फाटक ३

Submitted by घायल on 21 November, 2015 - 07:26

मागील भागासाठी येथे क्लिक करा

"आत येऊ का "
" या या , मिसेस कागाळे !"
" मुद्यालाच हात घाला इन्स्पेक्टर साहेब !"
" हं , काय घेणार चहा , कॉफी ? "
" नाही नको, धाकधुक होतेय हो. "
" गायकवाड, चहा वाल्याला आवाज दे, स्पेशल सांग दोन "
" अहो, खरंच नको हो "
" लांबून आला आहात. थेट इकडेच. तुमची अवस्था कळतेय मलाही. तुमच्या निमित्ताने माझाही चहा होऊन जाईल. जरा रिलॅक्स व्हा !"
" कालपासून जिवात जीव नाही. लवकर सांगा प्लीज "
" विशेष असं काही नाही. कुठून सुरूवात करू ? "

" तुमचे बाबा डायरी लिहायचे याची कल्पना आहे का ?"
" पूर्वी लिहीत होते. आताची कल्पना नाही. ब-याच वर्षांपूर्वी सवय सुटली होती "
" ही डायरी सापडलीय. चहा येईपर्यंत वाचा "
....................................................................

" वाचलीत ? चहा घ्या "
" काहीच कळालं नाही यावरून"
" नाही कसं ? अपघाताची केस आहे, आमच्या रेकॉर्डला तसं काहीच दिसत नाही "
" कुठला अपघात ?"
" डायरी प्रमाणे पाहीलं तर बारा वर्षे झालीत. इथे त्या वेळी गोडबोले होते. त्यांनी स्टेशन डायरीला कसलीच नोंद केलेली नाही "
" तुम्ही कुठल्या अपघाताबद्दल बोलताय ?"
" असं काय करता ? तुमच्या आईच्या लिफ्टच्या अपघाताबद्दल. तुम्ही आला होतात ना ?"
" माझी आई लहानपणीच गेली "
" मग या बाबांच्या दुस-या पत्नी का ? "
" दुसरी पत्नी ? आणि मला कसं माहीत नाही ?"
" हे काय, अगदी लग्नापूर्वीचं नाव सुद्धा दिलंय. ऋता पटवर्धन म्हणून उल्लेख आहे ."
" अहो, मला कसं माहीत नाही मग ! "
" तुम्ही शेवटच्या कधी आलेल्या इथे ?"
"बारा वर्षांपुवी !"
" मग बरोबर जुळताहेत डिटेल्स !"
" अहो, पण काहीही काय ?"
" हे पहा मिसेस कागाळे. तुम्ही आम्हाला सहकार्य करावं हेच तुमच्या हिताचं राहील "
" एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अशी माहीती विचारताय, जी सांगणे माझ्या आवाक्यापलिकडील आहे. अहो कसलं दुसरं लग्न घेऊन बसलात ? दुसरी आई असती तर कुणीतरी सांगेल ना तिच्याबद्दल "
" त्यांच्याकडे कुणी येत जातच नाही, तर कोण पाहणार ? पाण्याच्या टाकीच्या इथला राम खंडाळे येतो रोज. त्यालाही काही माहीती नाही."
" इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते की त्यांचं कुठल्याही बाईशी लग्न वगैरे झालेलं नव्हतं. माझी आई गेल्यानंतर ते एकटेच राहीलेत. माझं लग्न करून दिलं, तोवर दुसरं लग्न करावं असं त्यांच्या मनात सुद्धा आलेलं नाही "
" पण मग हा अपघात ?"
" कसं शक्य आहे ?"
" मिसेस कागाळे ! अपघात झालाय कि नाही हे मी शोधून काढणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ नका "
" माफ करा इन्स्पेक्टर साहेब, मला वकीलाचा सल्ला घ्यावा लागेल. मी एक गृहीणी आहे. माझं घर सोडून अशी अनिश्चित काळासाठी दुस-या गावात नाही राहू शकत. त्यातून न झालेल्या अपघातासाठी तर नाहीच नाही. असा कुठला अपघात झाला होता याचा या डायरीव्यतिरिक्त काही पुरावा आहे का तुमच्याकडे ?"
" ठीक आहे ! तुमची मर्जी ! कायदेशीर बाबी पूर्ण करून केस रिओपन केल्यावर तुमच्याकडे सहकार्य नाकारण्याला कारण उरणार नाही , हे लक्षात असू द्या. डायरी हा पुरावाच आहे मिसेस कागाळे "
" येते मी "

मिसेस कागाळे गेल्यावर इन्स्पेक्टर कागलकर किती तरी वेळ बसून राहीले होते.
इथे येऊन सहा महीने होते आले होते. तसं फारसं काही घडत नव्हतंच या शहरात. त्यातून त्यांची चौकी ज्या बाजूला होती तिथे वस्ती तुरळक होती. दहा पंधरा दिवसातच ब-याच ओळखी झाल्या होत्या. रहायला स्वस्तात चांगली जागा मिळाल्याने कागलकर खूष होते.
कमी वस्तीच्या गावात सरकारी अधिका-यांना मान असतो, आणि पोलीस अधिकारी असेल तर बघायलाच नको. पण अशा ठिकाणी पोस्टींग घ्यायला तेच नाखूष असतात. कागलकर अपवाद होते. त्यांनाही अशी निवांत पोस्टींग हवीच होती. प्रामाणिक माणसाला काय कुठलीही अडचण नसते.

काम काय असतं हे लगेचच ध्यानात आलं होतं. त्यामुळे जुने तंटे सोडवणे, नगरपालिकेच्या जागेवर असलेले ताबे सोडवणे ही कामं करूनही काम काही निघेना. त्यामुळं हुंड्याच्या तक्रारीच्या केसेस, पूर्वी लिहून दिलेल्या लेखी हम्या आणि ज्येष्ठांची सुरक्षितता ही कामं त्यांनी हातात घेतली होती.

दोन वेळच्या जेवणासाठी मेसच्या ऐवजी राम खंडाळेचा डबा मागवा असं सुचवल्यावरून त्यांनी डबा सुरू केला होता. त्याच्याकडूनच गावाबाहेरच्या टेकडीवरच्या बंगलीतल्या या एकाकी वृद्धाबद्दलची माहीती कळत गेली. थोडी उत्सुकता आणि थोडी कर्तव्यभावना यातून बंगलीला भेट द्यावी असं त्यांना वाटू लागलं होतं. एक दिवस गायकवाड ला घेऊन मोटरसायकलवरून ते बंगलीकडे निघाले.

श्री. इशान गदगकर !
मोडकळीला आलेल्या पाटीशी ते थबकले़

( क्रमशः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

रश्मीजी, स्वस्तिजी, मेंढकाजी आपण वाचताय हे कळवल्याबद्दल आपले आभार.
रश्मीजी... वेळ लागतो अशा कथांना. शिवाय लिहीण्याचा वेग पण आहेच. आपण वाचताय हे कळवल्याबद्दल आपले.. बघूयात !

कथानक मस्त वाटले! एकंदरीत सुरुवात झकास … पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

(पात्रांच्या नावाचा विचार करता मला वेगळेच काही वाटले Proud )

तिनही भाग सुंदर.. उत्सुकता वाढवणारे आहेत.. सो प्लीज पुढचे भागही लौकर टाका, आम्ही वाट पाहत आहोत.

"कथा फाटक गूढ कथा" नावाचा ग्रुप बनलाय ज्यात १ व ३ क्रमांकाचे भाग आलेत. "फाटक गूढ कथा" नावाचा दुसरा बनलाय ज्यात दुसरा भाग आलाय. सगळे एकाच ग्रुपमधे करता का शब्दखुणा?
छान चाललीय कथा. दुसर्‍या भागात बायकोच्या वेळी मुलगी स्वतः आली नव्हती असं सुरुवातीला लिहीलय आणि नंतर ती व जावई आले होते असं लिहीलय. तिथे काही चूक झाली असावी असं वाटलं होतं पण हा भाग वाचताना ती चूक नसावी असं वाटतय.