चार काळे मणी

Submitted by विद्या भुतकर on 16 May, 2016 - 09:57

काकूंची सकाळपासून धावपळ चाललेली. कॉलेज पुन्हा सुरु झालं की नवीन पोरांची झुंबड उडायची. एकतर या पोरांना घरंच जेवण खायची सवय असायची त्यामुळे आपोआप तुलना व्हायचीच. शिवाय पटापट जेवून वर्गात जायचं सोडून ही पोरं घरी पंगतीला बसल्यागत गप्पा मारत जेवायची. बाहेर दुसरी मुलं वाट बघताहेत याचं त्यांना काही भानच नसायचं. चपाती लाटता लाटता त्यां मधेच बाहेर येऊन बघून गेल्या. बाहेर किती पोरं आहेत यावर त्यांचा अजून एक मोठा कणकेचा गोळा मळला जायचा. वाढत्या वयाची पोरं ती त्यांना कोण थांबवणार? पोळ्या करेपर्यंत पाठीला पार बाक यायचा. बरं, मदतीला दोन पोरी ठेवल्या होत्या पण त्या इतक्या हळू काम करायच्या की काकूंच्या स्पीडसमोर कासवच ते. पण नाईलाज होता.

' अगं त्या कोपऱ्यातल्या अजयला देऊन येजा पोळी मघापासून बसलाय. ', काकू पोळी करता करता चढ्या आवाजात बोलल्या.

'दही दिऊन आलीस का बाहेर? प्रत्येकाच्या ताटात दही ठेव म्हणून कितीदा सांगायचं तुम्हाला?'

'आमटी वाढलीस का?'. बाहेर काय चाललंय हे त्यांना आत बसून बरोबर कळायचं. बराच वेळ झाला तरी चार टाळकी अजून बोलत बसलीत म्हटल्यावर काकू तावातावाने बाहेर आल्या आणि बोलल्या,'काय रे झालं का जेवण? काय हवं असेल तर घ्या पटापट आणि जा बाहेर. बाकी पोरांना क्लास आहेत. ' त्यांचा आवाज ऐकून ती पोरं उठलीच.

त्यांना काकूंच्या रागाची अजून सवय नव्हती. नंतर मात्र एकदा रुळले की त्यांना काकूंचं प्रेम कळायचं. एखाद्याला अडचण असेल तर एखादा महिना उशिरा पैसे दिले तरी समजून घ्यायच्या. कुणी आजारी असला तर जरा वेगळं काहीतरी बनवून द्यायच्या. सणाला गोडधोड करून भरपूर जेऊ घालायच्या. परीक्षेला टेन्शन घेतलेल्या पोरांना समजावून सांगायच्या. काकूंचं व्यक्तिमत्वही तसं भारदस्त, उंचपुऱ्या, भक्कम खांदे, कायम कपाळाला मोठी टिकली, दोन्ही हातभरून बांगड्या. अगदी एव्हढ्या चपाती लाटून सुद्धा कधी त्या बांगड्यांच ओझं झालं नाही त्यांना. आवाजही जोरदार होताच. कधी कुणी पैसे चुकवले तर भांडायला कमी करायच्या नाहीत. कुणी नोकरी लागली की पेढे आणायचा. दरवर्षी निघून जाणारे असायचेच पण कुणी परतून काही वर्षांनी आला तरी आठवणीने साडी घेऊन यायचा. काकूंचं रहाटगाडगं मात्र तिथेच, तसंच चालू असायचं.

बारा वाजले तशी जरा गर्दी कमी झाली. अगदीच दांड्या मारणारी, उशिरा उठणारी तेव्हढी राहिली होती. दुपारीही काकू शांत बसायच्या नाहीत. भांडी उरकली की लगेच संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालूच असायची. या उशिरा येणाऱ्या पोरांत तिची लाडकी एक-दोन पोरं होतीच. ती आली की त्या काहीतरी गरम गरम करून देत. कधी आपल्या साठी काही केलं तर त्यातलं खायला देत. आज काकू तांदूळ निवडत असताना एक जण आला. काकूंनी खोट्या रागाने त्याला सांगितलं, 'वेळ संपली दुपारच्या जेवणाची आता संध्याकाळीच ये.'

पण संतोष कुठला ऐकतोय. तो काकूंच्या शेजारी बसलाच. 'अहो काकू काल अभ्यास करत बसलो होतो रात्री. उशीर झाला एकदम. आता १२ लाच उठलो. आता कुठे जाणार जेवायला.'

