्ही 'पॅकेज' म्हणतो. तुम्ही फक्त एवढंच करायचं की तुमच्यापैकी प्रत्येकाने आमचं एक पॅकेज प्रमोट करायचं. तुम्ही पहिलं पॅकेज प्रमोट केलं की तुम्ही आमचे लाईफ मेंबर झालात."

आता सर्वजण उत्सुकतेने ऐकू लागले. माझ्या पत्नीला सुद्धा एकदम खूपच इंटरेस्ट वाटायला लागला. मला मात्र या प्रकाराची आता जवळपास संपूर्ण कल्पना आलेली होती.

"तुम्ही एकदा आमचे लाईफ मेंबर झालात की तुम्ही फक्त अजून दोन नवीन लाईफ मेंबर आम्हाला मिळवून द्यायचे. ते नवीन मेंबर जे पॅकेज प्रमोट करतील त्याच्या किंमतीच्या ५ टक्के तुमचा वाटा.", त्याने आमिष दाखवले.

"तुमचे नवीन मेंबर जेव्हा त्यांचे स्वतःचे नवीन मेंबर आणतील तेव्हा त्यांच्या प्रत्येक पॅकेजमागे तुम्हाला ५ टक्के प्रॉफिट मिळत राहील. आणि मग बघता बघता तुम्ही लक्षाधीश होऊन जाल." त्याने एक गोंडस चित्र सर्वांच्या नजरेसमोर उभे केले. "आणि मग तुम्हाला स्वतःची मर्सिडिझ घेता येईल."

"खेळण्यातली कार घ्यायला तरी जमेल ना?" पुन्हा एकदा तोच आवाज आणि त्याच ठराविक लोकांचा हशा. बहुतेक प्रेक्षकात काही यंत्रमानव बसवलेले असावेत. त्यांच्यातला एक जण फालतू जोक टाकत होता आणि उरलेले यंत्रमानव किल्ली दिल्याप्रमाणे हसत होते.

त्याने नाऊमेद न होता चित्रात गुलाबी रंग भरायला सुरवात केली.

"सुट्टीत ट्रिपसाठी अमेरिका, हवाई, ऑस्ट्रेलिया . . . अगदी पाहिजे तिथे जाता येईल. ते सुद्धा विमानाच्या बिझनेस क्लासमधून!"

त्याची रसवंती आता टॉप गिअरमध्ये भरधाव सुटली होती. त्याचे भाषण चालू असताना तोच ठराविक लोकांचा ग्रुप "वॉव", "फॅंटॅस्टिक" असे पढवलेले चीत्कार काढत होता.

अशी बरीच स्वप्ने दाखविल्यावर तो समारोप करू लागला. त्याने रंगवलेल्या स्वप्नामुळे सर्व श्रोतृगण अतिशय भारावून गेलेला होता. त्याने सर्वांसमोर सोन्याची खाण उघडी केलेली होती. आता फक्त जमेल तेवढं सोनं लुटायचं आणि चंगळ करायची असेच सगळ्यांच्या मनात विचार येत होते. सर्व जण एसीमुळे भरलेली हुडहुडी विसरून भविष्यातल्या धनाची उब अनुभवत होते.

त्याचं विवेचन चालू असताना मधून मधून काही जण प्रश्न विचारत होते आणि तो अतिशय चपखल उत्तरे देत होता. विचारले गेलेले प्रश्न, त्यांची उत्तरे, मधूनच उमटणारे चीत्कार आणि पीजे यावरून हा सर्व प्रकार ठरवून केल्यासारखा वाटत होता.

"तुम्ही सर्वांनी चेकबुक आणलं असेलच."

लगेच काही लोकांनी "हो" असा सामुहिक होकार देऊन आपल्या हातातली चेकबुकं फडकावली.

"मला माहित आहे की तुम्ही आमचे लाईफ मेम्बर बनायला अतिशय उत्सुक आहात. त्यासाठी तुम्हाला आमचं तुम्हाला आवडलेलं कुठलंही एक पॅकेज प्रमोट करायला लागेल."

पॅकेज प्रमोट करावं लागेल!!! म्हणजे पैसे देऊन काहीतरी विकत घ्यायला लागेल. या खरेदीविक्रीला त्याने काय नामी शब्द शोधून काढले होते!

"तुम्ही पाहिलेलं आमचं प्रत्येक पॅकेज वीस लाख रुपयांना आहे." त्याने उगाचच एक पुडी सोडली. त्याचे उद्गार ऐकल्यावर सर्वत्र भयाण शांतता पसरली.

"अरे, हे काय. तुम्हाला वीस लाख रुपये खूपच जास्त वाटले वाटतं. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला म्हणून डिस्काउंट देतो. आमचं कुठलंही पॅकेज तुम्ही एकोणीस लाख नव्वद हजार रुपयांना प्रमोट करा."

मघाच्याच ग्रुपमधला कुणीतरी एकच टाळी वाजवून थांबला. सर्वांचे आंबट चेहरे बघून तो हसला आणि म्हणाला,

"घाबरू नका. आमच्या पॅकेजसाठी तुम्हाला वीस लाख, एकोणीस लाख, दहा लाख एवढंच काय, एक लाख रुपये सुद्धा लागणार नाहीत. प्रत्येक पॅकेज प्रमोट करण्यासाठी तुम्हाला फक्त ५०,००० रुपये लागतील. एकदा तुम्ही ५०,००० रूपये देऊन कुठलंही एक पॅकेज प्रमोट केलंत की तुम्ही आमचे लाईफ मेंबर झालात आणि मग तुमच्याकडे पैशाचा नळ वाहू लागेल. पाहिजे तेव्हा उघडा आणि पाहिजे तेव्हा बंद करा. नळातून धोधो पैसे वाहत येतील."

"आता आमचे काही लाईफ मेंबर तुम्हाला त्यांचे स्वतःचे अनुभव सांगतील."

एकदम प्रेक्षकातले १५-२० जण उठून स्टेजवर गेले. त्याचे भाषण चालू असताना हेच १५-२० जण वेगवेगळे चीत्कार काढत होते आणि पेरलेले प्रश्न विचारत होते. काही जणांनी इंग्लिशमध्ये, काही जणांनी हिंदीत तर काही जणांनी चक्क मराठीत आपले अनुभव सांगितले. त्यातले काही जण बॅंका, एलआयसी अशा चांगल्या ठिकाणी नोकरी करणारे होते तर काही जण व्यवसाय करणारे होते. त्यांच्यात काही गृहिणी पण होत्या. त्या सर्वांनी आपली या नवीन कल्पक उद्योगाने कशी भरभराट झाली याचे सविस्तर वर्णन केले. जमलेल्या सर्वांना भारावून टाकण्यासाठी त्यांची धडपड चाललेली होती.

या सर्व प्रकाराचा मला अतिशय उबग आलेला होता.
"चल. निघूया आपण.", मी पत्नीला सुचवले.
तीसुद्धा एव्हाना भारावून जायला लागलेली होती.
"आपण थोडे दिवस प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?", तिने विचारले.
"तू मला एवढंच सांग. समजा आपण पन्नास हजार रूपये भरून यातलं एखादं पॅकेज घेतलं, तर ते वसूल करण्यासाठी दोन लाईफ मेंबर तू कुठून आणणार आहेस? तुझ्या मैत्रिणींपैकी, आपल्या नातेवाईकांपैकी कुठले दोघे जण त्यांचे पन्नास हजार रूपये गुंतवून यात पडणार आहेत?"

माझ्या या प्रश्नावर ती निरूत्तर झाली. हा एक सापळा आहे आणि एकदा त्यात अडकल्यावर दुसर्‍या कुणाचा तरी पाय अडकवल्याशिवाय आपली सुटका नाही हे तिच्याही लक्षात आले. आयुष्यात बहुतेक पहिल्यांदाच तिला माझे विचार पटले होते. हा प्रकार म्हणजे मोहाला बळी पडून खड्ड्यात उडी मारायची आणि मग बाहेर पडण्याकरता दुसर्‍या कुणाला तरी गोड गोड बोलून खड्ड्यात ओढायचं आणि ते खड्ड्यात पडले की त्यांना तसंच खड्ड्यात ठेवून त्यांच्या डोक्यावर चढून आपली सुटका करून घ्यायची असा प्रकार होता. एकदा आपण बाहेर पडलो की मग ते बोंबलत का बसेनात.

त्यांची भाषणे संपल्यावर अचानक रीना माझ्याजवळ आली. इतका वेळ मी तिला विसरूनच गेलो होतो. तिने जवळ येऊन एक फॉर्म माझ्यापुढे धरला.

