वारसा भाग ११

Submitted by पायस on 14 February, 2015 - 03:34

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52696

*मुधोजींची अखेर*

मुधोजी एकटेच काटेकुटे तुडवित चालले होते. आसपासच्या २० कोसांवरील सर्व गावात दहशत असलेला माणूस आज स्वतः कुणाच्या दहशतीखाली वावरत होता हे कोणालाच सांगते आले नसते. मायकपाळ मधील एकूण एक माणूस मात्र मुधोजीराजे पूर्वीसारखे राहिले नाहीत असे म्हणत होता. वाघ म्हातारा झाला कि त्याला पोरे-सोरे देखील खडे मारतात पण इथे वाघ आत्ताशी उतारवयात पाऊल टाकत होता. इतक्यात गलितगात्र व्हायची मुधोजींवर का वेळ यावी हे कोणालाच समजले नव्हते; दोन व्यक्ती सोडून. एक खुद्द मुधोजींचे थोरले चिरंजीव व पमाण्णा. स्वतः त्यांचे चिरंजीव हे कारण जाणल्यापासून टरकलेच होते पण जोवर एका मर्यादेत राहू तोवर आपण भयमुक्त आहोत हे तो जाणून होता व म्हणूनच तो गढीवर झोपू तरी शकत होता व आपल्या तामसी प्रवृत्तीला मुरड घालत होता. पण जुन्या सवयी मोडणे कठीण असते व मुधोजी या प्रकारे सतत दडपणाखाली जगू शकत नव्हते त्यामुळेच कि काय त्यांनी गढी सोडून दूर कुठेतरी जाण्याचे ठरविले होते. तसेही पमाण्णाने रक्ततपासणी करुन वारस नक्की केलाच होता मग आता थांबलो काय न थांबलो काय? आणि खजिना कशाला पाहिजे चिरंजीवांना? आला शोधता तर शोधा स्वतःच, नाहीतरी तो माझा खजिना आहे फक्त माझा! आणि तिथेच तो खंजर........

मुधोजी हळहळले. त्या खंजरानेच घात केला होता. त्या दिवशी मुधोजी व पमाण्णा खजिन्याच्या मायकपाळमध्ये दडविलेल्या व ज्याची माहिती मुधोजींच्या मुलांना माहिती होती त्याच जुन्या कक्षात उभे राहून बोलत होते.
"पमाण्णा, या दालनांची, या गुहेची माहिती आता आपल्या विश्वासुंना सोडून कोणास माहित नको. खात्री करुन घेणे."
"जी मालक. इथे तो प्रकार आणि लुटालूट झाल्यापासून मी जानोजीच्या शरीराचा ताबा घेतला. जानोजीस बरेचजण ओळखत. ते तसेच फसले आणि सर्व घडाघडा बोलून बसले. बरेचसे जुजबी ऐकीव माहिती सांगत होते पण काहीजण अर्थातच धोकादायक.."
"मग? काय केलेत?"
जानोजीच्या रुपात उभ्या असलेल्या पमाण्णाने आपल्या कंबरेला असलेल्या तलवारीच्या म्यानेवरुन हळुवार हात फिरवला. हात फिरवीत असतानाच त्याने हलकेच मान वर करुन मुधोजींकडे पाहिले व तो भेसूर हसला. मुधोजींच्या ओठांतून अत्यंत शालीन असे हास्य बाहेर पडले. पण जर कोणी त्या हास्याबरोबरच त्यांच्या डोळ्यातले भाव बघता तर एक विकृत आनंद व्यक्त होतोय हे त्याला जाणवले असते.
"हा अंशही आता सुरक्षित आहे तर. तसेही माझ्या नालायक मुलांना एवढा खजिनाही मिळता कामा नये. म्हणून तर जवळपास सर्व महत्त्वपूर्ण, उंची, कीमती चीजवस्तू वेगवेगळ्या ठिकाणी हलविल्या आणि तुलनेने सामान्य वस्तूच इथे ठेवल्या. जर लायक असाल तर मिळवा खजिना. पमाण्णा आम्ही आज बहुत खूश आहोत. या निमित्ताने काही दिल बहलवणारी चीज आम्हाला हवी आहे."
"आपण स्पष्ट करुन सांगावे मालक" खरे तर पमाण्णा या म्हातारवयाकडे झुकलेल्या हिरवट सरदाराची आवड जाणून होता पण तरेही तो खोटीच अदब दाखवत बोलला.
जहागीरदाराने एक नाव घेतले. ते थोड्या दूर अंतरावरील गावातील एका अजून वयातही न आलेल्या मुलीचे होते.
"क्षमा असावी पण ती आपल्या मुलीपेक्षाही छोटी आहे. २-३ वर्षे अजून अंतर असते तर ती तुम्हाला नात शोभली असती. आणि हे आपल्या इभ्रतीला व कुलीनतेला धरुन तर्कसंगत होणार नाही. कितीही प्रकरण दाबले तरी दंतकथा पसरणारच मालक. आपण शक्य झाल्यास कुणा दुसर्‍या चीजेची मागणी करावी नाहीतर हा सेवक आज्ञा पाळेलच."
खरे म्हटले तर इथे चिडण्यासारखे काही पमाण्णाच्या तोंडून बाहेर पडले नव्हते. तो त्याही परिस्थितीत त्या तामसी विकृत इच्छेची पूर्तता करण्यास सिद्ध होता. पण उन्माद एकदा चढला कि माणसाला दुसरे काही दिसत नाही, समजत नाही. मुधोजींना पमाण्णाचा हा सल्ला आपला अपमान वाटला.
"हरामखोर. तुला कालद्वीपावरुन याचसाठी आणला का आमच्या पूर्वजांनी? आमची बेअदबी करण्यासाठी तू येथे आहेस कि दिलेल्या आज्ञा गुपचूप पाळण्यासाठी? आदित्यवर्मन् ने तुला बांधले आहे हे तू विसरलास का रे *****. थांब ****** तुला दाखवतोच." असे म्हणून मुधोजी काहीतरी शोधायला लागले.
पमाण्णा थरथर कापू लागला. तो जागच्या जागीच लटलटत पुटपुटायला लागला
"नको मालक. खंजर नको. मालक आदित्यवर्मन् चा हेतु काय होता आणि तुम्ही खंजर कशासाठी वापरताय? मी देतो ना आणून तिला, लगेच खंजर कशाला काढताय? तुम्हाला लुमिखाची आण आहे मालक. नको मालक."
मुधोजी यावर खदाखदा हसत जवळच्याच एका रांजणात काही धुंडाळायला लागले. १-२ मिनिटे शोधल्यावरही काही हाती लागेना. आता पमाण्णा काहीसा साशंक दिसू लागला व घाम फुटायची पाळी मुधोजीची होती. त्यांनी तो रांजण चाचपायला सुरुवात केली. तो रांजण खंजरवाला नव्हता. खंजर व अनेक परंपरेने भरलेल्या वस्तूंचा तो अमूल्य रांजण खजिन्याच्या मध्यभागी ठेवलेला असे. पण आता खजिन्याची पुनर्रचना झाली होती. म्हणजे तो रांजण आणि खंजर लपविलेल्या अंशांपैकी कुठल्यातरी अंशात गेला. पण कुठल्या?
"माऽऽऽऽलऽऽऽऽक" एक गोड आवाजातली साद घालत पमाण्णा आता त्यांच्या अगदी जवळ, समोर उकिडवा बसला होता. मान किंचित तिरपी करीत त्याच्या चेहेर्‍यावर एक अत्यंत खेळकर हास्य पसरले होते. इतर परिस्थितीत ते तितकेसे भयानक वाटले नसते पण मुधोजींना त्या स्वरामागचे गांभीर्य जाणवले.
"हरवला खंजर? असे नसते करायचे मालक. पमानानान्गल पाळणे काय सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला? त्यात तुम्ही त्याला बद्ध करुन ठेवणार, लुमिखाबरोबर करार करणार आणि अशा क्षुल्लक चुका व असे वर्तन? तुला खरेच कळतेय का मंदबुद्धिच्या मनुष्या तू काय चूक करुन बसला आहेस?" आता पमाण्णा एकेरीवर आला होता. मुधोजीचे धोतर ओले झाले होते. ते थरथर कापत कसेबसे उठण्याचा प्रयत्न करीत होते.
"तू याला खेळ समजतो ना? मग आतापासून हा खेळ सुरु. तुला शेवटची संधी मी दिली. बघू किती दिवस राहतोस आणि खंजर शोधू शकतोस का."
एक गडगडाटी हास्य करीत तो निघून गेला. मुधोजींचा फासा चुकीचा पडला होता. आता साप त्यांना कुठल्या अंकावर आणून सोडणार होता ते दैवालाच ठाऊक.
---------

