वारसा भाग १८

Submitted by पायस on 9 March, 2015 - 18:34

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52972

"आये ते काय लटकावत आहेत?" त्या चिमुरडीने विचारले. ती डोळे किलकिले करून दूरवर बघत होती. बालसुलभ मनाची शंका ती! आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेची चिकित्सक वृत्तीने चौकशी करणे, आपले माहितीचे जग विस्तारणे हा सर्वच लहान मुलांचा स्वभाव असतो. ती माऊली आत रात्रीच्या आसर्‍याची तयारी करत होती - नव्हे बाहेर घडणार्‍या घटनांपासून आपले लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत होती. जगणे हा मूलभूत हक्क माणसाकडून हिरावल्या गेलेल्या जगात ती आपल्या मृत्युची वाट पहात होती. त्या परिस्थितीतही ती आपल्या मुलीला सांभाळण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न करीत होती. गावातून पळाले असले तरी जंगलातून चालत एकाच दिवसात थोडीच पळता येते? सर्व कुटुंबे काही अजून हणमंतरावांच्या सैनिकांनी सुरक्षित बाहेर काढली नव्हती. जोवर सैनिक येत नाहीत तोवर कसा तरी वेळ काढायचा. तिने त्या दिशेने पाहताच आ वासला आणि आपल्या छोटीला जवळ ओढून घेतले. त्या पशूंची सावलीही हिला दिसता कामा नये.
"ते मेले ना?" तिने निरागसपणे विचारले. ही आई आता काय उत्तर देणार होती?
तिने सावकाश आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवला. मग एक घट्ट मिठी मारली.
"आये, रोज कुणी ना कुणी जायलाच पाहिजे का? त्यांना देवबाप्पा नक्की शिक्षा करेल बघ."
होय ग पोरी, म्हणत तिने छोटीच्या डोक्यावरून हात फिरवला. मग एक नजर तिने त्या वेशीवर टांगलेल्या प्रेताकडे टाकली. जर तुम्ही थोडी माघार घेतली असती आणि आमच्या गरजांबरोबर तडजोड केली असती, जर वेळेत थोडी आक्रमकता दाखवली असती तर कदाचित तुमचा अंत इतका मानहानीकारक झाला नसता धनी, ती स्वतःशीच पुटपुटत होती. नेमक्या त्याच वेळी एक कावळा येऊन हैबतरावांच्या प्रेतावर बसला आणि त्याने डाव्या डोळ्यावर टोच मारली. ओह्ह..... तिने नजर फिरवली. तिने मुलीचा हात धरला आणि ती जंगलात चालू लागली. इथून कुठेतरी दूरवर जायचे आहे एवढेच लक्षात ठेवून ती चालत होती. पण मनाशी विचारचक्र चालूच होते - खरेच देव असतो का? जर तो असेल तर तो यांच्या क्रियांना फळणार नक्की नाही. आमचे तळतळाट वाया नक्की जाणार नाहीत.
~*~*~*~*~*~

"सब होशियार" कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने पहार्‍याला ठेवलेले सैनिक सावध झाले होते. त्यातील थोडा अनुभवी पुढे झाला आणि त्याने हातातली मशाल खाली फेकली. रावांना व मालकांना सावध करण्याची सूचना द्यायला तो विसरला नाही. झालेल्या उजेडात तो निरखून पाहू लागला. सकाळचा हल्ला जरी अपेक्षेपेक्षा यशस्वी झाला असला - मृत तर सोडाच, एकहीजण गंभीर जखमी पण नाही. वर हवे ते कागद मिळाले - पण थोरल्या मालकांचा दुर्दैवी मृत्यु ओढवला होता. जंगलाच्या झाडीत काहीतरी होते हे मात्र नक्की पण नीट दिसत नव्हते. तेवढ्यात त्याला काहीतरी चुकते आहे याची जाणीव झाली. हे अनुभवी शिपाई एका बाबतीत जनावरासारखे असतात. त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रिया जबरदस्त असतात. तो झपकन मागे झाला. पण त्याच्या शेजारचा सैनिक तितका सुदैवी नव्हता. त्याचे डोके जबड्याच्या आत होते आणि तो मांजरासारखी दिसणारा प्राणी आपले दात त्यात रुतवत होता. भयाने बोंब ठोकत सर्वजण पळण्याच्या प्रयत्न करू लागले. पण हाय रे दैवा, मागून तोच लांडगा त्यांची वाट रोखून उभा होता. त्याच्या पंजाच्या एका फटक्यात सर्वात पुढे पळालेला कोसळला. मांजरीने ते पाहून मियाँव करीत आपल्या उजव्या पंजाच्या तळव्याची मागची बाजू चाटली आणि एक विकृत हास्य करीत मान लाडिकपणे फिरवली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ती दुसर्‍या एका शिपायाच्या समोर होती. तिने आपल्या पंजाच्या फटक्याने त्याचा चेहरा विद्रुप केला. तिथल्या एकूण एकाचा आत्ता भीतिने पुतळा झाला होता. या सर्व गडबडीत एक विशाल वटवाघूळ त्या छोट्याश्या उंचवट्यावर घिरट्या घालतंय हे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. तसेच एक शिपाई या गोंधळात रावांकडे, आतल्या गुहेमध्ये निसटलाय हे कोणाला कळले नव्हते.
~*~*~*~*~*~

