मार्ली अन मी, हे पुस्तक मी क्रॉसवर्ड मधे केव्हाच पाहिले होते. तशी बरेचदा काही काही पुस्तके मला खुणावत रहातात, त्यातलेच ते एक होते. अगदी त्याच्या लेखकाविषयी मला काहीही माहीत नसून. नाव सुद्धा ऐकले नव्हते मी त्याचे. अन् हो, त्यावर न्युयॉर्क बेस्ट सेलर चा शिक्का होता, पण त्याचाही काही संबंध नव्हता. कश्शाचा काही संबंध नसताना काही काही पुस्तके मला खुणावत रहातात, घे घे म्हणतात, त्यातलेच होते ते एक. पण जवळ जाऊन बघितले तर एक तर ते "हार्ड बाउंड" होते त्यामुळे किंमतही खूप होती. चटकन मी, घरी पडून असलेल्या अन् न वाचलेल्या पुस्तकांचे गठठेच्या गठठे नजरेसमोर आणले अन् मह्त्प्रयासाने मनावर काबू मिळवला. अर्थातच काही काळ, म्हणजे एखाद् दुसरा महिना गेल्यावर, नेहेमीप्रमाणेच मनाने माझ्यावर विजय मिळवला, अन् आता पेपर बँक आवृत्ती आहे, किंमत कमी आहे इत्यादी इत्यादी स्वतःला ऍकवत घेतले बाई ते एकदाचे विकत ! अगदी अधाशासारखे झडप घालून अन् त्यातल्या जरा ( की चांगल्याच ? ) बारीक अक्षरांकडे काणाडोळा करत. शिवाय या वेळेस एक अजून जबरदस्त कारण होते, ते म्हणजे आमचा "स्पाईक" ! खूप तीव्र लढा देऊन (अजून कोणाशी ? समजून घ्या ना जरा ! ) शेवटी एकदाचे घरात आणलेले बॉक्सर जातीचे कुत्र्याचे पिल्लू. त्याच्या थोडया ( ? ) विध्वंसक प्रवृत्ती बघून अन मार्ली असाच "बँड डॉग " होता हे वाचून मला ते पुस्तक वाचायची खूप उत्सुकता होती.
स्पाईकला आणण्याआधी आम्ही एक रस्त्यावरून उचलून आणलेले मांजराचे पिल्लू पाळले होते. दिसायबिसायला खूप गोंडस होते. पण त्याला फिटस् येत असत. अनेक पशुवैद्यक, सत्राशेसाठ औषधे, हॉस्पिटलच्या वार्या असे खूप काही करूनही ते सुधारले नाहीच. त्यामुळे कुत्रा घेण्याआधी तो अगदी चांगल्या कुलशीलाचा (पेडीग्री ) आहे ना हे बघणे माझ्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. शिवाय बाकी आखूड शिंगी बहुदुधी अशा, म्हणजे किंमत कमी, फार केसाळ नको, अति मोठा होणारा नको असल्या बर्याच मागण्या होत्याच. तशात मुलाने त्याच्या ओळखीतून हे पिल्लू घेऊ या असा प्रस्ताव मांडला. किंमत अगदी
किरकोळ, घराणे चांगले ( "अग आई, त्याचे आईवडिल बघ ना, चँपियन आहेत " ) एवढेच बघून
हो म्हटले. बाकी या जातीच्या कुत्र्यांच्या उपजत सवयी काय, त्यांची काय काय खास काळजी घ्यावी लागते वगैरे मुदद्यांकडे आमची बुद्धी वळलीच नाही. त्यात घरात "एक तर मी या घरात राहीन नाहीतर कुत्रा तरी !" असल्या बाणेदार उद्गारांशी सामना करायचा होताच ना ! मुलाची दृष्टी फक्त " अग आई, तो माझ्याच वाढदिवसादिवशी जन्मलाय, कित्ती छान ना ! " या कडेच होती. यात छान काय ते मला अजूनही समजलेले नाहीच. तर अशा सगळ्या गदारोळात एकदाचा स्पाईक घरी आला. त्याच्या
नावावरून सुद्धा इतकी चर्चा झडली, अन् मोबाईल कंपन्यांचा इतका काही फायदा झाला की शेवटी ठेवा बाई एकदाचे काय हवे ते, असे म्हणून त्याचे नामकरण "स्पाईक" असे केले. "अय्या, तो त्याच्या बास्केटमधे कध्धी शू करत नाही, धडपडत बाहेर येतो" असल्या उद्गारांनी त्याच्या शहाणपणावर शिक्कामोर्तब झाले. हळू हळू मोठे होत होत मात्र तो आपल्या मूळ वळणावर जाऊ लागला. त्याच्या जातीचा, किंवा त्याचा एक स्वभावविशेष म्हणजे अतोनात उत्सुकता. कुठे काय आहे, कशात काय ठेवले आहे , प्रत्येकजण हातात काय घेतो..ते मला हवे, ही वृत्ती. अन् दुसरी गोष्ट म्हणजे अति खेळकरपणा ! प्रत्येक गोष्ट तोंडात धरून धावून धावून सतवायचे अन् पाठलाग करणार्याला हुलकावण्या द्यायच्या. याच उत्सुकते पोटी, दुसर्या मजल्यावरच्या गच्चीत जाऊन खाली काय आहे बघण्याच्या प्रयत्नात या महाशयांनी ( वय वर्षे तीन महिने ) खाली उडी मारली अन् मग पडले दोन दिवस सगळा रागरंग हरवून निपचित,
आमच्या तोंडाचे पाणी पळवून. हसला नाही, बोलला नाही, भुंकला नाही की गुरगुरला नाही. हूं कि चूं नाही. " ताई, हा मुका झाला का हो ? " असा कामवालीचा प्रश्न. दोन दिवसांनी उठून मात्र पहिले पाढे पंचावन्न.
हे सगळे पाहून आपल्याला त्या ईश्वराने कसे निवडून निवडून प्राणी बहाल केलेत असे वाटून, बँड डॉग म्हणजे नक्की काय हे वाचण्यासाठी ते "मार्ली अन् मी" हे पुस्तक घेण्याचा खटाटोप. पुस्तक अतिशय सुंदर आहे. म्हणजे मला तरी अतिशय आवडले. वेगवेगळ्या ठिकाणी त्याची परीक्षणे आली आहेत की कुत्रे पाळणार्यांना, प्राणी आवडणार्यांना आवडेल, पण लेखक म्हणजे जॉन ग्रोगन ची भाषा व शैली इतकी काही सुरेख आहे की मला असे वाटते ते सर्वांनाच आवडेल. अर्थातच तो लेखक एका वृत्तपत्राचा सदरलेखक होता, त्यामुळे शैली , भाषा ही चांगली असणारच. थोडी नर्मविनोदी, किंचित उपरोधिक अशा शैलीमुळे पुस्तक खरंच वाचनीय आहे ( माझ्या मते हं..) आणि जरी ते "मार्ली" या लँब्राडॉर जातीच्या
कुत्र्याबद्दल प्रामुख्याने असले तरी जॉन ग्रोगनच्या आयुष्यातले घडलेले काही प्रसंग, त्याची त्या प्रसंगांकडे बघण्याची वृत्ती, त्यावरची त्याच्या खास शैलीतली टिपण्णी यामुळे ते पुस्तक फक्त आणि फक्त कुत्र्याबद्दल आहे असे मला तरी वाटले नाही. अर्थातच , आता आम्ही एका कुत्र्याचे मालक झाल्याने, खरे तर इथे मला "proud owner" लिहायचे होते पण "proud" हे विशेषण वापरायला मन धजले नाही, या पुस्तकाशी जरा विशेषच नाळ जुळली. माझ्याबरोबर मुलांनीही एका बैठकीत ते वाचून काढले ( जॉन ग्रोगन की जय हो !) 
पिल्लू निवडण्यापासून ते त्याच्या नामकरणापर्यंत, त्याला शू शीच्या सवयी लावण्यापासून ते इतर नियम शिकवण्यापर्यंत आमचे अनुभव अगदी एकाच जातीचे होते. अन् स्पाईक हळूहळू मार्लीच्या पावलावर पाऊल ठेऊन जात असल्याने, या जगात आपण एकटेच नाही अशी सहानुभूतीही मिळत होती. ग्रोगनने मार्लीच्या मोठं होण्यातले काही प्रसंग सुरेख वर्णन केले आहेत, त्यात सोफे फाडणे, वादळ होताना तोडफोड करणे, दागिना गिळून टाकणे ( या प्रसंगाचे वर्णन ग्रोगनने फारच बहारदार रीत्या केले आहे ), हॉटेलमधले टेबल ओढून नेणे इत्यादि प्रसंग आहेत. आमच्या स्पाईकच्या मोठे होण्यामधेही तमाम कुत्रे कुळाला जागून फर्निचर अन् चपला कुरतडणे हे तर आहेच आहे, पण पळवून नेऊन तोडलेल्या वस्तूंच्या यादीत मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, चश्मा, पेन, पेन्सिलींचे बॉक्सेस, तर्हेतर्हेची झाडे, आणि... सर्वात मला लाज वाटायला लावण्यासारखे म्हणजे लायब्ररीतून आणलेली पुस्तके ! आयुष्यात कधीही मला ग्रंथपालांची
क्षमा मागण्याचा प्रसंग आला नव्हता, तो या साहेबांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत बरोब्बर चार वेळा आला. केवढे हे लाजिरवाणे दुर्भाग्य !
ग्रोगनने लिहिलेला मार्लीने टेबल खेचून नेण्याचा प्रसंग, बर्याच वाचकांना अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण
स्पाईकची शक्ती अन जिद्द बघून माझा तरी पूर्ण विश्वास बसला. पूर्वी त्याचा गावठी दोस्त "शिरो" दिसला की अन् अलिकडे त्याचे जन्मजात शत्रू म्हणजे मार्जारकुलोत्पन्न दिसले की त्याला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही रोज फिरायला जातो तेव्हा लोकांना एक फुकटात करमणुकीचे दृश्य असते. रस्सीखेच, आरडाओरड हे बघून लोक चक्क रस्त्यात उभे राहून तमाशा पहातात. एकदा तर एकाने ,( तो एक अन तीन मुले असे चारजण ), स्कूटरवरून जाताना ती थांबवून आमची मज्जा बघितली, वरून काहीतरी ओरडून शेराही मारला. मला ते या धांदलीत नीट ऐकूच न आल्याने संभाव्य अपमानापासून बचाव झाला आपोआप. आमच्या फिरायच्या वाटेवर एका ठिकाणी बरीच मांजरे असतात अन् तिथे आले की
याची नजर एकदम शोधक बनते. तीच गोष्ट उंदीर घुशींची. त्याला तर्ह्तर्हेने सांगून बघितले, " अरे, तुला अजून मुनिसिपालिटीने उंदीर पकडायच्या कामावर नेमलेले नाही, अन् तोवर तुला पगार मिळणार नाही बाळा ", " अरे, माणसाने ( आमच्याकडे माणसात कुत्र्याचा समावेश होतो बरं का ! ) नेहेमी
क्षमाशील असावे, आपल्या शत्रूवर दया करावी...", पण छे, याच्या डोक्यात काही शिरेल तर शपथ ! " आई, कशाला तू त्याला एवढे मुल्याधिष्ठित शि़क्षण देते आहेस ? " - इति कन्यका. अर्थात ती एवढे शुद्ध
मराठीत नाही सांगत. तिच्या बोलण्यात बरेचसे इंग्लिश शब्द मराठीचा थोडा शिडकावा घालून येतात. मात्र "अलिकडची" मराठी भाषा तिला बिनचूक येते " काय ग हे आई, कसली ही चिंधीगिरी करतेस तू ! " किंवा " आई, ढापूगिरी नको हं प्लिझ ! " ..असो, तो एक वेगळाच अन् स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
शेवटी या रोजच्या खेळाला कंटाळून त्याच्या प्रशिक्षकाला यावर उपाय काय, असे विचारल्यावर त्याने सांगितले, बरोबर बिस्किटे न्या अन् ती हळूहळू देत देत त्याचे लक्ष मांजराकडून दुसरीकडे वळवा. समजले ना आता, लाचलुचपतीचा जन्म कसा होतो ते ? अर्थात हे अति हुश्शार श्वानमहाराज, एकाच वेळी दोन्ही साधून घेण्यात प्रवीण झालेले आहेत, बिस्किटेही अन् मांजरांचा पाठलागही !
मात्र एका गोष्टीत स्पाईकने मार्लीवरही कुरघोडी केलीय. तोंडाचा अन् नाकाचाही वापर करून अन् अर्थात हातापायाच्या नखांचाही वापर करून हे श्वान महाशय कपाटे उघडायचा प्रयत्न करतात. अथक
परिश्रमांच्या जोडीला हाती घ्याल ते तडीस न्या, फिरून यत्न करून पहा ही वृत्ती ठेवून, यशस्वीही होतात.
चपलांचे कपाट तर आवडीचे, पण खाऊचे कपाट उघडून लाडूंचा चटटामटटा करायची जादूही
त्याने करून दाखवली आहे. काही दिवस शोकेसमधे , कदाचित आतून फारसे वास न आल्याने
असेल, त्याला विशेष रस नव्हता. पण मग शेवटी मोर्चा वळलाच तिथेही. मुकाटयाने सगळ्या
जिवापाड साठवलेल्या मोलाच्या वस्तू वर उचलून ठेवल्या अन सगळीकडे कुलूप पद्धतीचा
अंगीकार केला.
कुत्र्यांच्या जातीला कलंक लागावा असे त्याचे वर्तन म्हणजे लोणी, तूप, तळलेले पदार्थ अन् गोडधोड
हे विशेष आवडीचे. अन् हो अजून एक सांगायचे म्हणजे, त्याला आणण्याआधीचा लढा तसाच चालू राहिलाय, पण राजकारण्यांनी पक्ष बदलावेत तसे आमच्याकडे पक्ष बदलले गेले. " एक तर मी तरी किंवा कुत्रा तरी" ही घोषणा साफ विसरली गेली. इतके लाड अन् सतत "गरीब बिचारा", असे म्हणण्यापर्यंत हृदयपरिवर्तन घडून आले अन् मला विरुद्ध ( नेहेमी विरुद्धच पक्ष असणार ना, मी तरी काय परत परत लिहितेय असे ! ) प़क्षात जाऊन, " अरे तो तुझे मूल, नातवंडे असे काही नसून आपल्या घरातला कुत्रा आहे फक्त" असे वारंवार सांगायची वेळ आली. "आता याच्यासाठी फक्त डायनिंग टेबल वर स्वतंत्र पान मांडून खुर्ची द्यायची बाकी आहे " हे वाक्य घरात माझ्या तोंडून वरचेवर निघू लागले, एकूणात काय
जीवन हा सततचा संग्राम आहेच. बाकी त्याला सारखे "गरीब बिचारा" असे म्हटले जाते, तेव्हा मला आपले पर्ल बकच्या गुड अर्थ मधली "poor fool" आठवते. पण स्पाईक मात्र तशा अर्थाने मुळीच गरीब नाही हो. चांगलाच हुश्शार ( आपला तो बाब्या, या चालीवर..) अन् बदमाश ( विरुद्ध पक्षीय नेता या भुमिकेतून ) आहे. पण गुणी आहे बिचारा ! ( सतत ऐकून ऐकून हा परिणाम ..)
मार्लीने केलेल्या नासधुशीबद्दल ग्रोगनने बरेच लिहिले आहे, त्यापुढे मात्र स्पाईकची मोडतोड बरीच कमी म्हणावी लागेल. पण एकूणात हिशेब करता, जमीन जशी किंमतीत वाढत जाते, तशी त्याची मूळची किरकोळ किंमत वाढून, ही मोडतोड जमेस धरता बरीच झाली आहे असे म्हणावे लागेल. मला प्रेझेंट आलेले एक सुरेखसे बांबूचे मोठठे वळणावळणाचे झाड त्याने अख्खेच्या अख्खे खाऊन टाकले, अन् दुसर्या दिवशी त्रास होऊन घरभर गरागरा फिरून घर घाण केले. अमूलचे मोठेच्या मोठे पाकीट चूपचाप खाले ओढून निम्म्याहून अधिक चाटून टाकले. केस बांधायचे बँडस् तर कितीतरी गिळंकृत केले.
मार्लीला शिस्त लावण्यासाठी शाळेत दाखल केल्याचे धमाल वर्णन ग्रोगनने केले आहे. आणि न
ऐकण्याबद्दल अन गैरशिस्तीबद्दल त्याला त्या शाळेतून कसे हाकलून दिले जाते, त्याचंही मस्त वर्णन दिले आहे. आपल्याकडे अशा काही शाळाच नसल्याने आम्ही सहीसलामत बचावलो आहोत. पण स्पाईकसाठी प्रशिक्षक ठेवूनही काही फारसा फायदा झालेला नाहे. "तो ऐकत नाही, सतत खोडया करतो " वगैरे तक्रारी आम्ही त्याच्याकडे केल्या की आमच्यावर "तुम्हीच त्याला फार लाडावून ठेवले आहे" असा आरोप होतो. शिवाय अशा खोडया काढणे अन् अति सळसळता उत्साह हा बॉक्सरचा जन्मजात गुण आहे असेही आम्हाला सांगितले जाते. अगदी ग्रोगनने म्हटल्याप्रमाणे आमची कुत्र्याची निवड ही " non research based " असल्याने आम्ही अळी मिळी गुप चिळी करून बसतो बापडे ! त्याचा पशुवैद्यही त्याला " live wire" या विशेषणानेच संबोधतो.
परवाच येऊन मुलीने मला म्हटले की " आई, लोक रस्त्यात मला एकदा धरून मारणार आहेत."
" का ग बाई ? " असे विचारल्यावर ती म्हणते " अग, हा बघ ना, बस स्टॉपवर बसलेल्या (
अलिकडचे नवीन बस स्टॉप बघितलेत ना, मस्त बसायला जागा वगैरे आहे ) लोकांच्या पार्श्वभागाजवळ जाऊन वास घेतो. कित्ती खेचले तरी येत नाही पटकन ! " जोरात खेचावे तर अजून जोरात पळून तो तिला मस्तपैकी पाडतो अन ती उठेपर्यंत मात्र स्वतः शांत उभा रहातो. तेवढी तरी अक्कल आहे म्हणायची दिलेली देवाने ! कसे कोणास ठाऊक, त्याला घरातली मुले कोण, मोठी माणसे कोण हे बरोब्बर समजते, अन् कोणाबरोबर किती मस्ती करावी याचे उपजतच ज्ञान आहे त्याला.
"मार्ली अँड मी" , हे पुस्तक अगदी अथपासून इतिपर्यंत म्हणजे मार्लीला आणण्यापासून ते
थेट त्याच्या करूण अंतापर्यंत असल्याने बर्यापैकी मोठे आहे. अतिशय आजारी झाल्याने, मार्लीला शेवटी दयामृत्यु द्यावा लागतो. हे बर्याच जणांना न पटून ग्रोगनवर सडकून टीकास्त्रही सोडले गेलेले आहे. पण बरे-वाईट, चूक-बरोबर या वादात न पडता, ग्रोगनच्या भावना समजून घेऊन हे पुस्तक वाचले तर ते सुंदरच आहे यात शंका नाही. आता त्यावर चित्रपटही येतोच आहे.
स्पाईक आत्ताशी कुठे जेमतेम दोन वर्षांचा झालाय. अजून तर बरीच मस्ती करायची बाकी आहे त्याची ! 
मस्त
मस्त लिहिलंय ललित. आवडलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
छान
छान लिहिलंय.
आपले फॅमिली मेंबरच असतात ते!
या पुस्तकावर नुकताच सिनेमाही निघालाय. 'मार्ली अँड मी' नावाचा. खास नाही असं ऐकलं पण सगळ्या die hard canine lovers ना आवडेलच.
मस्तच.
मस्तच. आवडला लेख. तुमच्या पिल्लाचे फोटोपण टाका इथे.
वा काय
वा काय मस्त लिहीलंय!! मार्ली अँड मी पिक्चरही छान असेल असं वाट्त होतं.. पुस्तकाबद्द्ल ऐकले नव्हते... आता नक्की वाचेन..
एकीकडे मार्ली आणि एकीकडे स्पाईक , आयडीआ आवडली एकदम!!
आवडलं.
आवडलं.
मार्ली अँड
मार्ली अँड मी म्हणजे जेनिफर ऍनिस्टन असलेला ना?
छान
छान लिहिलेय. खरे तर माझा ही अतीशय आवडता प्राणी(प्राणी म्हणने जीवाअव्र येतं). पण वरील वाचून अशीच उत्सुक्ता, तुमचा स्पाइक तूप, लोणी खातो? ते त्यांच्या पोटाला बाधत नाही?
लहानपणी सवय लागली का? त्यांच्या आतड्यांना त्रास होतो मोठेपणी. तेव्हा जपून. फुकटचा सल्ला वाटेल तेव्हा सॉरी.
छान
छान लिहिलंय ...
मजा आली वाचताना....
छान
छान
वा! छान
वा! छान लिहिलंय.
पाळीव प्राणी आणि मी हे समीकरण या जन्मी तरी जुळणारं नाही ... पण हे वाचायला छान वाटलं.
त्या पुस्तकाबद्दलही माहिती नव्हतं. कदाचित क्रॉसवर्ड मध्ये पाहिलंही असेल कधीतरी पण पुन्हा तेच ना - पाळीव प्राणी आणि मी... !!! त्यामुळे फारसं लक्ष गेलं नसेल
~~~
पकाक पॅक पॅक पॅक पॅक
उमा तुझ्या
उमा
तुझ्या नावातच माऊ आहे! सुंदर लिहिलयंस!. फोटो टाक ना.
मी लिहिलेला बोक्या मनी आणि मॉस्किटो नेट वाचलंस का?
छान आहे.
छान आहे.
पाळीव प्राणी म्हणजे जीव की प्राण.. पण त्यांच आयुष्य आपल्यापेक्षा कमी त्यामुळे होणर दु:ख सहन नाही होत मला. आत्याकडचे ४ कुत्रे मरताना पाहिलेत मी. 
लेख छान आहे!
छान दिसतोय
छान दिसतोय स्पाईक! चेहर्यावरुन एकदम शहाणा मुलगा वाटतोय.
त्या उशांमधला कापूस बाहेर आला की नाही अजून?
>>> छान
>>> छान दिसतोय स्पाईक! चेहर्यावरुन एकदम शहाणा मुलगा वाटतोय. <<<< अगदी सहमत!! उगाच नाव सांगता हा तुम्ही!!
कसला क्युट
कसला क्युट आहे !! पिल्लू स्पाईक तर अगदी गोडूला आहे!
कसल गोंडुल
कसल गोंडुल आहे तुमचे भु भु!
मस्त लेख..
मस्त लेख.. मीनाताईंसारखी लेखमाला लिहा की.. आवडेल वाचायला..
भूभू माझा सर्वात आवडता प्राणी..
मस्तच ग...
मस्तच ग... फोटोज कसले मस्त आहेत.
छान लिहिल आहेस.
आमच्या ऑफिसच्या इथे वॉचमन काकांचं एक कुत्र्याचं पिल्लु आहे,, त्याच्यशी इतकी मैत्री झालीये, की सारख येता जता, दुपारच्या वेळेत त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नाही.. आणि आम्हाला पाहील्यावर, शेपुट हलवत हलवत येतो आपला.. खुप छान वाटतं.
------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
छान
छान लिहिलय... मलाही कुत्रा आवडतो... पण मी विरोधीपक्षात!! पाठींबा नाही कुणाचा... लहानपणी आई आणि आत्ता बायको यांच राज्य!
मलाही हे पुस्तक वाचायला आवडेल.
हा बॉक्सर म्हणजे बुलडॉगचा भाऊ वाटतोय. विकी मधे लिहिलय, Boxers are friendly, lively companions that are popular as family dogs.As puppies, Boxers demonstrate a fascinating combination of worrisome expressions, energetic curiosity, flexible attention spans and charming characteristics.
माझ्या चुलत भावाने लाब्रेडोरचे पिल्लु आणले होते, मोठ्या माणसायेवढे जेवायचे ते... खेळायला तर येवढा उत्साह की आपल्यालाच भिती वाटावी... शेवटी दुसर्याला देउन टाकावे लागले.
कसला मस्त दिसतोय हा स्पाईक
कसला मस्त दिसतोय हा स्पाईक आणि चेहर्यावरुन एकदम गुणी बाळ वाटतोय. उगाच आपलं कशाला नाव ठेवायची त्याला!
मस्त लिहिलयस.
मस्त लिहिलयस.
छान लिहिलंय. खरंच तुमचा
छान लिहिलंय. खरंच तुमचा स्पाईक फोटोत अगदी गुणी बाळ दिसतंय (दिसतं तसं नसतं बर्याचदा हे माहितीये). सगळ्या श्वानप्रेमींनी '10 Promises to my dog ' हा जपानी पिक्चरही नक्की बघा.
माझ्या सासरीही दोन कुत्रे आहेत, त्यातल्या एकाचा अगदी फेसबुक अकाऊंटही आहे. आता बोला.
आईग्ग....कसला गोडु आहे तुमचा
आईग्ग....कसला गोडु आहे तुमचा स्पाईक !
त्यातल्या एकाचा अगदी फेसबुक अकाऊंटही आहे. >> आडो,
>>त्यातल्या एकाचा अगदी फेसबुक
>>त्यातल्या एकाचा अगदी फेसबुक अकाऊंटही आहे >>
कसलं क्यूट!
म.मा. वाचलच नव्हतं हे. मस्त
म.मा.
वाचलच नव्हतं हे. मस्त आहे स्पाईक.
फुडच्या येळंला नक्की कॉन्टॅक्ट करतू.
मस्तं लिहीले आहे. स्पाईक
मस्तं लिहीले आहे. स्पाईक मस्तंच. शब्दच नाहीत सांगायला. खूप सुंदर.
मार्ली अन मी
हल्ली वाचणे होतच नाही ही तक्रार असताना या लेखामुळे वाचावंसं वाटू लागलंय. मिळवून वाचणार. धन्यवाद.
आणि "हे पण पहा" या उपक्रमाचेही आभार. नाहीतर हा लेख माहिती झाला नसता.
मउमाऊ च्या घरी कुत्रा...
मउमाऊ च्या घरी कुत्रा... हाहाहा...
खुप छान लिहिलयं.. पुस्तक मिळवून वाचणार नक्की..