मुधोजी गुहेच्या जवळ पोचले होते. आतली सुरक्षा यंत्रणा त्यांना माहित होती. त्यामुळे कोणालाही, अगदी पमाण्णालाही खबर न होता ते आतपर्यंत घुसू शकत होते. त्यांना हे कळून चुकले होते कि अशा मानसिक अवस्थेत त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या गणित्याने सांगितलेले सर्व तिलिस्मी संदेश (हिंट्स) आठवणार नव्हते. आणि नाही म्हटले तरी २७ अंश शोधणे म्हणजे खेळ नव्हता. २७ हिश्श्यातील कुठल्याही हिश्शात तो खंजर असू शकत होता. हे सर्व करण्यापेक्षा आपल्या वाटचा खजिना घेऊन निघून जावे. पमाण्णाच्या क्षेत्राच्या बाहेर कुठेतरी गुप्तपणे उरलेले आयुष्य कंठावे. तसेही सर्व परिस्थिती कळल्यावर आपला मुलगा आता जहागीरदार कमी आणि संत जास्ती वाटू लागला आहे. पमाण्णालाही खंजर हवा आहे. का कुणास ठाऊक? तो आणि चिरंजीव बसतील ते २७ अंश शोधत. जर शोधता आला तर! चिरंजीवांना ती भाषा नीट कुठे येते आणि पमाण्णाला ती लिपी नीट येते ती त्याचीच मातृभाषा आहे हे त्यांच्या मठ्ठ डोक्यात येणारच नाही. आणि नुसती भाषा येऊन काय उपयोग ती कोडी कोणालाच सोडवता येणार नाहीत. म्हणून मसणात गेला तो खजिना आणि मसणात गेला तो पमाण्णा आणि त्याचा लुमिखा. मुधोजी सोनेनाणे एका थैलीत भरता भरता मनाशीच विचार करीत होते. एकदा निसटल्यावर काय करायचे याचे स्वप्नरंजनही सुरु झाले होते. हलकेच ते स्वतःशीच कुठलीशी धुन गुणगुणत होते.
"माऽऽऽऽऽऽऽऽऽलऽऽऽऽऽऽऽऽऽक"
मुधोजींच्या हातातून ती धनाने गच्च भरलेली थैली गळून पडली. त्यांनी थरथरत हलके हलके मान वळवून मागे पाहिले. पलित्याचा प्रकाश तसा मंदच होता. होनांनी काठोकाठ भरलेल्या एका हंड्यावर ऐसपैस पाय फाकवून पमाण्णा बसला होता. त्या लालसर प्रकाशाची तिरीप त्याच्या गालावर पडून तो अजूनच भयाण दिसत होता. त्याच्या थोडा मागे ....... चिरंजीव........ मुधोजींच्या छातीत कळ आली.
"पमाण्णा, हा तुमचा गुनहगार आहे. आम्ही तुम्हाला आज्ञा करीत नाही आहोत कारण ते आम्हास तितकेसे प्रशस्त वाटत नाही पण त्याचे वर्तन बघत मृत्युदंड हे एकच शासन योग्य!"
"मालक लवकर लवकर शिकताय कि. फक्त आता हे नाटक मरेपर्यंत जपा म्हणजे झालं. नाहीतर खंजर शोधत भटकावे लागेल." पमाण्णा दात विचकत उत्तरला.
"आणि तू." तो आता मुधोजींकडे वळला. "खेळ हरणे किंवा जिंकणे हा गौण मुद्दा आहे. तशीही मला तुझ्याकडून फारशी अपेक्षा नव्हतीच. तुला माणसांची पारख एकेकाळी होती. तुझी त्या गणित्याची निवड आजही कौतुकास्पद आहे. पण हा खेळ अस्तित्त्वाचा आहे. आणि अशा खेळात पळून जायची परवानगी नाही."
पमाण्णा जानोजीच्या शरीरातून बाहेर येऊन तुटून पडला. नव्या जहागीरदाराने तोंड वळवले. काही झाले तरी तो त्याचा जन्मदाता होता, बाप होता. त्याच्या शरीराची विटंबना तो बघू शकत नव्हता. पण त्याला त्याच्या बापाची एकही किंकाळी ऐकावी लागली नाही. पमाण्णाचे सर्व हल्ले मृतशरीरावर होत होते. मुधोजीचे हृदय 'परवानगी नाही' हे शब्द ऐकताच बंद पडले होते.
~*~*~*~*~*~