वॅक! दुर्जनला आत्ता कोणी पाहिले असते तर कदाचित कोणाचा विश्वास बसला नसता. वॅक! फू, फ्फू, थू....... रक्ताची वांती! म्हणजे अजून माझा तुझ्यावर पूर्ण ताबा आला नाही तर, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने आपल्या तोंड साफ केले. आपल्या तब्येतीवर काही परिणाम झाला आहे याचे कुठलेही चिन्ह दिसून येत नव्हते. त्याने आधी समोरच्या महाकालाची पूजा केली. मग तो पायर्‍या चढत वर सीतामंदिरात आला. त्याचे सैनिक जागच्या जागी सज्ज असलेले पाहून त्याला थोडे समाधान लाभले. गावकरी व कैदी पळाल्यापासून त्याचा फक्त लाखन, मंजू व संगारीवर विश्वास उरला होता. बाकी बरेचसे तांत्रिक नुकतेच रुप बदलायला शिकत होते. त्यांचे तंत्र काहीसे कमकुवत होते. त्यामुळे त्याने रात्रीच या उरल्या सुरल्या शत्रूंचा नाश करून मायकपाळचा समूळ नायनाट करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करायचे ठरविले होते. व्याघ्ररुपाने त्याला नवीन शक्ती प्रदान केल्या होत्या. त्यामुळे तो दूरचे ऐकू शकत होता. त्याला किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्या किंकाळ्यामध्ये जणू त्याला संगीत ऐकू येत होते. तो त्या किंकाळ्याच्या तालावर हेंगाडा नाच नाचू लागला. कोणालाही शहारून टाकणारे हे दृश्य पाहण्याचे धैर्य मंदिराकडे पाठ करून उभे असलेल्या सैनिकांपैकी कोणात नव्हते.
~*~*~*~*~*~

"अजून किती पळायचे?" हा प्रश्न आता सर्वजण विचारत होते. त्याचे उत्तर कोणाकडे नव्हते. अग्रज व इतरांना हल्ला झालाय हे समजताच त्यांनी सर्वांना पळ काढायला सांगितला. तिथे थांबून जीव गमावण्यात काहीच अर्थ नव्हता. सकाळपर्यंतच हा हल्ला चालणार असा अग्रजचा कयास होता. कारण उजेडामध्ये बंदूकांच्या साहाय्याने बळवंत, राव व इतर फौज निश्चित प्रबळ ठरणार होती. ते सर्व दाहीदिशांना पांगले. त्यांना फक्त उजाडेपर्यंत जीव वाचवायचा होता. पण मधूनच "लाखन, तुझ्या ३० पाऊले डावीकडे" या प्रकारच्या हाका आकाशातून येत आणि काहीच क्षणांमध्ये एखादी किंकाळी ऐकू येई. यामुळे त्यांची जीवित राहण्याच्या लढाईला फारसे यश येताना दिसत नव्हते.
०००००

इकडे रानमांजरीचे रुप टाकून आपल्या मनुष्यरुपात मंजू आली. ती गुहेच्या त्या खास भागात प्रवेश करती झाली. क्षणभर तिने मागे वळून पाहिले. प्रेतांचा खच पडला होता. तिने किंचित मान तिरकी करीत भुवया उंचावत खांदे उडवले. समोर एक दरवाजा होता. कडी काढून ती आत आली. समोरचा ऐवज पाहून तिच्या चेहर्‍यावर बीभत्स भाव आले. तिच्या नकळत तिने रानमांजरीचे रुप धारण केले. तळव्याचा मागचा भाग चाटत तिने मान गोल फिरवली.
०००००