"मग कुठलं पॅकेज प्रमोट करायचं, ते ठरवलंस का तू?", तिने अशा स्वरात मला विचारलं की मी जणू काही पन्नास हजार रूपये देऊन त्यांचे पॅकेज घ्यायला कासावीस झालो होतो.
"सॉरी रीना. मला कुठलंही पॅकेज घ्यायचं नाही. मला या प्रकारात अजिबात इंटरेस्ट नाही." मी एकदम तुकडा तोडला.
"पण का? तुला ही स्कीम आवडली नाही का?"
"स्कीमचा प्रश्न नाही. मला इंटरेस्ट नाही."
"तुला एक वेळ नसेल. पण हिला तरी असेल ना? तू तुझे विचार तिच्यावर कशाला लादतोस?" रीनाने आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला.
माझ्या पत्नीनेही तिला शक्य नसल्याचे ठामपणे सांगितले. आमचा ठाम नकार ऐकल्यावर रीना काहीशी निराश झाली.
"एक्स्क्युज मी", असे म्हणून ती कुठेतरी निघून गेली.

काही वेळातच एक प्रौढ माणूस आमच्याकडे आला. तो रीनाचा सुपरव्हायझर होता. आता माझ्या डोक्यात ट्युब पेटली. त्या माणसाने रीनाला पन्नास हजार रूपये भरायला लावून मेंबर करून घेतले होते. आता खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी रीना बकरा शोधत होती.

मला लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीत खड्ड्यात पडलेला लांडगा गोड गोड बोलून एका बकर्‍याला खड्ड्यात उडी मारायला लावतो आणि मग त्याच्या खांद्यावर चढून स्वतः खड्ड्यातून बाहेर येतो त्या गोष्टीची आठवण झाली. मला रीनाबद्दल थोडसं वाईट वाटलं. बिचारीचे पन्नास हजार रूपये अडकले होते. ते सोडवण्यासाठी तिला एक बकर्‍याची आवश्यकता होती. पण तिच्या चुकीकरता मी का बळी जायचं?

आजूबाजूला खड्ड्यात अडकलेले इतर लांडगे खड्ड्याच्या बाहेर असलेल्या बकर्‍यांना आत ओढण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. मधेच कोणीतरी उठून एकदम ओरडायचा,

"लेडीज आणि जंटलमेन, मिस्टर अलाणा फलाणांचे अभिनंदन करूयात. त्यांनी अमुक अमुक पॅकेज प्रमोट केलेलं आहे. गिव्ह हिम ए बिग हॅंड."

कुठल्यातरी बकर्‍याने लांडग्याच्या गोड बोलण्याला भुलून खड्ड्यात उडी मारलेली असायची. ही घोषणा ऐकल्यावर सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करायचे. आमचा निश्चय पक्का झालेला असल्यामुळे मला या सर्व प्रकाराची गंमत वाटत होती.

तिच्या सुपरव्हायझरने आमच्या जवळ येऊन दोन मिनिटं फालतू गप्पा मारल्या आणि नंतर एकदम मुद्द्याला हात घातला.
"तुम्ही कुठलं पॅकेज प्रमोट करायचं ठरवलंय?" त्याने विचारलं.
"कुठलंच नाही. आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही.", मी ठाम उत्तर दिलं.
"पण का?"
"ते मी सांगू शकत नाही. पण आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही."
"तुम्हाला पैसे कमावण्याची इच्छा नाही वाटतं? तुम्हाला कशाची तरी भीती वाटत असणार."
"मी तुम्हाला एकदा सांगितलं ना. आम्हाला या प्रकारात इंटरेस्ट नाही."
"मला एक सांगा. याक्षणी तुमच्या मनात कोणते विचार येत आहेत? मी सांगू? तुम्हालाही भरपूर पैसे मिळविण्याची इच्छा आहे. पण धाडस करायची भीती वाटते. बरोबर ना?" त्याने काहिशा कुत्सित आवाजात विचारले.
"खरं सांगू. इथून कधी एकदा घरी जाऊन झोपतोय असा आमच्या मनात विचार येतोय. गुड नाईट.". असं म्हणून आम्ही रीनाचा निरोप घेऊन तिथून निघालो.

बाहेर आलो तेव्हा साडेनऊ होऊन गेलेले होते. एक संपूर्ण संध्याकाळ आणि सहाशे रूपये वाया गेल्याचं दुःख मनात होतं. त्याच बरोबर खड्ड्यात उडी टाकण्याचा मूर्खपणा न करून पन्नास हजार रूपये वाचल्याचं समाधानही मनात होतं!

-सतिश माढेकर

विशेषांक लेखन: