वारसा भाग १

Submitted by पायस on 19 January, 2015 - 10:08

पूर्वसूत्र इथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52349

**ते मंदिर**
हा अचानक गारवा कसला? पाठीखालची खाटही मऊमऊ लागतीये. हे काय गवत? मी गवतावर झोपलोय? पुरुषभर उंचीचे गवत? गणेशखिंडीच्या जंगलातही असे गवत नसते. हा काय आवाज? "डुमाटिंग सा डुमाटिंग सा, हिंदी नताताकोत, डुमाटिंग सा डुमाटिंग सा" कोण बरे असेल तिथे? चालुया का असेच पुढे? या गवताचा स्पर्श असा ओळखीचा का वाटतो? अरे हे काय? हे आहे तरी काय? घंटांचा आवाज? मंदिर तर नव्हे? "नपाकाबुती, डुमाटिंग सा डुमाटिंग सा" हा कोणाचा आवाज असावा? मी माझ्या पुण्यातल्या खोलीतून इथे कसा आलो? ही जागा नक्की पुण्यात नाही. ही कसली ओढ वाटतीये मला, हा आवाजही जणू आत ये, आत ये, घाबरू नकोस, आत ये, शाब्बास अजून थोडे - डुमाटिंग सा डुमाटिंग सा. मंदिर जवळ येतेय, माझ्याकडे सरकतेय, नव्हे मीच पुढे चाललोय, मी चालतोय. हा कोण उभा आहे, याचे कपडे ना भारतीय ना ब्रिटीश. एखादा अदिवासीच भासतो हा.
"मलिगयांग पगडेतिंग पांगिनून. कुंग अलिंग विका आंग दापत कोंग माकिपागुसाप?"
हा काय बरळतोय? नवटाक झोकलिये की काय? "आपण कोण? मी कुठे आलोय? हे एक मंदिरच आहे ना?"
"मघिंतय. मस्यदोंग मारामिंग म्गा काटानुंगन. ही मराठी भाषा आहे ना? मालक काय सेवा करु मी आपली?"
"मालक? मला फक्त इथून पुण्याला जायचा रस्ता सांगा."
"इतक्या वर्षांनंतरही तुम्हाला फक्त परत जायचा रस्ताच हवा आहे. ठीक आहे. तशीही तुमची सत्य जाणून घ्यायची वेळ आलेली नाही. चला माझ्याबरोबर."
आता माझा हा दत्त मला कोणीकडे नेतो? हा रस्ताही काहीसा विचित्रच आहे. तसे सर्वकाही धूसरच दिसते पण पायाला फक्त गवतच जाणवतेय. एक काटा बोचला तर शप्पत! याचा चेहराही नीट दिसला नाही. "आलो मालक आपण, इथून १० पावले सरळ चाला." १० पावले? एवढ्याजवळ पुणे आहे? एक दोन तीन चार... जरा मागे बघतो, धुके ती आकृती धुक्यात का लुप्त होतीये, अरे मी का चाललोय पुढे - पाच सहा सात आठ नऊ, द.........हाआआआआआआ. खाली जमीनीच नाहीये.
"परत भेटू मालक"
"नाहीSSSSSSSS" अरे मी तर माझ्या खोलीतच आहे. कोंबडाही आरवला. आजतर मायकपाळला जायला निघायचंय. मद्रास मेल चुकायची. चला आवरलेच पाहिजे. स्वप्नावर काय नंतरही विचार करता येईल.
~*~*~*~*~*~

डिसेंबर १८९६

पुण्यासाठी हा काळ खडतर होता. प्लेगची साथ नुकतीच पसरायला सुरुवात झाली होती. हॉंगकाँग मधून बॉम्बे मध्य आधी हा प्लेग पसरला व मग पुण्यात त्याची लागण झाली. पुणे तेव्हाही तडफदार विद्यार्थ्यांचे शहर होते. पण अशा आपत्तीशी कोण लढेल? १८९७ यापेक्षा वाईट असणार होते. चित्राहुती-प्राणाहुती देता देता प्राणांची आहुती जाणे हा रोजचा खेळ बनणार होता. काही वर्षांनंतर विचार करता फर्ग्युसन मधल्या त्या विद्यार्थ्यांचा निर्णय अतिशय शहाणपणाचा तरी वाटणार होता किंवा निखालस वेडेपणाचा.
पुणे रेल्वे स्थानकावर नेहमीपेक्षा जास्ती वर्दळ होती. बॉम्बे-पूना मेल हा एकच पर्याय. तीच गाडी पुढे डबा बदलून मद्रास मेल. ४ विद्यार्थी तिथे याच मद्रास मेलच्या सुटण्याची वाट पहात होते. काळ कोणताही असो पण कॉलेजचे विद्यार्थी उत्साहाने सळसळणारे असलेच पाहिजे हा नियम बनणार नाही का? "आपल्या तीर्थरूपांना सांगा असले नियम"

विषयाला तोंड फुटले. भविष्यातील भारत व फर्ग्युसन हा त्या कंपूचा आवडता विषय. टिळक गुरुजी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार यावर मात्र एकमत. वर्षाभरापूर्वी त्यांचे दुसरे दैवत आगरकर गुरुजींचे निधन झाले होते. आता या प्लेगच्या साथीचे निमित्त साधून मंडळी पुण्याबाहेर पडली होती. घरी जाण्यात कोणाला फारसा रस नव्हता. त्यात भरीस भर प्रतापच्या आजोबांचे निमंत्रण आले. मग पुण्याबाहेर राहायचेच आहे तर प्रतापच्या वडिलोपार्जित वाड्यावर वेळ काढू. "शिंचे हे इंग्रज शिपाई जास्ती त्रास देणार बघ." शामने गाडी सुटता सुटता वाक्य टाकले.
"म्हणजे बघा हं. आता यांना प्लेग तपासणीसाठी म्हणे विशेषाधिकार देण्यात येणार आहेत. म्हणजे साक्षात सैतानाला थैमान घालायची परवानगी! कसे?" शाम कोकणातून आलेला लिटरेचरचा विद्यार्थी. वेळास पाशी कुठेतरी त्याची वाडी होती. तशी त्याची चण छोटीशीच होती पण तरतरीत, गोल चेहरा व बोलके डोळे तसेच अखंड बडबड करण्याची प्रवृत्ती यामुळे तो लगेच सर्वांच्या नजरेत भरे.
"आरं असं कसं? वस्तांदांची आण हाय, एकेकाला पट काढून आस्मान दाविन. त्यांच्या बाचं राज हाये जनू"
प्रताप यावर गालातल्या गालात हसला. बळवंत नावाप्रमाणेच बलवान होता. तालमीचा पठ्ठ्या. बळवंतराव नावाने तो त्याच्या सहपाठ्यांमध्ये प्रसिद्ध होता. पण प्रताप नेहमीच त्याला बल्लु म्हणत असे. ७ फूट उंचीचा बल्लु प्रतापचा अत्यंत भरवशाचा सहकारी होता. बल्लुचे गाव मायकपाळच्या जवळच होते. त्याचे पूर्वज ३ पिढ्यांपासून प्रतापच्या घरी चाकरी करीत होते. प्रतापचा अंगरक्षक म्हणून पुढे बळवंतची वर्णी लागणार हे निश्चित होते.
शामने इथे मोर्चा बळवंतकडे वळवला होता. आता व्हिक्टोरिया राणीचे राज्य म्हणजे एका अर्थाने इंग्रजांच्या बापाचेच राज्य नाही का? प्रताप तिकडे लक्ष देत नव्हता. त्याने नजर बळवंतच्या शेजारी वळवली. अग्रज! अग्रे जातः सः अग्रजः प्रताप स्वतःशीच पुटपुटला. मोठ्या अपत्याला अग्रज प्रत्ययरुपाने जोडणे पुणेकरांसाठी फारसे नवीन नव्हते पण हा नक्की कुणाचा अग्रज? अग्रज मुळचा पुण्याचाच. त्या तिघांमध्ये आवडीने शास्त्र व गणित शिकणारा तो एकटाच. एकदा खुद्द टिळकांशी त्याला गणित संबंधी काही चर्चा करताना प्रतापने स्वतः पाहिले होते. दोघांच्या अंगकाठीत फारसा फरक नव्हता. पण प्रतापच्या काहीशा चौकोनी चेहेर्‍यासमोर अग्रजचा मूळचाच निमुळता चेहरा अजूनच लांबुळका दिसे. आत्ता सुद्धा तो त्याच्या एका चोपड्यात डोके खूपसून बसला होता. केंब्रिजसाठी अभ्यास करीत असणार. परांजपे या वर्षी केंब्रिजला जाण्यात यशस्वी झाल्यावर फर्ग्युसनच्या सर्वांचाच होरा होता कि आता अग्रज पुढचा केंब्रिजवीर असणार. केवळ या सुप्त आकर्षणामुळे प्रतापने अग्रजला पुण्याबाहेर पडण्यास तयार केले होते. इतक्यात अग्रजने डोके वर काढले - प्रताप अजून किती वेळ चालणार रे प्रवास?
"तशी गाडी कोल्हापूरच्या आधी थांबत नाही. पण वाईच्या जवळ गाडी रूळ बदलते. मी गार्डशी बोलून ठेवले आहे. तिथे आपल्याला २-३ लघु उतरून घेण्यास मिळावेत. माझे आजोबा पमाण्णा म्हणून आमचे विश्वासु सेवक आहेत त्यांना एक छकडा घेऊन पाठवणार आहेत. तो वेळ धरुन तरी अजून दीड-दोन प्रहर. रस्ता खराब आहे अन्यथा लवकरही पोहोचलो असतो."
अग्रजने मान डोलावली व परत पुस्तकात मान खुपसली. प्रताप लहानपणी शिक्षणासाठी सोडलेल्या गावाला आठवत होता. पण शामची बडबड चालूच होती - पुढे कहाण्यांमध्ये आपल्या सारखीच मुले असतील नाही? काय म्हणतात ते गोरे? स्टीरिओटाईप होईल. कसे?
~*~*~*~*~*~*~

एक छकडा वेळेत उभा होता खरा. गार्डचे आभार मानत चौघेही खाली उतरले. त्याला त्याची दक्षिणा देऊन ते छकड्यात जाऊन बसले. पमाण्णांनी गाडी हाकायला सुरुवात केली. ते साधारण त्यांचे काका शोभले असते. कभिन्नकडे झुकणारा काळा वर्ण, अंगात बंडी, डोईला मुंडासे व हातात एक काठी बैल हाकण्यासाठी.
"काय पोरांनो प्रवास नीट झाला ना?"
"होय पमाण्णा. मी ओळख करुन देतो. बल्लुला तुम्ही ओळखताच. आता चांगलाच मोठा झालाय. तुम्हाला मदत करायला लागेल हा हा म्हणता. हा शाम. बरं का शाम पमाण्णांना गप्पा मारायला खूप आवडते. आणि त्यांच्या दिसण्यावर जाऊ नकोस. त्यांना जवळपास सर्व काही माहित असते. आणि हा अग्रज. हा खूप हुशार विद्यार्थी आहे. याच्याबद्दल सांगू तितके कमीच आहे."
"आरं समदं आत्ताच सांगायलास. बरं पोरांनो माझे नाव पमाण्णा. मला प्रतापच्या आजोबांचा मदतनीस समजा पण तसा माझी खरी जबाबदारी वाड्याची रखवाली करणे. प्रतापचे वडील ४ वर्षांपूर्वी गेले तेव्हापासून माझे व त्याच्या आजोबांचे काम अजूनच वाढले. प्रताप कर बाबा शिक्शान पूर्न लवकर आनि आम्हाला या व्यापातून सोडव. पिराजीबाबाची आण!"
अग्रज पमाण्णांकडे टक लावून बघत होता. पमाण्णांच्या गळ्यात एक जाड साखळी होती. तिची चमक गेलेली असली तरी ती चांदीची असल्याचे लपत नव्हते. बैल चांगलाच तगडा होता. तो आरामात चालला होता. पमाण्णा घाई करीत होते. अंधार व्हायच्या आत पोचणे गरजेचे होते.
" तुझ्या गावाचे नाव फार विचित्र आहे रे प्रताप. मायकपाळ काय?"
"अरे असे सांगतात की सीतेला वनवास काळात इथे भूदेवी म्हणजेच तिच्या आईने दर्शन दिले होते. मग तिने माय पुढे कपाळ टेकले म्हणून मायकपाळ. गावाजवळच एक राम-सीता-लक्ष्मणाचे मंदिर आहे. तीच आमची कुलदेवता."
"अस्से काय. बाकी कुठे कोणती कथा ऐकावयास मिळेल काही नेम नाही."
अरे देवा! अग्रज ओरडला. एक बैल जखमी होऊन पडला होता. "जनावर पंजा मारून गेले वाटते. आता काही जगत न्हाई हा."
"पमाण्णा हा बाकी आपल्या कपिलेचा गोर्‍हा वाटतो. आता असाच दिसत असेल नाही?" - बळवंत
" छोटे अंगरक्षक. तो गोर्‍हा गेला. त्याला एके रात्री वाघूर उचलून घेऊन गेले." पमाण्णा उद्गारले.
सगळेच काही क्षण शांत बसले. तिथून पुढच्या रस्त्यात फारसे कोणी बोलले नाही. पण जर ते तिथेच उतरून काही अंतर चालले असते तर त्यांना एक बिबट्या फाडलेला मिळाला असता. तर गाडीने तुडविलेले, छिन्नविछिन्न मानवी शव रुळांवर पडले होते. "मालकांची आज्ञा त्यांच्या नातवाला व मित्रांना छकड्यातून सुखरुप आणणे. त्या वाघराने अडथळा आणला खरा पण आज्ञा म्हणजे आज्ञा. तसाही एक छकडा उचलून आणणे कितपत अवघड आहे?"
~*~*~*~*~

चौघांचेही वाड्यावर जहागीरदारांनी अर्थात प्रतापच्या आजोबांनी स्वागत केले.
"प्रवास खूप लांबचा होता. तुम्ही थकले असाल. पमाण्णा यांच्या गूळपाण्याची व्यवस्था करा. जरा हुशार व्हा. मी दिवेलागणीच्या वेळेस तुम्हा सर्वांची ओळख करुन घेईन. मांसाहार करता? प्रताप व बळवंतला चालतो मला माहीत आहे. नाही? हरकत नाही. पमाण्णा आज शाकाहारी भोजन असेल हे आमच्या बल्लवाचार्यांना कळवा. चला येतो मी."
नमस्कार करुन सर्वांना मागे आडावर हात-पाय धुण्यासाठी नेण्यात आले. अग्रजला मात्र दोन गोष्टी सतावत होत्या. पमाण्णांच्या गळ्यातली साखळी अजिबात हालत नाही. जणू गळ्याला पट्टीप्रमाणे चिकटवली आहे. आणि एक किमान प्रथमदर्शनी रामोशी वाटणारा माणूस एका ब्रिटिशांशी चांगले संबंध राखून असलेल्या जहागीरदाराचा रखवालदार कसा?

क्रमशः

(ऐतिहासिक टीपा - पुण्यात प्लेग १८९६ मध्ये पसरला हे सर्वश्रुत आहेच. उल्लेखिलेले परांजपे म्हणजेच रँग्लर परांजपे जे १८९६ मध्ये केंब्रिजला रवाना झाले. आगरकर १८९५ मध्ये स्वर्गवासी झाले. बॉम्बे-मद्रास रूट १९०० च्या आत सुरु झालेला होता. मद्रास मेल हेच तिचे नाव का हे मला माहित नाही. कोणाला तिथे बदल हवा असल्यास तसे सुचवू शकता. या गोष्टीत गूढाबरोबरच इतिहासालाही महत्त्व असणार आहे म्हणून ही खबरदारी.
Happy )

पुढील कथा इथे - http://www.maayboli.com/node/52429

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती मोठे? मला जर काही अंदाज देऊ शकलात तर मी तसा बदल पुढील भागांपासून करू शकेन. आत्ताच्या भागाच्या दुप्पट पुरेल? आणि अहो जाहो नको हो. मी तसा लहानच आहे अजून.

बर्‍यापैकी मोठा आहे हा भाग!
अजुन मोठे आले तर स्वागतच! फक्त २ भाग येण्यात जास्त दिरंगाई करू नका.

काल्पनिक कथेत खर्‍या व्यक्तिंचा उल्लेख चपखल बसलायं. वर्तमान, भुतकाळ सांगड छान जमलीयं.
खुप उत्सुकता वाढलीय कथेत पुढे काय होइल याची.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !! Happy