या रणधुमाळीत डोके शांत राखणे गरजेचे होते. एका चमत्काराची गरज होती; अन्यथा सकाळ होईपर्यंत एकही माणूस जीवंत उरणार नव्हता. आणि चमत्कार घडला. सुदैवाने त्यांना लपायला एक कपार जवळच सापडली व लाखनने आधी जंगलावर लक्ष केंद्रित केले असल्याने त्यांना योजना बनवायला संधी मिळाली. अग्रज बोलू लागला
"हे सर्व रुप बदलणारे तांत्रिक आहेत. मी जे काही निरीक्षण केले त्यानुसार आत्ता या कलेत निष्णात असे ३च जण आहेत. मंजू, तिची आई संगारी आणि कोणी लाखन. त्यातील किमान २ जण आत्ता इथे नक्की आहेत. त्यातील एकतर आकाशात घिरट्या घालतोय. त्याची/तिची सावली आभाळात वळवळ करतीये. आपल्याला त्याला किंवा तिला आधी हरवले पाहिजे."
"पण कसे?"
"हे सर्व रुपबदल करणारे कुठल्या ना कुठल्या प्राण्याच्या आत्म्याबरोबर करार करतात. या करारांतर्गत ते एखाद्या वस्तुबरोबर त्या प्राण्याच्या मूळ शरीराचा हिस्सा बांधतात. जोवर ती वस्तु आहे तोवर ते हवे तेव्हा रुप बदलू शकतात. प्रथम आपण त्या वाघळाला खाली आणूयात. वाघळाची दिवसाची नजर असते कमजोर. बळवंत तुझा नेम सर्वात चांगला आहे. तू डोळे मीट. पमाण्णा तुला काहीही करून दिवसाढवळ्या पडेल इतका उजेड, काही क्षणांपुरता का होईना, पाडायचाय."
"समजलो मालक". पमाण्णाने हवेत झेप घेतली आणि त्याने तोंडातून कसले तरी तेजोगोल आकाशात सोडले. थोड्याच वेळात झगझगीत प्रकाश पडला. क्षणभर सर्वांचे डोळे दिपले. सर्वात त्रास झाला तो संगारीला. तिला कधीच असे वाटले नव्हते कि रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताकदवान असलेल्या रुपाला असे काहीतरी झेलावे लागेल. तिचे डोळे जळत असल्याचा भास तिला होत होता. तो उजेड ३ क्षणच टिकला असेल पण त्याने लढाईचे पालडे फिरले. डोळे बंद ठेवल्याने कमीत कमी त्रास झालेल्या बळवंताने सरळ गोळी संगारीच्या हृदयावर मारली. ती हवेत हलत असल्याने नेम अगदी अचूक नाही बसला पण गोळी फुफ्फुसाच्या खालच्या भागात लागली. ती वेदना सहन न होऊन खाली कोसळली. तिचे शरीर चांगलेच ठेचकाळून निघाले.
ते सर्व ती जिथे पडली होती तिथे आले. तिचे रुप अजून पूर्णपणे गेले नव्हते. सावधगिरी म्हणून तिने ते तसेच राहू दिले होते. अग्रज तिचा अंदाज घेत, तिची नखे चुकवित तिच्या जवळ गेला. सहज दिसणारे एकमेव आभूषण, एक ताईत त्याने खसकन् ओढला. संगारी तिच्या मूळ रुपात आली. एव्हाना काही मायकपाळवासी तिथे जमा झाले होते. हीच ती संगारी, जिने आपल्यासोबत राहून आपला विश्वासघात केला. हणमंतरावांचा राग तिला पाहून अनावर झाला. त्यांनी उत्स्फूर्तपणे जवळ पडलेला एक दगड उचलला आणि नेम धरून भिरकवला. तिच्या कपाळावर खोक पडून भळाभळा रक्त वाहू लागले. अग्रज याने अगदीच चमकला. तो काही बोलणार इतक्यात प्रतापने त्याचा हात ओढून त्याला बाजूला घेतले. त्याने बोटानेच त्याला गप्प राहायला सांगितले. त्याबरोबर दुसर्‍या एकाने दगड भिरकावला. संगारीला त्याबरोबर ऐकू आले. "२ झाले ३९८ बाकी". तिला त्या अवस्थेतही हसु फुटले. वीराजी जहागीरदार, तुझा मृत्यु माझ्याचमुळे असा झाला ना? त्याचे हे फळ असणार. नाहीतरी दुर्जनच्या डोक्यात कोणी भरवून दिले हे बदल्याचे खूळ लहानपणापासून. '३' तिसरा दगड बसल्यावर तिची अवस्था अजूनच वाईट झाली.
मागून लाखन तिथे आला. सोबत मंजूही होती. "संगारी" तो ओरडला. पण पमाण्णा मध्ये आला.
"इथे न्याय होतोय. तुम्हाला लढायचे असेल तर मी आहे ना."
लोकांनी पुन्हा लक्ष वळवले. ४, ५, ६.......१०, १५........५०,७५,१००........ संगारीचा चेहरा ओळखू येईनासा झाला होता. लाखनने उजाडणे लक्षात घेऊन आईच्या मृत्युने शोकाकुल झालेल्या मंजूला उचलून पळ काढला. लोकांचा क्षोभही उगवत्या सूर्याबरोबर शांत होत होता. ते सर्व बाजूला झाले तेव्हा चेंदामेंदा झालेला संगारीचा देह एका झाडाला टेकून पडला होता. हे पाहून इंग्रजी भाषेतून शब्द उसने घेण्याचा मोह अग्रजला आवरला नाही.
"वन डाऊन, थ्री टू गो"
~*~*~*~*~*~

मंजू भयंकर संतापली होती. एकतर पमाण्णाला तिला फारशी लढत देता आली नव्हती. लाखननेच तिला वाचवले होते. दुसरे म्हणजे तिची आई, तिच्या डोळ्यांदेखत मारली गेली होती आणि ती काहीही करू शकली नाही. भरीस भर सरदारला याचे फारसे वाईट वाटलेले दिसत नव्हते. त्यामुळे तिची चिडचिड जास्त होत होती.
"पण सरदार, संगारी तुमची सर्वात जुनी साथी होती. तुमची तंत्रविद्येतील पहिली गुरु होती."
"मंजू! तांत्रिकाबरोबर आपण डाकू देखील आहोत. दोहोंना असे भावनेत वाहून जाणे मना आहे. तू तिचा मृत्यु झाला असे का समजते आहेस? तिने बलिदान दिले आहे. देखो, लाखन के कहने के मुताबिक तुम लोगोंने कुछ १०-१५ सिपाही और बेकार के करीब १०० गाववाले छोडके सबको मार डाला. एक रात मे कुल मिलाके कुछ ३००-४०० लोग तो जरुर मारे होंगे तुम लोगोंने. कमाल कर दिया."
या निर्लज्ज माणसाला काहीच कसे वाटत नाही? मंजूने रागात फाडकन त्याच्या मुस्काडात मारली. तिचे नख त्याचा गाल ओरबाडत गेले. तिथे चांगलाच वण उठला. लाखनने लगेच तिला धरले आणि जमीनीवर भिरकावून दिले. तो अजून काही करणार इतक्यात दुर्जनने त्याला हाताने बास म्हटले.
"मंजू. तू मेरे लिए छोटी बहन कि तरह है. समझने कोशीश कर. हमसे लडकर तुझे कुछ हासिल नही होगा. तुने कल रात एक तांत्रिक, एक डाकू के नाते जो किया उस पे फक्र कर. तेरी वजह से अब हमे इस लडाई मे पूरी तरह से बढत हासिल हुई है. मला माहिती आहे कि तुला बदला पाहिजे. तुझी बदल्याची आग ठंडी होणार. ते पागल यानंतरही गावात घुसण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत वाट बघ. अपने अंदर की काली बिल्ली को फुसला के रख. अब मै ना और कुछ सुनूंगा ना कहूंगा. याद रखना बिल्ली बिल्ली होती है, शेर शेर होता है."
मंजूने प्रथमच दुर्जनला तिला धमकावताना पाहिले होते. तिला आपली स्थिती समजली. ती तिथून निघून गेली.
"खैर. जाऊ दे तिला. होईल शांत नंतर ती. पण लाखन तिने काम चोख बजावले आहे ना?"
"जी सरदार. मी स्वत: खात्री करून घेतली."
दुर्जनने समाधानाने हात चोळले. बस्स. आता अधिक संख्येने शक्तीशाली तांत्रिक बनवायचे.
~*~*~*~*~*~