'हो म्हणे अभ्यास. ती तुझ्यासोबत येते आणि बाहेर वाट बघत असते 'ती'च का तुझा अभ्यास?', काकू.

काकू बोलल्या तसा तो ओशाळला. म्हणाला, 'काकू तुमचं सगळीकडे लक्ष असतं म्हणजे. लग्न झालं की तुम्हालाच भेटायला आणतो पहिला. आईकडे पण नेणार नाही बघा.'

'बस, बस, इतकीही लाडी गोडी लावू नकोस. असे बरेच येऊन गेलेत आधीपण. हे घे तांदूळ निवड, मी चपाती करते. '

त्याच्या हातात तांदूळ देऊन काकू चपाती करायला लागल्या.

'आमटीच आहे बघ आता फक्त. भाजी संपलीय.' काकू.

'काकू मी कधी तक्रार केलीय का?', तांदूळ निवडत, संतोष मस्का लावतच होता.

त्या चपाती करत असताना आतून एक माणूस बाहेर आला. वयस्कर, हाफ शर्ट, pant घातलेली. केस विस्कटलेले. डोळे लाल भडक. त्याला पाहून संतोष एकदम दचकला. याला आधी कधी पाहिला नव्हता त्याने. त्या माणसाने बाहेर येऊन चूळ भरली. तोंडावर पाणी मारलं आणि 'सुशे, चहा दे गं.' म्हणून जोरात हाक मारली. काकूंनी आतूनच, 'हो करते' म्हणून सांगितलं. तो माणूस बाहेर पायरीवर बसून राहिला. संतोष मुकाट्याने खाली ताटात मान घालून बसला. त्या माणसाने त्याला विचारलं,'काय रे किती वेळ चालती ही खानावळ. कधी पण येतोस का?' .

'हां जरा उशीर झाला आज', संतोष हळूच बोलला.

त्याने पुढे विचारलं, 'किती पैसे देतोस महिन्याला?'.

'२००० देतो. ', संतोष.

'बघा म्हणजे ही खोटं बोलून माझ्याकडेच चोरी करतेय की', तो माणूस तावातावाने बोलू लागला.

'काय गं सुशे हा काय म्हणतोय. किती पैसे दडवून ठेवलेस असे माझ्यापासून?', त्याचा आवाज वाढला तशा काकू बाहेर आल्या.

'काय चाललंय तुमचं? भर दिवसा तमाशा करू नका. ही माझी पोरं आहेत त्यांना काय बोलू नका. ', काकू रागात बोलल्या.

'हो आता बरोबर आहे, तुझं भांडं फुटलं ना. मी पैसे दे म्हणालो तर म्हणालीस नाहीयेत आणि इथं इतकी पोरं येतायत दोन दोन हजार देऊन खायला.', आता भांडण जोरात सुरु झालं आणि संतोष ला काय करावं सुचेना. तो निघून जाणार तर काकू म्हणल्या, 'बस रे, जेवून जा. तू कशाला उपाशी राहतोस.' त्यामुळे आता त्याला निघताही येईना. तो तसाच उभा राहिला. त्याने कधी काकूंच्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं. आणि कधी विचारायची हिम्मत ही झाली नव्हती. पण आज एकूण प्रकार बघून त्याला वाटत होतं की हाच तो माणूस असणार.

त्या माणसाची बडबड चालूच होती,' माझी पोरं म्हण, स्वत:चं असतं एखादं तर मी असा कशाला असतो. काही मिळालं नाही तुझ्याकडून. आता पैसे मागितले तर हे असं खोटं बोलायचं. '.

लोकांसमोर तमाशा नको म्हणून काकू त्याला हात धरून आत नेऊ लागल्या, तसा त्या माणसाने हात उचलला. ते पाहून मात्र संतोषने त्याला तिथेच थांबवलं आणि त्याच्या हाताचा जोर पाहून तो माणूस गप्प आत निघून गेला. आत म्हणजे तरी काय, तीन छोट्या छोट्या खोल्यांचा तो गाळा, काकूंनी पैसा जोडून विकत घेतला. नवरा मात्र कधीतरी यायचा पैसे घेऊन जायचा. कुठे जायचा, राहायचा काही बोलायचा नाही. दोन दिवसांनी आला तसाच निघून जायचा. त्यांनाही आता सवय झाली होती या सर्व नाटकाची. त्याही आलं की दोन दिवस सहन करायच्या आणि पुन्हा कामाला लागायच्या.

संतोष काकूंकडे बघून थांबून राहीला. त्यांना काही उगाच व्हायला नको. काकूंनी काहीच झालं नाही असं सहजपणे त्याला ताट दिलं. तो शांतपणे जेऊ लागला. काकू हळू आवाजात त्याला सांगू लागल्या.

"मुलं होण्यासाठी १० वर्ष वाट पाहिली. उपास तापास, नवस, डॉक्टर सगळं झालं. पण उपयोग होत नव्हताच आणि जाच पण कमी होईना म्हणून नवऱ्याला मनवून गावातून इथं सांगलीत आलो. इथं आल्यावर हातात काहीच नव्हतं. एका आजींनी आधार दिला, त्याचं सर्व करते म्हणाले म्हणून त्यांनी महिन्याला थोडे पैसे आणि एक छोटी खोली दिली राहायला. मी सगळं करत होते तरी बोलून घ्यायचं सुटत नव्हतं. एक दिवस हा घरातून निघून गेला. खूप रडले. आज्जीनी खूप मदत केली. अशा वेळी आपलं कुणीही मिळत नाही. हळूहळू कॉलेजच्या पोरांना डबा द्यायला लागले. हातात पैसे यायला लागले तसं काम वाढवलं. आता २० वर्षं झाली माझी खानावळ चालू आहे. स्वत:च्या हातात ताकद आहे तोवर करायचं. तुझ्यासारखी पोरं आल्यावर जीव लागतो. तुम्हाला घराच्या सारखं खायला दिऊन मला सुख मिळतं, अजून काय पाहिजे".

त्याला जेवण जात नव्हतं पण काकू एक संपली कि दुसरी चपाती वाढतच होत्या. त्यांचं असं रूप बघून त्याला वाईट वाटत होतं.

तो हिम्मत करून बोलला, 'मग कशाला तुम्ही याचं ऐकून घेता? सोडून द्यायचं ना?'.

"अरे मला पण असंच वाटलं पहिल्या दोन तीन वेळा हा असा येऊन गेला तेव्हा. पण परत म्हटलं कशाला दु:खं करायचं? मी रोज तुम्हा पोरांना इतकं करून घालते. अजून चार चपाती मला जड नाहीत. आपल्या दारात आलेल्याला देतोच की आपण. असंच समजायचं याला पण. जर भांडणाचा त्रास असतो पण दोन दिवसासाठी चालतंय तेव्हढा. आणि आपल्या इथं या दोन काळ्या मण्यांना खूप भाव आहे बघ. इथं आले तेव्हा अजून वयात होते. जरा नवरा दिसत नाही म्हटल्यावर हे कावळे यायला लागले मग म्हणलं जाऊ दे, घालून ठेवावं गळ्यात. बाकी लोकांचा त्रास कमी होणार असेल तर त्यासाठी दोन दिवस झाला त्रास तर करून घ्यायचा. आणि तुझ्यासारखी माझी पोरं आहेत तोवर मला काही होत नाही बघ. '

संतोष हसला. काकूंना काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं पण त्यांच्याबद्दल चा त्याचा आदर वाढला होता नक्कीच.

'आणि सुनेला भेटायला आणायला विसरू नकोस हां', खोट्या रागाने काकू बोलल्या तेव्हा त्याला हलकेच हसू फुटलं होतं.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan

सर्वान्चे आभार. Happy
माझ्या माहितीत अशा अनेक मेस आणि त्यान्च्या काकू आहेत ज्याना सशक्त, सक्शम असुनही त्रास सहन करावा लागतो. Its not easy to let someone go.

Vidya.

छान!

छान.
> आणि आपल्या इथं या दोन काळ्या मण्यांना खूप भाव आहे बघ. इथं आले तेव्हा अजून वयात होते. जरा नवरा दिसत नाही म्हटल्यावर हे कावळे यायला लागले मग म्हणलं जाऊ दे, घालून ठेवावं गळ्यात. बाकी लोकांचा त्रास कमी होणार असेल तर त्यासाठी दोन दिवस झाला त्रास तर करून घ्यायचा. > निम्नवर्गातल्या बऱ्याच स्त्रियांची हीच कहाणी असते. त्या आर्थिक स्वतंत्र असतात, रादर त्यांची पूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून असतात, पण तरीही बिनकामाचा नवरा 'ठेवावा' लागतो.