सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

शिवशक्ती संगम या धाग्यावर पुढे चर्चा जातीनिर्मुलनाकडे गेली, त्यावर तिथे पडलेल्या काही चांगल्या कमेंट्स येथे आणून ठेवत आहे.
प्रतिसाद नावासहित कॉपी पेस्ट करण्यास त्या प्रतिसादकांची परवानगी आहे असे मी नम्रपणे गृहीत धरतो जेणेकरून थोडा वेळ वाचेल..

प्रकु :
भिन्न भिन्न जातित लग्न लावणे हा जातिअंताचा उपाय आहे संघाला हा विचार झेपेल? >>>.
पगारेजी मला या प्रश्नाला उत्तर द्यायचे नव्हते .. उगाच काहीतरी नव्या वादाला तोंड फुटेल म्हणून,
पण आत्ता तुम्ही हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारलात सो..,
तुम्हाला वाटतो तितका संघ काही मागासलेल्या विचारांचा नाही. संघाचा विस्तार इतका आहे कि संघात असा विवाह केलेले लोक सुद्धा नक्कीच असतील.
एकतर विवाह हि वैयक्तिक बाब आहे. कोणी आंतरजातीय विवाह केला तर संघाने त्याला विरोध करण्याचे काही कारणच नाही. कारण कोणत्या 'जातीचे' लोक काय करतायेत वगेरे हा संघाचा विषयच नाही..

दुसरे म्हणजे मला वाटते 'उपाय' म्हणून 'आंतरजातीय विवाह संघाने 'घडवून' आणावेत' असं तुम्ही म्हणता आहात. पुन्हा तीच गोष्ट आहे. संघाने कोणत्या जातीला काय करावे काय नाही हे सांगण्याचे प्रयोजन काय.? संघात कोणत्याही एका जातीचे लोक नाही. सर्वच आहेत.

माझ्या मते असे विवाह 'घडवून आणणे' औघड आहे. कारण कोणी कोणाला विवाहासारख्या वैयक्तिक गोष्टीबद्दल कसा काय सल्ला देईल आणि तो ऐकून कोण घेईल.?
एक मात्र होऊ शकते कि आंतरजातीय विवाह स्वेच्छेने करायचे झाल्यास फक्त 'दुसऱ्या जातीचा' म्हणून विरोध होता कामा नये याकरता प्रबोधन केले जाऊ शकते.
तस आता काळ बऱ्याच प्रमाणात बदललेला आहे.. आंतरजातीय विवाह खूप चांगल्याप्रकारे स्वीकारले जात आहेत.

या निमित्ताने मला एक जुने वाचलेले आठवले. सावरकरांनी अंदमानहून परतल्यावर जे जाती निर्मूलनाचे कार्य हाती घेतले होते त्यात एका जातीच्या (कुठल्या ते लक्षात नाही) मेळाव्यामध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आले होते. त्या वेळी त्यांना असाच काहीसा प्रश्न विचारण्यात आला होता. (पूर्ण तपशील लक्षात नाही.)
सावरकर त्या वेळी ज्यांना मंदिर प्रवेशाचा अधिकार नाकारण्यात आला होता अशांकडून सामूहिकरीत्या सत्यनारायण पूजन करवून घेत असत.

सचिन पगारे :
ह्या जातीच नष्ट करण्याबाबत संघाने पुढाकार घ्यावा असे माझे म्हणणे आहे.

vijaykulkarni :
मी संघाचा समर्थक वगैरे नाही पण अगदी ठरवून भिन्न जातीय विवाह केलेले संघाचे लोक पहाण्यात आहेत. संघात जातीवाद पाळला जात नाही व उलट विविध जातीच्या मुलंच्या घरी "सहज" जाऊन पाणी पिणे, त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावणे वगिअरे चालते.

