पाऊस आणि माती

Submitted by पल्ली on 8 January, 2009 - 02:36

बरसलेल्या पावसाच्या आठवणी
मातीच्या आत आर्त असतात...
एकेका आठवणींचे नंतर
हिरवे अंकुर फुलतात.
वर्षभर सार्‍या ऋतुंत
माती वाट पहाते पावसाची,
धो धो श्रावण असो,
वा अवचित हलका वळीव असो,
मातीला तो कसाही हवा असतो.
हिरव्या हिरव्या पानांखाली
माती आतुर खोल असते,
पाऊस बरसुन गेला तरी
मातीच्या शरिरी ओल असते.
पावसाचा एकेक थेंब,
माती आपल्या कुशींत जपते . . .
पावसाच्या शितल सरीत
माती तृप्त गार मऊ होते,
पावसाच्या प्रत्येक थेंबानं
माती अवघी सुगंधी होते.

गुलमोहर: 

अगदी, पाऊस पडुन गेला किं मग मातीला एक वेडावुन टाकणारा मस्त , मादक गंध सुटतो. पल्ली, तुझ्या प्रत्येक कवितेला तो गंध जाणवतो मग ती पावसावरची असो वा अन्य कुठला विषय असो.

मस्तच गं !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

पाऊस अनुभवायला मिळाला तुमच्या कवितेतून... मस्त आहे कविता...!

एक प्रश्नः

एकेका आठवणींचे -> इथे "एकेका आठवणीचे" हे बरोबर वाटेल का? म्हणजे एक असेल तर आठवण पण एकवचनीच हवा ना!

एकेका आठवणींचे नंतर
हिरवे अंकुर फुलतात.>>>

मला वाटतं इथे 'आठवणींचे' हा शब्द हिरवे अंकुर याच्याशी संलग्न आहे. हिरवे अंकुर हा अनेकवचनी शब्द असल्याने 'आठवणींचेच बरोबर आहे.

माते, ठिक आहे ना माझं स्पष्टीकरण ?

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

पटतंय विशाल, धन्यवाद स्पष्टीकरणाबद्दल... Happy

माझा टायपायचा त्रास वाचला. खरतर मी बदल करणार होते पण.... विशालचे म्हणणेही पटले. मी गप्प बसले.

बरसलेल्या पावसाच्या आठवणी
मातीच्या आत आर्त असतात... >>>> सुरुवातच इतकी अचुक आहे कि कविता आपोआप उलगडत जाते...

खुप छान पल्ली... आताशा तुझं नाव पाहिलं की वाचल्याशिवाय पुढे जाणं होतच नाही... Happy

फारच सुंदर!!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

विलाप, थांकु. सगळ्यांचेच आभार

तुझी कविता वाचली आणि ते चित्र डोळयात उभे राहीले . शब्दात किती ताकद असते. ती ताकद योग्य व्यक्तीला गवसली की त्या ताकदीची जाणीव होते . अप्रतिम !

मस्त कविता पल्ली...प्रत्येक ओळ वाचताना मातीच्या सुंगंधाची आठवण आली..पावसाचा गारवा ही जाणवला..:)
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

मी ह्या कवितेच नाव "अनामिक ओढ" अस ठेवल असत... मला पाउस जाणवलाच नाही.. जाणवली ती ओढ...

खरंय सत्यजीत, ही ओढ आहे, अनामिक ओढ Happy खरतर ही मातीची कविता आहे, पावसाची नाही.