आम्ही अस्पृश्याची पोरे

Submitted by Devadatta Parulekar on 20 November, 2014 - 07:36

विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
 
नका दे‌ऊ अन्न
नका दे‌ऊ पाणी
नका दे‌ऊ थारा
पहा हा अस्पृश्य
 
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
 
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
 
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
 
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
 
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू
नामयाचा बाप
परि तो अस्पृश्य?
 
जनीची साजणी
दीनांची मा‌उली
संतांची सा‌उली
तरी ती अस्पृश्य?
 
तुम्हा ती अस्पृश्य
आम्हा ती पवित्र
दिसते सर्वत्र
भेटते सर्वत्र
 
आज झालो आम्ही
अस्पृश्याची पोरे
घेतसे कवेत
आमुची आ‌ई
 
देवदत्त परुळेकर मो.क्र. ०९४२२०५५२२१
२०-११-२०१४

Group content visibility: 
Public - accessible to all site users