उद्गम खंड ३ - गुणवर्धनाचे आत्मवृत्त - अग्रजच्या नोंदी

आम्ही सर्व त्या जहाजावर बसून निघालो. स्वतः राजेन्द्र महाराज आमचे नेतृत्त्व करीत होते. माझ्यासाठी समुद्रावर इतक्या दूरवर सफर करण्याचा पहिलाच अनुभव होता. तसे बरेचजण नवीनच होते या अनुभवाला पण ते किमान सिंहलद्वीपापर्यंत जाऊन आले होते. त्यातील काहीजणांनी सुरुवातीला माझ्या येण्यावर आक्षेप घेतला होता. पण मी योद्धा म्हणून भाग घेत नसून लिखापढीच्या साहाय्यक कामात असणार आहे हे ऐकून त्यांनी आक्षेप मागे घेतले होते. हे ऐकल्यावर मीही थोडा खटटूच झालो होतो. पण काय करणार? अनुभव या एका बक्षिसापोटी मी आता या मोहिमेत तेवढ्याच उत्साहाने सहभागी असणार होतो.
आमची योजना म्हणायला एकदम सहजसोपी होती. यवद्वीपात घुसण्यासाठी भारतीय व्यापारी बंगालच्या उपसागरातून मलाक्काच्या सामुद्रधुनीमार्गे केदाह बंदरात पोचत व तिथून पुढे श्रीविजयाच्या नियमाप्रमाणे वागत. त्यांना आमच्याकडूनही मलाक्कामार्गे येण्याचीच अपेक्षा होती. त्यामुळे जवळपास सर्व सैन्य व नाविक बळ केदाहमध्ये एकवटले होते. पण आम्ही हिंदी महासागरातून लांबच्या मार्गाने सुंदच्या सामुद्रधुनीतून यायचे ठरवले. हे फक्त चोळांनाच शक्य होते कारण त्यांचे अत्यंत पुढारलेले जहाजबांधणीचे तंत्रज्ञान! श्रीविजयाच्या हे गावीच नव्हते कि असे काही होईल. त्यामार्गाने आमची पहिलीच झडप पडणार होती पालेम्बंगवर. पालेम्बंग श्रीविजयची राजधानी होती. पहिल्याच फटक्यात राजधानी पडल्यावर कसले युद्ध आणि कसले काय?
योजना साधी पण बिनतोड होती. खडतर प्रवास करुन पालेम्बंगला पोचल्यावर चोळांची वाट पाहत होती दुय्यम दर्जाची व संख्येने अत्यंत तोकडी फौज. त्या मूठभर शिपायांचा यूं धुव्वा उडाला. पालेम्बंग खरे तर एक नितांत सुंदर शहर दिसत होते. विविध देशांशी व्यापार करुन गोळा केलेली संपत्ती मुक्त हस्ताने खर्च केलेली दिसत होती. मला प्रत्यक्ष लढण्याची वेळच आली नव्हती. त्यामुळे मी शहराच्या नयनरम्य सौंदर्याचा आनंद घेत हिंडत होतो.
आल्या आल्या सम्राट संग्रामविजयोत्तुंगवर्मन् ला कैद करण्यात आले. केदाहला बातमी पोचून श्रीविजयन सेनापती सावध होण्याच्या आतच आम्हाला मोहिमेचा पुढचा टप्पा पार पाडायचा होता. त्यामुळे हे सर्व एका दिवसात उरकण्यात आले. स्वतः राजेन्द्र रात्रभर जागे होते.
आता सैन्याचे अनेक भाग पडणार होते. त्यातील सर्वात मोठा भाग राजेन्द्रबरोबर उरलेली ठाणी जिंकत केदाह पर्यंत मजल मारणार होता. ठिकठिकाणी थोडे थोडे सैन्य विखरत ते केदाहला वेढा घालण्यासाठी पोचणार होते. आम्ही लुटालूट करीत मधले हेर मारुन काढत केदाहला पोचणे अपेक्षित होते. माझ्या दुर्दैवाने मी पालेम्बंगहून सर्वात शेवटी निघणार्‍या निम्न दर्जाच्या तुकडीत होतो. त्यांनी महाराज जाताच पालेम्बंगची राखरांगोळी केली. कितीही सुशिक्षित, सुसंस्कृत माणूस असो. युद्ध त्याला अधम बनवते हेच खरे. आणि त्यात दिलेले काम संपत्ती खणून काढण्याचे असल्यावर या जनावरांना मोकळे रानच मिळाले होते. पण फक्त एकच अजब गोष्ट घडली. पालेम्बंगला एक तुरुंग होता. जाळपोळ करीत असले तरी चोळ सैनिकांना जीवितहानीचे भान होते. कदाचित थोडा परिणाम होतोच संस्कारांचा. केवळ विरोधाला विरोध करणार्‍यांनाच ते जीवंत सोडत नव्हते. बाकी इमारतीला आग लावण्यापूर्वी ते संपूर्ण इमारत मोकळी करीत असत. पण इथे नवलच घडले. एका कैद्याला काहीही झाले तरी मोकळे सोडू नका असे यवद्वीपवासीच आम्हाला विनवू लागले. उदार मनाने सैनिकांनी अर्थातच त्याला मोकळे सोडले पण त्यावर तुमचा आता सर्वनाश होईल असा आशीर्वाद मिळाला. तो कैदी मला मुळीच खतरनाक वाटत नव्हता. पण त्याचे डोळे, मला कदाचित भ्रमही झाला असेल पण त्यांची बुबुळे काळी होती आणि मध्ये पांढरी बाहुली!
०००००००००

आम्हाला मुख्य काम होते हेरांना, बातमीदारांना रोखणे. अर्थात गुणवर्धन् म्हणजे मला ही जबाबदारी वैयक्तिकरीत्या सोपविण्यात आली नव्हती. त्यात मी लढणे अपेक्षित नव्हते. म्हणून मी निश्चिंत होतो. आम्हाला एका हेराच्यामागे पाठविण्यात आले. तुरुंगाला जाळल्या दिवसाचीच रात्र होती. आम्हाला खबर मिळाली कि पालेम्बंगच्या वायव्येला जंगलाच्या दिशेने २ बातमीदार पळालेत. तिथे जाऊन त्यांना जमले तर रोखायचे होते. अन्यथा पुढच्या ठाण्याला तशी खबर पाठवायची व्यवस्था करायची होती. आमच्यात काही युद्धकैदी होते. मला त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे काम होते. ते बदलून आता मला या नव्या कामगिरीवर पाठवले जात होते. हे ऐकताच कैद्यांमधील खिन्नपणे म्हणाला - त्यांना त्याच रस्त्याने जायचे होते. आता चोळांकडून आले असते त्यापेक्षा कितीतरी भयानक मरण मरणार तो. हे वाक्य ऐकून मी व माझा अधिकारी थोडेसे चमकलोच पण जात्याच आलेल्या श्रेष्ठत्वाच्या भावनेने तिकडे दुर्लक्ष केले.
यवद्वीपातील जंगले आपल्यापेक्षा वेगळी आहेत. तिकडे जवळजवळ रोज पाऊस होतो (*विषुववृत्त इंडोनेशियातून जाते). अत्यंत दमट वातावरण व बेसुमार आडवीतिडवी वाढलेला झाडोरा. मोठे वृक्ष तिथेही आहेत पण इतक्या प्रमाणात बिलगून झुडपे आपल्याकडे नाहीत. त्यामुळे हातभर अंतरावरचे दिसणेही मुश्किल! अशा भयानक जंगलात हरवण्यापेक्षा दुसरा भयावह अनुभव नाही. हे मी सांगू शकतो कारण माझ्याबाबतीत नेमके तेच झाले. मी हरवलो. मी फौजेपासून खूप दूर नक्कीच गेलो नव्हतो. कारण काहीबाही कुजबुजल्यासारखा आवाज सतत येत होता. पावलेही दूरवर कुठेतरी वाजत होती. पण मला सर्वात राग याचा येत होता कि ते निर्लज्ज हसत होते. लांबवरुन मला हसण्याचा आवाज येत होता. कान देऊन ऐकले तर कळत होते कि तो कुत्सित हसण्याचा आवाज होता. त्या भयाण जंगलात अवसान गळालेले असतानाही मला या सर्वाचा सात्विक संताप आला होता. पण करतो काय? तो आवाजच माझा एकमेव मार्गदर्शक होता. त्याच्यावर चिडून चालण्यासारखे नव्हते.
त्या आवाजातही एक लय होती. 'पाग्लिको कनन, पाग्लिको कलिवा, पाग्लिको , माग्लाकाड' असेच शब्द वारंवार ऐकू येत होते. ती लय क्लिष्ट होती. मी जे थोडे काही संगीत शिकलो होतो, झंप, रुपक, अठ छे कुठल्याच तालात नाही बसत पण तरी असे एक ताल होता, पुनरावृत्ती होती. असे वाटत होते कि जणू त्या आवाजाला त्या जंगलामध्ये काटकोनात छेदणारे रस्ते दिसत आहेत. आता मला त्या आवाजातही जणू अर्थ जाणवू लागला होता. 'उजवीकडे वळ, आता डावीकडे, सरळ चाल, वळ, इतके नको, हा शाब्बास' अर्थात ताण निवळला नव्हता. प्रकाश जवळ येत होता म्हणजे मी फौजेला गाठत होतो पण अजूनही हसण्याचा आवाज ना कमी होत होता ना वाढत होता. जणू कोणी माझा ठराविक अंतर ठेऊन पाठलाग करता करता मला वाकुल्या दाखवत होते. याने माझे उसने अवसानही जात होते पण तरीही मी धावत पळत कसेतरी त्या प्रकाशाला गाठले आणि........
आमची तुकडी जवळपास संपूर्ण गारद झाली होती. सगळे मेले होते का हे कळायला मार्ग नव्हता. पण कोणीही लढण्याच्या स्थितीत वाटत होते. त्या कालच्या कैद्यात इतक्या वेगात हालचाली करण्याची शक्ती आहे? अरे त्याने कोणाला धरले हे काय हा हाथ मागे का घेतोय? जर मुष्टीप्रहार करणार असशील तर मूठ वळत का नाही आहेस? टिचकी मारण्याची का मुद्रा घेतोय? नाकावर टिचकी मारणार आहेस तू म्हणजे त्याला अपमानित करतोयस? हे काय डोके इतके खाली घेता येते? नाही त्याचे डोके उडाले टिचकीने. हे होण्याची ...... परवानगी नाहीये. महान चोळ साम्राज्यात मी का आलो? असेच पराभव पाहण्यासाठी? नाही याची परवानगी नाही. याची कोणाला परवानगी नाऽऽऽऽऽही. (असे म्हणत गुणवर्धन् त्या राक्षसावर(?) तुटून पडला असला पाहिजे)
------------

प्रत्यक्ष लढाई मला नीटशी आठवत नाही. क्रुद्धावस्थेत मी एका वेगळ्याच विश्वात गेलो होतो. पण त्याही अवस्थेत कुठेतरी माझ्या मनाच्या कोपर्‍यात तो आवाज, ते हास्य अजूनही भुंगा घालत होते. पण आता त्या आवाजात थोडा फरक पडला होता. 'हा वेगात हलत नाहीये. हा छोट्या अंतराची उड्डाणे करतोय.' म्हणजे याच्या तलवारीचे पाते छोटे असले पाहिजे अन्यथा तो स्वतःला देखील दुखापत करेल. उडता उडता हल्ला करायचा म्हणजे त्याला फार जास्ती त्रिज्येचा वार करता येणार नाही व सर्व ताकद ही पात्याच्या टोकात एकवटली जाणार. म्हणजे मी थोडासा मागे झुकलो तरी मी प्राणघातक जखमेपासून वाचू शकतो. 'ऑ फरीन. कमाल आहेस मनुष्या. तियानाकच्या हल्ल्यातून वाचणे शक्य नाही अन्यथा.' हा आवाज वेगळा आहे.
"तो माझा आहे." तो राक्षस माझ्या चेहेर्‍याच्या अगदी जवळ येत बोलला. त्याने जीभेने मला एकदा चाटले व तेवढ्याच तत्परेतेने पुन्हा त्याच्या हल्ल्याच्या पावित्र्यात गेला. अखेरीस मी कितीवेळ वाचणार होतो? 'घाबरु नकोस. तू तियानाकला आवडला म्हणजे तो तुला मारू शकत नाही.' "तू माझ्या लक्ष्याला जर असेच शिकवीत राहिला तर मी नक्की त्याला मारणार" 'तू विसरतोयस कि मी तुला सहज पकडू शकतो पण तू या मनुष्याकडूनच धडा शिक.'
हे काय चालू आहे? पण या नादात त्या राक्षसाचा संतुलित ताल बिघडलाय. आम्| हीच माझी सुवर्णसंधी आहे. फक्त तलवारीचे पाते घट्ट धरायचे आहे. आम्| तू त्याच मार्गात आहेस जिथे तू मला पाहिजे आहेस. आम्| याच वेगाने ये आणि मग.......
फर्रर्रकन तो राक्षस तलवारीतून आरपार झाला. जसे वितळायला लागल्यावर लोण्याचा एक थर दुसर्‍या थरावरून घसरतो तसे त्याचे मस्तक धडावरून घसरले. त्या जखमेच्या इथून कसलासा धूर बाहेर येत होता. मी आजूबाजूला नजर फिरविली. माझे सर्व साथी यातर मरण पावले होते किंवा अजून २ प्रहर तरी उठण्याच्या स्थितीत नव्हते. तिथेच एका झाडावर दोन प्रेते लटकत होती. वर्णन तर जुळते आहे म्हणजे हेच ते दोन हेर. म्हणजे आमचे काम झाले होते. काहीजण परत पालेम्बंगला पोचले असणार. अर्थात या घनदाट जंगलातून वाट काढत जायचे म्हणजे अजून एखाद प्रहर तरी सेना येणार नाही असे दिसते.
तेवढ्यात त्या कैद्याच्या प्रेतात हालचाल सुरु झाली. परत एक लढाई. हरकत नाही, मी तलवार अधिक घट्ट पकडली व वीरासनात तयार होऊन बसलो. ते प्रेत शांतपणे उठले त्याने स्वतःचे डोके धडाला जोडले. माझ्याकडे न बघताच त्याने काही क्षण काहीतरी विचित्र मुद्रा केल्या. जणू तो कोणाला बंदिस्त करीत आहे. मग तो माझ्याकडे वळत प्रसन्नपणे हसला. तो काही पाऊले पुढे आला तसे मी अधिकच सावध झालो. पण त्याने किंचित झुकून अनपेक्षितरीत्या मला प्रणाम केला.
"मी तुझ्यावर बेहद्द खूश आहे मनुजा. मला पमानानान्गल म्हणतात पण कदाचित तुझ्या भाषेत याचा अपभ्रंश पमाण्णा अधिक शोभेल." (हा तोच आवाज!)
~*~*~*~*~*~

"हाच दुसरा दरवाजा" बळवंत चित्कारला. यावेळचा दरवाजा पूर्वीपेक्षा बराच मोठा होता. एका दरीत ते उतरले होते. छोटीशीच नदी बाजूला वाहत होती. मंजूने तिचे पाणी हलकेच चाखून बघितले व लगेच थुंकून टाकले. ती नदी मृत्युपंथास लागली होती. ते पाणी फारच मचूळ होते व किंचित कडवट चवही लागत होती. शाम मंजूला फार काही नाही झाले ना हे बघायला धावला. बळवंत ते पाहून किंचित स्तिमित झाला. शाम आता मंजूकडे आकर्षित होऊ लागला होता. पण लहानपणीपासून मंजूवर जीव असलेला, तिचा मित्र असलेला बळवंत याने खूश होण्याची सुतराम शक्यता नव्हती. जोवर हे एका मर्यादेत होते तोवरच तो हे बघणार होता. पण आता शामने पहिली पायरी चढली होती. पण आत्ता या क्षुल्लक गोष्टींसाठी वेळ नव्हता. त्यात पमाण्णाकाका सोबतीला होते. त्यामुळे बळवंतने हे विचार मनातून तात्पुरते झटकून टाकले.
अग्रज व प्रताप त्या दरवाज्यावरची लिखावट निरखत होते. प्रतापने यावेळी अग्रजकडून ती भाषा व लिपी थोड्याफार प्रमाणात शिकून घेतली होती. प्रतापने या अभ्यासात असाधारण गती दाखवली होती. अग्रजसुद्धा त्याने आश्चर्यचकित झाला होता. दोघे मिळून त्यावरचा संदेश जाणून घेत होते.
"याची कळ इथल्याच कुठल्यातरी दगडाखाली आहे. गेल्यावेळसारखीच साधारण व्यवस्था आहे."
"हम्म संदेशतर बरोबर वाचला आहेस प्रताप. पण इथे तो दगड कसा शोधायचा. शेंदरी दगड दिसणे खरे अवघड जायला नको आहे पण....."
त्या नदीला कधीकाळी जोरदार वेग असणार. ठिकठिकाणी अर्धवट रांजणखळगे होते. कदाचित पूरही आला असणार पण त्यात तो दगड वाहून गेला तर?
सर्वजण डोक्याला हात लावून बसले होते.
"मालक आपण दरवाजा तोडला तर?" यावेळी बरोबर आलेल्या पमाण्णाने पृच्छा केली.
प्रतापने मान हलविली. "त्या दरवाजाच्या बाहेर छोट्या खाचा दिसत आहेत? त्यातून दगडाच्या चौकोनी दोन शिला बाहेर येऊन चेचतील दरवाज्याबरोबर छेडछाड करणार्‍या माणसाला."
"माणसाला ना?" पमाण्णा तुच्छतेने हसला.
तो उठून चालू लागला. बळवंतही तिरमिरीत उठला पण तेवढ्यात अग्रजने त्याला थांबवले.
"त्याची ताकद तो अखेर दाखवणार तर"
प्रताप चकित होऊन अग्रजकडे पाहू लागला. अग्रजने कागदपत्रांचा सखोल अभ्यास करुन सर्व इतिहास जाणून घेतला काय?
पमाण्णाने इकडे सरळ त्या ३० फूट उंच व १० फूट रुंद द्वारावर लाथ घातली. लगेच खट् आवाज झाला आणि त्या दोन शिळा बाहेर आल्या. पण डोळ्याची पापणी लवण्याच्या आत पमाण्णाने दोन्ही हातांनी त्या शिळा थांबवल्या. क्षणभर काहीच नाही झाले मग हळूहळू त्या शिला तुकडेतुकडे होत मातीत मिसळल्या. सर्वजण अवाक् होऊन पाहत होते. ते द्वार फुटून आत एक भगदाड तयार झाले होते. पमाण्णा अनवधानाने लगेच आत शिरला आणि त्याला ती छोटीशीच लिखावट दिसली.
' मला माहित होते कि दगड हरवल्यावर फक्त तूच हे द्वार तोडशील. पण इथून पुढे असे शक्तिप्रयोग नकोत. इथे रस्ता बंद झाला नाही पण पुढे होईल.'
पमाण्णाच्या चेहेर्‍यावर स्मितहास्य आले. जर हा माझा मालक असता, गुणवर्धन् व आदित्यवर्मन् पेक्षाही हा हुशार आहे. पण मग त्याने मला माझ्या हेतूत सफल होऊ दिले असते?
एवढ्यात त्याला मागे हालचाल जाणविली. त्याने लगेच ती लिखावट पुसली व तो अदबीने म्हणाला
"खजिन्याच्या दुसर्‍या दालनात मालकांचे व त्यांच्या मित्रांचे स्वागत असो."
~*~*~*~*~*~

हैबतराव जहागीरदार स्वस्थ बसले होते. ते खलबत्त्यात सुपारीबरोबर कसले तरी चूर्णदेखील कूटत होते. आजच्या काळात त्याला कदाचित आपण anti-depressant म्हणू. मुधोजींच्या मृत्यूची कथा व पमाण्णाबद्दलची माहिती जेव्हा त्यांना त्यांच्या वडीलांनी सांगितली होती तेव्हा नाही म्हणायला त्यांना ती थट्टेवारी न्याविशी वाटली होती. पण त्यांनी त्यांच्या वडीलांना त्या सावटाखाली, दहशतीखाली वावरताना पाहिले होते. जहागीरदार घराण्याच्या मूळ तामसी प्रकृतीला सुलभ अशा इच्छा पूर्ण करताना दहादा विचार करावा लागत होता. पमाण्णाची यावर प्रतिक्रिया काय होईल? तो बर्‍याचशा आज्ञा पाळायचा खरा पण जर तोवर कोणी मुलगा मोठा झाला आणि त्याला मालक बनविले तर? अशा कोंडीत हैबतरावांना ते चूर्ण खायची सवय जडली होती. समोर पमाण्णानेच तयार करुन दिलेले कसले तरी तिलिस्मी यंत्र होते. ते साधारण एखाद्या शंखासारखे दिसत असले तरी त्यातून धोक्याची अचूक सूचना मिळत असे. त्यातून मंदसे स्वर निघत होते. जर एखाद्याने लांबून ऐकले असते तर त्याला ते स्तोत्रासारखे वाटले असते. पण कान देऊन ऐकता ते अंगावर येणारे कर्कश स्वरात म्हटलेले संगीत होते. त्यात फक्त बेसुर व भेसुर आलाप व ताना होत्या. शत्रू चालून येत असल्याची निशाणी होती ती. पण हे हैबतरावांना माहिती होते कि असा हल्ला होणार होता त्यामुळे ते काहीच न करता शून्यात बघत सुपारी कुटत होते.
"सरकार" एक नोकर आत डोकावला. तो हैबतरावांचा खास हेर होता. त्याने जरुर काहीतरी खबर आणली होती. तेवढ्यात समोर ठेवलेला शंख तडकला व त्याचे कैक तुकडे झाले. त्या तुकड्यांनी एका बंदिस्त आकृतीचे स्वरुप घेतले. पण ते तुकडे तरीही जिवंत वाटत होते. हे पाहून नाही म्हटले तरी तो हेर अचंबित झालाच. पण हैबतरावांनी हात उंचावत त्याला थांबण्याचा इशारा केला. त्या आकृतीला निरखीत त्यांनी खलबत्त्यातील मिश्रणाची एक गोळी बनवून जीभेवर ठेवली. त्यानंतरचे त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव पाहून त्या हेराला कसेसेच वाटले.
"मायकपाळला वेढा घातला जातोय."
"जी? तुमास्नी कसे कळले?"
"खबर बदल आता. मायकपाळला वेढा पडला."

क्रमशः

पुढील कथासूत्र इथे - http://www.maayboli.com/node/52767

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायस,

कादंबरी मस्त चाललीये. एक शंका आहे. बंगालचा उपसागर, मलाक्काची सामुद्रधुनी, सुंदची सामुद्रधुनी, हिंदी महासागर यांपैकी कोणत्या संज्ञा तत्कालीन आहेत? मला वाटतं बंगालचा उपसागर हे बरंच अर्वाचीन नाव आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै - तुमची शंका बरोबर आहे. यातली कुठलीही नावे तत्कालीन नाहीत; असली तर मला माहित नाही. आता ही त्रुटी आहे खरी, पण आता तत्कालीन संज्ञा शोधून बदल करणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते.