ईस्ट युरोप - ऑश्वीझ एक भयानक अनुभव भाग- ४

Submitted by मोहन की मीरा on 7 June, 2015 - 02:40

भाग ३= http://www.maayboli.com/node/54122

ह्या ट्रीप ला जायचे ठरवले तेंव्हाच ऑश्विझ हा नाझींचा ज्यू कत्तल खाना पहायचा आहे, हे माहिती होतं. त्या बद्दल अनेक ठिकाणी वाचलं होत. शिंडलर्स लिस्ट, लाईफ इज ब्युटीफुल सारख्या सिनेमां मधून पाहिलं होत. तरीही एक अनामिक रुख रुख मनाला लागली होती. आपण तिकडे का जातोय? हा प्रष्ण पण मनात येत होता. खरच का गेले मी तिकडे?

उत्तर एकच, ते मला पहायचे होते. का? कारण तो एक काळा इतिहास आहे. घडून गेलेला. आपल्या सुदैवाने आपल्याला त्याची जराशीही झळ लागली नाही. आपल्यावर आपल्या दुर्दैवाने इंग्रजांनी राज्य केले. ते स्वत: दुसऱ्या महायुद्धात सक्रीय होते. आपले अनेक सैनिक अनेक आघाड्यांवर दोस्तांच्या बाजूने लढायला होते, आपल्या कडे ही अनेक लोकांचे शिरकाण इंग्रजांच्या राज्यात झाली. पण मास किलिंगच्या एखाद दुसऱ्या (जालियान वाला बाग) घटना सोडता, आपल्या नशिबी तसे सभ्य शासाकच आले. मला वाटते मानव जातीच्या इतिहासात एवढ्या प्रमाणावर माणसे मारण्याचा कुविक्रम फक्त आणि फक्त नाझीम्च्या नावावर असेल. शिंडलर्स लिस्ट सिनेमात एक दृश्य आहे, की कॅम्प चा मुख्य सकाळी उठतो आणि बाहेर गेलारी मध्ये येवून आळस झटकतो. सहज म्हणून तो बंदूक डोळ्याला लावतो व खालून चाललेल्या एका ज्यू प्रिझनर वर गोळी चालवतो. उगाच, मजा म्हणून, मरगळ झटकायला !!!! हा प्रसंग अतिशय केज्युअली चित्रित करण्यात आला आहे. तरी तो अंगावर येतो. अशीच त्यावेळेस माणसे मारली गेली. का?.....का?.... उत्तर कोणाही कडे नाही.

हिटलर अतिशय सद्वर्तनी होता. शाकाहारी होता, स्त्री दाक्षिण्य असणारा होता, काटकसरी, मद्यपान न करणारा, शेवटच्या १५ वर्षात इव्हा ब्राऊन सोडून एकाही स्त्री कडे न पहाणारा, उत्तम प्रशासक, जर्मनीला पहिल्या महायुद्धाच्या अपमानित परिस्थितीतून वर काढत तंत्रज्ञानाच्या वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवणारा. पण त्याचं बरोबर कमालीचा हेकट, तापट, टोकाची भूमिका असणारा, स्वत: बद्दल फाजील कल्पना असणारा, एककल्ली, क्रूर सुध्धा होता. त्याने जर ज्यू व इतरांच्या शिराकाणाची आज्ञा दिली नसती तर आज तो एक यशस्वी राज्य करता म्हणून ओळखला गेला असता. नाण्याला नेहेमी दोन बाजू असतात हे खरे, पण इकडे त्या काळ्या बाजूने करोडो लोकांचे प्राण घेतले. हकनाक बळी घेतले.

ज्यु लोकान्चा बरेच धर्म राग करतात. क्रिश्चन्स त्यांचा राग करतात, की त्यांनी येशू क्रीस्ताला कृसिफाय केले. मुसलमान त्यांचा राग करतात कारण दोन्ही धर्म एकाच जागे वर हक्क सांगतात. हिटलर चा हा ज्यू द्वेष एवढा टोकाचा का? ह्याचे मुळ युरोप च्या अर्थ कारणात आहे !!!! त्यावेळेस ज्यू समाजाच्या हातात अनेक उद्योग धंद्याची नाडी होती. मुळातच हे सावकार लोक. त्याच बरोबर व्यापारात डोके चालणारे. रिटेल उद्योगाच्या नाड्या आपल्या हातात असणारे. त्याचं मुळे पैसा बाळगून असणारे. आर्थिक दृष्ट्या मजबूत व एकमेकान्ना धरून असणारे. पहिल्या महायुद्धा नंतर आलेल्या मंदी मध्ये हा समाज त्यांच्या ह्या वैशिष्ट्या मुळे तरुन गेला. तोच इतर समाज मात्र पोळला गेला. त्यामुळे हा ज्यू द्वेष मुळातच ह्या लोकांत होताच. हिटलर ने त्यांचे भांडवल केले. लोकप्रियता मिळवण्या साठी केलेल्या घोषणांचे नंतर ओझे झाले. मग जगाला त्यांच्यावर केलेलं अत्याचार कळू नयेत म्हणून मग गुपचूप पण अतिशय planning ने त्यांना मारायला सुरुवात केली. युद्ध हरतोय अशी जाणीव झाल्यावर तर अजून जोमाने मारायला सुरुवात केली.

माझ्या परीने मी ह्या मानसिकतेचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. ह्या विषयावर अजून चर्चा अपेक्षित आहे. माझा दृष्टीकोन चुकतही असेल. माबो वरील जाणत्या लोकांनी प्रकाश टाकावा.

तरीही तो जे एक प्रश्न होता “का? कशासाठी” हा प्रश्न तिकडे जाऊन आल्यावर मनात अजूनच नाचायला लागला आहे. बर> हे खूप सहज झालं आहे का... की बाबा भावनेच्या भरात केला एखादा अपराध..... आणि झाला पश्चाताप.... पण नाही... खूप विचारपूर्वक, प्रचंड डोके लावून, नीर निराळ्या पद्धतीने, अभ्यास पूर्ण रीत्या ही गोष्ट घडवून आणण्यात आली. आणले ज्यू...घातल्या त्यांना गोळ्या..... दिसला ज्यू उडवलं त्याचं मुंडकं..... असे असते तर ते युद्ध ह्या नावाखाली खपले असते. पण इकडे पद्धतशीर रीत्या, त्या जीवांना कसे मारायचे, कसा आरडाओरडा होवू द्यायचा नाही, जगाला कळू द्यायचे नाही, आड जागा शोधून, त्यातही त्यांच्या शरीराच्या प्रत्येक गोष्टीचा कसा उपयोग होईल, ह्याचा विचार करून हे काम केलेले आहे. म्हणजे सहज नाही, तर खूप बुद्धीचे हे काम आहे. माणसे कशी मारायची ह्यावर अनेक संशोधक, डॉक्टर्स, इन्जिनीअर्स विचार करायचे. नव्या नव्या क्लुप्त्या काढायचे.

साधारण इकडे असा “प्रोसेस” ( एकदम प्रोडक्शन हाउस सारखे वाटते ना.... पण हा खरो खरीच माणसांना मारायचा कारखाना होता) होता, की ट्रेन, रोड, ने लोकं इकडे आणली जायची. एका wagan मध्ये जिकडे जेम तेम ५० जण मावू शकायचे त्यात 400-४५० लोक भरून आणले जायचे. कधी हा प्रवास काही तासांचा असे, तर कधी कधी आठवड्यांचा. न खाता न पिता एकामेकांच्या अंगावर कोंबून बसल्याने व शारीरिक विधी ही एकमेकांच्या अंगावर झाल्याने, दुर्गंधी, घाण व कोंडून बरेच लोक प्रवासातच मरायचे. जे उरायचे त्यांना ऑश्विझ व बर्कानाऊ सारख्या रम्य ठिकाणी आणल्यावर बरे वाटायचे. ह्या लोकाना आणताना तुम्हाला कामाला नेत आहोत हेच सांगितले जायचे. स्टेशन वर उतरल्यावर त्यांच्या रांगा लावायचे. त्यात १५ वर्षां खालील मुले व स्त्रिया ह्यांची एक रांग, व पुरुषांची दुसरी रांग. पैकी मुले व त्यांच्या आया ह्यांना सरळ सरळ gas चेम्बर मध्ये नेले जायचे. तिकडे जागा नसेल, वा खूप रांग असेल तर एक दोन दिवसात नेले जायचे. मुले व त्यांच्या आया एकत्र का, तर आई पासून तोडले तर पोर व आया गोंधळ घालीत म्हणून. gas चेम्बर मध्ये नेताना त्यांना सांगत की तुम्हाला प्रवासात जे इन्फेक्शन झाले आहे ते काढण्या साठी आंघोळ घालायची आहे. म्हणजे मग तुम्हाला काम देता येईल. मग कपडे काढून, बायकांच्या डोक्या वरचे लांब केस काढून , आत त्यांच्यावर शोवार्स सोडत असत. ह्या शोवार्स मध्ये झायाक्लोन बी हे पोयझन मिसळलेलं असे. हा शोवर अंगावर पडून साधारण पणे गुदमरून २० मिनिटात मृत्यू यायचा. आधी ते अशा ज्यू ना गोळ्या घालत. पण नंतर गोळ्या कशाला फुकट घालवायच्या? असा “ सुज्ञ” विचार करून त्यांनी हा मास किलिंगचा प्रकार शोधून काढला. ही माणसे मेल्यावर त्यांची प्रेत ओव्हन ( म्हणजे विद्युत दाहिनी) मध्ये घालून त्याची राख करत असत.

जे पुरुष व स्त्रिया शरीराने मजबूत असत त्यांना कामांसाठी वेगळं काढत असत. त्यांच्या कडून खूप कामे करून घेत, जशी युद्ध सामुग्री, शेती, वस्तू बनवणे इ. त्यांना गरजे एवढेच अन्न देत असत. झोपायला गोणपाटात गवत भरून केलेल्या गाद्या देत असत. साधारण एका बराकीत 500 ते 600 माणसे असत. त्यांना मिळून साधारण १० शौचालये असत. देख रेख करायला, त्या प्रिझनर्स मधीलच युद्ध कैद्यांची निवड होई. ते लोक खूप लाच खाऊन व देवून स्वत: चे मरण पुढे ढकलत असत. रोज साधारण पणे १००-१५० लोकांवर काहीतरी खोटे आरोप करून त्यांना मारत असत. त्या मुळे इतरांवर वाचक रहात असे. रोज संध्या काळी ओर्केस्त्रा वर गाणी वाजवली जात. त्या वेळेस सगळे कैदी तिकडे जमत. हे करमणुकी साठी नसून डोकी मोजण्या साठी अवल्म्बालेले तंत्र होते. रोज संध्याकाळी कैद्यांची परेड घेत असत.
जे आजारी पडत त्यांची रवानगी दवाखान्यात होई. इकडे त्यांच्या वर वेगवेगळ्या औषधांचे टेस्टिंग होत असे. कधी कधी विशिष्ट लक्षणे आढळली तर मुद्दाम त्या रुग्णाला तिकडे डाम्बत असत. (अश्या तर्हेने जवळ जवळ ३०० औषधांच्या पेटंट चे काम इकडे झाले!!!).

कैदी इकडे आणताना त्याच्या चीज वस्तू काढून घेण्यात येत.(मेल्या वर सोन्याचे दात सुद्धा कढुन घेत !!!!) परत जाताना आपल्याला परत मिळाव्यात म्हणून बिचारे ह्यावर नावे घालीत. ह्यातल्या कीमती वस्तू बाहेर विकत असत. अनेक एजंट ह्या वस्तू एका दूरच्या ठिकाणी विकत घेत. त्या ठिकाणाला कॅनडा म्हणत. कारण त्या वेळेस युरोप मध्ये कॅनडा हा देश श्रीमंती साठी प्रसिध्द होता.कैदी मारल्या नंतर त्यांचे चांगले बूट, कपडे, bag ठीकठाक करून बाहेर विकत असत. सगळ्या जर्मनीत त्याची विक्री होत असे. त्या मेलेल्यांच्या केसां पासून ते एक वेगळेच कापड तयार करत असत. जे युद्ध भूमीवर सैनेकांच्या वापरा साठी नेले जायचे. तिकडे मिळणार्या मिंक कोट साठी तर अनेक जर्मन धनिक बायका डोळे लावून असायच्या.

हे सगळे पाहिल्यावर मन सुन्न होवून जाते. का? आणि कशा साठी? हे प्रश्न पाठ सोडत नाहीत. कैद्यांनी बाहेर पळून जावू नये म्हणून जाड जाड तारांचे, ज्या वर वीज खेळवली आहे, असे कुंपण असायचे. तरीही 600 कैदी इकडून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण १३ लाख मेले!!!!

हे ऑश्विझ चे प्रवेशद्वार

Aushtwich.JPG

ह्या बराकी. त्या मैदानात परेड चाले.

IMG_0402.JPG

हे कुंपण

DSC06441.JPG

हे gas चेम्बर्स

DSC06455.JPG

हे ओव्हन्स

DSC06457.JPG

अशा तर्हेने माणसे वेगळी करत

DSC06451.JPG

हा तो गॅस

Aushtwich Gas.JPG

ह्या बॅगा

IMG_0380.JPG

बुट

IMG_0386.JPG

बराक आतिल बाजु

IMG_0389.JPG

हे सगळे पाहिल्यावर भडभडून आले. अनेक ठिकाणी तर मी रडत होते. अनेक ठिकाणी फोटो काढायला मनाई आहे. कारण अनेकांचे केस, वस्तू अश्या चीजा इकडे ठेवलेल्या आहेत. इकडे गाईड बहुतेक पोलिश असतात. अनेक लोक रोज भेट देतात. गाईड ला विचारले तर ती म्हणाली की येनार्यात इस्रायल कडून खूप लोक येतात. देणग्याही देतात. कारण त्यांचे कोणी ना कोणी इकडे होतेच ना !!! जर्मन पण खूप येतात. पण आपल्या पूर्वजांनी केलेली एक चूक म्हणूनच ते ह्या कडे पहातात. १९४५ साली जर्मन जेंव्हा पोलंड सोडून गेले त्या नंतर १९४६ साला पासून ऑश्विझ व बर्कानाऊ कॅम्प tourist अ‍ॅट्रॅक्शन झाले. मानवतेच्या क्रूर तेचे प्रतिक झाले.

जेंव्हा जर्मन्स इकडून पळाले तेंव्हा ह्या कॅम्प चा जास्तीत जास्त वेळ जो मुख्य अधिकारी होता तो रुडोल्फ होस, जो आर्जेन्टीना मध्ये पळून गेला होता, त्याला मोसाद ने पकडले व बर्कानाऊ मध्ये एका वध स्तंभ बांधून त्या वर त्याला फाशी देण्यात आले. त्याला मृत्य समयी सुध्धा वाईट वाटत नव्हते. “मी आज्ञा पालन केले” हेच त्यांचे शब्द शेवट पर्यंत होते. ह्या सगळ्या मागे जरी हिटलर ची इच्छा हे कारण होते तरी एवढ्या क्रूरतेने मारण्या मागचे डोके मात्र हिमलर चे होते. जे एस.एस. गार्डस ह्या कॅम्प मधून कामे करत असत ते ही जवळ जवळ ११००० संख्येत होते. पैकी नंतर फक्त 800 मिळाले. बाकीचे इतर देशात पळाले वा आपली ओळख बदलून राहिले.

सुरुवातीला ह्या कैद्यांचे रेकॉर्ड ठेवत असत. त्यांची नावे, फोटो ठेवत असत. पण नंतर नंतर ही नोंद ठेवणेही कठीण झाले. त्यातले काही फोटो तिकडे लावलेले आहेत. त्यावर कॅम्प मध्ये आणल्याची आणि मृत्यू ची तारीख अशा नोंद आहे. काही काही लोकांना तर ५-६ दिवसात मारले आहे. अनेक प्रकारे छळ करून त्यातले खुपसे लोक रोगांना बळी पडत. हे जे फोटो आपल्याला इकडे दिसतात, ते त्या वेळच्या गार्डस ने लपवून काढलेले आहेत. नंतर जेंव्हा त्यांच्या वर खटले भरले त्या वेळेस हेच फोटो पुरावे म्हणून वापरले गेले.

जेंव्हा मी ऑश्विझ मध्ये गेले तिकडे कॅम्प छोटा असल्याने व खूप लोकं तिकडे येत असल्याने भकासपणा जरा कमी जाणवला. पण बर्कानाऊ मध्ये शिरल्या शिरल्या भयंकर nigativity जाणवायला लागली. खूप ओझं वाटायला लागलं. बर्कानाऊ ऑश्विझ च्या ८ पाट मोठा आहे. प्रचंड कॅम्प आहे. इकडेच सर्वाधिक माणसे मारली गेली. मी स्वत: रेकी आणि एंजल थेरपी व मेडीटेशन करते. alternative हिलिंग मध्ये असल्या कारणाने, मला nigativity पटकन जाणवते. तिकडे गेल्या गेल्या माझे हात जड झाले. प्रचंड ओझे वाटायला लागले. गंमत म्हणून माझ्या नवर्याने गाईड ला विचारले की इकडे भुतेही असतात का हो? कारण एवढ्या प्रमाणावर लोकं हकनाक मेल्या मुळे सहाजिकच खूप वाईट व्हायाब्रेशांस इकडे असणे सहाजिक आहे. आम्हाला वाटले होते की ती गाईड हा प्रश्न उडवून लावेल. पण तिने उत्तर दिले की, तिने स्वत: हा अनुभव घेतलेला नाही, पण इकडे काम करणार्या रात्र पाळी च्या सुरक्षा रक्षकांनी मात्र असे अनुभव व तक्रारी केलेल्या आहेत. त्यांना रात्री च्या वेळेस परेड करताना जसे खूप बुटांचे आवाज येतात तसे आवाज ऐकू आले आहेत. बर्कानाऊ ला कुठलेच कुंपण नाही. तारांचे कुंपण आहे. पण तो 400 एकर असल्याने खूप मोकळा आहे. आजूबाजूला व्यवस्थित वस्ती आहे. पण एकंदर वातावरणात एक प्रकारची खिन्नता आहे. आजूबाजूच्या घरांच्या किमतीही कमी आहेत, अशी माहिती कळली. सहाजिकच आहे, अगदी अडल्या शिवाय इकडे घरे कोण घेणार. मृत्यूचा एवढा मोठ्ठा खेळ जिकडे झाला तिकडे असे वातावरण अपेक्षितच होते.

येणारे लोक (आम्ही सुध्धा) एक ऐतिहासिक घटना व वास्तू म्हणूनच ह्याच्याकडे पाहतात. पण तरीही खूप ओरखडे मनावर रहातातच. ती गाईड बोलताना “जर्मन्स” असाच उल्लेख करत होती. आमच्यातील एकाने तिला ‘नाझी’ असा उल्लेख करायची विनंती केली. ती तिने मान्य केली. खरच आहे पण. हे कृत्य बर्याच जणांना माहित नव्हते. अगदी आतले लोक सोडले तर नक्की काय होते आहे, ह्याची कल्पना बाहेर लोकांना नव्हती. होस ची बायको, जी त्याच कॅम्प मध्ये एका टोकाला रहात होती, व जिच्या घरा भोवती भिंत होती, तिला आपला नवरा जेलर आहे ह्या पलीकडे नक्की काय करतोय ह्याची अजिबात कल्पना नव्हती. जेंव्हा तो आर्जेन्टीना मध्ये पळाला तेंव्हाही ही जर्मनीतच रहात होती. जेंव्हा पोलीस तिच्या कडे येवून विचारणा करू लागले, तेंव्हा तिला त्यांचे चाळे समजले. तरीही ती नवर्या बद्दल ते सगळे खरे आहे हे मानायला तयार नव्हतीच!!!! त्यामुळे ह्या बातम्या खूप गुप्त ठेवत असत.

त्या काळात मिडीया आजच्या इतका सक्रीय नव्हता. युद्ध पत्रकारांना तर इकडे येण्यास बंदीच होती. ज्यू लोक फक्त युद्ध सामुग्री बनवण्या साठी व शेती साठी मजूर म्हणून वापरली जातात एवढेच त्यांना माहित होते. पण इतका नर संहार असेल अशी कल्पना रशियन ने येवून हे कॅम्प ताब्यात घेई पर्यंत कोणालाही नव्हती.

आज पोलंड देशाचं हे एक मोठ्ठ tourist अ‍ॅट्रॅक्शन झालेले आहे. लाखो लोक इकडे येतात. अनेकांची पोट ह्यावर अवलंबून आहेत. ते जगाला ओरडून सांगत आहेत, बघा बघा नाराधमतेचा नजारा. हे सांगणे गरजेचे आहे का? पाहणे गरजेचे आहे का?

हो... मला वाटते हो..... आपल्या एका इच्छे मुले त्या माणसाने हजारोंचे प्राण घेतले. म्हणजे एक इच्छा किती संहार करू शकते. हे पाहून भविष्यात कोणी हिटलर पैदा होवू नये आणि कडव्या मानसिकतेने फक्त आणि फक्त निराशाच हाती लागते, ह्याचे हे कॅम्पस म्हणजे द्योतक आहे. इतका संहार करूनही आज ते ज्यू आपल्या पायावर खंबीर पणे उभे आहेत. भले प्रगत देशांची त्याला फूस असेल, मोठ्ठ राजकारण तिकडे असेल, काहीही असो. पण त्यांची जीवन इच्छा मेली नाही. उमेद संपली नाही. उलट ह्या आघातांनी वाढली. आज रेताड मातीताही अनेक प्रयोग करून इस्राईल ने शेती मध्ये क्रांती केली आहे, तंत्रज्ञान, गुप्तहेर खाते सगळ्यातच प्रगती केली आहे. युद्ध संपल्यावर त्यांनी ह्या अपराध्यांना वेचून वेचून शोधून काढले. त्यांच्यावर खटले भरले. शासन केले. जगाची सहानुभूती त्याना होतीच.

नाझी जर्मनीला तरी उद्वास्थ्ते शिवाय काय मिळाले? फक्त लोकांच्या डोळ्यातला संताप, उपेक्षा आणि राग. आघातांनी राष्ट्र मोठी होतात की काय? काय माहित. पण इतिहास तरी तेच सांगतो. जर्मनी, जपान, इस्रायेल. ह्यांचा तरी इतिहास हाच आहे.

हे सगळे पहात असताना माझी १४ वर्षांची मुलगी माझ्या सोबत होती. फारसे काही माहित नसलेली. म्हणजे पूर्वाभ्यास नसलेली. ती खूप उत्सुकतेने पहात होती, गाईड ला प्रश्न विचारात होती, रडत होती, खिन्न होत होती. तिकडून निघताना उगाच हिला आणली असे मला वाटले, मी बोलूनही दाखवले. त्यावर ती पटकन म्हणाली,” आई, हा इतिहास आहे, तो आम्हाला कळलाच पाहिजे, नाहीतर असे हिटलर अजून बनतील. लोकाना मारून काही मिळत नाही. फक्त स्वत:चा शेवट हाती लागतो.” वरच्या परिच्छेदा मधल्या भावना तिच्या आहेत.

हे ऐकून ज्या उद्धेशाने हे कॅम्प जतन केले आहेत तो सफल झाला असे वाटते.

भाग ४ = झाकोपाने , बुदापेष्ट = रम्य दुनिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages