आधुनिक सीता - ३२

Submitted by वेल on 28 July, 2015 - 10:03

भाग ३१ - http://www.maayboli.com/node/52689

****************************************************

मी काय करायचं? फातिमा म्हणते तसं करायचं की आणखी काही वेगळं. पुन्हा एकदा मी इकडे आड आणि तिकडे विहीर अशा स्थितीत सापडले होते, फातिमा म्हणते तसं करावं तर खोटं बोलण्याची परिसीमा होती ती आणि ते खोटं सुद्धा कोणाबद्दल स्वतःबद्दल. आणि तेही काय तर मानसशास्त्राची विद्यार्थिनी असणारी मी इतरांच काऊन्सेलिंग करणारी मी, मी स्वतःच मानसिक आजाराने त्रासलेली आहे असे सांगायचे? भिंतीवर डोके आपटून स्वतःचे डोके फोडून घ्यावे असे वाटत होते मला. बसल्या जागी मला हमसाहमशी रडू लागले. मला तसे रडताना पाहून फातिमा माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारून माझ्यासोबत तीही रडू लागली.

"सरीता, मला माफ कर तुला इथे ठेवून घेण्याच्या मूर्ख निर्णयात मीही सहभागी होते. मला माफ कर. मी पूर्ण प्रयत्न करेन तुला मदत करण्याचा इथून परत पाठवण्याचा, पण तू जर काही उलटसुलट बोललीस तर तू, मी, माझा भाऊ, रफिक आणि तिथे सागर सगळ्यांनाच प्रॉब्लेम होईल. मी तुला जे सांगितलं तसं बोललीस तर तुला त्रास होणार नाही हे पाहाण्याची जबाबदारी माझी. पण मला मदत कर."

त्या रात्री फातिमा तिथेच मला सोबत म्हणून झोपली.

दुसर्‍या दिवशी फातिमाने सांगितल्याप्रमाणे काही अधिकारी मला भेटले. त्यावेळी मात्र रफिक, फातिमा आणि हॉस्पिटलचे लोक ह्यांना येऊ दिले नव्हते. त्या अधिकार्‍यांनी स्वतःची ओळख मलाकरून देली. त्यांमध्ये काही स्त्रियादेखील होत्या आणि भारतीय वकिलातीचा एक अधिकारीही होता. मला वाटत होते त्याचे पाय धरून सत्य काय ते त्याला सांगावे. पण फातिमाने मला घातलेल्या भीतीमुळे मी तसे काही बोलू शकले नाही. फक्त सर्वात शेवटी मी हात जोडून त्याच्याकडे बघून त्याला मराठीत सांगितले. "मला परत जायचय माझ्या आईबाबांकडे" त्याला समजले की नाही कळले नाही.

त्या मिटिंगमधून बाहेर आल्यावर मला बाहेर जेनी भेटली. तिने मला पुन्हा एकदा हॉस्पिटलच्याच खोलीत नेले. परंतु ती माझ्याबरोबर काहीच बोलली नाही. खोलीत माझ्या आणि तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. बर्‍याच वेळाने रफिक आणि फातिमा एकत्र माझ्या खोलीत आले. मला तर रफिकचे तोंड पाहाण्याचीही इच्छा नव्हती. मी फातिमालाच विचारले, "काय झाले?"

"सौदी अधिकार्‍यांची आणि तुमच्या भारतीय वकिलातीच्या लोकांची मिटिंग चालू आहे. अजून काही कळले नाही. दुर्दैवाने ह्या मिटिंगमधली कोणतीही व्यक्ती आमच्या इन्फ्लुएन्समधली नव्हती. त्यामुळे तिथे तू काय बोललीस किंवा त्या अधिकार्‍यांचे काय म्हणणे पडले हे आम्हाला अजूनही कळले नाही." फातिमाने उत्तर दिले.

फातिमाचे हे वाक्य संपते न संपते तोच रफिक माझ्या अंगावर धावून आला. "तू जर काही कमी जास्त बोलली असलीस आणि त्यामुळे मी जर अडकलो ना तर मी तुला सोडणार नाही. तू सुटलीस तरी मी तुला आणि तुझ्या त्या सागरला अस्सा अडकवेन ना की.." फातिमाने त्याला हाताला धरून मागे खेचले. आणि ती त्याच्याबरोबर काही तरी बोलू लागली. तिचा बोलण्याचा आवाज जरी हळू असला तरी तिच्या चेहर्‍यावरचा कठोरपणा लपत नव्हता. मला तिची भाषा कळत नसूनही ती कडक शब्दात रफिकशी बोलत असावी असे वाटत होते. तिचे बोलणे संपले तसे रफिक त्या खोलीतून बाहेर निघून गेला.

"फातिमा तू म्हणालीस तसंच बोलले मी. आता काहीतरी कर आणि परत पाठव मला. मला तसं सुद्धा इथे राहायचं नव्हतं. इथून सुटका नाही हे समजल्यावर मी तडजोड करायचा प्रयत्न केला. पूर्ण मनापासून केला. पण मला हे असलं अडकवून ठेवणारं, सतत कसली ना कसली भीती घेऊन राहायला लावणारं आयुष्य नकोय. मी इथे एखाद्या गुलामासारखं वाईट आयुष्य जगतेय. मी काय असा गुन्हा केली होती की मला इथे अडकून राहावं लागलय. मी काय वाईट केलं होतं तुझं आणि तुझ्या नवर्‍याचं."

"तू एकच चूक केलीस. लग्न करून इथे आलीस आणि रफिकच्या नजरेला पडलीस. मी सागरला सांगितलं होतं तुझ्या बायकोला इथे आणू नको. ती रफिकच्या प्रेयसीसारखी दिसते. रफिकचं डोकं कधी फिरेल माहित नाही. रफिकला काय इतर कोणालाही तुझा फोटो दाखवायला बंदी केली होती मी सागरला. तेवढं मात्र त्याने ऐकलं पण ह्या बाबतीत त्याने का नाही ऐकलं माहित नाही. आणि तूसुद्धा एवढी शिकलेली मुलगी सौदी सारख्या देशात कशाला आलीस. तेही तुला माहित असताना की रफिकची प्रेयसी तुझ्यासारखी दिसते."

"तू सागरला सांगितलं होतस? आणि तुला कसं माहित की मला माहित आहे रफिकच्या प्रेयसीबद्दल"

"सागर माझ्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचा ना? माझा भाऊ, मी आणि सागर आम्ही हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या निमित्ताने अनेक वेळा भेटायचो. मित्रासारख्या गप्पा मारायचो. रफिकला जितक्या वेळा सागर नसेल भेटला तेवढ्या वेळा तो मला भेटला होता. तेव्हा सागरने तुझा फोटो दाखवला होता. तेव्हाच मी त्याला सांगितलं तुला इथे आणू नकोस हेही सांगितलं रफिक खूप विचित्र वागतो कधी कधी. पण सागरला पटलं नाही. मग मी सुद्धा तेच तेच किती वेळा सांगणार."

मला एकदम रडूच फुटलं. खरच का सागरने मला जाणून बुजून इथे आणलं होतं. त्यानेच तर नसेल रफिकला सांगितलं की मी परत जायचा विचार करतेय. त्याने खरच मला विकलं नसेल ना रफिकला.

"फातिमा तुला असं म्हणायचं आहे का सागरने मला मुद्दाम इथे आणलं. रफिकच्या जाळ्यात मी अडकावं आणि त्याला पैसे मिळावे म्हणून."

"रफिक विचित्र वागू शकतो ही कल्पना मी सागरला दिली असताना तो असं का वागला. हा प्रश्न ह्या पूर्वी कधी विचारला असतास तर मी तुला संगितलं असतं मला माहित नाही. पण मला आता कंटाळा आला आहे खोटं बोलायचा आणि खोटं वागायचा." असे म्हणून फातिमाने एक पॉझ घेतला. आणि ती पुढे बोलू लागली.

"सागर तसा मनाने वाईट नव्हता. पण थोडासा"

क्रमशः

पुढील भाग http://www.maayboli.com/node/55393

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई. | 28 July, 2015 - 07:52 नवीन
अरे आता सागरने काय केले असावे याची उत्सुकता लागली आहे

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
जाई, पण फातिमा तरी खरे बोलतेय कशावरुन?

फातिमा सौदी विवाहित महिला आहे ना? ती सागरसारख्या पर पुरूषाला रफिक अथवा इतर कुणी नसताना भेटू शकते??? नक्की कुठल्या सौदीमध्ये हे कथानक घडतंय??

फातिमा सौदी विवाहित महिला आहे ना? ती सागरसारख्या पर पुरूषाला रफिक अथवा इतर कुणी नसताना भेटू शकते??? नक्की कुठल्या सौदीमध्ये हे कथानक घडतंय?? +++++११११११

सुरवातीला ही कथा मी खूप आवडीने वाचायचे. पुढचा भाग बघुन छान वाटल पण खरतर बर्याच छोट्या छोट्या गोष्टी मी आता विसरले आहे Sad त्यामुळे नीट संगती लागत नाहीये.

ह्याला काय अर्थ आहे? काल रात्री भाग येनार होता. पुढील भाग २०१६ मध्ये टाकण्यात येईल... वाट पहा++++१००

अहो याकुब मेमनच्या बातमीला फॉलो करण्यात रात्र गेले तुम्ही कथेच काय घेउन बसलात

असो. लेखन चालू आहे. लवकरच पुढचा भाग येइल.

वेल, तुझा पाठ्लाग कोणि सोड्णार नाही हि कथा संपे पर्यंत.छान भाग पुढच्या भागांच्या प्रतीक्शेत.

Pages