प्रकु :
संघाच्या आत्ताच्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांनी समाजात समरसता आणणे जातीभेद नष्ट करणे याच मुद्द्यांवर भर दिला होता.
त्यात ते म्हणाले कि जातीभेद हा केवळ कायद्याने नष्ट होणार नसून तो मनातून उखडून टाकणे गरजेचे आहे. त्याकरिता संघाचे पूर्वीपासून काही उपक्रम सुद्धा चालू आहेत.
त्यातील एका उपक्रमाची सुरुवात करताना संघाने ती कशा प्रकारे केली ते त्यांनी उदाहरणादाखल भाषणात सांगितले ते असे, काळाराम मंदिरात ज्यांना एके काळी प्रवेश नाकारण्यात आला होता, ज्याकरता डॉ. आंबेडकरांना संघर्ष करावा लागला, त्या मंदिरात त्यांच्या हाताने पूजा करून त्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
भाषणाचा व्हिडियो मिळाल्यास बघा.

तात्पर्य, संघ जातीनिर्मूलनावर अगोदरपासून काम करीत आहे. संघाचे एक लाखाहून अधिक सामाजिक उपक्रम चालू आहेत. ते आपापले शांतपणे काम करत असतात त्यामुळे कुठे बोलबाला होत नाही न् सामान्य जनतेपर्यंत ते फारसे पोहोचत नाहीत.

टण्या :
पगारे मी आता संघाशी संबंधित नाही. पण माझ्या पाहण्यात कित्येक संघाचे शिक्षक कार्यकर्ते आंतरजातीय विवाह केलेले आहेत. माझाच वर्गमित्र बहुतेक कानडी ब्राह्मण असावा जो संघ शिक्षक होता याची बहिण दुसरे एक तालुका प्रमुख कुंभार होते त्यांच्याशी झाला आहे.
प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हे अजून एक उदाहरण. मुद्दाम उत्तेजन देऊन संघ कार्यकर्ते आंतरजातीय विवाह करताना पाहिले आहेत.

माझ्या नात्यातले अनेक लोक ज्यांचा संघाशी काडीचा संबंध नाही ते जातेयवाडी आहेत. मी ज्या भागातून आलो आहे तिथले राजकारण मराठा समाजाच्या हातात आहे. त्यातले अनेक शेती व इतर कामामुळे जवळून संबंधित आहेत. कुणीही संघाशी दुरुऊन संबंधित नाही. त्यांची जात या विषयावरील मते अत्यंत प्रतिगामी आहेत. आंतरजातीय विवाह ही विचारसुद्धा करण्याच्या पलीकडील गोष्ट आहे.

तेव्हा संघ हा जातीव्यवस्थेला मान्यता देणारी संघटना आहे हा विचार सोडा. शत्रूची विरोधी विचाराच्या लोकांची माहिती अचूक असावी. संघ हिंदू सोडून भारत म्हणू लागला तर पुरोगामी होईल स्मित

प्रकु,
संघस्वयंसेवकांमध्ये जो अप्रतिम बंधुभाव असतो (मग डायरेक्ट ओळख असो वा नसो) त्याला काही तोडच नाही पगारेजी. यामध्ये आमच्या मनात समोरच्याची जात कोणती याचा नुसता विचार येणे हेहि केवळ अशक्य आहे. कित्येकदा वेगवेगळ्या भागातील स्वयंसेवकांची भेट होते त्यांचे आम्हाला पूर्ण नाव देखील माहित नसते. तरीही त्याच्याशी तेवढ्यात बंधुभावाने गप्पा चहा, पाणी अगदी घरी जाऊन जेवण सुद्धा होते..
संघ हा ६०,७० लाख कदाचीत एक कोटी सदस्य संख्या असलेले एक कुटुंबच आहे..

सुनिधी :
टण्याला अनुमोदन. मी संघपरिवारात वाढले. असंख्य कार्यकर्त्यांशी बोलणे झाले, ऐकले. एकदाही जातीवर कोणी काही म्हटले नाही. पगारे, मोगा त्यांच्यापेक्षा तुम्हीच जातजात जास्त करता असे माझे एकुण मत झाले आहे. इथेपण आम्ही शाखेत जातो. मस्त वाटते.

सावली :
मी संघाशी अजिबात संबंधीत नाही. किंबहुना दोन अडीच वर्षापूर्वी संघाबद्दल मला काहीच माहिती ( असलीच तर थोडी निगेटीव्ह) नव्हती. पण पूर्वांचलात प्रवास करताना संघाचे लोक कसे काम करतात आणि कशी सगळ्यांनाच मदत करतात. समोरच्या माणसाला पहिल्यांदाच भेटत असले तरी संघाचे असल्यावर किती बंधुभावाने वागतात हे पाहीले आहे. पूर्वांचला च्या आदिवासी आणी अतिदुर्गम भागातही गेले साठ एक वर्ष यांचे कार्य सुरु आहे. जन्मत:च प्रतिकुल परिस्थिती आहे म्हणुन त्याला तोंड देणे वेगळे आणि सगळं सोडुन तिथल्या प्रतिकुल परिस्थितीतही वर्षानुवर्ष कार्यरत रहाणे वेगळे. हे मी फक्त एकाच ठिकाणी पाहिले, पण सगळ्या भारतभर यांचे कार्य चालते असे मला तेव्हा लक्षात आले. त्यासाठी मला त्यांचा फार आदर वाटतो. ( बाकी काही प्रतिगामी मतेही आहेतच जी मला पटत नाहीत, पण त्यामुळे त्यांचे काम छोटे होत नाही)

संघस्वयंसेवकांमध्ये जो अप्रतिम बंधुभाव असतो (मग डायरेक्ट ओळख असो वा नसो) त्याला काही तोडच नाही >> याचा अनुभव आला आहे.

सचिन पगारे :
संघ जातपात मानत नाही, आंतरजातिय विवाह त्यांच्यात करतात हे चांगले आहे पण मुळ प्रश्न बाजुलाच राहिला ते जात निर्मुलनाचा प्रश्न का घेत नाहीत का जाती राहण्यातच त्यांचा फायदा आहे?

>>अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.<<

सुंदर!! गांधीजींचंच एक कोट आहे - "ए वीक कॅन नेवर फर्गिव; फर्गिवनेस इज ॲन ॲट्रिब्युट आॅफ दि स्ट्राॅंग"

प्रकु, आधीच्या धाग्यावरचे विजयकुलकर्णी व टण्याचे RSS मधल्या आंतरजातीय विवाहांबद्दलचे प्रतिसाद सेव्ह करून ठेवा आणि त्यांनी परवानगी दिल्यास त्या धाग्याच्या किंवा ह्या धाग्याच्या हेडरमध्ये चिकटवा. हा धागाही वाहता केला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा.

प्रस्तावना आवडली.

< समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. अभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.>

हे फारच आवडलं.

<दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू>

हे बोल्ड करा.

तूर्तास वाचनापुरता येईन.

धागा आवडला.
सावरकरभक्ती, गांधीजींचा उगाचच तिरस्कार इ. सायकल्समधून मी सुद्धा गेले असल्याने रिलेट झाला.
आता दोघांविषयीही आदर आहे.
धाग्यावर संयत चर्चा झाली तर वाचायला आवडेल.

संघ जातपात मानत नाही, आंतरजातिय विवाह त्यांच्यात करतात हे चांगले आहे पण मुळ प्रश्न बाजुलाच राहिला ते जात निर्मुलनाचा प्रश्न का घेत नाहीत का जाती राहण्यातच त्यांचा फायदा आहे?

विवाहातून सामाजिक समरसतेचा प्रयोग सावरकरांनी स्वतः आपल्या कुटूंबापासूनच केला होता.
त्यांनी आपल्या मुलामुलींची लग्ने अतिशय साधेपणाने केली.
मुलींची लग्ने जातीबाहेर, कोंकणस्थ ब्राह्मणांशी लावून दिली. त्यावेळेस हे अतीव धाडसाचे आणि क्रांतिकारक पाऊल होते.
इतकेच नव्हे तर मुली - जावयांना आपल्या संपत्तीत हिस्साही दिला.
(संदर्भ- धनंजय कीर लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र)

वि दा सावरकर ह्यांचे उदाहरण कौतुकास्पद आहे.आंबेडकरांनीही आंतरजातिय विवाह केला होता पण ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी उदाहरणे झालि. जात हा प्रकार समाजावर लादण्यात लादणार्यांनी मोठी चुक केली आहे.समाजात एक हिंदु हा दुसर्या हिंदुशी मनाप्रमाणे लग्न करू शकला पाहिजे जात आडवी यायला नको ह्या द्रुष्टिने जातनिर्मुलनासाठी संघ ह्या हिंदुंच्या सर्वात मोठ्या संघटनेने खरच मनात असेल तर कार्यक्रम आखायला हवा.

सर्व प्रतिसादकांचे आभार ..

हा धागाही वाहता केला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा. >> हे न होण्यासाठी काय करावे.?
मागचा धागा सुद्धा नंतर वाहता करण्यात आला असे मला वाटते. कारण मला गप्पांचे पान, लेखनाचा धागा यातले फरक माहिती आहे. तसेच मी मुद्दाम सार्वजनिक ठेवलेला तो धागा असार्वजनिक का करण्यात आला हे देखील लक्षात आले नाही..

यामागे काही कारणे असतील तर प्रशासनाने कळवावे जेणेकरून योग्य बदल करता येतील.

माझी प्रशासनास अशी विनंती आहे कि हा धागा वाहून जाऊ देऊ नये. कारण लगोलग सगळे हेडर मध्ये घालणे औघड आहे. यामध्ये हेडर इतर कोणी access पण करू शकत नाही.

एखाद्या धाग्यावरच्या प्रतिसादांची पातळी घसरली, धागा विषय सोडून किंवा पारच भरकटू लागला की अ‍ॅडमिन तो वाहता करायचा उपाय अंमलात आणतात असा अनुभव आहे. त्यावर उपाय एकच : जर कोणी अशा प्रकारचे प्रतिसाद देत असेल तर त्याला तिथे अजिबात उत्तर न देणे. तेव्हा हे मायबोलीकरांच्याच हाती आहे.
सगळा मजकूर हेडरमध्ये अपडेट करत राहणं हे किचकट आहेच, पण त्यामुळे हेडरमधला मजकूरही भलताच लांबलचक होईल.

जातनिर्मुलनासाठी संघ ह्या हिंदुंच्या सर्वात मोठ्या संघटनेने खरच मनात असेल तर कार्यक्रम आखायला हवा. >>>> कार्यक्रम आखलेले आहेत. संघ जातीनिर्मुलनासाठी राबवत असलेले उपक्रम यावर मी लवकरच लिहीन.

जात निर्मुलनाचा प्रश्न का घेत नाहीत का जाती राहण्यातच त्यांचा फायदा आहे? >>>>
जातीयवादामध्ये संघाचा फायदा नसून हे संघा समोर असलेले एक आव्हान आहे. याचे कारण असे आहे कि संघ 'सर्व' हिंदूंच्या एकतेसाठी झटत आहे. जातीभेदामुळे हिंदूंमध्ये फुट पडून हे एकजूट होण्यात अडथळे येतात ...

भरत अच्छा असे आहे काय.
पण मागचा जो धागा होता त्यामध्ये 'तशा' प्रतिसादांकडे जवळजवळ सगळ्यांनीच दुर्लक्ष केले होते. पुढे चर्चा पण छान झाली होती. म्हणजे जशी टिपिकल चिखलफेक होते तस तर काही झाले नव्हते माझ्या मते.
आता या धाग्यावर विषयच असे असणार कि कोणीना कोणी 'तसा' येणारच.
आपला हेडर मोठा होण्याचा मुद्दा देखील रास्तच आहे. तो माझ्या लक्षातच आला नाही.

असो. आपण विखार येणार नाही याची काळजी घेऊच तरी मी एकदा admin ना विपु करून विनंती करतो हे वाहते करू नका म्हणून.

धागा आवडला असे नोंदवणाऱ्या सर्वांचे आभार Happy

प्रकु,

आधीच्या धाग्यात संघाला विरोध असणारे काही आयडीज खोडसाळ प्रतिसाद देत होते. नंतर त्याला स्वतःला संघाच्या बाजूचे म्हणवणार्‍या आयडीजनीही तितकेच खोडसाळ रिप्लाय दिले. दोन्ही बाजूच्या या उपद्रवाने अ‍ॅडमिनना कारवाई करावी लागली. पण खरंच अ‍ॅडमिनना विनंती की अशावेळी त्या आयडीजवर कारवाई करा/त्यांचे प्रतिसाद उडवा पण चांगले प्रतिसाद राहू देत.

अच्छा ठीक आहे सनव, आपण सांगितलेले बदल करतो.
मी admin ला विपु करून त्याबद्दल लिहिले आहे. बघूया ..

संघ ही भारतीयांची संघटना आहे. कोणा एका जातीची नव्हे. संघात हिंदुंपैकी सर्व जातीचे लोक अहेत शिवाय मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौध्द, पारसी बांधवदेखील आहेत.

हे ३ वर्षं जुने व्हिडियोज- सरसंघचालकांचे- लोकसत्ता पेपरशी मुलाखत- छोटे व्हिडियोज आहेत- जरुर बघा- तीन वर्षं जुने आहेत हे मुद्दाम सांगत आहे- म्हणजे मे २०१४ च्या आधीपासूनच संघाची ही भूमिका consistent आहे-

Dalit person can also be the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief -- Mohan Bhagwat

https://www.youtube.com/watch?v=u5TX8lmSHRY

More and more Muslims are joining Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) nowadays -- Mohan Bhagwat

https://www.youtube.com/watch?v=RSoMZ_Tno9M

Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) is not just a Hindu organization -- Mohan Bhagwat

https://www.youtube.com/watch?v=PF364OEEVWQ

आणखी एक गोष्ट- पगारे- संघ परफेक्ट नाही.नक्कीच नाही. चीड यावी इतकी काही धोरणं चूक आहेत..माझ्या तरी डोक्यात जाणार्‍या काही गोष्टी संघाने केल्या आहेत. त्यामुळे अंधभक्ती इथे अजिबात नाही.
पण- संघाकडून त्या चुका सुधारण्याचे, स्वतःत बदल घडवण्याचे प्रयत्न दिसून आले आहेत..म्हणूनच संघ अजूनही पॉझिटिव्हली वापरला जाऊ शकतो असं वाटतंय इतकंच.

प्रकु, धाग्याचा उद्देश चांगला आहे आणि तो सफल व्हावा अशी आशा बाळगतो.

बाकी खोडसाळपणा हा होणारच त्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम.

प्रत्येक हिंदु जातित निरनिराळ्या परंपरा असतात ब्राम्हण समाजात मुंज आणि उपनयनविधी केले जातात ह्याने वर्णविषमता आणि स्त्री पुरुष विषमता वाढते असे वाटत नाही का?,

प्रकु संघाबाबत आणि ब्राम्हण समाजाबाबत बरेच चांगले वाईट बोलले जाते त्याबद्दल प्रश्न विचारणे काही गैरसमज असतील तर ते दुर व्हावे म्हणुन मी प्रश्न विचारत आहे.धागा वाहता करणे हा उद्देश
नाही.

संघाची शिस्त, निष्ठा या सद्गुणांचं कौतुक केलं, तरीही प्रत्येक क्षेत्रात आपला सहभाग असावा आणि आपलीच धोरणं (जी फक्त काही थोडक्यांनी ठरवलेली असतात) सर्वत्र लागू असावीत, हा हट्ट घातक आहे. गेल्या काही वर्षांत 'भारतीय शिक्षणपद्धती', 'भारतीय विज्ञान', 'भारतीय जीवनशैली' अशा लेबलांखाली संघानं अनेक अकादमिक संस्थांचं रुपडं बदललं आहे. हे रूप बदलण्यामागे असलेला विचार काय, अशी पृच्छा केल्यास 'संघविचार' असं उत्तर मिळतं.

नव्या शासनकाळात संघानं विज्ञानक्षेत्रावर आपली पकड असावी, यासाठी मजबूत प्रयत्न सुरू केले आहेत. 'विज्ञान भारती'चे प्रतिनिधी आता सर्व बैठकांना हजेरी लावू लागले आहेत. शास्त्रज्ञांनी 'नव्या शासनाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत' असंच संशोधन करावं, अशा 'अपेक्षा' व्यक्त केल्या जात आहेत. या 'अपेक्षा' म्हणजे गंगेच्या शुद्धीकरणासारख्या योजना असल्यामुळे अवकाशतंत्रज्ञान किंवा स्ट्रिंग थियरी यांमध्ये काम करणार्‍याला आपण नक्की काय करायचं, हा प्रश्न पडल्यास नवल नाही. 'मूलभूत विज्ञान कुचकामी आहे', हा विचार केंद्रस्थानी ठेवून केवळ 'सामान्य जनतेला उपयुक्त असं विज्ञान सरकारी प्रयोगशाळांमधून बाहेर यावं' अशी धोरणं आखली जाऊ लागली आहेत. संशोधनात पैसा उगाच वाया जाऊ नये, म्हणून ठरावीक काळात एखाद्या समितीसमोर आपलं काम मांडणं हे योग्यच असलं तरी त्या समितीत संघाचा प्रतिनिधी असणं, ते काम 'योग्य' दिशेनं जात नसल्यास काम बंद करायला सांगणं, असे प्रकार होऊ घातले आहेत / होणार आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत भारतात परतलेले शास्त्रज्ञ पुन्हा अमेरिका-युरोपात निघून गेल्यास नवल नाही. फंडिंगमध्ये झालेली कपात ही अजून एक बाब. संशोधनासाठी असलेला पैसा 'विज्ञानाच्या पॉप्युलरायझेशन'साठी आणि 'उपयुक्त विज्ञाना'साठी वळवण्यात आल्याची चर्चा आहे.

आता इथे 'उपयुक्त विज्ञान' म्हणजे काय याबाबतीतही संभ्रम आहे. देशातल्या प्रयोगशाळा अन्न / वस्त्र / पाणीपुरवठा यांसाठी काम करतच नाहीत, असं नाही. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून तयार होणारी जलशुद्धीकरण यंत्रं किंवा लखनऊच्या सीएसआयआरच्या प्रयोगशाळेनं विकसित केलेली बियाणी हे उदाहरणं आहेत. पण शास्त्रज्ञांनी देशातल्या अन्नपाण्याच्या, दुष्काळाच्या समस्यांची जबाबदारी घेऊन केवळ तेवढंच काम करावं, अशी अपेक्षा रास्त नाही. मनमोहन सिंगांच्या पहिल्या सरकारात असलेल्या डाव्यांनी अशीच अपेक्षा ठेवून प्रयोगशाळांवर दबाव आणला होता. पण नंतर मुद्दा समजून घेऊन त्यांनी माघार घेतली. सध्या मुद्दा समजून घेणं आणि देणं हे दोन्ही शक्य नाही. धोरणांना विरोध केल्यास 'तुम्हांला संघ म्हणजे काय हे कळत नाही, आधी संघविचार समजून घ्या' असं स्टॉक उत्तर मिळतं. मैसुरुच्या सायन्स कॉंग्रसमध्ये पुण्यातल्या काही शास्त्रज्ञांनी विज्ञान भारतीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेच स्टॉक उत्तर मिळालं. गेल्या दोन सायन्स काँग्रसांमधून विज्ञानक्षेत्रातल्या संघविचारामुळे काय नुकसान होऊ शकतं, हे अनेक शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. 'दोनच वर्षांत इतकं, तर अजून तीन किंवा आठ वर्षांत किती?' हे त्रैराशिक आता अनेकजण मांडू लागले आहेत.

आपण प्रत्येक क्षेत्रात लुडबुड करावी का, त्या क्षेत्राला 'योग्य' दिशेने (म्हणजे संघविचाराच्या नव्हे) नेण्यासाठी आपल्याकडे निर्णयक्षमता - आकलनक्षमता असलेलं मनुष्यबळ आहे का, याचा विचार आता नव्वदीतल्या संघानं करावा. शिस्त आणि निष्ठा या दोन गुणांच्या जोरावर सार्वभौमत्व प्रस्थापित करता येत नाही. केलं तरी त्याचा इतरांना फारसा फायदा होत नाही, हे संघानं समजून घ्यायला हवं. 'मी शिस्तशीर आहे', असं एवढंच क्वालिफिकेशन सांगणार्‍या माणसाला आपण आपल्या मुलांना शिकवू देऊ का? नाही. त्यामुळे केवळ शिस्तीच्या जोरावर राष्ट्राचं भवितव्य ठरवण्याची जोखीम संघानं घेऊ नये. तळागाळापर्यंत विज्ञानशिक्षण नेणं, हे स्तुत्य असलं तरी त्या बळावर जगात नावाजल्या गेलेल्या प्रयोगशाळांची धोरणं ठरवण्यात पुढाकार घेणं, हे चुकीचं आहे.

प्रत्येक हिंदु जातित निरनिराळ्या परंपरा असतात ब्राम्हण समाजात मुंज आणि उपनयनविधी केले जातात ह्याने वर्णविषमता आणि स्त्री पुरुष विषमता वाढते असे वाटत नाही का?,>> मला वाटते की असे विधी विविध जातींमधेही होत असतील. पण मुंज्/उपनयन यांच्यामुळे वर्णविषमता वाढीस लागते हे विधान थोडे चुकीचे वाटते.

ब्राम्हण समाजात मुंज आणि उपनयनविधी केले जातात ह्याने वर्णविषमता आणि स्त्री पुरुष विषमता वाढते असे वाटत नाही का?,>>>>>> तुम्हाला असे का वाटते ते सांगू शकाल का?

पगारे, बाकी तुमचा उद्देश लक्षात आलेला आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची खरच गरज नव्हती.

उपनयन सारख्या संस्कारातुन हिदु धर्मात दोन विषमता निर्माण होतात१)वर्ण विषमता- ह्यातुन ब्राम्हण हिंदु व शुद्र हिंदु अशी हिंदुचि विभागणी होते.
२)हिंदु धर्मात मुलिंवर उपनयन संस्कार होत नाहित त्यामुळे होणारी विषमता.

ह्यातुन ब्राम्हण हिंदु व शुद्र हिंदु अशी हिंदुचि विभागणी होते. >> ईतरेजनांनी मुंज/उपनयन विधी केले तर??

धर्माधिष्ठित कुठल्याही संघाचे,समाजाची आपापली गृहितके आहेत.धर्म बेस आला की चांगल्या गोष्टींसोबत त्यातल्या प्रकर्षाने उमटणार्‍या उणिवादेखील आल्या. RSS चे काम सामाजीक असेल तर ते समाजिकच असावे त्यात वैयक्तीक रित्या कोणाला त्रास होणार नाही असे राहावे.संघाच्या कर्यपद्धतीतील उतार चढाव पाहता काही गोष्टी घेण्यासारख्या आणि काही टाकून देण्याजोग्या आहेत.तेव्हा राजहंस व्हावे आणि वागावे.
चिनूक्स प्रतिसाद योग्य वाटला.पगारे घासून घासून झिजलेल्या गोष्टी कशाला काढता.धाग्याच्या विषय व्यवस्थापन विषयाशी मर्यादित आहे.

Pages