विधिलिखीत?

Submitted by aschig on 13 January, 2009 - 12:28

(आशिष महाबळ)
(२००८-०६-१४ चे LAMAL विषयः इतिहास)

ही गोष्ट आहे मला अचानक भेटलेल्या एका व्यक्तिची आणि तिने बदलवुन टाकलेल्या जगाची. कधी नव्हे ते रेमो सभागृहामध्ये स्केप्टीक सोसायटीच्या भाषणाला वेळेवर पोचल्यामुळे उशिरा येऊन "एक्स्क्युज मी" म्हणत पुढुन जाणाऱ्यांचा त्रास सहन करायची पाळी माझी होती आज. बाजुच्या खुर्चीत साधारण पंचेचाळिसिच्या एक महाराष्ट्रियन वाटणाऱ्या मॅडम येवुन अशाच विराजमान झाल्या. "आज-काल वादविवाद-वजा जास्तच भाषणं असतात, नाही का?", असा वक्तव्य वजा प्रश्न विचारुन त्यांनी स्वत:ची ओळख अनामिका देव-तबकडिवाला अशी करुन दिली. म्हणजे त्या महाराष्ट्रियन असल्याचा माझा कयास बरोबर होता तर. पण बाई कोणत्यातरी पारशी माणसाचे नाव पण आपलेसे करुन बसल्या होत्या. सर्व-धर्मियतेचा तो आणखिन एक छोटासा विजय असे मी मनातच म्हणालो. सध्या कॅलटेकला त्या भेट देत होत्या. भाषण सुरु झाल्याने आमच्या संभाषणात खंड पडला. साधारण अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे मला झोप येऊ लागल्यामुळे मी काढता पाय घ्यायचा ठरवला. शेजारी पाहिले तर बाई आधीच गायब झालेल्या.

त्या घटनेचा मला विसर देखिल पडला होता. त्यानंतर काही महिन्यांनी मात्र त्यांचा एक प्रबंध प्रसिद्ध झाला आणि त्यांना नोबेल पारितोषिक तसेच गणिताचे सर्वोच्च फिल्ड मेडल मिळणार हे नक्की झाले. असा विश्व दुभंगवणारा प्रबंध होताच मुळी तो. विश्व्योत्पत्ति मागे लागुन मानवाने अनेक गुढांचा उलगडा केला होता. क्वांटम मेकॅनिक्स नी असे दाखवुन दिले होते की विश्वाचा बहुतांश कारभार हा शक्याशक्यतेच्या बळावर चालतो. अणु-परमाणुंच्या एकमेकांवर आपटण्याच्या शक्याशक्यतेच्या जोरावर मुख्यतः सर्व घडामोडी होतात. आईनस्टाईनला देखिल जिथे हे सुरुवातिला पटले नव्हते तिथे तेंव्हाच्या इतर बहुतांश मर्त्यांना ते पचवणे अर्थातच कठीण गेले होते.

या सहजासहजी न पटणाऱ्या प्रकाराला वळसा घालुन जणु जुन्याच ज्ञानाचे वर्चस्व राखण्याकरता तेंव्हा पासुन मल्टीवर्स, मेनी वर्ल्ड्स सारख्या कल्पनांना उधाण आले होते. थोडक्यात सांगायचे झाले तर काही लोकांचे म्हणणे होते की ज्या क्षणी कोणताही निर्णय घेतल्या जातो, भले तो निर्णय घेणारा एखादा जीवरहीत हायड्रोजन अणु का असेना, विश्वाचे दोन परिपूर्ण भाग होतात. दोहोमध्ये फरक एवढाच की एकात जणु निर्णय असा झाला आणि दुसऱ्यात तसा. जणु काही प्रत्येक छोट्या-मोठ्या निर्णयाबरोबर हे अतिविश्व एका नवनव्या फांद्या फुटत जाणाऱ्या वृक्षाप्रमाणे बनते. अनेक वैज्ञानीक या गोष्टिंना तपासुन पहाता येतील अशी भाकीत करता येत नसल्यामुळे हस्त-रेखांवरुन भविष्य सांगण्याप्रमाणेच निकालात काढत. या वेगवेगळ्या विश्वांची एकमेकांशी देवाणघेवाण असते काय यावरही एकमत नव्हते. काही वैज्ञानिकांचा कयास होता कि यातच कुठे तरी काळप्रवासाचे गुपीत दडले असावे. इतिहासात फेरफार करता येऊ शकेल का याबद्दल देखील विचार करणाऱ्यांची संख्या थोडी नव्हती.

अजुन सिद्ध न झालेल्या वैज्ञानीक कल्पना जणु त्या सर्वमान्यच आहेत असे दाखवून, त्यातील आपल्याला उपयोगी पडतील असे मोजके भाग वापरुन त्यांची झालर आपल्या काळ्या कारवायांना घालु पहाणा्ऱ्या भोन्दुंचे मात्र त्या मुळे फावले होते. या जगापलिकडचे जग किती रम्य आहे, आणि ते प्राप्त करण्याचा मार्ग कसा केवळ अनुभुतीतुनच प्राप्त होतो, पण यांना पैसे दिले तर हे मदत करु शकतील वगैरे. इतिहासात फेरफार करणे हे इतिहास लिखित स्वरुपात उपलब्ध होऊ लागला त्या आधीपासुनच सुरु होते. खरेतर एकदा लिहिल्यागेल्यानंतर त्यात बदल झालेला सहज ओळखु यावा. पण सत्ताधिशांचा वरदहस्त असल्यावर देवादिकांचेच जिथे चरित्र बदलल्या जायचे तिथे इतरांचे काय सांगावे. चोर नेते बनत, लुच्चे महाराज बनत तर साधे लोक कसेबसे जीवनक्रमण करत. या लोकांना इतिहास बदलवायला काळप्रवासाची गरज नव्हती. पृथ्वीवर अंधःकाराचे साम्राज्य वाढत होते.

अशी एकुण परिस्थिती असतांना बाईंनी मेनी वर्ल्ड्स सत्य असल्याचे सिद्ध केले होते. क्वांटम मेकॅनिक्स व्यतिरीक्त विसाव्या शतकातील दुसरा महत्वाचा शोध म्हणजे सापेक्षतावादाचा. क्वांटम मेकॅनिक्सचि तत्व लागु होतात ती अतिसुक्ष्माला तर सापेक्षतावादाची महाकाय वस्तुमान असणाऱ्या गोष्टींना. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन सिद्धांतांचे विश्वाबद्दल एकमत नाही. जिथे दोन्ही सिद्धांतांचे डोमेन्स एकत्र येतात तिथे मोठाच पेच निर्माण होतो. सुदैवाने हे केवळ दोन ठिकाणी होते. जिथे आकारमान शुन्य असतं आणि तरीही वस्तुमान अफाट म्हणजेच विश्वनिर्मितीच्या वेळी आणि कृष्णविवरांमध्ये. ही कृष्णविवरे इतर विश्वांच्या श्वेतविवरांना, अर्थात क्वासार्सना जोडलेली असतात हा तसा जुना असलेला कयास त्यांनी सिद्ध केला होता. यातुनच वेगवेगळी विश्वे एकमेकांशी देवाणघेवाण करु शकतात हे त्यांनी दाखवीले.

या मुळे खरेतर पुनर्जन्म, स्वर्ग-नरक यांचा पाठपुरावा करणाऱ्यांचे फावायला हवे होते. पण त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारुन त्या प्रकाराचाही विमोड केला होता. या बाबतीतले त्यांचे संशोधन एका बुवाबाजीवरुनच बहुदा सुरु झाले होते. काही शतकांपुर्वीचे आवाज ऐकु येणाऱ्या एका जागेचा उल्लेख त्यांच्या प्रबंधात होता. त्या तथाकथीत घटनेत त्या जागी झालेल्या एका युद्धाचे आवाज काळात आरोपीत झाले होते व विशीष्ठ प्रसंगांना ते पुन्हा ऐकु येत. एखाद्या कृष्णविवरामध्ये एखादी गोष्ट जेंव्हा पडते तेंव्हा त्याबद्दलची माहिती नष्ट न होता आपल्याच विश्वात रहाते हे व्हीलर हॉकिंग ई. प्रभुतिंनी आधीच दाखविले होते. ती बाब आणि युद्धाच्या आवाजांचे लुटुपुटुचे मॉडेल वापरुन त्यांनी एका विश्वातुन दुसऱ्या विश्वात काय दळणवळण होऊ शकतं याचा सखोल अभ्यास केला होता.

या पुढे जावुन त्यांनी हे दाखविले की आपल्या शरीरात जसे ‘ब्लड ब्रेन बॅरीअर’ मेंदु पर्यंत पोचणाऱ्या रक्तातुन हानिकारक रसायनांना दुर ठेवते त्याचप्रमाणे एक प्रकारचा जैवीक अडथळा वेगवेगळ्या विश्वांमधिल सजीवांना वेगळे ठेवतो. त्याचा दुसरा अर्थ असा की पलिकडे जे बाहेर येतं ते जवळपास पुर्णपणे निराकार, निरागस आणी तितकंच निर्जीव असतं. आपल्या इतिहासाला धडक बसायची शक्यता नसते. आपल्या भविष्याचेच नाही तर आपल्या भूताचे देखिल आपणच वाली असतो. ज्याप्रमाणे आयुष्य जरी अनेक वर्षांचे असले तरी आपला फोकस आज किंवा हा आठवडा, महिना किंवा फार-फार तर हे वर्ष इतकाच असतो, त्याचप्रमाणे इतर स्त्रोतांपासुन येणारे धक्के हे अल्पजिवी व एकमेकांना मारक असतात. विश्व आणि काळ अविरत बदलत रहाणार, विनासायास पुढे सरकत रहाणार.

अशातऱ्हेने त्यांनी विज्ञानाच्या प्रगतीला मोठाच हातभार लावला होता. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मुलनातही मदत केली होती. गम्मत म्हणजे त्यानंतर न त्यांचा दुसरा एखादा प्रबंध प्रकाशित झाला न त्यांच्याबद्दल काही कानावर आले. जणु काही एखाद्या विज्ञानदुताप्रमाणे त्या आपली कामगिरी करुन अंतर्धान पावल्या असाव्यात. त्यांच्या नावाचा आणि त्याचा काही संबंध असेल का न कळे. त्यांच्या मुळे जग जास्त रहाण्यायोग्य मात्र खचीतच झाले होते.

गुलमोहर: 

कुच जम्या नही रे! सोंगटि झाली ...
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
http://www.peshawai.blogspot.com
:::::::::::::::::::::::::