शून्य सेनेचे सेनापती असल्यासारखे ते सर्व मान खाली घालून बसले होते. उरले सुरले गावकरी दैवाला दोष देत खाली रडत होते. तर बाकी १५ शिपाई या बैठकीत हजर होते. आता करो या मरो शिवाय तिसरा पर्याय होताच कुठे? खासकरून जेव्हा त्यांना ती भयंकर गोष्ट कळली.
"सर्व बंदूका व दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. हातातली हत्यारे सोडून आता कुठलेही हत्यार शिल्लक नाही."
ज्या बंदूकांच्या जीवावर ते तांत्रिकांशी टक्कर घेणार होते त्या बंदूकाच राहिल्या नाहीत आता काय करायचे? अग्रज सांगत असलेली योजना आता त्यांची शेवटची आशा होती.
"मित्रहो. मी आता सांगणार असलेली योजना ही रुढार्थाने योजना नाही. तिच्यात आपला सर्वनाश होण्याचीच शक्यता जास्त आहे. तरी लक्ष देऊन ऐका. सध्या मायकपाळ मध्ये सामान्य हत्यारांनी न मरणारे ३च जण आहेत. दुर्जन, लाखन व मंजू. मी पमाण्णा बरोबर चर्चा केली. जसे संगारीचा ताईत होता, तसेच मंजूकडे उजव्या हातात एक बांगडी आहे. या बांगडीला काढले तर ती निष्प्रभ होईल. लाखनची वस्तु त्याच्या गळ्याच्या जवळ कुठेतरी होती पण अंधारात नीट दिसले नाही. बहुधा तो ताईतच असावा. म्हणजे राहता राहिला दुर्जनच. त्याच्याशी मी स्वतः लढेन. तुम्हाला फक्त इतर डाकूंना हरवायचे आहे. आणखी तांत्रिक बनण्याच्या आत आपल्याला हे सर्व करायला हवे. आजच, सूर्य मावळताच आपण गावात घुसू. प्रताप व शामच्या नेतृत्वाखाली मंजूचा पाडाव, राव व बळवंत लाखनला सांभाळतील तर मी व पमाण्णा दुर्जनला. तुम्हाला पळून जायचे असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता. पण तुमच्या लक्षात आले असेलच कि ते शक्य नाही. मग किमान मरता मरता मरू. मग आहात तयार?"
होय शिवाय इथे दुसरा पर्यायच उरला नव्हता
~*~*~*~*~*~

त्या दिवशीच सूर्य मावळताच गावाच्या वेदीच्या इथे सर्व डाकूंना बोलावण्यात आले. लाखन व मंजूने त्यातले तांत्रिक वेगळे काढले. दुर्जन येताच सर्वांनी त्याला मुजरा केला. त्यानेही त्याचा स्वीकार केला. मग तो बोलू लागला
"तुम्हा सर्वांना या रुपबदलची कल्पना आहेच. याचे दोन प्रकार आहेत. एक तर तात्पुरते मंत्र म्हणून तुम्ही रुप बदलु शकता. पण ते फारच कमजोर आहे. दुसरे तुम्ही व्यवस्थित क्रिया करून करार करा. त्यासाठी एक बळी द्या. आणि तुम्हाला हे पण माहिती आहेच कि मला असे शक्तीशाली तांत्रिक अजून पाहिजेत."
हे वाक्य बोलताच सर्व डाकूंचे हात बांधले गेले लाखन आणि मंजू असताना काही इलाजच नव्हता. दुर्जन खदाखदा हसत होता. त्याने या दलातील बिगर डाकूंना याच दिवसासाठी जिवंत ठेवले होते.
सर्व तांत्रिक त्या क्रियेचे विधि करू लागले. मग सर्व बळीसाठी उठले आणि एवढ्यात..............
उरल्यासुरल्या दारू गोळा धडाडू लागला. हातात येईल ती वस्तु फेकून मारणे सुरू झाले. सगळा गोंधळ माजला. दुर्जनने एक डरकाळी फोडली आणि तेवढ्यात त्याच्या खांद्यात एक बाण रुतून बसला. बळवंतने आपला हल्ला सुरु केला होता.
"मंजू, लाखन. तुम्ही यांना सांभाळा. मी यांना दुसरीकडून गाठतो." असे म्हणत तो तळघराच्या दिशेने पळाला.
योजनेचा पहिला टप्पा सफल, अग्रज चित्कारला. "सर्वजण. आपापले लक्ष्यभेद करा मी व पमाण्णा आमचा लक्ष्यभेद करतो."
असे म्हणत तो पमाण्णाच्या पाठीवर बसला आणि पमाण्णा उडत उडत दुर्जनच्या मागे तळघरात घुसला
~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53070

Group content visibility: 
Public - accessible to all site users

pudhcha bhag kadhiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii